झोपाळ्यावाचुनी झुलायच्या वयात...

Submitted by अतुल ठाकुर on 19 September, 2015 - 04:58

dr.png

मध्यंतरी ठाणे फॉलोअप ग्रुपमध्ये एका अकरावीतल्या मुलीचं मनोगत ऐकण्याचा योग आला. "आपण सर्व कुटुंबिय आहोत. यापुढे तुम्ही येताना आपल्या मुलांना बरोबर आणा. मला माझ्या भावंडांना भेटायचं आहे. ....त्यावेळचे माझे पप्पा आणि आताचे पप्पा यात खुप फरक आहे आणि या चांगल्या बदलाचे कारण तुम्ही सर्वजण आहात..." अतिशय हृदयस्पर्शी असं ते मनोगत होतं. हे अकरावीतल्या मुलिच्या तोंडुन येत आहे यावर विश्वास ठेवणंही कठिण जात होतं. सर्वांप्रमाणेच मलादेखिल त्या मुलिचे खुप कौतुक वाटले. पण नंतर विचार करताना या घटनेतले दुर्दैवही जाणवले. हे अकाली प्रौढ होण्याचे उदाहरण होते. अकाली बाल्य कोळपुन जाण्याचे उदाहरण होते. "मॅच्युअर" म्हणुन तिचं जग कितीही कौतुक करो. पण "झोपाळ्यावाचुनी झुलायच्या" वयात प्रौढत्व येण्यासारखं दुर्दैव नाही अशी माझी समजुत आहे. आणि हे पाप व्यसनाचंच आहे. मुक्तांगणमध्ये संशोधनाला जायला लागल्यापासुन अशा अनेक घटना पाहिल्या. बाजुला बायकामुलं हताश होऊन पाहात आहेत. समुपदेशक दाखल होण्याअगोदर नवर्‍याला विचारतो आहे कि तुमची काय इच्छा आहे? दाखल व्हायचंय ना? चार आठवडे राहाल ना? मनापासुन उपचार घ्याल घ्याल ना? समोरचा माणुस ढिम्म. जणुकाही भींतीशी बोलणं चाललंय. तुमची इच्छा काय आहे या वारंवार विचारलेल्या प्रश्नाला बर्‍याचे वेळाने दिलेले उत्तर म्हणजे "(दारु)थोडी कमी करायचीय."

कुणी बायकोला मारझोड करणारा, तर कुणी तिला रस्त्यावर एकटीला सोडुन बारमध्ये जाऊन आपले व्यसन शमवणारा. कुणी सतत खोटे बोलुन पैसे काढणारा, घरातल्या वस्तु विकणारा. कुणाची मुले सतत घाबरुन बसलेली. कॉलेजमध्ये जाणारी तरुण मुलगी. नवथर तारुण्य, लाजरे कटाक्ष, मैत्रिणींशी तासनतास गप्पा, कॉलेजमधली धम्माल हे सारं करायच्या वयात तिच्या डोक्यात विचार कसले तर रात्री बाप पिऊन तर येणार नाही? आईला मारणार तर नाही? कुणी सकाळी सहा वाजल्यापासुन पिणे सुरु करणारा, तर कुणी गाडीत, बाथरुममध्ये, ऑफिसात स्टॉक करुन ठेवणारा, कुणी फोटोसमोर ठेवलेले पैसे पळवणारा, कुणी जुगाराबरोबर दारुचे व्यसन असलेला. आता तर मुक्तांगणमध्ये येणार्‍यांचे वय कमी कमी होऊ लागले आहे. मी स्वतः १५, १६ वर्षे वयाची मुले पाहिली आहेत. त्यांना दाखल करुन घेणे हा एक मोठा सोहळा असतो. व्यसनासाठी चलाखपणे पैसे काढणारी ही मुले मुक्तांगणमध्ये आल्यावर मोठमोठ्याने रडु लागतात, दंगा करतात, त्यांना धरण्याचा प्रयत्न करणार्‍यांना चावायला जातात. यातली काही मुले मल्टीपल अ‍ॅडीक्ट असतात. म्हणजे पैसे असतील त्या तर्‍हेचे व्यसन. जास्त असल्यास उंची दारु, सिगारेट वगैरे. हे सारं करुन अगदी व्यसनासक्त झाल्यावर मुलाचे व्यसन लक्षात येणारे आईवडिलदेखिल धन्यच.

संशोधनाच्या दरम्यान हे सारं सतत पाहात आलो, ऐकत आलो. पण व्यसनासक्त माणसे माझ्यात फारशी सहानुभुती अजुनतरी निर्माण करु शकली नाहीत. हा माझा स्वभावदोष असेल. पण मला अतिशय सहानुभुती वाटते ती सहचरींबद्दल. सहचरी म्हणजे व्यसनाधीन व्यक्तीच्या कुटुंबातील स्त्रिया. त्याची पत्नी, मुलगी, बहिण, आई या सार्‍या जणी. बरेचदा कसलाही दोष नसताना अपार छळ सहन करणार्‍या. तरीही त्यांना मुक्तांगणात दाखल करणार्‍या. नेमाने मंगळवारी पुण्याला येऊन फॅमिली काउंसिलिंगची मिटिंग अटेंड करणार्‍या, आपल्या माणसाबद्दल समुपदेशकाकडे सतत चौकशी करणार्‍या या माऊलींबद्दल मला अतिशय हळवेपणा वाटतो. सेवाभाव किती आणि त्याहीपेक्षा क्षमाशीलता किती. मुक्तांगणच्या बाहेर आल्यावर यांचीही कसोटी. कारण आता हा पुन्हा घसरला तर? ही सतत काळजी. आधी घरात आणि बाहेर समाजात प्रचंड पराक्रम केलेले. त्यामुळे बाहेर तोंड दाखवायची सोय नाही. पण तरीही हे सारं विसरुन मायेने आपल्यामाणसाला पुन्हा स्विकारण्याचा मोठेपणा या स्त्रिया दाखवतात. मला बरेचदा असे वाटते कि या स्त्रिया जर या व्यसनी माणसांच्या आयुष्यात नसत्या तर या पुरुषांच्या आयुष्याचा अक्षरशः उकिरडा झाला असता.

हे झालं बायका मुलांचं. पण बायका अगदी असह्यच झालं तर घटस्फोट घेतात. आई घटस्फोट कसा घेणार? तिला आपल्या पोटच्या गोळ्याला सांभाळावंच लागतं. म्हातार्‍या झालेल्या आई आपल्या म्हातारपणाच्या उंबरठ्यावर उभ्या ठाकलेल्या मुलाला घेऊन आलेल्या मी पाहिल्या आहेत. स्वतःचे वय ऐशी आणि मुलगा साठिच्या घरात पोचलेला. अजुनही त्या माऊलीला आशा वाटतेय. त्यातुन व्यसनामुळे मधुमेहासारखे काही आजार निर्माण झाले असतील तर बघायलाच नको. स्वतःकडे पाहायचं कि मुलाकडे? बरेचदा आईवडिलांना अगदी अगतीक झालेलं पाहिलंय. आम्हाला माहित आहे त्याला व्यसन लागलंय. पण आम्ही त्याला मुक्तांगणला आणु शकत नाही. तो यायलाच तयार नाही. राग राग करतो. आरडाओरड करतो. बर्‍याच जणांना, लग्नाला जायचंय, आळंदीला देवळात जायचंय असं सांगुन आणावं लागतं. बरी झालेली आणि निर्व्यसनीपणा टिकवलेली माणसे टेचात आपला निर्व्यसनीपणाचा वाढदिवस मुक्तांगणमध्ये साजरा करतात. मला वाटायचं हे खरंच सर्वस्वी यांचं यश आहे? आणि यांच्यासाठी त्या रक्ताचे पाणी करणार्‍या बायकांचं काय? मुक्तांगणकडुन संशोधनाची चर्चा सुरु असताना यामुळे मी एक सुचना केली होती कि जेव्हा व्यसनमुक्तांचा वाढदिवस साजरा केला जाईल तेव्हा त्यांच्या कुटुंम्बियांचाही सत्कार करण्यात यावा. मुक्तांगणने हि सुचना मान्य केली. आता निर्व्यसनीपणाचे मेडल स्विकारण्यासाठी व्यसनमुक्तांबरोबर त्यांच्या कुटुंबियांनाही पुढे बोलावले जाते.

हा सारा विचार करतानाच मला स्वतःच्या मर्यादादेखिल स्पष्टपणे जाणवल्या. सुरुवातीला ज्या मुलीच्या मनोगताचा उल्लेख केला आहे त्या मुलिने आपल्या वडिलांना केव्हाच क्षमा केलंय. आता तिचे वडीलांशी संबंध मैत्रीचे झालेत. व्यसनाच्या दरम्यान मला घाबरुन माझ्यापासुन दुर राहणारी माझी मुलगी आता माझी मैत्रीण झाली आहे हे सांगताना तिच्या वडिलांचा चेहरा आनंदाने फुलुन आला होता. जेव्हा या मुलिच्या जागी मी स्वतःला पाहतो तेव्हा मला हे चित्र दिसत नाही. मुक्तांगणमध्ये जायला सुरुवात होऊन तीन वर्षे होऊन गेली. तिथल्या माणसांच्या पोटात अपार माया आहे. तिथुन उपचार घेऊन घसरगुंडी झालेल्या माणसांना तितक्याच प्रेमाने मुक्तांगण पुन्हा बोलावते, स्विकारते. त्याच्यावर माया करते. त्याला सुधरवण्याचा प्रयत्न करते. पण ही करुणा मला माझ्यात अजुनतरी निर्माण करता आली नाही. उपचार घेऊन व्यसनापासुन दुर राहणार्‍या मंडळींबद्दल मला पराकाष्ठेचा आदर वाटतो. मात्र उपचार घेऊनदेखिल व्यसनात पुन्हा पुन्हा बुचकळ्या मारणार्‍यांबद्दल मला फारशी आस्था वाटत नाही हे सत्य माझ्या लक्षात आलंय. हा आजार आहे, घातकी आजार आहे वगैरे गोष्टी मला माहित आहेत. पण "आजार" आहे ही गोष्ट पुन्हा पुन्हा घसरण्याचे "लायसन्स" असु शकत नाही असे मला प्रामाणिकपणे वाटते.

अतुल ठाकुर

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खुप छान लिहिलंय.

कधीतरी सवडीने, सो कॉल्ड सोशल ड्रिंकिंग आणि व्यसन, यातल्या सीमेवर असतानाची लक्षणे, वागण्यात बदल.. याविषयी मुक्तांगण ने काही प्रसिद्ध केले असेल तर त्याची माहिती अवश्य द्या इथे..

आणि हो मलाही तूमच्यासारखाच या व्यक्तींचा प्रचंड तिटकारा आहे.

खूपच छान लिहिलय. खरचं अशा लोकांच्या घरातल्यांचीच खरी कसोटी असते. किती सोसतात ती बिचारी माणसं.
हो मलाही तूमच्यासारखाच या व्यक्तींचा प्रचंड तिटकारा आहे.>>>>>>>>>>. + १ स्वत:ची आणि त्याचबरोबर घरादाराची, त्यातील माणसांची वाट लावणार्‍यांबद्दल कसलं आलय प्रेम?

छान लिहिलय..
एवढी माया असल्या लोकांबद्दल दाखवणे खरच शक्य् नाही.
त्यांच्या कुटुंबियांचीच किव येते.. Sad
मला वाटत या दारू सोडवणाऱ्या संस्था त्या व्यक्तिपेक्षा त्या कुटुंबातील इतर लोकांसाठी खुप मोलाच कार्य कर्ताएत...

खूप छान लिहिलेय.

व्यसनाधीन व्यक्तीच्या कुटुंबीयांची खरच खूप कीव येते.
आणि व्यसनमुक्ती केंद्रात काम करणाऱ्यांचे विशेष कौतुक वाटते.

अतुल ठाकूर,

अगदी मनातलं नेमकं बोललात. माणूस निर्व्यसनी होणं हा एक प्रकारे पुनर्जन्मच असतो. त्याच्या प्रसूतीवेदना मात्र आप्तांच्या नशिबी येतात! व्यसनी माणूस व्हायचा तेव्हा ठीक होईलही. पण मधल्या वेळात त्याच्या कुटुंबियांना कायकाय खस्ता खाव्या लागतील त्याचा नेम नाही.

लेखातलं शेवटचं वाक्य फार समर्पक आहे. एकदा व्यसनातून बाहेर पडल्यावर परत त्यात न पडण्यासाठी तशी बुद्धी (=इच्छा) न होणं महत्त्वाचं आहे. रोज थोडं तरी वाचन वा स्तोत्रपठण वा देवपूजा केलेली बरी पडते. यालाच साधना असंही म्हणतात.

आ.न.,
-गा.पै.

खूप छान लिहीलंयत.
खरं तर मलाही या व्यसनींचा तिटकारा आणि त्यांच्या नातेवाईकांचा भयंकर राग यायचा
आता नातेवाईकांबद्दलच्या रागाची जागा सहानुभूतीने घेतलीय तरी या व्यसनी लोकांबद्दलचा तिटकारा नाही कमी होत.

नातेवाईकांचा सत्कार करण्याची कल्पना खरंच छान आहे.

लेख अतिशय आवडला.
पण एका रिसर्च पेपरकडे आपले लक्ष वेधू इच्छिते : SLC6A4 ह्या gene चे दोन प्रकार असतात - शॉर्ट व लाँग. शॉर्ट अलीलमुळे व्यसनाधीनता असते/टिकते तर लाँग अलीलमुळे उपचारांना रिस्पाँन्सची शक्यता असते. "आजार" आहे पेक्षा घडणच तशी आहे हे लक्षात घेतले तर आजूबाजूच्यांना व सरकारला धोरणे ठरवणे शक्य ठरेल. मधुमेही व्यक्तीने साखर खाल्ली तर जस त्यात एक प्रकारची बेदरकारी वाटते (कारण शुगर क्रेव्हिंग जेनेटिक सिंप्टम नाही, माझ्या माहितीत) तशी वारंवार व्यसनाधीनतेकडे जाणार्‍या व्यकतीत नाही, उलट आगतिकता आहे. त्या मूळ घडणीवर परिश्रम इ. ने मात करता येईल पण तो प्रवास अतिशय अप्स-अँड-डाऊन्सचा असेल.

आपण ह्या क्षेत्रात तज्ञ आहात आणि कार्यशील आहात. आपल्या वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा.

सर्वांचे मनःपूर्वक आभार.

सीमंतिनी, तुम्ही अतिशय महत्वाचा मुद्दा मांडला आहे. जमल्यास सविस्तर उत्तर देईन.

छान लिहिलेय. नेमकं अगदी.

स्वतच्या कुटुंबाचे हाल करुन स्वतचे व्यसन शमवण्यार्यासाठी अजिबात सहानुभुति वाटत नाही

सर्वांचे मनःपूर्वक आभार.

सिमंतीनी यांच्या मुद्द्याबद्दल...

जीवशास्त्रिय घटक आणि परिस्थिती असा झगडा सतत सुरु असतो आणि त्याचे पदसाद अर्थातच संशोधनात पडतात. हा विचार संशोधनात समाविष्ट करावा लागतो. "मूळ घडणीवर परिश्रम इ. ने मात करता येईल पण तो प्रवास अतिशय अप्स-अँड-डाऊन्सचा असेल. " व्यसनाच्या बाबतीत हे अगदी खरे आहे. पण मला थोडा वेगळा मुद्दा मांडायचा आहे.

व्यसनाच्या बाबतीत जीवशास्त्रिय घटकाचे अस्तित्व आणि परिस्थितीचा परिणाम यांवर संशोधन सुरु आहे. मात्र बरेचदा असे दिसुन आले आहे कि वीस वीस वर्षे सोशल ड्रिंकर असलेली माणसे अचानक शेवटच्या काही वर्षात व्यसनी झालेली आहेत. सोशल ड्रिकर्सचे रुपांतर व्यसनात होण्याची शक्यता असते. पण काही जण आयुष्यभर सोशल ड्रिंकर्स राहतात तर त्यातले काही व्यसनी होतात. हे काही जे व्यसनी होतात यांच्यात कदाचित हे जीवशास्त्रिय घटक प्रबळ होत असावेत. पण हा टक्का (सोशल ड्रिंकर्सचे व्यसनी होण्याचे प्रमाण)अलिकडे वाढल्याचे दिसुन येत आहे. काही विशिष्ट स्वभाव असलेली माणसे व्यसनी होण्याची शक्यता जास्त असते हे देखिल एक महत्त्वाचे निरिक्षण आहे.

त्यामुळे जीवशास्त्रिय घटक वगळल्यास माणसाच्या हातात जर काही असेल तर ते "परिश्रम". त्यामुळे "स्वभावावर काम केले पाहिजे" हे वाक्य मुक्तांगणमध्ये अनेकदा ऐकु येते. हे स्वभावावर काम करणे मात्र अतिशय खडतर असते. परंतु मी जी व्यसनमुक्त माणसे पाहिली आहेत त्यातल्या काहींनी आपल्या स्वभावात परिश्रमपूर्वक बदल केलेले आढळले आहेत. अशांच्या निर्व्यसनीपणाची "क्वालिटी" ही वरच्या दर्जाची असलेली जाणवते. नुसतीच दारु सुटणे म्हणजे व्यसनमुक्ती असे मुक्तांगणमध्ये मानले जात नाही. दारु शरीरातुन जाते. मनातुन जात नाही. या अवस्थेला ड्राय ड्रिंकिंग म्हणतात. त्यामुळे स्वभावावर काम करण्याचे जे मनावर घेतात त्यांच्यासाठी हा प्रवास यशस्वी होण्याची शक्यता खुप असते. अन्यथा दारु सुटली पण तंबाखु वर्षानुवर्ष सुटत नाहीय अशी अवस्था असलेले महाभागही आहेत.

दुसरा मला मांडायचा मुद्दा हा आहे कि आपण घरच्यांना अतोनात त्रास दिला आहे याची जाणीव माणसात हवी. तर स्वभाव बदलण्याला काही प्रेरणा मिळेल. अशी जाणीव असलेली माणसे मी पाहिली आहेत. त्यामुळे ही माणसे सावध असतात. पण आपले व्यसन हा एक "आजार" आहे ही बाब काहींना "क्लिन चीट" मिळाल्यासारखी वाटत असावी असे मला नेहेमी वाटते. म्हणजे हा आपला दोष नाही. आणि हे धोकादायक आहे अशी माझी समजुत आहे. संवेदनशील माणसाला आपण आपल्या जवळच्या माणसांना त्रास दिला ही जाणीव योग्य मार्गाकडे वळवते. पण व्यसनाच्या वाटेवर असलेल्या अत्यंत आत्मकेंद्रित अशा माणसाचे काय? हा "आजार" आहे असे सांगुन त्याला दोषमुक्त केले म्हणजे हा माणुस खरोखर स्वभाव बदलण्याचा प्रयत्न करेल काय? यावर उत्तर देणे मला तरी कठिण वाटते.

लेख आवडला!
सीमंतिनी यांनी मांडलेला मुद्दा आणि तुमचा 20 September, 2015 - 11:00 चा प्रतिसाद दोन्ही माहितीपूर्ण!

>>मात्र बरेचदा असे दिसुन आले आहे कि वीस वीस वर्षे सोशल ड्रिंकर असलेली माणसे अचानक शेवटच्या काही वर्षात व्यसनी झालेली आहेत. >>
ही मंडळी व्यसनी आधीच झालेली असतात मात्र ते त्यांनी व्यवस्थित लपवलेले असते. हे जेव्हा फारच हाताबाहेर जाते तेव्हा इतरांना जाणवते.

मला पडलेला प्रश्न - आपण व्यसन या प्रकाराबाबत जेनेटिकली प्रिडिस्पोस्ड आहोत हे माहित असणे (फॅमिली हिस्ट्री) आणि ते अ‍ॅक्सेप्ट करुन सोशल ड्रिंकर होणे जाणीव पूर्वक टाळणे, इतर कोपिंग स्किल्स असा प्रोअ‍ॅक्टिव अ‍ॅप्रोच ठेवल्यास पुढील पिढीला व्यसनांपासून वाचवता येइल का?

अजून एक म्हणजे व्यसन हा आजार आहे असे मान्य केल्याने क्लीन चीट मिळते असे मला तरी वाटत नाही. उलट या आजाराशी लढायला आवश्यक सपोर्ट मागणे,मिळणे सुलभ होते. व्यसनी व्यक्तीच्या जवळच्या लोकांनाही असा सपोर्ट मिळवणे सुलभ होते. बरेचदा व्यसनी व्यक्तीच्या जोडीला तिच्या जीवनसाथीच्या वाट्यालाही उपेक्षा येते, बरेचदा जोडीदाराच्या व्यसनाला काही प्रमाणात कारणीभूत असल्याचा आरोपही माथी बसतो. अशावेळी भोवतालच्या लोकांनी हा आजार आहे. रीलाप्स होण्याची शक्यता असलेला आजार आहे हे लक्षात घेतल्यास चांगल्या प्रकारे आधार मिळू शकतो.

अजून एक म्हणजे व्यसन हा आजार आहे असे मान्य केल्याने क्लीन चीट मिळते असे मला तरी वाटत नाही. उलट या आजाराशी लढायला आवश्यक सपोर्ट मागणे,मिळणे सुलभ होते. व्यसनी व्यक्तीच्या जवळच्या लोकांनाही असा सपोर्ट मिळवणे सुलभ होते. बरेचदा व्यसनी व्यक्तीच्या जोडीला तिच्या जीवनसाथीच्या वाट्यालाही उपेक्षा येते, बरेचदा जोडीदाराच्या व्यसनाला काही प्रमाणात कारणीभूत असल्याचा आरोपही माथी बसतो. अशावेळी भोवतालच्या लोकांनी हा आजार आहे. रीलाप्स होण्याची शक्यता असलेला आजार आहे हे लक्षात घेतल्यास चांगल्या प्रकारे आधार मिळू शकतो.

हे मान्य आहे. म्ह्णुन मी हे काहींच्या बाबतीत होत असावे असे म्हटले. आपले व्यसन हा एक "आजार" आहे ही बाब काहींना "क्लिन चीट" मिळाल्यासारखी वाटत असावी असे मला नेहेमी वाटते.

अतिशय महत्वपूर्ण विषयावरील सुंदर लेख.
गापै व सीमंतिनी यांचे प्रतिसाद फार आवडले. व्यसनाधीनतेमागे २ प्रकारची गुणसूत्रे कार्यरत असतात वगैरे काही माहीतच नव्हते. प्रतिसादांतूनही लेख अधिकाधिक उलगडत गेलेला आहे.