जोशी काकू '

Submitted by कविता केयुर on 28 August, 2015 - 06:39

जोशी काकू '

आज काही केल्या घड्याळाचे काटे पुढे सरकतच नव्हते. आपल्याला हवं तेव्हा वेळ थांबत नाही आणि वेळ थांबू नये असं वाटत तेव्हा ती जात नाही, या समीकरणाचा प्रत्यय येत होता आज.
आईला आत नेले होते . आतां या डायलिसिस सेंटर च्या Waiting area मधे पाच ते सहा तास असेच बसायचे होते, हो डॉक्टर आताच सांगून गेले होते तसं . 'डायलिसिस म्हणजे नक्की काय करणार', हा प्रश्न मागेच रेंगाळला कारण आता कशाचीच माहिती करून घेण्याची मनाची तयारीच नव्हती. मागच्या महिन्याभरांत बऱ्याच गोष्टींची झालेली अर्धवट / पूर्ण माहितीच पुरेशी होती. आता अजून नवीन काही नको होते.

देवाची अनेक रूपं पाहतो आपण, वेगवेगळ्या देवळांत. मला मात्र या एका महिन्यांत हि सगळी रूपं इथेच भेटत होती वेगवेगळ्या डॉक्टरांच्या रुपात. प्रत्येकावर तेवढाच विश्वास होता आणि अपेक्षाही. मात्र मंदिरात मिळते तशी शांतता नव्हती इथे मनाला… होती फक्त भीती !!!

या अवघड अवस्थेत असतानाच अचानक एक बाई समोर आल्या, अगदी सोज्वळ आणि सात्विक रूप. पिवळ्या रंगाची लाल काठाची साडी, डोक्यात घातलेले पिवळ चाफ्याच फुल, हातभर भरलेल्या हिरव्या बांगड्या त्यात चमकणाऱ्या पाटल्या, मणी मंगळसूत्र आणि कपाळावर लावलेल कोरड ठसठशीत कुंकू. मी जरा दचकलेच. मी काही बोलायच्या आधीच त्या म्हणाल्या, 'तीळ गुळाची वडी घे, चिक्कीच्या गुळाची आहे. घरी बनवलेली. तिळगुळ घे गोड बोल'. काही बोलण्याच्या आधीच हातावर वडी ठेवून त्या गेल्यासुधा. खूप वेळ मी त्या वडीकडे पाहत राहिले.या वर्षी संक्रांत अशी भेटली मला, इथे .

काउंटर वरच्या काकांच्या आवाजामुळे मी दचकले आणि पाहिले तर त्याच बाई काकांना तिळगुळ देत होत्या. 'तुमच्यासाठी मुद्दाम मऊ वडी आणली आहे.' काका म्हणाले ' का ? माझे दात अजून शाबूत आहेत, ती चिक्कीची वडी द्या जोशी काकू मला ', 'घ्या, दोन्ही खा हो', अस म्हणून त्यांनी दोन्ही वड्य़ा काकांना दिल्या. त्या नंतर येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाला, डॉक्टर्स ना , सिस्टर्स ना, पेशंटच्या सर्व नातेवाईकांना त्यांनी तिळगुळ वाटला. शेवटी 'झाल माझ हळदी कुंकू ' असं म्हणत समाधानाने समोरच बसल्या. इतका वेळ चालू असणारा त्यांचा तोंडाचा पट्टा आता तरी थांबेल अस वाटत असतानाच बाजूला बसलेल्या इतर चार चौघींबरोबर गुळाची पोळी व वड्यांची रेसिपी, साड्यांचा सेल पासून सुरु झालेली चर्चा आता इतर पेशंटच्या चौकशी पर्यंत येउन पोचली होती

मला खरं तर खूप त्रास होत होता या सर्वाचा. आपण कोठे आहोत आणि हे काय चालू आहे ? वाटत होत, त्यांना सांगाव कि, 'प्लीज थोड गप्प बसा हो, खूप त्रास होतोय' पण काहीच बोलू शकले नाही मी. मुक्याने सर्व पाहत राहिले …

इतक्यांत समोरून येणाऱ्या डॉक्टरांना पाहून थोडा धीर आला. त्या वातावरणाची सवय त्यांना होती पण माझ काय… माझा चेहरा पाहून त्यांना अंदाज आला असावा. ' अग बस, बस ' अस म्हणंत बाजूलाच बसले. त्या काकू परत आल्या आणि डॉक्टरांना तिळगुळ देवून त्यांचीच चौकशी करून गेल्या.

आता मात्र मी खूपच अस्वस्थ झाले. माझी ती अवस्था पाहून डॉक्टर म्हणाले , या जोशी काकू. मागच्या जवळपास चार वर्षांपासून दर दोन दिवसाआड इथे येतात, काकांना घेऊन. पाच ते सहा तास मग इथेच असतात. बाकी सर्वांची पण परिस्थिती काही वेगळी नाही, कोणी मागचे सहा महिने कोणी वर्षभर कोणी दोन वर्षांपासून येताएत इथे आपापल्या पेशंटना घेऊन … गणपती , दसरा , दिवाळी , राखी सगळे सण इथेच. किती दिवस भांडतील त्या वरच्याशी . शेवटी आपला आनंद शोधलाय त्यांनी , परिस्थितीशी जुळवून घेतलं. आम्हीच राखीला भाऊ होतो त्यांचे. आपल कर्तव्य पार पाडताना थोडा वेळ स्वत:साठी पण काढतात ते. या सर्वांचा क्लब आहे एक ' डायलिसिस क्लब '. इथे येणारा प्रत्येक जण ओळखतो जोशी काकुंना, सध्याच्या सिनियर पेशंट रिलेटीव आहेत त्या. हे ऐकून मी थक्क झाले.

स्वत:च दुःख कुरवाळताना समोरच जग मला दिसतच नव्हत. परिस्थिती माणसाला बदलवते आणि इथे तर या सर्वांनी आपल्या प्रयत्नांनी त्यांची परिस्थितीच बदलवली होती.

डॉक्टर माझा निरोप घेऊन कधीच गेले आणि पुढचा सर्व वेळ मी त्या काकुंना पाहत राहिले ……

Group content visibility: 
Public - accessible to all site users

डायलिसिस, दर दोन दिवसांनी, आणि तेही ४ वर्ष … आई ग Sad
कल्पनाच नाही करवत … कसे काय सहन केले सगळ्यांनी … खरच Hats Off . ..

खरच, कुणाकुणाचे कायकाय प्राक्तन असते. तरिही सदैव हसतमुख, सकारात्मक राहणारी माणसे असतात.