मराठे ज्वेलर्स बीएमएम सारेगम २०१५ - नील नाडकर्णी (एडीसन, न्यू जर्सी) यांच्याशी गप्पा

Submitted by समीर on 8 June, 2015 - 14:12

मराठे ज्वेलर्स बीएमएम सारेगम २०१५ अंतिम फेरीत आपली निवड झाल्याबद्दल सर्वप्रथम मन:पूर्वक अभिनंदन.

Neel NAdkarniMB.jpg१. तुम्ही मुळचे कुठले ?

माझा जन्म एडिसन, न्यू जर्सी इथे झाला आणि मी त्याच शहरात लहानाचा मोठा झालो. माझे आईवडील अमेरिकेला येण्यापूर्वी मुंबईला राहत असत. पण माझ्या आयुष्यात मी फक्त ४-५ वेळाच मुंबईला जाऊन आलो आहे. मागच्या वर्षी मी Carnegie Mellon University (Tepper Business School)मधून BS, Business झालो.

२. तुम्हांला संगीताची गोडी / आवड कशी आणि केव्हा लागली ?

माझ्या आईवडिलांना संगीताची प्रचंड आवड आहे. विशेषकरून त्यांना मराठी आणि हिंदी भावगीते आणि चित्रपटगीते ऐकायला आवडतात. त्यामुळे अगदी पाळण्यात असल्यापासून माझ्या कानावर मोहम्मद रफी, किशोरकुमार, मन्ना डे, सुधीर फडके, हृदयनाथ मंगेशकर, लता मंगेशकर, आशा भोसले आणि सुमन कल्याणपूर यांची गाणी पडत आहेत. या गाण्यांमध्ये वाजणार्‍या वाद्यांचेसुद्धा मला खूप आकर्षण वाटत असे. मी २-३ वर्षांचा असताना गाडीच्या मागच्या सीटवर कारसीटमध्ये बसलो असताना माझे वडील मला नेहमी विचारायचे “नील, आता काय वाजतंय सांग?” आणि मी बहुतेक वेळी अचूकपणे सांगायचो – संतूर, सतार, सरोद, बासरी, पेटी, सारंगी, वायोलिन इत्यादी.

३. संगीताचे शिक्षण तुम्ही किती वर्ष घेत आहात? आणि कोणत्या प्रकारचे संगीत शिक्षण चालू आहे?

मी साधारण ३ वर्षांचा असताना वायोलिनचे धडे घेतले. साधारण ५-६ वर्षांचा असल्यापासून मी गायनाचे धडे घेत आहे. मी हिंदुस्तानी शास्त्रीय आणि वेस्टर्न क्लासिकल (Opera) आणि क्वायर संगीताचे धडे घेतले आहेत. मी पिआनो आणि की बोर्डच्या बरोबर तबल्याचं शिक्षणसुद्धा घेतलं आहे. पेटी मात्र मी स्वतःच वाजवायला शिकलो.

४. संगीतातील तुमचे गुरु कोण?

संगीतात माझे बरेच गुरू आहेत. मी लहान असल्यापासून अमेरिकेतील आणि भारताहून येणाऱ्या अनेक नावाजलेल्या गायकांच्या आणि संगीतकारांच्या सहवासात राहिलो आहे. ८-९ वर्षांचा असताना काही वर्षं मला पंडित जसराजजी (आमचे 'बडे गुरुजी') आणि त्यांच्या शिष्या पंडिता तृप्तीजी यांच्याकडून शिकण्याचे भाग्य लाभले. पंडिता अर्चना जोगळेकर ('अर्चनामावशी') यांना मी ११ वर्षांचा असल्यापासून कॉलेजमध्ये जाईपर्यंत हार्मोनियमवर त्यांच्या कथ्थकबरोबर साथ केली. त्या दरम्यान मला पंडित रमेश मिश्रा, पंडित समीर चटर्जी, पंडित रामदास पळसुले. विजय घाटे अशा अनेक मातब्बर कलाकारांबरोबर साथ करायची आणि त्यांच्याकडून शिकायची संधी मिळाली. पण माझे गाण्याचे खरे गुरू आणि ज्यांना मी देवासमान मानत आलो आहे ते म्हणजे स्व. मोहम्मद रफी – रफीसाहेबांच्या हजारो गाण्यातून मला खूप काही शिकायला मिळाल आहे. देवाच्या दयेने माझा आवाज त्यांच्या आवाजाशी मिळताजुळता असल्यामुळे, त्यांची गाणी म्हणताना मला एक विशेष प्रकारचा आनंद मिळतो आणि प्रत्येक वेळी नवीन प्रेरणा मिळते.

५. तुमच्या संगीतातल्या विशेष कामगिरीबद्दल काय सांगाल?

मी १५ वर्षांचा असताना आमच्या न्यू जर्सीमधल्या EBC Radio 1170 यांनी आयोजलेल्या Karaoke स्पर्धेत मला Karaoke Kingचा किताब मिळाला. त्या स्पर्धेत Adult Categoryमध्ये माझ्याबरोबर भारतात संगीत शिकलेल्या ५०हून अधिक लोकांनी भाग घेतला होता. मी १७ वर्षांचा असताना एकटाच भारतात जाऊन मुंबईतील नावाजलेले संगीतकार श्री अशोक पत्की यांनी स्वरबद्ध केलेली ८ गाणी रेकोर्ड करून आलो. त्यातील २ गाणी नावाजलेल्या गायिका बेला शेंडे आणि वैशाली सामंत यांच्यासमवेत duets आहेत. प्रसिद्ध ढोलकीवादक किरण जोगळेकर आणि नाटक/सिनेकलाकार विजय कदम यांनी अशोक काकांना माझ्या संगीतप्रेमाविषयी सांगितलं आणि त्यांना माझ्याबरोबर एक आल्बम काढायची कल्पना सुचली.

मी शाळेत पाचवीपासून Choir music गात आलो आहे. Choirची बरीच पारितोषिकं आणि Regions, All State, आणि All Eastern अशा Choir Conferences मध्ये माझी निवड झाली होती. संगीत हे माझ जीवन आहे. मी रात्रंदिवस त्यातच बुडलेला असतो. संगीताला भाषिक, राष्ट्रीय किंवा धार्मिक मर्यादा नसतात असे मला वाटते. मी सध्या Fusion Musicमध्ये जास्त लक्ष घालतो आहे. माझ्या वयाच्या मुलामुलीत हे सध्या खूप लोकप्रिय होत चाललं आहे. चोखंदळ रसिकांना खालील संकेतस्थळी जाऊन माझी गाणी ऐकण्याची आणि आपले अभिप्राय कळवण्याची मी नम्र विनंती करतो:
http://facebook.com/officialneel
http://soundcloud.com/neelofficial
http://youtube.com/neelofficial
http://neelofficial.com

६. संगीताच्या या आवडीसाठी तुमचे काय विशेष प्रयत्न असतात ?

मी संगीतमय जगातच नेहमी राहत असल्यामुळे मला आणखी काही विशेष प्रयत्न करावे लागत नाहीत. माझे बहुतेक मित्रमैत्रिणीसुद्धा संगीतातच बुडलेले असल्यामुळे आम्ही बरेच वेळा Jam sessions करतो, त्यात खूप मजा येते. याव्यतिरिक्त माझा नियमित रियाज चालूच असतो.

७. तुमचे आवडते गायक / गायिका आणि आवडते गाणे कोणते ? तुमचे आवडते एखादे गाणे ? कोणाचे संगीत ऐकायला तुला जास्त आवडते?

आवडते गायक / गायिका -
मराठी - सुधीर फडके, भीमसेन जोशी, हृदयनाथ मंगेशकर, लता मंगेशकर, आशा भोसले
हिंदी - मोहम्मद रफी, किशोरकुमार, मन्नाडे, सोनू निगम, लता मंगेशकर, आशा भोसले, श्रेया घोशाल
इंग्लिश - Justin Timberlake, Boyz II Men, Michael Jackson, Usher

आवडते गाणे -
मराठी - तोच चन्द्रमा नभात (सुधीर फडके)
हिंदी - ये दुनिया ये मैफिल (रफीसाहेब)
इंग्लिश - Cry me a river, Four seasons of loneliness, Man in the mirror, Burn

८. आपल्या बीएमएम सारेगम 2015च्या अंतिम स्पर्धेसाठी कशा पद्धतीची तयारी चालू आहे?

मी नेहमीपेक्षा काही वेगळी तयारी करत नाही आहे. मी निवडलेली मराठी गाणी पाठ करायचा प्रयत्न मात्र चालू आहे.

९. संगीताखेरीज आपले अजून काय छंद किवा आवड आहे?

मला Ping-pong (Table tennis) खेळायला आवडतं. आमचा एक ग्रूप ping-pongच्या निमित्ताने नियमितपणे भेटत असतो.

१०. आपल्या बीएमएम सारेगम २०१५च्या प्राथमिक आणि उपांत्य फेरीची तयारी तुम्ही कशी केलीत?

वर म्ह्टल्याप्रमाणे काही वेगळी तयारी केली नव्हती. गाणी पाठ करण्यात मात्र थोडा वेळ नक्कीच दिला होता.उपांत्य फेरीतील गाणे इथे ऐकू शकता.

११. आपला कौटुंबिक परिचय?

आमच्या घरात माझ्याबरोबर माझे आईवडील, धाकटा भाऊ (शिव), धाकटी बहिण (जाई) आणि आजोबा असे लोक राहतात. शिव आणि जाई उत्तम गायक आहेत. ते दोघेही हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत शिकले असले तरी त्यांचा जास्त भर western music (Choir/Opera) वर आहे. शिव गेली १३ वर्षं पं. अर्चना जोगळेकर यांच्याकडे कथ्थक शिकतो आहे. गेल्या वर्षी तो नृत्य विशारद झाला. आता August मध्ये त्याचा रंगमंच प्रवेश आहे.

नीलला तुम्ही या दुव्यावर जाऊन मत देऊ शकता.

Group content visibility: 
Public - accessible to all site users