बशर नवाझ साहेब - दहा गझला आणि भावानुवाद

Submitted by बेफ़िकीर on 30 July, 2015 - 00:48

Bashar Nawaz.jpg

परिचय बशर साहेबांच्या गझलांचा:

बशर नवाझ साहेब - १८ ऑगस्ट १९३५ ते ९ जुलै २०१५

नुकतेच निवर्तलेले उर्दूचे महान शायर बशर नवाझ हे अस्सल उर्दू गझलच्या परंपरेतील एक शेवट-शेवटचे शायर म्हणता येतील.

बशर साहेबांनी बाजार, लोरी, जाने वफा अश्या चित्रपटांसाठी गीतलेखन केले. त्यांनी रेडिओवरील 'सारे जहाँसे अच्छा' ह्या मालिकेच्या सव्वीस तर टीव्हीवरील 'अमीर खुस्रो' ह्या मालिकेच्या सर्व तेरा भागांचे लेखन केले होते. गुलाम अली, मेहंदी हसन, लता मंगेशकर, तलत अझीझ अश्या दिग्गजांनी बशर साहेबांच्या गझला गायल्या.

बशर साहेबांची पद्मश्रीसाठी नामांकनही झालेले होते.

बशर साहेबांसोबत मला आठ एक वेळा तरी निकटचा सहवास मिळाला. आपल्यापेक्षा सर्वच बाबतील लहान असणार्‍याला प्रोत्साहन देताना बशर साहेब त्याला मार्गदर्शनही करत असत. दाद देण्याची त्यांची शैली खास होती. त्यांचे स्वतःचे गझल सादरीकरण अप्रतीम होते.

वयाने केव्हाच पंचाहत्तरी पार केलेली, पांढरी शुभ्र दाढी, कोड असल्याने चेहर्‍याचा रंग पूर्णतः बदललेला, शार्प डोळे, खर्जातल्या आवाज शेर ऐकवणे आणि दादही देणे! बशर साहेबांच्या रुपाने अ‍ॅटिट्यूड नसलेला असा एक दुर्मीळ बुजुर्ग उर्दू शायर हरपला असे म्हणावे लागेल.

बशर साहेबांच्या दहा गझलांवरील भाष्य करण्याच्या ह्या मालिकेची जबाबदारी शिरावर घेताना माझ्या मनात कल्लोळ आहे. आंधळ्याने हत्ती कसा वर्णावा अशी चिंता आहे. पण लहान तोंडी मोठा घास घेऊन एक पाऊल पुढे टाकण्याचे धाडस करतो. आशा आहे आपल्याला ही मालिका भावेल.

===========

बशर नवाझ साहेबांची पहिली गझलः

चुभो के याद के नश्तर उदास कर देगा
ये हंसता बोलता मंजर उदास कर देगा

वरवर दिसायला सगळे काही आलबेल असले आणि हसत खेळत चाललेले असले तरी ह्या पातळीला येण्यापर्यंत किती किती काय घडून गेलेले आहे. समोरचे हे सुखद दृश्य स्वतःमध्ये शेकडो स्मृती दडवून बसलेले आहे. माझी नजर त्या स्मृतींपर्यंत पोचत आहे. हे सुखद दृश्य मला उदास बनवेल, जुन्या कित्येक आठवणींचे शल्य बोचून मला उदास करेल

इक उम्र जिसकी मुलाकात के लिये तरसे
किसे खबर थी वह मिलकर उदास कर देगा

तिच्या एका भेटीसाठी आयुष्यभर तरसलो होतो. असे वाटत होते की एकदा ती भेटली की आपल्या ह्या सगळ्या तडफडाटाचा अंत होईल, सुखद अंत होईल. आयुष्यभर तिची वाट पाहण्याचे सार्थक होईल. पण हा आयुष्याने दाखवलेला दैवदुर्विलास असा की ती भेटल्यावर इतकी परकी परकी, अनोळखी असल्याप्रमाणे वागली किंवा इतकी वेगळीच वाटली की त्याने मी आणखीनच उदास झालो. ती जणू परकीच कोणी होती.

दिला के याद कई भुले बिसरे अफसाने
किसी गली का कोई घर उदास कर देगा

ती अरुंद गल्ली, ते हळूच एकमेकांकडे चोरून पाहणे, एकमेकांना पाहण्यासाठी सगळ्यांच्या नजरा चुकवत छप्परावर येणे, डोळ्यांमधून अविरत होणारे ते संवाद, त्या हुरहुरी, ती मनाची तडफड, ते रात्री खिडकीतून बघून हसून खिडकी बंद करणे! आज कित्येक वर्षांनी त्या गल्लीतून चाललो आहे. जुन्या हजारो कहाण्या आठवून ते घर मला उदास करेल.

जिसे भुलाने की खातिर यहाँ तक आ पहूँचे
उसीके नाम का सागर उदास कर देगा

तिला विसरण्यासाठी मी मद्यपान करायला इथे आलो. आणि किती विचित्र ही अवस्था, की तिच्याच नावाने हा प्याला घेत असताना हा प्याला मला उदास करणार असे दिसते.

थमा के उम्रके हाथों मे चंद टूटे ख्वाब
गुजरते लम्हों का लश्कर उदास कर देगा

एक वैश्विक सत्य! काही अपूर्ण, भंगलेली किंवा विखुरलेली स्वप्ने आयुष्याच्या हाती सोपवून जाणार्‍या क्षणांची पलटण मनुष्याला उदास करेल.

किसी के कुर्ब से रौशन ये लम्हा-ए-शादाब
अकेल देख के अक्सर उदास कर देगा

कोणाच्या तरी समीपतेमुळे प्रज्वलीत झालेले हे रंगीन क्षण, पुढे मला एकटे पाहून नक्की उदास करतील.

कोई सी मौज कहीं भी बहाके ले जाए
रुका रुका ये समन्दर उदास कर देगा

हा शेर मोठा गहन आहे. समुद्रातल्या लाटा अश्या उफाळत आणि धावत असतात जणू आयुष्य म्हणजे खूप काही हालचाल, चैतन्य, प्रवास वगैरे आहे. पण एक संपूर्ण समुद्र म्हणून त्याकडे पाहिले तर कसले काय? सगळे जागच्या जागीच असते. जेव्हा आपल्या मनाला ही जाणीव होईल की आजवर केलेले सर्व प्रयत्न, प्रवास, तडफड हे सगळे निरर्थक होते, एका बंद समुद्रातील निरर्थक वादळे होती तेव्हा आपण नक्की उदास होऊ.

आशा आहे की आपल्याला ही गझल आवडली असेल.
==================================

बशर नवाझ साहेबांची ही दुसरी गझल देताना उर्दू गझलेतील अनेक संकेतांची प्रकर्षाने जाणीव होत आहे. हे सगळे संकेत दुखर्‍या नसांना छेडणारे संकेत आहेत. मी तर म्हणेन की चांगली गझल रचणे एक वेळ सोसेल पण चांगली गझल पचवणे फार अवघड जाते. कारण त्यातून मनात उलथापालथी होतात. आवंढे येतात. क्षणभर थबकल्यासारखे होते.

वो बोलता महताब लबे-बाम नही है
क्या जाएं अब उन गलियों से कुछ काम नही है

ती होती तेव्हाचे दिवसच काही और! रात्री सगळीकडे निजानिज झाली की ती छतावर यायची! हळूच नकाब दूर सारायची! हरवल्या हरवल्यासारखी अंधाराकडे बघत राहायची. मग आपणही आपल्या घराच्या छतावर पावलांचा आवाज न करता जायचो. पण तिला स्त्रीसुलभ जाणिवांमुळे आपली चाहुल लागायचीच. तरीही न बावरता आणि नकाब न घेता ती तशीच दोन क्षण आपल्या डोळ्यांत डोळे मिसळायची आणि हसत हसत नकाब घेत खाली जायची. तिचा चेहरा आणि डोळ्यातून केलेले संवाद म्हणजे जणू बोलता चंद्रच! नंतर सगळेच बदलले. ती दुसर्‍या कोणाची तरी झाली. आता ते छतही नाही. आपले घरही नाही. आता त्या गल्लीशी आपला काय संबंध?

मनसूब इसी नाम से हो जाता है अक्सर
वह दर्द भी जिस दर्द का कुछ नाम नही है

मला माझं मन मोठं ठेवावं लागतं! कोण जाणे कोणते अनामिक दु:ख कधी येईल आणि माझ्या मनात बस्तान बसवेल! ज्या दु:खाला स्वतःचा धड काही परिचयही नाही असेही दु:ख शेवटी माझेच दु:ख म्हणून मिरवून घेते!

दुसरा एक अर्थ - माझी सगळी दु:खेच अशी की ज्यांना धड काही नांव, धड काही कारणमीमांसाच नाही. असली तरी ती चारचौघात सांगता येण्यासारखी नाही. माझ्याशी संबंधीत सगळी दु:खे ही अशीच!

वैसे भी तो होनी थी किसी दर्द की बारिश
बदले हुवे मौसम पे कुछ इल्जाम नही है

शब्दार्थ थेट आहेच! पण म्हणायचे असे आहे की आता कोणताही ऋतू येवो, जावो, त्याने काय फरक पडणार आहे? आता सगळे दिवस असेच दर्दभरे असणार आहेत. हळूहळू हे दर्द वाढतच जाणार आहे.

बादल तो उसी सिम्त से आते है मगर अब
लिख्खा हुवा उन पर कोई पैगाम नही है

निसर्गात काय बदल होणार आहे म्हणा तसा? ढग अजूनही त्याच दिशेने इकडे येतात. पण आता त्यांच्यावर माझ्यासाठी काही निरोप लिहिलेला नसतो. ती जेव्हा माझ्यापासून दूर जाऊनही माझ्यावर प्रेम करत असे तेव्हाच्या काळी तिच्याकडून आलेले ढगही असे वाटत जणू तिने माझ्यासाठी पाठवलेला कोणतातरी निरोप घेऊन आलेले आहेत. पण नंतर हळूहळू ती तिच्या संसारात, मुलाबाळांत रमली. हळूहळू माझे महत्त्व तिच्यालेखी कमी कमी होत गेले आणि एक दिवस ते पूर्ण संपलेही असेल. मग त्यानंतर मी तिच्या पूर्ण विस्मरणात गेलो असेन. आता त्या दिशेने येणारे ढग निरोप घेऊन येत नाहीत, कसलाच! (कालिदासाचेही महत्त्व अ‍ॅकनॉलेज करणारा एक प्रकारचा शेर म्हणता येईल हा)

तमगे की तरह सीने पे रुसवाई सजा ले
कुछ और तो सच्चाई का इनाम नही है

तिच्या प्रेमात पागल होऊन आयुष्यभर वेड्यासारखा वागलास. सगळे जग तुझी छी थू करत हसले तुझ्यावरती! सगळेजण आपापल्या भौतिक विकासासाठी झटत असताआ तू तिच्यासाठी वेड्यासारखा भटकत, फिरत राहिलास. हाती काय लागले? फक्त बदनामी! ठीक आहे. आता हीच बदनामी स्वतःच्या छातीवर एखाद्या पदकाप्रमाणे मिरव मित्रा!

=======================

बशर नवाझ साहेबांच्य ह्या तिसर्‍या गझलेत त्यांनी उर्दूची अस्सल नजाकत हरवत चाललेली असून एकेकाळी ती कशी होती ह्याचे वर्णन करणारा एक शेर रचला आहे. उर्दू आणि मराठी ह्या भाषांचा पोतच वेगळा आहे. उर्दू भाषेत, अदबीत आणि संस्कृतीतच गझलियत आहे. मराठीत जे म्हणायला एक उतारा लिहावा लागतो ते उर्दू अनेकदा दोन ओळींत सांगून मोकळी होते. प्रश्न पडतो की का असे? अनेक उत्तरे मिळतात. खरे तर एक स्वतंत्र लेखनच होईल ते! मराठीकडे विनय, अदब, शान ह्या गोष्टी कमी प्रमाणात आहेत. भावनांची पराकोटीची तीव्रता काव्यात गुंफण्याइतके कटू आणि भीषण अनुभव मराठीने तितके घेतले नाहीत जितके उर्दूने ते शतकानुशतके घेतले. माणसातील पशूत्व आणि देवत्व ह्या दोन्हींचा अतिरेक इस्लाममध्ये झाला, मराठीत तो तितका झाला नाही. असो!

ख्वाब अपने हुए दुनिया के हवाले कितने
खो गये इन ही अंधेरों मे उजाले कितने

आपण स्वतःसाठी बघितलेली स्वप्ने दुनियादारी करता करता दुनियेचीच स्वप्ने होऊन गेली. प्रयत्न आपण केले आणि इतरांचीच स्वप्ने पूर्ण होत राहिली जी कधी आपण पाहिली होती. दुनियेने जणू स्वप्न पाहण्याचा आपला हक्कच काढून घेतला. ह्या 'गम-ए-रोजगार'च्या अंधारात कित्येक भावनिक प्रकाशाचे पुंजके हरवले.

क्या पता क्या है उधर फिर भी नजर ने अपनी
रंग दीवार के उस पार उछाले कितने

तिकडे तिचे घर आणि इकडे आपले! मधे एक मोठी, उंच भिंत! नुसते आवाज येत असत. कधी ती गुणगुणत असे, कधी हसत असे, कधी तिचे पैंजण वाजत, कधी बांगड्या वाजत तर कधी ती भरभरून बोलत असे. ती दिसते कशी, तिचे नांव काय कशाचीच कल्पना नाही. पण आपण इकडे आपल्याच स्वप्नांत मश्गुल होऊन त्या भिंतीकडे बघत बसत असू! जणू तिच्या प्रत्येक रुपाचा सण साजरा करण्यासाठी, त्या सोहळ्यात सहभागी व्हायला आपण आपल्या नजरेतून आपल्या भावना तिकडे पाठवत असू! तिला शेवटपर्यंत कळलेही नसेल की एक वेडा भिंतीच्या पलीकडे फक्त आपला वावर ऐकायला बसून असतो.

मरना पडता है कई ढंगसे जीने के लिये
इस सदाकत को मगर माननेवाले कितने

एक साधा जन्म जगायचा तर हजार मरणे सोसावी लागतात. पण हे वास्तव (सदाकत = सत्य, वास्तव) मानणारे आहेतच किती? बहुतेकांना आरामात जगता येत आहे बहुधा! बहुधा आपणच असू ज्याला अनेक मरणे सोसून जगावे लागत असेल.

आज तक्सीम है शोलों कि यहाँ मय के एवज
देखना ये है चटखते है पियाले कितने

आज इथे दारू ऐवजी (मय के एवज) ज्वाळांचे वाटप (तक्सीम) होणार आहे. पाहण्यासारखी गोष्ट ही आहे की आता किती प्याले भरभरून फुटणार!

हा शेर जरा वेगळा आहे. जोवर आनंद मिळतो तोवरच माणसाचे मन गुंतते. एकदा दु:ख, कष्ट, अडचणी ह्यांचा सामना करायला लागला की तेथून माणसे हळूहळू पळ काढतात.

उलझने, आर्जूएं, कर्ब, खुशी, बेचैनी
जिंदगी बोझ संभाले तो संभाले कितने

हा शेर शाब्दिक शेर आहे. ह्या शेरात आशयापेक्षा लहजा (शैली), अंदाजे-बयाँ (मांडणी) ह्याला अधिक महत्त्व आहे, शेरातील खयाल साधा व थेट आहे. पण एका उद्विग्नतेतून हा शेर आलेला आहे.

रेख्ता आज सुनाये तो सुनाये किसको
मीर-ओ-मिरजा की जबाँ जाननेवाले कितने

रेख्ता हे उर्दूचे आधीचे नांव! मीर-ओ-मिरजा म्हणजे मीर तकी मीर (उर्दू गझलचा सम्राट) आणि मिर्झा गालिब (जगभरात ज्यावर सर्वाधिक लिहिले गेले तो उर्दू गझलचा मीर नंतरचा बादशाह)! ह्या शेराचाही अर्थ थेटच आहे व शाब्दिक शेरच आहे. पण ह्यात एक वेगळी व्यथा आहे. उर्दू गझलचा जो सुवर्णकाळ होता तो मीर आणि गालिबसारख्यांच्या शायरीने आणि बहादूरशहासारख्या सम्राटाच्या आश्रयाने आलेला होता. त्याकाळी चौकाचौकात शायरीवरच चर्चा चालत असे. लोकांची अभिरुची, कल्पनांच्या भरार्‍या, प्रत्येकाची शैली हे सगळेच श्रीमंत असे! हळूहळू तो काळ संपला आणि बशर साहेब ज्या काळात होते तो तंत्रज्ञानाने व्यापलेला काळ आला. त्यात सगळीकडे मिरवण्याची घाई आणि भाषेबद्दल काहीशी अनास्था हेच चित्र त्यांनी पाहिले. (एकदा माझी गझल ऐकताना ते त्यांच्या सहकार्‍याला म्हणाले होते की ही मराठीतील पोरेसुद्धा उत्तम लिहितात, नाहीतर आपल्याकडचे जुनाट विचार लिहिणारे मोठाल्ल्या वयाचे शायर नुसतेच मिरवतायत! त्यांचे हे वाक्य मी हृदयात जपून ठेवलेले आहे कारण माझ्यासाठी तो मोठा किताब आहे). तर बशर साहेब म्हणतात की त्या काळाप्रमाणे शायरी करून आणि उत्तम रेख्तामधून शेर लिहून ऐकवणार कोणाला? मीर आणि गालिबला समजणारेच मुळात कुठे राहिले आहेत आता?

धूप पी पी की झुलस जाएं जमीं तब बरसे
है घटाओं के भी अंदाज निराले कितने

हा शेर थेट अर्थाचा आहे. उन्हे प्राशून प्राशून जमीन भाजून निघाली की मग पाऊस येतो. ढगांची सुद्धा काय न्यारीच तर्‍हा आहे. पण ह्या शेरात ढग, ऊन, जमीन ही रुपके (की प्रतीके) आहेत. ती अर्थातच मानवी जीवनाशी निगडीत आहेत. शेर सरळ, साधा वाटत असला तरी त्याचा साधेपणा हे त्याचे सौंदर्यस्थळ आहे. गझलेत प्रत्येक शेरात कलाटणी, नाट्यमयता, शॉक व्हॅल्यू असायला लागते असे नाही. मनापासून, प्रामाणिकपणे केलेले एखादे सीधे-सरळ भाष्यही मन हेलावून नेऊ शकते.

एकुण काय, तर बशर नवाझ साहेबांची ही तिसरी गझल संपली! आपल्याला आवडली असेल अशी आशा आहे.
====================

आज बशर नवाझ साहेबांची गुलाम अलींनी गायलेली एक लहानशी गझल आपल्यासमोर सादर करत आहे. ह्या गझलेत फार नवीन खयाल वगैरे नाहीत, पण गायनानुकुल गझल कशी असते ह्याचे ही गझल एक उत्तम उदाहरण आहे. गेय सगळ्याच गझला असतात कारण सगळ्या गझला गझलतंत्रातच असतात. पण गायनानुकुल म्हणजे चारचौघांमध्ये सहज झिरपतील असे काव्यमय विचार असलेली, उगाच विखार, टीका वगैरे नसलेली गझल! अशी गझल कोणी मुद्दाम रचत वगैरे नसते, पण कधीकधी अशी गझल होऊन जाते इतकेच!

होठ सागर है, आँख पैमाना
हुस्न तेरा है रश्क-ए-मैखाना

ओठ म्हणजे मद्यचषक आहेत आणि डोळे म्हणजे मद्याचे प्याले आहेत. तुझे सौंदर्य तर असे आहे की मदिरालयालाही असूया वाटेल. रश्क-ए-मैखाना म्हणजे मदिरालयाला हेवा वाटावा असे!

तुमसे बिछडे तो हमने ये जाना
कितना मुश्किल है दिलको बहलाना

अर्थ थेट आहे! पण अश्या सहज शब्दबद्ध केलेल्या शेरांमध्ये शेर कोणाला उद्देशून आहे हे ठरवण्याचे स्वातंत्र्य रसिकाकडे असते. हा शेर प्रेयसी, प्रियकर, सुदैव, एखादी मरण पावलेली प्रिय व्यक्ती अश्या कोणालाही उद्देशून असू शकतो.

अपनी बरबादियों पे क्या रोये
शम्मा की जिंदगी है जलजाना

मी एक ज्योतच आहे म्हंटल्यावर जळणे हेच माझे जीवन आहे. मी नष्ट झालो ह्याचे दु:ख कशाला करत बसू?

सो गया चाँद, छुप गये तारे
कौन सुनता है गमका अफसाना

वरवर पाहता हाही थेट शेर वाटेल! पण ह्यात एक कथानक आहे. चंद्र आणि तारे लुप्त होण्याची वेळ म्हणजे पहाटेची उजाडण्याची वेळ! म्हणजे रात्रभर कवी आकाशाकडे बघत चंद्राला आणि तार्‍यांना आपली कहाणी मूकपणे ऐकवत होता. कहाणी इतकी आर्त आणि इतकी प्रदीर्घ होती की सकाळ झाली तरी ती संपेना! शेवटी कंटाळून चंद्र, तारे झोपी गेले. जणू ते म्हणाले असावेत की एवढी मोठी आणि दु:खद गोष्ट कोण ऐकत बसणारे? थोडक्यात, कवीने आणखी एक रात्र विरहात व्यतीत केली होती.

अब तो ये भी 'बशर' को याद नही
बन गया कोई कैसे बेगाना

अश्या शेराला 'मक्ता' असे म्हणतात. गझलेचा असा शेवटचा शेर ज्यात शायर स्वतःचे नांव किंवा उपनाम गुंफतो, तो शेर म्हणजे मक्ता! उर्दूमध्ये मक्ता ही परंपरा मोठ्या प्रमाणावर आहे. उपनामाला तखल्लुस म्हणतात. मराठीत सुरेश भट साहेबांनी ही संकल्पना स्वीकारली नाही. हा शेर ह्या गझलचा मक्ता आहे.

ही गझल अगदीच साधेपणाने विचार मांडते. त्यामुळेच ती जनसामान्यांना त्वरीत आवडू शकते व त्यामुळेच गायली जाण्यास अधिक अनुकुल ठरते. गायनानुकुल गझल श्रेष्ठ असते वगैरे असे नव्हे, पण सुश्राव्य नक्कीच असते. लज्जिता वृत्तातील ही गझल आपण कधीतरी ऐकली असेल किंवा ऐकाल अश्या शुभेच्छा व्यक्त करून थांबतो.

===============

आदाब अर्ज है! बशर साहेबांची ही पाचवी गझल देताना अर्धी जबाबदारी पार केल्याच्या आनंदापेक्षा आता अर्धेच काम उरल्याचे दु:ख मला अधिक होत आहे. आत्तापर्यंतच्या गझला साध्यासुध्या, सरळ खयाल मांडणार्‍या होत्या. आजची गझल हा एक अनुभव असेल. सागराची गाज रात्री ऐकण्यासारखा, बाहेर पडू न देणार्‍या रिपरिप पावसासारखा, कधीच उजाड झालेल्या वस्तीचे अवशेष पाहिल्यासारखा आणि रडून झाल्यानंतर येणार्‍या भक्कपणासारखा!

सुरेश भटसाहेबांची 'सुन्या सुन्या मैफिलीत' ही गझल ज्या हिरण्यकेशी वृत्तात आहे त्याच वृत्तातील बशरसाहेबांची ही गझल सादर करत आहे.

कहीं नमी तेरे आसूओंकी, कही तबस्सुम की रौशनी है
तू दूर है फिर भी तेरी खुशबू हरेक शै मे बसी हुई है

सुगंधाला गझलेमध्ये महत्त्वाचे स्थान मिळाले. विशेषतः प्रेयसीच्या वावराबरोबर तिच्या आजूबाजूने दरवळणारा तिचा सुगंध, ती सोडून गेल्यानंतरही तो सुगंध मनात साठून राहणे आणि अचानक अनेक वर्षांनी कशामुळेतरी त्या सुगंधाची पुन्हा आठवण येणे, मन गलबलणे वगैरे उल्लेख उर्दू गझलेने मनोभावे पूजले. असफल पण तीव्र, उत्कट व काहीश्या अव्यक्त प्रेमात ह्या सुगंधाने मोठीच कामगिरी बजावली. खरे तर उर्दू शायरीतील विविध संकेत ह्यावर एक वेगळीच लेखमाला लिहावीशी वाटत आहे, पण ते नंतर! माझ्या गझलेवर उर्दू गझलचा प्रभाव असल्याने माझ्याही गझलेत अनेकदा हा सुगंध आपले स्थान राखून असतो. वरचा शेर थेट आहे पण माहौल तयार करणारा मतला आहे. (मतला = गझलेचा पहिला शेर). मतला ऐकल्यानंतर रसिकाची मनस्थिती तयार होते. ही मनस्थिती एका लवचिक साच्यासारखी असते ज्यात पुढील खयालांचा अर्क हळूहळू सोडता येतो. विशेषतः मुसल्सल गझलमध्ये ही आस्वादप्रक्रिया प्रभावी ठरते. (मुसल्सल = एकाच विषयावर असलेल्या शेरांची गझल)

इस एक चेहरे को दूरियों ने हजार चेहरा बना दिया है
हर एक परछाई पर गुमाँ है तलाश जिसकी थी वो यही है

पहिली ओळ उत्तम शेराचे उदाहरण ठरावी! तो एक चेहरा, ज्याची प्राप्तीची कामना होती, तो सोडून गेल्यानंतर आता अशी अस्थिर मनोवस्था झाली आहे की त्या चेहर्‍याच्या शोधात असताना समोर आलेला प्रत्येक चेहरा तसाच वाटत आहे. जणू एका चेहर्‍याला ह्या लांब जाण्याचे हजार चेहर्‍यांमध्ये रुपांतरीत केले आहे. कोणाचीही सावली दिसली तरी शंका येते की अरे ही तिचीच सावली तर नाही?

तुम्हारे जाने से वक्त ठहरा न चाँद-सूरज ने राह बदली
उसी तरह है तमाम लेकिन कोई न कोई कहीं कमी है

शेर थेट व सरळ अर्थाचा आहे. पण काहीतरी 'वजा' असण्याचे महत्त्व अधोरेखीत होत आहे. जगावे तर लागत आहे, जसे आधी जगत होतो तसाच आजही जगत आहे. सभोवताली सगळे काही तसेच आहे. तीच माणसे, तेच रस्ते, त्याच गल्ल्या, त्याच घटिका! पण तू नाहीस! मग काय उरले? एक तू इथे असायचीस म्हणून ह्या सगळ्या रुक्षपणावर मन जडलेले असायचे.

पुरानी तस्वीरें सब वही है मगर ये कैसी मिटी-मिटी है
नुकूश ही कुछ बदल गये है कि गर्द हालात की जमी है

हा शेर शब्दार्थापलीकडचा आहे. येथे तस्वीरचा अर्थ छायाचित्र असा घेणे योग्य होणार नाही. डोळ्यासमोरची नेहमीचीच दृश्ये आजही (कित्येक वर्षे झाली, पण) तशीच आहेत पण आता सगळी निर्जीव, निरर्थक आहेत. ह्या इलाक्याचे जणू नकाशेच बदलून गेलेले आहेत (नुकूश = नकाशाचे अनेकवचन) आणि धुळकटलेली जमीन आहे. (गर्द = धूळ). जमीनीला धुळकटलेले म्हणण्यामागे 'जमीनीवर आधी काय काय असायचे ते आता अस्पष्ट होऊन गेलेले आहे' असे म्हणण्याचा हेतू आहे. ही धूळ काळाची धूळ आहे, लाखो क्षणांची धूळ आहे.

हा शेर शब्दार्थापलीकडे घेण्याचे कारण म्हणजे हा शेर फक्त 'जुदाई = विरह' ह्या विषयावरचा आहे असे नाही तर विस्मृतीत गेलेले बालपण, सोडून गेलेली इतर कोणीही माणसे, नैसर्गीक आपत्तीमुळे उजाड झालेली एखादी वस्ती अश्या कश्यावरही लागू होणारा शेर आहे. आपलेच बालपण जिथे गेले ते घर कित्येक वर्षांपूर्वी आपण सोडून स्थलांतरीत झालेलो असलो आणि अनेक दशकांनी त्या घराचे अवशेष पाहायला मिळाले तर कसे वाटेल? हे मनाला गलबलायला लावण्याचे सामर्थ्य मी जितके उर्दू गझलेत पाहिले तितके इतर कशातही नाही पाहिले. कदाचित माझ्या मनाचा साचा तसा असेल.

वही है मिलना, वही बिछडना, वही चराहों की तरह जलना
हर एक किस्सा मगर जुदा है हर इक कहानी मगर नई है

आता ह्या शेराकडे आणखीनच वेगळ्या नजरेने बघता येते आहे का बघा बरे? तुम्ही समजा रेल्वे प्लॅटफॉर्मवरचे फेरीवाले आहात! रोज शेकडो माणसे तुमच्याकडून काही ना काही वस्तू विकत घेऊन जातात. गाडीत बसून दिसेनाशी होतात. तुमच्याकडे दररोज येणारे ग्राहकही असतात आणि त्यांचा आणि तुमचा थोडा परिचयही होतो, थोड्या गप्पाही होऊ शकतात. पण एक अशी व्यक्ती असते की जी तुमच्याकडून कधीच काही घेत नाही पण नेमका तिच्या लोकल ट्रेनचा डबा तुमच्या स्टॉलसमोर लागतो. ती खिडकीतून रोज दोन तीनदा तुमच्याकडे बघते आणि तुम्ही बघता. एक शब्दांपलीकडचे नाते निर्माण होते. रोज तुम्हाला सोडून जाणारे शेकडो जण असतात. पण ही व्यक्ती रोज त्याच लोकलमधून सकाळी जाते आणि संध्याकाळी येते. एक शब्दही न बोलता फक्त गहिर्‍या नजरेने बघते. आणि अचानक एक दिवस ती स्टॉलसमोर उभी राहून डोळ्यांत पाणी आणून म्हणते, "ही माझ्या लग्नाची पत्रिका, नक्की ये, आता मी इथे दिसणार नाही"! मला तर हे लिहितानाही रडावेसे वाटत आहे. बशर साहेबांनी दोन ओळींत हे सांगताना कोणत्या ईश्वरी प्रतिभेचा आशीष वापरला असेल कोण जाणे!

असाच एक इतर उर्दू शेर आहे, तो द्यायचा मोह होत आहे.

वो रोज रोज जो बिछडे तो कौन याद करे
जो एक रोज ना आये तो याद आये बहुत

मित्रांनो, उर्दू गझल प्यावी तितकी अधिक हवीशी वाटते. बाकी काही लिहीत नाही. शेवटच्या शेराच्य अनशेत आजचा दिवस घालवेन म्हणतो.
======================

आज बशर साहेबांची सहावी गझल देत आहे पण ह्यावेळी अर्थाविनाच देत आहे. गझल सोपी तर आहेच पण शब्दार्थांचीही विशेष गरज नाही आहे. ही गझल गुलाम अलींनी गायलेली आहे.

ह्या गझलेतील तिसरा शेर अफाट आहे.

जब तेरी राह से होकर गुजरे
आँख से कितने ही मंजर गुजरे

(मंजर = दृश्य)

तेरी तपती हुई साँसों की तरह
कितने झोंके मुझे छूकर गुजरे

उम्र यूं गुजरी है जैसे सरसे
सनसनाता हुआ पत्थर गुजरे

जानते है कि वहाँ कोई नहीं
फिर भी उस राह से अक्सर गुजरे

अब कोई गम न कोई याद 'बशर'
वक्त गुजरे भी तो क्यूं कर गुजरे

(क्यूं कर = कसा)
=======================

जातीच्या सुंदराला काहीही छानच दिसते असे म्हणतात. अगदी घरगुती साडीमध्येही सुंदर स्त्री सुंदरच दिसते. पण ही स्त्री जेव्हा मन लावून शृंगार करते तेव्हा तिचे सौंदर्य अनेक पटींनी वाढते.

गझलेचेही असेच आहे. मुळात गझल गेय असल्यामुळे आणि तरल काव्यप्रकार असल्यामुळे सुंदर असतेच. पण बशर नवाझ साहेबांच्या ह्या सातव्या गझलेत जशी सुमधूर भाषाही गझलेने ल्यायली आहे तशी नटलेली गझल काही औरच खुलते.

शबनम के आईनों मे गुलों की जवानियाँ
मौसम सुना रहा है दिलों की कहानियाँ

पहाटेच्या दवाच्या आरश्यांमध्ये फुलांच्या तारुण्याची प्रतिबिंबे आहेत. प्रेमाने व्यापलेल्या अनेक हृदयांच्या कथा मोसम ऐकवत आहे. हा मतलासुद्धा माहौल तयार करतो. पुढे कोणत्या प्रकारचे खयाल ऐकायला मिळतील ह्याचा एक लवचीक साचा तयार करतो.

बहती नदी, भटकती घटा, झूमती पवन
मिलती है कितने रंग मे तेरी निशानियाँ

अर्थ थेट आहे. पण एरवी विरहाने व्याकुळ, दु:खाने पोखरलेल्या कवीमनातून असे रंगीनमिजाज विचार ऐकायला मिळाले की आपल्यालाही असे वाटते की शायराचा एकदम उत्तम मूड लागलेला दिसतो आहे.

आणि पुढच्या शेरात बसतो एक झटका!

तनहाईयों की ऋत भी सुकूं से गुजार दे
आये मगर न याद तेरी मेहेरबानियाँ

मी आता इतकी मनःशक्ती प्राप्त केलेली आहे की हा एकांतवास मी सहज सोसू शकेन. हा विरह, तू मला सोडून जाणे अगदी सहज सहन करू शकेन. किंबहुना ते सोसण्यातच मी एक सुकून, एक समाधान मिळवू शकेन. फक्त (हे खुदा, एक उपकार कर की) तिने प्रेमात माझ्यावर केलेले उपकार मला स्मरू नयेत. कारण ते स्मरले तर माझ्या विव्हळ मनाला परत वाटू लागेल की तिच्याही मनात थोडेसे प्रेम होतेच. मग हे मन पुन्हा तिच्याकडून त्या प्रेमाची आशा करू लागेल. मग पुन्हा हा विरह सोसण्याचे बळ निघून जाईल. पुन्हा तडफडाट होईल. तिने केलेले जे काय थोडेफार उपकार होते ते नाही स्मरले तर निदान माझ्या मनात तिची प्रतिमा नेहमीच एक पाषाणहृदयी स्त्री अशी राहील आणि त्यामुळे अश्या स्त्रीवर आपण मूर्खासारखे प्रेम केले असा विचार करून मी तो विरह सोसू तरी शकेन.

दामन की धूल में है कई तज्रुबों के फूल
गलियाँ जहाँ की यूं ही नहीं हमने छानियाँ

आमच्या पदरात जी काय धूळ आहे त्यात अनुभवाची फुले आहेत. (आमच्या पदरात धूळ आहे म्हणून आमचा तिरस्कार करण्याचे कारण नाही). आम्ही ह्या जगाच्या गल्लीबोळातून उगाच हिंडत नव्हतो. आम्ही दुनियादारीचा अनुभव घेतलेला आहे. (आज आम्ही दिसायला फकिरासारखे आणि भणंग दिसत असलो तरी हे रूप प्राप्त करायला आम्हाला अख्ख्या जगाचा अनुभव घ्यावा लागलेला आहे हे विसरू नका).

बच्चों का खेल बन गयी जीने की आरजूं
कागज की नांव और नदी की रवानियाँ

एक आयुष्य जगायचं, एक जन्म काढायचा ही इच्छासुद्धा आता लहान मुलांच्या खेळासारखी झाली आहे. आपले अस्तित्त्व म्हणजे जणू कागदाची होडी आणि जग आणि काळ म्हणजे जणू वाहता प्रवाह! कुठेही भरकटत चाललो आहोत. कसलेही नियंत्रण नाही. ना वेगावर ना दिशेवर! पण पुढे चाललो आहोत हे पाहून लहान मुले आपली नांव पाहून टाळ्या पिटतात तश्या टाळ्या तेवढ्या पिटत आहोत. (ह्या शेरात एक असहाय्यता दिसून येते पण त्यातसुद्धा शायर दुसर्‍या कोणाला दोष देत नाही तर त्या असहाय्यतेला, अगतिकतेला चांगल्याच रंगांनी रंगवतो. अनेकदा उर्दू आणि मराठी गझलेत मला हा फरक आढळतो. मराठी गझल चटकन् समाजाला किंवा कोणालातरी दोष देऊन मोकळी होते. उर्दू गझल दुसर्‍याचे दोषही खुदाका रहम असल्यासारखे प्रस्तूत करते. ह्यासाठी मन विशाल असावे लागते. विशाल मनाची माणसे जातिवंत कवी होऊ शकतात.)

इक दौर था कहानी भी लगती थी सच हमे
सच्चईयाँ भी लगती है अब तो कहानियाँ

शेर थेट आहे. लहानपणी आजी-आजोबांनी सांगितलेल्या काल्पनिक कहाण्या आणि त्यातली पात्रेही आम्हाला खरीच वाटायची. आता असे वळण आले की आजवर जे खरोखर घडूण गेले ते तरी खरंच घडले होते की एक गोष्टच वाचली होती असे वाटत आहे. इतकेच नव्हे तर जी स्वप्ने सत्यात उतरवणे सहज शक्य वाटत होते ती स्वप्नेही आता कहाण्यांसारखी काल्पनिक वाटू लागली आहेत. शाब्दिक खेळ, शाब्दिक करामती करणारे शेर सहसा श्रेष्ठ समजले जात नाहीत. महान उर्दू शायर दाग देहलवीचे असे अनेक शेर असत. पण हे शेर अनेकदा मन ढवळून काढू शकतात. मात्र ते अस्सल अनुभुतीतून उतरले असले तर! बशर साहेबांचा हा शेर कोणालाही लागू होईल असा आणि अस्सल शेर आहे. नुसतेच पहिल्या ओळीत 'गोष्टी खर्‍या वाटायच्या' आणि दुसर्‍या ओळीत 'सत्यही गोष्ट वाटते' असा विरोधाभास मांडण्याचा मोह त्या शेरात दिसत नाही.

बशर साहेबांवरच्या लेखमालिकेतील शेवटचे तीन शेर आता राहिलेले आहेत. आशा आहे की आपणा सर्वांना बशर साहेब माझ्या तुटपुंज्या व अपुर्‍या विवेचनातूनही लख्ख दिसत असतील.
============================================

बशर नवाझ साहेबांची आणखी एक ताकद आपण आज समजून घेणार आहोत. आत्तापर्यंतच्या गझला बर्‍याचश्या थेट, तरल आणि काहीश्या पारंपारीक शैलीने नटलेल्या होत्या.

आजची गझल विविध प्रतिकांनी नटलेली आहे. इमेजरीचे सामर्थ्य दर्शवणारी आहे. डोळ्यासमोर चित्र उभे राहील पण अर्थ ज्याचा त्याने लावायचा आहे. प्रत्येक शेराचा शब्दार्थ देत आहे आणि प्रतीके नोंदवत आहे. शब्दार्थापलीकडे काही अर्थ जाणवला तर अवश्य कळवावेत अशी विनंती! मला जाणवलेला अर्थ मी स्टार मार्क करून नोंदवत आहे.

उस को पाकर भी उसीके लिये रोना क्या है
रूह का जिस्म की दीवार से रिश्ता क्या है

तिच्याच (/त्याच्याच) प्राप्तीनंतरही पुन्हा तिच्याचसाठी (/त्याच्याचसाठी दु:खी होणे हा नेमका काय प्रकार आहे?
आत्म्याचे (तुरुंगासारख्या) शरीराच्या भिंतीशी नेमके काय नाते आहे?

**आत्म्याच्या रुपाने अल्लाह आपल्यात आहेच की! परत अल्लाहच्या प्राप्तीसाठी का रडावे लागते? ह्या शरीराचे आणि अल्लाहच्या त्या रुपाचे काय आणि का नाते आहे?**

ओ मेरी उम्र के तपते हुए सहरा बतला
छाँव कहते है किसे, अब्र का साया क्या है

माझ्या वाढत्या वयाच्या (वाढत्या वयाबरोबर अधिकच रुक्ष होत जाणार्‍या) वाळवंटा मला सांग
सावली म्हणजे काय असते आणि ढगांची छाया काय असते?

**बालपण आणि तरुणपणीची सगळीच मजा गेलेली आहे. आता फक्त जबाबदार्‍या आणि चिंता, ताण-तणाव! हे माझ्यातील नकोश्या परिपक्वते, ते हलके फुलके दिवस काय असतात हेही मी आता विसरू लागलो आहे**

एक सुनसान सडक धुंध मे खोयी खोयी
नक्शेपा है न कोई शम्मअ, तमाशा क्या है

धुक्यात हरवलेला एक सुनसान रस्ता
ना कोणाच्या पावलांचे ठसे ना एखादी प्रकाशाची ज्योत, हा काय तमाशा आहे?

**सगळे बरोबर आहेत असे आपण समजतो खरे, पण प्रत्येकाची वाट वेगळी आणि प्रत्येकासाठी त्याची वाट अंधुकच ठरते. ना त्या वाटेवरून आधी कोणी चाललेले असते, ना अश्या कोणाचे मार्गदर्शन मिळत ना कोणी त्या वाटेवर आपल्याला प्रकाश दाखवू शकत. एकट्यानेच चालावे लागते आणि पुढची वाट शोधावी लागते**

रेत मे फूल खिलाए थे, नतीजा देखा
एक ही मौज ये समझा गयी दरिया क्या है (उर्दूमध्ये दरिया = नदी)

रेतीमध्ये काही रोपे लावली होती आणि त्यांना फुले आली, पण त्याचा परिणाम काय झाला बघा
एकच लाट आम्हाला समजावून गेली की नदी म्हणजे काय असते

**नैसर्गीक आपत्ती, शासनाची धोरणे, ह्यामुळे उजाड झालेल्या वस्त्या कुपोषणामुळे झालेले बालकांचे मृत्यू, अश्या गोष्टी डोळ्यासमोर आल्या. 'माळीण दुर्घटना' डोळ्यासमोर आली.**

एक ही आग है सब जिसमे जले जाते है
फिर ये अहवाल सुनाने मे झिझकना क्या है

एकाच प्रकारच्या दु:खात सगळे जळून नष्ट होत असतात
मग लाज कशाची वाटते 'आपले काय झाले' हे सांगताना?

**माणूस 'लोक काय म्हणतील' ह्याचा विचार करून जगतो हे चूक आहे. प्रत्येकाचे प्रॉब्लेम्स जवळपास तसेच असतात. त्यापेक्षा स्वतःची सत्य परिस्थिती सांगितली तर निदान मनावरचा बोजा कमी होईल आणि बरे जगता येईल**

उससे छुटें भी तो क्या ऐसी कयामत होगी
उसको पाकर भी सिवा दर्द के पाया क्या है

(गंमत बघा, मतला आणि हा शेर कसे एकमेकांच्या विरोधी अर्थाने, खुबीने गुंफलेले आहेत)

तिच्यापासून मुक्तता झाली तरी काय मोठे आभाळ कोसळणार आहे
तिच्या प्राप्तीमुळे तरी दु:खाशिवाय काय पदरी पडले आहे?

** संपत्ती, आवडती स्त्री, एखादे पद, एखादी वास्तू ह्यातील काहीही**

लम्स से हाथ जले, देखे तो ठंडक पड जाए
शबनम-ए-शोला सिफत है, वो सरापा क्या है

स्पर्श केला तर हात भाजतो, नुसते दुरून बघितले तर डोळ्यांना ठंडक मिळते
आपादमस्तक एखाद्या ज्वाळेसारखे असणारे हे दव नेमके काय आहे?

हा शेर तारुण्याने मुसमुसलेल्या प्रेयसीवरचा आहे. सरापा = आपादमस्तक, शबनमे-शोला सिफत = ज्वाळेचे गुणधर्म असणारे दव, लम्स = स्पर्श!

जिला लांबून पाहिले तर बरे वाटते पण जवळ गेलो तर धग जाणवते आणि स्पर्श केला तर आपण जळून जातो. अशी दिसायला दवाप्रमाणे पण गुणधर्माने ज्वाळेप्रमाणे आपादमस्तक शरीर लाभलेली ही चीज नेमकी काय आहे?

**काही गोष्टी, माणसे ह्यांच्या आकर्षणाने अती जवळ जाऊ नये. दु:ख पदरी पडू शकते**

मला स्वतःला ही गझल फार आवडली. तुम्हाला?
==================================

बशर नवाझ साहेबांवरील मालिकेतील ही नववी गझल!

दिल के हर दर्द ने अशआर मे ढलना चाहा
अपना पैराहने-बेरंग बदलना चाहा

हृदयातील प्रत्येक दु:खाला गझलांचे शेर बनायची इच्छा झाली.
स्वतःचा रुक्ष पेहराव बदलायची इच्छा झाली.

(दु:खी सगळेच असतात, पण दु:खाला गझलेतील शेर बनवून नटवणे हे कवीचे काम)

कोई अन्जानी सी ताकत थी जो आडे आई
वरना हमने तो बहरगाम संभलना चाहा

एक अज्ञात शक्ती आमचा विरोध करत असे.
अन्यथा आम्ही तर प्रत्येक पावलावर सावरायची इच्छा ठेवून होतो.

(ही अज्ञात शक्ती म्हणजे भौतिक सुखांचा मोह! जो आपल्याला सावरू देत नाही. किंचित मिश्कील शैलीने खयाल मांडला आहे).

चाहते तो किसी पत्थर की तरह जी लेते
हमने खुद मोम की मानिंद पिघलना चाहा

वाटलं असतं तर दगडासारखे खणखणीत जगलोही असतो.
आम्हालाच मेणासारखे वितळायचे होते म्हणून वितळलो.

(इथे निर्देश केला जात आहे तो कवी आणि कवी नसलेल्या इतरांच्या मनातील फरकाकडे! आम्हीही इतरांसारखे पत्थरदिल झालो असतो, पण जगातील प्रत्येक गोष्टीनेच मन द्रवत असे त्यामुळे हळवे हळवेच बनत गेलो. अर्थात, त्यामुळे कवीही होऊ शकलो.)

आँखे जलने लगी तपते हुए बाजारों में
जब भी दिलने किसी मंजर पे मचलना चाहा

सुंदर शेर! ज्या ज्या वेळी एखादे दृश्य पाहून हृदयाला गलबलून यायचे असे तेव्हा नेमके ते दृश्य पाहून डोळ्यांना चटके लागायचे आणि मग मान फिरवावी लागायची. त्यामुळे ते दृश्य अधिक वेळ पाहताच यायचे नाही. त्यामुळे हृदयाला गलबलताच यायचे नाही. त्यामुळे हृदय 'गलबलण्याची' कुवतच, क्षमताच हरवून बसले. त्यामुळे आम्ही असे पाषाणहृदयी झालेलो असणार बहुधा!

छोडती ही नहीं पैरों को ये जंजीरे-वफा
हमने इस कैद से सौ बार निकलना चाहा

पायातून हा निष्ठेचा साखळदंड निघतच नाही.
ह्या (प्रेमाच्या) कैदेतून बाहेर पडायचे शेकडो प्रयत्न केले. (पण माझे तिच्यावरचे प्रेमच इतके अस्सल आणि खरे की त्यातून मी कधीच बाहेर पडू शकलो नाही.)

सिर्फ हम ही नहीं, हर एक ने जीने के लिये
चंद ख्वाबों के खिलौनों से बहलना चाहा

पहिली ओळ तशी भरीची ओळ असल्यासारखे आहे किंवा अधिक प्रभावीही होऊ शकली असती. पण ह्या शेरात माणसाच्या स्वप्नांना माणसाची मन रमवण्याची खेळणी असे म्हंटलेले आहे. खेळणी मोडतात तशीच स्वप्नेही मोडतात हे अप्रत्यक्षपणे सुचवलेले आहे.

उद्या ह्या मालिकेची सांगता होईल. बशर साहेबांची खासियत म्हणजे आव न आणता प्रासादिक भाषेतून तरल खयाल मांडणारी परिपक्व गझल देणे! गझल रचतानाच्या प्रवासात पाय घसरणे, पाऊल वाकडे पडणे, पाय भर्रकन् उचलला जाणे, पायात पाय येणे, पायाला ठेच लागणे, पायात काटा बोचणे असे अनेक प्रकार ओऊ शकतात. थोडक्यात, मूळ खयाल सादर करताना शब्द, संकेत, रूपके, वृत्त ह्यांचा खूप मोह होत असतो. पण त्यातून अस्सल मार्ग काढणारे मोठे गझलकार होतात. बशर साहेब हे तसेच एक मोठे गझलकार!
=======================

बशर नवाझ साहेबांवरची ही लेखमालिका आज अंतिम टप्प्यावर आली आहे. हे लेखन करण्याची जबाबदारी माझ्यावर सोपवणार्‍या मंदार फडके ह्यांचे ऋण तसेच ठेवतो. फेडू शकत नाही म्हणूनही आणि फेडू इच्छित नाही म्हणूनही!

वास्तविक पाहता बशर साहेब तर ९ जुलैलाच अल्लाकडे गेले. पण ह्या लेखमालिकेचा हा शेवटचा भाग सादर करताना ते पुन्हा एकदा मैफिलीतून कायमचे जात असल्यासारखे वाटत आहे.

एक स्वार्थ म्हणून माझ्या एका शेराला बशर साहेबांनी दिलेली दिलखुलास दाद आठवल्याचे नमूद करतो.

तो शेर असा:

आजही हसल्याप्रमाणे हुंदके देतेस तू
आणि मी रडल्याप्रमाणे भासतो हसलो तरी

बशर साहेबांवरील ही लेखमालिका मी बशर साहेबांच्याच 'करोगे याद तो' ह्या प्रशांत गुल्हान ह्यांनी निर्मिलेल्या संग्रहावरून लिहिली. ह्या निमित्ताने प्रशांत ह्यांचे आभार मानतो.

शेवटच्या भागात बशर साहेबांचे सिग्नेचर गीत सादर करत आहे. माझ्या अनुवादाने रसभंग होऊन ह्या महान शायरासमोर गुस्ताखी होऊ नये म्हणून आज फक्त शब्दार्थच देत आहे. हे गीत वाचतानाही गलबलून जायला होते. ह्या लेखमालिकेची प्रेरणा देणारे, मालिकेतील प्रत्येक भागावर प्रतिसाद देणारे आणि बशर साहेबांच्या तेजातही माझ्या काजवेपणाला उदार दाद देणारे ह्या सर्वांचे मनःपूर्वक आभार! बशर साहेबांना माझा एक जुना मक्ता अर्पण करून त्यांचे सिग्नेचर गीत सादर करतो.

मनाने 'बेफिकिर' व्हा... जन्मतो तो संपतो येथे
पुढे न्या आपली ही पोरकी मैफील दु:खांनो

चित्रपट - बाजार
संगीतकार - खय्याम
गायक - भूपेंद्र

करोगे याद तो हर बात याद आयेगी
गुजरते वक्त की हर मौज ठहर जायेगी (मौज = लाट)

ये चाँद बीते जमानों का आईना होगा
भटकते अब्र मे चेहरा कोई बसा होगा (अब्र = ढग)
उदास राह कहानी कोई सुनायेगी
करोगे याद तो हर बात याद आयेगी

बरसता भीगता मौसम धुआँ धुआँ होगा
पिघलती शम्मों पे दिल का मेरे गुमाँ होगा (शम्मा = ज्योत, गुमाँ = संशय)
हथेलियों की हिना याद कुछ दिलायेगी (हिना = मेहंदी)
करोगे याद तो हर बात याद आयेगी

बिखरते प्यार के रिश्ते दुहाईयाँ देंगे (दुहाई = तक्रार)
ये बे-जबान से पत्थर गवाहियाँ देंगे (गवाही = साक्ष)
खमोशी काँच के बर्तन सी टूट जायेगी
करोगे याद तो हर बात याद आयेगी

गली के मोड मे सुनसान कोई दरवाजा
तरसती आँखो से रस्ता किसीका देखेगा
निगाह दूर तलक जाके लौट आयेगी

करोगे याद ...... तो हर बात याद आयेगी!

आखिरी सलाम बशर साहब!

आपका गुस्ताख चहेता!

-'बेफिकीर'!
================================

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वाह बेफि,
धन्यवाद या धाग्यासाठी.. मला उर्दु पुर्ण कळत नाही..ना ही गझल लिहिता वगैरे येत; पण नेमाने वाचते मात्र.. आणि त्यांच्यातील भावना जशाच्या तश्या समजतात सुद्धा.. गझला खुप आवडतात म्हणुन कदाचित काही अपवाद सोडले तर प्रस्तावना वाचली पण खालचा भावानुवाद वाचला नाही .. आता परत एकदा संपुर्ण वाचुन काढते..

तुम्ही हरेक गझल आणि त्याच्या भावानुवाद लिहिला असता तर आणखी मजा आली असती का ?
सलग एवढं वाचन जीवावर येत.. किंवा धाग्यागणिक दोन गझला पण चालल्या असत्या ..
बाकी तुम्ही लिहिलय त्यामुळे तुमच्या विचारांचा आदरच आहे..
बर्‍याच माहिती नसलेल्या उर्दु शब्दांची ओळख झाली यामुळे..
धन्यवाद परत एकदा _/\_ Happy

विचार केला कि खुप आवडलेला एखादा शेर प्रतिसादात द्यावा पण नेमके कुठले द्यावे हे खरच ठरवु शकली नाही..एकुणएक जबरदस्त आहे..

पहिल्या दोन गझला आत्ता वाचल्या. त्या गजला आणि त्यावर तुमचे रसग्रहण...खरोखरीच सोने पे सुहागा.
लेख बराच मोठा आहे आणि या दहा रचनांचे तुम्ही केलेले रसग्रहण जरा आरामात, नीट लक्षपुर्वक वाचायला हवे.

पहिली रचना तर फारच सुरेख आहे.
" इक उम्र जिसकी मुलाकात के लिये तरसे
किसे खबर थी वह मिलकर उदास कर देगा "...आहा..खूपच छान.

ही भावना मला वाटतं की फक्त प्रियकर किंवा प्रेयसी साठीच काय पण मित्र मैत्रिणीसाठी पण तेव्हडीच चपखल बसावी.
एखादी बालपणातली मैत्रीण किंवा मित्र ज्याची/ जीची बरेच वर्षात भेट नाही. जीला भेटण्याची, लहानपणाच्या सगळ्या आठवणी तिच्याबरोबर जागवयची आपल्याला खूप उत्सुकता असावी. ती मैत्रीण मग कधीतरी अचानक भेटते. मात्र आज तिला भेटून जाणवतं की इतक्या वर्षात खूप बदल झाले आहेत. लहानपण ची मैत्रीण ती हीच का? अस वाटावं. मग त्या भेटीचा आनंद होण्यापेक्षा निराशाच व्हावी असे काहीतरी.

तसेच ही रचना " कोई सी मौज कहीं भी बहाके ले जाए
रुका रुका ये समन्दर उदास कर देगा "...केवळ आणि केवळ अप्रतिम. त्यावरील तुमचे भाष्य अतिशय सुरेख.
त्यातील रूका रूका समुन्दर....काय छान कल्पना. खूपच आवडली.

रसग्रहण आवडलंच.. पहील्या तीन गझली मधील कठीण शब्दांचे अर्थ क्रुपया द्याल का?
आठवी गझल विशेष आवडली. रसग्रहणाबद्दल अभिनंदन व खूप आभार.

उर्दू गझल! अगदी आवडता विषय!
बेफ़िकीरजी, या लेखाबद्द्ल तुमचे आभार मानावेत तेव्ह्ढे थोडेच. पुन्हा पुन्हा वाचणार हा लेख!
बशर साहेबांचे सगळेच शेर सुंदर आहेत. पण आज हा एक अगदी मनाला भिडला.
<< ख्वाब अपने हुए दुनिया के हवाले कितने
खो गये इन ही अंधेरों मे उजाले कितने
उद्या दुसराच कुठला तरी शेर आवडेल हेही तितकंच खरं Happy