तीट कवितेला - कविता क्र.४ - मज गाणे शोधत येते

Submitted by संयोजक on 19 September, 2015 - 14:43

गुलमोहरात पूर्वी काय काय लिहिलंय हे बघत असताना आम्हाला कवितांचा एक खजिनाच सापडला. काही वाचलेल्या, काही न वाचलेल्या, तर काही वाचलेल्या असूनही परत वाचताना वेगळाच अर्थ गवसलेल्या. अशा कित्येक सुंदर कविता, काळाच्या... आपल धाग्यांच्या उदरात गडप झाल्या आहेत. आता हा खजिना शेअर केल्याशिवाय आम्हाला राहवतय थोडच?
पण नुसता त्या त्या कवितेचा दुवा देण्यापेक्षा एक उपक्रम घेतला तर? ह्या कवितेला तुम्ही शेवटच्या कडव्यानंतर एक कडवं जोडायच. थोडक्यात ती कविता समजून घेऊन, त्यातल्या कल्पनांचा विस्तार करून आणि अर्थातच स्वतःचा स्वतंत्र विचार करून आणखी एका कडव्याची रचना करायची, बरोबरच कवितेला एक नवीन नावही सुचवायच. कशी वाटतेय कल्पना?

यात कवी/ कवयित्रीच्या प्रतिभेशी बरोबरी करायचा किंवा त्याच्या कलाकृतीला जरासाही धक्का लावायचा हेतू नाही. फक्त कवी/ कवयित्रीच्या प्रतिभेला दाद देउन आपल्याला अशीच रचना करायची वेळ आली तर आपण कसा विचार करू याचा एक खेळीमेळीत अंदाज यावा आणि उत्तमोत्तम कविता पुन्हा वाचल्या जाव्यात इतकाच उद्देश आहे.

नियम:
१. या उपक्रमा अंतर्गत आम्ही मायबोलीवर पूर्व प्रकाशित कविता, कवी/ कवयित्रीच्या नावासकट प्रकाशित करू. त्या कवितेच्या शेवटी तुम्हाला एक कडवं रचायच आहे आणि त्या कवितेला एक नवीन नावही सुचवायच आहे.
२. या उपक्रमात रोज एक नवीन कविता देण्यात येईल.
३. कडवं आणि नाव दोन्ही सुचवणे आवश्यक आहे.
४. तुमचं कडवं आणि नाव इथेच प्रतिसादात लिहा.
५. एका प्रतिसादात एकच कडवं लिहिण अपेक्षित आहे.
६. एक आयडी कितीही वेळा या उपक्रमात भाग घेऊ शकतो.

आजची कविता:

मूळ नाव: मज गाणे शोधत येते
कवयित्री: दाद
कवितेची लिंक: http://www.maayboli.com/node/12104

आयुष्य रोजचे असते, दिनचर्या वाहत असते
दिवस आपला नसतो, अन रात्रंही परकी होते

मी नको नको म्हणते, अन तरी पुरती बुडुनी जाते
सापडेन माझी मजला शक्यताही असली नुरते

नि:श्वास सोडण्यापुरताही श्वासाला वेळ न उरतो
गुदमरतो जीव बिचारा जगणेच जणू विस्मरतो

क्षण क्षणास जोडायाचा कण-कणास रोगच जडतो
डुचमळे जोग कळशीत, पायातळी भोगच जळतो

बरबटते निर्मळ बिंब अन गढूळ जीवन होते
तशी धावत नाही मी, पण आयुष्य ओढुनी नेते

हो अवेळ हर वेळेची भरदिसा सांजही होते
गर्दीत गर्दं एकली का अवघी करीत सुटते

मग प्राण बनुनि श्वासात कुणी हलके हलके शिरते
अज्ञाताच्या देशातुन पक्षांसम येती खलिते

चांदणेच पागोळ्यांनी जणू झरते, कधी झिरमिळते
कधी शांत ज्योत दिवलीची अन कधी ढणढणते पलिते

कधी प्रपात शब्दं-सुरांचा कधी केवळ लकेर उठते
अन निरव शांतता मधली गुज काही सांगू बघते

कधी शब्दंच संपुनी जाती तरी सांगायाचे उरते
’तोम-तदियन-तन-देरेना’ही त्या हृदयीचे ह्या कळते

गुणगुणते मी काही, की गाणेच मला गुणगुणते
कधी हरवू देतच नाही मज गाणे शोधत येते

Group content visibility: 
Public - accessible to all site users

तदॄप

सूर कुठे, ताल कोणता, कायामन नुरते,
दीड्दा दीडदा, षडज-पंचमा, मी तयांत तदृप होते!

दाद! तुमच्या सुंदर रचनेला छोटीशी गुरुदक्षिणा..

शीर्षक : दाद
हृदयातूनी मग उमटतो हळूवार एक हुंकार
नजरेतूनी ओसांडून ती मिळे 'दाद' अश्या काव्यास..

मी गाणे होउन जाते

मज गाणे शोधित येते, मज गाणे वेढुन घेते
मग मागे काहि न उरते, मी गाणे होउन जाते

नाव- मी खाणे शोधत जाते

कधी प्रयास दोरी उड्यांचा करण्याला लवकर उठते
अन निरव शांततेमध्ये फोनावर माबो बघते

कधी स्केल संपुनी जाते तरी मोजायाचे उरते
'अब डाएट करना पडता ' हे हृदयाला या कळते

त्या फर्स्ट दिशी जी एमच्या मी कशी बशी तग धरते
दिस दुसरा सरतही नाही मी खाणे शोधत जाते.

शीर्षक : छळ

ते जोजवते, पालवते, ते डोळेही ओलवते
ते ओठांवरती रुळते अन् वेळिअवेळी छळते

शीर्षक - ऋतुस्वर

कधी बनातुनी पळसांच्या , नदी 'केसरिया 'गुणगूणते
चैतीच्या गडद सुरांनी मनफांदी झुलावन झुलते.

शीर्षक - अस्वस्थ प्रहर

या मंद दिव्यांच्या प्रहरी जळी संथ रागिणी तरते
हदयातील पिंपळगाथा ऐकत मी डोळे मिटते.

दाद,मला माहितेय या ओळी तुमच्या कवितेच्या आसपासही जाऊ शकत नाही कारण यांचा मूडच अलग आहे तसेच तुमच्या कवितेतला आशय ,प्रतिमा वेगळ्याच आहेत कवितेच्या तेव्हा आलेल्या जबर उर्मीतून उतरल्यात आम्ही सहजच शब्दांचा खेळ म्हणून खरडल्यात... निदान मी तरी कृ गै नसावा .स्मित ..

वा वा,, किती सुरेख झड... खरतर कवितेपेक्षा ह्या तीट अधिक भारी वाटतायत.

भुईकमळा, अस्वस्थ प्रहर अगदी भेटला.

खरतर कवितेपेक्षा ह्या तीट अधिक भारी वाटतायत.>>> नाही दाद !!!हा तुमच्या मनाचा मोठेपणा आहे. उदा. 'चांदणेच पागोळ्यांनी जणू झरते, कधी झिरमिळते
कधी शांत ज्योत दिवलीची अन कधी ढणढणते पलिते'

कधी प्रपात शब्दं-सुरांचा कधी केवळ लकेर उठते
अन निरव शांतता मधली गुज काही सांगू बघते ' असं सुचणच किती दुर्मिळ योग आहे अशी एक जरी ओळ सुचली कधी तर तिच्यावरून जान कुर्बान ...धन्यवाद संयोजक सुंदर कवितेसाठी .