सीआयडी, साळुंके आणि गडबड

Submitted by पायस on 16 May, 2015 - 04:36

एसीपी प्रद्युमन, अभिजीत, दया, फ्रेडरिक्स, डॉ. साळुंके आणि अशी सगळी नावे जे जे हिंदी चॅनेल्स बघतात त्यांच्या परिचयाची आहेत. सीआयडी प्रचंड प्रसिद्ध आहेच; तसेच ती सर्वात जास्त काळ चाललेली भारतीय मालिका आहे (वर्षांनुसार; अदरवाईज बाय नंबर ऑफ एपिसोड्स केकताच्या सासवा). सीआयडीमध्ये बेस्ट गोष्ट, जी माझ्यामते तिला मनोरंजक बनवते, आहे त्यातल्या गडबडी. जेव्हा जेव्हा एसीपी कुछ तो गडबड है म्हणतो तेव्हा तेव्हा मला त्याला तू आधी तुझ्या तपासातल्या गडबडी बघ म्हणावेसे वाटते. खासकरून फॉरेन्सिकमधले सीन्स. मी आंतरजालावर इतर डिटेक्टिव सीरियल्सचे असे ब्लूपर्स एकत्र केलेले पाहिले आहेत. मग सीआयडीचे का करू नयेत?

१) एपिसोड १२२२ सीआयडी इन ट्रेन

सीन - साळुंके व तारिका एका जळालेल्या ट्रेन तिकिटाला साफ करण्याचा प्रयत्न करत आहेत. तो कागद ते एका द्रावणात भिजवून (कलर वरून ते कॉपर सल्फेट वाटत होते) एका काचेवर चिकटवतात. ते कुठलीशी लेसर त्या कागदावर मारतात आणि ती कागदावर आणि आसपासच्या काचेवर थांबते, पुढे जात नाही. एरर - काच काय परफेक्ट ब्लॅक बॉडी आहे, पूर्ण अ‍ॅबसॉर्ब करायला आणि ती पास न व्हायला! असो पुढे ती वेगळ्या केमिकल्सच्या व काचेच्या भांड्यांमधून (हवा, फिनॉल्प्थालेन(रंगावरून अंदाज), सोडा घातलेले पाणी(संकलित असे कि बुडबुडे लेसरमुळे आले)) पास होते आणि मग एक सेन्सर असेंब्ली. मग मॉनिटरवर झूम व स्वच्छ केलेले तिकिट!

गुड - जळालेल्या कागदातली माहिती काढण्यासाठी इन्फ्रारेड लेसर वापरतात त्यामुळे फुल मार्क्स! दाखवण्यापुरती लाल रंगाची रुबी लेसर (अभियांत्रिकी/शास्त्र प्रथम वर्ष, प्रयोग लक्ष देऊन केले असतील तर आठवेल) वापरली आहे, फाईन कारण नाहीतर इन्फ्रारेड किरणे कशी दिसणार आणि सुरक्षा म्हणून ते ग्लासेस घालतील ते पण चांगले आहे.

बॅड - शेवटी लेसरचा रंग लालचा पांढरा होतो. कसं शक्य आहे? प्रकाश शोषला गेला तर त्याची प्रखरता कमी होते, वारंवारिता नाही आणि रंग वारंवारितेवर (फ्रीक्वेन्सी) ठरतो. मूळात प्रकाश वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळा परावर्तित होईल आणि मग संगणकामार्फत त्यातला नॉईज काढता येईल या तत्त्वाचा वापर करून माहिती रिकव्हर करतात. इथे प्रकाश त्यातून पास केला जात आहे. दुसरे प्रत्यक्षात तिकिटाचा एक छोटा तुकडा आहे त्यांच्याकडे पण संगणकावर मात्र पूर्ण लांबीचे न फाटलेले तिकिट दिसते आहे!! त्या रसायनांमध्ये पण काही अर्थ नाही. शाळांच्या प्रयोगशाळेत पण ती सर्व रसायने मिळतात. काहीतरी भारी चालले आहे हे दाखवायचे आहे ठीक; पण मग रसायने दाखवायलाच पाहिजे का?

२) एपिसोड ११९७ बहरुपिए का राज
या मालिकेचे निम्मे ब्लूपर्स तर फक्त ज्या पद्धतीने ते विष शोधतात त्याचेच बनतील. "बॉस इसे जहर देकर मारा गया है" हा डायलॉग आला रे आला कि सरसावून बसायचं. मी बारावीची अ‍ॅनालिटिकल केमिस्ट्रीची सर्व प्रॅक्टिकल्स सीआयडीचे एपिसोड बघता बघता नकळत रिव्हाईज केली होती.

सीन - मौत जहरसे हुई है पर जहर खाने मे नही था, क्या बात कर रहे हो साळुंके, तारिकाजी (अभिजीत उवाच) इ. नमनाचे डायलॉग झाले. आता असली मजा - साळुंके ब्ल्ड सॅम्पल्स परीक्षानळीत घेतो, सेंट्रिफ्युज मध्ये ठेवतो आणि त्यातला विषाचा भाग वेगळा होतो. मग तो एक छोटा कागद त्यात बुडवतो, निरखतो आणि त्याला स्कॅन करतो. लगेच त्याला जोडलेला एचपी लेजरजेट प्रिंटर प्रिंट करतो - Toxin was administered 5 hours prior to death!!

गुड - सेंट्रिफ्युज खरोखरचा वाटत होता. तुम्ही खरेच रक्त-विष सेंट्रिफ्युज वापरून वेगळे करू शकता, विष कोणते आहे याच्यावर ठरते पण तरी. (बहुधा त्याला plasmapheresis म्हणतात.) अर्थात अ‍ॅक्चुअल प्रोसेस जास्ती क्लिष्ट असणार पण ते ठीक आहे कारण एपिसोड दाखवायचा आहे.

बॅड - तो पेपर बुडवतो तो चक्क निळा लिटमस पेपर होता! त्याने फक्त आम्ल कि अल्कली एवढेच कळेल. आता त्याला स्कॅन करून कसे कळेल कि विष कधी दिले? किमान पीएच पेपर तरी वापरायचा म्हणजे निळा लिटमस पेपर ओळखू आला नसता आणि जरातरी भारी वाटले असते. दुसरे म्हणजे मध्ये एखादा सॉफ्टवेअर अ‍ॅनॅलिसिस होतंय असा शॉट टाकता आला असता म्हणजे कैच्याकै इंडेक्स कमी झाला असता.

हे नुकतेच आलेले एपिसोड्स असल्याने हे लक्षात राहिले. आणखी ब्लूपर्स आठवतील तसे प्रतिसादांमध्ये टाकेन. तुम्हाला काही अशा चुका जाणवल्या असतील तर तुम्ही पण लिहा. फक्त फॉरमॅट हा वापरा
एपिसोड नं/नाव (आठवले नाही तर तसे लिहा)
सीन
गुड - काही गोष्टी सेट डिजाईन म्हणून चांगल्या पण असू शकतात. त्या आवर्जून लिहा.
बॅड - अशा चुका ज्या शाळकरी मुलांना पण लक्षात येतील. जसे लिटमस पेपर ६वी, ७वी पासून माहित असतो. नो वे अशी चूक कोणाच्याच लक्षात येणार नाही.

त्यामुळे " कुछ तो गडबड" हैच! त्या फक्त एकत्र करण्याचा हा खटाटोप Lol

Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्रतिसादांबद्दल सर्वांना धन्यवाद
सी आयडी ही माझी आवडती मालिका आहे. निखळ मनोरंजन हा या मालिकेचा उद्देश पूर्ण होतो >>> +१ >>> अगदी अगदी. ही एकमेव मालिका असावी जी डोकं लावून पाहिली काय डोकं बाजूला ठेवून पाहिली काय तुम्हाला आनंद मिळतोच. काम/अभ्यास यांच्यातून आलेला शीण घालवण्यासाठी सीआयडी अप्रतिम पर्याय आहे.

पण इतक्या डीटेलिंगने आणि कसोशीनं प्रत्येक एपिसोड पाहिल्याबद्दल पायस यांचा जाहीर सत्कार करायला हवा.>>> कुठे येऊ? Happy

जाता जाता,

घर आया तो मा ने कहा आज खाने मे आंबटचुका है
लाश देख के विवेक ने कहा "सर ये तो मर चुका है" Lol

एपिसोड नं ७९३ राज सफेद शर्टवाली लडकी का

हा आणखी एक ट्रेंड सीआयडीची शीर्षके पाळतात - अमुक तमुक वाली लडकी! फक्त हा जरा रेअर आहे. असाच अजून एक राज लाल रेनकोटवाली लडकी का आहे पण तो नंतर कधीतरी. तर सफेद शर्टवाली लडकी; नावाप्रमाणेच सफेद शर्टवाली लडकी आहे. एका शाळा/कॉलेज मधून १२वीतल्या दोन मुली गायब झाल्या आहेत आणि त्यातली एकजण मारली जाते. हा सगळा गोंधळ दोघींनी सारखा वेष - सफेद शर्ट आणि स्कार्फ - घातला असल्याने होतो, म्हणजे भलतीच मरते. मग बाकी पूछताछ इ. आहे. पटकथा फुलवताना शेरलॉक होम्सच्या अ‍ॅडव्हेंचर ऑफ द प्रायरी स्कूल पासून प्रेरणा घेतल्याचे जाणवते - श्रीमंत माणसाचे मूल (तिथे मुलगा, इथे मुलगी) हॉस्टेलमधून गायब होणे, गुन्हेगार गायब झालेल्या व्यक्तिचा जवळचा नातेवाईक असणे आणि गायब झालेल्या व्यक्तिने गुन्हेगारावरच विश्वास टाकणे अशी काही साधर्म्ये सांगता येतील बाकी दोन्ही गोष्टींमध्ये पुष्कळ फरकही आहेत.

सीन्स
सफेद शर्टवाली लडकी क्र. १ - नाव जान्हवी - हिची पर्स चोरण्याच प्रयत्न ओपनिंग सीनमध्ये होतो. मग त्या चोराला पब्लिक धरते आणि त्या गोंधळात ती गायब होते. पर्स व चोर सीआयडीच्या स्वाधीन केले जातात. पर्समध्ये खून लागलेल्या २ वस्तु असतात - एक चाकू आणि एक टिश्यू पेपर. त्याशिवाय एक हेअरब्रश असतो जिथून बाल मिळतो. सीआयडी लॅबमध्ये डीनए मशीन असल्याने लगेच त्यांची डीनए टेस्ट होते. साळुंके साब रिपोर्ट नाचवत सांगतात कि टिश्यू पेपरवरचे रक्त आणि ब्रशमध्ये अडकलेला केस हे दोन्ही वेगवेगळ्या मुलींचे आहेत तर चाकूवरचे रक्त एका पुरुषाचे आहे. आपण या रिपोर्टकडे परत येऊया. मग तारिका, ती टिश्यू पेपरवर पिपेटने एक लिक्विड टाकते आणि मायक्रोस्कोपखाली बघते, ती सांगते टिश्यू पेपर वर गनपावडर ट्रेसेस आहेत. (मतलब सालुंके उस लडकी को गोली लगी थी - एसीपी प्रद्युमन सूर्य पृथ्वीभोवती नव्हे तर पृथ्वी सूर्याभोवती फिरते या थाटात). अजून एक सीन आहे त्याच्यात सफेद शर्टवाली लडकी क्र. २ - नाव वन्या - मरते कशी ते दाखवले आहे. तिला एक स्नायपर लांबून गोळी मारतो. याच्याकडेही येऊयात.

गुड
गनपावडर ट्रेस अ‍ॅनॅलिसिस विषयी कोर्सेराच्या एका कोर्सदरम्यान वाचले होते. त्या प्रोफेसरांनी सांगितले कि जर सरफेस स्मूथ असेल तर एक अल्कोहोलचा लेअर देऊन त्याची अ‍ॅब्सॉर्प्टिव्ह अ‍ॅटॉमिक स्पेक्ट्रोस्कोपी करून गनपावडर डिटेक्ट करता येते. टिश्यू पेपरचा सरफेस पुरेसा स्मूथ आहे असे पकडूया. ते लिक्विड रंगाने ब्रँडीला जवळ वाटत होते, म्हणजे अल्कोहोल. तारिकाचा सीनमधला पार्ट बराच चांगला डिझाईन केला असे वाटले. एकंदरीत पटकथा देखील चांगली आहे. प्रायरी स्कूलचा देजावू नसेल तर रहस्य बरे सांभाळले आहे.

बॅड
साळुंके डीनए रिपोर्ट दाखवतो कि एक्स रे रिपोर्ट? एका जुन्या एपिसोडमध्ये, जेव्हा सीआयडीत हायफाय संगणक प्रणाली नव्हत्या, तेव्हा देखील एक्सरे नाचवत डीनए मॅच हो गया असे म्हटल्याचे अंधूक आठवते (तो एपिसोड भयानक विनोदी आहे. आठवला कि सविस्तर लिहिन). डीनए रिपोर्ट एक्सरे सारखा अजिबात दिसत नाही आणि सीआयडीने कधीच तो नीट दाखवला नाही. आता तर सरळ संगणकावर 'Match Found' लिहून मोकळे होतात. डीनए रिपोर्ट पुष्कळ क्लिष्ट गोष्ट असते. तारिका सुद्धा नॉर्मल मायक्रोस्कोप वापरते. शक्यतो स्पेक्ट्रोस्कोपी वगैरे करताना SEM वापरतात (Scanning Electron Microscopy). इथे बजेट कमी पडले असा एक संशयाचा फायदा दिला तरी मानले कि त्या मायक्रोस्कोपमध्ये कॅमेरा आहे जो संगणकाला जोडला आहे. पण मग संगणकाला जोडलेली वायर दिसली पाहिजे ना! ज्या काही २० फ्रेम्स दिसतात त्यात मायक्रोस्कोप टू कॉम्प्युटर वायरच नाही!
फायनली या अदरवाईज चांगल्या एपिसोडमधली सर्वात भयानक चूक! तो स्नायपर वन्यावर गोळी चालवतो तेव्हा आधी स्कोपमधून नेम धरताना दाखवलंय. वन्या स्कोपच्या एका कडेला आहे, म्हणजे स्कोपमध्ये जो क्रॉस असतो त्याच्या अगदी उजव्या हाताला स्कोपच्या बॉर्डरला वगैरे आहे. असा नेम तो स्नायपर साधतो तरी वन्याला बरोबर गोळी लागते, ती सुद्धा छातीत! बर वारं पण फार काही सुटलंय असं दिसत तरी नाही.

पगली/कॉमेडी
एक कॉमन प्रश्न - विवेकने नेहमीचा रस्ता, जिना, पायवाट इ. सोडून आडवाटेने उड्या मारत/कसरती करत हालचाली करणे बंधनकारक आहे का?
सहसा सीआयडीवाले आपल्या ओव्हर अ‍ॅक्टिंग मधून इतरांना काही करण्याची संधि देतच नाहीत पण यावेळेस काही जणांनी भाव खाल्ला आहे.
शाळेतली रिसेप्शनिस्ट - "सर सर आपको जान्हवी का कुछ पता चला?" "नही पर वन्या का पता चल गया."
"ओह. पर सर जान्हवी का पता चला?" थोडे बदल करून रिपीट ३ वेळा
हे सर्व डायलॉग्ज एका सुरात चेहर्‍यावरची माशीही न हलू देता म्हणावेत.
चोर - जान्हवीची पर्स चोरतो म्हटलं ना! हे साहेब जान्हवीचा पाठलाग शहरात कुठेतरी करायला सुरुवात करतात. जान्हवीला हे लक्षात येते बरं का पण ती कोणालाही मदतीची हाक नाही मारत; हे थोडे अ‍ॅक्सेप्टेबल आहे कारण तिच्या हातून स्वसंरक्षणार्थ एक खून झाला आहे पण नंतर सुद्धा ती अशीच लोकांना हाक मारून बोलावल्यावर निसटतेच की! असो तर चोर शहरात पाठलाग सुरु करतो मग पार हायवे पर्यंत चालत जातो, सेम बस पकडतो, सेम स्टॉपवर उतरतो आणि पकडला जातो! एवढी मेहनत कोण चोर घेईल हो?
जान्हवी स्वतः - स्वसंरक्षणार्थ खून झाल्यावर असली गुन्हेगार (पक्षी तिचा चुलतभाऊ) तिची समजूत करून देतो कि आत्मसमर्पण करणे धोकादायक आहे. मग ती लपून राहते. लपून राहते तर राहते, बसल्या बसल्या एक कट्टा (गावठी बंदूक) बनवते. आणि तिला जेव्हा दया आणि निखिल शोधून काढतात तेव्हा अ‍ॅस्थमाचा अ‍ॅटॅक आल्यासारखे हावभाव करून सरळ निखिलला पायात गोळी घालते! भारी आहे नाही Lol
गुन्हेगार - हा अ‍ॅक्चुअली फक्त शेवटच्या सीनमध्ये 'हॅम'तो पण जो काही डायलॉग मारला आहे कि यंव रे यंव. दयाने येऊन त्याचे बखोट धरलंय आणि साहेब दयाला सुनावत आहेत
"अरे क्यों मौत के मुंह मे आ गये तुम लोग?" (धन्य!! लगेच थोबाडीत खाऊन टेलिपोर्ट होतो ते वेगळे सांगावयास नको!!)

दयाने येऊन त्याचे बखोट धरलंय आणि साहेब दयाला सुनावत आहेत
"अरे क्यों मौत के मुंह मे आ गये तुम लोग?" (धन्य!! लगेच थोबाडीत खाऊन टेलिपोर्ट होतो ते वेगळे सांगावयास नको!!) >> Rofl

आज पहिल्यांदा बघीतला हा धागा.. कुठ गायब होता कुणास ठाऊक ?
पायस, कुछ तो गडबड है.. Wink

>>आज पहिल्यांदा बघीतला हा धागा.. कुठ गायब होता कुणास ठाऊक ?
पायस, कुछ तो गडबड है.. डोळा मारा>>

पता नही किसने एसीपी का ये डायलॉग लिखा
पता करो दया, टीना को ये धागा क्यों नही दिखा
Proud

अरेच्चा, मला पण हा धागा आत्ताच दिसतोय!

पायस, खतरनाक धागा आहे. Happy

सी आय डी फार पाहत नाही, पण इथे वाचायला आवडेल. त्याच त्या डायलाॅगचा कंटाळा येतो, नाहीतर सिरियल बघायला आवडायची मला.

एक कॉमन प्रश्न - विवेकने नेहमीचा रस्ता, जिना, पायवाट इ. सोडून आडवाटेने उड्या मारत/कसरती करत हालचाली करणे बंधनकारक आहे का?>> +१. पण विवेक असतानाच सीआयडी आवडायची मला.
एका एपिसोडमध्ये काजलने त्याला थोबडवलं होतं ते तर जाम भारी! Lol

हे १६-१०-१४ मध्ये लिहले होते एका साइटवर.. Wink
तेथे माझा आयडी दशानन आहे.

आज डोकं फार दुखतं आहे. आई गं! - दशानन
मेली, मी कधी पासून सांगत होते, तो दळभद्री टीव्ही पाहू नका, पाहू नका! - दशाननची बायको
अगं, मला काय माहिती असा त्रास होईल.. - दशा.
पण मला का त्रास? नेमकं कुठले डोके दुखत आहे, ते तरी सांगा.. अमृतांजन लावते थोडे... - दशा.बाय
दहाच्या दहा, ठणाना करत आहेत.... - द
मेले गं! नेमकं काय पहात होता टीव्हीवर? ऑ? ते इंग्लिश चेनेल का? - द.बा.
अगं, ते मोदी आले तेव्हाच, बंद झाले. आज सोनी पहात होतो सिआयडी - द.
अगं बाई, अजून तुम्ही मेला नाय? ते सीआयडी पाहून तर किमान १०००००००००० लोकं गेली असतील वर.. - दबा
म्हणजे? तुला म्हणायचे काय आहे? - द
अहो, तुमचा जीव घ्याचा प्लान करते मी असे वाटत नाही ना तुम्हाला? - दबा
हो, तशीच शंका येत आहे, मगापासून.. तू डोके सोडून माझा गळा दाबत आहेस बये..... - द
अग्ग्गो...बाई..चुकलेच माझे! सीआयडी परत नीट बघून अभ्यास करायला हवा.. -दबा
त्यांनी आज एका टीव्ही रिमोट वापरून जग मुंबई वाचवली.. मला तो रिमोट हवा, मी शिकवेन रामाला धडा- द
गप्प रे मेल्या, म्हणे शिकवेन रामाला धडा, आधी वाचायला आणि बघायला शिक.. तो टीव्हीचा नव्हता.. एसीचा होता रिमोट - दबा
अगं, पण तू पाहिले का नाय, तो दया कसे दरवाजे तोडतो.. धडाधड.. - द
त्याला म्हणावे, माजा घराचा दरवाजा तोड! - दबा
का? तोडलं कि तो आरामात.. - द
अरे हाड.. आपला दरवाजा आत नाही उघडत, सगळे दरवाजे बाहेर... बसं म्हणावे मुसंडी मारत..- दबा

Lol

खूप दिवसांनी आलो इकडे. भारी लिहिलं आहे तुम्ही राज.

असो येण्यास कारण कि सीआयडी वाल्यांनी शातिर लेखक कॉन्टेस्ट जाहीर केला आहे. ३ अर्धवट कथा आपण पूर्ण करायच्या. सर्वोत्कृष्ट पूर्ण केलेल्या कथांचा एपिसोड बनवून टीवी वर प्रसारित केला जाणार आहे. मला वेळेअभावी जमेलसं वाटत नाही पण बघा कोणाला काही सुचतंय का, तेवढाच एखादा बरा एपिसोड मिळेल बर्‍याच दिवसांनी Lol

ही घ्या लिंक cid.setindia.com

पायस, खतरनाक लिहीलंय!!
सांभाळा, एसीपी मागे लागेल Lol

एपिसोड नं ८३० - राज कटे कानों का

भोयोंकर (हा भाग बघताना इतक्या वेळा फुर्रकन हसू फुटते कि तोंडाचा चंबू होऊन आपला बंगाली होतोच). खूप कमी एपिसोड्स असतील ज्यात साळुंकेचा तपास डिसेंट वाटतो, सीआयडीवाल्यांची दया येऊ लागते आणि .... जाऊ द्या सरळ मुद्द्यावर येऊया. या एपिसोडला एकच सेक्शन आहे - पगली. जणू संपूर्ण एपिसोड फिलर सारखा बनवला आहे. त्यामुळे चिरफाड सुरू.

ओळीने जाऊया. शहरात खून पडलेत आणि प्रत्येक लाशचे कान कापून त्या लाशच्या शेजारी ठेवलेत. अभिजीत म्हणतो कि चोरी वगैरे झालेली नाही आणि कानाच्या पाळीवर झटापटीचे निशाण नाहीत म्हणजे खून चोरीच्या इराद्याने नाही झालेले. वॉव! म्हणजे झटापटीत अख्खा कान तुटतो ना आणि तपासावे लागते कि कानातलं ओढून काढताना कान तुटलाय कि कापून काढलाय!
संपूर्ण एपिसोडमध्ये ऑफिसर्सने झोपेत डायलॉग म्हटले असावेत कारण काही काही ठिकाणी उच्चारांच्या सणसणीत चुका आहेत. आता अभिजीत नेहमीच कॉईनचा उच्चार क्वॉईन करतो पण फ्रेडीने बेरहमचा उच्चार बेहरम करावा..... काय फ्रेडी!

कॉलेजमध्ये एन्थू ही संज्ञा अनेकदा कानावर पडते. अतिउत्साही नवख्या लोकांसाठी अनेकदा ही वापरली जाते. या एपिसोडचा एडिटर एन्थू असावा. असतील नसतील तेवढे सर्व ट्रान्झिशन्स, इफेक्ट्स, सॉफ्टवेअर जे जे काही करू शकतं ते सर्वच्या सर्व वापरले आहे. ते सर्व वापरता यावे म्हणून इतके कट्स आहेत कि इतके कट्स आहेत आणि अंगात उत्साह आहे म्हणून हे सर्व वापरलेत एन्थ्वेश्वर जाणे! थ्रिलर सीरिजमध्ये अनेकदा असे खूप सारे कट्स असतात कारण सतत चित्र बदलत असल्याने प्रेक्षकाला वेग जाणवतो - फास्ट पेस्ड एडिटिंग म्हणतात कदाचित याला, चूक असेल तर जाणकारांनी सांगावे. पण सगळीकडे हे चालत नाही ना आणि ते फास्ट कट्स व्यवस्थित जोडले तर उपयोग. त्यात एपिसोड विनोदी त्यामुळे लुईस सीके (माहित नसेल तर कपिल शर्मा घाला) फास्ट फॉरवर्ड करून बघतोय असे वाटते. अनेकदा तो कॅमेराची इमॅजिनरी लाईन ऑफ मूव्हमेंट कट जोडताना तोडतो त्यामुळे हे अजूनच प्रकर्षाने जाणवते.

आता स्टार अ‍ॅट्रॅक्शन - या एपिसोडमध्ये उन्नत नावाचे उपद्व्यापी कारटे - यापेक्षा दुसरा योग्य शब्द नाही - आहे. कुणाल नावाचा मनुष्य खून्याचे शेवटचे टारगेट असतो आणि त्याचा कान कापून तो बॅरलमध्ये भरून समुद्रात फेकून देतो. उन्नतला बीचवर खेळताना ते बॅरल सापडते आणि आधी तो मेलेला 'अंकल' पाहून घाबरतो = बागडत बागडत मागे सरतो. मग त्याच्या लक्षात येते कि 'अरे अंकल तो अभी जिंदा है.' त्याला तो बॅरलमधून बाहेर काढतो इतपत सर्व ठीक आहे, वीर बालक असेल वगैरे वगैरे. त्यानंतर त्याला बॅरलमध्ये पडलेला कान दिसतो यावरची त्याची प्रतिक्रिया - 'अरे ये तो अंकल का कान लगता है. इसे संभल के रखता हूं' असे म्हणून तो छान रुमालात तो कान बांधून घेतो. (नंतर अर्थातच तो सीआयडीला सापडतो) मग कोणाला मदतीला बोलावण्याऐवजी उन्नत कुणालला फरफटत घरापर्यंत ओढून घेऊन जातो. (वर त्याचे पालुपद, किसीने देख लिया तो मुसीबत हो जायेगी)

उन्नतच्या मानसिक स्थितीची आपल्याला आलेली शंका त्याच्या आईवडलांना पाहून दूर होते. उन्नतला नंतर खूनी किडनॅप करतो, ते डिटेल्स जाऊ द्या. त्याचे आईवडीलदेखील एन्थू अ‍ॅक्टर्स आहेत. असेल नसेल तेवढी सगळी अ‍ॅक्टिंग आज करून टाकायचीच या निर्धाराने त्यांनी एक एक सीन केलाय. त्यामुळे एका सीनमध्ये उन्नतचे वडील त्याच्या आईच्या खांद्यावर धीर देण्यासाठी हात ठेवतात तेव्हा चेहर्‍यावरील संमिश्र भावांमुळे हा धीर देतोय कि चान्स मारतोय हे नक्की करता येत नाही. त्यात ते नंतर सांगतात कि त्यांचे नस्ते-उद्योग स्पेशालिस्ट चिरंजीव कधी कधी भिकार्‍यांना सुद्धा मलमपट्टी करायला न सांगता घरी घेऊन येत तेव्हा तर मला चक्कर यायचीच बाकी राहायली होती. एक अवांतर शंका - तो भिकार्‍यांना सुद्धा फरफटत आणायचा कि काय? आणि इतरांना मदत करा वगैरे संस्कार हे सगळं ठीक आहे पण कुठल्याही सामान्य (वाचा मेन्टली सेन) घरात असे कोणी केले तर दुसर्‍या दिवशी - मुडद्या कोणी सांगितले होते हे नस्ते धंदे - करून त्याची झार्‍याने धुलाई होईल.
मला माहित आहे कि हा एपिसोड जनजागृतीसाठी लिहिला असेल पण मग काही किमान लॉजिक(?) नको का. ६-७वीतला मुलगा जिम करणार्‍या माणसाला फरफटत ओढत नेतो, कोणाला पण घरी आणून ठेवतो आणि त्याचे आईवडील त्याला काही बोलत नाहीत आणि अजून बोलायची खरंच गरज उरली आहे का?

शेवटी साळुंकेच्या एका प्रयोगामुळे ही केस सुटते. काय तर साळुंके स्वतःला त्या बॅरलमध्ये ३५ मिनिटे बंद करून घेतो. तो बाहेर येतो तेव्हा त्याची अवस्था बिकट असते. तो सांगतो कि या बॅरलमध्ये बंद राहून कोणीही ३५-४० मिनिटांपेक्षा जिवंत राहू शकत नाही!! कशावरून? हा काय सायंटिफिक, कंडिशन कंट्रोल्ड प्रयोग चाललाय का? उगाच काहीतरी. असो जास्तीत जास्त ३५-४० मिनिटे ना एसीपी सरळ रेषेतली कमीत कमी ३५ मिनिटांवरची जागा बघतो - सीरियसली?

सर्वात भारी शेवटी एसीपीला जेव्हा खूनी सांगत असतो कि मी ब्लॅकमेलला वैतागलो होतो (जिन कानोंसे उन्होंने मेरी बाते सुनी मैने वो कान काट दिये) तेव्हा एसीपी एक महान ड्वायलॉक फेकतो - "जान लगी फंसने तो खैरात लगी बंटने" (आणि पुढे परेश रावलचा तेजा कसा अँ करत असतो तसा टोन!)

एकूणात भयंकर विनोदी एपिसोड Lol

पायस लय भारी लिहिलय.

वॉव! म्हणजे झटापटीत अख्खा कान तुटतो ना आणि तपासावे लागते कि कानातलं ओढून काढताना कान तुटलाय कि कापून काढलाय!

त्यामुळे एका सीनमध्ये उन्नतचे वडील त्याच्या आईच्या खांद्यावर धीर देण्यासाठी हात ठेवतात तेव्हा चेहर्‍यावरील संमिश्र भावांमुळे हा धीर देतोय कि चान्स मारतोय हे नक्की करता येत नाही>> Rofl

एपिसोड नं ८३० अत्ताच forward करत परत बघितला: अशक्य पार्ट आहे.
६-७वीतला मुलगा जिम करणार्‍या माणसाला फरफटत ओढत नेतो, ते पण खांद्यावर दप्तर असताना .

माणुस बॅरेल मध्ये असेल तर बॅरेल हवांबंद असल्याशिवाय तरंगणार नाही. आणि हवाबंद बॅरेल मध्ये माणुस ३५ मिनिटे जिंवत कसा राहिल?

मला जास्त हसू त्याच्या सो कॉल्ड निरागस प्रतिक्रियेचे आले. साधारण त्याची विचारप्रक्रिया अशी असावी - अरे हे काय गिळगिळीत दिसतंय? ओह्ह अंकलचा कान आहे होय. पण अंकल तर बेशुद्ध आहेत. उठल्यावर पहिल्यांदा कान शोधतील आणि नाही मिळाला तर किती त्रास होईल त्यांना! बिच्चारे चला आपणच सांभाळून ठेवू हा कान आणि त्यांना उठल्यावर देऊ.

Pages