परेम कथा

Submitted by धनुर्धर on 9 August, 2015 - 01:49

माळाला जनावरं सोडून मी निवांत बसलो होतो. पावसाची भुरभुर चालूच होती. हिरव गवत भरपूर असल्याने जनावरं एकाच ठिकाणी चरत होती. मी तिथेच एका दगडावर ठिय्या दिला होता. येताना दोन मुठी भाजलेल्या शेंगा खिशात टाकल्या होत्या. एका हाताने छत्री धरत मी एक एक शेंग तोंडात टाकत होतो. त्या पावसाळी वातावरणात भाजलेले शेंगदाणे खाणे स्वर्गसुखाची अनुभुती देत होते. तेवढ्यात पायवाटेने एक छत्री वाकडी तिकडी होत माझ्याकडे येताना दिसली. तो जित्या होता. मी पटकन तिथे पडलेली शेंगांची टरफले पायाने दूर केली. हाताने तोंड पुसले, शेंगांनी भरलेला खिसा ठिकठाक केला. जित्याला जर शेंगांचा वास लागला तर मला एकही शेंग उरणार नाही याची खात्री असल्यानेच मी ही खबरदारी घेत होतो.
आता जित्या माझ्याजवळ आला. त्याचा हिरमुसलेला चेहरा बघून मी त्याला विचारले, "काय रं? काय झालं?"
"काय नाय" सुतकी आवजात जित्या बोलला.
"मग नाराज का हायेस असा?"
"ती शाळेबायेर दिसली व्हती"
आता हा तासभर माझं डोकं खाणार होता, मी मनाची तयारी करून विचारले , "मग॑ "

"येका पोराबरोबर बोलत व्हती" जित्या नाराजीच्या सुरात बोलला.
"मग तु काय केलंस?"
"मी काय करणार? फटकावला त्याला तिथल्या तिथं अन् काय?"
"च्याआयला! आता रं काय?"
"आत्ता काय? नाराज झाली असणार ती माझ्यावर!" दुःखी स्वरात जित्या उद् गारला.
"तुला मायती हाये ना 'मनी' मला किती आवाडते ती! पहिल्यांदा ती जेंव्हा ह्या गावात आली तवापासून आपण तिच्या मागं हाये! नळावर पाणी भरताना पहिल्यांदा मी तिला पाहिलं आणि . . . . ". जवळपास पंचवीस ते तीस वेळा त्याची स्टोरी मी एकल्यामुळे ती मला पाठ झाली होती. मनिषा माने ही दोन महिन्यांपुर्वी आमच्या गावात रहायला आली होती. तिच्या तिचे वडील सरकारी नोकर होते. त्यांची बदली आमच्या गावात झाली होती. त्यांनी भाड्याने एक खोली घेतली होती. त्या खोलीसमोर एका घराचे अर्धवट झालेले बांधकाम होते. तो आमच्या बसण्याचा अड्डा होता. माने कुटुंब राहिला आल्यानंतर दुसऱ्याच दिवशी पाणी भरताना जित्याने मनीला बघितले आणि तो प्रेमात पडला. त्या बांधकामाच्या भिंतीना वरचे बांधकाम करताना उभे राहता यावे त्यासाठी वासे आडवे लावण्यासाठी एका विटेच्या आकाराची भोके ठेवण्यात आली होती. तिच्या खोलीसमोरच्या असणार्या भिंतीच्या एका भोकातून हा तिच्या खोलीकडे तासन् तास बघत राही. वास्तविक त्या भिंतीपासून ती खोली बरीच लांब होती तरीही आपण तिला इथून पाहतो हा संशय कोणाला येऊ नये म्हणून त्याने त्या भोकात एक तुटकी चप्पल अडकवली होती व थोडी फट ठेवून तो टेहाळणी करीत असे. त्या भोकातून इतर कोणी डोकावल्यास जित्याचा राग अनावर होत असे. काही दिवसात तो तिच्या प्रेमात एवढा बुडाला की त्याने आपला बिछानाच त्या अर्धवट घरात आणून टाकला. शेवटी आम्हाला ही त्याच्या सोबतीला यावे लागले. आता रात्रीचीही निरिक्षणे होऊ लागली आणि आमच्या गप्पा ह्या एकाच विषयावर होऊ लागल्या. सुरुवातीला आम्हाला सुद्धा त्यात रस होता. पण नंतर त्याचे अती होऊ लागले ह्या एकाच विषयावर एकायचा, बोलायचा कंटाळा यायला लागला. जित्याचा मात्र उत्साह दिवसेंदिवस वाढतच होता. आमच्या पैकी जो सापडेल त्याला त्याची प्रेमकहाणी एकावी लागे. शेवटी शेवटी आम्ही त्याला टाळू लागलो. पण झोपायला आम्ही त्या नविन बांधकामात जात असल्याने तिथे मात्र कुणाचेच काही चालत नसे. त्याच्या प्रेमग्रंथाचा एक एक अध्याय आम्हाला रोज एकावा लागे. आज मात्र त्याने कहरच केला होता. मनीच्या शाळेत जाऊन मारामारी केली होती.
"बरं चल घरी, बघू संध्याकाळी काय व्हईल ते!"
असं म्हणत मी म्हशींना घराकडे

हाकलू लागलो.
रात्री आमची या विषयावर गंभीर चर्चा होऊ लागली.
"च्याआयला त्या पोराच्या! मी त्याला सोडणार नाय!" जित्या दातओठ खात म्हणाला.
"अरं नुस्त बोललं म्हणून काय त्यांच लफडं झालं काय?" मी त्याचा राग कमी करण्याचा प्रयत्न केला.
"मगं आता करायंच तरी काय?" जित्याने पुन्हा प्रश्न केला.
"मी सांगू का? तु तिला डायरेक विचरून टाक " सोम्या काडीने आपले दात कोरत म्हणाला.
"अन् ती 'नाय' म्हणाली तर?" मन्या भीतीयुक्त सुरात बोलला.
"च्याआयला ह्याच्या ! काळ्या जीभंच्या" असं म्हणत जित्याने दोन गुद्दे त्याच्या पाठीत मारले तसा मन्या ओरडत आपल्या गोधडीत शिरला.
"मी काय म्हंन्तो आपण त्या राम्याला गाठू या. तो तिच्या वर्गात पण हाये आणि घरी दुध पण घालतो." मी एक उपाय सुचवला.
"मायला ही आयड्या चांगली हाये. आधी राम्याला पटवू मगं तो आपली वळख मनीशी करून दील , मंग पुढच आपणं बघू" सोम्या टाळी देत बोलला. या गोष्टीवर जित्याचे समाधान झाले.
"उद्याच राम्याला गाठू." जित्या हात चोळत बोलला.
"पण राम्यानेच तिला पटवली तर?" मन्याच्या गोधडीतून ही शंका बाहेर पडली आणि पाठोपाठ दोन कचकचीत शिव्या आणि दोन जोरदार लाथा खाऊन ती गोधडी शांत झाली. मग जित्याने आपले डोळे त्या भोकाला चिटकवले आणि आम्ही गोधडीवर अंग!
दुसऱ्या दिवशी संध्याकाळी राम्या दुध घालून बाहेर आला आणि आम्ही त्याला गाठले.
"काय रामदास घातलंस का दुध?" जित्याने त्याच्या खांद्यावर हात टाकला.
"हे काय आत्ताच !"
"मनी व्हती का घरात "
ह्या प्रश्नानं राम्या थोडा गांगारला.
"आसलं की"
"तुझ्याशी बोलत आसलकी"
"नाय बाबा! माझ्याशी कशाला बोललं ती? मी आपला दुध घालतो आणि काय नाय" राम्या अंग झाडू लागला.
"हे बघ रामदास, तु तर आपल्या जितू भाऊला वळखतोच ना तु" मी

मुद्द्याला हात घातला. राम्याने भेदरून जित्याकडे पाहत मान डोलावली.
"तर तु आपल्या जितूभाऊची आणि मनीषाची ओळख करुन द्यायची"
हे एकून राम्याला जरा गरगरायला झाले. तो ततपप करू लागला. तेवढ्यात "समाजलं का राम्या" जित्यान दरडावणीच्या सुरात ओरडला.
"हा हा! देतो की, देतो की, पण एवढ दोनचार दिवस जाऊ दे. आम्ही आता एकत्रच आभ्यास करणार हाये. त्या वेळेस बोलतो मी तिच्याशी " राम्या कळवळत बोलला.
"कुठं आभ्यास करणार तुमी" जित्याने डोळे बारीक केले.
"तिथंच त्यांच्या वट्यावर"
"फकस्त आभ्यासच करायचा, बाकी काय नाय! समजला आँ?" जित्या गरजला.
"बास का? इस्वास नाय का माझ्यावर?" राम्या नाराजीत बोलला.
"आरं तस नाय, विसरशील म्हणून बोलला त्यो" मी सावरण्याचा प्रयत्न केला.
"बरं जाव का मी" राम्या निघाला.
आम्हीही घरी निघून आलो.
नंतर दोन तीन दिवस रोज जित्या राम्याला भेटून आपली प्रेमकहाणी एकवू लागला त्यामुळे आम्ही थोडासा सुटकेचा श्वास सोडला. नंतर एक दिवस खरोखरंच राम्या मनीषाच्या घरी आभ्यासाला आला. रात्री ८.३० ते ११.०० पर्यंत त्यांचा अभ्यास चालू होता. जित्याही तेवढा वेळ त्याच्या दुर्बिणीला डोळे लावून होता. आम्ही मात्र निवांतपणे झोपी गेलो. पहिल्या दिवशी काहीही घडले नाही. दुसऱ्या दिवशी मला नुकतीच झोप लागली होती तोच जित्या मला गदा गदा हलवू लागला. मी डोळे चोळत जरा त्रासिक आवाजात विचारले, "काय झालं"
"अरं दोघं बोलत्यात बघ!" जित्या कुजबुजला आणि पहिल्यांदाच त्याने मला त्या भोकामधून बघू दिले. घरासमोरील ओट्यावर राम्या आणि मनी हातात पुस्तकं घेऊन अभ्यास करत होते. मधूनच ते एकमेकांशी बोलत होते.
"आरं आभ्यास चाललाय त्याचा"
"मग आभ्यास करताना बोलत्यात कशाला"
"आत्ता मी काय सांगू?"
"उद्या राम्या मरतोय माझ्या हातून" जित्या

दातओठ खात म्हणाला.
"आरं तो बोलला नाय तर तुझी वळख कशी करून देणार ? " मी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला. त्याने मान डोलावली.
"झोप आता, उद्या बघू" म्हणत मी झोपी गेलो.
दुसऱ्या दिवशी जित्याने राम्याला गाठलाच
"काय रं भडव्या काय बोलत व्हतास तिच्याशी?" जित्यानं राम्याची गचांडी पकडत दरडावले.
"काय नाय आरं एक शंका इचारंत व्हतो" राम्या दबकत दबकत बोलला.
"तुझ्या आयला! तुला माझ्या इषयी इचारायला पाठावलाय का श॑का?" म्हणत जित्याने दोन गुद्दे त्याच्या पाठीत घातले.
"येवढ्या दोन दिसात नक्की इचारतो" असे म्हणत राम्याने काढता पाय घेतला.
"दोन दिसात तु नकोच इचरू , तुझं तंगडच मोडतो बघं" पळता पळता राम्याच्या कानावर ही जित्याची आरोळी पडली. मग दोन दिवस जित्या त्याच्या त्या दुर्बिनीला डोळे लावून बसला. इकडे राम्याचा अभ्यास कमी आणि शंकाच जास्त वाढू लागल्या. कधी कधी शंका विचारने व त्याचे निरसन हसण्यामधुन होऊ लागले. आत्ता मात्र जित्याचा संयम सुटला. एक दिवस त्याने राम्याला गाठला. "तुझ्या शंका लयच वाढायला लागल्यात हल्ली"
"आरं बोर्डाचा आभ्यास हाये, त्यामुळं इच्चाराव लागतं आणि मनीषा लय हुशार हाये" हे बोलताना राम्या कुठेतरी हरवल्या सारखा झाला.
"चल आता माझ्या शंका दूर कर" असे म्हणत वाघाने बकरी उचलून न्यावी तसा राम्याला जित्या घेऊन गेला. तेंव्हापासून राम्याने मान्यांकडचा रतीब बंद केल्याचे कळवले. रात्रीचा अभ्यासही बंद झाला. आता मात्र जित्याची घालमेल वाढू लागली. काही तरी करणे आवश्यक होते. एक दिवस घाईगडबडीत तो माझ्याकडे आला, "येक आयड्या सुचलीया" उत्साहात जित्या सांगू लागला, "आपण चिट्ठी लिवायची"
"आरं पण" मी थोडासा घाबरलो.
"आत्ता 'पण' नाय नि 'बिन' नाय ठरलं म्हन्जे ठरलं! तु वही आन् पेन आणं" त्याचा
निश्चय पाहून मला वही आणि पेन आणणं भाग पडलं. "मी सांगन तस लिव" मी त्याचा लेखनिक असल्यावसारखी त्याने मला ऑर्डर सोडली. "नाय बाबा आपल्याला नाय जमायचं, माझं आक्षर चांगल नाय." मी संभाव्य धोका ओळखून माघार घेतली.
"आणं हिकड लितो माझं मी" काहीश्या नाराजीने त्याने वहीपेन माझ्या हातातून हिसकावून घेतले आणि स्वतः लिहू लागला. लिहीताना त्याच्या चेहर्यावर वेगवेगळ्या प्रकारचे हास्य उमटत होते. पंधरा मिनिटात त्याने लिहीलेली चिट्ठी माझ्या हातात दिली. "वाच" त्याने मला पुन्हा ऑर्डर दिली. मी वाचू लागलो, "प्रीय मनीशा
तु मला नळावर दीसल्यापासन खूप आवडाया लागली हायेस माझं तुझ्यावर लय परेम बसलंय तरी तु बी माझ्यावर परेम करावं ही विनंती
कळावे
आपला इश्वासू
जीतेंद्र नाना साळे
चिठ्ठी वाचून काय बोलावे हे मला सुचेना. जित्या स्वतःवर खुश होत चिठ्ठी घेऊन गेला. शाळा सुटायच्या वेळेत तो रस्त्यावर असलेल्या मोकळ्या गोदामाच्या आडोश्याला थांबून मनीषाची वाट पाहू लागला. दुरवर 'ट्ण ट्ण ट्ण ' शाळा सुटल्याची घंटा झाली आणि त्याच्या ह्रुदयाचे ठोके वाढू लागले.
तेवढ्यात त्याला मनीषा येताना दिसली. जवळ येताच तो तिच्या समोर जाऊन उभा राहिला. काही न बोलता त्याने खिशातून चिठ्ठी बाहेर काढली
"ही चिट्टी" पोस्टमन सारखे दोनच शब्द त्याच्या तोंडातून बाहेर पडले. मनीषा कावरी बावरी झाली. त्याला टाळून जाऊ लागली. "घे की! त्यात काय लिवलंय तेवढ वाच की!" कशीबशी दोन वाक्ये तो बोलू शकला. इकडे तिकडे बघत तिने ती चिठ्ठी पटकन हातात घेतली व ती झप झप पावले टाकीत निघून गेली. सुटकेचा निश्वास टाकत जित्याही घरी परतला.
संध्याकाळी मी गोठ्यात जनावरांना चारा घालत असताना जित्याच्या घराकडून मला गलबला एकू आला. मी त्या दिशेने निघालो. जवळ जाताच एक बाई तावा तावाने बोलताना दिसली. ती मनीषाची आई होती. तिच्याकडेला मनीषा डोळे पुसत उभी होती. जित्याचे वडील नाना तिला समजावत होते. जित्या तिथेच खाली मान घालून उभा होता. आणखी बरेच लोक उभे होते. मी हळूच जाऊन गर्दीत मिसळलो.
"हे बघा तुमच्याकडे पाहून मी गप्प बसते नायतर पोलीसांनाच बोलावले असते" मनीषाची आई.
"हे बघा हीथन फुढ हा तिला कायबी तरास देणार नाय हे मी बघीनं तुमी काळजी करू न का" नाना समजावणीच्या सुरात म्हणाले.
"परत अशी तक्रार येता कामा नये, अहो तिच्या वडलांना ही गोष्ट कळली तर काय होईल? हा ह्या असल्या चिठ्ठ्या लिहतो. त्याला लाज कशी वाटत नाही" जित्याकडे रागाने पहात माने बाईंनी चिठ्ठी नानांच्या हातात दिली. नानांनी तिच्यावर नजर फिरवली आणि फाडकन जित्याच्या मुस्कटात लगावली.
"हेच शिकायला साळंत गेल्ता व्हय रं भडव्या"
जित्या गाल चोळत खाली बघत राहिला.
"चांगली शिस्त लावा त्याला म्हणजे असले उद्योग करायचा नाही तो!" मनीषाच्या आईने आगीत तेल ओतले.
"आता बोल की रे भाड्या वाचा बसली का तुझी परत करणार का आसं?" नाना डोळ्यांनी आग ओकत बोलले. हा गप्प उभा.
"ताई तुम्ही जा घरी ह्याला दावतो माझा इंगा! परत काय तुमच्या पोरीच्या वाट्याला जाणार नाही" नानांनी विनंती केल्यावर मानेबाई मनीषाला घेऊन बडबड करत निघून गेल्या. नाना खुप संतापले होते.
"परेम करतंयस व्हर भडव्या चल आत तुला सांगतो" असं म्हणत ते जित्याला फरफटत आत घेऊन गेले. मीही घरी आलो. पुढे तीन चार दिवस काही जित्या दिसला नाही. नंतर तो परत यायला लागला. आमच्या गप्पा परत व्हायला लागल्या पण मनीचा विषय काय त्याने परत काढला नाही. ते अर्धवट बांधकामही पुन्हा सुरू झाले, आणि ती फट ही बुजवून टाकण्यात आली होती जिच्यातून जित्या मनीकडे पहायचा.

. . . . . . . धनंजय . . . . . .

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आवडली..
बरेच प्रेमकहाण्या अश्याच नष्ट होतात ..
बापाच्या धाकाने, आईच्या माराने ..
पण तसे होण्यातच त्यांचे भले असते ..

धनंजय आवाळे,

छान कथा आहे. मिलिंद बोकीलांची शाळा कादंबरी अशाच वळणाने जाते.

आ.न.,
-गा.पै.

मस्त Happy