रडीयल अ'सुरी' कहानी (Movie Review - Hamari Adhuri Kahani)

Submitted by रसप on 14 June, 2015 - 00:11

चित्रपट सुरु. एक बस कुठल्याश्या नयनरम्य रस्त्यावरून जाते आहे. आजूबाजूला सुंदर अशी उंच उंच झाडं आहेत. बसमध्ये एका खिडकीशी विद्या बालन बसली आहे. (तिचे केस रंगवून तिला म्हातारी दाखवायचा एक केविलवाणा प्रयत्न अयशस्वी ठरला आहे, असा संदर्भ आपल्याला वीसेक मिनीटांनंतरच्या एका दृश्यात लागणार असतो.) तिचे डोळे आसवांनी भरलेले आहेत. चेहऱ्यावर बारा वाजलेले आहेत. बस थांबते. विद्या एकटीच त्या निर्जन रस्त्यावर उतरते. दिग्दर्शक खूपच हुशार आहे. त्याला माहित असतं की हा भूभाग भारतातला आहे, असं कुणाला वाटणं केवळ अशक्य आहे. म्हणून त्या बसवर बटबटीत अक्षरांत 'छत्तीसगड' असं लिहिलेलं असतं, जे जाता जाता ती बस व्यवस्थित दिसेलसं दाखवून जाते. ही पहिली पाचेक मिनिटं खरं तर एक 'हिंट' म्हणून आहेत. ह्यावरून आपल्याला समजुन येऊ शकतं की पुढील दोनेक तास डबडबलेले डोळे, ओघळणारे अश्रू, ओढलेले चेहरे वगैरेच्या जोडीला अविश्वसनीय, अशक्यप्राय संदर्भ असा सगळा एक अतिप्रचंड रडीयल मेलो-ड्रामा आपल्या माथी येणार आहे. सिगरेटच्या पाकिटावर असणाऱ्या 'वैधानिक चेतावनी' प्रमाणे ही एक हिंट आहे, जेणेकरून ह्या अपायकारक चित्रपटाला सुज्ञ प्रेक्षक वेळीच सोडून देईल. पण सुज्ञ असला, तरी काय झालं ? पैसे देऊन तिकीट घेतलेलं असतं, त्यात बाहेर बिन-पावसाचा ओलाचिक उकाडा ! म्हणून प्रेक्षक 'रडीयल तर रडीयल ही कहानी बघूच' असा विचार करून एअरकंडीशन्ड चित्रपटगृहात बसून राहतो.

तर होतं काय की, (दाखवलेल्या घटनाक्रमानुसार अंदाजे) १९९४-९५ च्या आसपास मुंबईत एका पुरातन विचारांच्या कुटुंबातल्या 'वसुधा'चं (विद्या बालन), तितक्याच पुरातन विचारांच्या 'हरी'शी (राजकुमार राव) तिच्या आवडीविरुद्ध लग्न होतं. हरीची प्रेम व्यक्त करण्याची, दाखवण्याची पद्धत असुरीच असते. तो वारंवार तिला तिच्या स्त्री व स्वत:च्या पुरुष असण्याची जाणीव करून देत असतो, तिच्या हातावर जबरदस्तीने स्वत:चं नाव गोंदवतो, (इथे 'हरी'चा 'हरि' केला आहे. पण आजकाल शाळेतही शुद्धलेखनाचे मार्क कापत नाहीत, त्यामुळे हे चालवून घेऊ.), बंधनं घालतो वगैरे. मेलो-ड्रामा ! (अग्निसाक्षी आठवला का ?) पण हे सगळं एकच वर्ष. एक दिवस तो कामानिमित्त ओरिसात जातो, तो गायबच होतो. वसुधाच्या कडेवर एक महिन्याचा मुलगा 'सांझ' (हे मुलाचं नाव आहे, हे नव्यानेच समजलं) सोडून. ज्याप्रमाणे पृथ्वीसाठी एकच आभाळ असतं, त्याचप्रमाणे 'वसुधा'साठी एकच 'हरी' असतो. तिच्या गळ्यातलं मंगळसूत्र हे तिच्या प्राणाहून मौल्यवान असतं. तिच्यासाठी तिचा पती हाच परमेश्वर, सर्वस्व वगैरे असतो. त्यामुळे ती त्याची वाट पाहत ५ वर्षं काढते. 'अडली वसुधा हरीचे पाय धरी' असा न्याय, ठार-मेलो-ड्रामा ! मग एके दिवशी तिच्या आयुष्यात 'आरव' (अनेक चित्रपटांत परस्त्रीस नादी लावणाऱ्या नरपुंगवाची भूमिका साकारण्याचा तगडा अनुभव असलेल्या 'इम्रान हाश्मी'ने साकारलेला) येतो. त्याचीही एक वेगळी इमोशनल कहानी असते ! त्याच्या आईची कहानी आणि वसुधाची कहानी एकसारखीच असते ! तिलासुद्धा तिच्या नवऱ्याने टाकलेलं असतं आणि लहानग्या आरवसाठी ती कॅब्रे गायिका बनते. तिथला मालक तिचे अनेकदा अपमान करत असतो. एकदा जेव्हा ती तिला आणि आरवला आधार देणाऱ्या 'जीवन' अंकलसाठी दारू चोरते, तेव्हा तो तिला धक्के मारून हाकलून देतो. तेव्हाच पोरगेला आरव शपथ घेतो, दुनिया मुठ्ठी मे करण्याची ! तत्क्षणी-मेलो-ड्रामा, रेस्ट इज हिस्टरी ! (दीवार आठवला का ?)

पाच वर्षं गायब असलेला हरी 'योग्य वेळी' परतणार असतो, परततोच ! ही पाच वर्षं तो कुठे असतो ? परत आल्यावर, आपल्या सुविद्य पत्नीच्या नव्या नात्याबद्दल कळल्यावर तो काय करतो ? क्या बीतती है उस पर ? वगैरे बाबी किरकोळीत उरकून घेतल्या आहेत. बहुतांश वेळ वसुधा-आरवची इमोशनल तत्वज्ञानी डायलॉगबाजी चालते, अधूनमधून कुणी ना कुणी मुळूमुळू किंवा ओक्साबोक्षी किंवा हमसाहमसी, मनातल्या मनात किंवा गाडीतल्या गाडीत किंवा दाढीतल्या दाढीत अश्रूदान करत राहतं. सगळ्याच्या अखेरीस ही अधुरी कहानी एकदाची 'सुफळ संपूर्ण' झाल्यावर 'समोरचा पडदासुद्धा निथळत असावा की काय', असा भास झाल्यावाचून राहत नाही.
humari-adhuri-kahani.jpg
'बॉबी जासूस' मध्ये भरभक्कम देहयष्टीची विद्या बालन आपण चालवून घेतली होती, कारण त्या व्यक्तिरेखेला नाजूक दिसण्याची गरज नव्हतीच. पण इथे मात्र विद्याचं 'पडदा व्यापून उरणं' डोळ्यांना खुपतं. बरं, सुरुवातीपासून शेवटपर्यंत जागोजाग टिपं गाळण्याव्यतिरिक्त काहीच न करणाऱ्या ह्या तद्दन फुसक्या भूमिकेला स्वीकारून विद्यासारख्या ताकदीच्या अभिनेत्रीने काय साध्य केलं असावं, कुणास ठाऊक? सरतेशेवटी 'ए मुहब्बत तेरे आंसुओ पे अब हंसी उनको आने लगी हैं' अशी कथा होऊन ती रडायला लागली की प्रेक्षक हसायला लागतात !

'इम्रान हाशमी' हा माझ्या मते एक बरा अभिनेता आहे, पण त्याला स्वत:ला आव्हान देणं आवडत नसावं की काय, असं वाटतं. त्याचा 'आरव' त्याच्या बहुतेक चित्रपटांत, नशीब चांगलं नसेल तर, आपण पाहिलेला आहे. तोच चेहरा, तेच भाव, तीच देहबोली, तीच संवादफेक, अरे बाबा, तुझा तुलाच कंटाळा कसा येत नाही ? त्यातल्या त्यात एकच वेगळी गोष्ट म्हणजे, परंपरेला जागून इथे त्याने कुठला बेडसीन तापवलेला नाही ! ही वेगळी गोष्ट उलटूसुद्धा शकते कारण लोकांना इम्रानला पाहण्यापेक्षा त्याची विशिष्ट दृश्यं पाहण्यात जास्त रस असावा !

'राजकुमार राव' च्या 'हरीदर्शना'साठी प्रेक्षक आसुसलेला असतो आणि शेवटपर्यंत तहानलेलाच राहतो. माथेफिरू, वेडगळ, मानसिक रोगी 'हरी' त्याने ताकदीने उभा केला आहे. पण फुटकळ रडारडीत रमलेले लेखक-दिग्दर्शक ह्या हरीला एखाद्या आधीच विलंबाने धावणाऱ्या ट्रेनला सायडिंगला टाकावं, तसं सायडिंगला टाकून ठेवतात. तरी त्याला जेव्हा जेव्हा 'सिग्नल' मिळतो, तेव्हा तेव्हा बिचारा जीव तोडून पळतो. पण सगळं मुसळ केरातच ! चित्रपटाची कथा 'हरी'च्या डायरीत बंदिस्त आहे. ही डायरी 'वसुधा-हरी'चा लग्न झालेला मुलगा 'सांझ' वाचतो आहे आणि त्यांत सगळ्यात कमी कुणाविषयी लिहिलं आहे ? दस्तूरखुद्द !

ट्रेनच्या सायडिंगला टाकण्यावरून आठवलं, शीर्षक गीत चांगलं आहे; पण 'हमारी अधुरी कहानी' हे पालुपद आणि ध्रुवपदाचा उर्वरित भाग ह्याचा संबंध म्हणजे पुलंच्या भाषेत 'बिपीशायला जायपीचा डबा' लावल्यासारखा आहे. राहत फतेह अली खानने गायलेलं 'जरुरी था' सुद्धा चांगलं वाटलं. ही दोन गाणी त्यातल्या त्यात दिलासा देतात. कारण इतर गाणी टिपिकल उच्चरवात केलेला भावनिक उत्सर्ग वाटतात. 'अरिजित सिंग'चा नाक चोंदल्यासारखा आवाज सध्या लोकप्रिय आहे. त्याचा इथे पुरेपूर उपयोग करून घेतलेला आहे.

लेखक-दिग्दर्शकांनी आपापली अक्कल गहाण टाकलेली असावी की काय, असा संशय वारंवार येतो. ९४-९५ सालच्या कथेत पडद्यावरील पात्रं मोबाईल वापरताना दिसतात, नुसते मोबाईल नाही, तर स्मार्ट फोन्स, आय-फोन्स ! त्यावर ते फोटो काढतात, एकमेकांना पाठवतात ! एका दृश्यात जंगलातील दुर्गम भागात बसलेला हीरो आपल्या 'मॅक'वरून एक व्हिडीओ फाईल अक्षरश: १-२ सेकंदांत पाठवतो, तेव्हा क्षणभर असा विचार मनात येतो की, 'कुठे आहे हे जंगल? मला तिथे जाऊन राहायचंय ! २० वर्षांनंतर आजही, शहरात राहूनसुद्धा व्हिडीओचं 'बफरींग' सहनशक्तीचा अंत पाहतं आणि तिथे त्या काळात असा भुर्रकन व्हिडीओ जातोय ?' रस्त्यांवर दिसणाऱ्या गाड्या वगैरे दुय्यम गोष्टी, केशभूषा, वेशभूषा इ. तिय्यम बाबी तर त्यांच्या गावीही नसाव्यात. त्यांच्या मते ९४-९५ नंतर आजपर्यंत भारतीय किंवा एकंदरीतच जागतिक जीवनशैलीत (असंही काही असू शकतं, बरं का?) काही बदल झालाच नसावा. छत्तीसगडच्या जंगलात 'लिली'चं शेत पाहून तर ह्या अद्वितीय कल्पनाशक्तीला मी मनापासून हात जोडले.

हे सगळं पुरेसं नसावं म्हणून की काय, पांचट शब्दांचे मळकट संवाद नकली नाट्य निर्माण करण्याचा हास्यास्पद प्रयत्न करत राहतात. 'इसी काम से मेरे घर का चूल्हा जलता है..', 'सीता तो तू जनम से है, राधा कब बनेगी..' वगैरे पन्नास वर्षांपासून रगडून रगडून बुळबुळीत झालेली वाक्य ठराविक काळानंतर प्रेक्षकाच्या तोंडावर फेकली जातात.

सहनशक्तीचा कडेलोट झाल्यावर उमगलेला सारांश हाच की लेखन, दिग्दर्शन, अभिनय, संवाद, छायाचित्रण वगैरे सर्व आघाड्यांवर सपशेल गंडलेली ही मोहित 'सुरी'ची रडीयल कहानी उणीपुरी एकशे तीस मिनिटं प्रेक्षकावर 'असुरी' अत्याचार करते आणि पिंजऱ्यात कोंडलेला पक्षी दार उघडल्याबरोबर झटक्यात बाहेर पडून मोकळा श्वास घेईल, तसा 'एक्झिट' चं दार किलकिलं झाल्याबरोबरच सुज्ञ प्रेक्षक तडकाफडकी बाहेर पडून मोकळा श्वास घेतो.
एकशे तीस मिनिटं आणि काही शे रुपडे अक्कलखाती जमा करतो.

रेटिंग - *

- रणजित पराडकर

http://www.ranjeetparadkar.com/2015/06/movie-review-hamari-adhuri-kahani...

हे परीक्षण मराठी दैनिक 'मी मराठी लाईव्ह' मध्ये आज १४ जून २०१५ रोजी प्रकाशित झाले आहे :-

15 - Hamari Adhuri Kahani - 14-Jun-15.JPG

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वाटलच होत मला ,इव्हन ट्रेलर मधली गाणी पण इतकी रडकी की माझ्या मैत्रीणी जेव्हा हा चित्रपट बघयचा आहे अस म्हणायच्या तेव्हा मी त्यांना "अग ह चित्रपट तुम्ही कसा बघु शकता यार्,मला तर गाणी बघुनच antidepressants घेण्याची इछ्छा होते"अस म्हणायचे:)

जर ईम्रान हाशमीचा एकही सीन नाही तर एक स्टार का दिलाय.. की किमान एक स्टार तरी द्यावाच अशी पद्धत असते.

(असह्य झाली तरी ती शेवटी ती 'विद्या बालन' होती) + (राजकुमार रावने खूपच मनापासून काम केलं आहे) + (दोन गाणी बरी आहेत. पैकी 'जरुरी था' तर मला आवडलं असावं, असा मला संशय आहे !) = एक स्टार आहे. Happy

विद्या बालन चांगली अभिनेत्री आहे पण ग्रेट वगैरे नाही. आजच्या घडीच्या प्रियांका, अनुष्का, आणि आता ती आपली कंगना यांच्या मी मागेच पकडेन तिला. दिपिका आणि करीना या देखील उत्तम अभिनेत्र्या आहेत. विद्याने यांच्यासारखे काही कमर्शिअल सिनेमे करण्याची गरज आहे, हे असले चित्रपट स्विकारणे निव्वळ अभिनयाचा वेगळा ठसा ऊमटवायच्या सोसातून झाले आहे. अर्थात कमर्शिअल सिनेमांसाठी तिला आपल्या टिपिकल काकू लूक मधून बाहेर यावे लागेल, आणि इथे तिच्या फिटनेसचाच नाही तर अभिनयाचाही खरा कस लागेल.

>> विद्या बालन चांगली अभिनेत्री आहे पण ग्रेट वगैरे नाही. आजच्या घडीच्या प्रियांका, अनुष्का, आणि आता ती आपली कंगना यांच्या मी मागेच पकडेन तिला. <<

इथे माझी मती खुंटते. __/\__

इथे माझी मती खुंटते. __/\__

>>
इथे आख्खी मायबोली ' येडी ' झाली आहे तर तुम क्या चीज हो ?

मती खुंटायची गरज नाही, ती चांगली अभिनेत्री आहे हे मी कबूल करतो आहेच. पण त्यापेक्षाही तिला जास्त रेट केले जाते. विविध भुमिकांमध्ये तिला अजून सिद्ध करायचे आहे. क्रिकेटच्या भाषेत सांगायचे तर एखादा फलंदाज भारतीय खेळपट्ट्यांवर चमकतो आणि आपण लगेच सचिनद्रविडशी त्याची तुलना करतो पण तेच परदेशी त्याचे तंत्र तोकडे पडते. सिनेमांमध्येही एक दोन भुमिका तुमच्या हिट गेल्या तर कौतुक सुरू होते पण नंतर ठराविक छापाच्या भुमिका करतच आपले बस्तान बसवायला तुम्ही शाहरूख-सलमान असावे लागतात.
असो, येणारा काळ सांगेल तिच्याबद्दल. माझ्यामते ती तब्बूसारखी थोडीफार काळाने लुप्त होईल.

आणि हो. कमर्शिअल सिनेमांसाठी लागणारा एक्स फॅक्टर तिच्यात मिसिंग आहे, म्हणून तिथे तिच्या अभिनयाचा कस लागेल असे म्हणालो आहे.

अरारा !
मुळात विद्या बालन त्या हाशमी सोबत काम का करते ..
एवढी गुणी कलाकार आहे पण कधी कधी एकदम मंदबुद्धी सारखी वागते .. Uhoh

डर्टी पिक्चर साठी विद्याने वजन वाढवले होते चित्रपट संपुन रिलिज होउन दोन एक वर्ष होत आली तरी विद्याबाई अजुन डर्टी पिक्चरच्याच वजनात आहे. दुसरीकडे सोनाक्षी सिन्हासारखी गोलमटोल अभिनेत्री देखील स्लीम ट्रेंडी होत आहे. जशी भुमिका आहे तसे बनण्यात काहीच चुकिचे नाही परंतू मी ट्रेंडच्या विरुध्द जाणारच हा गर्व कधी कधी नुकसान करुन जातो. तो सध्या विद्याच्या बाबतीत होत आहे.

आत्ताच एके ठिकाणी वाचलं की, 'हरी'च्या भूमिकेसाठी राजकुमार रावने २० दिवस अंघोळ केली नाही !
आणि 'हरी' त्या कळकट वेशभूषेत फक्त १५-२० मिनिटंच आहे. जेव्हा तो 'अज्ञातवासातून' परत येतो तेव्हा. त्या १५ मिनिटांसाठी त्याने २० दिवस अंघोळ केली नाही ! Uhoh

. त्या १५ मिनिटांसाठी त्याने २० दिवस अंघोळ केली नाही > चुक

१५ मिनिटांचा सीन हा पुर्ण होण्यास कधी कधी २-३ दिवस देखील लागतात.

इमरान हाशमीबरोबरच विद्याने डर्टी पिक्चर हा तिच्या करीअरमधील माईलस्टोन चित्रपट दिलाय.
ईथे खरे तर मला प्रश्न पडलाय की चित्रपट असा रडका ड्रामा असेल तर ईमरान हाशमी ने अश्या भुमिकेत असलेल्या विद्या बरोबर काम का केलाय, कारण त्याचा स्वताचा असा एक ऑडीयन्स आहे.

दिनेश्क | 14 June, 2015 - 13:50 नवीन
. त्या १५ मिनिटांसाठी त्याने २० दिवस अंघोळ केली नाही > चुक

१५ मिनिटांचा सीन हा पुर्ण होण्यास कधी कधी २-३ दिवस देखील लागतात.

>>
मालक, हे माहित आहे हो मला ! २-३ च काय, जास्तही लागू शकतात ! पण पडद्यावर जो गेट अप १५ मिनिटंच दिसणार आहे, त्यासाठी इतकी मेहनत घेतली, असं म्हणायचं होतं.

रसप साहेब, पडद्यावर तो गेटअप किती मिनिट दिसणार आहे हे "एडीटर" ठरवतो. प्रत्यक्षात सीन बराच लांबीचा देखील असु शकतो. एडीटरला त्यातले काही अनावश्यक भाग संवाद काढायचे असल्यास तेवढा भाग कट करुन सीन कमी लांबीचा बनवू शकतो. त्यामुळे पडद्यावर किती मिनिट दिसणार आहे याऐवजी सीन प्रत्यक्षात किती तासाचा शुट होणार आहे याला महत्त्व दिले जाते.

धन्यवाद

मस्त चुरचुरित परीक्षण....आवडले.
मूवी नक्किच रडियल असणार यात शंका उरलेली नहिए. तुमच्या या लेखाने आमचा एक हेलपाटा आणि तीन चार तास वाचले.

आजुन एक जबरदस्त डायलॉग. ...इम्रान ची आई विद्याला पहिल्यांदा पाहून म्हणते "बेटे यह बंजारन कौन है

रसप, लेखन आवडले.

-० - -० - -० - -० - -० - -० - -० - -० - -० -

ऋन्मेऽऽष | 14 June, 2015 - 11:19 नवीन
विद्या बालन चांगली अभिनेत्री आहे पण ग्रेट वगैरे नाही. आजच्या घडीच्या प्रियांका, अनुष्का, आणि आता ती आपली कंगना यांच्या मी मागेच पकडेन तिला. दिपिका आणि करीना या देखील उत्तम अभिनेत्र्या आहेत.

अभिनेत्री या शब्दाचं अनेकवचन मूर्ती या शब्दाप्रमाणे तेच होतं. म्हणजे अभिनेत्री या शब्दाचं अनेकवचन अभिनेत्री असेच आहे.

बाकी चालुद्या. Rofl

Sorry for Vidya. She should select films carefully now.>>> हो खरच.

>> विद्या बालन चांगली अभिनेत्री आहे पण ग्रेट वगैरे नाही. आजच्या घडीच्या प्रियांका, अनुष्का, आणि आता ती आपली कंगना यांच्या मी मागेच पकडेन तिला. <<

इथे माझी मती खुंटते.>>> माझी पण

बाकी रसप तुमच्या परिक्षणांची मी फॅन आहे Happy

विद्या बालन आवडते आणि इम्रान हश्मी पण . दोघांचाही अभिनय आवडतो. खूप अपेक्षा होत्या या सिनेमा कडून पण आता नाही बघणार.

Pages