भाषिक संभ्रम

Submitted by नवनाथ राऊळ on 4 July, 2015 - 12:48

संस्कृत ही जवळजवळ सर्वच भारतीय भाषांची (लिप्या म्हणत नाही) जननी आहे. तस्मात, पुढील चर्चेच्या अनुषंगाने संस्कृत ही भाषा प्रमाण मानून चालण्यास कोणाचीच हरकत नसावी. (उर्दू ही भारतीय भाषा मानत नाही आणि लिपी तर खचितच नाही - ठाम मत!)

हिंदीभाषिकांसोबतच्या दीर्घ सहवासात जाणवलेली आणि आढळलेली काही निरीक्षणे, त्यांना समजावण्याच्या अथक आणि निष्फळ प्रयत्नांअंती येथे मांडत आहे. (हिंदीभाषिकांची मराठीप्रति माया पाहता मायबोलीवर कुणी हिंदीभाषिक प्रतिनिधी असेल असे वाटत नाही. त्यामुळे पक्षपाती उहापोह घडेल अशी भीती वाटते.)

१. हिंदीपेक्षा (किंबहुना इतर कोणत्याही भारतीय भाषेपेक्षा) मराठी ही संस्कृत भाषेला सख्खी आहे असे नेहमी वाटते (एक मराठीभाषिक म्हणून नाही तर तटस्थपणे). उच्चार आणि लिखाण दोहोंबाबत संस्कृत भाषेस मराठीच सर्वांत जवळची आहे. (व्याकरणाच्या दृष्टीने पाहणे हा वेगळ्या चर्चेचा विषय ठरावा.)

२. संस्कृत, मराठी आणि हिंदी या तिन्ही देवनागरी लिपीत लिहील्या जात असल्या तरीही केवळ संस्कृत आणि मराठीतील मुळाक्षरे समान आहेत आणि हिंदीतील मुळाक्षरांची संख्या कमी आहे. 'ञ', 'ङ', 'ज्ञ', 'ण', 'ळ' सारखी मुळाक्षरे हिंदीत नाहीत (असे स्वतःच एका स्नेही हिंदीभाषिकाने सांगितले), ना त्यांचा उच्चार केला जातो.

३. नुक्ता (़) वगैरे Foreign particles हिंदीत घुसली आहेत (अरबी भेट). त्यामानाने मराठी विशुद्ध राहिली आहे. 'चिंच'मधल्या दोन्ही 'च'चा आणि 'जिजाबाई'मधल्या दोन्ही 'ज'चा यथायोग्य उच्चार मराठीत होतो. 'चलां कल्पतरूंचे आरव' आणि 'चला हवा येऊ द्या' या दोन्हीमधला 'च' वेगवेगळा उच्चारण्याची सोय मराठीत आहेच आणि त्यासाठी नुक्त्यांबिक्त्यांची गरज भासत नाही.

४. उच्चारांचाही हिंदीत अभाव (खरंतर अशुद्धता) आहे. 'ज्ञ' ला 'ग्य' म्हणतात. 'ण' वगैरे अनुनासिकांची चुकून एखाद्याला ओळख असलीच तर त्यांना पाहून एकच 'नाऽऽ' असे काहीतरी ऐकू येणारा उच्चार करतात. 'कृ' ला 'क्रि' म्हणतात. (क्रिश्न भगवान, हमपर क्रिपा करें.. ध्रितराष्ट्र, अम्रित, ब्रिहन्मुंबई, वगैरे)

• ('वृषभ' अचूक उच्चारणारा हिंदीभाषिक शोधून दाखवाच!
यावरून मला हल्ली शंकाच वाटू लागली आहे.. तिचं निरसन झालं तर उत्तमच! - 'रिषभ' हा वेगळा शब्द किंवा वेगळ्या अर्थाचा शब्द अस्तित्वात आहे का?
तसेच 'संस्कृत' योग्य की 'सन्सक्रित' याचा उलगडा झाल्यास बरे होईल.)

५. 'ॉ', 'ॅ', 'ँ', '्' वगैरेंचा वापर मराठीत होऊन तिची समृद्धी झाली आणि सर्वसमावेशकता वाढली आहे (आणि ही Foreign particles नाहीत). आंग्लादि पाश्चिमात्य भाषांचे बहुतेक सर्व शब्द मराठीत जवळपास अचूकपणे लिहीता तसेच उच्चारताही येतात.

६. गैस (गॅस), चैनल (चॅनल), बैट (बॅट), बैंक (बँक), फौंट (फाँट्), कंप्युटर (कॉम्प्युटर), कोस्मैटिक्स (कॉस्मॅटिक्स्), पैंथर (पँथर), सैमसंग (सॅमसंग), डैझल(डॅझल्), रौक (रॉक), आकलन्ड (ऑकलंड), मैथेमैटिक्स (मॅथमॅटिक्स्), टैंक्स (टँक्स), इंग्लैंड (इंग्लंड), साईंस (सायन्स्), लाईसैंस (लायसन्स), ग्रैज्युऐसन (ग्रॅज्युएशन), वगैरे आंग्लभाषिक शब्द हिंदीभाषिकांच्या तोंडून ऐकताना गंमतच वाटते (त्यांच्या 'हँस क्यूँ रहे हो' ला उत्तर देता देता नाकी नऊ आले आहेत...). हिंदी ऐकाराचं गाजलेलं 'वैशाली' प्रकरण तर सर्वश्रुतच आहे.

७. 'श', 'ष' ही मुळाक्षरे हिंदीत निव्वळ लिहीण्यापुरतीच असावीत अथवा त्यांचा उच्चारच निषिद्ध असावा. हिंदीभाषिक मंडळी सरसकट 'स'चाच उच्चार करताना दिसतात. आणि त्यातून परकीय भाषेतील शब्दही सुटत (खरंतर वाचत) नाहीत.

माझा रोख हिंदी भाषेकडे आहे, भाषिकांकडे नाही हे इथे नमूद करू इच्छितो.

ही हिंदी भाषेची असमर्थता आहे का?
की या हिंदी भाषेतील त्रुटी आहेत?
की माझ्या शंकाच पुर्वग्रहदूषित आहेत?
की हे साहजिकच आहे?
आणि अपभ्रंश (हिंदीत अपभ्रन्श) ही अशुद्धता मानावी का?

भाषाशास्त्र, उच्चारशास्त्र, वगैरेंशी माझा काडीचाही संबंध नाही, सबब जाणकारांनी चुकीचे काही आढळल्यास मोठ्या दिलाने क्षमा करून त्याकडे निश्चितच अंगुलीनिर्देश करावा. शिवाय शंकांचे निरसन करता आले तर दुधात साखर!

(खरंतर हा विषय मांडायला मायबोली हे उचित ठिकाण आहे का, याबाबत माझ्या मनात संभ्रम आहे. कारण ही चर्चा (झालीच तर) एकांगी किंबहुना एकतर्फी होईल असे वाटते. तरीही जाणकारांची मते जाणून घेताना ज्ञानात भर पडून तदनुषंगिक पुर्वग्रह दूर झाल्यास आनंदच आहे. चूकभूल देणे घेणे. हिंदीप्रेमींनी रोष न धरावा.)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

लेख आवडला.
परवा लेकाला मूळाक्षरे शिकविताना मी सरळ श ष स ह ळ क्ष ज्ञ लिहून दिलं तर त्याच्या मॅडमनी 'ळ' वर एवढा मोठा लाल लाल गोळा करून पाठविला.
मग लक्षात आलं की हिंदीत ळ नाहीच आहे.
गंमत म्हणजे त्याला दोन हिंदी पुस्तके आहेत . एकात ते नुक्ता दिलेले ड, ढ आहेत मूळाक्षरांच्या यादीत आणि एकात नाहीत.
तसेच 'त्र' हे चक्क मूळाक्षर आहे.

पण संस्कृत प्रमाण मानून दक्षिणेच्या माणसांना चालत नाही हां.

आमच्या कानडीत मराठी/संस्कृतातले ळ ण आहेतच पण आमची चौदाखडी (बळ्ळी) बाराखडीपेक्षा प्रगत आहे.
दुसरा ओ (ओsड) शब्दातला, दुसरा ए ( एsत) शब्दातला असे उच्चार मराठी संस्कृतात नाहीत.;)

मला अजून 'ष' चा योग्य उच्चार करणारी मराठी भाषिक सोडून अन्य व्यक्ती आढळली नाही.

आत्ताच मोठ्या मुलीचं हिंदी पुस्तक पाहिलं तर त्यात
स्वर- अ ते अं
व्यंजन- क ख ग घ ङ च छ ज झ ञ ट ठ ड ढ त थ द ध न प फ ब भ म य र ल व श ष स ह
मिश्र व्यंजन - क्ष ज्ञ त्र श्र
अन्य व्यंजन- ड. ढ.
अन्य स्वर- अ: ऋ

असे नवेच वर्गीकरण आढळले.

याहून वेगळा मुद्दा म्हणजे मूळात हिंदी भाषिकांना मात्रं मराठी लोकांचे उच्चार फारच चुकीचे वाटतात.
खास करून त्यांच्या अर्धचंद्रांचे.
तू छूपी है कहां , मै तडफता रहां मधले उछार मराठी माणूस 'चहा' सारखे करतो किंवा मग 'कहान' सारखे.

एका सुप्रसिद्धं गायिकेला 'उनके हिंदीमें दाल चावल की बू आती है' असा काहितरी टोमणा मारलेला प्रसिद्धच आहे.

तुम हम शब्दातला म चा अर्धवट उच्चार आपल्याला येत नाही तितकासा.

बाकी पाश्चात्य म्हणताना आपण फक्त अमेरिकन किंवा ब्रिटीश इंग्रजीचा विचार करता आहात. ( ते पण आपण अ‍ॅ ऑ हल्ली हल्ली आपलेसे केले म्हणून)

स्पॅनिश, जर्मन इ पाश्चिमात्य भाषांतील आणि चिनी कोरियन अश्या पौर्वात्य भाषांतील कित्येक उच्चार लिहून दाखवायला संस्कृत /मराठी आणि अनेक भारतीय भाषा अपूर्‍या पडतात.

लेख फारच वाचनीय!

पण एक शंका विचारतो. कोणकोणत्या प्रदेशातील हिंदी भाषिकांशी चर्चा करून मग ही मते मांडलेली आहेत? ह्याचे कारण असे की माझ्या परिचयात उत्तर प्रदेशातील काहीजण उत्तम हिंदी बोलणारे आहेत. त्यांची हिंदी प्रवाही व स्वच्छ आहे. वरील लेखाशी ह्या उदाहरणांचा संबंध नाही असे मत असेल तर तेही मान्यच आहे. कारण वरील लेखात बहुतेक मुद्दे तांत्रिक आहेत, केवळ प्रवाहीपणे व स्वच्छ बोलण्याने त्या मुद्यांची उत्तरे दिली गेली असे होत नाहीच.

पण असे वाटते की जेथे उर्दूचा प्रभाव राहिला तेथील हिंदी समृद्ध राहिली.

बॅंकचा उच्चार बैंक असा करणे हे त्यांच्या भाषेतच आहे ना? मराठीत 'राकेल किंवा रॉकेल' म्हंटले जाते तसे?

मला वाटते की एखाद्या भाषेला असमर्थ किंवा त्रुटींनी युक्त असे मानले जाऊ नये.

पण मराठीच्या समृद्धतेबाबत मांडलेले मुद्दे समजले, पटले व आवडलेही.

छान आहे लेख, प्रतिसादही माहितीपूर्ण यावेत.

अवांतर - ए ऐ ऎ .. यातील तिसरे ऎ काय आहे? कूठल्या भाषेतील मुळाक्षर आहे, आणि याचा काही शब्द आहे का? हिंदीतील चष्म्याला म्हणतात ते ऐनक - ऎनक आहे का?

दक्षिण भारतातल्या(द्रविडी) भाषांची जननी बहुधा संस्कृत नाही.
२ : संस्कृतात ळ आहे का? मराठीत ळ प्राकृतमधून आला असावा. नक्की माहीत नाही.
हिंदी पाठ्यपुस्तकातील वर्णमालेत ञ', 'ङ', 'ज्ञ', 'ण', 'ळ हे सगळे वर्ण आहेत. सातींनी लिहिले आहे तसे श्र आणि त्र हेही तिथे वर्णच आहेत, जोडाक्षरे नाहीत.
३ : चाक आणि चक्र यातल्या 'च'च्या दोन वेगवेगळ्या उच्चारांसाठी दोन वेगळे संकेत नसणं हे मराठी -देवनागरीतले न्यून आहे असे मला वाटते. बहुधा संस्कृतात फक्त एकाच (चक्र्मधल्या) प्रकारचा उच्चार असल्याने त्याची गरज नसावी. पण मराठीत तरी हा भेद लिपीतून दाखवायला हवा.नुक्त्याचा वापर हा हिंदी देवनागरीतला दोष नसून त्या लिपीचे सामर्थ्य आहे---असे मला वाटते
४ ऋचा उच्चार रु असा नसून रु आणि रि च्या मधेच कुठेतरी आहे असे वाचल्याचे आठवते. बहुधा माधुरी पुरंदरेंच्या लिहावे नेटकेत. (कृष्णचे बोली भाषेतले रूप किसना होते असा दाखलाही दिलेला आठवतोय. माझी स्मरणशक्ती मला दगा देत असेलही )
५ अ‍ॅ , ऑ हे उच्चार दर्शवणारे चंद्रकोरीचे चिन्ह व ते उच्चार संस्कृमध्ये आहेत का? ते फॉरेन पार्टिक्ल्स नाहीत म्हणजे काय? त्यांचे उगमस्थान इंग्रजी भाषाच नाही का? मराठीच्या पाठ्यपुस्तकांत अ‍ॅ, ऑ हे स्वर नसतात. बाराखडीच असते. माधुरी पुरंदरेंनी 'लिहावे नेटके' या पुस्तकात या दोन स्वरांचा समावेश करून चौदाखडी वापरली आहे.
६) हिंदीत चंद्रकोर आहे पण ती नुसती कधीच वापरलेली दिसत नाही. कायम चंद्रबिंदीच असते आणि तिचा उच्चारही वेगळा कळत नाही. हूं आणि हूँ यांचा वेगवेगळा उच्चार मला तरी कळलेला नाही. हिंदीने काही स्वर व काही व्यंजनांचा समावेश नाकारला आहे खरे. बैट आणि बाल , डाक्टर कानाला फारच खटकतात. मराठी भाषा या परकीय शब्दांच्या मूऴ उच्चाराशी जास्त जवळीक साधते.

७) श आणि स यांचे हिंदीतले उच्चार वेगवेगळे आणि मराठीसारखेच आहेत. पण व्यक्तिपरत्वे बदलत असतील हिंदीतले एक क्रीडापत्रकार 'श'च्या जागी 'स' आणि 'स'च्या जागी 'श' म्हणता. स्रोताओं को मेरा नमश्कार. हे ते विशेषनामांच्या बाबतीतही करून शचिन, शौरभ, साम, सरद असे म्हणत असल्याचे मात्र आठवत नाही. गुजरातीतलं "मारू नाम उसा सा" तर प्रसिद्धच आहे.

'संध्या' भाषा म्हणजे कोणती भाषा. फक्त उल्लेख वाचला/ऐकला आहे. ह्या भाषेतील काही नमुने उपलब्ध आहेत का?

साती,
स्पॅनिश, जर्मन इ पाश्चिमात्य भाषांतील आणि चिनी कोरियन अश्या पौर्वात्य भाषांतील कित्येक उच्चार लिहून दाखवायला संस्कृत /मराठी आणि अनेक भारतीय भाषा अपूऱ्या पडतात. >>> खरं आहे.. मान्य आहे...

कानड्यांचा 'ळ' मला फार आवडतो. आमच्या एक कानडी मॅडम आहेत - नलिनी... आपलं नाव सांगतात 'नळिणी'.. आणि बोलतात 'नम्म तुळू'... मला फार आवडतं ते.. Happy

द्रविडीयनांचं एवढं वाकडं का ओ संस्कृतशी?!? Happy
लिपी भिन्न आहे पण.. (ऐकताना समजणारे Wink ) बरेच शब्द तर संस्कृतशी मिळतेजुळतेच वाटतात...

अश्विनीजी,
साधा 'श' उच्चारायचीच मारामारी.. 'ष' कसला उच्चारतायत ते...
मी विचारलं तीघा-चौघांना.. तर म्हणाले, "ये 'स' अलग है, साब.. पर वो 'स' और 'स' में कुछ फर्क नहीं है.. वो लिखते अलग है पर बोलते एक ही जैसा है..."
मी त्यांचे तिन्ही 'स' गोळा करेपर्यंत ते आपापल्या जागेवर जाऊन बसलेसुद्धा...

Lol

'भाषा' हा शब्द कसा बोलतात ते?

संध्या भाषेबद्दल कुणाला माहित असेल तर सांगा ना. गूगलने फार नाही सांगितलं.

अश्विनी भाषा हा शब्द ते भाशा किंवा भाश्या असा उच्चारतात.
माश्यांसारखा!
बरेचसे युपी / बिहारी 'भासा' च म्हणतात.
संध्या भाषेबद्दल कधीच ऐकले/वाचले नाही.

'भासा'च म्हणतात, अश्विनीजी...
'श'चा लवलेशही नसतो...
कदाचित त्यांच्या दृष्टीने ते करतही असतील वेगळा उच्चार.. माझीच कर्णपटले तेवढी संवेदनाक्षम नसावीत... Happy

मी जेव्हा पाच सहा वर्षांपूर्वी कन्नड लिहा वाचायला शिकले तेव्हा खूप पंचाईत व्हायची.
म्हणजे माझंच नाव लिहिताना मराठीत स अर्धा आणि वा पूर्ण लिहितो (उच्चारानुसार योग्य) तर कानडीत सा लिहून त्याला अर्धा व जोडतात.

एअरटेल च्या जाहिरातीत तो दुसरा ए आणि मग र लिहितात एsरटेल.
डाक्टर , फ्यान, ग्यास असे शब्दं लिहायचे.
वाटर, डाटर आणि ह्यारी पाटर!
Wink

मज्जा येतेय वाचायला..माहिती सुद्धा मिळतेय छान छान..
साती आत्ताचा किस्सा भारी.
सद्ध्या गोंडी भाषा शिकतेय.. येते , समजते पण पुर्णपने नाही.. झालच तर लिहते त्यावरही Happy

बेफ़िकिर,
ते हिंदी भाषिक सर्वच राज्यांतल्या सर्व भागातले आहेत/होते. जम्मू, हरयाणा, हिमाचल, पंजाब, दिल्ली, बिहार, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि इतरही. पण चर्चा असं नाही.. रोजचंच अनौपचारिक बोलणं... आणि तेही बिचारे माझ्यासारखेच.. भाषाशास्त्र वगैरेशी काही संबंध नसलेले.. Happy

भरतजी,
संस्कृतात 'ळ' नाही?????????
मंत्रपुष्पांजलीतील 'आंतादापरार्धात् एकराळिती' प्राकृतापूर्वीचंच आहे ना???

हे सुटलं होतं.
उर्दू ही अस्सल भारतीय भाषाच आहे. उर्दूच्या लिपीला भारतीय मानत नसाल तर सिंधी, ओरिया, बांग्ला, पंजाबी, या देवनागरी लिपी न मानणार्‍या भाषांच्या लिप्याही नाकारणार का?

अहो नवनाथ, माझा प्रश्न होता : "संस्कृतात ळ आहे का? मराठीत ळ प्राकृतमधून आला असावा. नक्की माहीत नाही".
माहितीत भर घातल्याबद्दल धन्यवाद.

संध्या भाषा - आत्ता परत गूगलला विचारलं तर काहितरी बुद्ध, तांत्रिक, संस्कृत, हिमालयन योगी संबंधीत काही असावंसं वाटतंय. आधी मला वाटत होतं की संस्कृतच्याही आधीची काही भाषा असावी जी आता लोप पावली आहे. त्यामुळे उत्सुकता. जाऊदे.

भरतजी,

नुक्ता हे अरबी भाषांचे सामर्थ्य नक्कीच असेल. हिंदीने ते तिकडून घेतलंय असं म्हणेन.
ॉ,ँ,ॅही परकीय चिन्हे नक्कीच नाहीत.. मात्र परकीय उच्चार दर्शवण्यासाठी मराठीत त्यांचा वापर केला जातो..
साक्षात ॐ चा अर्धचंद्र कुठचा? याविषयी तरी दुमत नसावं...
काना वापरून अर्धचंद्राचा मात्रेप्रमाणे वापर करणे हे देवनागरीचंच वैशिष्ट्य इथे inherit झालं आहे.. त्याला परकीयत्वाचा वासही येत नाही. नुक्तातर जशास तसा उचललाय हिंदीने.. एवढंच म्हणायचं होतं.

कहाँ, हिंदोस्ताँ, जहाँ वगैरेंचा उच्चार हिमेश रेशमियाँ व्यतिरिक्त अन्य कोणास जास्त चांगला जमेलसं वाटत नाही.. (केवळ विनोद.. क्षमस्व) Wink

पंजाबी, गुजराथी, बंगाली, ओरिया या संस्कृतच्याच कन्या आहेत.. त्या भाषा आणि त्यांच्या लिप्याही.. संस्कृतचं पालकत्व स्वतः ते भाषिकही नाकारत नाहीत.. गुरूदेवांचं आणि बंकिमचंद्रांचं संस्कृतप्रेम सर्वांना ठाऊकच असेल...
सिंधीबद्दल काहीही माहित नाही.. Sad
दाक्षिणात्यांना मात्र संस्कृत अमान्य आहे हे खरं. त्यांच्या लिप्याही देवनागरी कुळातल्या नाहीत.. पण त्यांचे बरेच शब्द संस्कृत शब्दांशी मेळ खातात ते कसे? कळालेलं नाही.. Sad

मस्त लेख आहे. मुलीला आता अभ्यासक्रमात हिन्दी आहे. बन्गाली लोक चा करतात आणी बिहारी लोक चा करतात. गुजराथी पण चा काही वेळा करतात. सुरेशच्या ऐवजी सुरेस वगैरे. प्रत्येक प्रान्तानुसार उच्चार व भाषेतला टोन बदलतो.

नवनाथ राऊळ,

>> त्यांच्या लिप्याही देवनागरी कुळातल्या नाहीत.

संस्कृत पूर्वी ब्राह्मी लिपीत देखील लिहिली जायची. दक्षिणी लिप्या ब्राह्मी कुळातल्या आहेत. त्यामुळे त्या भाषाही संस्कृतशी साधर्म्य दर्शवतात. मल्याळम भाषा मराठीसारखी संस्कृतला बरीच जवळची आहे. त्यामुळे की काय परभाषा व्यवस्थित बोलता येणाऱ्या लोकांत केरळी भाषिकांचा क्रमांक बराच वरचा लागतो. (पहिला अर्थात गुज्जूभाईंचा, त्यांच्या धंद्यापायी!)

आ.न.,
-गा.पै.

छान लेख.
हिंदी मधील पूर्णविराम हा संस्कृत मधला आहे पण मराठी मधले टिंब कोठून आले असावे? बाकी हिंदी भाषिक सिंह चा उच्चार सिंग असा का करतात हे एक कोडे आहे. सिंह हा शब्द उच्चारायला काही एव्हढा अवघड वाटत नाही.

बेफ़िकिर,
मला वाटते की एखाद्या भाषेला असमर्थ किंवा त्रुटींनी युक्त असे मानले जाऊ नये. >>>>>> सत्यवचन..! पूर्ण सहमत आहे.. नाही मानणार तसं....

गा.पै.,
दाक्षिणात्य लिप्यांबद्दलच्या ज्ञानात भर पडली.. Light 1 Happy
आणि गुज्जूभाईंबद्दलच्यासुद्धा.. Proud
आभार..

असे असूनही त्यांच्या संस्कृतद्वेषाचे कारण कधी समजले नाही.. Sad

फारच चांगला लेख आणि तितकीच चांगली रंगलेली चर्चा...

मराठीत 'श' आणि 'ष' इतक्या खोलात जाऊन उच्चार-प्रधान लिपी बनवली असल्याचे आढळते. पण मग 'च' ( चहा-तला ) आणि 'च' ( चवी-तला ) तसेच 'ज' ( जमिनितला ) आणि 'ज' ( जास्तीतला ) वेग वेगळे लिहिता यावे या साठी भाषाशुद्धी का झाली नसावी ?

तसेच वेग वेगळ्या प्रकारे लिहिले जाणारे शब्द शेवटी एकच अर्थ आणि उच्चार प्रकट करतात, हे नक्की मराठी भाषेच 'बलस्थान' की 'दौर्बल्य' ? ऊदा. 'व्यक्ती' आणि ' व्य क् ती ' चा उच्चार आणि अर्थ एकच पण लिखिणाच्या मात्र दोन पद्धती, असे का ?

'प्रत्यक्ष' हा शब्द लिहिताना या शब्दाचा उच्चार मात्र 'प्रत्यक्ष्य' असा होतो. 'क्ष' चा उच्चार प्रत्यक्षात 'क्ष्य' असा केला तरी अशुद्ध गृहीत धरत नाहीत. प्रत्यक्ष्यात लिहीणे योग्य नाही काय ? पण 'क्ष' हेच एक जोडाक्षर आहे त्याला 'क्ष्य' करणे चूक आहे. पण उच्चार मात्र तसाच करावला लागतो.

मुळातच 'क्ष' ची गरज काय आहे. 'क' आणि 'ष' ( किंवा श् ) यांचे जोडाक्षर ( जोडाक्शर ? ) बनवून उच्चाराचा तोच परिणाम साधता येतोच की. जर मुळात 'क' आणि 'श' या दोन मूळाक्षरांचा मिळून 'क्ष' तयार होतो तर मग 'क्ष' ला लिपी मध्ये एवढे वेगळे स्थान का दिले ? तोच विशेष दर्जा 'त्र' चा.? आणि 'स्त' 'स्फ' 'द्र' आणि अशाच उर्वरित अनेक जोडाक्षरांना वेगळे पण न देता जोडाक्षरच म्हणूनच का जगू दिले ?

मराठी महानच आहे. पण शेवटी ती जितकी सुभग होईल तितकी जास्त वापरली जाईल. एवढाच एक प्रामाणिक उद्देश आहे.

भाषाशास्त्र, उच्चारशास्त्र, वगैरेंशी माझा काडीचाही संबंध नाही, सबब जाणकारांनी चुकीचे काही आढळल्यास मोठ्या दिलाने क्षमा करून त्याकडे निश्चितच अंगुलीनिर्देश करावा.

असे तुम्ही लिहिता आणि मग खालीलप्रमाणे ठाम विधाने कोणत्या आधारावर करता? जर जाणकार नसाल व तरिही उत्सुकता असेल तर आधी थोडा अभ्यास (पुस्तके वाचणे, इंटरनेटवरील पीअर रेव्युड वा खात्रीशीर साइट्स बघणे वगैरे) करून लेख लिहिला असतात तरी बरे वाटले असते. तुमच्या लेखात सरसकट चुकीची विधाने आहेत.
>>>
हिंदीपेक्षा (किंबहुना इतर कोणत्याही भारतीय भाषेपेक्षा) मराठी ही संस्कृत भाषेला सख्खी आहे असे नेहमी वाटते (एक मराठीभाषिक म्हणून नाही तर तटस्थपणे). - तेलुगु, मल्यालम मध्ये कित्येक संस्कृत शब्द तसेच्या तसे येतात. मग त्या संस्कृतास अधिक जवळच्या का नाहीत? मुळात जवळची याची व्याख्या काय? शब्द तसेच्या तसे असणे, व्याकरण तसेच असणे, उच्चार तसेच असणे की लिपी की सर्व काही? तेलुगुत ओक्का नेमिषु म्हणजे एक मिनिट हां अश्या अर्थाने. त्यातला निमिष हा क्षण याचा संस्कृतमधला समानार्थी शब्द मला फार आवडतो. मराठीत आपण अभावानेच एक क्षण हां असे म्हणतो, एक मिनिटच म्हणतो बहुतकरून. मग तेलुगु अधिक समृद्ध का?
उर्दू ही भारतीय भाषा मानत नाही आणि लिपी तर खचितच नाही - ठाम मत! - कशाच्या आधारावर हे ठाम मत? जगातल्या अनेक भाषातज्ज्ञांच्या विरोधात आपले मत का झाले असावे? विकिपिडियावरच्या एन्ट्रीत पहिलेच वाक्य आहे: Urdu formed from Khariboli—a Prakrit spoken in North India—by adding Persian and Arabic words to it. Around 99% of Urdu verbs have their roots in Sanskrit and Prakrit. आता विकी हा ठोस पुरावा नसला तरी तिथे अनेक इतर दुवे, पुस्तके मिळतील ज्यामधून तुम्ही शंका निरसन करू शकताच.
'चलां कल्पतरूंचे आरव' आणि 'चला हवा येऊ द्या' या दोन्हीमधला 'च' वेगवेगळा उच्चारण्याची सोय मराठीत आहेच आणि त्यासाठी नुक्त्यांबिक्त्यांची गरज भासत नाही. - नुक्ते न देता अमराठी भाषिकाला व नवीन शिकणार्‍याला कसे कळेल कोणता उच्चार करायचा ते?
'ॉ', 'ॅ', 'ँ', '्' वगैरेंचा वापर मराठीत होऊन तिची समृद्धी झाली आणि सर्वसमावेशकता वाढली आहे (आणि ही Foreign particles नाहीत). >>> अ‍ॅ, ऑ हे उच्चार संस्कृत वा मूळ मराठी शब्दांत नाहीत. ते इंग्रजी वा पाश्चिमात्य भाषातून आलेले दिसतात . मग हिंदी विशुद्ध (ज्यात हे उच्चार करत नाहीत) की मराठी? मुल्ख्य म्हणजे ही फॉरिन पार्टिकल्स नाहीत हे कशावरून?

मी शिकलेल्या एका युरोपियन भाषेत दीर्घ ओ आहे, दीर्घ अ आहे, आपण उच्चार करतो तसा अ आहेच पण त्याबरोबर अगदी पोटातून निघणारा अ आणि त्याचा दीर्घ अ पण आहे. तसेच उ आणि यु हे दोन स्वतंत्र स्वर आहेत. जमिनीतला ज आणि जालातला ज, चमच्यातला पहिला च आणि नंतरचा च्य अश्या स्वतंत्र उच्चारांसाठी स्वतंत्र मुळाक्षरे आहेत. ती सर्व मराठीत स्वतंत्रपणे देता येत नाहीत. हिंदीत येतील. मग मराठी समृद्ध की हिंदी?

तेलुगुत ओक्का नेमिषु म्हणजे एक मिनिट >> हेच तमिळमध्ये ओरू मिनिषं (मी इतके दिवस ते मिनीट वरून आलं असावं असं समजत होते, पण आज लक्षात आलं की निमिषवरून आलं अस ण्याची शक्यता जास्त)

टण्या, उत्तम प्रतिसाद.

Charudutt Ramtirthkar,
आपल्या शंकांशी सहमत आहे.. पण निरसन करण्यास असमर्थ...

उदाहरणार्थ, परवाचाच हा किस्सा घ्या ना.. एका इमारतीजवळ 'लावण्या' असे लिहीलेली पाटी होती आणि पाटीवर सोनाली कुलकर्णी या मराठी अभिनेत्रीचे साजशृंगार केलेले छायाचित्र होते, बहुधा नटरंगमधील असावे.. मला काहीतरी लावण्यांचे डान्स क्लासेस वगैरे असतील असे सुरूवातीला वाटले.. पण आमची गाडी जेव्हा तिथे पार्क झाली तेव्हा जवळून पाहिल्यावर खाली ब्युटी पार्लर लिहीलेले वाचले आणि मग लक्षात आलं की ते 'लावण्ण्या' आहे...
आता 'लावण्ण्या' असा काही शब्द नाही पण आपण उच्चार मात्र करतो तसा हे खरंय..!

Pages