आमच्या घराचा हरवलेला (?) आनंद - आपत्ती व्यवस्थापनाचे पहिले वास्तविक पाऊल !!!

Submitted by अपराजिता on 27 April, 2015 - 11:43

संध्याकाळची वेळ होती. शाळेतून कंटाळून, दमून भागून आलेली बच्चे कंपनी खेळायला बिल्डींगच्या परिसरात जमू लागली. धावाधावी, पकडापकडी, लपंडाव असे खेळ रंगू लागले आणि बघता बघता अख्खा परिसर त्यांच्या ओरडण्याच्या, किंचाळण्याच्या आवाजांनी दुमदुमून गेला होता.

काही लहान मुलांचे उडया मारायचे खेळ चालले होते. आजूबाजूला बसायला जे सुमारे २ - २ १/२ फूट उंचीचे बाकडे बनवले होते त्यावरून ६-७ वर्षाची ती लहानगी चिमुरडी बाळे उडया मारून आपण किती शूर आहोत हे दाखवून आपाआपसात गोंधळ घालत होती.

त्यातल्या काही मुलांचे बोलणे कानी पडले ए मी ना जिन्यावरून २ पायर्‍यांवरून उडी मारू शकतो.

दुसर्‍याने त्याला तोंड वेंगाडून दाखवत चिडवले हे त्यात काय एवढे मोठे सांगतोस तू. मी तर ना ३ पायरीवरून पण उडी मारतो.

प्रत्येक जण आपण किती उंचावरून उडी मारू शकतो हे अगदी तावातावाने रंगवून सांगत होता.

तेवढ्यात एक चिमुरडी म्हणाली त्यात काय ? तुम्ही कोणी गच्चीवरून खाली उडी माराल का?

आधी जरा सगळे घाबरले आणि गोंधळले.

तेवढ्यात दुसरा मुलगा म्हणाला त्यात काय ते टी.व्ही.वर दाखवतात ना तसे पोटाला दोरी बांधून मारायची उडी.

एका भित्र्या मुलाने विचारले आपण पडून हात पाय मोडले तर? आई-बाबा किती मारतील, झोडूनच काढतील बघ...

त्या प्रश्न विचारणार्‍या चिमुरडीने सांगितले फक्त उडी मारायच्या आधी suicide note लिहून ठेवायची ...

अग ते suicide note काय असते ? ह्या श्रावणीचे तर काही तरी नवीनच असते बाबा....

आता आश्चर्याने अवाक होऊन तोंड वासायची पाळी माझी होती . एव्हाना तेथे असलेल्या काही जणांची बाचाबाची सुरु झाली... ह्या एवढ्या लहानशा चिमुरडीला कसे काय माहिती?

एक वयस्क बाई म्हणाल्या हे सारे त्या टी. व्ही. वरच्या नको नको त्या मालिका, सिरीयल्स पाहण्याचे परीणाम. किती वेळा सांगून आई - बापांना कळत नाही. लहान मुले जे बघतात ते करायला बघतात. त्यात चांगले काय , वाईट काय हे त्यांना कुठे कळते. म्हणून तर त्यांना वेळ द्यावा लागतो.
दुसरी कडाडली हल्लीच्या आई-बापांना वेळ असतो का मुलांना द्यायला. कामावरून आले तरी कोठे लक्ष असते घरात... लहान मुले एकतर बिचारी वाट पाहून पाहून दमतात आणि आई बाबा नाही लक्ष देत असे दिसले की मुकाट्याने टी.व्ही. म्हणा., Computer म्हणा नाहीतर ते मोबाईल , व्हिडीओ गेम्स घेऊन बसतात आणि शिकतात मग हे असले नको ते...

असाच एक अजून प्रसंग ... शाळेच्या एक टीचर बाई आज वर्गात मुलांना दिलेले निबंध तपासत होत्या आणि चक्क रडू लागल्या , बाजूलाच त्यांचा नवरा मोबाईल वर गुंग झाला होता. त्याचे बायकोकडे सहज लक्ष गेले आणि त्याने तिला विचारले की ए बाई तुला आता काय झाले?

तेव्हा त्या बाईने सांगितलेला किस्सा ही असेच काही सांगून जातो. ती म्हणाली आज वर्गात मुलांना मी मोठा होऊन काय बनावे वाटते ह्यावर निबंध लिहायला सांगितला. मुलांचे असे भयानक विचार वाचून डोळ्यांत पाणी आले. वेळ मारून नेण्यासाठी नवरोबाने बायकोचे सांत्वन केले अग असे आहे तरी काय त्यात ? एवढी का तू गंभीर झाली.
ती म्हणाली एका मुलाने चक्क लिहीले आहे मला मोठेपणी मोबाईल व्हावे वाटते. म्हणजे मी सर्वांचा लाडका, आवडता होईल. ऑफीस मधून आले तरी बाबा मला प्रेमाने जवळ घेतील, आई पण रागावणार नाही, तिच्या मैत्रीणींचे SMS पाहायला, chatting करायला मला जवळच ठेवेल...

आता जरा मोबाईल मधून डोके वर काढून त्या नवर्‍याने सांगितले की अग तू त्या मुलाच्या आई-बाबांना बोलावून समज दे आणि मुलाला जरा थोडा वेळ द्या म्हणून समजावून सांग. सगळे काही नीट होईल बघ.

तेव्हा तर ती जास्तच रडू लागली.. आता त्याने तिच्या जवळ जात विचारले अग किती सोपा उपाय आहे...

तेव्हा रडत रडत ती म्हणाली अहो तो मुलगा कोण आहे माहीत आहे का? आपलाच मुलगा हे लिहीतोय?
आता मात्र त्यातला ’बाबा’ जागा झाला होता... आपण आपल्याही नकळत किती चुका करतो हे त्याच्या ध्यानी आले होते...

नुकताच नेपाळ आणि उत्तर भारतात ७.९ रिश्टर स्केलचा भूकंप झाला आणि क्षणार्धात हजारों लोकांची घरे उध्वस्त झाली. होत्याचे नव्हते झाले. टी.व्ही., वर्तमानपत्रे ह्यांतून डोळ्याला पाणी दाटेल अशी केविलवाणी बिकट चित्रे आपण पाहतो आहोत. त्यामुळे साहजिकच आपत्ती म्हटले की आपल्या डोळ्यापुढे पटकन चित्र उभे राहते ते भूकंप, पूर, त्सुनामी , दुष्काळ , दरड कोसळणे आणि त्यातून आ वासून उभी राहिलेली प्रचंड जीवित हानी, वित्त हानी ह्यांचे भयानक चित्र.

पण आता वर नुकतेच वाचलेले हे बोलके प्रसंग काय सांगू पाहतात ? ह्याचा जरा नीट विचार करू या.

तसे बघायला गेले तर आपण सर्व कुटुंबीय एकाच घरात राहतो पण बहुतांशी खूप मोठ्या प्रमाणावर ह्या आपल्या वाटणार्‍या घरातला आपलेपणा हद्दपार झाला आहे जणू आणि ह्या आपत्तीला तोंड देण्यासाठी व्यवस्थापन करायला हवे ते संवादाचे..हरवत चाललेल्या नात्यांना जपण्यासाठी खरी सुसंवादाची गरज आहे. मी माझे , माझे ह्यात खर्‍या माझेपणाचा अर्थच हरवला आहे कळत वा नकळत...

त्यामुळे रोजच्या व्यावहारिक , सांसारीक जीवनात आपल्या स्वत:च्या घरातील हरवलेली नाती, हरवलेला आनंद वा ह्यासारख्या इतरही लहान लहान दिसणार्‍या अशा अनेक छोटया-मोठया गोष्टींकडे दुर्लक्ष करून आपणच आणखी मोठया संकटाला किंवा गंभीर प्रकारच्या प्रश्नांना आमंत्रणच देतो जणू काही, ह्याचे साधे भानही आपल्याला उरतच नाही. आणि मग त्यातूनच उद्भवतात आपले घर आपले न वाटणे, त्या घरात आपण फक्त लॉजिंग-बोर्डींग असलेल्या पाहुण्यासारखे राहणे म्हणजेच खर्‍या घराच्या आनंदाला हरवणे ह्या आपत्ती.

माझ्या वा आमच्या घराचा हरवलेला आनंद ह्या पेक्षा माणसाच्या स्वत:च्या जीवनात दुसरी कोणती दुर्दैवी गंभीर आपत्ती असू शकते असे मला तरी निदान वाटत नाही.

लहान मुलांचे वय खूप संस्कारक्षम असते. जणू ओल्या मातीचा गोळा... जसा आकार देऊ तसा .... पूर्वीच्या काळी एकत्र कुटूंब पध्दती होत्या, त्यामुळे घरात आजी-आजोबा, काका, आत्या, मामा , मावशी आणि भरपूर चिल्ली-पिली असायची आणि मुलांचा वेळ आरामात जायचा. कधी भावंडा बरोबर कधी आजोबा , कधी काका... आज काळा बरोबर चित्र पालटले आणि आम्ही दोघे आणि आमचे दोन वा एकच असा चौकोनी वा त्रिकोणी कुटुंबाचा प्रघात पडला. त्यामुळे लहान मुले खूप एकटी पडतात. त्यांना आपण योग्य तो वेळ दिला नाही तर ते एकतर एकलकोंडे बनतात, स्वत:चे विश्व स्वत: शोधतात ...त्यात त्यांना चागले काय वाईट काय हे समजण्याचे वय नसते. जे दिसते त्याचे अनुकरण करायचे एवढेच माहित असते. त्यांना नाना प्रश्न पडतात हे कसे , ते कसे , असेच का आणि तसेच का ... ह्या प्रश्नांना त्यांना समजेल अशा भाषेत उत्तरे द्यावी लागतात , त्यांचे कुतुहल , कोडी ह्यांना समजून घ्यावे लागते.

आज घड्याळाच्या काट्या सोबत आपण सारे धावत असतो पण ह्या आपल्याच लहान चिमण्या पाखरांना आपण वेळ देत नाही. Mobile, smart phone, tab , computer, laptop ह्यांच्या भुलभुलैयात आपण एवढे हरवून जातो की आपले खरे कर्तव्यच विसरतो. मुलांना आज आपण शाळेत वा क्लास मध्ये काय काय केले , कधी किती मजा केली तर कधी किती ओरडा खाल्ला टीचरचा, तर कधी काय गंमत झाली , काय फटफजिती झाली अशा अनेक गोष्टी आई बाबांशी बोलायच्या असतात. आपण जर त्यांना वेळ दिला नाही, त्यांचे म्हणणे एकून घेतले नाही, त्यांच्या प्रश्नांना , शंकाना समाधान करणारी उत्तरे दिली नाही, तर ती मुले अजाणते पणाने म्हणा तर कधी चुकीच्या मार्गाने , कळत वा नकळत जाऊन फसू शकतात . त्यात त्यांच्या स्वत:चे नुकसान होऊ शकते वा कधी कधी तरी वाईट संगतीने अख्खे आयुष्य सुध्दा वाया जाऊ शकते.

थोरा-मोठयांचे नेहमी कानी पडणारे बोल - तोंडातून निघालेला शब्द , धनुष्यातून सुटलेला बाण आणि हातातून निघून गेलेला वेळ कधी परत मिळवता येत नाही. म्हणूनच आपण वेळीच जागरूक होणे आणि सभान असणे, सजग असणे खूप मह्त्त्वाचे आहे. दिवसातला काही मोजका वेळ तरी आपण घरातील सर्व कुटूंबीयांनी हसत खेळत आनंदात घालवायला हवा. सकाळच्या वेळी शाळा, कॉलेज, ऑफीस ह्यामुळे बहुतेक सर्वच जण घराबाहेर पडतात आणि त्यामुळे दुपारचे जेवण हे वेगवेगळेच होते. परंतु रात्री सर्वांनी एकत्र बसून जेवले, त्या वेळेत टी.व्ही. न पाहता एकमेकांची गप्पा मारल्या तर आज हरवत चाललेला हा सुसंवाद , दुर्मिळ होणार नाही. रात्री मनोरंजनासाठी एखादी मालिका , टी.व्ही.पाहणे ह्यात काहीच चुकीचे नाही. पण घरात एक जण ह्या खोलीत तर एक जण दुसर्‍या खोलीत... असे चित्र असल्याने आपण आपल्याच माणसांपासून दुरावतो.
वैयक्तिक जीवनात ह्या महत्त्वाच्या गोष्टीकडे दुर्लक्ष करून आपण खरेच खूप मोठे संकट ओढावून घेत असतो असे मला वाटते.

इंग्लिश भाषेत एक खूप चांगली गोष्ट वाचनात आली - The family that prays together,stays together ..Servant of God म्हणून ओळखल्या जाणार्‍या Father Patrick Peyton ह्यांचे slogan. दुसर्‍या महायुध्दानंतर लॅटीन अमेरीका आणि फिलीपाईन्स मध्ये युध्दाची झळ लागून विभागलेल्या , विस्कळीत झालेल्या कुटूंबियांना एकत्र आणण्यासाठी वापरला गेलेला हा अत्यंत प्रभावी मंत्र... खरेच आजही तेवढाच महत्त्वाचा आहे असे जाणवते.

जे कुटुंब एकत्र प्रार्थना करते ते नेहमी एकत्र राहते... पूर्वी संध्याकाळी दिवेलागणीच्या वेळेला आजी-आजोबा घरातील लहान -थोर मंडळी एकत्र येऊन "शुंभम करोती कल्याणं " अशी प्रार्थना करायचे. आज बदलत्या काळा नुसार हे जरी शक्य नसले तरी किमान रात्री झोपण्याच्या आधी कमीत कमी १०-१५ मिनीटे सर्वांनी एकत्र बसून आपल्या आवडत्या देवाची प्रार्थना करायला काहीच हरकत नसावी. कोणताही मंत्र, गजर, स्तोत्र आपण घेऊ शकतो जो सर्वांना सोयीचा असेल. ह्यामुळे आपले आपल्या भगवंताशी नातेही चांगले अधिक घट्ट बांधले जाईल आणि "तो" परमात्माच आपल्या एकमेकांची नाती अधिक चांगल्या प्रकारे घट्ट बांधून देईल नक्कीच...

आयुष्यभर माणूस सुखासाठी वणवण करत फिरतो , सुखाचा सदरा असा शोधून सापडत नाही म्हणून दु:खी होतो पण संत रामदास ही सांगतात "जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तूची शोधूनी पाहे" मला तरी वाटते की सुख हे आयुष्याच्या अंतिम टोकाला कधीच नसते , तर ते असते तुमच्या वाटेवरच , सभान राहून मला ते माझ्या वाटेवरच आहे ह्यासाठी शोध घेणारी दृष्टी बाळगावी लागते .....मगच "तुज आहे तुजपाशी परी जागा चुकलासी "अशी माझी परवड होत नाही...

"अवघाची संसार सुखाचा करेन, आनंदे भरीन तिन्ही लोक" ही संत ज्ञानेश्वरांची अमृत वाणी सत्यात उतरल्याची साक्षात प्रचिती घेता येईल , ते केवळ एक स्वप्न उरणार नाही.

काय पटतयं ना मग आमच्या घराचा हरवलेला (?) आनंद - हेच आमच्या करीता आपत्ती व्यवस्थापनाचे पहिले वास्तविक पाऊल आहे..

चला तर मग आनंदाच्या मार्गावर चालताना "एकाकीपणा, एकटेपणा" ह्या विपत्तीला बारा वाटा दूर पळवू या.... सुखी , आनंदी जीवनाचे व्यवस्थापन करू या...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

"शुंभम करोती कल्याणं "<<<<
शुंभम नव्हे हो, शुभं.. चुकीच्या जागी अनुस्वार पडल्याने अर्थ बदलतोय. तसंच तो 'म'पण एक्स्ट्रॉ पडलाय. एकदा अनुस्वार दिला की पुन्हा म नको.

आजचा सुविचार - अक्षरे अक्षर असली तरी अनलिमिटेड वापरू नयेत. 'आम्हां घरी धन शब्दांचीच रत्ने' असे म्हटले आहे. ती रत्ने उधळली तर गरिबी येईल. मी मराठी, भाषा मराठी, लिपी देवनागरी.

इत्यलम्! (येथे मी अर्धा म वापरून दाखवला आहे.)

शुंभम करोती कल्याणं >>

असो.
बरंच काही लिहायची इच्छा होत्येय पण श्रद्धा म्हणाल्यामुळे अक्षरे वाचवत्येय!
Wink

(अरेरे, दोन 'य' पण वाचविता आले असते Wink )

असाच एक अजून प्रसंग ...

शाळेच्या एक टीचर बाई आज वर्गात मुलांना दिलेले निबंध तपासत होत्या आणि चक्क रडू लागल्या , बाजूलाच त्यांचा नवरा मोबाईल वर गुंग झाला होता. त्याचे बायकोकडे सहज लक्ष गेले आणि त्याने तिला विचारले की ए बाई तुला आता काय झाले?

तेव्हा त्या बाईने सांगितलेला किस्सा ही असेच काही सांगून जातो. ती म्हणाली आज वर्गात मुलांना मी मोठा होऊन काय बनावे वाटते ह्यावर निबंध लिहायला सांगितला. मुलांचे असे भयानक विचार वाचून डोळ्यांत पाणी आले. वेळ मारून नेण्यासाठी नवरोबाने बायकोचे सांत्वन केले अग असे आहे तरी काय त्यात ? एवढी का तू गंभीर झाली.
ती म्हणाली एका मुलाने चक्क लिहीले आहे मला मोठेपणी मोबाईल व्हावे वाटते. म्हणजे मी सर्वांचा लाडका, आवडता होईल. ऑफीस मधून आले तरी बाबा मला प्रेमाने जवळ घेतील, आई पण रागावणार नाही, तिच्या मैत्रीणींचे SMS पाहायला, chatting करायला मला जवळच ठेवेल...

आता जरा मोबाईल मधून डोके वर काढून त्या नवर्‍याने सांगितले की अग तू त्या मुलाच्या आई-बाबांना बोलावून समज दे आणि मुलाला जरा थोडा वेळ द्या म्हणून समजावून सांग. सगळे काही नीट होईल बघ.

तेव्हा तर ती जास्तच रडू लागली.. आता त्याने तिच्या जवळ जात विचारले अग किती सोपा उपाय आहे...

तेव्हा रडत रडत ती म्हणाली अहो तो मुलगा कोण आहे माहीत आहे का? आपलाच मुलगा हे लिहीतोय?
आता मात्र त्यातला ’बाबा’ जागा झाला होता... आपण आपल्याही नकळत किती चुका करतो हे त्याच्या ध्यानी आले होते...
<<

हे व्हॉट्सॅप फॉर्वर्ड सुमारे १५-२० दिवसांपूर्वी वाचले होते.

naya.jpg

Sad इब्लिस सर, काय सांगताय?? व्हॉट्स अ‍ॅप वरचे लेखन इथे अपराजिता यांनी स्वतःचे म्हणून दिले?? का त्यांनीच मुळात व्हॉट्स अ‍ॅप वर टाकले होते??

भाव पोहोचला Happy

<<<पण आता वर नुकतेच वाचलेले हे बोलके प्रसंग काय सांगू पाहतात ? ह्याचा जरा नीट विचार करू या.>>> ह्या वाक्यावरुन समजतंय की अपराजिता ह्यांनी देखिल वाचलेलेच प्रसंग लिहिले आहेत. त्यांनी ते स्वतःचे म्हणून लिहिलेले नाहीत.

अपराजिता, तुम्ही चुकीच्या ग्रूपमध्ये हा लेख घातला आहे. 'कोणाशी तरी बोलायचंय' हा ग्रूप मायबोलीवर साधारणतः एखादा काही वैयक्तिक प्रॉब्लेम डिस्कस करायचा असेल आणि त्यातून स्वतःपुरती काही दिशा ठरवायची असेल तर वापरतात. तुमचे इतरही लेख योग्य त्या ग्रूपमध्ये अ‍ॅडमिनना सांगून हलवलेत तर बरं होईल.

प्रॉब्लेम ये है की-

मुलं पालकांच्या देखरेखीशिवाय/ सहित टिव्हीवर पाहू नये ते पहातात आणि अनुकरण करायला जातात
आपण आपल्या कुटुंबासोबत जास्त वेळ घालवत नाही.
मुलांपेक्षा स्मार्टफोनवर जास्त वेळ घालवतो.
एकत्र प्रार्थना करत नाही

हे सगळं आजकाल!

ते अगदीच खोटंही नाही.

मला प्रत्येकक्षणी मुलांसोबत इन्वॉल्व होऊन रहायला आवडेल.
पण असं आमच्या आई/आज्जीनेही केलं नाही.
आज्जीपेक्षा आईने आणि आईपेक्षा मी आपापल्या मुलांना/ कुटूंबाला देतोय तो वेळ कमी केलाय.
ज्याचे काही बरेवाईट परिणाम होत आहेत.

मला प्रत्येकक्षणी मुलांसोबत इन्वॉल्व होऊन रहायला आवडेल.>> ते प्रत्येकालाच आवडेल पण ह्याच मुलांना लेटेस्ट आयपॅड, स्मार्ट फोन, कार, चांगली एसी बेडरूम, फॉरिन हॉलिडेज, क्लब मेंबरशिप, ह्या वस्तू पीअर प्रेशर मुळे हव्याश्या असतात. नाहीतर त्यांचा एल एस एफ कमी होतो म्हणे. त्यांची शिक्षणे, प्रवास, महागड्या हॉबीज, क्लासेस ह्या सर्वांसाठी पैसे लागतात ते घरी बसून मिळत नाहीत.
असे गळे काढून काही होणार नाही. माझी आजी देखील शेतात मजूरी करून मुलांना वाढवत होती आता मी नोकरी करते. आई मला नातेवाइकांकडे ठेवून लग्नानंतर शिकली व पूर्ण वेळ शिक्षक होती.

मला असे कितीतरी सुजाण पालक माहीत आहेत जे आई बाबा मुलांच्या बरोबर अ‍ॅक्टिव्हिटी शेअर करतात, वीकांताला एकत्र वेळ घालवतात वन टू वन संवाद करतात व हास्य विनोद हे तर आहेच. मुलांचे होमवर्क करवून घेणे, प्रॉजेक्ट बनवणे ह्या आनंददायक बाबी, पीटीएला जाणे हे फार इन्वोल्व्ह होउन करत असतात जे पूर्वीच्या जॉइंट फॅमिलीतले पालक करत नसतील कदाचित. ( वाचा बिगरी ते
मॅट्रिक.)

आताची जीवनपद्धती वेगळी आहे. सपोर्ट सिस्टिम त्यानुसार डेव्हलप झाली आहे. अ‍ॅप्स, फोन्स नेट ह्या द्वारे उलट मुलांवर लक्ष ठेवणे सोपे व सहज झाले आहे. सिंगल पेरेंट ना खरेतर ह्या सुविधांचा उपयोग होतो. स्काइप शिवाय परदेशात शिकणार्‍या मुलांशी संपर्क ठेवण्याचा विचार आपण करू शकतो का आता?

वेगळे दुकानात न जाता मुले घर बसल्या एखादी वही सुद्धा फ्लिपकार्ट वरून मागवू शकतात. जेवण
होम डिलिव्हरी मागवू शकतात. कोर्सेरा मधून कोर्सेस करतात, व ऑनलाइन व्यवहार शिकतात. त्यांना धोक्याची जाणीव करून दिल्यास ती समजूत दार पणे हे सर्व हँडल करू शकतात.

मोठ्या भारतीय कुटुंबात मुलांवर अत्याचार झाले तर ते आईवडिलांपरेन्त पोहोचत नसत. आता पालक व मुलांचा संवाद खूप सुधारला आहे. मुले बाहेर क्लासला वगिअरे गेल्यास फोन ने संपर्क ठेवता येतो.
हे लाइफ डिजनरेट होते आहे वगैरे खूप विशफूल थिंकिंग आहे. हा माझा अनुभव.

अमा, तेच म्हणतेय.
प्रत्येक पिढीला पुढची पिढी जीवनातला आनंद हरवत चाललीय , व्हॅल्यू डिलीशन होत चाललीय असं वाटतं.
मात्रं प्रत्येक नविन पिढी नवा आनंद, व्हॅल्यू शोधतेच.

पूर्वी नातेवाईकांना महिन्यातून एखादं पत्रं लिहिणं योग्य असे, नंतर आठवड्यातून एखादा फोन आणि आत्ता दरसकाळी आपापल्या कुटुंबाच्या वॉटसअ‍ॅप ग्रूपवर गुडमॉर्निंगचं फॉर्वर्ड!
प्रत्येक काळाची आपापली संस्कारपद्धती.

साती अनुमोदन. अगं ते " पर प्रॉब्लेम क्या है ? " हे एका स्टँड अप कॉमेडी द्वयाने वापरले आहे. त्या संदर्भाने लिहीले होते. यूट्यूबवर मै प्रेम की दिवानी चा प्रिटेन्शिअस मुव्ही रिव्यू बघ. व्हेरी फनी. तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे संवाद हरवतो आहे हे एक बेकार गृहीतक आहे. मध्नं मधनं उसासे टाकायला बरे.

अपराजिता, तुम्ही चुकीच्या ग्रूपमध्ये हा लेख घातला आहे. 'कोणाशी तरी बोलायचंय' हा ग्रूप मायबोलीवर साधारणतः एखादा काही वैयक्तिक प्रॉब्लेम डिस्कस करायचा असेल आणि त्यातून स्वतःपुरती काही दिशा ठरवायची असेल तर वापरतात. तुमचे इतरही लेख योग्य त्या ग्रूपमध्ये अ‍ॅडमिनना सांगून हलवलेत तर बरं होईल.

>> +१००००