मोबाईल आणि मुले

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 19 June, 2015 - 03:49

मागिल वर्षी मुलीच्या शाळेत पालकांसाठी लेखन स्पर्धा होती त्या निमित्ताने लिहीलेला हा लेख.

हॅलो, आनंदाची बातमी आहे, मुलगा/मुलगी झाला/झाली. हो हो व्यवस्थित आहे. आता ही माझ्याकडे फोन करताना कशी टुकू टुकू पाहतोय/पाहतेय." आजकाल नवीन जन्मलेल्या बाळाच्या नजरेसमोर येणार्‍या ह्या पहिल्या प्रसंगातूनच बाळे मोबाइलशी परिचित होत असतील नाही का? आपल्या आई-वडील आणि घरातील इतर सदस्यांबरोबर मोबाइलही आपल्या आयुष्यातील एक घटक आहे हे नक्कीच बाळांना जाणवत असणार.
अडगुलं मडगुलं किंवा ये ग गाई गोठ्यात च्या ऐवजी आजकाल डायरेक्ट मोबाइलवर
इट्स माय पमकीन टमकीन
हॅलो हनी बनी,
फिलिंग समथिंग समथिंग हॅलो हनी बनी
रिंगींग ट्रिंग रिंग रिंगींग हॅलो हनी बनी
टोको टोको टोको टोको

हे गाणं बाळाला ऐकवलं की ह्याच्या गोड धुनी मुळे बाळ हातपाय हालवून हसू लागत. अजून पुढे जाऊन जेव्हा मुलांना जाहिरातीचे अर्थ कळायला लागतात तेव्हा

आयडिया इंटरनेट जब लगाविंग
दुनिया को ना उल्लू बनाविंग
कैसे उल्लू बनावींग

अश्या जाहिराती लागल्या की मुलांची बोटे जाहिरातींची नक्कल करण्यासाठी वळायला लागतात. तर अशा छान छान आकर्षक गाण्यांच्या, झुझु वापरून केलेल्या गमतीशीर जाहिरातींपासून मुलांना मोबाईल वापरण्याने कसे फिलिंग येते, आपल्याला कोणी कसे उल्लू बनवू शकत नाही. कोणते अ‍ॅप्स कुठल्या मोबाइलमध्ये चांगले आहेत, मोबाईल वापरल्याने कशी "दुनिया करलो मुट्ठी मे" ह्याचे आकलन होऊ लागते. मला वाटत मोठ्यांपेक्षा आजकाल मुलेच आपल्या आई-वडिलांना कोणता मोबाईल कसा आहे हे पटवून देण्यात सक्षम ठरतात व मुलांनी पटवून दिलेल्या माहितीवरून त्या ब्रँडचा स्मार्टफोन घरात येतो.

साधा फोनही जेव्हा मागील काळात नवलाईची गोष्ट होती तिथे दोन वर्षाच्या मुलांनाही आता मोबाइलवरचे अ‍ॅप्स चालवता येतात ह्यात काही नवल राहिले नाही. जितके फायदे तितकेच तोटेही मोबाइलमुळे लहान मुलांच्या आयुष्यात घर करून बसले आहेत.

पूर्वी शाळेतून घरी आलो, दप्तर टाकलं की हातपाय धुऊन, खाऊ खाऊन कधी अंगणात खेळायला जातो असे व्हायचे. पण त्या अंगणाची किंवा मैदानाची जागा आता मोबाइलच स्क्रीनने घेतली आहे. ह्याचा वाईट परिणाम मुलांच्या मनावर व शरीरावर अप्रत्यक्षपणे होत आहे. मैदानी खेळ सुटल्याने मुलं शारीरिक व्यायामाला मुकत चालली आहेत. त्याचा परिणाम त्यांच्या स्वास्थ्यावर होत आहे. कोडी, बुद्धिबळ, नवाव्यापार, सापशिड्यांसारख्या मनोरंजक व बौद्धिक खेळांची जागा मोबाइलच डोक्याने (मेमरीने) चालणार्‍या गेमने घेतली आहे. त्याचा परिणाम मुलांच्या बुद्धीच्या विकासावर व कल्पकतेवर होऊन मुलांची चंचल वृत्ती वाढीस लागत आहे. गोष्टीची पुस्तके कालबाह्य ठरून मोबाइलवर कथा, वाचल्या पाहिल्या जातात त्यामुळे पुस्तकांचे ते सुगंधीस्पर्शी अनुभव मुकत चालले आहेत उलट मोबाइलच स्क्रीनमुळे डोळ्यांवर व रेंजेस मुळे शरीरावर घातक परिणाम होण्याची शक्यता वाढीस लागली आहे. पालक आपल्या मुलांना घरी एकटे असतात, व अडीअडचणीला इमर्जन्सी म्हणून मोबाईल घेऊन ठेवतात. असावा काळानुसार गरजाही बदलत असतात. पण त्यावर पण कंट्रोल ठेवला नाही तर ह्याचा योग्य उपयोग न होता मुले गेम्स, चाटिंग, क्लिपिंग पाहणे या सारख्या गोष्टींमध्ये स्वतःला पूर्ण झोकून देतात. नेट सर्चिंगमध्ये जशी कोणतीही चांगली माहिती क्षणात उपलब्ध असते तशी वाईट गोष्टींचीही भर असते. वयात आलेली मुले जर वाईट गोष्टींच्या आहारी गेली तर त्याचे किती विपरीत होतात हे आपण पाहतोच. घरात पालकच हल्ली स्मार्टफोन वरील फेसबुक व वॉट्स अ‍ॅप सारख्या सुविधांमुळे घरातील आपला मोलाचा वेळ ह्या अ‍ॅप्सवर खर्च करतात. त्यामुळे मुलांमध्ये आणि पालकांमध्ये संभाषण कमी होऊन अ‍ॅप्सवर जिव्हाळा अडकून पडला आहे. मोबाईल कंपन्यांने आता खरच दुनिया मुठ्ठी मे केली आहे.

काही दिवसांपूर्वी मुलीला घेऊन लहान मुलांच्या दवाखान्यात गेले होते. पूर्वी लहान मुलांच्या दवाखान्यात कायम दवाखान्याच्या इंजेक्शन, तपासणीच्या भितीने मुलांच्या रडण्याचा आवाज यायचा. आई-वडील हे चित्र, ते चित्र दाखवून मुलांना समजवून त्यांना गप्प करण्याच्या आटोकाट प्रयत्नात दिसायचे पण त्या दिवशी आई-वडील नंबर येण्याच्या प्रतीक्षेत होते तर लहान मुलाच्या हातात मोबाईल होते व लहान मुले बिझिनेसमॅनप्रमाणे त्या मोबाइलमध्ये गर्क होती. त्यांच्या भिती, चिंतेची जागा मोबाइलने गिळंकृत केली होती. हा बदल चांगला आहे की वाईट हे समजणे जरा अवघडच आहे.

काही गोष्टी मोबाइलमुळे खरंच खूप चांगल्या झाल्या आहेत. गूगल सारख्या माध्यमातून हवी ती माहिती आज एका सेकंदात उपलब्ध होऊ शकते. काही माहितीमध्ये तफावत असते ही बाब वेगळीच. बर्‍याच गोष्टींच्या ट्युटोरियल्स यू ट्यूब द्वारे मिळते. कुठेही अडीअडचणीला व्यक्तींशी कॉन्टॅक्ट करण्यासाठी मोबाईल हे उत्तम साधन आहे. लांबवर अगदी फॉरेनलाही असणार्‍या आपल्या जीवलगांबरोबर व्ही चाट सारख्या अ‍ॅप द्वारे सेकंदात दृष्टिभेट होते त्यामुळे अशा दूरच्या व्यक्तींमध्ये बरीचशी जवळीक साधता येते.

कुठलीही गोष्ट म्हणजे मोबाइलही मुलांसाठी वाईट आहे असे नाही. पण त्याचा योग्य उपयोग केला गेला पाहिजे.

सौ. प्राजक्ता म्हात्रे

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खरंय..
स्मार्ट फोन स्मार्ट जनरेशन.
पण लहान मुलांच्या हातात मोबाईल जेवढ्यास तेवढा वेळ द्यायला हवा आणि थोड्यावेळाने त्यांच्या रडण्याची पर्वा न करता खेचून घ्यायला हवे.
लहान मुल तेवढेच बिझी राहतेय ही आपली सोय बघणे तर एक पालक म्हणून अपराध आहे.

खरं आहे.
मोबाइल, लॅपटॉप याच्या वापराने मुलांना वेळेच्या आधीच मोठं केलय. कुठे आणि कसं कंट्रोल करायचं.
बरं आपल्या मुलांना आपण भलेही मोबाइल ची, लॅपटॉप ची बंदी करणार, तर शाळेचे शिक्षक म्हणतात गूगल सर्च करा आणि अमक्या अमक्या विषयाचं प्रॉजेक्ट बनवा. आता काय बोलणार? ... कठीण आहे.

१००% खरय, सुरवातीला आपली सोय म्हणून पालक मुलांच्या हातात थोडावेळ मोबाइल देतात पण मग त्याची चटक आकधी लागली हेच लक्षात येत नाही. आणि आता तर शाळेत ज्युनिअर पासुन मुले आय प्याड वापरतात तेव्हा त्यांच्यासाठी मोबाईल म्हणजे किस झाड कि पत्ती

जागू, अगदी सत्य परिस्थिती लिहिलीस. अग, आई-वडीलच जिथे मोबाईलवर गेम आणि चॅट्मध्ये गुंग असतील तर ते मुलांना तरी काय सांगणार? त्यांनाच जगाचं भान नसत. तर हे चांगल की वाईट हे मुलांना कसं समजावणार? पुढच्या पिढीच्या भवितव्याची काळजीच वाटतेय. Uhoh

I have seen kids of 2/3 years getting violent if the phone is not handed over to them.. But then who introduced the phone to them ?

But then who introduced the phone to them ?
>>>
पालकांना तर कौतुक वाटते की आपल्या मुलाला दिड-दोन वर्षांचा असतानाच मोबाईल हाताळता येतो याचे. आमच्या ऑफिसमध्ये बायकांच्या चर्चेमध्ये हे वरचेवर ऐकू येत असते.

बाकी getting violent चे म्हणाल तर हा प्रश्न नुसता मोबाईलपुरता मर्यादीत नसून व्यापक आहे. आजकालचे कित्येक पालक लाड करताना मुलांना "नाही" ऐकायची सवय लावायला विसरतात असे माझे निरीक्षण बोलते.

जागु मस्त आहे लेख. पण काळ बदलला आहे . ह्या गोष्टींपासून कोणी ही लांब राहु नाही शकत. तारतम्याने वापर व्हायला हवा हे खरे.
गेल्यावर्षी बघितलेली एक गोष्ट सांगते. सुपर मार्केट मध्ये एक फॅमिली शॉपिंग ला आली होती. नवरा बायको आणि त्यांच वर्षाच्या आतलं मुल. त्या मुलाला बाबा गाडीत बसवल होतं आणि त्याच्या हातात एक जाड पुटठ्याच चित्राच पुस्तक दिल होत खेळणं म्हणून. त्या मुलाला त्या पुस्तकाच पान उलटायच होत पण पान उलटतात हे त्याने कधी पाहिलेच नसल्यामुळे ते मुल आपण मोबाईल स्वाईप करतो तसं करत होतं पुस्तकाच पान पलटण्यासाठी.

१००% सहमत. माझा मुलगा आता २ वर्षांचा आहे. आम्ही आत्तापर्यंत त्याला स्मार्ट फोन ची ओळख होऊ दिली नव्हती. त्यामुळे तो घरात प्रचंड उद्योग करतो आणि आम्हाला मस्त पळवतो पण त्याबद्दल आमची तक्रार नाही. आता मात्र त्याला हे खेळणं आवडायला लागलय. सद्ध्या तरी त्याला देतो त्या जुन्या स्मार्टफोनवर नुसती गाणी आहेत त्यामुळे तो थोडा वेळ खेळतो आणि कंटाळतो. पण अधुन मधुन स्क्रीनशी खेळायला येतोच.

ह्या लेखावरून नेहमी येणारा एक अनुभव आठवला - रोज संध्याकाळी आम्ही बागेत खेळायला जातो. माझा फोन तेव्हा खिशात'च' असतो आणि मी सगळा वेळ मुलाबरोबर खेळण्यातच घालवतो. बरेच पालक मात्र फोन मधे डोकं घालुन असतात. झोपाळ्यावर मुलाला झोका देताना ह्यांच डोकं फोन मधे. मग झोपाळ्यावर बसलेल्या त्या मुलाच्या चेहर्‍यावर अक्षरशः निर्जीव भाव दिसतात. ती मुलं आपल्या आईबापांकडे अतिशय अपेक्षेनी पहात असतात हे बघताना वाईट वाटतं. परवा असाच एक लहान मुलगा घसरगुंडी वर खेळत होता. वयानी माझ्याच मुलाएवढा असावा. मी त्याच्याकडे बघुन हसलो, तो घसरुन आल्यावर टाळ्या वगैरे वाजवल्या तर तो प्रचंड खुश झाला आणि मस्त खेळायला लागला. काही ओळख नसताना तो माझ्या मुलासाठी थांबायचा आणि दोघं एकत्र परत वर जायचे. नंतर बघितलं तर त्याचा बाप म्हणवणारा म्हसोबा लांबच्या एका बाकावर बसून आमच्या खेळाचा फोनवर व्हिडिओ काढत होता. त्या आधीही मुलगा एकटाच खेळत असताना तो फोनमधे बघत बसला होता हे वेगळे सांगायला नकोच. फार वाईट वाटलं त्या दिवशी त्या मुलासाठी.

पालकच असे वागल्यावर मुलांनी काय करायचं?

लेख आणि चर्चा सुंदर ..

टीनएज मध्ये या सोयींच्या अनिर्बंध वापरने किती घातक परिणाम होऊ शकतात याची आपण केवळ कल्पनाच करू शकतो.. काही गोष्टींची तर आपण पांढरपेशे लोक कल्पना सुद्धा करू शकत नाही ..
उदा. मध्ये वाचलेली एक बातमी, एक मुलगी (१३ वर्ष) चांगला मोबाईल पाहिजे म्हणून चक्क शरीरविक्रय करायला लागली. मोबाईल वरून संपर्क करून ती त्या लोकांना घरी बोलवायची. (हे लिहायला सुद्धा कसतरी होतय! अरे मोबाईला, कुठे नेऊन ठेवलंय बालपण याचं!)

मला तर वाटत कि या सगळ्या गोष्टींचा अॅक्सेसच त्यांच्या करता बंद करणे शक्य नाही. काही दृष्टीने बरोबर पण नाही. काही वेबसाईट वगेरे लॉक करून ठेवण त्यांच कुतूहल जाग करून उलटाच परिणाम घडवून आणू शकत.
तेव्हा आता पर्याय एकच तो म्हणजे चांगले संस्कार करण !
वाईट संस्कार करायला जेवढ्या वाईट गोष्टी आहेत त्याहून जास्त प्रमाणात चांगले संस्कार करण एवढ एकच पालक करू शकतात. पूर्वी कधी नव्हती तेवढी मदार या काळात आहे संस्कारांवर !

माझी मुलगी २ वर्षाची होती तेव्हपासून जेवताना ipad/ laptop वर कार्टून बघत जेवते. दिवसभरात तेवढाच वेळ तिला ipad/ laptop बघायला मिळते. तिच्या वयाला योग्य अशीच कार्टून मी तिला बघून देते. मुलं कार्टून मधून पण अनेक चांगल्या गोष्टी शिकतात.
मला तरी यात फार काही चूक वाटत नाही. पूर्वी जेव्हा ipad/ laptop नव्हते तेव्ह आई किंवा आजी मुलांना गोष्टी सांगत जेवायला घालत. ते गोष्टी सांगायचे काम हल्ली ipad/ laptop करतात. बाकी घरातील इतर १० कामात आपण यंत्रांची मदत घेतो. मग ह्या कामासाठी घेतली तर कुठे बिघडलं?
मी आणि नवरा दोघं नोकरी करतो. दिवसभरातील घटना घडामोडी शेअर करायला आम्हाला जेवतानाची वेळ सोयीची असते. ती रात्री झोपताना मी किंवा तिचा बाबा तिला गोष्ट सांगतो.
मुलगी अजून थोडी मोठी झाली की तिला पण दिवसभरातील घडामोडी आमच्याशी शेअर करायला जमायला लागेल. मग ह्ळूहळू कार्टून बघायची वेळ बदलायची.

जागु, छान लिहिलं आहेस.
पण ममो ने लिहिल्याप्रमाणे , काळाच्या वेगाबरोबर चालणं आवश्यक आहे, पण बॅलेंस हवाच. तो आईवडिलांनी अगोदर स्वतःमधे बाणवायला शिकायला हवंय.. वरची काही उदाहरणं ही आजची सॅड वस्तुस्थिती आहे.
लहान मुलांना काय दोष देणार .. परवडतंय म्हणून त्यांच्या हातात मोबाईल देणार्‍या आईवडिलांनी आपल्यावरची नैतिक जबाबदारी ओळखून त्याप्रमाणे वागायला शिकावं. मुलं अनुकरणानेच तर शिकतात..

माझ्या भाच्च्याने जगण्या साठी आवश्यक ३ गोष्टींवर निबंध लिहिलाय त्यात पहिली गोष्ट आहे इलेक्ट्रीसिटी, कारण त्याशिवाय आपल्याला वाय फाय व नेट चालू करता येत नाही. मग नंतर फूड व शेल्टर. Sad

लेख फार पटला! माझ्या लहानपणी मोबाईल आणि कॉम्प्यूटर नव्हते ही माझ्यासाठी सगळ्यात आनंदाची गोष्ट आहे!
माझ्या मैत्रिणीची मुलगी दीड वर्षांची आहे आणि ती जेवत असताना तिला पुस्तकं किंवा खेळणी देतात. screen addiction फार पटकन होतं आणि जर जेवताना distraction एवढाच उद्देश असेल तर पुस्तक/खेळणं हेच काम करतं. अर्थात हे माझं मत आहे.
मुलांना बागेत नेऊन मोबाईलकडे पाहणारे आई बाबा पाहिले की चिडचिड होते. जर वेळ नसेल तर मूल जन्माला घालू नका..you have a choice. Parenting is a huge time commitment. If you are not ready, don't go for it!

कुठलीही गोष्ट म्हणजे मोबाइलही मुलांसाठी वाईट आहे असे नाही. पण त्याचा योग्य उपयोग केला गेला पाहिजे. >>>> अगदी बरोबर आहे हे ...

जागू छान मांडलस.
ते मुल आपण मोबाईल स्वाईप करतो तसं करत होतं पुस्तकाच पान पलटण्यासाठी.>>>>>>>>> ममो ...काय निरीक्षण आहे तुझं! मलाही एकदा हाच अनुभव आला होता.

मला तरी यात फार काही चूक वाटत नाही. पूर्वी जेव्हा ipad/ laptop नव्हते तेव्ह आई किंवा आजी मुलांना गोष्टी सांगत जेवायला घालत. ते गोष्टी सांगायचे काम हल्ली ipad/ laptop करतात. बाकी घरातील इतर १० कामात आपण यंत्रांची मदत घेतो. मग ह्या कामासाठी घेतली तर कुठे बिघडलं?>>> आई किंवा आजी मुलांना गोष्टी सांगताना जो ह्युमन टच असतो तो ह्यात रहात नाही. गोष्टी सांगताना त्या अनुशंगाने इतर अवांतर बोलणे होते ते पण ह्यात होत नाही. गोष्टी ऐकताना आलेल्या मुलांच्या गम्मतशीर प्रतिक्रिया तुम्ही मिस करताय Sad

मुलगी अजून थोडी मोठी झाली की तिला पण दिवसभरातील घडामोडी आमच्याशी शेअर करायला जमायला लागेल. मग ह्ळूहळू कार्टून बघायची वेळ बदलायची.>>> तुम्हाला खरच असे वाटत असेल की नंतर मुले तुमच्या गप्पात सामील होतील तर मला तो भाबडा अशावाद वाटतो. असे होण्याची शक्यता फार कमी असते.

चौकट राजा Sad

चौकट राजा छान किस्सा आणि गुड जॉब.

ऋन्मेष, पद्मावती, निर्मलानंद, शोभा, दिनेशदा, पियु, वर्षूताई, जिज्ञासा, शांकली, शशांक, मानुषी, सृष्टी, तुमच्या सगळ्यांच्या विविध अनुभवांच्या प्रतिसादांबद्दल धन्यवाद.

हेमाताई अगदी बरोबर निरिक्षण आहे तुमचे.

प्रकू अगदी भयानक परिस्थिती सांगितलीत तुम्ही.

सोहा चुक की बरोबर ही गोष्ट वेगळी पण ह्याचे मुलांवर दुष्परीणाम होतात हा माझा मुद्दा आहे. आणि गोष्टी आणि गाणी पहाणे चांगलेच आहे. टिव्हि ऐवजी आता हे साधन आहे. माझ्याही मुली पाहतात गोष्टी आणि गाणि आणि आम्हीही सांगतो त्यांना. फक्त त्यांना मोबाईलचे अती व्यसन लागू नये असे माझे म्हणणे आहे जेणे करून त्यांच्या तब्बेतीवर व मानसीकतेवर परीणाम होईल.

मेधा कमाल ना?

मी नताशा, खर आहे ह्युमन टच हा हवाच.

पियू, मी नताशा, जागू, धन्यवाद.
>आई किंवा आजी मुलांना गोष्टी सांगताना जो ह्युमन टच असतो तो ह्यात रहात नाही. गोष्टी सांगताना त्या अनुशंगाने इतर अवांतर बोलणे होते ते पण ह्यात होत नाही. गोष्टी ऐकताना आलेल्या मुलांच्या गम्मतशीर प्रतिक्रिया तुम्ही मिस करताय > अगदी १०००% सहमत. आमच्या घरी तर जेवताना टी व्ही सुद्धा बंद असतो.

सोहा, लॅपटॉप माणसाची जागा घेऊच शकत नाही. मुलं अतिशय छोट्या छोट्या गोष्टीमधुन आपल्याशी भावनिक जवळिक साधत असतात. त्यामुळे मुलांना असे गुंतवून ठेवण्याचे दुष्परिणामच आहेत.
१. पहिली २ ते ३ वर्षे मुलांचा मेंदू प्रचंड वेगाने घडत असतो. अक्षरशः स्पंजप्रमाणे मुळे सगळे आत्मसात करत असतात. अशा वेळी लॅपटॉप वर / स्मार्ट फोन वर / यु ट्युब वर गाणी लावून देणे ह्यामुळे मुलांच्या मेंदुला कमी श्रमात ज्ञान मिळायची सवय लागायला लागते. ह्यामुळेच ह्या गोष्टींची आवड / चटक पटकन लागते. त्या ऐवजी आपण गाणी म्हटली, गोष्टी सांगितल्या तर त्यामुळे नंतर जेव्हा मुले प्राणी पक्षी प्रत्यक्ष बघतात तेव्हा रिलेट करायला शिकतात आणि मेंदूला लक्षात ठेवायची सवय लागते. खरं तर मुलांची पाटी कोरी असते. त्यांना मनोरंजनासाठी काहीही चालते पण आपल्यालाच तो मार्ग सोपा असल्यामुळे तो पटकन सगळीकडे वापरला जाऊ लागतो. जेवताना स्वतः गाणी; गोष्टी म्हणून बघा, मुलीची प्रतिक्रिया वेगळीच असेल आणि तुमच्या मेंदुलाही एक वेगळा व्यायाम मिळेल Happy
२. जेवणाच्या टेबलावर सर्व कुटुंबाने एकत्र येऊन हसत; बोलत जेवण करणे हे निरोगी कुटंबासाठी अत्यावश्यक आहे. हल्ली अनेक समुपदेशक सल्ला देतात कि जेवणाच्या टेबलावर कोणतीही इलेक्ट्रॉनिक गोष्ट येऊ देऊ नका. कारण बर्‍याच कुटुंबांमधे ती एकच वेळ असते जेव्हा घरातले सगळे एकत्र येतात. तुमच्या घरात आताच तशी वेळ आली आहे का? आत्ता तुमची मुलगी लहान आहे पण 'मी नताशा' ह्यांनी वर म्हटल्याप्रमाणे नंतर तुमची मुलगी तुमच्या संवादात सहभागी होईल असे वाटत असल्यास परत एकदा विचार करा.
३. समोर वाढले असेल ते खायचे आणि घरात बाकिचे सगळे तेच खातात तेव्हा आपण कोणी वेगळे / स्पेशल नाही ही जाणीव निर्माण होण्यासाठी मुलांना आपल्याबरोबर आपण खातो तेच देणे महत्वाचे असते. नाहीतर नंतर मुलांचे खाण्याबाबतचे नखरे वाढतात. एकुणच लहान वयातच शिस्त लावण्यातला पहिला धडा जेवणाच्या टेबलावर शिकवला जातो कारण बाकि सगळा खेळच असतो.

वर लिहिलेल्या गोष्टी मी आंतरजालावर विविध ठिकाणी वाचल्या. तुम्हालाही वाचायला मिळतीलच. पण स्वानुभवातुन सांगतो कि जेवणाच्या टेबलावर लॅपटॉप न ठेवण्याचे फायदेच आहेत तोटे अजिबात नाहीत. शुभेच्छा!

फार जिव्हाळ्याचा विषय

आमच्या घरी पण हेच आहे. प्रत्येकाचा मोबाईल असल्यामुळे मुलालाही त्याची चटक लागलीच. आणि मग किती भराभरा कॉम्प किंवा मोबाईल अॉपरेट करतो याचे कौतुक झाल्यामुळे हवा गेली डोक्यात. आता तो आठ वर्षाचा आहे

तरी मग तातडीने आम्ही उपाययोजना करून फक्त विकेंडस ला मर्यादीत वेळासाठी मोबाईल हाताळायला मिळेल असे केले. बाकीच्या वेळासाठी पुस्तके आणली, सायकल घेऊन जायला लागलो. पण आम्ही घरी नसताना तो आजोबांचा मोबाईल घेतो. (त्यांना लाडीगोडी लावणे सोपे असते.) आणि एकदा लवकर घरी आलो तर चपापून मोबाईल ठेऊन दूर गेला. मला असे वाटायला लागले आहे की मी व्हीलन तर ठरणार नाही ना अशाने.

तरी त्याला मोबाईलचे दुष्परीणाम - जसे की चष्मा लागेल, मग शाळेत मुले चिडवतील, डोळे खराब झाले तर मग दिसणार नाही, असे सगळे समजाऊन झाले आहे पण या वयात पटते पण वळत नाही.

चौकट राजा नेट वरील माहीती अगदी पटली.

आशुचॅम्प हो अशीच भिती घालावी लागते. पण तेही कधी ऐकले जाती कधी नाही. पण आपण आपल्या परीने त्यांना जरा ह्या माध्यमांपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करायचा.

इथ मुलांच्या मोबाईल वापरण्यावर टिव्ही पहाण्यावर सगळ्यांनीच मत नोंदवली आहेत. आपण स्वतः बिना फोनचे (झोप सोडुन) किती वेळ राहु शकतो हे कोणी पाहिलेल आहे का?
घरी फोन विसरला म्हनुन नाही पण मुद्दाम ऐखाद्या दिवशी काही तास बिना फोनचे , ईंटरनेटचे , व्हॉट्सअ‍ॅपचे.
कामात फार बिझि असताना नाही तर जेंव्हा कुठलीच घाई गडबड नाहीये , खुप सारी फुरसत आहे आणि फोन रेंजमधेच आहे तेंव्हा फोन बंद करुन पाहिल आहे का कधी.

जागूताई एकदम वास्तववादी लेख. लेखावरील प्रतिसाद सुध्दा एकदम छान.

मोबाईल आजच्या युगात एक आवश्यक गोष्ट झाली आहे एका घरात जेव्हढ्या प्रौढ व्यक्ती असतील त्या सर्वांकडे मोबाईल असण्याची शक्यता मध्यमवर्गात तरी जवळपास ९५% असण्याची शक्यता मला वाटते. त्यामुळे लहान मुलांसाठी मोबाईल ही एक कुतुहलाची गोष्ट असते. जरी तुम्ही तुमच्या मुलाला मोबाईल पासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केलात तरी त्याच्या इतर मित्रमैत्रीणींच्या घरी खेळायला गेल्यावर तिथे ते मोबाईलवर गेम खेळणे किंवा त्यावर चित्रपट पाहणे हे आज एकदम स्वाभाविक गोष्ट आहे. त्यामुळे आपण कितीही प्रयत्न केला तरी आता मोबाईल पासून आपण मुलांना दूर ठेऊ शकत नाही हे सत्य आहे. अनेकांनी लिहील्याप्रमाणे त्याचा अतिरेक टाळून मुलांच्या व्यक्तीमत्व विकासात त्याचा जास्तीत जास्त फायदा करून घेता आला पाहिजे.

सुशांत तुमचे म्हणणे बरोबर आहे. मला वाटत सगळ्यांच्या प्रतिसादातील मत आणि मी लिहिलेले म्हणण्ही हेच आहे की अतिरेक करून न द्यावा. कारण मुलांचे भविष्य अजून घडायचे आहे.

नरेश माने सहमत.

जागू खूप छान लेख.
सुशांत , मी करते हे. खूप वेळा दिवसभर मी फोन स्विच ऑफ करून ठेवते आणि अश्या वेळी शक्यतो डेस्क सोडून जात नाही. मोबाईल न लागल्यामुळे ऑफीस चे सगळे फोन आपोआप लॅन्ड लाईन वरच येतात. बॅन्ग्लोर, चेन्नई वैगरे च्या टीम मेम्बर्स ना ऑफीस मधे रेन्ज पकडत नाही असे सांगून ठेवले आहे.

माझ्या टीम मधे आम्ही याला मोबाईल उपवास म्हणतो , करून बघाच. काही जास्त फरक पडत नाही. घरी काही इमर्जन्सी नसेल तर करून बघायला हरकत नाही.

आमचे कॅन्टीन सेकन्ड फ्लोअर वर आहे,ऑफीस सिक्स्थ फ्लोअर वर. आम्ही जेवायला जाताना फोन स्विचॉफ करून जातो. आधी दोघ/तिघ तयार नसायचे. आता त्यांना ही सवय झाली, टेन्शन फ्री वाटते .