"रंगपेटी उघडू चला..!!!" - लहान मुलांची चित्रकला स्पर्धा

Submitted by संयोजक on 8 August, 2009 - 00:18

"रंगपेटी उघडू चला..!!!"

गणेशोत्सवानिमित्त मायबोलीच्या विस्तारित परिवारासाठी एक नवीन स्पर्धा!!

१३ वर्षांपूर्वी मायबोली सुरु झाली तेंव्हा बहुतांश मायबोलीकर एकटेदुकटे होते. पण काळ सरला तसे बर्‍याच मायबोलीकरांचे दोनाचे चार हात झाले. अन आता तर त्यांच्या संसार वेलींवर फुलेही उमलू लागली.

मायबोली आता आपले दोन्ही हात पसरून या छोट्यांना आपल्यात सामावून घेत आहे.

गणेशोत्सवानिमित्त यंदा प्रथमच मायबोलीकरांच्या चिमुकल्यांसाठी खास चित्रकला स्पर्धा!!

*******************************************************

ही स्पर्धा १ ते ४ वर्ष , ५ ते ८ वर्ष, ९ ते १२ वर्ष आणि १३ ते १६ अशा एकूण चार वयोगटात आयोजित करण्यात येत आहे.

स्पर्धेचे नियम :

१. ह्या स्पर्धेत विषयाचे आणि माध्यमाचे बंधन नाही.

२. ही स्पर्धा मायबोलीकरांच्या मुलांसाठी आहे. ह्यात इतर नातेवाईक अपेक्षित नाहीत. (पुतण्या, भाचा इ.)

३. स्पर्धेत भाग आई/वडीलांच्या आयडीनेच घ्यायचा आहे.

४. चित्राबरोबर मुलाचे/मुलीचे संपूर्ण नाव आणि वय लिहावे.

५. चित्राचे माध्यम देणे अपेक्षित आहे. (स्केचपेन, वॉटरकलर, पेंटब्रश इ.)

६. चित्र रंगवलेलं नसलं तरी चालेल.

७. एका मुलासाठी एकच चित्र द्यायचे आहे.

८. चित्र काढताना पालकांनी मदत केली असेल तर तसे स्पष्ट लिहावे.

९. मुला/मुलीचे सध्याचे वय आहे त्याच वयोगटात चित्र देणे अपेक्षित आहे.

१०. मतदान पध्दतीने विजेता निवडला जाईल.

मायबोलीकरांच्या परिवाराला आपल्या गणेशोत्सवात सामील करून घेण्याचा हा एक प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या स्पर्धेतला सहभाग वाढवण्यासाठी आणि ती निकोपपणे पार पाडण्यासाठी सर्व मायबोलीकरांनी सक्रिय प्रयत्न करावे ही संयोजकांतर्फे नम्र विनंती.

स्पर्धेची सुरवात गणेश चतुर्थीला होईल आणि प्रवेशिका कशा आणि कुठे पाठवायच्या याबद्दल माहिती लवकरच दिली जाईल.

*******************************************************

इतर स्पर्धांसाठी पहा : मायबोली गणेशोत्सव २००९ स्पर्धा घोषणा

ओ सन्योजक, नुस्ते चित्र मागू नका, चित्र काढणार्‍या लहानग्यान्चे नुकतेच काढलेले फोटो पण मागवा Happy म्हणजे चित्रा शेजारीच कुणी काढल ते देखिल दिसेल Happy

>>१ ते ४ वर्ष , ५ ते ८ वर्ष>>>> ४ वर्षे आणि काही महीने असतील तर काय करावे ? पहिल्या वयोगटात ती मोठी ठरेल तर दुसर्‍या वयोगटात ती छोटी ठरेल.

काळ बालमित्र मध्ये येणारे चित्र रन्गवुन पाठवले तर चालेल का?>>>
चीत्र हातानीच काढायचं आहे पण रंगवलेल नसल तर चालेल असं म्हटलय ना वरती.

असं म्हटलय ना वरती.
>>>>>>>>>
मार्गदर्शनाबददल धन्यवाद!!! Happy
सर्वच सर्वांच्याइतके सर्वज्ञ नसतात. Wink

१. १ ते ४ वर्ष , ५ ते ८ वर्ष>>>> ४ वर्षे आणि काही महीने असतील तर काय करावे ?

सतिश, ४ वर्षे आणि काही महीने झाले असतील तर ५ ते ८ ह्या वयोगटात सामील करावे लागेल. १ ते ४ वर्षे वयोगट म्हणजे ४ वर्ष पूर्णपर्यंत असा आहे.

२. सकाळ बालमित्र मध्ये येणारे चित्र रन्गवुन पाठवले तर चालेल का?

सरसेनापती, नाही. चित्र हाताने काढले पाहिजे.

सायोनारा, गणेशोत्सव स्पर्धांची अनंत चतुर्दशी (३ सप्टेंबर २००९) ही अंतिम तारीख आहे.