ईस्ट युरोप - ऑश्वीझ एक भयानक अनुभव भाग- ४

Submitted by मोहन की मीरा on 7 June, 2015 - 02:40

भाग ३= http://www.maayboli.com/node/54122

ह्या ट्रीप ला जायचे ठरवले तेंव्हाच ऑश्विझ हा नाझींचा ज्यू कत्तल खाना पहायचा आहे, हे माहिती होतं. त्या बद्दल अनेक ठिकाणी वाचलं होत. शिंडलर्स लिस्ट, लाईफ इज ब्युटीफुल सारख्या सिनेमां मधून पाहिलं होत. तरीही एक अनामिक रुख रुख मनाला लागली होती. आपण तिकडे का जातोय? हा प्रष्ण पण मनात येत होता. खरच का गेले मी तिकडे?

उत्तर एकच, ते मला पहायचे होते. का? कारण तो एक काळा इतिहास आहे. घडून गेलेला. आपल्या सुदैवाने आपल्याला त्याची जराशीही झळ लागली नाही. आपल्यावर आपल्या दुर्दैवाने इंग्रजांनी राज्य केले. ते स्वत: दुसऱ्या महायुद्धात सक्रीय होते. आपले अनेक सैनिक अनेक आघाड्यांवर दोस्तांच्या बाजूने लढायला होते, आपल्या कडे ही अनेक लोकांचे शिरकाण इंग्रजांच्या राज्यात झाली. पण मास किलिंगच्या एखाद दुसऱ्या (जालियान वाला बाग) घटना सोडता, आपल्या नशिबी तसे सभ्य शासाकच आले. मला वाटते मानव जातीच्या इतिहासात एवढ्या प्रमाणावर माणसे मारण्याचा कुविक्रम फक्त आणि फक्त नाझीम्च्या नावावर असेल. शिंडलर्स लिस्ट सिनेमात एक दृश्य आहे, की कॅम्प चा मुख्य सकाळी उठतो आणि बाहेर गेलारी मध्ये येवून आळस झटकतो. सहज म्हणून तो बंदूक डोळ्याला लावतो व खालून चाललेल्या एका ज्यू प्रिझनर वर गोळी चालवतो. उगाच, मजा म्हणून, मरगळ झटकायला !!!! हा प्रसंग अतिशय केज्युअली चित्रित करण्यात आला आहे. तरी तो अंगावर येतो. अशीच त्यावेळेस माणसे मारली गेली. का?.....का?.... उत्तर कोणाही कडे नाही.

हिटलर अतिशय सद्वर्तनी होता. शाकाहारी होता, स्त्री दाक्षिण्य असणारा होता, काटकसरी, मद्यपान न करणारा, शेवटच्या १५ वर्षात इव्हा ब्राऊन सोडून एकाही स्त्री कडे न पहाणारा, उत्तम प्रशासक, जर्मनीला पहिल्या महायुद्धाच्या अपमानित परिस्थितीतून वर काढत तंत्रज्ञानाच्या वेगळ्याच उंचीवर नेवून ठेवणारा. पण त्याचं बरोबर कमालीचा हेकट, तापट, टोकाची भूमिका असणारा, स्वत: बद्दल फाजील कल्पना असणारा, एककल्ली, क्रूर सुध्धा होता. त्याने जर ज्यू व इतरांच्या शिराकाणाची आज्ञा दिली नसती तर आज तो एक यशस्वी राज्य करता म्हणून ओळखला गेला असता. नाण्याला नेहेमी दोन बाजू असतात हे खरे, पण इकडे त्या काळ्या बाजूने करोडो लोकांचे प्राण घेतले. हकनाक बळी घेतले.

ज्यु लोकान्चा बरेच धर्म राग करतात. क्रिश्चन्स त्यांचा राग करतात, की त्यांनी येशू क्रीस्ताला कृसिफाय केले. मुसलमान त्यांचा राग करतात कारण दोन्ही धर्म एकाच जागे वर हक्क सांगतात. हिटलर चा हा ज्यू द्वेष एवढा टोकाचा का? ह्याचे मुळ युरोप च्या अर्थ कारणात आहे !!!! त्यावेळेस ज्यू समाजाच्या हातात अनेक उद्योग धंद्याची नाडी होती. मुळातच हे सावकार लोक. त्याच बरोबर व्यापारात डोके चालणारे. रिटेल उद्योगाच्या नाड्या आपल्या हातात असणारे. त्याचं मुळे पैसा बाळगून असणारे. आर्थिक दृष्ट्या मजबूत व एकमेकान्ना धरून असणारे. पहिल्या महायुद्धा नंतर आलेल्या मंदी मध्ये हा समाज त्यांच्या ह्या वैशिष्ट्या मुळे तरुन गेला. तोच इतर समाज मात्र पोळला गेला. त्यामुळे हा ज्यू द्वेष मुळातच ह्या लोकांत होताच. हिटलर ने त्यांचे भांडवल केले. लोकप्रियता मिळवण्या साठी केलेल्या घोषणांचे नंतर ओझे झाले. मग जगाला त्यांच्यावर केलेलं अत्याचार कळू नयेत म्हणून मग गुपचूप पण अतिशय planning ने त्यांना मारायला सुरुवात केली. युद्ध हरतोय अशी जाणीव झाल्यावर तर अजून जोमाने मारायला सुरुवात केली.

माझ्या परीने मी ह्या मानसिकतेचा आढावा घ्यायचा प्रयत्न केला. ह्या विषयावर अजून चर्चा अपेक्षित आहे. माझा दृष्टीकोन चुकतही असेल. माबो वरील जाणत्या लोकांनी प्रकाश टाकावा.

तरीही तो जे एक प्रश्न होता “का? कशासाठी” हा प्रश्न तिकडे जाऊन आल्यावर मनात अजूनच नाचायला लागला आहे. बर> हे खूप सहज झालं आहे का... की बाबा भावनेच्या भरात केला एखादा अपराध..... आणि झाला पश्चाताप.... पण नाही... खूप विचारपूर्वक, प्रचंड डोके लावून, नीर निराळ्या पद्धतीने, अभ्यास पूर्ण रीत्या ही गोष्ट घडवून आणण्यात आली. आणले ज्यू...घातल्या त्यांना गोळ्या..... दिसला ज्यू उडवलं त्याचं मुंडकं..... असे असते तर ते युद्ध ह्या नावाखाली खपले असते. पण इकडे पद्धतशीर रीत्या, त्या जीवांना कसे मारायचे, कसा आरडाओरडा होवू द्यायचा नाही, जगाला कळू द्यायचे नाही, आड जागा शोधून, त्यातही त्यांच्या शरीराच्या प्रत्येक गोष्टीचा कसा उपयोग होईल, ह्याचा विचार करून हे काम केलेले आहे. म्हणजे सहज नाही, तर खूप बुद्धीचे हे काम आहे. माणसे कशी मारायची ह्यावर अनेक संशोधक, डॉक्टर्स, इन्जिनीअर्स विचार करायचे. नव्या नव्या क्लुप्त्या काढायचे.

साधारण इकडे असा “प्रोसेस” ( एकदम प्रोडक्शन हाउस सारखे वाटते ना.... पण हा खरो खरीच माणसांना मारायचा कारखाना होता) होता, की ट्रेन, रोड, ने लोकं इकडे आणली जायची. एका wagan मध्ये जिकडे जेम तेम ५० जण मावू शकायचे त्यात 400-४५० लोक भरून आणले जायचे. कधी हा प्रवास काही तासांचा असे, तर कधी कधी आठवड्यांचा. न खाता न पिता एकामेकांच्या अंगावर कोंबून बसल्याने व शारीरिक विधी ही एकमेकांच्या अंगावर झाल्याने, दुर्गंधी, घाण व कोंडून बरेच लोक प्रवासातच मरायचे. जे उरायचे त्यांना ऑश्विझ व बर्कानाऊ सारख्या रम्य ठिकाणी आणल्यावर बरे वाटायचे. ह्या लोकाना आणताना तुम्हाला कामाला नेत आहोत हेच सांगितले जायचे. स्टेशन वर उतरल्यावर त्यांच्या रांगा लावायचे. त्यात १५ वर्षां खालील मुले व स्त्रिया ह्यांची एक रांग, व पुरुषांची दुसरी रांग. पैकी मुले व त्यांच्या आया ह्यांना सरळ सरळ gas चेम्बर मध्ये नेले जायचे. तिकडे जागा नसेल, वा खूप रांग असेल तर एक दोन दिवसात नेले जायचे. मुले व त्यांच्या आया एकत्र का, तर आई पासून तोडले तर पोर व आया गोंधळ घालीत म्हणून. gas चेम्बर मध्ये नेताना त्यांना सांगत की तुम्हाला प्रवासात जे इन्फेक्शन झाले आहे ते काढण्या साठी आंघोळ घालायची आहे. म्हणजे मग तुम्हाला काम देता येईल. मग कपडे काढून, बायकांच्या डोक्या वरचे लांब केस काढून , आत त्यांच्यावर शोवार्स सोडत असत. ह्या शोवार्स मध्ये झायाक्लोन बी हे पोयझन मिसळलेलं असे. हा शोवर अंगावर पडून साधारण पणे गुदमरून २० मिनिटात मृत्यू यायचा. आधी ते अशा ज्यू ना गोळ्या घालत. पण नंतर गोळ्या कशाला फुकट घालवायच्या? असा “ सुज्ञ” विचार करून त्यांनी हा मास किलिंगचा प्रकार शोधून काढला. ही माणसे मेल्यावर त्यांची प्रेत ओव्हन ( म्हणजे विद्युत दाहिनी) मध्ये घालून त्याची राख करत असत.

जे पुरुष व स्त्रिया शरीराने मजबूत असत त्यांना कामांसाठी वेगळं काढत असत. त्यांच्या कडून खूप कामे करून घेत, जशी युद्ध सामुग्री, शेती, वस्तू बनवणे इ. त्यांना गरजे एवढेच अन्न देत असत. झोपायला गोणपाटात गवत भरून केलेल्या गाद्या देत असत. साधारण एका बराकीत 500 ते 600 माणसे असत. त्यांना मिळून साधारण १० शौचालये असत. देख रेख करायला, त्या प्रिझनर्स मधीलच युद्ध कैद्यांची निवड होई. ते लोक खूप लाच खाऊन व देवून स्वत: चे मरण पुढे ढकलत असत. रोज साधारण पणे १००-१५० लोकांवर काहीतरी खोटे आरोप करून त्यांना मारत असत. त्या मुळे इतरांवर वाचक रहात असे. रोज संध्या काळी ओर्केस्त्रा वर गाणी वाजवली जात. त्या वेळेस सगळे कैदी तिकडे जमत. हे करमणुकी साठी नसून डोकी मोजण्या साठी अवल्म्बालेले तंत्र होते. रोज संध्याकाळी कैद्यांची परेड घेत असत.
जे आजारी पडत त्यांची रवानगी दवाखान्यात होई. इकडे त्यांच्या वर वेगवेगळ्या औषधांचे टेस्टिंग होत असे. कधी कधी विशिष्ट लक्षणे आढळली तर मुद्दाम त्या रुग्णाला तिकडे डाम्बत असत. (अश्या तर्हेने जवळ जवळ ३०० औषधांच्या पेटंट चे काम इकडे झाले!!!).

कैदी इकडे आणताना त्याच्या चीज वस्तू काढून घेण्यात येत.(मेल्या वर सोन्याचे दात सुद्धा कढुन घेत !!!!) परत जाताना आपल्याला परत मिळाव्यात म्हणून बिचारे ह्यावर नावे घालीत. ह्यातल्या कीमती वस्तू बाहेर विकत असत. अनेक एजंट ह्या वस्तू एका दूरच्या ठिकाणी विकत घेत. त्या ठिकाणाला कॅनडा म्हणत. कारण त्या वेळेस युरोप मध्ये कॅनडा हा देश श्रीमंती साठी प्रसिध्द होता.कैदी मारल्या नंतर त्यांचे चांगले बूट, कपडे, bag ठीकठाक करून बाहेर विकत असत. सगळ्या जर्मनीत त्याची विक्री होत असे. त्या मेलेल्यांच्या केसां पासून ते एक वेगळेच कापड तयार करत असत. जे युद्ध भूमीवर सैनेकांच्या वापरा साठी नेले जायचे. तिकडे मिळणार्या मिंक कोट साठी तर अनेक जर्मन धनिक बायका डोळे लावून असायच्या.

हे सगळे पाहिल्यावर मन सुन्न होवून जाते. का? आणि कशा साठी? हे प्रश्न पाठ सोडत नाहीत. कैद्यांनी बाहेर पळून जावू नये म्हणून जाड जाड तारांचे, ज्या वर वीज खेळवली आहे, असे कुंपण असायचे. तरीही 600 कैदी इकडून पळून जाण्यात यशस्वी झाले. पण १३ लाख मेले!!!!

हे ऑश्विझ चे प्रवेशद्वार

Aushtwich.JPG

ह्या बराकी. त्या मैदानात परेड चाले.

IMG_0402.JPG

हे कुंपण

DSC06441.JPG

हे gas चेम्बर्स

DSC06455.JPG

हे ओव्हन्स

DSC06457.JPG

अशा तर्हेने माणसे वेगळी करत

DSC06451.JPG

हा तो गॅस

Aushtwich Gas.JPG

ह्या बॅगा

IMG_0380.JPG

बुट

IMG_0386.JPG

बराक आतिल बाजु

IMG_0389.JPG

हे सगळे पाहिल्यावर भडभडून आले. अनेक ठिकाणी तर मी रडत होते. अनेक ठिकाणी फोटो काढायला मनाई आहे. कारण अनेकांचे केस, वस्तू अश्या चीजा इकडे ठेवलेल्या आहेत. इकडे गाईड बहुतेक पोलिश असतात. अनेक लोक रोज भेट देतात. गाईड ला विचारले तर ती म्हणाली की येनार्यात इस्रायल कडून खूप लोक येतात. देणग्याही देतात. कारण त्यांचे कोणी ना कोणी इकडे होतेच ना !!! जर्मन पण खूप येतात. पण आपल्या पूर्वजांनी केलेली एक चूक म्हणूनच ते ह्या कडे पहातात. १९४५ साली जर्मन जेंव्हा पोलंड सोडून गेले त्या नंतर १९४६ साला पासून ऑश्विझ व बर्कानाऊ कॅम्प tourist अ‍ॅट्रॅक्शन झाले. मानवतेच्या क्रूर तेचे प्रतिक झाले.

जेंव्हा जर्मन्स इकडून पळाले तेंव्हा ह्या कॅम्प चा जास्तीत जास्त वेळ जो मुख्य अधिकारी होता तो रुडोल्फ होस, जो आर्जेन्टीना मध्ये पळून गेला होता, त्याला मोसाद ने पकडले व बर्कानाऊ मध्ये एका वध स्तंभ बांधून त्या वर त्याला फाशी देण्यात आले. त्याला मृत्य समयी सुध्धा वाईट वाटत नव्हते. “मी आज्ञा पालन केले” हेच त्यांचे शब्द शेवट पर्यंत होते. ह्या सगळ्या मागे जरी हिटलर ची इच्छा हे कारण होते तरी एवढ्या क्रूरतेने मारण्या मागचे डोके मात्र हिमलर चे होते. जे एस.एस. गार्डस ह्या कॅम्प मधून कामे करत असत ते ही जवळ जवळ ११००० संख्येत होते. पैकी नंतर फक्त 800 मिळाले. बाकीचे इतर देशात पळाले वा आपली ओळख बदलून राहिले.

सुरुवातीला ह्या कैद्यांचे रेकॉर्ड ठेवत असत. त्यांची नावे, फोटो ठेवत असत. पण नंतर नंतर ही नोंद ठेवणेही कठीण झाले. त्यातले काही फोटो तिकडे लावलेले आहेत. त्यावर कॅम्प मध्ये आणल्याची आणि मृत्यू ची तारीख अशा नोंद आहे. काही काही लोकांना तर ५-६ दिवसात मारले आहे. अनेक प्रकारे छळ करून त्यातले खुपसे लोक रोगांना बळी पडत. हे जे फोटो आपल्याला इकडे दिसतात, ते त्या वेळच्या गार्डस ने लपवून काढलेले आहेत. नंतर जेंव्हा त्यांच्या वर खटले भरले त्या वेळेस हेच फोटो पुरावे म्हणून वापरले गेले.

जेंव्हा मी ऑश्विझ मध्ये गेले तिकडे कॅम्प छोटा असल्याने व खूप लोकं तिकडे येत असल्याने भकासपणा जरा कमी जाणवला. पण बर्कानाऊ मध्ये शिरल्या शिरल्या भयंकर nigativity जाणवायला लागली. खूप ओझं वाटायला लागलं. बर्कानाऊ ऑश्विझ च्या ८ पाट मोठा आहे. प्रचंड कॅम्प आहे. इकडेच सर्वाधिक माणसे मारली गेली. मी स्वत: रेकी आणि एंजल थेरपी व मेडीटेशन करते. alternative हिलिंग मध्ये असल्या कारणाने, मला nigativity पटकन जाणवते. तिकडे गेल्या गेल्या माझे हात जड झाले. प्रचंड ओझे वाटायला लागले. गंमत म्हणून माझ्या नवर्याने गाईड ला विचारले की इकडे भुतेही असतात का हो? कारण एवढ्या प्रमाणावर लोकं हकनाक मेल्या मुळे सहाजिकच खूप वाईट व्हायाब्रेशांस इकडे असणे सहाजिक आहे. आम्हाला वाटले होते की ती गाईड हा प्रश्न उडवून लावेल. पण तिने उत्तर दिले की, तिने स्वत: हा अनुभव घेतलेला नाही, पण इकडे काम करणार्या रात्र पाळी च्या सुरक्षा रक्षकांनी मात्र असे अनुभव व तक्रारी केलेल्या आहेत. त्यांना रात्री च्या वेळेस परेड करताना जसे खूप बुटांचे आवाज येतात तसे आवाज ऐकू आले आहेत. बर्कानाऊ ला कुठलेच कुंपण नाही. तारांचे कुंपण आहे. पण तो 400 एकर असल्याने खूप मोकळा आहे. आजूबाजूला व्यवस्थित वस्ती आहे. पण एकंदर वातावरणात एक प्रकारची खिन्नता आहे. आजूबाजूच्या घरांच्या किमतीही कमी आहेत, अशी माहिती कळली. सहाजिकच आहे, अगदी अडल्या शिवाय इकडे घरे कोण घेणार. मृत्यूचा एवढा मोठ्ठा खेळ जिकडे झाला तिकडे असे वातावरण अपेक्षितच होते.

येणारे लोक (आम्ही सुध्धा) एक ऐतिहासिक घटना व वास्तू म्हणूनच ह्याच्याकडे पाहतात. पण तरीही खूप ओरखडे मनावर रहातातच. ती गाईड बोलताना “जर्मन्स” असाच उल्लेख करत होती. आमच्यातील एकाने तिला ‘नाझी’ असा उल्लेख करायची विनंती केली. ती तिने मान्य केली. खरच आहे पण. हे कृत्य बर्याच जणांना माहित नव्हते. अगदी आतले लोक सोडले तर नक्की काय होते आहे, ह्याची कल्पना बाहेर लोकांना नव्हती. होस ची बायको, जी त्याच कॅम्प मध्ये एका टोकाला रहात होती, व जिच्या घरा भोवती भिंत होती, तिला आपला नवरा जेलर आहे ह्या पलीकडे नक्की काय करतोय ह्याची अजिबात कल्पना नव्हती. जेंव्हा तो आर्जेन्टीना मध्ये पळाला तेंव्हाही ही जर्मनीतच रहात होती. जेंव्हा पोलीस तिच्या कडे येवून विचारणा करू लागले, तेंव्हा तिला त्यांचे चाळे समजले. तरीही ती नवर्या बद्दल ते सगळे खरे आहे हे मानायला तयार नव्हतीच!!!! त्यामुळे ह्या बातम्या खूप गुप्त ठेवत असत.

त्या काळात मिडीया आजच्या इतका सक्रीय नव्हता. युद्ध पत्रकारांना तर इकडे येण्यास बंदीच होती. ज्यू लोक फक्त युद्ध सामुग्री बनवण्या साठी व शेती साठी मजूर म्हणून वापरली जातात एवढेच त्यांना माहित होते. पण इतका नर संहार असेल अशी कल्पना रशियन ने येवून हे कॅम्प ताब्यात घेई पर्यंत कोणालाही नव्हती.

आज पोलंड देशाचं हे एक मोठ्ठ tourist अ‍ॅट्रॅक्शन झालेले आहे. लाखो लोक इकडे येतात. अनेकांची पोट ह्यावर अवलंबून आहेत. ते जगाला ओरडून सांगत आहेत, बघा बघा नाराधमतेचा नजारा. हे सांगणे गरजेचे आहे का? पाहणे गरजेचे आहे का?

हो... मला वाटते हो..... आपल्या एका इच्छे मुले त्या माणसाने हजारोंचे प्राण घेतले. म्हणजे एक इच्छा किती संहार करू शकते. हे पाहून भविष्यात कोणी हिटलर पैदा होवू नये आणि कडव्या मानसिकतेने फक्त आणि फक्त निराशाच हाती लागते, ह्याचे हे कॅम्पस म्हणजे द्योतक आहे. इतका संहार करूनही आज ते ज्यू आपल्या पायावर खंबीर पणे उभे आहेत. भले प्रगत देशांची त्याला फूस असेल, मोठ्ठ राजकारण तिकडे असेल, काहीही असो. पण त्यांची जीवन इच्छा मेली नाही. उमेद संपली नाही. उलट ह्या आघातांनी वाढली. आज रेताड मातीताही अनेक प्रयोग करून इस्राईल ने शेती मध्ये क्रांती केली आहे, तंत्रज्ञान, गुप्तहेर खाते सगळ्यातच प्रगती केली आहे. युद्ध संपल्यावर त्यांनी ह्या अपराध्यांना वेचून वेचून शोधून काढले. त्यांच्यावर खटले भरले. शासन केले. जगाची सहानुभूती त्याना होतीच.

नाझी जर्मनीला तरी उद्वास्थ्ते शिवाय काय मिळाले? फक्त लोकांच्या डोळ्यातला संताप, उपेक्षा आणि राग. आघातांनी राष्ट्र मोठी होतात की काय? काय माहित. पण इतिहास तरी तेच सांगतो. जर्मनी, जपान, इस्रायेल. ह्यांचा तरी इतिहास हाच आहे.

हे सगळे पहात असताना माझी १४ वर्षांची मुलगी माझ्या सोबत होती. फारसे काही माहित नसलेली. म्हणजे पूर्वाभ्यास नसलेली. ती खूप उत्सुकतेने पहात होती, गाईड ला प्रश्न विचारात होती, रडत होती, खिन्न होत होती. तिकडून निघताना उगाच हिला आणली असे मला वाटले, मी बोलूनही दाखवले. त्यावर ती पटकन म्हणाली,” आई, हा इतिहास आहे, तो आम्हाला कळलाच पाहिजे, नाहीतर असे हिटलर अजून बनतील. लोकाना मारून काही मिळत नाही. फक्त स्वत:चा शेवट हाती लागतो.” वरच्या परिच्छेदा मधल्या भावना तिच्या आहेत.

हे ऐकून ज्या उद्धेशाने हे कॅम्प जतन केले आहेत तो सफल झाला असे वाटते.

भाग ४ = झाकोपाने , बुदापेष्ट = रम्य दुनिया

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मायनर वयाच्या मुलामुलींना दाखविण्यासारखी ही जागा नाही असे माझे नम्र मत आहे. सज्ञान झाल्यावर जरा जगाचा अनुभव आल्यावर देखील टप्प्या टप्प्याने जगाची ही बाजू मुलांना समजावून द्यावी व अगदी त्यांची इच्छा असल्यासच जावे. खुद्द जर्मनीतही पोस्ट वॉर तरुण पिढी ह्यातून बाहेर पडायचा प्रयत्न करत असते. ते गंमत म्हणून इथे भुते आहेत का ते विचारणे तर आजिबातच पटले नाही. ही ठिकाणे टुरिस्ट अ‍ॅट्रेक्षन नाहीत. मिपावर देखील एकांनी इथे जाउन मग लगेच संध्याकाळी बार मध्ये कसे गेलो मजा केली त्याचे वर्णन दिले होते. ते अस्थानी वाटले होते. पण अस्ते एखाद्याची आवड.

असहमत वरिल बाजु जितक्या लवकर समजेल तितके चांगले. उगाच खोट्या स्वप्नील दुनीयेपेक्षा वास्तवाची जाणिव होणे कधीही चांगले. असो हे माझे मत. तसेच भुताचा प्रश्न अगदीच चुकीचा नव्हता हे त्याला दिलेल्या उत्तरावरुन कळतेच.
असो अतिशय सुरेख लेखमाला..

वर बांगलादेश बद्दलची एक लिंक आहे.. त्यावरून एक सिनेमा आठवला..
Children of War नावाचा.. भयंकर आहे.. कोणाला माहिती म्हणून पाहायचा असल्यास पाहावा ..
अथवा न पहाणे उत्तम !

आजकालची मायनर मुले, आप्ल्या पेक्षा खुप वेगळा विचार करतात. ती खुप सेन्सेटिव्ह असतात पण त्याचा बाऊ करत नाहीत. माझी मुलगी खुप सेन्सेटिव्ह आहे. तिच्या प्रतिक्रिया साध्या साध्या गोष्टीतही खुप विचार करुन दिलेल्या असतात. तिच वाचन ही चांगलं आहे. त्या मुळेच तिला घेवुन गेलो. आर्थात ती त्याचा कशा पद्धतीने विचार करते आहे हे तिच्या प्रतिक्रिये वरुन समजतेच.....

भुतां बद्दल म्हणाल, तर तिकडे बघताना येवढे टेंशन आले होते की विचारु नका !!!!. भुतां बद्दल चा प्रश्न मनात आला. कदाचित उत्तर मिळणार नाही माहिती आहे, त्या मुळे सहजच हा प्रश्न विचारला. हा प्रश्न विचारला तेन्व्हा आम्ही बस मधे होतो व गाईड ला ऑश्विझ च्या मेन गेट वर सोडायला जात होतो. त्या वेळेस अनेक लोक अनेक उलटे सुलटे प्रश्न विचारतच होते. आम्हाला अपेक्षित होते ही गाइड हा प्रश्न उडवुन लावणार. पण तिने प्रांजळपणे जे काय आहे ते सांगितले. याचा अर्थ अनेक लोक हा प्रश्न विचारत असणारच.

एका ऑस्ट्रीयन माणसाने तर सरळ सरळ त्या गाईड ला प्रश्न विचारला की "जर काहीही रेकॉर्ड नाही तर तुम्ही कसे म्हणु शकता की ११ लाख लोकं मेली, पकडलेल्या एस.एस. गार्ड ना तुम्ही मारुन का टाकले, कशा वरुन ज्यु सानग्तात ती माहिती खरी.... तुम्ही जेत्याचा इतिहास सांगत आहात. कारण नंतर काय झाले ते फक्त रशियन लोकांना माहित आहे. खटला तुम्हीच भरला, सगळे जेते मंडळी भोवती. मग खरा प्रकार काय ?"
त्याचे म्हणणेही तिने उडवुन लावले नाही. त्याला ही ती व्यवस्थीत उत्तरे देत होती. आजही हा प्रकार ही एक प्रकारची "क्रियेटेड हाईप " आहे असे मानणारे खुप आहेत.

एका ने तर विचारले की "ह्या कँप मधे असतानच्या काळात कोणाला मुलं झाली का, नवी लग्न जमली का, प्रेम प्रकरणं झाली का?" त्या वर सगळे जण गाईड सहित छान पैकी हसले. हा प्रश्न अगदीच गैर लागु होता असे नाही. ही पण आयुष्याची एक बाजु आहे. अगदी शिंडलर्स लिस्ट पुस्तकातही असे प्रेम प्रसंग आहेत. त्या गाईड ने सांगितले की" इकडे अनेक लग्न जमली, प्रेम प्रकरणे तर खुपच झाली, मुले ही जन्माला आली, अनेक जोडप्यान्नी नंतर आपल्या मुळ साथीदार भेटले, तरी त्यांच्याशी फारकत घेवुन, नव्या जोडिदारा बरोबर नवा अध्याय सुरु केला. येवढे स्त्री पुरुष एका ठिकाणी असल्याने व जीवनाची खात्री नसल्याने, मिळेल ते सुख ओरबाडुन घेण्याची ही प्रव्रुत्ती होती. आर्थात हे सगळे चोरुन. लपवुन. पण शेवटी माणुस आहे, त्याला इच्छा, आवडी आणि भुका आहेतच. "

युरोपियन किंवा हा पुढारलेला समाज सेक्स ह्या विषयी खुप लिबरल व वास्तव कल्पना बाळगतो, त्या मुळे त्यांच्या मनात हे प्रश्न आले, व त्याची उत्तरेही मिळाली. ही पण त्या तिकडच्या जीवनाची बाजु होती.

भुता बद्दलचा प्रश्न विचारताना कुठेही त्या गेलेल्या आत्म्यां बद्दल खिल्ली उडवावी असे अजिबात मनात नव्हते. उलट एक अमानविय उत्सुकता होती. किंवा इकडे जाउन आल्यावर लगेच पब मधे जाऊन मजा करायचीही मनोव्रुत्ती नव्हती. सुन्न झालो होतो. तरीही मन जागरुक होते. उलट तिकडे जाउन आल्यावर कुठे जेवायलाही मन घेइना.... ती दुपार आम्ही ज्युस वरच काढली.

हाच नव्हे तर कुठल्याच हिंसाचाराचे असे दृष्य रुप डोळ्यासमोर राहू नये असे मला वाटते.>>>>

दिनेशदा.... खरे आहे तुमचे म्हणणे. पण आज हिंसाचारा ची अनेक प्रकरणं आपण पेपर नुसता उघडला तरी वाचतो. माझ्या लेकीला सध्याच टाइम्स वाचायची प्रॅक्टिस ह्या सुट्टीत करुन घेतली. भाषा अजुन चांगली होण्या साठी. पण पहिल्याच पानावर अनेक धक्का दायक प्रकरणे दिसतात.

आम्ही सध्या १० वी नंतर पुढे काय ह्या विचारात आहोत. त्या बद्दल आज अमेरिक युनिव्हर्सीटीज च्या कँपस मधे होणार्‍या लैंगीक अत्याचारावर लेख वाचला. ५ मधल्या १ मुलीला व ८ मधल्या १ मुलाला ह्या प्रकारच्या रेप ना सामोरं जावं लागतं. व ड्रग्ज मुळे हे झाले असे म्हणुन युनिव्हर्सीटीज हा प्रकार दाबत आहेत. अश्या प्रकारचे व्रुत्त आहे. हे वाचल्यावर आता असा हिंसाचार कुठे व कसा टाळणार हा प्रश्न आहे!!!!!

भयानक वास्तव तुम्ही संयत शब्दात मांडलेलं आवडलं. पुढचा दीर्घ प्रतिसादातील अनुभवही छान मांडलेत. का कुणास ठावून, या विषयासंबधी माहिती असतानाही तुमच्या या भागाची वाट बघत होतो. जेव्हा पुढेकधी भटकंती करीन, ह्या ठिकाणी एकदा भेट द्यायला नक्की आवडेल, सुन्न करणाऱ्या जागी जायची इच्छा का बर मनात उत्पन्न होत असेल?

ऑश्वित्झ व बिर्कानेउला भेट दिल्यावर सुन्न होते हे खरे. तसेच काझिमेर्झ हा ज्युइश घेट्टो, शिन्डलरची फॅक्टरी या क्रॅकोमधील इतर भागांना भेट दिल्यावर देखील. क्रॅकोसारख्या युरोपातल्या माझ्या मते सर्वात चैतन्यदायी शहरात (संध्याकाळी क्रॅकोच्या मुख्य चौकातले जॅझ बँड बघा म्हणजे मी काय म्हणतो ते लक्षात येईल) असे असावे हे फार वाईट.

तुम्ही मुलीला घेवून हा प्रवास करत आहात, तिला हे सर्व वास्तव योग्य प्रकारे समजावून देत आहात याबद्दल तुमचे कौतुक. तुमच्या प्रवासामागचा उद्देश शांतपणे इथेही समजावत आहात त्याबद्दलही मानले पाहिजे.

अँटीसेमिटिझम (ज्यु-द्वेश) केवळ ऑस्ट्रियन/जर्मनांच्यातच नाही तर इतर सर्व युरोपियन देशांतून होता. हंगेरीमध्ये बहुसंख्य हंगेरियन लोकांनी ज्युंना पकडून द्यायला मदत केली. हीच गत अनेक इतर राष्ट्रात विशेषतः मध्य व पूर्व युरोपियन राष्त्रात होती. त्यामानाने नेदरलँड्/फ्रान्समध्ये ज्युंना लपवून ठेवण्याचे प्रयत्न जास्त झाले.
पोलिश लोकांना जर्मन्/ऑस्ट्रियन पेक्षा मला वाटले रशियनांचा जास्त राग आहे. दुसर्‍या महायुद्धाआधी व दरम्यान पोलिश अधिकार्‍यांची झालेली बेसुमार कत्तल हा एक कायमचा ठसठसणारा अध्याय आहे. त्यांच्या दुर्दैवाने दुसरे महायुद्ध संपल्यावर रशियनांचेच जोखड डोक्यावर बसले. सोविएतचा पाडाव झाल्यावर रशियाने या कत्तलीची किमान दखल घेतली. मात्र एका दुर्दैवी अपघातात या कत्तलीच्या स्मरणार्थ होणार्‍या कार्यक्रमाला जाताना पोलंडचे राष्त्रप्ती, त्यांची बायको, चीफ ऑफ स्टाफ व इतर लष्करी व सनदी अधिकारी विमान अपघातात ठार झाले. http://en.wikipedia.org/wiki/2010_Polish_Air_Force_Tu-154_crash

वार्स्वा पॅक्ट मधल्या हंगेरी/पोलंड/झेक राष्ट्रात अजून एक जाणवलेली गोष्ट म्हणजे दुसर्‍या महायुद्धातील मेजॉरिटी गुन्हे ऑस्ट्रियनांनी आणि त्यामागोमाग जर्मनांनी केली. सर्वात जास्त हानी सेन्ट्रल्/इस्ट युरोपची झाली. महायुद्ध संपल्यावर कोल्ड वॉर मुळे अमेरिकेने जर्मनी/ऑस्ट्रियात मार्शल प्लॅन अंतर्गत तुफान पैसा ओतून हे देश समृद्ध केले (तिथल्या नागरिकांचे कौतुक आहेच) आणि सेन्ट्रल/इस्ट युरोप मात्र कम्य्निस्ट जोखडात अडकला. ऑस्ट्रियनांनी तर अनेक नाझींना पुन्हा राजकारणात सामावून घेतले. जर्मनीने किमान हा इतिहास स्विकारून त्यापासून कायमचा बोध घ्यायचा प्रयत्न केला आहे.

दुसरे महायुद्ध व हिटलर म्हटले की आपल्याला जर्मनी आठवते. दुर्दैवाने ऑस्ट्रिया कोणालाच आठवत नाही.

ट्ण्या

तुमच्या एकुण एक पोस्ट ला------त्यातल्या प्रत्येक शब्दाला +१११११११११११

खुप सुरेख प्रतिक्रिया. अभ्यास पूर्ण पोस्ट..... खरं तर तुम्ही तुमच्या अनुभवांबद्दल लिहायला हवे. आम्ही नुसते काठाने फिरलो, तुम्ही तर तिकडे रहात होतात....

क्रॅको खरोखरच एक अप्रतिम शहर आहे, पण बहुतेक जण फक्त ह्या खुणा पहायला येतो.

ऑस्ट्रियन्स बद्दल जे लिहिलं त्याला अ‍ॅडिशनल +१

आज इकडे सगळ्यात राग रशियनचाच आहे. आणि इतर पश्चिमी राष्ट्र त्याला खत पाणी घालत आहेत.

पुर्ण लेखमाला वाचली . आवडली कसं म्हणू ? Sad
छान लिहिलयं .. माझ्याकडे हिटलरच माईन काम्फ आहे . कुणी वाचलयं का इथे. माझ वाचन पुढ ढकलल्या जातयं . कसं आहे पुस्तक सांगा कुणीतरी .. वाचाव लागेल ..

टिना

माईन काम्फ वाचलय. ते वाचल्यावर हिटलर हा महान व्यक्ती आहे असे वाटायला लागते. आर्थात त्याने हे पूस्तक ज्यु संहाराच्या आधी लिहिले आहे. त्या मुळे त्या मनसिकते वर काहीच प्रकाश पडत नाही. पण त्याचा जीवन प्रवास व पहिल्या महायुद्धा नंतर च्या जर्मनीची हालत खुप सविस्तर समजते.

नक्की वाचा....

anne frank the diary of a young ह्या पुस्तकामधे हि बरीच माहिती दिलेली आहे.

anne frank the diary of a young ह्या पुस्तकामधे हि बरीच माहिती दिलेली आहे.>>>>

अ‍ॅन ने लिहिलेल्या ह्या डायरीज जेंव्हा सापडल्या तेंव्हा साहित्य जगात व एकुणच मिडिया मधे खळबळ उडाली. तिने लिहिलेल्याचे नंतर पुस्तक केले. अ‍ॅन ने स्वतः हे सगळे अनुभवल्यामुळे ते सगळे डॉक्युमेंटेड झाले.

मोहन की मीरा.. अतिशय गंभिर व भिषण ऐतहासीक घटना घडुन गेलेल्या ठिकाणाबद्दल व गोष्टीबद्दल चांगले लिहीले आहे.

खर म्हणजे तुमचे हे प्रवास वर्णन आहे. त्याला प्रतिसाद देताना खर तर मी पुढे जे लिहीणार आहे ते अवांतर होउ शकेल याबद्दल आधीच दिलगीरी व्यक्त करतो पण तुमच्या वर्णनात इतिहासाचा उल्लेख आला म्हणुन त्या इतिहासाबद्दल दोन शब्द लिहावेसे वाटले.

तुमच्या लेखात तुम्ही हिटलरच्या ज्यु द्वेषाची कारणे संक्षिप्तात देण्याचा प्रयत्न केला आहे तो वाखाणणीय आहे पण त्यात मी थोडी भर घालू इच्छितो.

तुम्ही म्हणता ते बरोबर आहे की १९२० च्या सुमारास जर्मनीतल्या बर्‍याच् उद्योगधंद्याची नाडी ज्युंकडे होती. पण त्यामुळे ते आर्थिक मंदित तारले गेले व बाकीचे लोक नाही हे हिटलरच्या ज्यु द्वेषाचे कारण नव्हते.ज्यु लोकांनी युरोपच्या व अमेरिकेच्या राजकारणात १९१४ ते १९२५ च्या दरम्यान बराच बदल घडवुन आणला होता. त्याचा थोडक्यात इतिहास असा..

१९१४ मधे अमेरिकेत वुड्रो विल्सन अध्यक्षपदासाठी निवडुन येण्यात ज्युंनी फार मोठा हातभार लावला होता. तसेच ब्रिटनमधेही पंतप्रधान लॉइड जॉर्ज हे ज्यु धार्जीणे होते. झालच तर १९१७ मधे रशियन झारला मारुन केलेल्या रशियन बोल्शेव्हिक राज्यक्रांतीमागेही ज्यु लोकांचा फार मोठा हात होता तर १९१९ मधे हंगेरीमधेही सत्ताबदल घडवुन आणण्यात ज्यु कारणीभुत होते.

पण हिटलरच्या ज्यु द्वेषाचे कारण समजायला आपल्याला १९१० ते १९२५ च्या दरम्यान ज्यु लोकांनी जर्मनीच्या राजकारणात काय केले ते समजुन घ्यायला लागेल.

१८८५ पासुन जर्मनीमधे "कैझर" वेल्हॅल्म चे राज्य होते. १९१४ मधे जेव्हा पहिल्या महायुद्धाची रणशिंगे युरोपमधे फुंकली गेली तेव्हा कैझर ला खरतर युद्ध नको होते पण त्याच्या सैन्याची धुरा वाहणारे हिंडेनबर्ग व लुडेंडॉर्फ हे सगळे मिलीटरी निर्णय घेत होते.त्यावेळेला हिटलर.. (जो ऑस्ट्रियात जन्माला आला होता..) ऑस्ट्रियाची राजधानी व्हिएन्ना मधे रस्त्यावरती भणंगासारखा भटकत होता. पहीले महायुद्ध सुरु झाल्यावर त्याने स्वतःला जर्मन सैन्यात भरती केले व एक साधा कॉर्पोरल म्हणुन इमाने इतबारे तो जर्मनीतर्फे लढला. पण नोव्हेंबर १९१८ मधे जेव्हा जर्मनीने अचानक शरणागती पत्करली तेव्हा त्याला धक्काच बसला कारण पुर्व आघाडीवर जरी जर्मन मित्र देश म्हणजे टर्की , ऑस्ट्रिया व हंगेरी शरण जात होते तरी पश्चिम आघाडीवर मात्र जर्मनीचा निर्णायक पराभव झाला नव्हता.. युद्ध स्टेलमेट सारखे चालले होते . सुरुवातीला युद्धास उत्सुक नसलेला कैझर वेल्हॅम सुद्धा खरतर १९१८ मधे नविन वेस्टर्न आघाडी उघडायच्या गोष्टी करत होता. पण त्याचवेळेस जर्मनीमधले राजकिय वजन असलेले ज्यु जर्मनीमधे युद्ध थांबवायच्या मागे कार्यरत होते. त्यांच्या त्या युद्ध थांबवायच्या प्रयत्नांना यश आले कारण सामान्य जर्मन जनता ५ वर्षे चालु असलेल्या प्रदिर्घ युद्धाला व त्यात होणार्‍या जिवितहानीला व फायनांशिअल हार्डशिपला कंटाळली होती व हिंडेनबर्ग व लुडेंडॉर्फसारख्या अनुभवी जनरल्सना कळुन चुकले होते की १९१७ मधे अमेरिका युद्धात उतरल्यापासुन दोस्त राष्ट्रांचे पारडे मिलिटरी द्रुष्ट्या जड झाले होते व जर्मनीचा पराभव दुर नव्हता.

त्या ज्युंच्या प्रयत्नांची सांगता नोव्हेंबर १९१८ मधे जर्मनीमधे कैझर वेल्हॅम ला जर्मनी सोडुन हॉलंडमधे पलायन करण्यात झाली व जर्मनीमधे नविन वायमार प्रजासत्तक आले. त्या सरकारात ज्यु लोकांचा भरणा होता व सगळी महत्वाची खाती ज्यु लोकांना मिळाली. ताबडतोब त्या वायमार प्रजासत्ताकाने युद्धात शरणागती पत्करली व व्हर्सायच्या तहावर घाइघाइने सह्या करुन ते मोकळे झाले.

झाल. इथे हिटलरसारखे अनेक जर्मन प्रेमी ती गोष्ट सहज पचवु शकले नाही. त्यांच्या डोक्यात ते वायमार प्रजासत्ताक "नोव्हेंबरचे हरामखोर" म्हणुन संबोधले जाउ लागले. त्या सरकारात मेजॉरिटी असलेल्या ज्युंनी व्हर्साय तहातल्या अपमानकारक व जर्मनीला पुरते नेस्तनाबुत करणार्‍या अटिंवर सह्या ठोकुन जर्मन देश विकला व त्यांनी जर्मन अस्मितेला काळीमा फासला असे ते मानु लागले.

असे ज्यु धार्जिणे सरकार जर्मनीत आल्यावर रशिया, पोलंड, हंगेरी, ऑस्ट्रिया वगैरे देशातुन बरेच ज्यु जर्मनीत स्थलांतरीत झाले. ते स्थलांतर व व्हर्सायच्या तहामुळे जर्मनीतल्या बर्‍याच जणांना ज्यु लोक खुपु लागले व एक अँटी ज्यु मानसिकतेची सुरुवात जर्मनीमधे व एकंदरीत युरोपमधे सुरु झाली.

सुरुवातीला त्या वायमार सरकारला पोस्ट वर्ल्ड वॉर १जर्मनी स्थिरस्थावर करण्यात यश आले पण १९२९ मधे जेव्हा जागतीक मंदीची लाट आली तेव्हा त्याचा फटका जर्मनीतल्या लोकांनाही बसला. तोपर्यंत हिटलरच्या नाझी पार्टीचे बस्तान बसले नव्हते पण आता त्याने त्याच्या प्रचारसभांमधे ज्यु लोक जर्मनीत येउन रशियासारखे कमुनिस्ट राज्य स्थापन करायच्या मागे आहेत व तेच ज्यु जर्मनीला व्हर्सायच्या तहाद्वारे विकण्यास जबाबदार आहेत व तेच ज्यु आताच्या आर्थिक मंदिला कारणीभुत आहेत असे सांगायला सुरु केली व सबंध जर्मन जनतेला ज्युंच्या विरुद्धा भडकावायला अजुनच मदत केली. या सगळ्या प्रचाराचे कारण दुहेरी होते.. त्याला वायमार प्रजासत्तक उलथवुन जर्मनीचे चॅन्सेलर व्हायचे तर होतेच पण खरच मनोमनी तो ज्यु लोकच जर्मनिच्या पहिल्या महायुद्धाच्या पराभवाला कारणीभुत आहेत व त्यांनीच जर्मनिच्या पाठीत खंजिर खुपसला व देशाला व्हर्सायच्या तहाद्वारे विकला असेच तो मानत होता.

आणी त्या द्वेषाची परीणीती त्याला हिमलर, हेस, गोअरिंग ,गोबेल्स,हायड्रिक असे सवंगडी मिळाल्यावर व सुरुवातीला जर्मनीची व नंतर सबंध युरोपची सत्ता हातात आल्यावर होलोकॉस्ट मधे झाली.

शंतनु.. तु खुप चांगली माहीती दिलीस. पण ऑस्ट्रियाने सर्वात जास्त गुन्हे केले हे मला पटले नाही. तु जर राइज अँड फॉल ऑफ थर्ड राइश हे विलिअम शेररचे पुस्तक नीट वाचलेस तर तुला कळुन येईल की फेब्रुवारी-मार्च १९३८ मधे हिटलरने युद्धाशिवाय ऑस्ट्रिया बळकावला(नंतर त्याने झेकोस्लोव्हाकियातल्या सुडेटन प्रांतात जर्मन लोकांचा छळ होतो या कारणाखाली झेकोस्लोव्हाकियात आपले सैन्य घुसवुन झेकोस्लोव्हाकिया सुद्धा युद्धाशिवाय गिळंकृत केला). फेब्रुवारी १९३८ मधे ऑस्ट्रियाचा चॅन्सेलर शुशेनिगला त्याने बर्चेसगार्डनला बोलावुन घेतले व धमकी देउन परत पाठ्वले की ३ दिवसात जर का ऑस्ट्रियातल्या नाझी लोकांना त्यांच्या मंत्रिमंडळात मोक्याची पदे.. खासकरुन पुलिस चिफ.. जर दिली नाहीत जर्मन आर्मी ऑस्ट्रियावर चाल करेल व ब्रिटनचा लेचापेचा पंतप्रधान नेव्हिल चेंबरलेन व फ्रांसचा पुचाट पंतप्रधान दलांदिया हे दोघेही षंढासारखे बघत बसतील. शुशेनिग तो प्रस्ताव घेउन ऑस्ट्रियाचा अध्यक्ष मिक्लस कडे गेला पण प्रेसीडंट मिक्लसने तो प्रस्ताव झुगारला. पण मग मार्चमधे हिटलरने खरोखरच त्याचे सैन्य ऑस्ट्रियन बॉर्डरवर हलवले तेव्हा जिवितहानी नको म्हणुन मग मिक्लस हिटलरच्या दबावाला बळी पडला व हिटलरच्या होक्याप्रमाणे चेंबरलेन व दलांदियानी जर्मनीविरुद्ध काहीच पावले उचली नाहीत व असे युद्धाशिवाय ऑस्ट्रिया जर्मनिच्या घश्यात गेले.

मग मार्च १९३८ मधे व्हिएन्नामधे .. जिथे एकेकाळी तो भणंगासारखा रस्त्यावर भटकत होता व व्हिएन्नाच्या ज्या हॉटेलात तो चपरासी होता.. त्याच व्हिएन्नाच्या हॉटेलच्या बाल्कनीत उभे राहुन.. हिटलर जर्मनिच्या सैन्याकडुन व्हिएन्नाच्या रस्त्यावर सलामी घेत होता.

मग पुढची ७ वर्षे हिटलरच्या नाझी पार्टीची माणसेच ऑस्ट्रियाचे चॅन्सेलर, अध्यक्ष व सगळ्या महत्वाच्या पदांवर होती.. थोडक्यात ऑस्ट्रिया म्हणजे जर्मनीचेच एक एक्स्टेंशन म्हणुन दुसर्‍या महायुद्धात अस्तित्वात होते. ऑस्ट्रियाने केलेले अत्याचार म्हणजे ऑस्ट्रियातल्या जर्मन नाझी व एस एस गार्डनीच केलेले अत्याचार होते!

आणी शेवटी जाता जाता माझे एक मत.. असल्या स्मारकांनी म्हणा किंवा इतिहास लक्षात ठेवल्याने म्हणा.. होलोकॉस्टमधे झाली तशी जिनोसाइडची पुनरावृत्ती होणार नाही हे ठार चुक आहे! जोपर्यंत हे जग आहे तोपर्यंत तश्या प्रवृत्तीची माणसे जन्माला येतच राहतील. उदाहरणेच द्यायची तर १९९० च्या दशकात युगोस्लाव्हियाची जेव्हा छकले झाली तेव्हाच्या ब्लडी सिव्हिल वॉरमधे बास्निया मधे जे झाले त्याला जिनोसाइडच म्हटले पाहीजे. तसेच रवांडामधे १९९० च्याच दशकात जे झाले(टुट्सी व हुटु जमातीत) तेही जिनओसाइडच होते! वा सध्या सिरिया व इराकमधे जे चालु आहे तेसुद्धा जिनोसाइडच आहे!

Mukund Great Post...आता नाझी भस्मासुराचा स्दयास्त परत वाचले पाहिजे. बर्याच वर्षात वाचले नाही Happy

मुकुंद,

अत्यंत समर्पक कथन. धन्यवाद!

भारतात ज्याला आपण अनागोंदीचा कारभार म्हणतो त्यास जर्मनीत वायमार रिपब्लिक (Weimarer Republik) म्हणतात. या राज्यात सगळी आर्थिक सत्ता ज्यूंच्या हाती एकवटली होती. भोगलोलुपतेमुळे बर्लिनचा उकीरडा बनला होता. जगातलं कुठलंही गलिच्छ व्यसन बर्लिनमध्ये पैसा फेकल्यास उपलब्ध होत असे. आणि पैसा फक्त ज्यूंकडेच असे.

यातून हिटलरने मार्ग दाखवला. जर्मनांना जर्मन म्हणून अभिमानाने उभं राहायला शिकवलं. जाने. १९३० मध्ये हिटलर सत्तेत आला. लगेच मार्च महिन्यात अमेरिकी ज्यूंनी जर्मन मालावर बहिष्कार टाकला. "Judea declares war on Germany" अशा बातम्या जगभरातल्या वर्तमानपत्रांत झळकल्या. प्रसारमाध्यम क्षेत्रात बरेच ज्यू कार्यरत आहेत, हे वेगळे सांगणे नलगे. मात्र तरीही सर्वसामान्य जर्मन ज्यू हिटलरच्याच बाजूने होता. त्याला वायमार मधून कसलाही फायदा झाला नव्हता. मात्र ज्यू असल्याच्या नावाखाली लुटालूट करणाऱ्यांनी जर्मनीस हैराण करून सोडलं होतं.

यातून पुढे हिटलरने ज्या ज्यूंना जर्मनी सोडून फिलीस्तीन (पॅलेस्टाईन) मध्ये जायचं असेल त्यांना वैध मार्ग उपलब्ध करून दिला. पण नंतर लगेच दुसरं महायुद्ध सुरू झालं.

साधारणत: जर्मनांनी ज्यूंचा छळ केला असं चित्रं रंगवलं जातं. त्याची ही दुसरी बाजू.

आ.न.,
-गा.पै.

फोटो बघून भकास वाटतं. ह्यातून प्रत्यक्ष गेलेल्यांची मनस्थिती काय असेल?कल्पनेपलिकडचं आहे.

मुकुंद आणि टण्या ह्यांच्या पोस्टी खूप माहितीपूर्ण वाटल्या.

>>१९१४ मधे अमेरिकेत विड्रो विल्सन अध्यक्षपदासाठी निवडुन येण्यात ज्युंनी फार मोठा हातभार लावला होता.
मुकुंद, कृपया 'विड्रो'चं टायपो दुरुस्त कराल का? तसंच १९१४ मध्ये नव्हे तर १९१३मध्ये वूड्रो विल्सन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले.

मुकुंदजी अप्रतिम पोस्ट

हेच मला अपेक्षित होते..... फार छान माहिती

माबो वर लिहिण्याचा हाच उद्देश आहे.... मला जास्तित जास्त माहिती मिळत आहे... धन्यवाद

बापरे... हा धागा वाहता झाला !!?????

अ‍ॅडमिन..... प्लीज आधीच्या सुंदर प्रतिक्रिया द्या इकडे...

मोकीमी,

तुमची लेखमाला अतिशय सुंदर आहे. नुसती टुरिस्टगिरी न करता अगदी डोळसपणे त्या ठिकाणांमागचा इतिहास, स्थळवर्णन करत आहात ते विशेष!

टण्या आणि मुकुंद यांच्या पोस्ट मधुन नवीन माहिती कळली. त्याबद्दल आभार!

मो की मी, आधी प्रतिक्रिया देणार होते पण धागा वाहता होतं म्हणून थांबले. खूप सुरेख लिहित आहात! टण्या आणि मुकुंद ह्यांचे प्रतिसाद खूपच माहितीपूर्ण आहेत. ह्या जागांचं ऐतिहासिक महत्व फार मोठं आहे. ज्या दिवशी हा धागा आला त्याच दिवशी मी डीसी मधलं Holocaust museum बघितलं आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी WWII memorial ला भेट दिली. मला वाटते D-day (६ जून) च्या आसपास काहीतरी कार्यक्रम असावा कारण मी पोचले तेव्हा बस मधून WWII veterans आले होते. त्यांना wheelchairs वर स्वयंसेवक घेऊन येत होते आणि लोक दोन्ही कडेला उभं राहून टाळ्या वाजवीत होते. त्यातले एक आजोबा खूप उत्साही असल्याने स्वतःच्या पायांनी चालत आले आणि प्रत्येकाला shake-hand करत होते आणि प्रत्येकजण (बरीच लहान मुले) त्यांना thank you म्हणत होता. मी देखील हात मिळवला आणि thank you म्हणाले! It was a very touching and heart warming experience!
आज ह्याच विषयावरचा एक फार अप्रतिम व्हिडिओ पाहायला मिळाला. १८ मिनिटांचा आहे पण worth every minute. पाहाच!
http://waitbutwhy.com/2015/06/spectacular-video-putting-wwii-deaths-pers...

युद्ध किती वाईट असतं ह्याची कल्पना अशा जागी भेट दिल्याने येते! देव करो आणि ह्या जगात सर्वत्र शांती नांदो!

धन्यवाद अ‍ॅडमिन

माबोकर खुप सुरेख भर घालत आहेत. सगळ्यांच्या पोस्ट खुप हुरुप देणार्‍या आहेत....

पुढला भाग लौकरच टाकते

माझे पोस्ट हे कोणाचीही बाजु न घेता ऐतहासीक घटनांवर आधारुन लिहीलेले पोस्ट होते.

हिटलरने व त्याच्या नाझी पार्टीने होलोकॉस्टच्या रुपाने लक्षावधी इनोसंट ज्यु लोकांना असे मारुन जे अतिशय घ्रुणास्पद व अमानवी कृत्य केले आहे ते कदापीही जस्टिफायेबल ठरणार नाही.

(जिज्ञासा.. युद्ध वाइट असते हे मान्य पण कधी कधी युद्ध न करणे हे युद्ध करण्यापेक्षाही जास्त वाइट ठरु शकते.. वरच्या होलोकॉस्टचेच उदाहरण घ्यायचे तर १९३७-३८ सुमारास जर युरोपमधे चेंबरलेन व दलांदियाच्या ऐवजी जर कोण खमके पुढारी असले असते व हिटलर जेव्हा युद्धाशिवाय ऑस्ट्रिया-हंगेरी-झेकोस्लोव्हाकिया गिळंक्रुत करत व त्याचे हातपाय युरोपमधे पसरवत होता तेव्हाच त्याला युद्ध करुन थांबवले असते तर कदाचित हिटलर व नाझी पार्टीला वेळीच आवर बसला असता व पुढचे सगळे टळु शकले असते.

मध्यपुर्वेत अमेरिकेने एकतर्फी सुरु केलेल इराक वॉर माझ्या द्रुष्टीने मुळीच जस्टिफायेबल नव्हते पण सध्या आयसस जे काही मध्यपुर्वेत करत आहे ते थांबावायला खर तर (अमेरिकन जर स्वतःला जगाचे पोलिस समजत असतील तर!) अमेरिकेने आपली मिलिटरी माइट दाखवायला हवी. पण गेल्या १५ वर्षात मध्यपुर्वेत त्यांचे हात (व्हिएतनाम वॉर मधे पोळले तसे) पोळले गेले असल्यामुळे अमेरिकेकडे तश्या डिरेक्ट युद्धासाठी पॉलिटिकल विल सध्या नाही. त्यामुळे आयसस जे जे काही करेल त्यासाठी मध्यपुर्वेतल्या लोकांना मुकाट्याने सामोरे जावे लागणार आहे व त्यात अजुन किती निरपारध जिवांचा बळी जाइल हे आताच कोणीच सांगु शकणार नाही.. परत एकदा होलोकॉस्ट सारखे काहीतरी होउन गेल्यावर आपण त्याबद्दल लिहीत बसु हे एक कटु सत्य आहे..:( )

मुकुंद धन्यवाद. मला ही माहिती नविन आहे.

ज्यु लोकांना इतक्या तिरस्काराला का तोंड द्यावे लागले हा प्रश्न मला कायम पडतो आणि त्याचे एकच एक पटेल असे उत्तर काही मिळत नाही.

याच्या अनेक कारणांपैकी त्यांची आर्थिक सुबत्ता आणि त्यांची कट्टर धार्मिकता ही दोन कारणे कायम प्रमुख कारणे म्हणुन वाचायला मिळाली. पैकी धार्मिक कट्टरतेचा मुद्दा ब-यापैकी खरा असावा हे त्यांच्याबद्दलची माहिती वाचुन कळते. सगळे काही कोशेर हवे आणि खायला फक्त एक वेळचेच मिळ्त असेल तरी ते कोशेरच मिळायला हवे हा आग्रह, असे अन्न मिळण्याची जागा राहण्याच्या जागेपासुन अतिशय लांब असली तरी तिथपर्यंत पायपिट करुन ते अन्न मिळवायचा आग्रह, पोशाखाची,प्रार्थनेची विशिष्ट पद्धत आणि या गोष्टींबद्दलची गुप्तता यामुळे बाकीच्या समाजात त्यांच्याबद्दल थोडे संशयी मत होत असेल असे नेटवरची माहिती वाचुन वाटले.

पण हे आर्थिक सुबत्तेचे कारण मात्र निटसे कळत नव्हते. कारण खुप ठिकाणी ही मंडळी घेटोमध्ये राहात होती, खायप्यायचे वांधे होते, मैलोनमैल पायपिट करुन कोशेर अन्न आणावे लागे हेही वाचायला मिळते. त्याना कुठुन कुठुन पकडुन आणले ते वाचले तर अर्ध्याहुन अधिक लोक अतिशय दारिद्र्यात जगत होते आणि अशा भुके कंगाल, गरिब माणसांना हिटलरने पकडुन आणुन मारले असा समज होतो. ह्या माणसांना मारुन काय कमावले हा प्रश्न निर्माण होतो. ह्यांच्यापासुन कोणाला काहीच धोका नव्हता ना कोणाला काही फायदा.

तुमच्या प्रतिसादावरुन आर्थिक सुबत्तेचे कारण कळायला मदत होते. धन्यवाद.

कोशेर हवे आणि खायला फक्त एक वेळचेच मिळ्त असेल तरी ते कोशेरच मिळायला हवे हा आग्रह, असे अन्न मिळण्याची जागा राहण्याच्या जागेपासुन अतिशय लांब असली तरी तिथपर्यंत पायपिट करुन ते अन्न मिळवायचा आग्रह, पोशाखाची,प्रार्थनेची विशिष्ट पद्धत आणि या गोष्टींबद्दलची गुप्तता
>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>
कोशेर?? म्हणजे?
पोशाखाची,प्रार्थनेची विशिष्ट पद्धत आणि या गोष्टींबद्दलची गुप्तता >>>>> नक्की कशी
माहिती असेल तर सांगा .. जाणुन घ्याव वाटत आहे..

Pages