काही मला म्हणायचे नाही

Submitted by जयदीप. on 8 October, 2015 - 03:44

काही मला म्हणायचे नाही
काही तुला कळायचे नाही

चल एक ते दहा परत मोजू
सध्या तुला चिडायचे नाही

होकार टाळ पाहिजे तितका
नाही कधी म्हणायचे नाही

होते तुला निघायची घाई
इतके कुठे रमायचे नाही

राहत जरी नसेन मी आता
हे घर मला विकायचे नाही

काहीतरी करेल ही इच्छा
सगळे जरी करायचे नाही

ते गाव गाव राहिले आहे
ज्याला शहर बनायचे नाही

ही आठवण बनेल म्हातारी
तोवर तिला मरायचे नाही

ही वाट दूर दूर जाते, पण
सध्या मला निघायचे नाही

जयदीप

Group content visibility: 
Public - accessible to all site users