आत आणि बाहेर

Submitted by भुईकमळ on 5 June, 2015 - 07:51

सगळेच क्षण कसे निपचित होत गेलेले
वारयाचे श्वासही मंदावलेले
धुळीचे पंखही झडलेले
आसमंताला माध्यान्हग्लानी येताना
सहस्रारातील कमळ मुडपलेले
तशातच जून कढीनिंबाच्या फांदीवरती
पाहताना लाल काळपट फळे झुलणारी
कोकिळाने दिलखुलास तान फेकलेली
अचानक बुलबुलांच्या जोडीने
हल्ला करून त्यास पिटाळलेले ...

तीच उन्हे गर्द पिकलेली वेळ
फक्त समोर जानाई मळाईच्या डोंगरमाथ्यावर
मेघसावली निवांत पहुडलेली .
ह्ल्लख पाचोळ्याची मंद गिरकी
फिस्कटल्या रांगोळीने झेललेली
रक्तातली ओहोटणारी विलंबित लय
शुन्य पोकळीतली संथ धडधड
अनिच्छेनेच ऐकताना
विजनवासी अस्तित्वाचे ढिसाळ वारुळ
आतल्या आत भुळूभुळू खचलेले
आणि त्याक्षणी तारेच्या कुंपणाबाहेर
तणतणीच्या हिर्व्या पानांच्या खरखरया पाटीवर
पिवळ्याधम्म उन्हाची झोकदार स्वाक्षरी करुन
पाकोळीपंख दिठीपार झालेले ......
.......................माणिक वांगडे

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भर दुपारच्या तल्खलीत अचानक वळवाची सर येऊन जावी तसा तुमचा प्रतिसाद गारवा
शिंपून गेल्या सारखा वाटतय.खुप धन्यवाद!!!

कालपासून ही कविता वाचतोय, वाचनाने शब्दाच्या निर्माण होणाऱ्या प्रतिमा निरखून पाहतोय.
स्तरास्तरातील मनाच्या खेळांना शब्दपरिणाम दिल्यासारखे वाटत आहे. संवेदनशील मनाला दैनंदिनीसोबत भूत भविष्यात विहरण्याचा, भोवताल टिपत घेत त्याने विद्ध किंवा उल्हसित होण्याचा शाप असतो, तशा अवस्थेचा मतितार्थ काढू पाहणारी...अशी काहीशी वाटली.
तुम्ही स्वतःही काही लिहिले होते खाली, पण त्यावेळी वाचायचे राहून गेले कामामुळे.

तुमच्या शब्दांतील तटस्थते-उत्कटतेचा खेळ नेहमीच आकर्षित करतो

अमेय, किती अभ्यासपूर्ण सखोल विचार करुन लिहीलाय तुम्ही हा प्रतिसाद!.... या चित्रातल्या गडद ,हलक्या तर कुठे जास्त उठावदार न करताही वेगळाच गर्भितार्भ सांगणारया रंगछटा तुम्ही सहज टिपलेल्या आहेत त्रयस्थ नजरेने अवलोकन करुन जितक्या मलाही नीट लिहता आलं नसत माझ्याच कवितेबाबत.....खुप आभारी आहे आणि आवर्जून दिलेल्या प्रतिसादाबद्दल निसर्ग प्रेमी मनीमोहर यांचेही आभार.