खेळ काही आठवणीतले

Submitted by धनुर्धर on 27 May, 2015 - 08:41

लहानपणी आम्ही मुले जेंव्हा मातीत खेळत असू तेंव्हा मोठी माणसे ओरडत असत, "मातीत खेळू नका.रे" हल्ली च्या मुलांना 'मातीत खेळा' अशी म्हणायची वेळ आलीय. कारण कॉम्पुटर, मोबाईल, व्हिडीओ गेम्स या सगळ्यामध्ये मुले एवढी गुरफटली गेली आहेत की, त्यांचा या मातीतील खेळांशी काही संबंध उरलाय का? असा प्रश्न पडतो. या निमित्ताने लहानपणी खेळलेल्या काही खेळांच्या आठवणी मनात जाग्या झाल्या. आमच्या गावात घर शाकारायच्या निमित्ताने घरावरची जुनी कौले काढून नवीन कौले टाकली जायची व जुनी कौले तिथेच रचून ठेवलेली असायची. त्या कौलाचा खालचा भाग खडबडीत असायचा. वरचा भाग सपाट व पुढे निमुळता होत गेलेला असायचा. बाजूला दोन उंचवटे असायचे. आम्ही ते कौल घेऊन त्याला पुढच्या भागात बारीक चुकीने गिरमीटासारखे फिरवून भोक पाडायचो. त्यामध्ये सुतळी ओवली की झाली गाडी तयार! मग हाताला सुतळीचे दुसरे टोक गुंडाळून आम्ही ती गाडी ओढत असू. कधी तिच्यात माती कधी छोट्या दगडी भरून त्या ओढत नेत असू.

पुढे थोडे मोठे झाल्यावर जनावरांना चरायला नेण्याची जबाबदारी माझ्यावर आली. पावसाळ्यात आम्ही सर्व मित्र माळरानावर जनावरांना चरायला सोडून तिथ 'गज रवारवी' हा खेळ खेळत असू. या खेळामध्ये एक लोखंडी छोट्या सळईचा तुकडा एवढेच साहित्य आवश्यक असे. एक गोल रिंगण तयार करुन त्यामध्ये प्रत्येकाने एकापाठोपाठ एक असे तो गज म्हणजे लोखंडी सळईचा तुकडा पायाखालच्या त्या रिंगणात फेकुन रोवायचा असे. पावसाळ्यात जमीन ओली असल्यामुळे तो गज पट्कन रोवला जात असे . ज्याचा गज रोवला जाणार नाही. त्याच्यावर 'राज्य' येई. मग त्या रिंगणापासून प्रत्येकाने गज रोवत जायच. पहिल्याचा गज जिथे पडेल तिथे दुसऱ्या ने गज रोवत जायचे. शेवटच्या मुलाचा गज जेथे पडेल तेथुन रिंगणापर्यंत त्या 'राज्यकर्त्याने' लंगडी घालावयाची व खेळ पुढे चालू रहायचा. या खेळात आम्ही एवढे रमत असू की, जनावरे कधी दुसऱ्या च्या शेतात घुसली हे लक्षातही येत नसे.
शाळेच्या मागे एक चाफ्याच्या फुलांचे एक झाड होते. त्या झाडावर मधल्या सुट्टीत आम्ही सुरपारंब्या हा खेळ खेळत असू. या मध्ये 'सुटणे' हा एक प्रकार होता. तीन जणांनी आपले हात एकमेकांच्या हातात गुंफून पुढे मागे हालवून, हाताल झटका द्यायचा व आपला एक पंजा दुसऱ्या वर उलटा किंवा सुलटा टाकायचा. यामध्ये दोघांचे उलटे व एकाचा सुलटा किंवा दोघांचे सुलटे व एकाचा उलटा पंजा पडायचा तो 'सुटायचा' . असे करत करत शेवटी जो राहिल त्याच्यावर 'राज्य' यायचे. मग एखाद्याने 'सुर' म्हणजे झाडाची छोटी फांदी आपला एक पाय उचलून पायाखालून फेकायची व सर्वानी झाडावर चढायचे. 'राज्यकर्त्याने' तो 'सुर' घेऊन यायचे व तो एका रिंगणात ठेवून त्याचे रक्षण करायचे. बाकीच्यांनी तो चोरायचा प्रयत्न करायचा. जर सुर चोरताना त्या 'राज्यकर्त्याचा' स्पर्श झाला तर त्याचे राज्य याच्यावर यायचे. दुपारच्या सुट्टीत हा खेळ खूप रंगत असे.
शाळेत असताना दुसरा एक खेळ आम्ही खेळत असू तो म्हणजे 'हाडक्या'.ही एक मोठी गोटी होती. तिचा रंग पांढरा असे. तळहाताच्या मधल्या बोटावर दुसऱ्या हाताने 'हाडक्या' ताणून धरायचा व दुसऱा 'हाडक्या' उडवायचा असा हा खेळ असे. आम्ही तास् न तास हाडक्या खेळत असू त्या एकदा खेळायला सुरुवात केली तहान भुकेचे भान रहात नसे. याशिवाय गोट्या, कबड्डी, लपाछपी, शिवापाणी, लंगडी, काचकवड्या असे अनेक खेळ आम्ही खेळले. या खेळांनी माझं बालपण समृद्ध केलं.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users