सीआयडी, साळुंके आणि गडबड

Submitted by पायस on 16 May, 2015 - 04:36

एसीपी प्रद्युमन, अभिजीत, दया, फ्रेडरिक्स, डॉ. साळुंके आणि अशी सगळी नावे जे जे हिंदी चॅनेल्स बघतात त्यांच्या परिचयाची आहेत. सीआयडी प्रचंड प्रसिद्ध आहेच; तसेच ती सर्वात जास्त काळ चाललेली भारतीय मालिका आहे (वर्षांनुसार; अदरवाईज बाय नंबर ऑफ एपिसोड्स केकताच्या सासवा). सीआयडीमध्ये बेस्ट गोष्ट, जी माझ्यामते तिला मनोरंजक बनवते, आहे त्यातल्या गडबडी. जेव्हा जेव्हा एसीपी कुछ तो गडबड है म्हणतो तेव्हा तेव्हा मला त्याला तू आधी तुझ्या तपासातल्या गडबडी बघ म्हणावेसे वाटते. खासकरून फॉरेन्सिकमधले सीन्स. मी आंतरजालावर इतर डिटेक्टिव सीरियल्सचे असे ब्लूपर्स एकत्र केलेले पाहिले आहेत. मग सीआयडीचे का करू नयेत?

१) एपिसोड १२२२ सीआयडी इन ट्रेन

सीन - साळुंके व तारिका एका जळालेल्या ट्रेन तिकिटाला साफ करण्याचा प्रयत्न करत आहेत. तो कागद ते एका द्रावणात भिजवून (कलर वरून ते कॉपर सल्फेट वाटत होते) एका काचेवर चिकटवतात. ते कुठलीशी लेसर त्या कागदावर मारतात आणि ती कागदावर आणि आसपासच्या काचेवर थांबते, पुढे जात नाही. एरर - काच काय परफेक्ट ब्लॅक बॉडी आहे, पूर्ण अ‍ॅबसॉर्ब करायला आणि ती पास न व्हायला! असो पुढे ती वेगळ्या केमिकल्सच्या व काचेच्या भांड्यांमधून (हवा, फिनॉल्प्थालेन(रंगावरून अंदाज), सोडा घातलेले पाणी(संकलित असे कि बुडबुडे लेसरमुळे आले)) पास होते आणि मग एक सेन्सर असेंब्ली. मग मॉनिटरवर झूम व स्वच्छ केलेले तिकिट!

गुड - जळालेल्या कागदातली माहिती काढण्यासाठी इन्फ्रारेड लेसर वापरतात त्यामुळे फुल मार्क्स! दाखवण्यापुरती लाल रंगाची रुबी लेसर (अभियांत्रिकी/शास्त्र प्रथम वर्ष, प्रयोग लक्ष देऊन केले असतील तर आठवेल) वापरली आहे, फाईन कारण नाहीतर इन्फ्रारेड किरणे कशी दिसणार आणि सुरक्षा म्हणून ते ग्लासेस घालतील ते पण चांगले आहे.

बॅड - शेवटी लेसरचा रंग लालचा पांढरा होतो. कसं शक्य आहे? प्रकाश शोषला गेला तर त्याची प्रखरता कमी होते, वारंवारिता नाही आणि रंग वारंवारितेवर (फ्रीक्वेन्सी) ठरतो. मूळात प्रकाश वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळा परावर्तित होईल आणि मग संगणकामार्फत त्यातला नॉईज काढता येईल या तत्त्वाचा वापर करून माहिती रिकव्हर करतात. इथे प्रकाश त्यातून पास केला जात आहे. दुसरे प्रत्यक्षात तिकिटाचा एक छोटा तुकडा आहे त्यांच्याकडे पण संगणकावर मात्र पूर्ण लांबीचे न फाटलेले तिकिट दिसते आहे!! त्या रसायनांमध्ये पण काही अर्थ नाही. शाळांच्या प्रयोगशाळेत पण ती सर्व रसायने मिळतात. काहीतरी भारी चालले आहे हे दाखवायचे आहे ठीक; पण मग रसायने दाखवायलाच पाहिजे का?

२) एपिसोड ११९७ बहरुपिए का राज
या मालिकेचे निम्मे ब्लूपर्स तर फक्त ज्या पद्धतीने ते विष शोधतात त्याचेच बनतील. "बॉस इसे जहर देकर मारा गया है" हा डायलॉग आला रे आला कि सरसावून बसायचं. मी बारावीची अ‍ॅनालिटिकल केमिस्ट्रीची सर्व प्रॅक्टिकल्स सीआयडीचे एपिसोड बघता बघता नकळत रिव्हाईज केली होती.

सीन - मौत जहरसे हुई है पर जहर खाने मे नही था, क्या बात कर रहे हो साळुंके, तारिकाजी (अभिजीत उवाच) इ. नमनाचे डायलॉग झाले. आता असली मजा - साळुंके ब्ल्ड सॅम्पल्स परीक्षानळीत घेतो, सेंट्रिफ्युज मध्ये ठेवतो आणि त्यातला विषाचा भाग वेगळा होतो. मग तो एक छोटा कागद त्यात बुडवतो, निरखतो आणि त्याला स्कॅन करतो. लगेच त्याला जोडलेला एचपी लेजरजेट प्रिंटर प्रिंट करतो - Toxin was administered 5 hours prior to death!!

गुड - सेंट्रिफ्युज खरोखरचा वाटत होता. तुम्ही खरेच रक्त-विष सेंट्रिफ्युज वापरून वेगळे करू शकता, विष कोणते आहे याच्यावर ठरते पण तरी. (बहुधा त्याला plasmapheresis म्हणतात.) अर्थात अ‍ॅक्चुअल प्रोसेस जास्ती क्लिष्ट असणार पण ते ठीक आहे कारण एपिसोड दाखवायचा आहे.

बॅड - तो पेपर बुडवतो तो चक्क निळा लिटमस पेपर होता! त्याने फक्त आम्ल कि अल्कली एवढेच कळेल. आता त्याला स्कॅन करून कसे कळेल कि विष कधी दिले? किमान पीएच पेपर तरी वापरायचा म्हणजे निळा लिटमस पेपर ओळखू आला नसता आणि जरातरी भारी वाटले असते. दुसरे म्हणजे मध्ये एखादा सॉफ्टवेअर अ‍ॅनॅलिसिस होतंय असा शॉट टाकता आला असता म्हणजे कैच्याकै इंडेक्स कमी झाला असता.

हे नुकतेच आलेले एपिसोड्स असल्याने हे लक्षात राहिले. आणखी ब्लूपर्स आठवतील तसे प्रतिसादांमध्ये टाकेन. तुम्हाला काही अशा चुका जाणवल्या असतील तर तुम्ही पण लिहा. फक्त फॉरमॅट हा वापरा
एपिसोड नं/नाव (आठवले नाही तर तसे लिहा)
सीन
गुड - काही गोष्टी सेट डिजाईन म्हणून चांगल्या पण असू शकतात. त्या आवर्जून लिहा.
बॅड - अशा चुका ज्या शाळकरी मुलांना पण लक्षात येतील. जसे लिटमस पेपर ६वी, ७वी पासून माहित असतो. नो वे अशी चूक कोणाच्याच लक्षात येणार नाही.

त्यामुळे " कुछ तो गडबड" हैच! त्या फक्त एकत्र करण्याचा हा खटाटोप Lol

Group content visibility: 
Public - accessible to all site users

एपिसोड ९५७ खतरनाक जहर
(नावातच जहर आहे म्हटल्यावर .........)

सीन्स

साळुंके कशासाठी तरी बाहेर होते म्हणून सबकुछ तारिका, पण अभिजीत देखील नसल्यामुळे वात्रटपणा फारसा नाही झाला. जहरने एक मुलगी मरते. आता तारिका सांगते कि सायनाईड पॉयजनिंगची केस आहे, तिला हायड्रोजन सायनाईड वायुचा वापर करून मारलंय. तो इतका जहरीला आहे कि मौत १०-१५ सेकंदात होते (बर्र!!). मग एसीपी चार-पाच फालतू डायलॉग मारतो, कि इसका मतलब स्टीम रुम मे (ती पोरगी स्टीम बाथ मध्ये मरते) किसी ने गॅस छोडी होगी, असे निष्कर्ष जे कोणालाही समजावून सांगावे नाही लागणार. पण बरोबर फ्रेडी असल्याने तीही वेळ येते.
मग तारिका,रजत आणि फ्रेडी एका रुमची तलाशी घेतात जिथे त्यांना एक बॅग मिळते. त्या बॅगच्या जवळ जगातले सगळे लाल हीट मारले तरी नाही मरणार इतकी झुरळं मरून पडलेली असतात. त्या बॅगेला थोडे जेल लागलेले असते, ज्याला हात लावताच रजतच्या हाताला जलन होते आणि धूर निघतो. मग ते जेल तारिका लॅब मध्ये नेऊन टेस्ट करते (हार्ड ग्लास परीक्षानळीत घालून गरम करते) मग परत धूर निघतो आणि मास्क घातलेले ते सगळे ठरवतात कि ते जेल किटनाशकात वापरले जाणारे काही तरी आहे (क्रेडॉक काही तरी नाव होतं). ते गरम केले कि तो वायु तयार होतो, जेल स्टीम रूम मध्ये सोडले आणि उष्णतेने वायु तयार होऊन ती मुलगी मेली.

गुड

क्रेडॉक नावाची किटनाशकाची कंपनी आहे असे गूगल सांगते, सो किमान गूगलिंग व्यवस्थित केले आहे. सायनाईड पॉयजनिंग पण बरोबर दाखवले आहे. हायड्रोजन सायनाईड खरेच वायु असतो, जेल स्वरुपात साठवतात आणि उत्कलन बिंदू २५ अंश सेल्सियसच्या आसपास असल्याने थोड्या उष्णतेने सुद्धा लगेच वायु रुपात जातो (volatile). मास्क घालणे, मुद्दाम हार्ड ग्लास परीक्षानळी वापरणे (साधी तडकू शकते, किंवा सायनाईडचा असर होऊ शकतो) इ. साठी फुल मार्क्स

बॅड

सायनाईड पॉयजनिंग विष किती प्रमाणात दिलंय यावर किती घातक आहे हे ठरते, कॉमन सेन्स असलेला कोणीही हे सांगू शकेल. हायड्रोजन सायनाईड वायू साधारण १० मिनिटे ते १ तासात जीव घेतो आणि अति दिला तरी किमान १ मिनिट (थँक यू फेलुदा आणि मिस मार्पल). तो खूनी अगदी कमी म्हणजे नखभर जेल टाकतो, ती मुलगी १० मिनिटे तरी जिवंत राहायला पाहिजे. १०-१५ सेकंद म्हणजे काहीही फेकलंय. आता फेकाफेक केली ती केली, कन्सिस्टन्सी देखील नाही. आता माहिती आहे कि असं विष आहे तरी ती बॅग मास्क न घालताच शोधत असतात. तो रजत तर चक्क धूर ओढून घेतो पण त्याला ठसका लागण्या पलीकडे काही होत नाही. नाही लगेच मरणार, अ‍ॅग्रीड, पण ते किटनाशक आहे ना; मग त्यात आय इरिटंट नको? डोळे खतरनाक चुरचुरायला पाहिजेत आणि हे भाऊ बिनधास्त तारिकाला सांगतायेत कि इसे ले जाकर टेस्ट करते है.

रीया, rmd, एजे, हिम्सकूल - प्रतिसादाबद्दल धन्स
rmd - माहित नाही. कदाचित सार्वजनिक नव्हता म्हणून.
एजे - अरे मूँह कि बात छीन ली, समग्र सीआयडी Happy
हिम्सकूल - रायटर्स ब्लॉक Sad

कविता - केकता व कंपनी पाहायला लागत नाही याबद्दल मी माझ्या घरच्यांना देऊ तेवढे धन्यवाद कमी आहेत. सीआयडी त्यामानाने फारच सौम्य शिक्षा आहे Happy

टेस्ट टयुब मध्ये एक पारदर्शक द्रावण असते त्यात कशाचे तरी दोन थेंब टाकले कि द्रावण गुलाबी होते बहुतेक dil. HCl मध्ये phenolphthalein टाकत असावित.

मला केमिस्ट्रीचा फारसा गंध नाही नाहितर पहायला मजा आली असती.
पण बर्‍याच गोष्टी बालिश वाटतात सी आय डी च्या. बरेच दिवस दया ला पाहण्यासाठी पहात होते सगळे भाग.
आता त्याचा पण कंटाळा आला.
पण तुम्ही केलेलं विश्लेषण भारी आहे. हा धागा वाचायल आवडेल. Happy

पायस - माझ्यात तर केकता आणि कंपनी आणि मराठी मालिका पाहण्याचीही सहनशीलता नाहीये; आणि सी. आय. डी आमच्या नातेवाईकांकडे आणि पार्क मधे जास्तीत जास्त लहान मुलेच पाहतात.

Lol

माझ्यात तर केकता आणि कंपनी आणि मराठी मालिका पाहण्याचीही सहनशीलता नाहीये; आणि सी. आय. डी आमच्या नातेवाईकांकडे आणि पार्क मधे जास्तीत जास्त लहान मुलेच पाहतात.>>>+++१

आम्ही मुलाना रोज १ तास टी व्ही बघायची अनुमती दिली आहे. त्यात ४० मिनिटे सी. आय डी. आणि २० मिनिटे निक्की बघतात. विकेंड ला नवीन भाग तर बाकिच्या दिवशी मागिल भाग रोज एक करुन बघतात. (यु त्युब वर मागिल सगळे भाग उपलब्ध आहेत.) तीन वर्षापुर्वी शाळेच्या सुटी मध्ये तर त्यानी सी. आय. डी वर exam paper तयार केला होता. त्यात दया क्या करता है ? किंवा अभिजित चे फेवरेट वाक्य काय आहे. असे common प्रश्न आणि नंतर जो भाग बघितला त्यावर प्रश्न काढले होते.

केमेस्ट्री माहित नाही ते बरेच आहे म्हणायचे.. उगाच डोक खराब व्हायचं काम ..
तस आता टीव्ही शोज आणि हिंदी पिक्चर पाहून डोक बाजूला ठेऊन पहायची उत्तम सवय लागली आहे.
त्यामुळे अशा अनेक गोष्टी मनाला डसत नाहीत .. Biggrin

मी प्राजक्ता -मस्त निरीक्षण. फक्त ते NaOH असणार कारण phenolpthalein अल्कलीत गुलाबी होते, एसिड मधे पारदर्शक असते.

असो आज आपण बघणार आहोत

एपिसोड नं. ७७३ शादी का खूनी हार

सीन्स
नावात लिहिल्याप्रमाणे एक हार सापडलाय, त्यावर रक्ताचा डाग आहे. काही दुसरे काम नाहीये चलो सीआयडी के पास >> इसे साळुंके साब के पास भेज दो. तारिका मग मोठ्या ऐटीत येऊन सांगते की डीएनए टेस्ट के मुताबिक ये खून किसी लडकी का है. बर, आणि तो धब्बा ज्यादा पुराना नहीं है. आता दया सगळ्यांना समजावतो की काहीतरी १० घंटे पाहिले खून झाला आहे आणि तो हार ४-५ तासंपूर्वी एका मुलीने विकण्याचा प्रयत्न केला - इसका मतलब विवेक खूनी ज्यादा दूरसे नही आया होगा. आता भाव खायची पाळी काजलची, सर ये गहने शादी में पहनते है मतलब खून किसी दुल्हन का हुआ है >> विवेक सारे ज्वेलर्स से जाके पूछ्ताछ करो (विवेकच्या चेहऱ्यावर काही भाव नाही, मनात मात्र वैताग, सगळी ढोर मेहनत मी करतो फक्त दरवाजा तोडायला साहेब येतात आणि सगळा फोकस खाऊन जातात)
पुढे दोन लाशें सापडतात. एकीचा चेहरा जळालेला आहे. साळुंके साब के पास भेज दो अब वही देंगे इस लाश को चेहरा. साळुंके सीटी का एमआरआय स्कॅन करतो. दया आल्या आल्या दोन मिनिटात सॉफ्टवेयर फोटो रेडी करते.
(आणखी एक म्हणजे शेवटी खूनी मुलगी आत्महत्या करण्याचा प्रयत्न करते पण पिस्तूलात गोळी नसते, पूर्वीने आधीच काढलेली असते. तेव्हा तिच्या चेहऱ्यावरचे भाव - ए नेहमी माझ्यावरच काय राज्य, आमी नाई खेळत जा बाबा)

गुड
? रक्त कोणाचे आहे हे तपासायला डीएनए घ्यावा लागतो हे वगळल्यास काही नाही. तपास म्हणजे साधारण २०-२५ मिनिट नुसती पूछताछ आहे सो जाऊदे.

बॅड
टाईमलाईन. मेजर इशू आहे. लॅब मध्ये येण्याच्या १०-१२ तास आधीचा तो डाग आहे, ४-५ तासांपूर्वी तो सोनाराकडे आला, अगदी लगेच लक्षात आल तरी सीआयडी येऊन लॅब मध्ये पोचेपर्यंत अजून किमान ३ तास जाणार(मुंबई ट्रॅफिक). मग नमुना घेऊन टेस्टला पाठवेपर्यंत, सोपस्कार होईपर्यंत आपण वर्तमानात आलो. मग तारिकाने डीएनए टेस्ट कधी केली? कॉलेजात कम्प्यूटेशनल बायॉलॉजि मध्ये शिकवलेल की सॉफ्टवेयरच तासंतास खातो, अगदी लिंगनिदान सुद्धा इतके पटकन होणार नाही. बहुधा हे नियम तारिकाच्या मशीनला लागू होत नाहीत.
आणि फेस रिकंस्ट्रक्शन ला सिटी स्कॅन ची काय गरज आहे? तो सुद्धा फुल बॉडी स्कॅन! इमेज प्रोसेसिंग करणार ना ते सॉफ्टवेयर मग hd फोटो पुरे की, dslr ने काढलेला. बाकी जाता जाता, एका सीन मध्ये ते गाडलेली लाश बाहेर काढत आहेत. तिथे क्लोजअप मध्ये एक झाड आहे. पण लॉंगशॉट मध्ये १ सेकंद ते दिसतच नाही आणि मग कॅमेरा zoom होतो. एडिटर नक्की वैतागला असणार हा सीन लावताना Lol

एपिसोड नं ९९४ हॉन्टेड हवेली

सीआयडीच्या प्रसिद्ध स्टीरिओटाईप्सपैकी एक आहे भुताळी एपिसोड्स आणि त्याला जोडून येणारे फ्रेडरिक्सचे न-इनोदी सीन्स! दुर्दैवाने फ्रेडीला ऑन लोकेशन ड्युटी न मिळाल्याने हा एपिसोड रंजक करण्याची संधी हुकली.

सीन्स
साळुंके फ्रेंच कट दाढीत होता तेव्हाचा हा एपिसोड आहे. अधिक अभ्यासाअंती तुम्ही अशा छोट्या छोट्या गोष्टींवरून संपूर्ण एपिसोडची साधारण आऊटलाईन, तो कोणत्या वर्षीचा आहे वगैरे वगैरे सांगू शकता. मौत जहरने झाली आहे - बॅक्स्टर गुडॉल हे कुठलं विष आहे कोणास ठाऊक? नावावरून डायॉल वाटत होतं पण गूगलवर पण काही सापडलं नाही. असो, याने अर्धांगवायूचा झटका येतो असं साळुंकेबुवा सांगतात अर्थात अभिजीतचा विश्वास मात्र तारिकाने सांगितल्यावरच बसतो (ऐसा कभी जहर होता है क्या?) या एपिसोड मध्ये दोन लॅब सीन्स आहेत हे लक्षात घ्या - आधी फक्त जहर आहे एवढेच कळते आणि कोणते ते शोधायला वेळ लागेल असे सांगितले जाते. दुसर्‍या सीन मध्ये, जो स्टोरीलाईननुसार किमान १ दिवसानंतर आला पाहिजे, विषाचे नाव सांगतात. सांगतो बॅड मध्ये काय मज्जा केली आहे इथे.

गुड
?? हा सीआयडीच्या सर्वात वीक एपिसोड्सपैकी एक आहे. साधारण नकुल मेल्यानंतर सीआयडी मध्ये फारशा तगड्या केसेस नाही आल्या पण हा त्यातही हा फारच कमजोर आहे. नॉट गुड.

बॅड
कंटिन्युटी जर्क्स आपल्याला सारखे बसत असतात. इथे कंटिन्युटी राखल्याने जर्क बसतो. वर सांगितल्याप्रमाणे दोन लॅब सीन आहेत ज्यांच्यात किमान १ दिवसाचे अंतर असले पाहिजे, म्हणजे साळुंके दुसर्‍या दिवशी सांगतो कि बाबा हे हे विष दिलं गेलं. मग त्यांचे कपडे बदलले गेले पाहिजेत कि नको? पण त्या सीन मधल्या प्रत्येक जणाची - साळुंके, तारिका, अभिजीत, फ्रेडरिक्स आणि श्रेया - वेषभूषा पहिल्या सीनप्रमाणे अगदी जशीच्या तशी आहे. सीआयडी ऑफिसर्स रोज रोज तेच कपडे कसे घालून येतील ते सुद्धा पाच पाच जण. नको तिथे कंटिन्युटी राखल्याचे परिणाम! तारिका आल्यानंतर मी फॉरेन्सिक लॅबमध्ये लॅबकोट्स पाहिलेच नाही आहेत त्यामुळे ती अपेक्षा ठेवणे होपलेस आहे. अगदी बारकाईने पाहिला तर अजून एक चूक कळते. पंकज एसीपीला पुरावा म्हणून सापडलेले फुटेज दाखवतो आहे व्हीएलसी प्लेअर वर. एसीपी म्हणतो रिवाईंड कर. तो चार पाच वेळा h दाबतो. आता h ने सबटाईटल डिले वाढतो, रिवाईंड कसा काय झाला?

कॉमेडी
काही काही गोष्टी या संपूर्ण एपिसोड्स मध्ये भयंकर विनोदी आहेत. जसे कि जेव्हा संशयित लोकांना एकत्र ब्युरोत बोलावतात तेव्हा एक मुलगी साधारण मी प्रोमोंमध्ये होसुमीयाघ मधल्या नायिकेचा जो आवाज ऐकला आहे त्या आवाजात विचारते - आप हमपे क्यों शक कर रहे है? ये तो गलत है. त्यावर एसीपी जोरात ओरडून म्हणतो "तो फिर किसपे शक करें?" आणि एक सेकंदभरच का होईना शिवाजी साटम खदखदून हसल्याचा आवाज ऐकू येतो.
नंतर सचिन आणि पूर्वी एका खोलीची झडती घेत आहेत. बरं यांना सर्च वॉरंट वगैरे काही लागत नाही. बिनधास्त बॅज दाखवून घुसतात सरळ आत. तर सचिन एक मोठ्ठ कपाट लीलया बाजूला सरकावून त्याच्या मागे खुफिया दरवाजा आहे का बघतो. मग खोलीतल्या पलंगाची पाळी येते तेव्हा त्याला पलंगावरची गादी बाजूला करायला पूर्वीची मदत लागते, एकट्याला जमत नाही. छान! पण हाईट गोष्ट पुढे आहे - पलंगाखाली एक चौकट आहे, बिजागर्‍या आणि सगळं दिसतंय बरं का, पण तरी २ मिनिट एकदा त्या ट्रॅप डोअरवर एकदा शेजारच्या जमिनीवर सचिन ठोकून पाहतो - देखो यहां पे जमिन खोखली है. मग पूर्वी सेम क्रिया करते - सर यहां कि जमिन तो वाकई खोखली है. मग दोघे दयाला हाक मारतात. मग तो पुनश्च हे करून पाहतो - तुम ठीक कह रहे हो सचिन यहां पे जमिन खोखली है. अरे ट्रॅप डोअर दिसतंय ना मग एवढं ठोकून कोण बघतं? स्कूबी डूला पण असली ट्रॅप डोअर्स ओळखू येतात.
फायनली खूनी सापडतात, दोन जण आहेत, ते एका कुंडलामुळे. मग त्या जोडगोळीतला मुलगा सांगतो कि मीच मुद्दाम तिकडे टाकलं होतं, त्याला बिचार्‍याला भाबडी आशा कि कोणीतरी फसेल. आई गं, इतका डम्ब खूनी होता तो, काही गरज नसताना कुणाला कशाला फसवायला गेला? बरं त्याची काही दुश्मनी पण नव्हती ज्याला तो फसवत होता. आणि त्या संबंधित इसमाला सीआयडी अडकवणं तर सोडाच त्याच्यावर संशय पण घेत नाही. वर तो पकडल्या जाण्यापूर्वी, वाचा थप्पड खाण्यापूर्वी, मोठमोठ्यांदा ओरडून सांगत असतो कि हम जैसे शातिर मुजरिमोंसे सीआयडी का इससे पहले कभी पाला नही पडा होगा. ट्रिमेंडस फेसपाम!!

Lol ४ वेळा (H न दाबता :फिदी:) रिवाईंड करून तो 'और किसपर शक करें' शॉट पाहीला. पण तो खदाखदा आवाज काही ऐकायला मिळाला नाही. तो शोधायला आता सीआयडीलाच बोलवावं काय? Proud

मी तर वैतागून बघायचंच बंद केलं.

रच्याकने :
लेसर एकाच वारंवारितेचे तरंग असतात. ते
डिस्पर्स कसे होतील? (इंद्रधनुष्यासारखे?
>>>
होतात हो. DWDM technology त्यावरच अवलंबून आहे. (आमची रोजी-रोटी आहे ती).

होतात हो. DWDM technology त्यावरच अवलंबून आहे. (आमची रोजी-रोटी आहे ती)
>> मी चुकत असेन कदाचित पण DWDM मध्ये वेगवेगळ्या तरंगलांबीच्या अनेक लेसर एका सिग्नल मध्ये एकत्र करतात. साळुंकेकडे एकच लेसर आहे. एक लेसर कशी काय मल्टिप्लेक्स होईल? किमान दोन वेगवेगळ्या लेसर लागतील ना?

demultiplexing Wink

ओके प्रथम. साळुंकेकडे demultiplexer होता (मी कधी पाहिला नाही म्हणून संशयाचा फायदा) असे समजूया. तेवढी चूक विश्लेषणातून काढून टाकत आहे.

एपिसोड नं ५३६ खूनी भूतिया हवेली

सीआयडीचे भूतिया हवेली नावांचे एकूण सात एपिसोड्स आहेत. इतर काही शेड्स लक्षात घेतल्या जसे इच्छापूर्ती हवेली तर अजून एक ६ एपिसोड्स वाढतात. त्यामुळे कसून अभ्यास करणार्‍या प्रेक्षकांनी या नावाच्या एपिसोड्स बाबत सावधान राहिले पाहिजे नाहीतर भूतिया हवेली म्हटल्याबरोबर जाणकार १३ पैकी कुठली हवेली विचारून तुमची भंबेरी उडवू शकतात. (बाकी टोटल हवेल्या ७+६ = १३ वर थांबल्या आहेत हा योगायोग आहे कि बीपी सिंग चे डोके?)

या एपिसोड मध्ये एक जबरदस्त विरोधाभास आहे. एपिसोड मध्ये नेहा देवी सिंह ची मध्यवर्ती भूमिका आहे. नेहा देवी सिंह म्हणजे विकराल (आठवा श्श कोई है : त्रिकाल) मधली बिजली; तीच ती निळ्या लेदर ड्रेसमध्ये फिरायची ती. इतकी वर्ष भूत पकडणारीचा रोल केल्यावर अचानक तिला भूतापासून घाबरायला लावलं आहे. अर्थातच ती बावरल्यासारखी वावरली आहे आणि हातांचा विशिष्ट चाळा करत आहे. (अरे मेरी ब्लू लेदर ड्रेस कहा है? और ये व्हीएफएक्स कि लेजर क्यों नही निकल रही मेरी उंगली से?)

बाकी हा संपूर्ण एपिसोड शलाका नावाच्या 'पात्रा'मुळे बिघडला आहे नाहीतर इतका काही वाईट नाही (प्रद्युमन ऑन लोकेशन तपास करत होता, लेडी ऑफिसर्स कावेरी आणि लावण्या होत्या म्हणजे २००९ अराऊंड. तेव्हाच्या मानाने बराच बरा आहे.) भविष्य सांगणार्‍या बंजारनला कोणीतरी बंगल्याचा केअरटेकर नेमतं का? गणेशोत्सवातल्या भिंतीदेखील लाजतील इतकी लाऊड अ‍ॅक्टिंग या पात्राने केली आहे. ओके सीन्स नाऊ

सीन्स
साळुंके यात दोन कामे करतो. एक म्हणजे जळालेल्या प्रॉपर्टी पेपर्स ना रिकव्हर करतो. त्यासाठी तो झाडाच्या वाळलेल्या पानांसारखे दिसणारे कागदाचे कपटे एका पारदर्शक द्रावणात बुडवतो, मग अल्ट्राव्हायोलेट बीम वापरून ते स्कॅन करतो आणि व्हायोला! त्याचे सॉफ्टवेयर लगेच १०० रुपयाचा स्टँप पेपर मॉनिटरवर दाखवतो.
नंतर यात एका मुलीचे भूत दाखवलंय. त्या मुलीचे एक पोर्ट्रेट हवेलीत असतं. नंतर कळते कि ती मुलगी नेहाने हायर केलेली असते (हा नेहाच व्हिलन निघते, किरकोळ आहे ते सोडून द्या) आणि सर्कसमध्ये अ‍ॅक्रोबॅट असते (ट्रॅपीज वाली). तर तिच्या सर्कसवाल्या पोस्टरवर पेंटिंग केलेलं असतं. साळुंके एक काहीतरी लिक्विड पेंटिंगचा रोलर ब्रश असतो त्याने चक्क फासतो संपूर्ण सरफेस आणि वरचा पेंट निघून येतो खालचं पोस्टर सहीसलामत.

गुड
कागद कसे जळाले आहेत यावर त्यांचा एंड रिझल्ट अवलंबून असतो. जर कागदाचे कपटे सुटे सुटे जाळले तर ते कोपरातून वळतात, ट्विर्ल होतात आणि एकत्र गठ्ठा जळाला असेल तर फ्लॅट राहतात. बर्‍याच सीआयडी एपिसोड्स मध्ये ही गोष्ट सांभाळली आहे जे मला खूप आवडले. अशा वळालेल्या कागदांना कोमट पाणी, ग्लिसरॉल वगैरे लावून आधी सॉफ्ट करतात जेणेकरून फ्लॅट करताना ते फाटणार नाहीत आणि फ्लॅट कागदाला स्कॅन अधिक नीट करता येते. साळुंकेने वापरलेला द्राव थोडा चिकट वाटत होता, बहुतेक ते ग्लिसरॉल-पाण्याचे मिश्रण असावे कारण ग्लिसरॉल सेट्सवर तसेही मिळते किंवा केकताच्या सेटवरून ग्लासभर ग्लिसरॉल तर कुठे जात नाही.

बॅड
स्कॅन केलेले डॉक्युमेंट लगेच स्क्रीनवर दिसते. म्हणजे इमेज प्रोसेसिंगला वेळ मिळालेला नाही. मग चार तुकडे वेगवेगळे दिसायला हवे ना! आणि कलर स्कॅन कसा होईल? वेगवेगळ्या ठिकाणी प्रकाश वेगवेगळा परावर्तित होईल आणि फोटो नेगेटिव्ह सारखे काहीतरी मिळेल, कृष्णधवल. इथे एसीपी डायरेक्ट नवाकोरा पेपर स्क्रीनवर बघतो, अ‍ॅज इफ तो कधी फाडला, जाळला गेलाच नव्हता. इतके काही तंत्रज्ञान पुढे गेलेले नाही.
त्या पेंटिंगवर त्याने पेंट डिसॉल्व होईल असे काहीतरी लावले असावे (टरपेंटाईन?). फाईन पण मागचे पोस्टर अगदी सही सलामत राहणे जरा दुरापास्त आहे. आणि मध्ये काही फ्रेम्स मध्ये तर मुलीचा पोस्टर वरचा चेहरा डॅमेज झालेला दिसतो मग पोस्टर पूर्ण दाखवतात तेव्हा तो व्यवस्थित कसा?

जाता जाता एक हॅम सीन. शेवटी लावण्याला विषारी पिन टोचून नेहा पळण्याचा प्रयत्न करते (चाणाक्ष प्रेक्षकांनी ओळखलेच असेल कि लावण्या जखमी आणि खूनी एक बाई आहे म्हणजे यानंतर कावेरी, उरलेली लेडी ऑफिसर, तिच्या कानाखाली जाळ काढून ब्युरोत पोहोचवणार्‍या वर्म होल मध्ये रवानगी करेल). टाचणी टोचल्यावर लावण्या बाई लगेच मरत नाहीत म्हणजे विष इतकं पण तीव्र नसावं, पण एकंदरीत आविर्भाव तिला निखार्‍यांवर चालायला लावल्या सारखे आहेत. लक्षात ठेवा रक्त निघाले आहे एक थेंब!!

त्याच वाहिनीवर क्राईम पॅट्रोल दस्तक सारखा उत्कृष्ट कार्यक्रम प्रसारित होत असताना सी आय डी सारखे कार्यक्रम देखील बघितले जातात हे मोठे आश्चर्य आहे.

अर्थात गेल्या वर्षभरात झी जिंदगी सुरु झाल्यापासून इतर वाहिन्यांवरचे कार्यक्रम फारसे बघण्यात येत नाहीत.

सीआयडी कधीच पाहिलं नाही.. हिंमतच नाही झाली.
पण तुमचा हा मुद्देसुद चिरफाडीचा धागा वाचायला जाम आवडतं. लिहित रहा Happy

सी आयडी ही माझी आवडती मालिका आहे. निखळ मनोरंजन हा या मालिकेचा उद्देश पूर्ण होतो. Happy

पण इतक्या डीटेलिंगने आणि कसोशीनं प्रत्येक एपिसोड पाहिल्याबद्दल पायस यांचा जाहीर सत्कार करायला हवा.

Pages