जम्मू- कश्मीर मदतकार्याच्या आठवणी- ८

Submitted by मार्गी on 6 August, 2015 - 03:44

२०१४ च्या सप्टेंबरमध्ये जम्मू- कश्मीरमध्ये आलेल्या महापूरानंतर तिथे मदतकार्यात घेतलेल्या सहभागाच्या आठवणी माबोकरांसोबत शेअर करत आहे. सर्वांना अभिवादन! (अवांतर- हे काम उदात्त/ ग्रेट इत्यादी नसून उत्स्फूर्त केलेलं सामान्य कामच आहे. आपण प्रत्येक जण असं काम कुठे ना कुठे करतंच असतो. ज्यांच्याकडे तशी पॅशन असते, तसे लोक ते काम जास्त काळ करतात. तेव्हा उदात्त/ ग्रेट असं काही मानू नये. धन्यवाद!)

जम्मू- कश्मीर मदतकार्याच्या आठवणी- १
जम्मू- कश्मीर मदतकार्याच्या आठवणी- २
जम्मू- कश्मीर मदतकार्याच्या आठवणी- ३
जम्मू- कश्मीर मदतकार्याच्या आठवणी- ४
जम्मू- कश्मीर मदतकार्याच्या आठवणी- ५
जम्मू- कश्मीर मदतकार्याच्या आठवणी- ६
जम्मू- कश्मीर मदतकार्याच्या आठवणी- ७

राजौरीमार्गे श्रीनगर

११ ऑक्टोबरला पहाटे जम्मूवरून श्रीनगरला जायला निघालो. इतक्या पहाटे उठून रवीजींनी कडक चहा बनवला. बनिहालच्या रस्त्याची स्थिती अजून ठीक नाही आहे, त्यामुळे मुघल रोडनेच जाऊ. अंधारात जम्मूच्या बाहेर पडून अखनूर रोडला निघालो. एम्ब्युलन्समध्ये कालच सर्व सामान ठेवलेलं आहे. औषधे आणि काल आलेले लाईटस आहेत. मी आणि दादाजी आहोत. चाचूजी गाडी चालवत आहेत. आज राजौरीमध्ये सेवा भारतीच्या काही कार्यकर्त्यांना भेटायचं आहे. तिथेसुद्धा मदतकार्य चालू आहे.

७ ऑक्टोबरला आलेल्या पावसानंतर हवामान शांत आहे. आल्हाददायक थंडी आहे. अखनूरजवळ रस्त्यामध्ये खूप धुकं आहे. ढगांमधून जात आहोत असं वाटतं. नंतर हळुहळु सूर्य वर आला आणि त्याने ऊर्जा दिली. दादाजींसोबत काल झालेली चर्चा पुढेही सुरू आहे. दादाजी म्हणतात की, कश्मिरी पंडितांमध्ये स्वत:ला श्रेष्ठ मानायचा एक भाव आहे जो अन्य समाजांमध्ये इतका नसतो. म्हणून ते स्वत:ला सगळ्यांपेक्षा वेगळे मानतात. कश्मीरला विशेष मानण्याचं कारण ह्याच विचारांमध्ये आहे. पण फक्त कश्मिरी पंडितच का, सर्वच लोकांमध्ये कमी अधिक प्रमाणात हा विचार असतोच. जेव्हा कधी आपण कोणाला भेटतो तेव्हा आपल्यापैकी कित्येक जण 'माझा जॉब असा असा आहे; मी असं ड्रायव्हिंग करतो; मी इतकं जग बघितलं आहे' अशा गोष्टी‌ सांगून स्वत:चं श्रेष्टत्वच सांगत असतात. किंवा मग 'मेरा भारत महान' म्हणणं असेल किंवा 'सारे जहाँ से अच्छा हिंदोस्ताँ हमारा' असेल; इथेही विचार तोच आहे. भारत महान आणि सगळ्या जगापेक्षा चांगला का तर तो माझा आहे! असो.

ह्या गोष्टी समजून घेताना एक गोष्ट नक्की‌ लक्षात घेतली पाहिजे. एक जुनी गोष्ट आहे. काही आंधळे हत्तीजवळ गेले. त्यांनी हत्ती काय आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न केला. ज्याचा हात सोंडेला लागला, त्याला हत्ती तसाच वाटला. ज्याचा हात शेपटीला लागला, त्याला हत्ती‌ दोरीसारखा वाटला. हेच इथेसुद्धा लागू आहे. आपण ज्या गोष्टी बघू शकतो किंवा समजू शकतो; त्या फक्त एखाद्या छोट्या तुकड्यासारख्या असतात. सत्य खूप गहन आणि व्यापक असतं. म्हणून दादाजी म्हणतात की, कुठे जजमेंट करू नये; गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न करत राहावं.
दादाजींनी पुढे सांगितलं की आता कश्मिरी मुसलमानांचे विचारही बदलत आहेत. काही प्रमाणात आधीपासूनच त्यांचे विचार वेगळे होतेच. कश्मीरमध्ये महिला बुर्का कमी वापरतात. महिलांबद्दल फार जास्त पक्षपात इथे होत नाही. आणि युवा पिढीमध्ये एका कुटुंबात दोन ते तीन मुलंच होतात. युवा पिढी खूप डायनॅमिक आहे. कश्मीरच्या क्रीम वर्गातील युवा जम्मू, दिल्ली किंवा भारतातील अन्य शहरे किंवा मग विदेशात शिकतात. अर्थातच त्यांचे विचार व्यापक होणार. पण त्यामध्ये अडचण हीसुद्धा आहे की, अशा शहरांमध्ये शिकल्यानंतर ते एक प्रकारे त्यांचं कश्मीरसोबतचे नातं दुरावतं; ते सेटल बाहेरच होतात. . .

दादाजींनी पुढच्या कामाची रुपरेषासुद्धा सांगितली. आता हळु हळु डॉक्टरांचे शिबिर कमी होतील. त्यानंतर एम्ब्युलन्स- मोबाईल क्लिनिक चालवायची आहे. त्यासाठी‌ देशभरातले डॉक्टर आळीपाळीने येतील असा प्रयत्न सुरू आहे. वर्षामध्ये पन्नास आठवडे असतात. देशाच्या वेगवेगळ्या ठिकाणाचे डॉक्टर एक एक आठवड्यासाठी जरी आले, तरी वर्षभर अशी एम्ब्युलन्स चालू शकते. अर्थात् त्यासाठी ड्रायव्हर आणि मेंटेनन्सची व्यवस्था करायची आहे. आत्ता ह्या संदर्भात अनेक जणांशी बोलणं‌ सुरू आहे. त्यानंतर पुढेही मदतीसाठी जितकी सामुग्री सेवा भारतीकडे येत राहील, तितक्या प्रमाणात हे काम सुरू राहील. इथे हे लक्षात घ्यायला पाहिजे की, सेवा भारती जमिनीवर काम करणारी एक स्थानिक एनजीओ आहे. ती फक्त माध्यम बनली. मदतकार्याचे खरे कार्यकर्ते सामान्य जनतेतून आलेले आणि देशभरातून आलेले कार्यकर्ते होते आणि मदत सामुग्रीसुद्धा बाहेरून आली. म्हणून पुढेही‌ जितकी मदत येत राहील, तितकं काम सुरू राहील.

ह्याबरोबरच उपजीविकेसाठी काही काम करायचं आहे. लोकांना उपजीविका पुन: सुरू करण्यासाठी काय करावं लागेल ह्यावर विचार चालू आहे. राजौरीमध्ये ह्या विषयावरही चर्चा होईल. दादाजींना हे माहिती आहे की, बाहेरून मदत घेऊन सतत काम करता येऊ शकत नाही. पण परिस्थितीची गरज बघता बाहेरून थोडी मदत घ्यावीच लागेल. एकदा सुरुवात झाल्यावर काम पुढे वाढू शकतं.

राजौरीला पोहचेपर्यंत सगळीकडे छान ऊन पडलं आहे. जागोजागी मिलिटरीचे युनिटस आहेत. राजौरीमध्ये राणे हेलिपॅडचा एक बोर्ड दिसला. हे नक्कीच राघोबा राणे नावाच्या सैनिकाच्या स्मरणार्थ असणार ज्याने १९४७ च्या युद्धामध्ये राजौरी वाचवताना प्राण दिले होते. कश्मीर ही एक विशाल भूमी आहे- बलिदानाची, शौर्याची आणि राजकीय असमंजसतेचीसुद्धा. असो. राजौरी! जम्मू क्षेत्रातला एक मुख्य जिल्हा. गांव मोठं आहे; पण रस्ते छोटे आणि अरुंद गल्ल्या. इथे सेवा भारती जम्मू- कश्मीरचे उपाध्यक्ष राहतात. त्यांच्याच घरी जायचं आहे. इथे सेवा भारतीची राजौरी शाखा कार्यरत आहे. पण तिची बॉडी वेगळी आहे.

सेवा भारतीचा प्रयत्न आहे की, एक एम्ब्युलन्स राजौरीमध्येही चालावी. इथल्या दुर्गम गावांमध्ये पुरामुळे मोठं नुकसान झालेलं आहे. म्हणून एम्ब्युलन्स चालली तर लोकांना मदत मिळेल. पहिल्या टप्प्यात इथे शिबिर चालवले गेले होते. ह्या एम्ब्युलन्सच्या संचालनाची जवाबदारी राजौरीतील सेवा भारती सदस्यांनी घ्यावी, असं दादाजींना वाटतं. ह्यासाठी कुठे फंड्स मिळतील का, हेसुद्धा बघितलं जात आहे. ज्या लोकांची घरं मोडली आहेत किंवा नष्ट झालेली आहेत, त्यांच्यासाठीसुद्धा निधी पाहिजे. उपजीविकेचा एक प्रस्ताव असा आहे की, स्टॉल किंवा ठेला चालवून लोक आपलं दुकान पुन: सुरू करू शकतात. ह्यासाठी ह्या प्रस्तावांवर थोडं काम करून संभाव्य मदत करणा-या संस्थांकडे त्यांना पाठवायचं आहे. श्रीनगरमध्ये अजित कदम ह्यांची राउंड टेबल फाउंडेशन नावाची पुण्याची एक संस्था अनेक एम्ब्युलन्सेस चालवत आहे असं कळालं. गूँजसुद्धा इथे काम करते आहे. गूँजने सेवा भारतीला काही औषधंसुद्धा दिली आहेत.

राजौरीमध्ये मोहनलालजींच्या घरी खूप वेळ चर्चा झाली आणि मस्त नाश्तासुद्धा झाला. पुढे थाना मंडीपासून रस्ता छोटा झाला. कदाचित श्रीनगरचा मुख्य रस्ता बंद आणि जाम झालेला असल्यामुळे अनेक छोटे वाहन ह्याच रस्त्यावरून जात आहेत आणि म्हणून रस्ता थोडा खराब झालेला दिसतो आहे. वाटेत एक स्थान डिकेजी नावाचं आहे. इथून दूर पर्वतामध्ये पांढरा रंग चमकताना दिसतोय. बर्फ पडण्यास सुरुवात झाली का? पुढे गेल्यावर कळेल. इथून बाफ्लियाजपर्यंत आता उतार. तिथून मुघल रोड सुरू होईल. आता अद्भुत नजारा आहे. खरोखर समोरच्या शिखरावर बर्फ दिसतो आहे!

प्रवासातसुद्धा दादाजी ह्या संपूर्ण कामाबद्दल लोकांशी बोलत आहेत. पुढेही डॉक्टर येतील ह्यासाठी एनएमओ आणि अन्य डॉक्टरांसोबत बोलत आहेत. दादाजींचं वय सत्तरच्या घरात असेल; पण ते फार सक्रिय आणि तरुणांप्रमाणे आहेत. ईमेल, लॅपटॉप, व्हॉटस अप अशा गोष्टींचा तेही खूप वापर करतात. सगळ्या ठिकाणचं समन्वयन तेच बघतात आणि लहान मुलाप्रमाणे म्हणतात, 'हम तो कुछ नही करते, बीरे!' बोलण्यात जर त्यांना एखादा अनावश्यक प्रश्न विचारला जसं किश्तवाड़मधून हिमाचलला जाण्याचा रस्ता सुरू आहे का किंवा बनिहालचा रस्ता कधी‌ सुरू होईल, तर ते लगेच फटकारतात- असे बिनकामाचे प्रश्न विचारू नकोस. होईल, न होईल, त्यामुळे काय फरक पडतो? अशी थट्टा मस्करीच्या गप्पाही सुरू आहेत. त्यामुळे चर्चेत मजा येते. दादाजी कश्मीरला अगदी आतून ओळखतात. लदाख, झांस्कर सारख्या सर्व ठिकाणी ते राहिलेले आहेत. श्वास घेताना दाढीवर बर्फ जमा होईल इतक्या थंड वातावरणातही राहिले आहेत. एकदा विषय छत्तीसिंगपूराचा निघाला. २००१ मध्ये बिल क्लिंटन भारतात आले असताना छत्तीसिंगपूरामध्ये अतिरेक्यांनी ३६ शीखांची हत्या केली होती.

दादाजींनी सांगितलं की हे गांव अनन्तनाग जिल्ह्यात आहे आणि अजूनही शीख परिवार इथे राहतात. काही दिवसांपूर्वी श्रीनगरमध्ये गेलो असतानाच कळालं होतं की अनन्तनाग अधिकृत नाव असलं तरी स्थानिक लोकांच्या बोलण्यात त्याला इस्लामाबाद म्हणतात कारण फुटिरतावाद्यांनी त्याला इस्लामाबाद म्हणणं सुरू केलं आहे. असो.

पीर की गलीजवळ येता येता नजारा आणखी भव्य होत गेला. पीर की‌ गलीमध्ये मस्त बर्फ मिळाला. जर दुपारच्या ऐवजी सकाळ असती‌ तर बर्फ हातात घेता आला असता. आता इथून पुढे सरळ उतार. शोपियाँ आणि पुलवामा मार्गे श्रीनगर. रस्त्यात दादाजींचं‌ बोलणं कुपवाडामध्ये शिबिर घेणा-या डॉ. प्रज्ञा दिदींसोबत झालं. त्यांना काही अडचण येत असावी असं जाणवलं. गावामध्ये थांबावं का श्रीनगरला यावं असा त्या विचार करत असाव्यात. त्याचा निर्णय दादाजींनी त्यांच्यावरच सोपवला आणि म्हणाले की, तुम्हांला जे ठीक वाटत असेल ते करा. दादाजी लोकांना खूप चांगलं पारखून घेतात आणि मग त्यांना काम सोपवतात. अनेक वेळेस ज्येष्ठ लोक दुस-यांवर निर्णय सोपवताना काचाकूच करतात. पण दादाजी माणूस बरोबर ओळखतात आणि त्याला निर्णय घेऊ देतात. गरज असेल तर ते फक्त आपलं मत सांगतात.

श्रीनगरला पोहचेपर्यंत संध्याकाळचे पाच वाजले. पण अद्भुत नजारा आणि कश्मीर आतून बघण्याच्या आनंदात वेळ गेल्याचं‌ जाणवलं नाही. अजून कार्यालयात जावेदजी, नज़ीरभाई हे काही स्थानिक कार्यकर्ते आणि संस्थेचे मयूरभाई, मुरैनाहून आलेले सुरेंद्र त्यागीजी, फार्मसिस्ट चेतनजी‌ आणि वर्माजी आहेत. वर्माजी कुपवाडावरून आले आहेत. बहुतेक त्यांचं वाहन तिथे बंद पडल्यामुळे त्यांना परत यावं लागलं. आज रात्री बहुतेक दोघे डॉक्टर दुस-या वाहनाने परत येतील. श्रीनगरमध्ये गाडी सर्विसिंगमध्येही अडचणी आहेत. वाहनं पाण्याच्या तडाख्यात सापडल्यामुळे तीन महिन्यांपर्यंत सर्व सर्विस सेंटर्स बूक झालेले आहेत. आता एक तर ती‌ गाडी कशी तरी चालू करून जम्मूपर्यंत न्यावी लागेल. असो.

आता कार्यालय अगदी सुनसान वाटतं आहे. चार दिवसांपूर्वी इथे कित्येक डॉक्टर होते; आश्रमातसुद्धा अनेक कार्यकर्ते थांबलेले होते. पण आत्तापर्यंत खूप लोक परतले आहेत. आणि डॉक्टरही फक्त दोनच आहेत. म्हणून श्रीनगरच्या रेसिडन्सी रोडवरील आश्रमात काही दिवस शिबिर झालं नाही. पण पुढचे डॉक्टर आता लवकरच येतील. उद्यापासून फिल्डवर जायचं आहे. आणि आज राजौरीमध्ये झालेल्या चर्चेप्रमाणे काही प्रस्तावही बनवायचे आहेत. सुरेंद्रजींनी बनवलेला व्हिडिओ एकदम छान आहे.


बर्फाचं ह्या वर्षीचं पहिलं दर्शन. . .

   पुढील भाग: जम्मू कश्मीर मदतकार्याच्या आठवणी- ९

मूळ हिंदी ब्लॉग:
जन्नत को बचाना है: जम्मू कश्मीर राहत कार्य के अनुभव १
जन्नत को बचाना है: जम्मू कश्मीर राहत कार्य के अनुभव २
जन्नत को बचाना है: जम्मू कश्मीर राहत कार्य के अनुभव ३
जन्नत को बचाना है: जम्मू कश्मीर राहत कार्य के अनुभव ४
जन्नत को बचाना है: जम्मू कश्मीर राहत कार्य के अनुभव ५
जन्नत को बचाना है: जम्मू कश्मीर राहत कार्य के अनुभव ६
जन्नत को बचाना है: जम्मू कश्मीर राहत कार्य के अनुभव ७
जन्नत को बचाना है: जम्मू कश्मीर राहत कार्य के अनुभव ८

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हा भागही खुप छान आहे
इतक्या उत्तम लेखमालिकेवर प्रतिसाद नाहीत हे पाहून सखेद आश्चर्य वाटतय Sad
असो
तुमच्या मदतकार्याच्या आठवणी तुम्ही इथे शेअर करत आहात त्याबद्दल धन्यवाद
पुढील भागाच्या प्रतीक्षेत Happy

आपण ज्या गोष्टी बघू शकतो किंवा समजू शकतो; त्या फक्त एखाद्या छोट्या तुकड्यासारख्या असतात. सत्य खूप गहन आणि व्यापक असतं. म्हणून दादाजी म्हणतात की, कुठे जजमेंट करू नये; गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न करत राहावं.>>>>> अगदी अगदी ....

फारच सखोल विचार आहेत दादाजींचे....

सेवा भारती - ही कुठली संस्था, काय आणि कुठे नेमके कार्य करते ??

लेखमाला अप्रतिम ...

सगळे भाग वाचून काढले. खूप प्रशंसनीय कार्य आहे. पण मला ही मालिका वाचताना थोडं विस्कळीत लेखन वाचल्यासारखं वाटतंय. म्हणजे माहिती चांगली आहे पण मजकुराची मांडणी विस्कळीत आहे त्यामुळे वाचताना सलगता वाटत नाही.

वाचनाबद्दल आणि प्रतिसादांबद्दल सर्वांना मन:पूर्वक धन्यवाद.

@पुरंदरे सर- हो; दादाजींचं व्यक्तिमत्व प्रचंड प्रेरणादायी आहे. जम्मू- कश्मीरला गेलातर तर आपण त्यांना भेटू शकता. सेवा भारती नावाच्या भारतात अनेक संस्था आहेत. ही जम्मू- कश्मीर सेवाभारती आहे. कार्यालय जम्मू, श्रीनगर व लेहमध्ये आणि काम अडीचशेपेक्षा जास्त गावांमध्ये काम आहे. एकल विद्यालय योजना, वस्तीगृहे, आरोग्य, आपत्तीमध्ये मदत असं विविधांगी काम आहे. मुख्य फोकस स्थानिक माणूस घडवण्यावर. इथे इतर औपचारिक तपशील.

@ जिज्ञासा जी- धन्यवाद. हो; हे लेखन विस्कळित आहे; कारण मूळ मदतकार्यातला सहभागही त्या अर्थाने विस्कळीत होता. जम्मू- श्रीनगर- जम्मू- श्रीनगर प्रवास झाले. मदतकार्य प्रक्रिया तशी ad hoc असते. निश्चित प्लॅन नसतो. परिस्थितीनुसार कामं केली जातात. त्यामुळे ती अनिश्चितता; त्यावेळेस मनात आलेल्या शंका- प्रश्न तसेच इथेही व्यक्त केले आहेत. Happy धन्यवाद.

खुप छान लिहिलेय मार्गी. तिथे प्रत्यक्ष राहुन काम करणा-या लोकांकडून जास्त विश्वासपुर्ण माहिती मिळते. दादाजींसारखी माणसे आणि सेवा भारतीसारख्या संस्था निस्वार्थीपणे काम करतात, त्यांना सलाम.