स्वित्झर्लंड : ब्लाउसी लेक (Blausee Lake).

Submitted by आरती on 9 May, 2015 - 04:12

एका गावात एक निळ्या डोळ्यांची सुंदर मुलगी रहात होती. तिचा प्रियकरही त्याच गावात रहात असे. गावाजवळच्या एका छोट्या तळ्यावर ती त्याला भेटायला जायची. सूर्यास्तापासून ते अगदी चंद्राचे प्रतिबिंब त्या नितळ पाण्यात उमटे पर्यंत ती दोघे तिथेच असायची. असेच मजेत दिवस चालले होते. पण एके दिवशी काही वेगळेच घडले. पाय घसरून तो पडला. पडला तोच एका टोकदार दगडावर. डोक्याला मार लागला आणि सगळाच खेळ संपला.

ती अगदी सैरभैर झाली. जे घडल आहे त्यावर तिचा विश्वास बसत नव्हता. त्याच्या आठवणीनी व्याकूळ झालेली ती अजूनही रोज संध्याकाळी तळ्यावर जात होती. तळ्याच्या मध्यात बोट घेऊन जायची आणि तिथेच बसून ती आक्रोश करत रहायची. अशा कितीतरी रात्री गेल्या पण ती आपले दुख:त्या तळ्याला रोज सांगत राहिली. आणि एक दिवस नाका-तोंडात पाणी जाऊन गुदमरून मृत झालेले तिचे शरीर पाण्याच्या तळाशी सापडले. शेजारीच खचून रुतलेली ती बोटही.

तिच्या निळ्या डोळ्यांच्या स्पर्शाने तळ्याचे पाणी त्यादिवशी निळे झाले ते कायमचेच...........

तेच हे ब्लाउसी लेक. ब्लाऊ म्हणजे Blue म्हणजेच निळे. गर्द झाडीत वसलेले हे अगदी छोटेसे तळे आहे. आम्ही गेलो होतो तेंव्हा तिथल्या नावाड्याने आम्हाला वरील कथा सांगितली. खर सांगायचं तर त्याची सत्यासत्यता पडताळून पहावी असे वाटलेच नाही.

तर, स्वित्झर्लंडच्या सहलीत ईंटरलाकेनला भेट देणार असाल तर आवर्जून याचाही समावेश करावा असं हे ठिकाण आहे. आल्प्स पर्वतरांगाच्या आसपास आढळणाऱ्या जलाशयांमध्ये हे सगळ्यात देखणे आहे असे ऐकले. 'कांडेरगृंड' नावाच्या गावाजवळ 'कांडेर' नदीच्या खोऱ्यात एका विस्तीर्ण उद्यानाच्या साधारण मध्यावर हे तळे आहे. तळ्याच्या एका बाजूला प्रचंड उंचीचा एक कातळ आहे. निळे आणि संपूर्ण पारदर्शक असे पाणी, नितांत सुंदर परिसर, खच्चून भरलेले निसर्ग सौंदर्य, डोळ्यांसाठी पर्वणी ठरावी असे सगळे दृश्य आहे. वल्ह्याच्या एका छोट्याश्या बोट राईडची सोय आहे. बोटीच्या तळाला काच लावलेली आहे जेणेकरून तळ्याच्या मध्यभागी सुद्धा, जिथे खोली साधारण ४० फुट आहे, पाण्याच्या पारदर्षषकतेचा अनुभव घेता येतो आणि जलाशयाचा तळ अगदी स्पष्ट दिसतो. पलीकडेच लहान मुलांना खेळण्यासाठी 'प्ले एरीया' पण आहे. बसायला लाकडी बाक आहेत. ग्रीलची पण सोय आहे. तसे तळे निरखून बोट राईड ईत्यादीसाठी तास-दीडतास खूप झाला. पण एक पूर्ण दिवस तिथे घालवायला आवडावा असे हे ठिकाण नक्कीच आहे.

१५००० वर्षांपूर्वी तळ्याच्या मागच्या डोंगरावरून दरड कोसळल्याने खळगा तयार होऊन या तळ्याची निर्मिती झाली. जलाशयाच्या तळाशी जिवंत झरे आहेत त्यामुळे पाणी स्वच्छा आणि पिण्यास योग्य आहे. आश्चर्य म्हणजे भर हिवाळ्यातही तापमान जेंव्हा शून्याच्या कितीतरी खाली गेलेले असते तेंव्हाही या तळ्याचे पाणी गोठत नाही. या पाण्याचे तापमान वर्षभर ८ ते ९ डिगरी सेल्सिअस असे स्थिर रहाते. त्यामुळे यात रंगीबेरंगी मासे आणि बदकं वर्षभर वास्तव्याला असतात. (पर्यटकांना हे गोड्या पाण्यातले ताजे मासे मिळण्याची सोय शेजारच्या हॉटेल चालकाने केलेली आहे). तळ्यातले सगळे पाणी दर ८ दिवसांनी पूर्णपणे नव्याने येते, जुने वाहून जाते अशी अजून एक माहिती त्या नावाड्याने दिली.

एवढेसे ते तळे पण त्यातही देखणे छोटेखानी लाकडी पूल बांधलेले आहेत. तळ्याच्या संपूर्ण बाजूबाजूने 'वॉक वे' केलेला आहे. त्यावरून फेरफटका मारताना अजून काही बारकावे लक्षात येतात. पाण्यात तळाशी काही ओंडके, झाडांची खोडं पडलेली दिसतात. चौकशी केल्यावर समजले की ती तशीच २०० वर्षांहून अधिक काळ तिथेच पडून आहेत, अजिबात न कुजता, खराब न होता. हा त्या पाण्याचा अजून एक गुणधर्म. तळ्या भोवतीच्या या फेरफटक्यातच आपल्याला एक देखणे शिल्प दिसते. कुण्या शिल्पकाराने त्या 'निळ्या डोळ्यांच्या' मुलीची आठवण म्हणून तिचे दगडी शिल्प पाण्याच्या तळाशी बनवले आहे.

जुलै-ऑगस्ट या उन्हाळ्याच्या महिन्यांमध्ये इथे बरीच गर्दी असते. पण आम्ही एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात गेलो होतो तेंव्हा हवा तर मस्त होतीच पण गर्दी अजिबातच नव्हती. अजून एखादाच ग्रुप तिथे आलेला होता. त्यामुळे थोडे सिझनच्या आधी गेले तर निवांतपणे तिथल्या सृष्टी सौदर्याची, शांततेची मजा घेता येऊ शकते. तळ्याच्या मागच्या बाजूने 'ट्रेक / ट्रेल' साठी पण मार्ग तयार केलेला आहे. आवड आणि सवड असल्यास तिकडेही एक फेरफटका मारता येतो.

उघडण्याच्या वेळा : उन्हाळ्यात - सकाळी ९ ते संध्याकाळी ५,
हिवाळ्यात - सकाळी १० ते संध्याकाळी ५

१. झुरीकहून जायचे असल्यास,
स्वत:ची गाडी असल्यास साधारण २.३० तासांचा प्रवास आहे. अंतर १५० किमी.
ट्रेनने जायचे असल्यास ३ तासाचा प्रवास आहे. झुरिक मुख्य स्थानकावरून ट्रेन मिळेल Zurich - Spiez - Frutigen (इथे ट्रेन बदलावी लागते) - Kandergrund.

(झुरिकहून झरमॅटकडे जाणाऱ्यांनाही 'ब्लाउसी लेक' बघून पुढे जाता येऊ शकते.)

२. 'इंटरलाकेन' या लोकप्रिय पर्यटन स्थळापासूनही बस किंवा ट्रेनने ब्लाउसीला जाणे सहज शक्य आहे.
स्वतःची गाडी असल्यास ४५ मिनिटांचा प्रवास आहे. अंतर ४० किमी.
ट्रेनने जायचे असल्यास १.३० तासांचा प्रवास आहे. Interlaken Ost east - Spiez - Frutigen (इथे ट्रेन बदलावी लागते) - Kandergrund.

**********

काही फोटो ....
.
1_0.JPG
.
2_0.JPG
.
3_0.JPG
.
4_0.JPG
.
5_0.JPG
.
6_0.JPG
.
7_0.JPG
.
8_0.JPG
.
9_0.JPG
.
10_0.JPG
.
11_0.JPG
.
12_0.JPG
.
13.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मूळ जागेपेक्षाही त्याच्या भोवताली गुंफ़ल्या गेलेल्या अशा कथांकारणास्तव तर मग ती जागा जास्तच भावू लागते. ह्या तळ्याची नीळाई इतकी आपलीशी आणि हवीहवीशी वाटते की निव्वळ सुंदर फ़ोटोजमधून ही जागा लुभावणारी वाटते तर मग लेखिका आणि तिच्या घरातील लोकांनी प्रत्यक्ष जागेवर जाऊन जेव्हा ही अनुभूती घेतली त्यावेळी त्याना झालेला अपार आनंद लेखात फ़ार देखणेपणाने उमटला आहे.

तलतचे एक गाणे आहे..."तस्वीर तेरी दिल मेरा बहला न सकेगी...." ~ ब्लाउसी लेकबद्दल मात्र असे म्हणता येणार नाही...कारण तस्वीर इतकी आकर्षक आहे की प्रत्यक्ष जागेवरच जाऊन तलाव पाहायला हवा असा आग्रह धरणार नाही.

सुरेख फोटोज.

पु लंनी (बहुधा पूर्वरंग मध्ये) जळात वितळल्या निळाईचे वर्णन केले आहे, त्याचीच आठवण झाली एकदम!

सर्व रंगात सर्वाधिक आकर्षण घालणारा हा रंग
ग्रेसांच्या निळाई कवितेमुळे
बोरकरांमुळे
सर्वव्यापी आकाशामुळे
आणि कृष्णामुळेही

ग्रेस किती सुरेखरित्या म्हणतात,

"निळे दुःख चोचीत घेऊन आली
निळ्या पाखरांची निळी पाउले"

वरचे तळे हेही अशाच पाखरांच्या निळ्या दुःखाने भरल्यासारखे!

सुरेख.

निळे दुःख चोचीत घेऊन आली
निळ्या पाखरांची निळी पाउले">> अतिशय छान अमेय. पुर्ण कविता विपु करशील का वेळ असल्यास?

काय सुंदर आहे हे .. मस्तच ...
फोटो बघून आलेले पहिले उद्गार म्हणजे , 'बाsssपरे! अशीपण जागा आहे काय पृथ्वीवर' ..

बी
ते कॉपीराईट वगैरे हल्ली फार झालंय
त्यामुळे कविता विपुत नकोच
ग्रेस निळाई ...असे गूगल करा; कविता दिसेल.

काय सुरेख निळा रंग आहे. स्तब्ध करणारा!

लॅन्डस्केपचे सगळेच फोटो सुंदर आहेत आणि ते शेवटचं शिल्पही काय सुरेख आहे!

धन्यवाद अमेय. नंतर आरतीनेच ती कविता दिली. धन्यवाद आरती. कविता छान आहे पण तू ज्या ओळी निवडल्या त्याच मला सर्वाधिक भावल्या.

अतिशय सुंदर फोटो.

बाकी, उत्कट प्रतिमा पाहिल्यावर प्रत्यक्ष जागा कधी पाहु नये असे वाटते हे अगदी खरे आहे. वरचे फोटो पाहुन फक्त फोटोच पाहात राहावे असे वाटतेय.

किती सुंदर प्रतीक्रिया आहेत सगळ्याच Happy
मजा आली वाचताना.

मनापासून आभार.

अमेय,
इतक्या सुरेख कवितेची आठवण करून दिल्याबद्दल धन्यवाद.

Pages