मज गाणे शोधत येते

Submitted by दाद on 19 November, 2009 - 00:07

आयुष्य रोजचे असते, दिनचर्या वाहत असते
दिवस आपला नसतो, अन रात्रंही परकी होते

मी नको नको म्हणते, अन तरी पुरती बुडुनी जाते
सापडेन माझी मजला शक्यताही असली नुरते

नि:श्वास सोडण्यापुरताही श्वासाला वेळ न उरतो
गुदमरतो जीव बिचारा जगणेच जणू विस्मरतो

क्षण क्षणास जोडायाचा कण-कणास रोगच जडतो
डुचमळे जोग कळशीत, पायातळी भोगच जळतो

बरबटते निर्मळ बिंब अन गढूळ जीवन होते
तशी धावत नाही मी, पण आयुष्य ओढुनी नेते

हो अवेळ हर वेळेची भरदिसा सांजही होते
गर्दीत गर्दं एकली का अवघी करीत सुटते

मग प्राण बनुनि श्वासात कुणी हलके हलके शिरते
अज्ञाताच्या देशातुन पक्षांसम येती खलिते

चांदणेच पागोळ्यांनी जणू झरते, कधी झिरमिळते
कधी शांत ज्योत दिवलीची अन कधी ढणढणते पलिते

कधी प्रपात शब्दं-सुरांचा कधी केवळ लकेर उठते
अन निरव शांतता मधली गुज काही सांगू बघते

कधी शब्दंच संपुनी जाती तरी सांगायाचे उरते
’तोम-तदियन-तन-देरेना’ही त्या हृदयीचे ह्या कळते

गुणगुणते मी काही, की गाणेच मला गुणगुणते
कधी हरवू देतच नाही मज गाणे शोधत येते

गुलमोहर: 

दाद..अप्रतिम!!! मला या पलिकडे खरच शब्द सुचत नाही ये...खुप छान गं..अगदी मनातल..

प्रत्येक कडव अप्रतिम...

बरबटते निर्मळ बिंब अन गढूळ जीवन होते
तशी धावत नाही मी, पण आयुष्य ओढुनी नेते

चांदणेच पागोळ्यांनी जणू झरते, कधी झिरमिळते
कधी शांत ज्योत दिवलीची अन कधी ढणढणते पलिते

गुणगुणते मी काही, की गाणेच मला गुणगुणते
कधी हरवू देतच नाही मज गाणे शोधत येते>>> क्या बात है!!! जियो...:)

चांदणेच पागोळ्यांनी जणू झरते, कधी झिरमिळते
कधी शांत ज्योत दिवलीची अन कधी ढणढणते पलिते>>>> आवडलं

तक्रार निवारण केल्याबद्दल धन्यवाद!! खूप दिवसानी कविता लिहिल्याबद्दल अजून धन्यवाद!! आता एखादी छानशी गोष्ट लिहिशील तर अजून अजून धन्यवाद!!

व्वा व्वा मस्तच.. काही काही वाक्ये (मिसरे) तर मस्त जमून आलेत...

आवडलीच

फक्त
मग प्राण बनुनि श्वासात कुणी हलके हलके शिरते
अज्ञाताच्या देशातुन पक्षांसम येती खलिते >>> इथे जरा लय जातीय असे वाटते

चु.भु.द्या.घ्या.

क्षण क्षणास जोडायाचा कण-कणास रोगच जडतो
डुचमळे जोग कळशीत, पायातळी भोगच जळतो >> आह..!
गुणगुणते मी काही, की गाणेच मला गुणगुणते
कधी हरवू देतच नाही मज गाणे शोधत येते

>> क्या बात है!
मस्त!

कधी प्रपात शब्दं-सुरांचा कधी केवळ लकेर उठते
अन निरव शांतता मधली गुज काही सांगू बघते.... अहाहा!

गुणगुणते मी काही, की गाणेच मला गुणगुणते
कधी हरवू देतच नाही मज गाणे शोधत येते... जियो!

सुरूवात कुठून केलीस आणि शेवट कुठल्या कुठे नेऊन ठेवलास.. वर शब्द आणि त्यांची प्लेसमेंट... सिम्पली ग्रेट! Happy

खुपच छान.....

कधी शब्दंच संपुनी जाती तरी सांगायाचे उरते
’तोम-तदियन-तन-देरेना’ही त्या हृदयीचे ह्या कळते

गुणगुणते मी काही, की गाणेच मला गुणगुणते
कधी हरवू देतच नाही मज गाणे शोधत येते

मस्त......

बाआआआआआआआआआआआआआआआआआपरे! कुठल्या उंचीवर नेऊन ठेवलीत कविता.
कथा आणि कविता दोन्हीमधे काय मास्टरी आहे तुमची. एकाच व्यक्तीला देव एव्हढे कसे काय देतो बुवा?
अमिताभ बच्चन जसा शतकातला अभिनेता तशा तुम्ही पण मा बो च्या शतकातल्या लेखिका राहाल हे मात्र नक्की.

कधी शब्दंच संपुनी जाती तरी सांगायाचे उरते
’तोम-तदियन-तन-देरेना’ही त्या हृदयीचे ह्या कळते
========
वाह!!!!

क्या बात है!

मग प्राण बनुनि श्वासात कुणी हलके हलके शिरते
अज्ञाताच्या देशातुन पक्षांसम येती खलिते

क्या बात है... हाय..
अतिशय सुंदर ... घायाळ करणा-या ओळी आहेत या.. कसे सुचते हे ?

सुंदर कविता शलाका!
कधी शांत ज्योत दिवलीची अन कधी ढणढणते पलिते -- वा वा अगदी तलत आणि भीमसेन कानात घुमू लागले...
तशी धावत नाही मी, पण आयुष्य ओढुनी नेते - सुंदर!
शेवटची द्विपदीही आवडली.
पण कहर म्हणजे... डुचमळे जोग कळशीत, पायातळी भोगच जळतो. कळलं कळलं वाटतं... पण तरी काही निसटतंय असंही जाणवत राहतं. मला वाटतं प्रतिभा प्रतिभा काय ती हीच आणि हाच तो "दाद" टच...

दाद गं दाद, किती वाट पहायला लावायची बाई! पण अशी दर्जेदार वाचायला मिळणार असेल तर वाट पहाणंही मंजुर.
> हो अवेळ हर वेळेची भरदिसा सांजही होते
गर्दीत गर्दं एकली का अवघी करीत सुटते >> इसको बोलते है दाद का जलवा

फार फार आवडली. अर्थगर्भ.

गुणगुणते मी काही, की गाणेच मला गुणगुणते
कधी हरवू देतच नाही मज गाणे शोधत येते

हे वाचलं आणि वाटलं ... माझ्या मनातलं तुम्हाला कसं बरं कळलं ?
खूप छान ...लिहित राहा प्लीज Happy

व्व्व्वाह!! बर्‍याच दिवसानी वाचायला वेळ मिळाला आणि अतिशय उत्कृष्ट!
केवळ उच्च्च्च, दाद!!! सच्च्या मायबोलीकराची मनोवस्था उत्कटपणे समोर येते!
वा!!

मिल्या, मला लय व्यवस्थित वाटली 'अज्ञातच्या..' ओळीची देखील. परत एकदा म्हणून पहा..

धन्यवाद... आभारी आहे सगळ्यांचीच.
मिल्या, अज्ञाताची ओळ मी सुद्धा परत (परत) म्हणून बघितली... कुठे तुटत नाहीये.
ओई... उमेश, अमिताभ? - तो खूपच उंच आहे रे Happy
मायबोलीवर सातत्याने, माझ्यापेक्षा खूप सुंदर लिहिणारे अनेक आहेत... एव्हढा मोठा मान नको रे बाबा... उगीच ओझं Happy
(पण तुझ्या भावना पोचल्या... आणि त्यासाठी मात्रं मनापासून आभार)

मला गाणं शोधत येतं... खरच येतं. मी सकाळी उठते, त्याही आधी गाणं मनात उठलेलं असतं. माझे डोळे किलकिले होताच झेप घेतं आणि दिवसभर बिलगुन असतं...
आपल्यातल्या प्रत्येकाला शोधत, हाकारत काही तरी आसपास असतच... फक्तं आपण आपल्यातच हरवण्यात इतके गर्कं असतो, इतकं मिटून घेतलेलं असतं स्वतःला की, "त्या"ची हाक ऐकू येण्याइतकीही फट ठेवलेली नसते. नाही?

तुम्हा सगळ्यांना अशा कुणी "त्या"ची सोबत असो... सदैव असो.... अजून काय म्हणू?

क्लास..!! अप्रतिम.. केवळ अप्रतिम..!!
खरच..प्रत्येक कडवं स्वतंत्र दाद देण्याजोगं.. क्या बात है!!

दाद कविता मस्तच आहे.. हे थोडे खुसपट काढल्या सारखे होत असेल तर माफ कर

मग प्राण बनुनि श्वासात कुणी हलके हलके शिरते
अज्ञाताच्या देशातुन पक्षांसम येती खलिते
>>>

कवितेत प्रत्येक ओळीत साधारण २८ मात्रा आहेत १४ मात्रांनंतर यति आहे

मग प्राण बनुनि श्वासात >> बनुनी मध्ये दोन न पाठोपाठ आल्याने अडखळायला होते तसेच यति लघु अक्षरावर (त वर) आल्याने लय जरा भंगते असे वाटते..

अज्ञाताच्या देशातुन >>> ओळिने चार गुरु आणि परत लघु वर यति ह्यामुळे अडखळायला होतेय असे वाटते (तसेच एकूण मात्रा १५ 'देशातून' असे वाचले तर)

परत काळजीपूर्वक वाचल्यावर इतर एक दोन ठिकाणी पण लय अजून सुधारता येईल असे वाटते.. अर्थात लय ही थोडी सापेक्ष असू शकते कारण एखाद्या अक्षराचा आपण वर्षानुवर्षे एखाद्या प्रकारचा उच्चार करत असतो जो दुसरा कुणी वेगळ्याप्रकारे करतो...

जसे देशातुन - कुणी 'तु' पटकन उच्चारते तर कुणी 'तू' जोर देऊन

तुझ्यासारख्या कवियित्रीला हे सहज टाळता येईल म्हणून हा प्रपंच

चु.भू.दे.घे.

Pages