मनातले काही - १

Submitted by बेफ़िकीर on 14 September, 2015 - 12:57

माणसे सारखी एकमेकांना धडकत आहेत. फेसबूकवर, व्हॉट्स अ‍ॅपवर, इमेलवर, फोनवर! प्रत्येकाला रिस्पॉन्स हवाच आहे. प्रत्येकाला वाटत आहे की काहीतरी त्यानेच प्रथम कळवले सगळ्यांना! माणसाचा मेंदू व्यापला आहे आभासी जगतात होणार्‍या ह्या संवाद-विस्फोटांनी! भाषा बदलत चालली आहे. स्मायलींमधून भावनांचे धबधबे आणि तोफखाने सुरू आहेत. अफवा उठत आहेत. खरी बातमी अफवा होती अशीही अफवा उठत आहे. तत्त्वज्ञानाचे डोस पाजले जात आहेत. अचानक आई, बाप, भाऊ, बहिण, मुलगी, पत्नी, मित्र, शेजारी, नेते, संत, देव ह्या सगळ्यांचे महत्त्व वाढले आहे. प्रत्येकाच्या इमेजेस आहेत. आयुष्य म्हणजे काय ह्याच्या अब्जावधी व्याख्या आदळतायत. रिस्पॉन्स केले नाही तर गैरसमज वाढू लागलेत. फादर्स डे ला वडिलांसाठी काहीतरी खास केले जात आहे. उरलेले ३६४ दिवस त्या प्रेमळ कर्तव्यातून जणू मुक्तता घ्यायची असावी. हजारो कवी रोज तयार होत आहेत. पती-पत्नी, काहीही हं श्री, आलिया भट, निरुपा रॉय, गण्या आणि गुरुजी, कांदा हे विनोद सगळीकडून येऊन आपटत आहेत. स्फुर्तीदायक संदेश, देशप्रेम, संस्कारांचे महत्त्व, फनी क्लिप्स ह्यांची मिसाईल्स येऊन डोक्याच्या चिंधड्या उडवत आहेत. समूह बनत आहेत. त्यात कंपू बनत आहेत. कॉलेजची मुले पस्तीस पस्तीस वर्षांनी अशी बोलत आहेत जसे काही पस्तीस वर्षे एकाच वर्गात काढली असावीत.

व्यक्त होण्यावर बांध घालण्याची इच्छासुद्धा मरून जात आहे. तंत्रज्ञानाचा हा स्फोट पेलत नाहीये आपल्याकडच्या लाख्खो लोकांना! भरडले जात आहेत ते त्याच्या जात्यात! कोणीही कोणालाही न विचारता अ‍ॅड करत आहे. न सांगता रिमूव्ह करत आहे. आपली महानता कर्कश्श्यपणे ओरडून जगाला दाखवली जातीय. बघा मी कसा गातो, बघा मी कसा दिसतो, बघा मी कसे काव्य रचतो, बाघा माझी चित्रे, बघा माझे कुटुंब, बघा माझी गाडी! लाईक करा, स्मायली पाठवा! नाही करत आहात? मग मी खोचक प्रतिसाद देणार!

वाढत आहेत रक्तदाब, ताण आणि हृदयविकार! पण एक मोठ्ठं समाधान आहे असा भास सगळ्यांना होत आहे. कसलं समाधान? तर माझ्या आयुष्यात प्रत्येक क्षणाक्षणाला घडणार्‍या प्रत्येक घटनेचे मी जगाला साक्षीदार बनवले आणि त्यातून सिद्ध केले की जे काही घडत गेले त्यात माझी कशी काहीच चूक नव्हती. आणि जगाने ते ऑनलाईन मान्यही केले.

बास! आता मला बॉस शिव्या देऊदेत, बायको तणतणूदेत, पोरं टीव्हीला चिकटूदेत, व्याधी होऊदेत!

पण साला, आय कन्व्हिन्स्ड एव्हरीवन दॅट आय वॉज राईट अ‍ॅन्ड ऑल्वेज द मोस्ट डिझर्विंग वन!

-'बेफिकीर'!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला तर आता कस्काय , ट्वीटर , फेबू इतका कंटाळा आहे.

अगदी अंगावर येतं ते लोकं भारंभार टाकत बसतात. सरळ डिलीट केलीत फेबू, कस्काय. ट्वीटर वर न्हवतेच.
पण नकोसं झालय खरंं.
लहानपणी पेपरातला 'चिंटू; मस्त हसवायचा. आता तेच तेच विनोद पाहून नकोसं होतं.

किती ते माहितीचा भार, खोटी तारीफ्चे पूल, सतत फोटोचा मार....ईक्स. Happy

एकदम पटेश.

मी फक्त कस्काय वापरते तेही अगदी मोजके ३-४ ग्रुप्स आहेत. त्यामुळे ह्या सगळ्यामधून मी फारशी गेले नाही पण कल्पना नक्की करू शकते.

ह्यावर उत्त्म उपाय. मी फेसबूक / वॅ अ‍ॅप वर स्वतःला खूप लिमिटेड ठेवले आहे....कधीकधी तर मी १- २ आठवडे सोशल मिडीया चेक ही करत नाही. उगाच डोक्याला शॉट नको Happy