परीकथा ३ - दिड वर्ष (facebook status)

Submitted by तुमचा अभिषेक on 29 September, 2015 - 06:26

परीजन्माची कहाणी
परीकथेचे सव्वा वर्ष
परीकथा २ - सव्वा ते दिड वर्ष

.

३१ ऑगस्ट २०१५

सध्या आमच्याकडे रोज डंबशेराजचा खेळ चालतो.
जीभ बाहेर काढून ती बोटाने त्यावर टिकटिक करते, तेव्हा तिला जेली नाहीतर चॉकलेट खायचे असते.
हाताने हवेत गोल गोल रेघोट्या मारते, तेव्हा पाटीवर खडू गिरवायचा असतो.
जेव्हा तोच हात वायपरसारखा फिरवते, तेव्हा ते गिरवलेले साफ करायला डस्टर हवा असतो.
फोन हवा असल्यास हात कानाला लावते, तर झोपायचे असल्यास तसाच हात कानाला लावत मान झुकवते. (गधडी झोपत काही नाही ती गोष्ट वेगळी)
सकाळी आंघोळ करायचा मूड होतो, तेव्हा डोक्यावर तेल किंवा शॅंपू चोळल्यासारखे करते.
दूध असो वा पाणी, अभ्यासाचे पुस्तक असो वा खेळण्यातला घोडा.. प्रत्येकाच्या खाणाखुणा ठरलेल्या आहेत.
छोटा बॉल आणि मोठा बॉल यांच्याही खुणा वेगवेगळ्या आहेत.
ईतकेच नाही तर कुठले विडीओ सॉंग लावायचे, हे देखील त्या त्या गाण्यातील सिग्नेचर स्टेप्सवरून ठरवले जाते.
एकदा ‘लहान माझी बाहुली’ गाणे लावावे म्हणून चक्क बाहुली ऊचलून आणलेली..
नाही म्हणायला कधीतरी अचानक एखादा शब्द उच्चारते, पण तो ठरवून रीपीट काही करता येत नाही.
त्या दिवशी तिला फ्रिजमधून काहीतरी हवे होते, काय हवे होते याची आम्हाला कल्पना होती. पण आता ते ईशार्‍यांनी कसे सांगते या कुतुहलापोटी मुद्दामच विचारले, "बाबड्या काय हवेय?"
तर सरळ तोंडातून शब्दच उच्चारले.., "चीज!"
आम्ही पुन्हा पुन्हा विचारले, तर तिने पुन्हा पुन्हा ‘से चीज’ केले.
गेले कित्येक दिवस आम्ही, ‘आधी मम्मी की आधी पप्पा’ याची वाट बघतोय, पण गधडी खाऊची वस्तू बरोबर बोलू लागली. या बाबतीत ही मुलगी कन्फर्म आईवरच गेलीय Happy

.
.

७ सप्टेंबर २०१५

सोफ्याच्या हातावर, खुर्चीच्या दांड्यावर..
बेडच्या काठावर, पिठाच्या डब्ब्यावर..
अन पुढच्या वर्षी खांद्यावर ..
आमच्या घरातून एक गोविंदा निघायचे फुल्ल चान्सेस आहेत Happy

.
.

१० सप्टेंबर २०१५

तेच तेच घर आणि तीच तीच माणसं, आम्हाला बोर होतात.
आता आम्ही माणसं तर बदलू शकत नाही, आणि घरही दुसरे शोधू शकत नाही.
म्हणून आम्ही घरातल्या घरातच बदल करतो.
बेडरूममधले कपड्याचे कपाट, खेचत खेचत हॉलमध्ये आणतो.
हॉलमधील टीपॉय, सरकवत सरकवत किचनमध्ये सोडतो.
खेळण्यांचा तर जन्मच इथे तिथे भिरकवायला झाला असतो.
तेच हाल आम्ही खुर्च्यांचेही करतो.
कधी पाटावर धाड पडते, तर कधी झाडूवर.
सकाळी जो घराचा नकाशा असतो, तो रात्र होईस्तोवर बदलला असतो.
मॉरल ऑफ द स्टोरी काय,
तर सिविल ईंजिनीअरच्या घरी ईंटरीअर डिजाईनर जन्माला आलीय. Happy

.
.

११ सप्टेंबर २०१५

आजकाल संध्याकाळी ऑफिसमधून घरी आल्यावर, परी हाताला धरून मला हॉलमध्ये नेते आणि पंख्याखाली बसवते.
नाही, हवा खायला नाही. तर ती तिची अभ्यासाची जागा आहे.
हातात खडू सोपवते आणि पाटी समोर धरते. रोज आम्हाला चित्ररुपात, आमचा फॅमिली ट्री काढायचा असतो.
आधी परी, मग मम्मी, मग पप्पा.. मागाहून मावश्या, आज्जी आजोबा.. एकापाठोपाठ एक सारे चेहरे, त्या दहा बाय अठराच्या पाटीवर जमा होतात. मग खेळता खेळता अभ्यास म्हणून मी एकेक अवयव उच्चारून रेखाटतो. आता परीचे डोळे, परीचे कान, परीचे नाक, कपाळावरची टिकली आणि सर्वात शेवटी केसांचे फर्राटे मारून चेहर्‍याला पुर्णाकार देतो. पण तिचे समाधान काही होत नाही. ‘पिक्चर’ अभी बाकी है मेरे दोस्त, म्हणत स्वताच्या गालाला हात लावते अन मला गाल रेखाटायला सांगते.
मग काय! कधी मिश्या काढल्या जातात, तर कधी दाढी काढली जाते. तर कधी चेहर्‍यावरच्या त्या मोकळ्या जागेत गोलमटोल टमाटर काढले जातात. पण देवाss या टू डायमेंशनल चित्रामध्ये गाल कसे काढतात हे मला आजवर समजले नाही.
सरतेशेवटी तिचाच गालगुच्चा घेऊन वेळ मारून नेतो. Happy

.
.

१३ सप्टेंबर २०१५

देवावर माझा विश्वास तसा कधीच नव्हता..
आजही नाहीयेच!
पण भूतांवर मात्र हळूहळू बसू लागलाय..
रोज सकाळ संध्याकाळ ती आमच्या अंगात येतात Happy

.
.

१५ सप्टेंबर २०१५

घोड्यावर बसून फिरायचे दिवस गेलेत..
आता घोड्यालाच उचलून फिरवायचे दिवस चालू झालेत.
कधी आम्ही त्याला पाणी पाजतो, तर कधी त्याच पाण्याने आंघोळ घालतो.
कधी प्रेमाने त्याचे तोंड चाटतो, तर कधी थाडथाड थोबाडात मारतो.
त्याची इच्छा असो वा नसो, त्याला काही ना काही अगम्य भाषेत सुनावत राहतो.
आधी तो आम्हाला या घरातून त्या घरात न्यायचा, आता आम्ही त्याची आयाळ पकडत इथून तिथे फरफटत नेतो.
असे वाटते, एका मुक्या प्राण्याने दुसर्‍या मुक्या प्राण्याशी कसे वागावे याचे कायदेकानून बनवायची वेळ आलीय Happy

.
.

१७ सप्टेंबर २०१५

लहान मुले शक्यतो दाढीवाल्यांना घाबरतात. आमच्याकडे अर्थातच उलटे आहे. कारण दाढीवाला प्रेमळ बाबा घरातच आहे.
तरी परी लहान असताना जेव्हा पहिल्यांदा मी दाढी काढून तिला दर्शन दिले होते. तेव्हा माझे सटासट रूप पाहताच, रडून रडून नुसता धिंगाणा घातलेला. तिची ओळख पटावी की मीच तिचा बाबा आहे म्हणून नेहमीच्या वाकुल्या करून दाखवाव्या लागलेल्या. अर्ध्या तासाने मला नेहमीसारखे घरच्या कपड्यांमध्ये वावरताना बघून जवळ तर आलेली, पण उचलून घेताच कितीतरी वेळ संशयिताच्या नजरेने माझ्या चेहर्‍याकडे बघत होती.
आज पुन्हा एकदा दोनअडीज महिन्यांची वाढलेली दाढी साफ केली. पण आज मात्र मला बघताच आनंदाने बागडू लागली. कदाचित तिला समजले असावे. दाढी असो वा नसो, त्यामागचा माणूस तसा चांगला आहे Happy

.
.

१९ सप्टेंबर २०१५

आज आमचा ढाई फुटीया देढ वर्षांचा झाला Happy

आजपासून "नया दौर" सुरू
घोड सवारी बंद, आणि सायकलिंग चालू Happy

Birth Day Gift - सायकल
courtesy - परीच्या मावश्या

.
.

२५ सप्टेंबर २०१५

सध्या आमच्याकडे "अफगाण जलेबी" गाणे फुल्ल हिट आहे
आणि जिला त्यावर नाचायला आवडते तिला ती उपमा सूटही होते.

एकाचवेळी जिलेबीचा गोडवा आणि तालिबानी आतंकवाद, हे तीच जमवू शकते. Happy

.
.

२६ सप्टेंबर २०१५

लोकांनाही काय एकेक उपमा सुचतील काही नेम नसतो ..
काल परी बरोबर नरेपार्कच्या गणपतीदर्शनाला गेलो होतो. तिथेच जत्राही भरली होती. तूफान गर्दी होती. पण त्या गर्दीतही मिळेल त्या जागेत ती बागडत होती. साहजिकच तिच्या पाठी पाठी मी देखील होतोच. असेच ती धावत धावत एका बायकांच्या ग्रूपसमोर आली. त्यातल्या एका बाईची नजर पडताच ती ईतरांना म्हणाली, "ए बघा ही कसली बाहुलीसारखी आहे". दुसरीही तिचीच री ओढत म्हणाली, "हो ग्ग, अगदी बाहुलीच दिसतेय". तिसरी सुद्धा पटकन बोलून गेली, "अय्या हो खरंच ग.. पांढर्‍या मैद्याची पिशवीच जणू" ... खरंच, लोकांना काय उपमा सुचतील काही नेम नसतो. हे कौतुक आहे की टोमणा, त्यावर पलटून स्माईल द्यावी की रागानेच बघावे, मला क्षणभर समजेनासे झालेले Happy

.
.

२८ सप्टेंबर २०१५

परवा रात्री उशीरा बाहेरून हादडून घरी आलो. परीलाही कधी नव्हे ते थोडेसे चॉकलेट खाऊ घातले होते. कुठून तिला सुचले देवास ठाऊक, पण ब्रश करायचा आहे म्हणत माझ्याकडे हट्ट करू लागली. मी म्हटले, ठीक आहे. तसेही रात्रीचे चॉकलेट खाणे झाले आहे, तर ब्रश करणे फायद्याचेच ठरेल. पण हा हट्ट पुरवताच तिची पुढची फर्माईश, मी सुद्धा तिच्यासोबत ब्रश करावा. काय करणार, नाईलाजाने घेतला ब्रश हातात. तसेही हे आमच्या सुट्टीचे रूटीनच आहे. दोघे सकाळी अकरा बारा वाजता एकत्र उठणार आणि आआ आआ करत सोबत ब्रश करणार. पण म्हणून रात्रीचा ब्रश !! याआधी स्वत:साठी म्हणून रात्रीचा ब्रश कधी केला होता ते आठवत नाही, पण लहानपणी सकाळचाही ब्रश करायचा आळस म्हणून खोटे खोटेच ब्रश ओला करत, आईला झाला माझा ब्रश करून म्हणत फसवल्याचे आठवतेय. त्यामुळे अश्यावेळी कधी कधी बरंच वाटते, की पोरगी सर्वच ‘गुण’ बापाचे घेत नाहीये. Happy

- तुमचा अभिषेक

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त वाटलं रे अभिषेक !! नीट जपून ठेव हे सर्वं आणी परी मोठी झाली कि दे तिला वाचायला..
काय जाणो एखाद वेळी तुझे हे पुस्तक ही छापले जाईल ..

अभिषेक, खुप खुप मस्त लिहतोस तु.
सगळीकडे थोड्याफार फरकाने हेच होत असते फक्त सगळ्यांनाच ते शब्दांत मांडता येत नाही पण तुझे हे लेख रिलेट करता येतात.
खुप गोड आहे तुझी परी. मुद्दाम फेबुवर जाऊन पाहिला फोटो.
नेहमी लिहित रहा.

मस्त लिहिलय.... खुप आवडले. Happy

पांढर्‍या मैद्याची पिशवी >> ही उपमा मी दहावी होईपर्यंत मलाही चिकटलेली होती. Happy

धन्यवाद सर्वांचे, पण फेसबूकवर कुठे, प्रोफाईल पिक का? कारण मला वाटते माझे सारे अल्बम सेटींग नुसार फ्रेंडस ओनली आहेत.. किमान परीवाले तरी.. वा चुकून एखाद दुसरा राहिला असेल.. हरकत नाही.. इथले सारे माबो फ्रेंडलिस्टमध्येच येतात Happy

ती ओरडत असताना तुमच्याबरोबरचा..
बहुतेक पिवळा ड्रेस घालुन आहे ती..
मी पन हाच विचार केला कि पिक पब्लिक क्स्काय ठेवला..असो.. तुमच्या चुकीमूळे मला तिला पाहता आलं Wink
She is damn cute...

धन्यवाद सर्वांचे.

के अंजली, मी तर इच्छा करतोय की परीने मोठे होऊन सुप्रसिद्ध सेलिब्रेटी बनावे, जे लोकांना तिच्या बालपणाबाबत जाणून घेण्यात ईंटरेस्ट निर्माण होईल, आणि एकदम या लिखाणाला डिमांड येईल. मग पुस्तक छापायला फारसे कष्ट उचलावे लागणार नाहीत Happy