भोपळ्याची बाकर भाजी

Submitted by मृण्मयी on 20 March, 2012 - 14:10
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

३ वाट्या लाल भोपळ्याच्या मध्यम आकाराच्या फोडी (साल न काढता)
१ वाटी तेल (जरा सढळ हातानी तेल लागतं या भाजीला)
हिंग
मीठ चवीनुसार
पाव वाटी चिंच कोळ
पाव वाटी किसलेला गुळ
हळद
लाल तिखट
गरम मसाला
सुकं खोबरं अर्धी वाटी (गुलाबी रंगावर भाजून घेतलं तर छानच नाहीतर तसही चालतं)
अर्धी वाटी खसखस (भाजून)
(खोबरं आणि खसखस एकत्र वाटून घ्यावी)
आलं लसूण्-हिरव्या मिरचीचं वाटण पाव वाटी
गरम मसाला पाव वाटी (आचार्‍यांचा ताजा मसाला असतो पण सांगत नाहीत काय घातलंय! 'गरम मसाला चालतो हो ताई' असं उत्तर मिळालं!)
१ वाटी आधणाचं पाणी
८-१० पानं कढीलिंबाची
भरपूर कोथींबीर
पाव चमचा मेथ्या
१ चमचा चारोळ्या (नाही घातली तरी चालते)

क्रमवार पाककृती: 

*जाड बुडाच्या भांड्यात तेल गरम करून त्यात हिंग, कढीलिंब आणि मेथीदाणे घालावे.

*आलं-लसणाची गोळी तेलात परतून घ्यावी. (जराशी चिकटेल भांड्याला पण काही हरकत नाही.)

*त्यावर वाटलेलं खोबरं-खसखस घालून परतावं.

*यावर भोपळ्याच्या फोडी, मासाला, हळद, तिखट मीठ, चिंच आणि गुळ घालून ढवळावं.

*आधणाचं पाणी ओतून, जाड झाकणी ठेवून फोडी शिजु द्याव्यात.

*कोथींबीर घालून एक उकळी आणावी.

*(चारोळ्या घालायच्या असतील तर त्या भोपळ्याच्या फोडींबरोबर घालाव्या नाहीतर लवकर करपतात.)

वाढणी/प्रमाण: 
२-३जणांसाठी
अधिक टिपा: 

*थोडा रस्सा हवा असल्यास एक वाटीऐवजी दीड ते दोन वाटी पाणी घालून, त्यानुसार मीठ्-मसाला वाढवावा.

*कोळ बाजारचा किंवा फार घट्टं असल्यास कमी करावा. आंबटपणा कमी वाटल्यास भाजी उकळताना चिंच घालता येते.

*विदर्भात लग्नकार्यात ही भाजी असते. त्यात आचारी वरून भसकाभर तळणीचं तेल ओततात. (चवदार लागतं, पण महातेलकट!)

माहितीचा स्रोत: 
आई
आहार: 
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

काल ही भाजी केली होती. अफलातून चव आहे या प्रकाराला. कमी तेलात पण सुप्पर लागत होती. Happy
दोन घास जास्त जेवले गेले, कढई चाटून-पुसून साफ झाली !!

अर्धी वाटी खसखस >> जास्त नाही का होत? खसखस जास्त झाली की पदार्थ उग्र लागतो आणी झोप येते म्हणतात Uhoh

>>दोन घास जास्त जेवले गेले Lol
खरंच होतं असं. साधंवरण्-तूप्-भात आणि जोडीला ही भाजी असेल तर तुडुंब जेवण होतं.

वर्षा, बाकी भाजीचं प्रमाण बघता अर्धी वाटी खसखस जास्त होत नाही. कमी घेतली तरी बिघडत नाही. मसाले आणि आलं-लसूण वगैरे घालून तशीही भाजी सात्त्विक नसते. Happy

मीहि केली होती हि भाजी मृ. मस्त झाली होती. माझ्या नागपूरकर नवर्‍याने मस्तं ताव मारला भाजीवर. धन्यवाद मृ, इतकी छान रेसिपी इथे शेअर केल्याबद्दल.

आज मी केली ही बाकर भाजी. मस्त घमघमीत आणि चविष्ट झाली होती. अजूनही हाताला बाकराचा वास येतो आहे Happy
खसखशीऐवजी पांढरे तीळ घातले आणि तेल नेहमी भाजीला घालते तेवढेच घेतले.

मी मध्यंतरी हाच सगळा मसाला वापरून कांदा-वांगं-बटाटा रसभाजी केली. अप्रतिम लागली !! Happy

मग फाजील आत्मविश्वास घेऊन हाच मसाला वापरून तोंडल्याची रसभाजी केली. ती अत्यंत बेकार लागली Proud

३ वाट्या लाल भोपळ्याच्या मध्यम आकाराच्या फोडी (साल न काढता) >> साल काढले तर गाळ होईल का ? मला ठेववेसे वाटत नाहिये.

मी आज किंवा उद्या करणार आहे. भोपळा आणला आहे.

मी गेल्याच वीक एंडला केली होती एका पॉटलकसाठी. चिरलेल्या फोडी न मिळाल्यामुळे आख्खा बटरनट स्क्वॅश चिरून-बिरून आणि दीपची डेट-टॅमरिंड चटणी संपल्यामुळे चिंच भिजवून त्याचा कोळ काढून अशी एकदम शुन्यातून भाजी केली पहिल्यांदाच. ज्यांच्यासाठी नेली होती त्यांना फारच आवडली. तिथे भोपळा न खाणारं एक नाठाळ घोडं होतं त्यानं पण चाटुन-पुसून खाल्ली.

baakar.JPG

आरती, गाळ नाही होत. मी जून भोपळा मिळाल्यामुळे साल काढूनच केली होती. मात्र तसा भोपळा अगदी पटकन शिजतो. त्यामुळे लक्ष ठेवावं लागतं.

सिंडे, भाजी देखणी आहे!

आरती, ललिता म्हणतेय तसं लक्षं ठेवावं लागतं साल काढल्यावर. पण साल पातळ असेल तर सालासगट अख्खी फोड एकाच वेळी शिजते. चव छान लागते.

विदर्भ/वर्‍हाडातल्या भोपळ्याचं साल (काही वैदर्भीय मायबोलीकरांच्या कातडीसारखंच) पातळ असतं. पण भोपळ्याला चालून जातं. Proud

केली आज भाजी. मस्त लागली. सवयीने हळद आधीच तेलात घातली हाच काय तो बदल. बाकी पा.कृ जशी आहे तशीच केली.

लाल तिखट घातले नसते तरी चालले असते असे खाताना वाटले. पण एकुण मजा आली. Happy
.
Bhopala Bakarbhaji.jpg

वॉव !! आरती भन्नाट फोटो. लग्गेच् खाविशी वाटतेय . सिंडरेलाचा फोटुही तोपासू

विदर्भ/वर्हाडातल्या भोपळ्याचं साल (काही वैदर्भीय मायबोलीकरांच्या
कातडीसारखंच) पातळ असतं. पण भोपळ्याला चालून जातं.>>>>> मृण्मयी Proud

Gauri jevtat tya divshi sawashna mhanun jevayala gele hote, tya kaku Nagpur chya aahet. Tyani keli hoti hi bhaji. Lasun navhata naivedya mhanun. & tyani ras navhata thevala bhajila. Til pan ghatale hote khaskhas & suke khobrya sobat. Apratim sundar chav hoti. Arthat prasada che jevan mhanje Amruta chi chav asate mhana........

सिंडे, तुझ्या भाजीचा फोटो इथे बघितला : http://misalpav.com/node/33211 त्यासाठी तुझी परवानगी घेतली होती का? लेखिका 'मधुरा देशपांडे' ह्यांनी तिथे 'दोन्ही चित्रे आंतरजालावरून साभार' हे मात्र लिहिलंय. इतक्या इमेजेजमधून तुझ्या फोटोचं सिलेक्शन झालं. थँक्यू म्हणून ये. Proud

आंतरजालावरून साभार? आता त्या मिपाचं सदस्यत्व घ्यावं लागेल तिथे जाउन लिहायचं तर. एकुणात सध्या आंतरजालीय चोरांमध्ये मी भलतीच लोकप्रीय आहे म्हणायचं. एवढ्यातल्या एवढ्यात ही तिसरी चोरी.

@सिंडरेला, तो लेख माझाच आहे. माझ्या माहितीप्रमाणे "आंतरजालावरुन साभार" असे लिहिल्यास ती चोरी होत नाही, त्यामुळे मी परवानगी घेतली नाही. या माहितीत काही चुक असल्यास मी त्या लेखातुन फोटो काढण्यास सांगते. असे करण्यामागे चोरीचा उद्देश अजिबातच नव्हता. तरीही क्षमस्व.

Aantarjalawaroon sabhar lihiNa purese nahi. A proper permission is needed.

माझ्या माहितीप्रमाणे "आंतरजालावरुन साभार" असे लिहिल्यास ती चोरी होत नाही, त्यामुळे मी परवानगी घेतली नाही.>>>

अरे फोटो मायबोलीवरून घेतला आहे हे माहिती आहे तर निदान 'आंतरजालावरून साभार'ला मायबोलीवरच्या त्या विशिष्ट बाफची लिंक तरी द्या. ज्या आयडीचा फोटो आहे त्या आयडीचं नाव लिहा, मायबोली आणि त्या आयडीला श्रेय तरी मिळू दे.
आणि आता परवानगी घेणं अतिआवश्यक आहे हे समजल्यावर तरी परवानगीचे सोपस्कार पूर्ण करा. तिथला लेख अजूनही दुरुस्त करू शकता तुम्ही.

Pages