मराठी की इंग्रजी:एक चर्चा.

Submitted by लसावि on 14 August, 2009 - 06:10

रुढार्थाने हा लेख नाही. मंदार आणि माझ्यामधे मराठी आणि इंग्रजी वाचन या अनुशंगाने परस्परांच्या विचारपुशीत झालेली ही चर्चा आहे.दोन मराठी माणसे वाद घालत असल्याने अनेक फाटेही फुटले आहेत.तशी ही चर्चा मधेच थांबली त्यामुळे ती कुठल्या एका ठाम निष्कर्षावर येत नाही.यात आलेले तात्कालिक संदर्भ मुद्दामच उडवलेले नाहीत.
- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - --
सत्यजित:17 December, 2008 - 15:41
लॉर्ड ऑफ द फ्लाईज जी.एं. नी मराठीत भाषांतरीत केली आहे,आतातरी वाच!
तुझा इंग्रजी साहित्याविषयीचा दृष्टीकोन मात्र मला पटला नाही आपल्या इथे खुप ग्रेट साहित्य आहे ह्यात दुमत नाही,पण इंग्रजीत देखील काही मास्टरपीसेस आहेत(केवळ तथाकथित बेस्टसेलर नव्हे).आणी ते केवळ इंग्रजीवरच्या आकसापोटी न वाचुन तु स्वतःला एका उत्कृष्ट अनुभवापासुन वंचीत करतो आहेस.हे बघ कुठलीही अभिजात कलाकृती,मग ती कोणत्याही भाषेत असो;सर्वांना भिडते कारण तिचा आशय हा कायम मुलभूत मानवी भावनांशी डील करत असतो.
तुला जर इंग्रजी वाचनाला सुरवात करायची असेल तर बेस्टसेलरच्या नादाला न लागता प्रथम चेकॉव्ह किंवा गॉर्कीच्या अनुवादीत कथां पासून सुरुवात कर,मजा येईल.

मंदार:19 December, 2008 - 20:51
माझा इंग्रजी साहित्याविषयीचा दृष्टिकोन थोडा अजून नीट शब्दांत सविस्तर सांगतो म्हणजे तुला कदाचित कळेल. आत्ता तुझा थोडा गैरसमज झालाय असं मला वाटतं.
एकतर मला इंग्रजी भाषेविषयी आकस वगैरे नाही. प्रत्येक भाषेची आपापली वैशिष्ट्ये असतात तशी इंग्रजीचीही आहेत. भाषांची तुलना करण्यात काहीच अर्थ नसतो. माझा मुद्दा "इंग्रजीपेक्षा मराठी चांगली आहे, मराठीत अधिक उत्तम साहित्य आहे" असा मुळीच नाही. तो असा आहे की मराठी ही मला सर्वाधिक जवळची, हिंदी ही बर्‍यापैकी जवळची, तर इंग्रजी ही मुळात अजिबातच जवळ नसलेली पण जबरदस्तीने जवळ आणली गेलेली भाषा आहे. सांस्कृतिकदृष्ट्या ती माझ्यापासून खूपच दूर आहे. (उदा. आपल्या शिक्षकांना "You" म्हणणं किंवा आपल्या वडिलांबद्दल बोलताना त्यांना "He" म्हणणं माझ्या खरोखर जिवावर येतं.) इतकी परकी भाषा मला रोज पावलोपावली वापरावी लागत असल्याने मला तिचा कंटाळा आलाय, ही एक गोष्ट. म्हणजे इंग्रजी चांगली भाषा असली तरी तिच्याशिवाय रोजचं जगणं अवघड व्हावं इतकी काही ती दिव्य भाषा नक्कीच नाही. (राग मानू नकोस. पण आत्ता आपण फोनवर बोललो, त्यात तू निम्म्याहून अधिक गोष्टी इंग्रजीतून बोललास. आता त्यात तू परप्रांतात राहत असल्याचा किंवा तुझ्या व्यवसायाचा परिणाम किती आणि काही गोष्टी केवळ इंग्रजीतूनच व्यक्त करता येतात किंवा पुरेशा परिणामकारक वाटतात, असा समज किती हे कोण जाणे.) शिवाय इंग्रजीशी जोडला गेलेला प्रतिष्ठेचा मुद्दा तर मला कमालीचा मूर्खपणाचा वाटतो.
आणि दुसरा मुद्दा असा की विज्ञान -तंत्रज्ञान, संगणक व तत्सम उपकरणे इ. गोष्टींच्या संदर्भात इंग्रजीचा वापर एकवेळ ठीक आहे. (खरंतर फ्रान्स-जर्मनी-जपान मध्ये त्याहीबाबतीत स्वभाषाधोरण आहे!) पण साहित्य, कविता, कथा, सौंदर्याचा आस्वाद किंवा अनुभवाची अभिव्यक्ती या गोष्टी फार आतून येणार्‍या आणि आतपर्यंत शिरणार्‍या असतात, असाव्यात. तिथे आपल्यासाठी आपली भाषा जेवढी प्रभावी असते, तेवढी दुसरी कोणतीच भाषा असू शकत नाही असे माझे प्रामाणिक मत आहे. आपण ती दुसरी भाषा स्वतः शिकलो असलो तरीही दुसर्‍या भाषेतून आपल्यापर्यंत पोचणार्‍या अनुभूती या कधीच शंभर टक्के नसतात, तर त्या कायम सेकंडहॅन्ड किंवा बी-ग्रेड असतात असे मला वाटते. कारण त्यातील सर्व सांस्कृतिक, सामाजिक संदर्भ आपल्याला ठाऊक नसतात. (ते तुम्ही त्या प्रांतात अनेक वर्षे राहिल्याशिवाय ठाऊक असूच शकत नाहीत.) भाषा ही केवळ संपर्काचे माध्यम नसते, ती सोबत अनेक पिढ्यांचा वारसा घेऊन येत असते. ज्यांना त्यात रस नसतो ते लोक "कळलं ना काय म्हणायचंय ते, मग झालं!" असले युक्तिवाद करतात. (असेच लोक Pirated CD वर सिनेमे बघतात.. "स्टोरी काय आहे कळलं ना, मग झालं!") पण ज्यांना ते नुसतं कळण्यापलीकडे अनुभवायचं असतं त्यांचं अशा दुय्यम अनुभवावर नाही समाधान होत. (निदान माझं तरी नाही होत!) कुतुहल म्हणून या अनोळखी जगाची ओळख करून घेणं, त्याची वैशिष्ट्ये पाहणं मान्य आहे. (त्यामुळेच वुडहाऊसपासून सिडने शेल्डन, आयन रॅन्डपर्यंत वाचन केलंच की मी!) पण ते वाचताना जाणवणारं त्या संस्कृतीबद्दलचं अनोळखीपण आणि तेच वाचत राहिल्याने निर्माण झालेलं आपल्याच संस्कृतीबद्दलचं अनोळखीपण अशी ही दुहेरी कात्री आहे, ज्यात माझ्या मते आपल्याकडची बहुसंख्य सुशिक्षित शहरी तरुण पिढी सापडलीय. एकसारखी ठराविकच पुस्तके ठराविकच खोलात शिरून वाचणारी एक पिढीच्या पिढी जगभर निर्माण होणं, ही मला मानवतावादी वगैरे नव्हे, तर अत्यंत भयावह घटना वाटते. आणि ती सध्या घडू पाहतेय!
तू म्हणतोस कोणतीही अभिजात कलाकृती ही मूलभूत मानवी मूल्यांवर आधारलेली असल्याने ती सर्वांच्या ह्रदयाला स्पर्श करत असते. मी याबाबतीत तुझ्या विरुध्द मताचा आहे. माझ्या मते कोणत्याही अभिजात कलाकृतीत मूलभूत मानवी मूल्यांचा "लसावि" काढलेला असल्याने ती सर्वांच्या ह्रदयाला स्पर्श करते. पण त्यापलीकडे तिचा सर्वांगाने खोलवर आस्वाद घ्यायचा असेल तर भाषा हा फार महत्त्वाचा मुद्दा ठरतो. मला खरंच असं नाही वाटत की जगात कुठली कलाकृती (किंवा खरंतर कुठलीच गोष्ट) "ग्लोबल" असू शकते. सिनेमाचं उदाहरण द्यायचं तर मला 'लगान' हा जगातील सर्वोत्कृष्ट सिनेमा वाटतो, आणि त्यातील गाण्यांचा वापर हे त्यातील एक प्रमुख कारण आहे. उलट एखाद्या युरोपियन माणसाला तो त्यातील गाणी 'सहन' करत बघावा लागेल! प्रत्येकाचा Target audience वेगळा असतो. आणि जगातले सारे मानवी समाज हे वेगवेगळ्या आचार-विचार-संस्कारांवर वाढलेले असतात. त्यांची विचारपध्दती एकसारखी असूच शकत नाही. उदा. पु.लं.चे लिखाण जगातील इतर कोणत्याही भाषेत भाषांतरित होऊच शकत नाही. त्यात मानवी मूल्ये इ. इ. असली तरी त्यापलीकडचे सौंदर्य हे भाषेवरच अवलंबून आहे. दुसरा एखादा माणूस मराठी भाषा शिकला, तरी त्याला 'बटाट्याची चाळ' नीट कळणं खूप अवघड आहे. तसाच तुला सत्यजित रेंचा 'पाथेर पांचाली' किंवा लहान मुलांसाठी बनवलेला 'गुपी गाईन बाघा बाईन' सुध्दा सर्वार्थाने कळणं कठीण आहे. म्हणजे तुम्ही अनेक भाषांमधील साहित्यात एका मर्यादित खोलीपर्यंतच शिरु शकता; किंवा एकाच भाषेत (बहुधा तुमच्या मातृभाषेत) खूप खोलवर शिरु शकता, प्रत्येक संदर्भाशी रिलेट करू शकता. मी दुसरा पर्याय निवडलाय.
आणि त्यामुळे मी कुठल्यातरी एका सुंदर अनुभवाला मुकत असलो तरी दुसर्‍या एका सुंदर अनुभवाला वंचित होण्यापासून वाचतो. शेवटी एका आयुष्यात सगळेच अनुभव घेता येत नाहीत. (त्यासाठी पु.लं.इतकी भूक व क्षमता लागते.) माझ्या या मर्यादित आयुष्यात मी मर्यादितच संख्येने पुस्तके वाचणार असल्याने चार परकीय भाषेतील पुस्तकांऐवजी चार माझ्या भाषेतील पुस्तके वाचल्याने मला नाही वाटत काही नुकसान आहे. झाला तर फायदाच आहे.
बघ, हाही एक छोटा लेखच झाला.. प्रतिक्रियेची वाट बघत आहे.

सत्यजित:20 December, 2008 - 10:51
भावा जिंकलसं! एवढी चांगली चर्चा सुरु केल्याबद्दल सर्व प्रथम धन्यवाद.
१] आपल्या दृष्टीकोनातला मुळ फरक हा आहे की मला इंग्रजी ज्या पद्धतीने भावते,जवळची वाटते तसे तुझे होत नाही.माझ्या बोलण्याबद्दलचे तुझे निरिक्षण अचूक आहे,असे व्हायचे मुख्य कारण मी विचारच इंग्रजीत करतो हे आहे.आता हे कधी आणि का सुरु झाले ते मला माहित नाही.एक मात्र नक्की त्यात प्रतिष्ठेचा मुद्दा अजिबात नाही.
२] आता ह्या भाषेत मी स्वभाषे इतकाच रुळल्यामुळे तु म्हणतोस तसे 'अभिव्यक्ती १००% न पोचणे' असे माझे होत नाही.एखाद्या सुंदर इंग्रजी वाक्यरचना मला तितक्याच ताकदीने भिडते
3] 'मला खरंच असं नाही वाटत की जगात कुठली कलाकृती (किंवा खरंतर कुठलीच गोष्ट) "ग्लोबल" असू शकत'
मुद्दा अमान्य.चित्रपटाचेच उदाहरण देतो 'लाईफ इज ब्युटीफुल' हा माझ्या मते एक सर्वोत्कृष्ट सिनेमा आहे.तो आवडण्यासाठी नाझी जर्मनीचे सर्व संदर्भ कळणे ह गौण मुद्दा आहे,कारण माझ्या मते तो सिनेमा त्याच्या नावातच सांगितलेल्या मुलभूत मानवी आशावादावर आहे;म्हणून तो भावतो.
4]पुलंच्या लिखाणाचा अनुवाद कधीच त्या ताकदीचा होणार नाही हे मान्य,कारण त्यात अनेक कल्चरल संद्रभ येणार नाहीत.तरीही जर अनुवाद करणार्याला पुलंच्या मनातील लोकांबद्दलचे कुतूहल आणी अपार प्रेम ह्या 'मुलभूत मानवी भावना' कळाल्या तर त्या वाचकांपर्यंतही पोचतील.लॉर्ड ओफ द फ्लाईजचेच उदा. घेतले तर मुळ पुस्तक नक्कीच उजवे ठरेल.पण जीएं नी त्यातल्या भीषणतेचा जो जर्म मराठीत उतरवला आहे त्याला तोड नाही.
५]दुहेरी कातर होण्यामागे बरेचदा 'इंग्रजीच श्रेष्ठ' हा प्रकार असतो आणी तो नक्कीच भयावह आहे.
मला अजूनही असे मनापासून वाटते की तु इंग्रजीतील काही उत्कृष्ट कलाकृतींना अनुभवाव्यात.(ग्रेटेस्ट शॉर्ट स्टोरीज' हे पुस्तक मी सुचवेन त्यातली पहिलीच कथा 'द सेलेस्टीअल ओम्नीबस' वाचच.)तुझी कातर नक्कीच होणार नाही ह्याची मला खात्री आहे.
**आपल्या सर्व प्रतिक्रिया जोडून एक लेख टाकुया माबोवर!!

मंदार:20 December, 2008 - 13:52
हो, ही चर्चा उद्बोधक होईल, हे नक्की! पाहूया ती पुढे कुठे जाते..
१] माझे इंग्रजी शाळेपासूनच अत्यंत उत्तम आहे. (खरंतर माझी एकंदर भाषांबद्दलची ग्रहणशक्तीच चांगली आहे. आत्मस्तुती नाही, पण मी कोलकात्याला गेलो तेव्हा दुसर्‍या दिवशी तोडकीमोडकी बंगाली बोलू व तिसर्‍या दिवशी थोडीथोडी वाचूही लागलो होतो! मी बंगालीत एक कविताही केलीय. महिन्याभरात मी नीट बंगाली शिकू शकेन.) त्यामुळे मलाही इंग्रजी साहित्य, कविता यांतील सौंदर्य जाणवते. प्रश्न तो नाहीये. माझी मुख्य तक्रार हीच आहे की तुझ्यासारखे अनेक लोक हल्ली इंग्रजीतच विचार करतात! मला याबद्दल अतिशय मनापासून वाईट वाटते.. त्यात प्रतिष्ठेचा मुद्दा नसेलही. पण म्हणून ते योग्य ठरते असे मला नाही वाटत. इंग्रजी साहित्यातील सौंदर्य जाणून घेण्याच्या नादात जर लोकांची विचारांची भाषाच बदलत असेल, तर ती नक्कीच इंग्रजी भाषेची नव्हे तर त्या लोकांची जबाबदारी आहे.
२] मी सहज एक प्रयोग करून पाहिला. (जमल्यास तूही तुझ्या जवळच्या मराठी लोकांवर करून बघ.) एक कोरा कागद देऊन आपले नाव लिहायला सांगितल्यास आपल्या पिढीतील बहुतांश लोक इंग्रजीतून नाव लिहितात. इंग्रजी माध्यमात शिकलेल्या अनेक मराठी लोकांना देवनागरी लिपी सराईतपणे वाचता येत नाही. शिवाय माध्यमांनी तर हल्ली देवनागरी लिपी नष्ट करण्याचा चंग बांधल्याप्रमाणे मराठी-हिंदी जाहिरातीही इंग्रजी (की रोमन?) लिपीत लिहितात. उदा. Aisi safedi aur kahaan?
३] आता तू म्हणशील, "त्यात वाईट काय आहे? मी मराठी साहित्यही वाचतोच की! विचार कुठल्या भाषेत करतो याने काय फरक पडतो?" पण माझ्या मते खूप फरक पडतो. कारण काल मी म्हटल्याप्रमाणे भाषा ही केवळ संपर्कमाध्यम नसते, ती त्यापलीकडे अनेक गोष्टी घेऊन येते. त्या कळत-नकळत तुमच्या विचारसरणीत भिनत जातात.
आणि मुळात मला कारणच कळत नाही. मराठी ही इतकी विचार करायलाही नालायक भाषा आहे का?
३] (पुन्हा एकदा) राग मानू नकोस, पण इंग्रजीतून विचार करण्याने असेल किंवा आणखी कशाने, पण तुझे मराठी बरेच बिघडले आहे. उदा. <<मला अजूनही असे मनापासून वाटते की तु इंग्रजीतील काही उत्कृष्ट कलाकृतींना अनुभवाव्यात.>> ही मराठी वाक्यरचना नाही रे.. तुम्ही दोन्ही भाषांमध्ये तितकेच पारंगत होण्यासाठी अफाट क्षमता लागते. ती नसली की 'एक ना धड भाराभर चिंध्या' होतात. अशी त्रिशंकू अवस्था होणे मला मुळीच आवडणार नाही!
४] एखादी कलाकृती ग्लोबल असण्याचा मुद्दा तुला नीटसा कळला नाही बहुधा.. "लाईफ इज ब्यूटिफुल" मीही पाहिलाय. तो आवडण्यासाठी नाझी जर्मनीचे सर्व संदर्भ माहित असावे लागत नाहीत, हे मी अंशतः मान्य करतो. (पूर्ण मान्य करण्यासाठी हे संदर्भ मुळीच ठाऊक नसलेल्या कोणालातरी तो चित्रपट दाखवून त्याचे मत घ्यायला हवे. कारण तुला-मला त्यातले बरेच संदर्भ माहित आहेत.) पण ते सर्व संदर्भ माहित असलेल्या व्यक्तीला तो जितका भिडेल, तितका ते माहित नसलेल्या व्यक्तीला भिडेल असे मला नाही वाटत. किंवा पुन्हा 'लगान'चे उदाहरण घे. आमच्या इथे आलेल्या एका स्विस विद्यार्थ्याला 'लगान' अत्यंत आवडतो. पण तो मला जितका भिडतो तितका त्याला भिडूच नाही शकत. मी कळण्या-आवडण्यापलिकडच्या भिडण्या-जाणवण्याविषयी बोलतोय!
५] अनुवादाचा मुद्दा तर अजूनच वेगळा आहे. टागोरांच्या 'गीतांजली'चे (खुद्द टागोरांनी केलेले!!!) इंग्रजी भाषांतर वाचून समाधान न झाल्याने पु.ल. बंगाली भाषा शिकायला प्रवृत्त झाले होते! भाषांतर हा मूळ कलाकृतीकडे घेऊन जाणारा दुवा ठरू शकेल, मूळ कलाकृतीला पर्याय कधीच ठरू शकणार नाही. आणि काही साहित्य, उदा. पु.लं.चे विनोदी लिखाण हे मुळात जराही अनुवादित होऊच शकत नाही असे मला वाटते. कल्पना करून बघः
And then Shankarya asked (with all his innocence), "Father, Father, (आता इथे त्या मराठीत येणार्‍या "फादर, फादर"ची गंमत गेली!) sometimes you call me 'pig'! Is this it?"
६] मला खरंच असं नाही वाटत, की इंग्रजीत मराठीइतकाच रुळणे आणि इंग्रजीतील उत्कृष्ट कलाकृतींचा आस्वाद घेणं ही माझी जबाबदारी वगैरे आहे. तसं असेल तर आपण बंगाली शिकून बंगालीतल्या किंवा मला आधीच येत असलेल्या हिंदीतल्या उत्तमोत्तम कलाकृतींचा आस्वाद का घेऊ नये? इंग्रजीत असं काय जगावेगळं वैशिष्ट्य आहे की मी सांस्कृतिकदृष्ट्या इतकी दूर असूनही तिला प्राधान्य द्यावं? कुतुहल म्हणून विचारतो, तू स्वतः मुन्शी प्रेमचंद किंवा मैथिलीशरण गुप्त वाचलेत/वाचतोस का? असल्यास 'चांगलं साहित्य' म्हणून आपली त्याबद्दल चर्चा का नाही होत? की त्यात 'मूलभूत मानवी मूल्ये' वगैरे नाहीत?
तेव्हा माझी दुहेरी कातर होणार नाही ही माझी खात्रीच आहे. पण मला ज्यातील सारे संदर्भ माहित आहेत असे व्यंकटेश माडगूळकर, द.मा.मिरासदार, श्री.ना.पेंडसे, गो.नी.दांडेकर, पु.ल., जी.ए. इ.इ. यांचे सारे लिखाण वाचून होईपर्यंत दूर जायची गरज काय, नाही का?
उत्तराच्या प्रतीक्षेत..

सत्यजित:22 December, 2008 - 15:12
१] इंग्रजीतून विचार करणं ही प्रक्रिया माझ्या बाबतीत तरी ठरवून झालेली किंवा मुद्दामहून घडवून आणलेली नाही.मला जेंव्हा इंग्रजीतुन विचार मांडायचे असतात तेंव्हा मी माझ्या मनातील मराठी वाक्य इंग्रजीत भाषांतर करुन बोलत वा लिहीत नाही ते इंग्रजीतच असते.ही एक जवळजवळ प्रतिक्षीप्त क्रिया असते त्यामुळे याची जबाबदारी कशी घ्यायची ते समजत नाही.मराठी विचार करायला नालायक भाषा आहे असे तर मला मुळीच म्हणायचे नाही.
२]माझे मराठी लिखाण बिघडले आहे असे मला खरचं वाटत नाही, कीबोर्ड वापरायची सवय नसल्याने काही चुका होतात पण व्याकरणदृष्ट्या त्यात फार काही गल्लत नसावी.
३]ग्लोबल असण्याचा मुद्दा मला अजुनही मान्य नाही.'लाईफ इज ब्युटीफुल' पहाच असे मला माझ्या आईने सुचवले नाझी जर्मनी तर सोडच पण तिचे इंग्रजीचे आकलनही फार चांगले नाही पण तिला त्यातल्या बापाची तगमग एकदम भिडली हे मी स्वतः पाहिलेले आहे.आणी माझाही मुद्दा भिडण्याचाच आहे केवळ आवडण्याचा नाही.
४]भाषांतर मुळ कलाकृतीला पर्याय असुच शकत नाही हे मान्यच.
५]>>इंग्रजीत असं काय जगावेगळं वैशिष्ट्य आहे की मी सांस्कृतिकदृष्ट्या इतकी दूर असूनही तिला प्राधान्य द्यावं?>>
ही वाक्य मला फारचं गोंधळात टाकतायतं.इतर अनेक भाषांप्रमाणे एक असा इंग्रजीचा विचार तु का करत नाहीस? प्राधान्य द्यावं असा माझा मुद्दाच नाही आहे.किंबहुना इंग्रजी ही एक अती महान भाषा आहे म्हणून त्यातले साहित्य वाचलेच पाहिजे असे माझे मत आहे असा तुझा गैरसमज झालेला दिसतो.तुच उदा दिल्याप्रमाणे हिंदी,किंवा बंगाली साहित्याचा जसा आपण आस्वाद घेतला पाहीजे तसाच इंग्रजीचाही घ्यायला काय हरकत आहे? तसे केल्याने दुर वगैरे जायचा प्रश्न येतोच कुठे?
**मी हिंदी साहित्यही भरपुर वाचले आहे,(प्रेमचंदच्या तोडीचा कथालेखक जगात नाही हे माझे प्रामाणीक मत आहे) त्याचबरोबर भाषांतरीत का होईना पण कन्नड,तेलुगू,तमीळ,बंगाली,गुजराती या भारतिय भाषातील साहित्यही बर्याच प्रमाणात वाचले आहे.माझ्या व्यवसायाचा हा एक चांगला भाग आहे भरपुर रिकामा वेळ आणी लायब्ररी कामाच्याच जागी! (अगदी गेल्याच महिन्यात डॉ.धर्मवीर भारतींची 'गुनाहोंका देवता' वाचली,पुन्हा सल्ला तोच-वाचच!)

मंदार:26 December, 2008 - 17:52
शूटमुळे पुन्हा काही दिवस भूमिगत झाल्याबद्दल क्षमस्व!
तर पुन्हा मूळ मुद्याकडे येतो..
१] तू ठरवून किंवा मुद्दामहून इंग्रजीत बोलतोस असं मला म्हणायचं नाहीये. पण त्याने काहीच फरक पडत नाही. तुला जे विचार इंग्रजीतून मांडायचे असतात ते तू इंग्रजीतच बोलतोस, मान्य! पण तुला खूपसे विचार इंग्रजीतूनच मांडावेसे वाटतात, हा विचार करण्याचा मुद्दा आहे असं मला वाटतं. असं का व्हावं, याचा कधी विचार केलायस का? मी खूपदा केलाय आणि मला काहीही उत्तर न सापडता अधिकाधिक वाईट वाटत गेलंय.. मीही अनेकदा बोलण्याच्या भाषेतच विचार करतो; प्रतिक्षिप्त क्रियेने हिंदी बोलताना हिंदीतून किंवा इंग्रजी बोलताना इंग्रजीतून विचार केला जातो. पण मराठी माणसाशी मराठीतून बोलताना इंग्रजी भाषेचा किंवा विचारांचा इतका आधार मला घ्यावा लागत नाही, घ्यावासा वाटत नाही. स्वतःसाठी वाचन आणि विचार करताना माझी विचारांची भाषा नेहमी मराठीच असते. आणि (परप्रांतातच वाढलेल्या व्यक्तीसारखी अपवादात्मक परिस्थिती सोडल्यास) तशीच ती असणे नैसर्गिक आहे असे मला वाटते. एवढाच माझा मुद्दा आहे..
२] तुझे मराठी लिखाण बिघडले आहे असे तुला खरंच वाटत नसेल तर मला आनंदच आहे. पण तुझे नसेल तरी आपल्या पिढीतील अनेकांचे असे झाले आहे, हे तरी मान्य करशील? हिंदी-इंग्रजीच्या अतिरेकी (व अनेकदा अनावश्यक प्रमाणात) वापरामुळे मराठी बिघडणे, हे मला मुळीच पटत नाही. एकतर माझ्या मते माणसाला एका आयुष्यात दोन-तीन भाषा व्यवस्थित बोलता-लिहिता येण्याएवढी बुध्दी देवाने दिली आहे, त्यामुळे हिंदी शिकल्याने मराठी विसरली हे पटण्यासारखे नाही. आणि ज्यांना ते जमत नसेल, त्यांनी इतर भाषांच्या फंदातच न पडता एका भाषेत तरी नीट बोलावे असे मला प्रामाणिकपणे वाटते!
३] कला आणि कलाकृती या शेवटी वैयक्तिक अनुभवाच्या गोष्टी आहेत. त्यामुळे एखादी कलाकृती ग्लोबल असण्याच्या मुद्यावर आपले मतभेद आहेत असं मानून सोडून देऊ.. फक्त मला सांग, 'लगान'सारखा सिनेमा किंवा पु.लं.चं लिखाण तू 'ग्लोबल' मानतोस की नाही? मी असेच काही कलाकृतींचे 'ग्लोबल' कौतुक ऐकले होते. पण त्यापैकी 'शिंडलर्स लिस्ट' व ऍटनबरोचा 'गांधी' हे मला तितके काही ह्रदयस्पर्शी वगैरे वाटले नाहीत. आवडले, पण भिडले नाहीत. आता याला काहीच उपाय नाही ना..
४] भाषांतराच्या एका मुद्यावर तरी आपले एकमत झाले!
५] >>इतर अनेक भाषांप्रमाणे एक असा इंग्रजीचा विचार तू का करत नाहीस?
किंबहुना मी इतर अनेक भाषांप्रमाणे एक असाच इंग्रजीचा विचार करतो आहे. (आणि माझ्यासाठी तो क्रम मराठी, हिंदी, इतर भारतीय भाषा, इंग्रजी, इतर परकीय भाषा असा आहे.) त्यामुळे अनेकजण अचानक इतक्या प्रमाणात इंग्रजीचा वापर का करताहेत ते मला कळेनासं झालंय. तू इतकं हिंदी साहित्य वाचलंयस, पण आजवर कधी आपली त्याबद्दल चर्चा झाली नाही. का बरं? आता मीच विषय काढला म्हणून तू डॉ. धर्मवीर भारतींची 'गुनाहोंका देवता' वाचच असे म्हणालास! स्वतःहून नाही.. असे का? चांगल्या साहित्याबद्दलच्या चर्चेत "द अल्केमिस्ट" पासून "द काईट रनर" पर्यंत तीच ठराविक नावं ऐकून मला कंटाळा आलाय! ही पुस्तकं चांगली असतीलही. पण म्हणून मी ती वाचलीच पाहिजेत आणि तीच वाचली पाहिजेत असे मला खरंच वाटत नाही.
६] मी ज्या "दूर जाण्या"बद्दल बोलतोय ते सांस्कृतिक दूर जाणे. मी मागे तुला काही उदाहरणे दिल्याप्रमाणे मला इंग्रजी ही अतिशय परकी भाषा वाटते आणि तिला आपली मानणे ही माझी जबाबदारी वगैरे आहे हे मला मुळीच मान्य नाही. तुझ्या बाबतीत ते काही कारणाने घडले असेल, आणि माझ्या बाबतीत घडले नसेल, तर काही हरकत नाही. दोघे आपापल्या जागी बरोबर आहोत, असेच मला वाटते. मात्र सतत इंग्रजीत बोलत राहूनही आपली (मराठी म्हण किंवा भारतीय म्हण) संस्कृती जपता येते, हे मला बिलकुल पटत नाही! भाषा ही आपल्यासोबत विचार आणि संस्कृती घेऊनच येते..
७] तुझं एकंदरच वाचन अफाट असेल आणि त्यात तू भरपूर मराठी, अनेक हिंदी व असंख्य इंग्रजी (शिवाय इतर भाषांतरित) पुस्तकं वाचत असशील तर ती खूपच चांगली गोष्ट आहे. (खरंतर या गोष्टीसाठी मला तुझा हेवाही वाटतो! पुढेमागे मीही मास्तर व्हायचा विचार करतोच आहे..) पण आपल्या पिढीत जिथे अनेकांचं वाचनच नगण्य आहे, त्यांनी नुसती काही इंग्रजी पुस्तकं वाचत राहणं मला बावळटपणाचं वाटतं! आणि त्याचे दुष्परिणाम आता नुकतेच कुठे दिसू लागलेत, आणखी काही वर्षांनी जेव्हा ते सर्वांच्या लक्षात येऊ लागेल तोवर खूप उशीर झालेला असेल.. शिवाय तेव्हा त्यावर काही उपायही नसेल! कारण परकीयांच्या विरुध्द आंदोलन तरी करता येते, आपल्याच लोकांशी लढणे खूपच कठीण असते!
बाकी काय खबरबात?

सत्यजित:27 December, 2008 - 10:17
याsss!
मी आजच तुझ्या नावाने बोंबाबोंब सुरु करणार होतो तेवढ्यात आलास!
१](ही पॉईंट्समधे लिहायची सवयही टिपीकल मास्तरपणाची! असो).इंग्रजीतच का विचार केला जातो,हा खरच विचार करण्याचा मुद्दा आहे.मजेची गोष्ट म्हणजे माझ्या शाळेत जेवढे मराठी लोक आहेत ते मात्र न चुकता एकमेकाशी मराठीतूनच बोलतात.महाराष्ट्रात आल्यावरच आपल्याला काय होते?
२] 'लगान'सारखा सिनेमा किंवा पु.लं.चं लिखाण मी नक्कीच ग्लोबल' मानतो. 'शिंडलर्स लिस्ट' व ऍटनबरोचा 'गांधी' मलाही फार भावले नाहीत.विषेशतः गांधी' तर मला 'अमेरिकन पत्रकाराच्या नजरेतुन गांधी'असा वाटला.
३]<<पण आजवर कधी आपली त्याबद्दल चर्चा झाली नाही. का बरं?>
पोस्ट लिहून झाल्यावर मलाही हेच वाटले,त्याबाबतीत इंग्रजीला झुकते माप दिले जाते हे खरेच.तरीही पुन्हा सांगतो 'द अल्केमीस्ट' सारखे पुस्तक न वाचण्याची चूक करु नकोस.हेच फक्त वाच असे मी कधीच म्हणणार नाही,पण हे वाचच असं नक्कीच म्हणेन.
५]प्रत्येक भाषा आपल्याबरोबर तिची संस्कृती घेउन येते हे जरी खरे असले तरी पुन्हा 'द अल्केमीस्ट' सारखी पुस्तके केवळ इंग्रजी आहेत म्हणून ती पाश्चात्य संस्कृतीबद्दल आहेत असे म्हणणे वेडगळपणाचे ठरेल.त्यातला मूळ विचार हा पुर्णपणे 'ओरिएंटल' आहे.तसेच साहित्य म्हणुन आयन रँडचे लिखाण कितिही सुंदर असले तरि ते तत्वञान म्हणून मला भावणे शक्य नाही कारण ते अत्यंत अभारतीय आहे.
६]त्यांनी नुसती काही इंग्रजी पुस्तकं वाचत राहणं मला बावळटपणाचं वाटतं! >>पुर्ण अनुमोदन!

मंदार:29 December, 2008 - 19:48
रामराम..
मास्तर होण्याआधीच मला मास्तरपणाच्या सवयी लागल्या म्हण की! चला, चांगली लक्षणं आहेत..
एक गोष्ट तुझ्या लक्षात आलीय का? एकएक करत तू हळूहळू माझ्या जवळजवळ सर्व मुद्यांशी सहमत झालायस..
१] >>इंग्रजीतच का विचार केला जातो,हा खरंच विचार करण्याचा मुद्दा आहे.
पटतंय ना तुला? मग खरंच विचार कर. इतर अनेक लोक करतात तसे "आता सवय लागलीय, काय करणार" वगैरे तकलादू युक्तिवाद करू नकोस. मुंबई-पुणे याला बॉम्बे-पूना म्हणणार्‍यांना मी नेहमी थांबवून दुरुस्ती करायला लावतो. त्यावर एक मित्र म्हणाला, "यार, अब आदतसी पड़ गयी है, क्या करें?" मी म्हटलं, "देख, आदतें तो कुत्ते-बिल्लियों को भी होती हैं | भगवानने हमें इन्सान बनाया है तो सही-ग़लत कुछ तो सोचना चाहिये! या सिर्फ आदतोंसे ही जीते रहोगे?"
>>महाराष्ट्रात आल्यावरच आपल्याला काय होते?
तूच विचार कर काय होते त्याचा. दुसर्‍या कोणी कितीही सांगितलं तरी स्वत:ला पटेस्तोवर काहीच उपयोग नसतो!
२] >>'लगान'सारखा सिनेमा किंवा पु.लं.चं लिखाण मी नक्कीच ग्लोबल मानतो.
पण मी नाही मानत. मध्यमवर्गीय मराठी संस्कृतीचा गंधही नसलेल्या लोकांना (म्हणजे अपवादात्मक मोजके लोक सोडून एखाद्या संपूर्ण समाजाला) जर पु.लं.चे विनोदी लिखाण खूप आवडते असे मला कोणी सांगितले तर त्यावर काय प्रतिक्रिया द्यायची हे मला कळणारच नाही. सध्या परदेशात (यशराज व शाहरुखच्या कृपेने) हिंदी सिनेमाचे जे खूळ पसरले आहे, ते रसिकतेच्या पातळीवर नसून 'नॉव्हेल्टी', 'फॅड' आणि 'उत्तम मार्केटिंगचा परिणाम' असे मला वाटते. त्यापलीकडचं 'ग्लोबल अपील' जगात फारच कमी कलाकृतींमध्ये असतं. पण ते नसल्याने एखाद्या अभिजात कलाकृतीचा दर्जा कमी होतो असं मला नाही वाटत.
'क्रिकेट आवडत नाही' या कारणास्तव माझ्या काही मित्रांना 'लगान' आवडला नव्हता! तेव्हा या विषयावर अधिक काय बोलू?
३] >>इंग्रजीला झुकते माप दिले जाते हे खरेच.
याच झुकलेल्या मापाचा मला अत्यंत कंटाळा आणि मनस्वी चीड आली आहे! ती आपल्यावर जुलूम करणार्‍या अमानुष राज्यकर्त्यांची, जुलमानेच जगावर लादली गेलेली भाषा आहे, हा इतिहास सगळे विसरले असतील तरी मी नाही विसरू शकत! आणि त्याचा वैयक्तिक पातळीवर निषेध म्हणून मी इंग्रजी वाचन व सिनेमे बंद केले आहेत. पुन्हा मनापासून इच्छा होईस्तोवर मी स्वतःवर मुळीच जबरदस्ती करणार नाही! आणि माझ्यापुढे मराठीत आरती प्रभू, भा.रा.तांबे, ग्रेसांच्या कविता, जी.ए., पु.ल., माडगूळकरांची पुस्तके आणि हिंदीत प्रेमचंद, मैथिलीशरण गुप्त, बंगालीत सत्यजित रेंच्या कथा, टागोरांचे साहित्य, उर्दू गज़ल इ.इ. इतका मी न वाचलेल्या असंख्य पुस्तकांचा खजिना पडलेला असताना मला नाही वाटत माझे काही नुकसान होणार आहे! तेव्हा तुला उगाच 'द अल्केमिस्ट' वाचण्याचे खोटे आश्वासन देत नाही.. हिंदीतली काही पुस्तके असतील तर मात्र अवश्य सुचव.
४] >>'द अल्केमीस्ट' सारखी पुस्तके केवळ इंग्रजी आहेत म्हणून ती पाश्चात्य संस्कृतीबद्दल आहेत असे म्हणणे वेडगळपणाचे ठरेल. त्यातला मूळ विचार हा पुर्णपणे 'ओरिएंटल' आहे.
प्रश्न तो नाहीये रे.. मला त्या लिपीचाच कंटाळा आलाय त्याला काय करू? या बाबतीत मी आपल्या इतर उदार मनाच्या भारतीय बांधवांसारखा पटकन ऍडजस्ट होणारा नाहिये असे समज हवं तर! ('मायबोली'चा मला शोध लागेपर्यंत मी नेट-मेल खूपच कमी वापरायचो आणि ऑर्कुट इ. वरही मी नाही! कारण पुन्हा तेच!!) आणि भाषांतरात मजा नाही हे तर आपण पूर्वीच बोललोय.. तेव्हा जाऊ दे!
मी काही "१००% मराठीतच बोला" वगैरे अव्यवहार्य हट्ट धरत नाही. संप्रेषण, उद्वाहन, अवगाहन इ. न कळणारे शब्द वापरण्याचा अट्टाहास नाही! पण तरीही ७०-८०% मराठी वापरणे मनात आणले तर कठीण नक्कीच नसते!
५] आजवर या विषयाबद्दलच्या माझ्या तीव्र भावना बाजूला ठेवून मी लिहीत होतो. पण आज वाटले, हेही एकदा होऊनच जाऊ दे! लिहिण्याच्या भरात काही कमीजास्त झाले असल्यास समजून घेणे..
उत्तराच्या प्रतीक्षेत..

सत्यजित:30 December, 2008 - 09:35
१] मुळ मुद्दा इंग्रजी वाचनाची गरज आहे की नाही हा आहे आणी त्यावर आपले एकमत होईल असे वाटत नाही.
भाषांतरीत पुस्तके,इंग्रजी सिनेमा,इंग्रजी बोलणे हे सर्वच विषय वेगवेगळे आहेत आणी त्याची सरमिसळ झाली आहे असे वाटतयं.
२] इंग्रजीत विचार करणे चूक आहे असे मी म्हणतचं नाहीये,या मागची मानसशास्त्रीय कारणे शोधायला पाहिजे एवढाच माझा मुद्दा आहे.
3]<<ती आपल्यावर जुलूम करणार्‍या अमानुष राज्यकर्त्यांची, जुलमानेच जगावर लादली गेलेली भाषा आहे,>>
अत्यंत बालीश आणी तथ्य नसलेले वाक्य.आपण इंग्रजी शिकावे ही त्यांची गरज होती,त्याशिवाय इथे राज्य करणे अवघड होते,आणी हे करताना कोठेही जुलूम झाल्याचा पुरावा नाही.इतर साम्राज्यवादी देश जसे की फ्रान्स,स्पेन इ.नी त्यांच्या वसाहतीतील,धर्म,संस्कृती,परंपरा नष्ट करुन टाकली तसे इंग्रजांनी कधीच केले नाही.इंग्रजी वाचताना ती तथाकथित अमानुष राज्यकर्त्यांची भाषा आहे असले विचार माझ्या मनात येत नाहीत.हेच सुत्र वापरायचे तर हिंदी,उर्दु देखील तसल्याच राज्यकर्त्यांची भाषा आहे,तीही नका वापरु.
४] माझ्या दृष्टीने प्रश्न केवळ मांडलेल्या विचारांचा आहे ते कोणत्या भाषेत आहेत ही बाब माझ्यासाठी दुय्यम आहे,त्यामुळे मॅक्झीम गॉर्की,जाँ पॉल सार्त्र यांचे साहित्य कोणत्याही भाषेत असले तरी ते मला तितकेच प्रिय आहे.यात कोणताही आपपरभाव माझ्या मनात नाही.आता तुला त्या लिपीचाच कंटाळा आला असेल तर मुद्दाच संपला.

मंदार:3 January, 2009 - 21:16
हं... तर नवीन वर्ष तुलाही सुखाचे, आनंदाचे आणि असमाधानाचे जावो!
पुन्हा एकदा मुद्याकडे..
१] >>मूळ मुद्दा इंग्रजी वाचनाची गरज आहे की नाही हा आहे आणि त्यावर आपले एकमत होईल असे वाटत नाही.
खरं आहे! मलाही नाही वाटत. आपली एकंदर जडणघडण व परिस्थिती खूपच वेगळी असल्याने हा फरक राहणारच. We can simply agree to disagree on this one.
भाषांतरित पुस्तके,इंग्रजी सिनेमा,इंग्रजी बोलणे हे सर्व त्या ओघात आलेले विषय आहेत. पण त्यानिमित्ताने आपल्याला एकमेकांची मते तरी कळली. इंग्रजीत एक वाक्य आहे ना: You don't know someone, unless you fight with him!
२] >>इंग्रजीत विचार करणे चूक आहे असे मी म्हणतचं नाही.
पण मी म्हणतोय ना, की मराठी लोकांना दैनंदिन आयुष्यात इंग्रजी 'अत्यावश्यक' वाटणे किंवा इंग्रजीशिवाय पान न हलणे मला चुकीचे वाटते. आणि त्यावर ज्याने-त्याने विचार करून आपापल्यापुरती 'मानसशास्त्रीय कारणे' शोधली पाहिजेत. कारण ती कारणे शेवटी 'आपल्या' मनाच्या समाधानासाठीच असतात. खरी कारणे सापडलीच आणि त्यावर उपाय करता आलाच तर फारच उत्तम!
३] >>आपण इंग्रजी शिकावे ही त्यांची गरज होती.
हो, आपण या 'कारकून बनवणार्‍या' शिक्षणपध्दतीत शिकावे व त्यातच खितपत पडावे हीसुध्दा त्यांचीच गरज होती. आणि आपण 'त्यांच्या' गरजा नेहमीच (पडतील ते कष्ट सोसून) पुरवत आलो आहोत, प्रसंगी आपल्या गोष्टींचा बळी देऊनही! (शेवटी "अतिथी देवो भव" बाबा!)
>>हे करताना कोठेही जुलूम झाल्याचा पुरावा नाही.
इंग्रज जुलमी नव्हते, हे मी नवीनच ऐकले! ईस्ट इंडिया कंपनीने कुठली निवडणूक जिंकून भारतावर राज्य केल्याचा इतिहास माझ्या तरी ऐकण्यात नाही!! आता मुघलांपेक्षा इंग्रज अधिक प्रेमळ होते का, हा संशोधनाचा विषय आहे. पण सार्‍या जगावर राज्य करण्याची साम्राज्यवादी भूक इंग्रजांएवढी कुणालाही नव्हती हा इतिहास आहे! (आता त्यालाच 'बलाढ्य क्षमता' वगैरे म्हणून गौरवायचे असेल तर प्रश्नच संपला!)
>>इतर साम्राज्यवादी देश जसे की फ्रान्स,स्पेन इ.नी त्यांच्या वसाहतीतील,धर्म,संस्कृती,परंपरा नष्ट करुन टाकली तसे इंग्रजांनी कधीच केले नाही.
No comments!
>>हेच सुत्र वापरायचे तर हिंदी,उर्दु देखील तसल्याच राज्यकर्त्यांची भाषा आहे,तीही नका वापरु.
हिंदी ही माझ्या माहितीप्रमाणे संपूर्णपणे भारतात जन्मलेली भाषा आहे. अरेबिक लिपी वापरणारी उर्दू आणि भारतीय देवनागरी लिपी यातून बनलेली ती एक संकरित भाषा आहे. शिवाय ती (घोषित नसेल तरी वापरातील) राष्ट्रभाषा आहे.
मी उर्दू 'वापरत' नाही.उर्दूमध्ये मी साधारण तेवढेच वाचतो जेवढे इंग्रजीत वाचतो! कारण दोन्हीही माझ्यासाठी 'दुसर्‍या' भाषा आहेत. (खरंतर 'तिसर्‍या!) आता त्यापैकी मला इंग्रजीपेक्षा उर्दूची मानसिकता जवळची वाटते(उदा. तू-तुम-आप च्या मूलभूत संकल्पना इ.).. पण तो भाग वेगळा!
४] >>त्यामुळे मॅक्झीम गॉर्की,जाँ पॉल सार्त्र यांचे साहित्य कोणत्याही भाषेत असले तरी ते मला तितकेच प्रिय आहे.यात कोणताही आपपरभाव माझ्या मनात नाही.
आता शेवटचा प्रयत्न म्हणून एकच उदाहरण देतो. व्यंकटेश माडगूळकरांची 'माणदेशी माणसे' ही माझे बालपण त्या भागात गेलेले असल्याने मला फारच जास्त जवळची वाटतात. ती 'ग्लोबल कलाकृती' आहे का हे मला माहिती नाही, कारण माझ्या मते असे काही नसतेच! ती 'ग्लोबल' असून 'जगातील प्रत्येकाला' आवडली पाहिजेत असा माझा हट्ट किंवा अपेक्षा नाही! पण त्यातून मला जितका आनंद मिळतो तेवढा इतर कलाकृतींतून क्वचितच मिळतो हे सत्य आहे!
५] >>आता तुला त्या लिपीचाच कंटाळा आला असेल तर मुद्दाच संपला.
हं, हे मात्र खरं आहे ते तुला सांगून टाकलं. कलेच्या क्षेत्रात तरी स्वतःवर जबरदस्ती मला पटत नाही म्हणून..

सत्यजित:5 January, 2009 - 16:05
You don't know someone, unless you fight with him! हे लईच आवडलं!
१]>इंग्रज जुलमी नव्हते, हे मी नवीनच ऐकले!> इंग्रजांनी भाषाप्रसार करताना जुलुम केल्याचा पुरावा नाही असे मी म्हणतो आहे,ते जुलमी नव्हते असे नव्हे.
२]इंग्रजी शिक्षणाने कारकुनच तयार व्हावेत ही त्यांची इच्छा होती,पण तेवढेच न होता आपल्या लोकांनी बाकीच्याही गोष्टी वाचल्या म्हणूनच त्यांना साम्राज्यवादाचे खरे स्वरुप कळले व चळवळ उभी राहिली.हे ही इंग्रजी शिक्षणाचेच फायदे आहेत.
३] नो कॉमेंट्स का ते कळले नाही.भारत देश म्हणून आपल्याला एक ओळख इंग्रजांमुळेच मिळाली असे माझे मत आहे व तसा पुरावाही आहे.आपण विसरुन गेलेल्या कितितरी गोष्टी जसे,सम्राट अशोक,अजंठा-वेरुळ इ. त्यांनीच शोधली.आता हे करण्यात कोणताही आर्थीक फायदा असण्याची शक्यताच नव्हती.बॉटनीकल सर्वे, झुलॉजीकल सर्वे, हॉपकीन इंस्टीट्युट इ. संस्था त्यांनी केवळ ञानप्राप्तीसाठी काढल्या.ह्या गोष्टी इतर कुठल्याही युरोपियन सत्तेने कधीच केल्या नाहीत.
४]'जगातील प्रत्येकाला' आवडली पाहिजेत असा माझा हट्ट किंवा अपेक्षा नाही! >>माझाही नाही. मी ही एक शेवटचे उदाहरण देतो- जेंव्हा मी सार्त्रचे 'माझे बालपण' हे पुस्तक पहिल्यांदा वाचले,तेंव्हा मी त्याच्याशी तात्काळ आयडेंटीफाय होउ शकलो.आता त्याचा देश-काळ ह्या सर्वच गोष्टी पुर्ण वेगळ्या असुनही असे झाले.किंवा मी जेंव्हा गॉर्कीच्या गोष्टि वाचतो तेंव्हा मला माझे माढा गाव,तिथले लोक,त्यांचे प्रश्न आणी गॉर्कीची पात्रे यात काही फरक वाटत नाही(जागा आणी व्यक्तींची नावे एवढा फरक सोडल्यास).अर्थात त्यासाठी लेखक त्या ताकदीचा पाहिजे.

सत्यजित:10 January, 2009 - 09:00
काही पश्चातबुद्धी-
१] व्यंकटेश माडगूळकर किंवा पुलं ग्लोबल आहेत की नाहीत हे आपण कसे ठरवणार? दुसरी;भारतीय वा परकीय भाषा असलेल्या माणसाला ते किती भावतात यावरुन ते ठरवावे लागेल.
२] सर्व चर्चेचा विचार करीत असताना मला अचानक माझेच सिग्नेचर आठवले 'द मोअर यु राईट पर्सनल द मोअर इट बिकम्स युनिवर्सल'. या सूत्रावर माझा पुर्ण विश्वास आहे,त्यामुळे एखादी रचना ग्लोबल होऊ शकते हे मला पटते.या द्रुष्टीने तुला आवडलेल्या साहित्याचा, ग्रेट मानल्या गेलेल्या कलाकृतींचा विचार करुन बघ.

मंदार:15 January, 2009 - 20:46
सॉरी सॉरी सॉरी! (त्रिवार सॉरी!!!)
नेहमीप्रमाणे पुन्हा एकदा हरवल्याबद्दल क्षमस्व... यावेळी शूटसोबत आणखीही अनेक उद्योग कारणीभूत झाले. पण आता तुला सवय झाली असेल माझ्या अशा Intermittent communicationची!
तर पुन्हा एकदा चर्चेकडे..
१] >>इंग्रजांनी भाषाप्रसार करताना जुलुम केल्याचा पुरावा नाही.
मित्रा, इंग्रजांनी जुलमानेच जगाच्या बर्‍याच भागावर सत्ता प्रस्थापित केली आणि बहुतांश प्रदेशावर असलेल्या त्यांच्या सत्तेमुळेच इंग्रजीचा इतका प्रसार झाला ना? म्हणजे भाषाप्रसार हा जुलमाचाच परिणाम आहे ना! असे तर नाही झाले ना, की 'आंतरराष्ट्रीय भाषा कुठली ठरवावी' यासाठी लोकशाही मार्गाने मतदान घेतले गेले किंवा भाषांचा अभ्यास करून 'सर्वोत्तम भाषा' म्हणून इंग्रजीची आंतरराष्ट्रीय भाषा म्हणून निवड झाली! (तसा अभ्यास केला तर इंग्रजीची निवड खात्रीने होणार नाही! अर्थात हे माझे वैयक्तिक मत आहे.)
२] इंग्रजी भाषा ही तिच्या मूळ प्रदेश व संस्कृतीत अगदी उत्तम असेल. पण मला इथे माझ्या आयुष्यात वापरताना ती अत्यंत तोकडी वाटते. ज्या भाषेत अंकल, आंटी व कझिन यापलीकडे नातीच नाहीत, ती भाषा मला पुरतच नाही! कारण चुलतबहीण, आतेभाऊ, मावसभाऊ या संदर्भांशिवाय माझी वाक्यंच पूर्ण होत नाहीत. इतके नात्यांचे गुंते किंवा मागे मी म्हटल्याप्रमाणे 'तू-तुम्ही-आपण' हे संबोधनांचे प्रकार या माझ्या दैनंदिन गरजा आहेत, ज्या इंग्रजीतून भागत नाहीत. असे इतरही असंख्य मुद्दे आहेत. तेव्हा उगाच तडजोडी करून इंग्रजी वापरण्याचा अट्टाहास मला कळत नाही.
३] >>हे ही इंग्रजी शिक्षणाचेच फायदे आहेत.
हे शिक्षणाचे फायदे आहेत, 'इंग्रजी शिक्षणाचे' नव्हे! शिवाय खरंतर अशी चळवळ उभी राहण्यासाठी शिक्षणाची नव्हे, संस्कारांची व देशाची अस्मिता जागृत असण्याची गरज असते. शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा लढा दिला, तो इंग्रजी किंवा कसल्याही शिक्षणाचा नव्हे तर जिजाबाईंच्या संस्कारांचा व आत धगधगणार्‍या अस्मितेचा परिपाक होता! ती अस्मिता नसेल तर शिक्षणाचा उपयोग केवळ ज्यांनी देशाचे वाटोळे केले त्यांचेच गुणगान करायला होतो.. तेव्हा इंग्रजांच्या येण्याने झालेले "फायदे" हे केवळ 'बाय-प्रॉडक्टस' असून तो इंग्रजांचा "उद्देश" मुळीच नव्हता हे एकदा समजून घेतले म्हणजे अनेक लोक 'इंग्रज आले नसते तर आपल्या देशाचे केवढे नुकसान झाले असते, त्यांचे आपल्यावर अनंत उपकार आहेत' असा जो सूर लावतात तो किती निरर्थक आहे हे कळेल.
४] >>भारत देश म्हणून आपल्याला एक ओळख इंग्रजांमुळेच मिळाली असे माझे मत आहे व तसा पुरावाही आहे.
थोर तुझे उपकार, इंग्रजा!! अशी तू शोधून शोधून इंग्रजांच्या 'चांगुलपणाच्या' उदाहरणांची यादी केली आहेस, तशीच त्यांच्या अत्याचारांच्या कथांची यादी केली तर ती याच्या दसपट मोठी होईल!! त्यात साम-दाम-दंड-भेद वापरून मिशनर्‍यांनी वर्षानुवर्षे केलेल्या धर्मांतरापासून ते कुठल्याशा खनिजाच्या मोहापायी केरळच्या समुद्रकिनार्‍यावरून जहाजे भरभरून लुटून नेलेल्या वाळूपर्यंत अनेक गोष्टी सांगता येतील. (त्याचेही पुरावे आहेत!!) पण त्यातून सिध्द काय होते? कुठलीही व्यक्ती किंवा समाज हा पूर्णपणे चांगला नसतो किंवा पूर्ण वाईटही नसतो. त्यांच्यापैकी काही चांगल्या लोकांनी काही चांगल्या गोष्टी नक्कीच केल्यात. पण त्या त्यांच्या इतर लोकांनी केलेली पापे धुऊन काढण्यास पुरेशा आहेत असे मला मुळीच वाटत नाही.
आणि मला जपानचे विशेष कौतुक वाटते ते यासाठी की त्यांनी पाश्चात्यांचेच कौतुक करण्यात वेळ व ऊर्जा न घालवता स्वतः स्वतःची प्रगती करून स्वतःची ओळख निर्माण केली. आज ते मोबाईल व कॉम्प्युटरपासून सर्व गोष्टी स्वतःच्या भाषेत बनवून वापरतात, इंग्रजीचे गुणगान करत बसत नाहीत. आपल्याकडच्या सुशिक्षितांना मात्र इंग्रजीचे महत्त्व इतके जास्त पटलेय की सर्वसामान्यांसाठी भारतीय भाषांमध्ये मोबाईल-कॉम्प्युटर असावेत ही नुसती कल्पनाही सुचायला किती वर्षे लागली! अजूनही तिचा प्रसार झालेला नाहीच..
५] >>व्यंकटेश माडगूळकर किंवा पुलं ग्लोबल आहेत की नाहीत हे आपण कसे ठरवणार?
मी टागोरांच्या 'गोरा' कादंबरीचे भाषांतर वाचले. भाषांतराविषयी आपण पूर्वीच बोललोय तेव्हा ते सोडून देऊ.. पण त्यात वर्णन केलेली बंगाली संस्कृती ही मला माहिती होती. कारण बंगाली संस्कृतीबद्दल मला एकंदरच कुतुहल व आपुलकी असल्याने मी प्रत्यक्ष बंगाल भेटीतून तसेच पुस्तके, सिनेमे यातून त्याविषयी बरंच जाणून घेतलंय. पण तेवढी पार्श्वभूमी माहिती असल्याशिवाय ती कादंबरी कळणे व आवडणे अवघड आहे असे मला वाटते.. लेखक कितीही ताकदीचा असला तरीही! जीएंच्या काही कथांमधून दिसणारे मिरज-धारवाड भागातले (महाराष्ट्र-कर्नाटक सीमेजवळच्या भागातले) वातावरण किंवा 'गारंबीचा बापू' किंवा 'शितू'मधले कोकणाचे चित्रण हे ज्याला तो भाग प्रत्यक्ष माहिती आहे त्याला नक्कीच जास्त भिडेल, आपलेसे वाटेल! माझ्या सुदैवाने मला या सर्व ठिकाणी राहायची संधी मिळाल्याने कोकण, माणदेश, मिरज, मराठवाडा हे सर्व प्रदेश व तिथली माणसं मला अतिशय आपलीशी वाटतात. ती किंवा बंगाली साहित्यातील माणसे, घटना जशा आपल्याशा वाटतात तशा मी न पाहिलेल्या प्रदेशातील गोष्टी वाटत नाहीत. आणि मला त्यात काही चूक वाटत नाही! कदाचित हा माझा वैयक्तिक दोष असू शकेल, पण मी वूडहाऊसपासून अनेकांचे साहित्य वाचल्यावर आणि अनेक दिग्गज जागतिक दिग्दर्शकांचे सिनेमे पाहिल्यावर हे मला जाणवलंय. तेव्हा माझ्यापुरतं तरी ते असं आहे.
६] एखादी कलाकृती जगातील सर्वांना कळणं, आवडणं नक्कीच शक्य आहे. (उदा. चार्ली चॅप्लिनचे सिनेमे.)पण एखादी कलाकृती चांगली किंवा अभिजात मानण्यासाठी ती आवश्यक अट आहे असं मला वाटत नाही. किंबहुना अनेक चांगल्या कलाकृती ही अट पाळत नाहीत असे मला वाटते.. 'बटाट्याची चाळ'मधील पु.लं.ची संगीतिका ऐकलीयस ना? ती माझ्या मते जगातील एक सर्वोच्च कलाकृती आहे. आणि ती अत्यंत कल्चर-स्पेसिफिक आहे! जगात इतरत्र असे प्रयोग नक्कीच झाले असतील. पण मला तिच्याएवढा आनंद दुसर्‍या भाषेतील कलाकृती देऊ शकतील असे नाही वाटत, ते लेखक किंवा सादरकर्ते कितीही ताकदीचे असतील तरीही..

सत्यजित:16 January, 2009 - 11:07
नमस्कार,संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा.पाच दिवस सुट्टी होती त्यामुळे द्वारकेला जाउन आलो.
तर पुन्हा मुद्यावर येतो.
१] आपण दोघेही उदाहरणांची फेकाफेक करायला कधीच दमणार नाही.तू आधी म्हणल्याप्रमाणे आपल्या दोघांची जडणघडणच याला कारणीभूत असावी (नाथा कामतासारखे-बाबारे,तुझे जग वेगळे आणी माझे जग वेगळे!!!).तर बाबारे! काहीही करुन (तडजोडी इ.इ.) इंग्रजी वापरच असे मी म्हणत नाहीये.इंग्रजीत काही अतुलनीय साहित्य आहे आणि याबाबत वैयक्तिक मतांतरे बाजूला ठेऊन त्याचा आस्वाद घ्यावा,ते न करुन तू काही 'ग्लोबल' अनुभवांना मुकतो आहेस.मी वाचलेल्या काही जबरदस्त इंग्रजी पुस्तकांची यादी आगाऊपणे देत आहे.यातली कोणती तू वाचली आहेस,त्याबद्दलची मते इ.इ. कळून घ्यायला आवडेल.
frida-paulo kohleo darkaness at noon-Arthur Koestler.
1984-Gorge Orwell to kill a mockingbird- harper lee
Man's Search for Meaning-Viktor Frankl
the metamorphosis-franz kafka
Pavilion of Women,Letter from Peking -pearl buck
Creatures That Once Were Men,Twenty-six Men and a Girl,The Mother ,My Childhood-maxim gorky
the man-Irving Wallace no comebacks-Frederick Forsyth.
The Rainmaker -John Grisham
खालील मुद्दे इंग्रजी वाचनाशी संबंधीत नाहीत,पण कोणतीही गोष्ट 'गप' ऐकून घ्यायची नाही या सोलापूरी बाण्याला जागून लिहीत आहे!
२] शिवाजी महाराजांचे उदा.अस्थानी आहे.इंग्रजी सत्तेविरुद्ध लढण्यासाठी तिचे खरे स्वरुप जाणून घेणे अत्यावश्यक होते कारण भारतीयांनी अशा प्रकारच्या परकीय आक्रमणाला कधी तोंडच दिले नव्हते.त्यांचा मूळ उद्देश आर्थीक शोषण आहे हे कळल्याशिवाय त्यांच्याशी लढणे अवघड होते,आणी हे ञान इंग्रजी शिक्षणानेच झाले.
३] इंग्रजांची सत्ता लोकहितकारी होती असे कोणीही म्हणणार नाही.माझा मुद्दा हा आहे की आपली सत्ता टिकवून ठेवण्यासाठी आवश्यक सुधारणा केल्यावर(रेल्वे,पोस्ट इ.इ.) ह्या देशातल्या लो़कांसाठी अजून काहीही करायची गरज नसताना मी आधी उल्लेख केलेल्या व इतर अनेक सुधारणा त्यांनी केल्या,तू म्हणतोस तसे हे सर्व बाय-प्रॉडक्ट्सच होते,पण इतर कुठल्याही साम्राज्यवादी शक्तीने त्यांच्या वसाहतीत ह्या गोष्टी केल्या नाहीत.धर्मांतराचा मुद्दाही असाच आहे.पुरावे सांगतात की ईस्ट इंडीया कंपनीच्या अधिकार्यांनी देखील मिशनर्यांच्या प्रसाराला विरोधच केला होता,कारण अर्थातच आर्थिक होते,हिंदू धर्माचे प्रेम नव्हे,हे जरी खरे असले तरी याच वृत्तीमुळे स्पॅनीश किंवा डच वसाहतीत जसे मूळ धर्माचे पुर्ण उच्चाटन झाले तसे भारतात शक्य झाले नाही.

मंदार:18 January, 2009 - 19:08
ए... हे चीटिंग आहे!! माझ्या निम्म्या मुद्यांना तू उत्तरंच दिली नाहीयेस, विशेषतः शेवटचे तीन मुद्दे. किंबहुना त्याकडे पूर्ण दुर्लक्ष केलंयस!
असो, मी पुन्हा एकदा सारांश काढायचा प्रयत्न करतो:
१] >> इंग्रजीत काही अतुलनीय साहित्य आहे आणि याबाबत वैयक्तिक मतांतरे बाजूला ठेऊन त्याचा आस्वाद घ्यावा,ते न करुन तू काही 'ग्लोबल' अनुभवांना मुकतो आहेस.
जगातील सर्वच भाषांमध्ये काही अतुलनीय साहित्य आहे. एका आयुष्यात त्यातील जितक्या साहित्याचा आस्वाद घेता येईल, तो घ्यायचा मी नक्कीच प्रयत्न करणार आहे. (आणि त्यासाठी जितक्या भाषा शिकता येतील त्या शिकणारही आहे.) मात्र त्याचा क्रम मी माझ्यापुरता मराठी-हिंदी-बंगाली-इतर भारतीय भाषा-इंग्रजी-इतर परकीय भाषा असा ठरवला आहे.
कारण-
अ) इतर भाषांपेक्षा इंग्रजीला प्राधान्य देण्याचे मला कोणतेही कारण दिसत नाही.
आ) सर्वत्र सतत कराव्या लागणार्‍या (आणि त्यातील अनेक ठिकाणी अनावश्यक असलेल्या) इंग्रजीच्या वापरामुळे मला त्या भाषेचा व लिपीचा कंटाळा आलेला आहे.
इ) वैयक्तिकरीत्या मला इंग्रजी ही अत्यंत तोकडी व सांस्कृतिकदृष्ट्या फार दूरची भाषा वाटते.
तेव्हा अगदीच अपरिहार्य ठिकाणे सोडून इतरत्र, विशेषतः साहित्यासारख्या ऐच्छिक विषयात इंग्रजीला माझ्याकडून प्राधान्य दिले जाणे कठीण आहे. पण मी जर मराठी-हिंदी-बंगालीतील "अतुलनीय साहित्य" वाचत राहिलो (जे रग्गड आहे!) तर मला नाही वाटत मी कशाला मुकतो आहे.. तर मला मराठी, हिंदी (व इतर भारतीय भाषांपैकी तू काही वाचत असशील तर त्या) भाषेतील उत्तमोत्तम पुस्तकांची नावे सुचवशील तर जास्त उपयोग होईल!
ता.क.: "शाळा" वाचतोय, अप्रतिमच आहे! सुचवल्याबद्दल मनापासून धन्यवाद..(बघ, मी ताबडतोब ऐकतो की नाही!)
२] >> त्यांचा मूळ उद्देश आर्थीक शोषण आहे हे कळल्याशिवाय त्यांच्याशी लढणे अवघड होते,आणी हे ञान इंग्रजी शिक्षणानेच झाले.
आता सध्या अमेरिकेचा मूळ उद्देश जगावर वर्चस्व गाजवणे हा असून दहशतवादविरोधी लढा हे नुसते निमित्त आहे, हे कळायला जर कोणाला इंग्रजी शिक्षणाची गरज लागत असेल तर त्यांच्या बुध्दीविषयीच मला शंका येते. शिक्षण सुरुही होण्याअगोदरच्या वयात सावरकरांनी इंग्रजांच्या गुलामीतून देशाला मुक्त करण्याची प्रतिज्ञा केली होती. त्यासाठी लागते ती अस्मिता! शिक्षणामुळे इंग्रजांच्या विरोधातील लढा कदाचित सोपा झाला असेल. पण इंग्रजांनी भारतावर सत्ता गाजवणे अन्याय्य असून त्यांना हाकलून लावले पाहिजे ही भावना मनात यायला शिक्षणाची काय गरज? कित्येक स्वातंत्र्यसैनिक अशिक्षितही होते, कारण शिक्षणाशी देशभक्तीचा संबंध नाही. आणि शिक्षणाने ही अस्मिता जागृत न होता नोकर्‍या पदरात पाडून घेऊन इंग्रजांपुढे लाळघोटेपणा करणार्‍यांची उदाहरणेही कमी नाहीत! तेव्हा मुद्दा अमान्य..
हे म्हणजे "इंग्रजांनी सावरकरांना जहाजात घालून नेले, म्हणूनच सावरकरांना समुद्रात उडी मारून पोहून रेकॉर्डब्रेक अंतर पार करता आले, तेव्हा खरे श्रेय इंग्रजांनाच आहे" असे म्हणण्यासारखे आहे!
३] >> आपली सत्ता टिकवून ठेवण्यासाठी आवश्यक सुधारणा केल्यावर(रेल्वे,पोस्ट इ.इ.) ह्या देशातल्या लो़कांसाठी अजून काहीही करायची गरज नसताना मी आधी उल्लेख केलेल्या व इतर अनेक सुधारणा त्यांनी केल्या.
याचे कारण मी मागे म्हटल्याप्रमाणे कुठलाच समाज पूर्णतः वाईट वा चांगला नसतो. त्यांच्यापैकी काही चांगल्या लोकांनी काही चांगल्या गोष्टी अर्थातच केल्या. मात्र त्यांचे एकूण प्रमाण लक्षात घेता असे चांगले लोक व त्यांनी केलेल्या चांगल्या गोष्टी खूप थोड्या आहेत. तेव्हा त्याचे श्रेय सर्व इंग्रजांना देण्याचे काही कारण नाही. किंवा त्यामुळे त्यांची अपकृत्ये माफ करण्याची तर मुळीच गरज नाही! गोष्टी लक्षात ठेवायच्याच असतील तर दोन्ही बाजू लक्षात ठेवायला हव्यात. और हिसाब मारके टोटल देखेगा तो वो निगेटिव्ह है बॉस!!
४] >> पुरावे सांगतात की ईस्ट इंडीया कंपनीच्या अधिकार्यांनी देखील मिशनर्यांच्या प्रसाराला विरोधच केला होता,कारण अर्थातच आर्थिक होते.
हे "पुरावे" आणि या विरोधामागचे "आर्थिक कारण" याविषयी मला अधिक जाणून घ्यायला आवडेल..

सत्यजित:19 January, 2009 - 15:59
मला वाटते की आपण तेच तेच मुद्दे घेऊन गोलगोल फिरतोयं! त्यामुळे तुझ्या प्रत्येक मुद्याला वेगळे उत्तर देण्याएवजी मी एकच उत्तर दिले होते.
१] साहित्यकृती ग्लोबल असणे हे कशावरुन ठरते यावर आपले विचार फारच भिन्न आहेत.मी ज्या इंग्रजी पुस्तकांची यादी दिली आहे त्यातली बहुतेक सर्व माझ्यामते ग्लोबल आहेत,आणि ती भावण्यासाठी कसल्याही कल्चरल रेफरेन्सची गरज भासत नाही.वुडहाऊस आवडायला जी पार्श्वभूमी लागते ती अट इथे नाही.
२] सर्व लोकांना भावणे हा तर निकष असूच शकत नाही,याबाबत दुमत नाहीच.
३] इंग्रजी वाचन टाळण्याची तुझी कारणे मान्य करुनही मी पुन्हा सांगेन की मी दिलेल्या यादीतील बर्याचशा पुस्तकासारखा अनुभव देणारी पुस्तके,तो विचार; भारतीय भाषात नाही (मी येथे ती जास्त ग्रेट आहेत असे म्हणत नसून त्यातला अनुभव दुसरीकडे नाही असे म्हणतो आहे.)
४] मी पुन्हा स्पष्ट करतो-इंग्रज दयाळू राजे होते असे माझे म्हणणे नाही आहे.मात्र त्यांची तुलना इतर साम्राज्यवादी देशांशी केल्यास ते बरेच चांगले होते असा माझा मुद्दा आहे.
५] सध्याच्या अमेरिकेचे उदाहरण पुन्हा अस्थानीच आहे.१८२० ते १९२० या १०० वर्षातल्या भारताचा विचार केल्यास त्यावेळी या नव्या,आधुनिक सत्ताधार्यांची भुरळ पडणे शक्य होते आणी तसे मोठ्या प्रमाणात झालेही मात्र या जादूतून बाहेर पडून इंग्रजी साम्राज्याचे खरे स्वरुप जाणण्यासाठी आणी देश म्हणून एकत्रितपणे त्यांच्याविरुद्ध लढा उभा राहण्यासाठी इंग्रजी शिक्षणाने उत्प्रेरकाचे काम केले असे माझे मत आहे.आणी ही प्रक्रिया सर्व जगातल्या वसाहतींमधे झालेली दिसते.भारतीय स्वतंत्र्यलढ्यातील जवळजवळ सर्व अग्रणी नेते उच्चशिक्षित होते याचे तू काय कारण देशील?

मंदार:21 January, 2009 - 14:22
खरं आहे! मलाही तेच वाटतंय की आपण त्याच त्याच मुद्यांभोवती प्रदक्षिणा घालतोय.. म्हणजे तुझ्या या पोस्टला उत्तर म्हणून मला माझी मागचीच पोस्ट परत लिहावीशी वाटतेय!
१] तू सांगितलेल्या पुस्तकांना कल्चरल रेफरन्सेसची गरज लागत नसेल, पण कल्चरल रेफरन्सेसनी साहित्य अधिक समृध्द होतं असं मला वाटतं. हे जनरल विधान नाही, पण मला स्वतःला असे रेफरन्सेस असलेलं साहित्य वाचायला अधिक आवडतं. हे रेफरन्सेस माहिती असतील तर फारच मजा येते, अनुभव अधिक सखोल होतो (जसं पु.लं.चं साहित्य ऐकताना-वाचताना होतं, तुम्ही जितके बहुश्रुत असाल तेवढा मिळणारा आनंद जास्त!) आणि ते माहिती नसतील तर उत्सुकतेपोटी मी ते जाणून घ्यायचा प्रयत्न करतो (जसं माझं बंगालीच्या बाबतीत झालं) आणि त्यातून त्या त्या संस्कृतीच्या अधिक खोलात शिरता येतं. आपण मागे बोलल्याप्रमाणे मूलभूत मानवी मूल्यांचा लसावि काढून केलेली कलाकृती कदाचित अधिक लोकांपर्यंत पोचते. पण त्यापलीकडील स्थानिक संदर्भ असलेली कलाकृती मला स्वतःला जास्त भावते.
२] तुझ्या यादीतील पुस्तकांसारखा अनुभव देणारी पुस्तके, तो विचार भारतीय भाषांमध्ये नसेलही. पण मग भारतीय भाषांमधील पुस्तकांसारखा अनुभव, तो विचार अर्थातच त्या पुस्तकांमध्ये नसणार. कोणत्याही साहित्यात असं असूच शकत नाही. तेव्हा मर्यादित वाचन असलेल्या व्यक्तीला निवड ही करावीच लागणार..
>> मी येथे ती जास्त ग्रेट आहेत असे म्हणत नसून त्यातला अनुभव दुसरीकडे नाही असे म्हणतो आहे.अर्थातच! तुला माहिती आहे, तू तसे म्हणशील तर मी आकाशपाताळ एक करीन!
३] >> इंग्रज दयाळू राजे होते असे माझे म्हणणे नाही आहे.मात्र त्यांची तुलना इतर साम्राज्यवादी देशांशी केल्यास ते बरेच चांगले होते असा माझा मुद्दा आहे.
म्हणजे 'दगडापेक्षा वीट मऊ' इतकाच तुझा मुद्दा असेल तर माझे काही म्हणणे नाही. मात्र त्या भरात त्यांचे अवाजवी कौतुक करण्याचे कारण नाही. त्यांच्यापैकी काही मोजक्या चांगल्या लोकांनी काही चांगल्या गोष्टी केल्या, मान्य! मात्र त्यांची साम्राज्यवादी वृत्ती, दडपशाही व हिंसाचाराचा वापर, त्यामुळे झालेले देशाचे नुकसान, त्या जुलमी सत्तेचा परिणाम म्हणून जगभर झालेला इंग्रजीचा प्रसार व त्यांच्या शिक्षणपध्दतीला बळी पडल्याने आजही आपल्या अनेक लोकांच्या मानेवर बसलेले इंग्रज व इंग्रजी प्रेमाचे भूत या गोष्टी सर्वथैव चुकीच्याच आहेत, त्यांचे समर्थन करण्याचे मला कारण दिसत नाही.
४] मागे तू म्हटला होतास, तू केवळ एक भाषा म्हणून इंग्रजीचा विचार का करत नाहीस? तर मग याच न्यायाने आपण फ्रेंच किंवा जर्मन किंवा जपानी किंवा अगदी स्वाहिली भाषा शिकून त्यातील साहित्य का वाचू नये? त्यातही इतर भाषांमध्ये नसलेला विचार मांडणारे, वेगळे अनुभव देणारे साहित्य असेलच की! इंग्रजीचा आपला संबंधच मुळात इंग्रजी सत्तेमुळे आला. तेव्हा तो इतिहास विसरून इंग्रजीचा विचार मला तरी करता येत नाही.
५] >> इंग्रजी साम्राज्याचे खरे स्वरुप जाणण्यासाठी आणी देश म्हणून एकत्रितपणे त्यांच्याविरुद्ध लढा उभा राहण्यासाठी इंग्रजी शिक्षणाने उत्प्रेरकाचे काम केले असे माझे मत आहे.
नक्कीच असू शकेल. खरंतर हे मीच गेल्या पोस्टमध्ये म्हटलंय, की शिक्षणाने इंग्रजांविरुध्दचा लढा सोपा झाला असेल. मात्र उत्प्रेरकाला मूळ घटकाइतके (पक्षी : अस्मिता, चाड) महत्त्व व श्रेय देण्याला माझा आक्षेप आहे. १८५७ च्या स्वातंत्र्यलढ्यात कदाचित या उत्प्रेरकाच्या अभावामुळे अपयश आले असण्याची शक्यता आहे. मात्र तिथे अस्मिता व अन्यायाविरुध्दची चाड हा मूळ घटक मोठ्या प्रमाणात असल्यानेच सावरकरांपासून अनेकांनी त्या लढ्याला महत्त्व देऊन त्याला स्वातंत्र्यप्राप्तीचा पाया असं म्हटलंय. कारण यश-अपयशापेक्षा त्यामागची लढाऊ वृत्ती महत्त्वाची असते हेच आहे! अस्मितेशिवायचं शिक्षण हे निरुपयोगीच नव्हे तर देशविघातक ठरल्याचीही उदाहरणे आहेत!
भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील जवळजवळ सर्व अग्रणी नेते उच्चशिक्षित होते याचे कारणही मला हेच वाटते की शिक्षण हे शस्त्र इंग्रजांविरुध्द उपयोगी असल्याचे त्यांनी जाणले असेल. पण पुन्हा तेच, शस्त्राला योध्दा व लढाऊ वृत्तीपेक्षा जास्त महत्त्व देण्याचे कारण नाही. मुघलांविरुध्दच्या लढाईत तलवारीने केलं ते काम या लढ्यात शिक्षणाने व लेखणीने केलं इतकंच..
----------------------------------------------------------------------------------------------------------------------
या ठिकाणी आमची चर्चा जरी थांबली असली,तरी तिच्या निमीत्ताने इथे काही साधक-बाधक गप्पा होतील ही अपेक्षा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चर्चा बरीच मोठी आहे, वाचायला मजा आली. माझं स्वतःचं मत बरंचसं सत्यजितसारखं असलं, तरी शेवटी वाचणं ही बरीचशी वैयक्तिक स्वरूपाची गोष्ट असल्यानं जर एखाद्याचा दृष्टिकोन वेगळा असला तरी तो स्वागतार्हच. सांस्कृतिक संदर्भांबाबत बोलायचं झालं तर मराठीतून वाचताना थेट अर्थ पोचल्यासारखा वाटतो. इंग्रजीत वाचायचा सराव झाला तरी थोडा अवकाश मध्ये राहतोच. (अगदीच अरसिक उदाहरण द्यायचं झालं तर, इन्ट्राव्हेनसमधून मिळणारी पोषणद्रव्यं वि. नेहमीचं खाणं).

एखादी भाषा प्रयत्नपूर्वक शिकूनही तिच्यातले सगळे संदर्भ उमगतील असं नाही. मराठी साहित्यातलेच सगळे संदर्भ कुठे ठाऊक असतात आपल्याला? सॉमरसेट मॉमच्या (बहुतेक) अ रायटर्स नोटबुक या पुस्तकात त्याने आपल्या स्पॅनिश, इटालियन, लॅटिन आणि अरेबिक इ. त्या त्या देशांत जाऊन शिकण्याच्या निश्चयाबद्दल लिहिलं आहे (त्या त्या भाषांतील साहित्याचा आस्वाद घेण्यासाठी), आणि लगेचच त्याच्या अव्यवहार्यतेबद्दलही. वैयक्तिकदृष्ट्या, मला मराठी आणि हिंदी सोडली तर इतर भाषेतलं साहित्य वाचण्यासाठी इंग्रजी सर्वात अधिक सोयीची असल्याने आणि तिच्यात इतर भाषांतल्या अनुवादित साहित्याचं दालन असल्याने तिच्यातलं साहित्य अधिक वाचलं जातं. एरव्ही रशियन किंवा फ्रेंच शिकल्याशिवाय जी पुस्तकं वाचता आली नसती, ती इंग्रजीतून वाचता येतात. अर्थातच एखाद्या रशियन माणसाच्या मनात 'वॉर अँड पीस' वाचताना जे संदर्भ जागे होतील, ते मला कधीच उमगायचे नाहीत. पण जितपत समजतात ते 'हा इथला मज पुरे फवारा' म्हणण्यासारखे आहेत हे नक्की.

दुसरा मुद्दा म्हणजे मूलभूत मानवी भावनांचा लसावि + अ-अनुवादनीय सांस्कृतिक संदर्भ यांच्यातल्या झगड्याचा/तुलनेचा. या संदर्भात 'पाडस' या राम पटवर्धनांच्या अनुवादाचं उदाहरण अतिशय बोलकं ठरावं. शंभर वर्षांपूर्वी फ्लोरिडातल्या ज्योडी नावाच्या मुलाच्या आयुष्याभोवती फिरणार्‍या 'इयर्लिंग' या कादंबरीतले अनेक संदर्भ आजच्या अमेरिकन मुलांनाही अनोळखी असावेत. पण त्यातल्या ज्या मूलभूत भावना आहेत (पोरवयातली भटकायची आवड, अपरिहार्यपणे लोप पावणारी निरागसता, भुकेचं खरं अक्राळविक्राळ स्वरूप इ.) त्या महाराष्ट्रातल्या मुलांपर्यंतही यथास्थित पोचल्या आहेत. यात अनुवादकौशल्याबरोबरच मूळ कादंबरीचाही वाटा आहेच.

बाकी इतर मुद्द्यांबद्दल वर विस्तृत चर्चा झालेली आहेच, त्यामुळे त्याबद्दल वेगळे काही लिहित नाही.

आगाऊ- विस्तृत चर्चा वाचली. आवडली. काही मुद्दे आवडले.
नंदनच्या मुद्यांशी सहमत.

वरील मुद्यात पुरेसा परामर्श घेण्यात आला आहेच म्हणून मी फक्त अनुभव सांगते.
वाचन हे मला भाषे पेक्षा महत्वाचं वाटत नाही (अजूनतरी). कुठल्याही भाषेत का असेना. मुळात वाचणारे, त्यावर चिंतन, मनन करणारे लोकंच इतके कमी आहेत की ते कुठल्याही भाषेत का वाचन करेनात, मला फरक पडत नाही.
माझ्यापुरती मराठी की ईंग्रजी संभवतच नाही. दोन्हीविना मला सारखंच पांगळं वाटत. फक्त मिंग्लीश मात्र सहन होत नाही.
इंग्रजी माझ्या कामाची आणि ७० टक्के विचारांचीही भाषा आहे. ब-याचदा गंभीर मुद्देसुद विचार करताना मला इंग्रजीत विचार केल्यामुळे, ते भाषांतर करुन मराठीत आणताना विशिष्ट शब्द आठवावे लागतात आणि मोल्सवर्थचाही आधार घ्यावा लागतो. वाचताना मात्र तसे होत नाही. त्या त्या भाषेत मला व्यवस्थित वाचता येतं.

दोन्ही भाषात मला नानांची युक्ती वापरायची तर अपरात्रीही उठुन सारखंच बोलता येतं.
मराठी कवितांच्या ओळी जशा मला काहीतरी पाहताना आठवतात तशा ईंग्रजीही. क्वचित इतर भाषांच्याही.
इंग्रजी माध्यमात शिकल्यामुळे शालेय संदर्भ (म्हणजे प्रत्येक विषयातील मुलभूत ज्ञान) सर्व इंग्रजीतून आठवतात.
मध्यंतरीच्या काळात परकीय भाषेतील शिक्षणाच्या/कामाच्या रेट्यात माझं मराठी वाचन बरंच कमी झालं होतं. ते जपानात राहताना जपानीच्या मा-यात अशा प्रकारे आपोआप उफाळून आलं की जवळ असलेल्या प्रत्येक मराठी पुस्तकाच्या पानापानावर मी आसवे गाळली आहेत. आणि आश्वर्यकारक रित्या इंग्रजीत विचार करण्याला खीळ बसली एकदम. इतकी की मला पुन्हा इंग्रजी शब्द आठवून वाक्य बनवायची वेळ आली- समोरच्याला ते ऐकताना जाणवणार नाही, पण मला आपण शब्दा शब्दांची फुलं ओवत वाक्यांची माळ बनवतोय हे जाणवायला लागलं.
जपानी शिकायला घेतल्यावर तर मला प्रत्येक नविन शब्दाला ३ भाषेत प्रतिध्वनी ऐकायला यायला लागले. ईंग्रजी, मराठी आणि जर्मन. व्याकरण शिकताना तर फारच.
घरी मी/ आम्ही ९५% टक्के मराठी बोलतो, मुलीलाही तसेच बोलायला शिकवतो आहे. जिथे इंग्रजी शिकवायची वेळ येते तिथे तिला दोन्ही भाषेतले शब्द सांगतो.
पण आत्ता जर मला भारताच्या परकीय धोरणाबद्दल बोलायचे असेल तर एकही इंग्रजी शब्द न वापरता बोलता येइल, पण मनात भाषांतर केल्याशिवाय येणार नाही.
मायबोलीवर कसे आलो या बा.फ वरच्या प्रतिक्रिया पाह्यल्या तर बहूतांश लोकांनी आंतरजालावरच्या मराठीच्या ओढीने इथं आलो असल्याचं सांगीतलं आहे. यातच काय ते आलं.
आत्मज्ञान वगैरे झालंच तर ते होणे मला महत्वाचं वाटतं, भाषा गौण. त्याबाबतीत लिहायचं झालं तर मात्र मी दोन्ही भाषेत लिहीणं पसंत करेन.

You don't know someone, unless you fight with him! हे लईच आवडलं!>> अगदी अगदी. मला पण लईच आवडलं बुवा.

इन्टरेस्टिंग चर्चा (आला का आंग्लभाषेतला शब्द Wink )

काही मुद्दे आगाऊचे पटले, काही मंदारचे..

मी ईन्जिनियरिंगला जाईपर्यंत रीडर्स डायजेस्ट आणि पाठ्यपुस्तकं वगळता इंग्लिश फारसं काही वाचलं नव्हतं.. मराठीची इतकीच सवय की मेंदूला क्षणमात्र त्रास न होता अर्थ आत पोचत पुस्तक एका बैठकीत - अत्यंत कमी वेळात (अर्थात पुस्तकाच्या जाडीवरही अवलंबून Wink ) होतं..
त्यामानानं इंग्लिश वाचायला मेंदूला थोडेसे का होईना जास्त कष्ट पडतात.. ह्याचा पुरावा म्हणजे एक नवीन मराठी पुस्तक आणि एक नवीन इंग्लिश पुस्तक समोर आलं तर पटकन मराठी पुस्तक उचललं जात (मी जात्याच आळशी आहे)

पण परकीयांची भाषा, संस्कृतीला रिलेट न करू शकणं वगैरे फारसं काही पटलं नाही..
माझ्या मते, पुस्तक वाचनामागे आपल्याला शब्द वाचायला मजा वाटते ही भूमिका नसते.. त्यामागे कुणाचा तरी अनुभव, अनुभवायची पद्धत, त्यामागचं तत्वज्ञान हे सगळं महत्त्वाचं असतं (मनोरंजन हा मला तरी दुय्यम मुद्दा वाटतो -अर्थातच मी निव्वळ मनोरंजनाकरताही वाचतेच - पण नेहमी तेच वाचू शकत नाही!) - जे मी माझ्या आयुष्यात अनुभवते आणि मला पटतं ते लिखाण तर मला भावतच, पण जे मी कधीच अनुभवु शकणार नसते - ते दुसर्‍याच्या शब्दाद्वारे अनुभवायला मिळणं हे ही माझ्या वाचनामधे महत्त्वाची भूमिका निभावतं.. आणि म्हणूनच मी इंग्लिशमधलं साहित्यही आनंदानं वाचते.

------------
हा लेखाचा मुद्दा नाही- तरीही लिहिल्याशिवाय रहावत नाही:
इंग्रजांनी राज्य केल्यामुळे त्यांच्या विद्वेष ही गोष्ट काही मला पटत नाही.
एवढा मोठा देश जर मुठभर माणसं हातात ठेवू शकत असतील तर दोष मुठभर माणसांचा का त्या ताब्यात रहाणार्‍या लोकांचा? (अर्थात, तसाही आपला देश एकसंध कधी होता म्हणा!) आपल्यात जेव्हा तेवढी धमक निर्माण झाली, तेव्हा आपला देश पारतंत्र्यातून बाहेर पडलाच ना!
आणि इंग्रज यायच्या आधीही आपल्या देशावर आपलीच सत्ता होती का?
अयोध्येमधे हनुमानाचं देऊळ होतं.. तिथे(ही) मुसलमानांनी मशिद वसवली होती..
इंग्रजांनी नेमलेल्या समितीनं नीट पाहून तिथे मंदीर होतं असा निर्वाळा दिला..दरम्यान हिंदू मुस्लिम दंगेही झाले होते..
ह्याव्यतिरिक्त अनेक ठिकाणी असले प्रकार सर्सास घडतच होते - इंग्रज आले नसते, तर कदाचित परकीय सत्ता आली नसती - पण आपल्याच देशात आपल्याला धर्मांतरीत होऊन किंवा तसं न केल्यात अपमानित जगत रहाण्याची वेळ आपल्यावर येऊ शकली असती..
इंग्रजांनी त्यावेळी केलेले बायकांसदर्भातले कायदे तर मी बाई म्हणून विशेष अ‍ॅप्रिशिएट करते!
ते आले नसते तर कदाचित आजही अनेक बायका बालविवाह, सती, विधवेचं असह्य जगणं असल्या चालींना बळी पडल्या असत्या.. कदाचित बहुजन समाजाला शिक्षण आणि माणूस म्हणून समान न्याय मिळायला नुकतीच सुरुवात झाली असती .. कदाचित हे बदल आधीही झाले असते, पण सत्ता असणार्‍यांच्या विरोधात ते मिळवणं ही कितीतरी पटींनी अवघड गोष्ट झाली असती!
इंग्रज चांगले होते, ते देव होते असं काही माझं म्हणणं नाही - त्यांनी आपल्याच नाही, तर इतर अनेक देशात जुलुम केले.. इतपत की माणसाला माणूस म्हणून वागवण्याचं शहाणपण त्यांनीही कित्येक वेळा दाखवलच नव्हत!
पण आज आकलन करताना - आपल्या देशातल्या अनेक चांगल्या बदलांना ते कॅटॅलिस्ट ठरले असं मला वाटतं
-----------------------------------------

भाषा हा दोन माणसांना जोडण्याचे साधन, विचारांच्या आदानप्रदानाचे ही. आज तोच एकाला दुसर्‍याच्या विरोधात उभा करण्यासाठी वापरला जातोय.
भाषेचा संदर्भ ती बोलणार्‍या लोकांनी केलेल्या कृत्यांशी जोडला, तर प्रत्येकच भाषेबद्दल पूर्वग्रह बाळगावे लागतील. संस्कृतातले संचित मराठीत आणणार्‍या संत ज्ञानेश्वरादिकांना ही त्रास सहन करावा लागला, म्हणून आपण संस्कृत भाषेबद्दल नकारात्मक भाव ठेवू का?

माझ्या मेंदूलाही रोमन लिपी वाचताना जरा त्रास होतो, असं तो मला सांगतो! परिणामी मी इंग्रजी वाचते, नाही असं नाही, पण मराठी जितक्या सहजगत्या, येता जाता आणि मोठ्या प्रमाणावर वाचलं जातं तितकं इंग्रजी नाही वाचलं जात.
इंग्रजीचा काही राग नाही. फक्त आळस हेच एकमेव कारण असावं. बाकी जगभरातल्या इतक्या उत्तमोत्तम कलाकृती इंग्रजीत उपलब्ध आहेत आणि दस्तुरखुद्द इंग्रजीत इतकं काही वाचण्यासारखं आहे; की मला इंग्रजीला वळसा घालून जाणं परवडण्यासारखं नाही. नाहीतर तसं करायला मला निश्चित आवडलं असतं!