Hola.......स्पेन!!.......भाग ३.

Submitted by पद्मावति on 11 June, 2015 - 06:37

Sevilla ...स्थानिकांच्या शब्दात सेविया.
आंड्यूल्यूशियाच्या राजधानिचे हे शहर Guadalquivir या नदीच्या तीरावर वसलेले आहे. स्पेनच्या इतिहास आणि संकृतीचं एक मानचिन्हं म्हणून याची ओळख आहे.
साधारण 206 B.C. रोमन राज्यकर्त्यांंनी याचं Hispalis हे नाव ठेवलं. रोमन काळात हे शहर वैभवाच्या शिखरावरती पोहोचले होते. मग नंतर इ.स.७०० नंतर अरबांनी याचा कब्जा घेतला आणि नाव ठेवलं Isbiliah. त्यानंतर जवळजवळ पाचशे वर्षं इथे इस्लामी सत्ता होती. या काळात पण हे शहर समृद्धशाली होते. तेराव्या शतकाच्या मधे फर्डिनॅंड-तिसरा याने सेविला जिंकून घेतले आणि तिथे ख्रिस्ती धर्माची स्थापना केली.
आताच्या सेविला मधे सुद्धा गत वैभवाच्या खुणा स्पष्टपणे दिसून येतात.

ग्रॅनडा पासून सेविला ला जायला अडीच ते तीन तास लागतात. आधी बस आणि मग ट्रेन, अगदी आरामदायी प्रवास आहे. इथे पोहोचताच मात्र जे धो धो पाऊस सुरू झाला, इतका जबरदस्त की टॅक्सी मधून आमच्या अपार्टमेंट मधे दारात पोहोचेपर्यंत आम्ही आमच्या समानासकट पार भिजून गेलो होतो. अपार्टमेंट मात्र सुरेख होते. दोन बेडरूम्स, स्वयंपाकघर आणि घरात वॉशिंग मशीन सुद्धा होते.
स्पेन मधे आमच्या लक्षात आले की बाकी सर्व युरोप च्या मानाने इथे किमती फार कमी आहेत. हॉटेल, टॅक्सी, रेस्टोरेंट्स, ट्रेन तिकिटे, अगदी सर्व स्वस्त आणि मस्तं...

पाऊस थांबल्यावर आम्ही बाहेर पडलो तर स्वच्छ उन पडलेले होते. आमच्या घरापासून चालत Plaza Nueva ला गेलो. हवा मस्तं होती मग जरा तिथेच रेंगाळलो.
ह्या चौकाच्या चारी बाजूने निरनिराळी दुकाने आहेत, सगळ्या टॉप ब्रॅण्ड्स ची..आणि गाड्यांना वाहतुक बंद! फक्तं केवळ पायी चालणार्‍यांसाठीच रस्ता खुला आहे. त्यामुळे लहान मुलं बिनधास्त खेळत होती आणि त्यांचे आईबाप तिथेच घोळका करून गप्पा करत होते. कोणी कुत्र्याला फिरवत होते, कोणी आजी आजोबा बाकावर निवांत बसले होते.....कोणाला काही घाई ना काही गडबड....छान लाइफ! अगदी आरामशीर! हा सेविला चा अगदी मध्यवर्ती भाग. इथून पुढे चालत गेलं की गावाचा मुख्य रस्ता लागतो. रस्त्याच्या कडेनी लागून अनेक कॉफी शॉप्स, दुकानांची रेलचेल आहे. डावीकडे येथील जगप्रसिद्ध सेविला कॅथेड्रलची भव्य इमारत दिसते. या रस्त्याने नुसतं चालत जरी गेलात तरी अगदी छान वेळ जातो.

sevilla 1_0.jpgsevila 2.jpgsevila 3.jpg

दुसरा दिवस- सकाळी आम्ही कालच्याच चौकाच्या पुढून ट्राम पकडली. ही ट्राम गावाच्या अगदी मध्यभागातून धावते आणि सगळ्या प्रमुख प्रेक्षणीय ठिकाणांना घेऊन जाते, हि फार सोयीची आहे. ट्राम मधून आम्ही मारिया लूयीसा पार्क मधे गेलो.

पार्क तर छान आहेच पण या पार्कचा मुख्य भाग आहे, Plaza de Espana. आतिभव्य आणि अतिशय सुंदर असा हा अर्धगोलाकार चौक आहे. मधोमध कारंजे आहे, बसायला बेन्चेस आहेत आणि अर्धगोलाकार असलेल्या या प्लाज़ा ला खेटून वाहणारी एक मोट आहे. याच्यामधे नौकाविहाराची पण सोय आहे. बोट आपणच वल्हावायची आणि पाण्यावर अलगद तरंगत शांतपणे आसपासचा हा सुंदर परिसर अनुभवायचा.
भरपूर वेळ असेल तर संध्याकाळी अंधार होईपर्यंत तिथे जरूर थांबा. रात्री हा सगळा भाग दिव्याच्या रोषणाई ने उजळून जातो. इथल्या इमारतींवर, पाण्यावर वेगवेगळ्या रंगाचे अगदी मंद प्रकाशझोत सोडलेले असतात...सगळा माहौल अगदी मन्तरलेला झालेला असतो...

sevila 4.jpgsevila 5.jpgsevilla plaza.jpg

स्पेन मधे येऊन Flamenco चा एखादा कार्यक्रम बघितला नाही असे कसे होणार? जवळच एका ठिकाणी त्याच रात्री Flamenco Dance Show होता तेव्हा तिथे जाऊन पोहोचलो. तिकिटे काढून आत गेलो.

थियेटर ची इमारत बाहेरून साधारणच होती. आत गेल्यावर आपल्याकडे जुन्या वाड्यांची कशी रचना असते नं तशी काहीशी होती. म्हणजेतिन्ही-चारी बाजूंनी ओसर्या, वरती सज्जे आणि मधे लहानसे आंगण किंवा चौक. या चौकात एक रंगमंच आणि त्याच्या तीन बाजूंनी खुर्च्या, साधारण एका वेळेस चाळीस माणसे बसतील इतक्याच.
कलाकार तीन चार होते. त्यामधे दोन तीन नर्तक, गिटार वादक, आणि गायक.

सुरुवातीला अगदी शांत गतीने नृत्य सुरू झाले. हळूहळू गायकाचा सूर चढा व्हायला लागला तसा नृत्याचा ठेकाही. सर्व नृत्याला, गाण्याला साथ होति फक्त पायाच्या आणि टाळ्याच्या ठेक्यांची. नाचणार्यांच्या पायात टॅप डान्सिंग चे शूज होते. त्या टॅप चा, गिटार चा आणि टाळ्यांचा असा तो सरमिसळ झालेला ठेका कानाला अगदी मस्तं वाटत होता. त्यांचे गाण्याचे शब्द तर समजत नव्हते पण त्या संगीतावर असलेला अरेबिक प्रभाव मात्र नक्की जाणवत होता.

fleminco.jpg

कार्यक्रम झाल्यावर बाहेर आलो तेव्हा शो चा मॅनेजर स्वत: दाराशी उभा राहून प्रक्षकांना निरोप देत होता. आमचे भारतीय चेहेरे बघून आम्हाला तो आमच्याकडे आला. त्याने आम्हाला माहिती दिली जी माहिती दिली की अशी की कित्येक शतकापूर्वी भारतातून भटके, दरवेशी जेव्हा मजल दरमजल करीत स्पेन मधे गेले त्यांच्याबरोबर त्यानी अर्थातच त्यांची कला, नृत्य हे ही आणले. त्यानीच कथक या नृत्यप्रकाराची स्पेन ला ओळख करून दिली. त्यामुळे Flamenco चं मूळ हे कथक मधे आहे असे इथले लोक मानतात.
आता ही माहिती किती खरी किंवा खोटी माहीत नाही पण त्याने हे सांगितल्यावर माझ्याही लक्षात आलं की खरंच या दोन प्रकारात खूप समानता आहे...तशीच पायाचा ठेका आणि तशाच हाताच्या बोटांच्या मुद्रा... असो, पण एक सुंदर अनुभव घेऊन आम्ही बाहेर पडलो.

( शेवटचे दोन फोटो जालावरून साभार घेतले आहेत.)
क्रमश:

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

व्वा! मन प्रसन्न झाले . स्पॅनिश मुली पण दिसायला खूप गोड आणी सुन्दर असतात, थोडा मॅनली लुक असतो. ते छोटे कॅनॉल छान वाटले.