सह्यमेळावा २०१५ - भाग ३ (अंतिम): किल्ले पिंपळा उर्फ कंडाळा

Submitted by आनंदयात्री on 17 July, 2015 - 01:25

सह्यमेळावा २०१५ - भाग १: पूर्वतयारी आणि प्रस्थान
सह्यमेळावा २०१५ - भाग २: किल्ले चौल्हेर

मुक्कामाची सोय सुरेखच होती. शांत गाव, ऐसपैस मंदिर, आणि ट्रेकमध्ये असल्याची जाणीव! अजून काय हवं? डावीकडे शाळा आणि उजवीकडे मंदिर -

रविवारच्या सकाळच्या नाष्ट्याचा जिम्मा आम्हीच उचलला होता. बर्‍याच घमासान चर्चेनंतर नाष्ट्याला मिसळपाव फायनल झाले होते. प्लॅननुसार सकाळी साडेसातला पिंपळ्याकडे निघायचे होते. म्हणजे मिसळपाव टीमला त्याआधी नाष्टा तयार ठेवावा लागणार होता. पण सकाळच्या 'मुख्य' कामांमध्येच इतका वेळ गेला की सुरूवातीपासूनच उशीर होत गेला. एकतर रस्त्याच्या दोन्ही बाजूला दूरपर्यंत पिके नसलेली रिकामी शेते पसरली होती. पुढचं लिहित नाही आता. सूज्ञास सांगणे न लगे.

मिसळ तयार होईपर्यंत मी हेमकडून RAAM (Race Across America) बद्दलच्या माझ्या शंका निरसून घेतल्या. हेम काय, आशिश काय (आशुचँप), सायकलमधले दिग्गज! एवढा स्टॅमिना, एवढी धडपड पाहिली की आपणही असं काहीतरी करावं याची सुरसुरी येते (जशी येते तशी जातेही हेच तर दु:ख आहे!). RAAM जिंकून नुकत्याच भारतात परतलेल्या नाशिकवासी डॉ. महाजन बंधूंना भेटण्याचा उपकार्यक्रम या मेळाव्यामध्ये होता.

मिसळ फक्कड झाली होती. ते अवघड काम अनिरुद्ध केळकर आणि सवंगड्यांनी पार पाडले. तेव्हाचा एक किस्सा आठवला. मिसळची उसळ आणि तर्री घेण्यासाठी विनय भिडेंनी पसरट डिश पुढे केली. त्यावर अनिरुद्धने 'काय भिडे? रस्सा घ्यायला पसरट प्लेट काय कामाची?' असा सवाल केला. त्यावर सिनिअर भिडेंनी आपल्या उपजत हजरजबाबी शैलीने 'अरे! नाष्ट्याला मिसळ होती?? मला माहितच नाही' असे उत्तर दिले. हातातली मिसळप्लेट घेऊन भिडे पितापुत्र बाहेर व्हरांड्यात येऊन बसले. तेव्हा श्रेयस उर्फ ज्युनिअर भिडेंनी बाबांना विचारले, 'बाबा, जर तुला माहित नव्हतं नाष्ट्याला मिसळ आहे तर मग तू सॅकमधून फरसाणाची पॅकेट्स का आणलीस?' सबंध व्हरांड्याने हे वाक्य ऐकलं आणि पुन्हा हास्यकल्लोळ! सीनिअर भिडेंना मी क्वचितच चूप झालेलं पाहिलंय, अँड दॅट वॉज वन ऑफ दोज रेअर मॉमेंट्स! अ‍ॅक्च्युअली, बच्चेकंपनीतील कोणी बाबाशी बोलायला लागला की आम्ही हळूच शांत बसायचो कारण काहीतरी 'वस्त्रहरण' ऐकायला मिळणार याची खात्री असायची. (माझ्या डोक्यात मात्र सारंग ट्रेकला यायला लागल्यावर आपलंही हेच होणार आहे वगैरे विचार यायचे)

तर मिसळप्रकरण संपवून आम्ही सॅक्स भरल्या आणि पिंपळ्याकडे निघालो. पिंपळ्यावर अजिबात पाणी नाही हे माहित असल्यामुळे प्रत्येकाला एक्ट्रा पाणी घेऊन ठेवायला सांगण्यात आले होते. हा किल्ला साधारण वीसएक वर्षांपूर्वी नाशिकच्या गिरीश टकले यांनी कागदपत्रांतील माहितीच्या आधाराने शोधला. पिंपळा हा प्रत्यक्षात किल्ला नाही. माथ्यावर पाण्याची टाकी आहेत. एक गुहा आहे. पण माची, तटबंदी, दरवाजा यापैकी काहीच नाही. पण याचे भौगोलिक स्थान पाहता 'वॉचटॉवर' म्हणून याचे महत्त्व असावे. या किल्ल्याचे एक मोठे वैशिष्ट्य म्हणजे, किल्ल्यावर असलेले नेढे. हे नेढे बहुधा सह्याद्रीतील सर्वात मोठे नेढे असावे. एकावेळी सव्वाशे ते दीडशे माणसे आरामात बसू शकतील एवढे हे मोठे आहे.

सावरपाड्याहूनच पिंपळ्याकडे पायवाट निघते. रात्रभराच्या वार्‍यानंतर सकाळ झाली तीच मुळी काळ्याशार ढगांची तलम शाल नभावर घेऊन! आज(तरी) पाऊस पडणार काय असा विचार करत करत पिंपळ्याकडे निघालो. पिंपळ्याचे पहिले दर्शन -

या वरच्या फोटोत पिंपळ्याचे नेढे दिसले ना? Happy

ही वाट सुरेखच आहे. त्यात आल्हाददायक हवा सतत सोबत होतीच. ऊन्ह, उकाडा असा प्रकार सुदैवाने नव्हताच. पहिलं पठार येईपर्यंत पिंपळा नवनवीन रूपे दाखवत होता.

बरेच चालून/चढून आलो की!

ही वाट अंदाजे दोन तासांची आहे. सुरूवातीला सपाटी, मग अंगावर येणारा चढ, मग विस्तीर्ण स्वर्गीय पठार आणि पुन्हा शेवटच्या टप्प्यातला सुमारे पासष्ट-सत्तर अंशातला चढ अशी थोडक्यात वाट आहे. वाटेत स्थानिक वाटाड्याने कोशिंब नावाची फळे काढून दिली. चवीला कोकमासारखी ही फळे असतात. 'व्हिटॅमिन सी' भरपूर! एकदा तोंडात टाकली की बराच वेळ तोंडात घोळवत ठेवावीत अशी ही फळे. हा अचानक मिळालेला रानमेवा दिलखूश करून गेला.

प्रत्यक्ष पिंपळा डोंगराचा चढ अंगावर येणारा आहे. पण त्याच्या पायथ्याचं पठार म्हणजे या ऋतूतला स्वर्ग आहे. पिंपळ्याकडे यायला मळेगावातूनही एक वाट येते. आपण तिथून का नाही आलो हे ओंकारला विचारल्यावर त्याने 'तिथे मुक्कामाची सोय झाली नाही' इत्यादी किरकोळ कारणे दिल्यावर सांगितले, 'त्या वाटेने आलो असतो तर हे पठार miss झालं असतं. तू पठारावर गेल्यावर बघशील काय वाटतं ते!'. खरंच होतं ते! तिथे जो वारा वाहत होता, त्याला सोसाट्याचा, भणाणता वगैरे विशेषणे कमी पडतील. केवळ सुख! त्यात सूर्य ढगाआड! मग अजून काय हवं?
तिथून दिसणारा व्ह्यू तर नजरबंदी करणारा! पठारावरून घेतलेला पिंपळा -

पिंपळ्यावरून घेतलेला पठाराचा फोटो -

पिंपळ्यावरील नेढं हे बहुधा सह्याद्रीतील सर्वात मोठं नेढं आहे. एकावेळी शंभर-सव्वाशे माणसे आरामात बसतील अशी ही जागा आहे. तिथे इतका वारा होता की कुणीतरी 'मल्लीला धरून ठेवा रे' अशी कॉमेंटही केली. हॅट तर सर्रास उडत होत्या. नेढ्यापुढील झुडुपात जाऊन पडत होत्या. नेढ्याशेजारीच एक गुहासदृश खिंडार आहे. त्याच्या दुसर्‍या बाजूला कातळाला भेगा पडल्या असून त्यातून वारा वाहणे सुरू झाले आहे. वार्‍याबरोबर धूळ आणि मातीही उडू लागली आहे. यावरून अजून चार-पाचशे वर्षांनी इथे दुसरे नेढे तयार होईल आणि जुळी नेढी असलेला महाराष्ट्रातला (भारतातला?) एकमेव किल्ला (?) म्हणून पिंपळा प्रसिद्ध होईल असे भा़कीत मनोजने मांडून टाकले.

सह्याद्रीतला सर्वात उंच किल्ला साल्हेर (डावीकडे) आणि सालोटा (उजवीकडे) -

नेढ्याच्या बाजूने कातळखाचेतून माथ्यावर वाट आहे. बिचार्‍या श्रेयसला (ज्युनिअर भिडे) ती दिसली नाही आणि त्या कातळावरूनच वर जायचे असावे अशी समजूत त्याने करून घेतली. त्यावर 'Oh Baba! is this way to go up? this is so insane!!' या त्याच्या निरागस कॉमेंटवर हसून हसून माझे हृदय शतशः विदीर्ण झाले.

कातळखाचेवर बच्चेकंपनीचा उत्साह अपूर्व होता. दर्शनने तर (ज्युनिअर आशुचँप) वर चढताना 'सरका, सरका' चा घोष लावला होता आणि एके ठिकाणी हात टेकायला जागा मिळाली नाही म्हणून पुढे असलेल्या विनयच्या गळ्याभोवती हात गुंफून विनयचा उभ्या जागी पुतळा करून टाकला. माथ्यावर बघण्यासारखे काहीच नाही. तीनशेसाठ अंशातल्या डोंगररांगा, चढून आलो ती वाट, दूरवर सावरपाड्याचा रस्ता मात्र प्रेक्षणीय!

पुन्हा नेढ्यात आलो आणि काल रात्री झालेल्या चर्चेचा गोषवारा आणि घेतलेले निर्णय सर्वांना कळवण्यात आले. त्यानुसार या मेळाव्याला जे येऊ शकले नाहीत ते वगळता सह्यमेळाव्याच्या सदस्यसंख्येत यापुढे कोणाचीही भर पडणार नाही असे ठरले. हाच एक मुख्य निर्णय होता. उतरताना कसरत होती. सत्तर अंशाचा उतार उतरून जाण्यापेक्षा डोंगराला वळसा घालून उतरूया असा प्रस्ताव ओंकार सीएमने मांडला आणि इथे पहिल्यांदाच विरोधात मते पडली. मी (अर्थातच) विरोधाला पाठिंबा दिला. शेवटी आम्ही दहा-बारा जण त्या उताराची फुल्ल मजा घेत आलो आणि बाकीचे वळसा घालून आले.

पठारावर आल्यावर डोळे मिटले आणि पंधरा मिनिटे शांततेशी गप्पा मारत बसलो. चौफेर वाहणारा वारा, आजूबाजूचा दंगा यातून हळूहळू मन शांत, अलिप्त होत गेलं आणि पुढे उरली फक्त वाहती शांतता. तो वारा जर नसता तर अजून सुखी शांतता ऐकायला मिळाली असती. पुढे कधी काळी आयुष्यातल्या काही अविस्मरणीय वेळा आठवायची वेळ आली तर त्यात ही पंधरा मिनिटे नक्की लक्षात येतील. असो. सगळे पठारावर आल्यावर गृप फोटोसेशन झाले. एव्हाना एक वाजून गेला होता.


(फोटो क्रेडिट - सुनिल पाटील)

आता पुन्हा तिरकस उतार, पठार आणि गाव! उतरताना तनिष्कला (ज्युनिअर संतोष काशिद) सुसाटत उतरताना पाहून काळजीने मी त्याचा हात पकडला आणि माझ्याबरोबर उतरायला लावलं. बिचार्‍याने निमूटपणे काही अंतर ती आज्ञा पाळली. पण मी मुळात माझ्या तब्येतीला जपत उतरत असल्यामुळे त्याची अडचण व्हायला लागली. मग ते माझ्याही लक्षात आल्यामुळे मी त्याचा हात सोडून दिला. तत्क्षणी ज्युनिअरसाहेब पुन्हा गती पकडून दिसेनासे झाले. आणि उतरताना 'पाय कुठे टाकावा, कुठे टाकू नये, वेग बॅलन्स कसा करावा' याचं इतकं सुंदर प्रात्यक्षिक देऊन गेले की काही वर्षांनी ही मुलं नक्कीच उत्तम क्लाईंबर/ट्रेकर होतील अशी खात्रीच वाटायला लागली. मी त्याचा हात पकडून उगाच एका उडत्या पक्ष्याचं आकाश बांधून ठेवत होतो असं वाटून गेलं.

येताना एका वेगळ्या वाटेने उतरण्याचा आनंद घेत गावात आलो तेव्हा अडीच वाजून गेले होते. जेवायला मिसळीची उरलेली उसळ अ‍ॅड करून फक्कड उसळ-भाकरी बेत होता. चिकनही होतेच. बरेच दिवसांपासून लिस्ट वर असलेला सह्यमेळावा संपत आला होता असं वाटत होतं. तिथून निघायला चार वाजले.

नांदुरी मार्गे सप्तशृंगीगडाला वळसा घालून येताना अचला-अहिवंतपासून चांदवडपर्यंत पसरलेल्या सातमाळ रांगेतले बरेचसे किल्ले एकाच ठिकाणाहून दिसले. सोबत माहिती पुरवायला तत्पर तल्लख ओंकीपिडीआ उर्फ ओंकार होताच.
सप्तशृंगीगड -

सप्तशृंगीगडाच्या समोरचा मोहनदरी किल्ला, यालाही नेढं आहे. या नेढ्याची एक आख्यायिका आहे. देवी आणि एका दैत्याचं युद्ध झालं. देवीपुढे निष्प्रभ होत चाललेल्या त्या दैत्याने रणांगणातून पळ काढला. तो दैत्य या डोंगराआड गेला असताना पाठलाग करता करता देवीने या डोंगरावर प्रहार केला, त्यातून हे नेढं तयार झालं. मूळ नाव - मोहिंद्री, अपभ्रंश - मोहनदरी. (संदर्भ - स्थानिक गावकरी आणि ओंकार ओक)

विस्तीर्ण अहिवंतगड -

सप्तशृंगीगडाच्या शेजारचा मार्कंडेय डोंगर -

सप्तशृंगी, मार्कंडेय आणि रवळ्या-जावळ्या -

नाशकात आलो तेव्हा साडेसहा वाजले होते. नाईलाजाने डॉ. महाजनबंधूंना भेटण्याचा कार्यक्रम रद्द केला आणि बस पुण्याकडे निघाली. रविवार संध्याकाळ, त्यात पालखीनिमित्त वारकर्‍यांना घेऊन निघालेले ट्रक आणि दुपदरी रस्ता यामुळे प्रवास खूप वेळखाऊ झाला.

राजगुरूनगरच्या टोलनाक्यावर आलो तेव्हा रात्रीचा दीड वाजला होता. फिर वही रात! फिर वही बात! टोलवाल्यांशी सह्यमेळाव्याच्या शिलेदारांची बाचाबाची! "टोल भरावाच लागेल" ही त्यांची सक्ती आणि १. गाडी MH14 ची आहे. २. इथून जाताना परवा रात्री टोल नाही घेतलात मग आत्ताच का? ही आमची दोन बिनतोड पण निष्फळ उत्तरे यात अर्धा तास मोठा मजेत गेला. मग तिथल्या आयआरबीच्या अधिकार्‍याचे तिथे अवतरणे (बहुधा झोपमोड झाल्यामुळे तो चिडलेला असणे), 'एकवेळ टोल न घेऊन तुम्हाला सहकार्य केले ही बकवास' 'तुम्ही टोल न भरून महाराष्ट्राची शान घालवता आहात' वगैरे त्याचे बरळणे (हे ऐकून तर माझी सटकलीच होती, कैच्याकै!) मग नाईलाजाने त्याच्या हातावर सत्तेचाळीस रुपये टेकवणे हे प्रकार यथासांग पार पडले. मला तरी नाशिक हायवेवरच्या या टोलनाक्यांची भानगड समजतच नाही. पुढच्या वर्षी याच मार्गाने यायची वेळ आली तर सगळी माहिती आधीच काढून या टोलवाल्यांची दादागिरी उतरवायचं फार मनात आहे! असो.

अपरात्र झाली असल्यामुळे प्रत्येकाला ऑलमोस्ट होमड्रॉप मिळाला. मला घरी पोचायला पहाटेचे साडेतीन वाजले. डोळ्यावर झोपही होती आणि मनात गेले दोन दिवस सह्याद्रीत स्वच्छंदपणे हुंदडलेल्या क्षणांची स्मृतिचित्रेही!

सह्यमेळावाच्या आयोजनात ओंकारने प्रचंड मेहनत घेतली. तसंच हेम, राहूल यांनी पायलट ट्रेक करून लेटेस्ट माहिती आमच्यापर्यंत पोचवली. हॅट बनवण्याची जबाबदारी हिम्याने एकहाती पेलली. यो, विन्या, इंद्रा, आशुचँप, गिरी, सूनटून्या, मनोज आणि सगळेच (कुणाचं नाव राहिलं असल्यास क्षमस्व!) घरचं कार्य असल्यासारखे वावरत होते. (आणि रिलॅक्स व्हायला वॉट्सअ‍ॅपवर पडीक होते!) मेळाव्याला आलेला प्रत्येक जण सह्याद्रीवर मनापासून प्रेम करणारा होता. हल्ली बाजार आणि बिझनेस बनत चाललेल्या या ट्रेकिंगमध्ये नकारात्मक बातम्या सातत्याने येत चालल्या आहेत. निरनिराळ्या प्रकारचे धोके नव्याने उभे राहत आहेत. अशा परिस्थितीमध्ये ज्यांच्या 'कंपनी'मध्ये निर्धास्त भटकावं अशी माणसं या सह्यमेळाव्यामध्ये एकत्र भेटली. निसर्गाचा आदर करून, स्वत:च्या मर्यादा ओळखून सह्याद्रीच्या हवाली होणारे हे सह्यपंढरीचे वारकरी! इतिश्री सह्यमेळावा २०१५!

*******************

दरवेळी ट्रेकने मला काय मिळतं हे प्रश्न आता हळूहळू पुसट होत चालले आहेत. पूर्वी ट्रेकहून आल्यावर वृत्तांत लिखाणाची जितकी आवड आणि हौस असायची तितकी आता उरलेली नाही. आता फक्त सॅक पाठीवर टाकावी, जुने-जाणते निवडक दोस्त सोबत असावेत आणि डोंगरदर्‍या-घाटवाटा तुडवाव्यात, कुठेतरी मंदिरात-गुहेत राहावं, कातळझर्‍याचं थंड पाणी प्यावं आणि कुठल्याशा हिरव्यागार आसनावर डोळे मिटून शांत बसावं आणि हा सह्याद्री, त्याच्या अंगाखांद्यावर खेळण्याचं लाभलेलं भाग्य अबोलपणे अनुभवावं, ही जाणीव अधिकाधिक वाढू लागली आहे. कधी वाटलंच तर रायगड प्रदक्षिणेतला पाऊस कागदावर उतरवावा, नाही वाटलं तर केवळ मनात झिरपू द्यावा, एवढंच! कागदावर उमटतील आणि फोटोतून दिसतील ते केवळ तिथे जाऊन आल्याचे पुरावे! शेवटी, या पायवाटांच्या सोबत येणार्‍या समृद्धतेला शब्दांत मांडण्याची ताकद कुठून आणायची? इति लेखनसीमा!

(समाप्त)
- नचिकेत जोशी

(ब्लॉगवर प्रकाशित - http://anandyatra.blogspot.in/2015/07/blog-post_63.html)

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अप्रतिम लिहिलय....
शेवटचा परिच्छेद तर कळसाध्याय झालाय लिखाणाचा....
अत्यंत हेवा वाटला तुम्हा सगळ्यांचा ....

सॅक पाठीवर टाकावी, जुने-जाणते निवडक दोस्त सोबत असावेत आणि डोंगरदर्‍या-घाटवाटा तुडवाव्यात, कुठेतरी मंदिरात-गुहेत राहावं, कातळझर्‍याचं थंड पाणी प्यावं आणि कुठल्याशा हिरव्यागार आसनावर डोळे मिटून शांत बसावं आणि हा सह्याद्री, त्याच्या अंगाखांद्यावर खेळण्याचं लाभलेलं भाग्य अबोलपणे अनुभवावं, ही जाणीव अधिकाधिक वाढू लागली आहे. >>> एक नंबर... हेच अपेक्षित होतं तुझ्या वृत्तांतून Happy

या मेळाव्यातील खास बात म्हणजे सहा छोट्या ट्रेकर्सचा सहभाग... त्यांनी निखळ मनोरंजन तर केलच पण बापाला नी काका लोकांना बरच काही शिकवून गेले... हॅट्सऑफ

नचिकेत वृत्तांत अगदी मस्त झालाय....

फक्त बच्चे कंपनीचा फोटो मिसिंग वाटतोय. माझ्याकडे एक त्यांचा ग्रुप फोटो आहे. श्रेयस, तनिष्क, दर्शन, अनिरुद्ध, रुद्राक्ष हे पाच जण आहेत. फक्त ओजस त्यात नाही.

Bacche Company.JPG

- कधी वाटलंच तर रायगड प्रदक्षिणेतला पाऊस कागदावर उतरवावा, नाही वाटलं तर केवळ मनात झिरपू द्यावा, एवढंच! कागदावर उमटतील आणि फोटोतून दिसतील ते केवळ तिथे जाऊन आल्याचे पुरावे! शेवटी, या पायवाटांच्या सोबत येणार्‍या समृद्धतेला शब्दांत मांडण्याची ताकद कुठून आणायची? इति लेखनसीमा!

- मी त्याचा हात पकडून उगाच एका उडत्या पक्ष्याचं आकाश बांधून ठेवत होतो असं वाटून गेलं.

अरारारारारा !!! ह्याला म्हणतात "नचिकेत जोशी" लिखाण (Credit goes to us !!). खत्तरनाक वर्णने आणि पिंपळ्याचा पठारावरून घेतलेला फोटो तर कोणत्याही किल्ल्याच्या पुस्तकाचं मुखपृष्ठ म्हणून शोभेल असाच !!!

बाकी तुझ्या ब्लॉगची आम्ही जेवढी वाट पाहिली तेवढी नळाची सुद्धा कोणी पाहिली नसेल….अगदी दमयंतीने सुद्धा !!!

एकूणच " भ न्ना ट "

मस्त नच्या !!! सही रे सही !! शेवटचा परिच्छेद अगदी मनातला... बाकी तू डोळे बंद करून खरच शांतता प्राप्त केलीस ?? एवढ्या कल्लोळात.. आणि केलि असशील तर आम्हाला धन्यवाद दे तुला तसे बसू दिले म्हणून...

नचिकेत,
अप्रतिम जमला आहे हा भाग !
मी खरच लकी होतो की तुमच्याा सगळयांसोबत मला हा सहयमेळावा साजरा करता आला

>>डोंगरदर्‍या-घाटवाटा तुडवाव्यात, कुठेतरी मंदिरात-गुहेत राहावं, कातळझर्‍याचं थंड पाणी प्यावं आणि कुठल्याशा हिरव्यागार आसनावर डोळे मिटून शांत बसावं आणि हा सह्याद्री, त्याच्या अंगाखांद्यावर खेळण्याचं लाभलेलं भाग्य अबोलपणे अनुभवावं, ही जाणीव अधिकाधिक वाढू लागली आहे. कधी वाटलंच तर रायगड प्रदक्षिणेतला पाऊस कागदावर उतरवावा, नाही वाटलं तर केवळ मनात झिरपू द्यावा, एवढंच! कागदावर उमटतील आणि फोटोतून दिसतील ते केवळ तिथे जाऊन आल्याचे पुरावे!

---
व्वा मित्रा !!!

मागे पडलेल्या भटक्या नचिकेतला संजिवनी देणारा मेळावा व हा लेख.. पुणे गाडीच्या खिडकीतून मेळावावृत्तांत झाला आता मुंबई खिडकीतून कोण लिहितंय त्याची वाट पहात आहोत. यो, इंद्रा...
त्या कोशिंब्याच्या झाडावर नविनने गिलबिला करुन बहुतेक फळं उतरवली..
पिंपळ्यावरुन उत्तरेस टकारा सुळका साल्हेर सालोटा हरगड मुल्हेर मोरा पूर्वेस भिलाई चौलेर दिरभावजय वेगळ्या कोनातून दिसतात. दक्षिणेस सातमाळेचा काही भाग पश्चिमेस भोराईचा डोंगर ठळक दिसतो.
औरंगजेब १६३६ मधे दख्खनचा सुभेदार असतांना त्याने बागलाणातील काही किल्ले घेतले त्यांत किल्ले पिंपळा उल्लेख आहे.याच्या पायथ्याकडील सुळापिंपळा गांव व वर असलेली टाकी यांवरुन बागलाणातील पिंपळा किल्ला तो हा अशी स्थाननिश्चिती आहे.
स्थानिक या डोंगराला कंडाळा म्हणून ओळखतात.
जशी मोहिंद्रीच्या नेढ्याची गोष्ट तशीच कंडाळ्याच्या नेढ्याचीही.. परशुरामाने समुद्र हटवायला साल्हेरवरुन बाण सोडला तो या डोंगरातून आरपार गेला व हे भोक पडले अशी दंतकथा पण दिशा जुळत नाहीत.
नांदुरीला येतांना वाटेत मारुतीचं मुख असलेल्या कळसाचं मंदिर लागतं त्याची दखल इथेघेतलेली नाही. यो च्या लेखांत ती येईल..
..पुन्हा एकदा खास लेख... नचिचे पाय व पेन फिरते राहोत ही शुभेच्छा!

अप्रतिम वर्णन. शेवटचा परिच्छेद तर अतिशय सुरेख अगदी मनापासून लिहिलाय. खूप आवडला.

बाकी तू डोळे बंद करून खरच शांतता प्राप्त केलीस ?? एवढ्या कल्लोळात.. आणि केलि असशील तर आम्हाला धन्यवाद दे तुला तसे बसू दिले म्हणून...>>>>
काहीही हां नचि... ! यो ने बरोब्बर धरला तुला...

सर्वांचे आभार Happy

कविता, खूप पूर्वतयारी लागेल. दोनपैकी एक किल्ला होऊ शकेल. कॅप्टनशी जुजबी बोलणं झालंय माझं.
हेम, उत्तम माहिती. धन्यवाद!
यो, होय, ऑलमोस्ट! तुम्हाला धन्यवाद Happy

नचिकेत, मस्त लिहील आहेस.
वाचताना, तुला ऐकण्याचा फील आला, थेट कॉलेज सारखा!