आईच्यान सांगतु....

Submitted by विशाल कुलकर्णी on 16 August, 2009 - 10:11

आईच्यान सांगतु....
कालच्याला १५ आगस्ट झाला
मले माझा बापुस बोल्ला व्हता
१५ आगस्टला म्हनं देशाला सवतंत्र्य मिळ्ळं व्हतं !

आईच्यान सांगतु....
म्या इच्चारलं, बाबा..., सवतंत्र्य म्हंजी रं काय?
बाप म्हनला, त्येची लै मज्जा असतीया पोरा,
खिशावं झेंडा लावाचा आन जय म्हनाचं, मग जेवाया मिळतया !

आईच्यान सांगतु...
म्या सदर्‍याच्या खिशावर....,
रुप्पायाचा...., झेंडा लावला...., टाचनीनं,
जण गण मण व्हईपत्तुर, गळ्याच्यान सांगतु..., थुकबी नाय गिळ्ळी !

आईच्यान सांगतु.....
मास्तरबी म्हनलं व्हतं आमचं,
झेंडा फडकला की जेवाया मिळंल,
शिळं येफर नी कुरतडलेला पेडा बगिटला...., आन भुकच मेली !

आईच्यान सांगतु...
गांधीबाबा म्हनलं व्हतं म्हनं तवाच्याला,
आता म्हनं देशात रामराज येनार हाय,
जनमल्यापासुन बगतुया, हितं रामाचा वनवासच सपत न्हाय!

आईच्यान सांगतु...
पंदरा आगस्टच्या सवतंत्र्याचं मस्नी न्हाय म्हायीत,
पन चौका चौकात बांदल्यालं ब्यानर मातुर कामी आलं,
आता थंडीचं दिस येनार..., माजं पांगरुणाचं काम झालं.

विशाल.

गुलमोहर: 

काल १५ ऑगस्ट होता. सकाळी ध्वजारोहण करुन आलो. मन एका अनामिक आनंदाने, अभिमानाने भरुन आलं होतं. त्यात रात्री नेहेमीप्रमाणे जेवणानंतर शतपावलीसाठी म्हणुन बाहेर पडलो. जवळच्याच एका चौकात एक दृष्य बघायला मिळालं, १५ ऑगस्टच्या शुभेच्छा व्यक्त करणारा कुठल्याशा पक्षाचा कापडी फलक गुंडालुन घेवुन एक दहा बारा वर्षाचा मुलगा फुटपाथच्या कडेलाच झोपला होता.
वाटलं स्वातंत्र्याने आपल्याला हे दिलं? Sad

विशाल.

गांधीबाबा म्हनलं व्हतं म्हनं तवाच्याला,
आता म्हनं देशात रामराज येनार हाय,
जनमल्यापासुन बगतुया, हितं रामाचा वनवासच सपत न्हाय! >>>

खरय ,
हितच काय पण जगाच्या पाठीवर कुठेही रामाचा वनवास संपत नाही .

विशाल, कथित क्षण डोळयासमोर तरळला. मित्रा, किती छान मांडलं आहेस. मनापासून खुप खुप शुभेच्छा ...

देवनिनाद

ओह्ह... भिडली कविता.. अगदी वेगळ्या पद्धतिने मान्डलय..
खिशावं झेंडा लावाचा आन जय म्हनाचं, मग जेवाया मिळतया !>>>

कधी बदलणार हे सर्व??? Sad

छान Happy

उमेशराव आहात कुठे? बर्‍याच दिवसात फोन नाही समस नाही ! Happy

.......................................................................................

आम्ही इथेदेखील पडिक असतो www.magevalunpahtana.wordpress.com

अरे, नेहमीप्रमाणेच कार्यरत आहे कामात. निवडणूकीपूर्वीची धवपळ सुरू आहे. एस एम एस केला होता ना?
खरेच...आईच्यान सांगतु...

>>पन चौका चौकात बांदल्यालं ब्यानर मातुर कामी आलं,
आता थंडीचं दिस येनार..., माजं पांगरुणाचं काम झालं.>> Sad

पन चौका चौकात बांदल्यालं ब्यानर मातुर कामी आलं,
आता थंडीचं दिस येनार..., माजं पांगरुणाचं काम झालं.>>>>

मनाला टोचुन गेली अगदी !
Sad

विशाल,
कविता आवडली पण 'आईच्यान सांगतु,' हे जर रिपीट केलं नसतं, तर जास्त भावलं असतं , ( अर्थात हे झालं माझं मत)
धनु

Pages