विद्वत्ता आणि तुच्छता

Submitted by अतुल ठाकुर on 25 April, 2015 - 01:49

te-292x300.jpg

अलिकडे सेमिनारला जायचे म्हटले म्हणजे मी इंप्रेस होण्याच्या तयारीनेच जातो. तिथलं सारं काही भारावुन टाकण्यासाठीच असतं. किंबहुना सर्व योद्धे त्यासाठीच कंबर कसुन आलेले असतात. हे सर्व योद्धेच असतात. जे बोलत नाहीत ते प्रश्न विचारुन घायाळ करण्यासाठी येतात. इतर विषयांचं माहित नाही पण समाजशास्त्राचे सेमिनार ही एक रणभुमी असते. तर अशाच एका रणभुमीत अलिकडेच सापडलो होतो. बाई ब्रिटीश होत्या आणि अतिशय हसतमुख. ही मुळातच दुर्मिळ गोष्ट होती. आम्ही समाजशास्त्री म्हणजे "चिंता करतो विश्वाची" या कॅटॅगरीतील माणसे. त्यामुळे हसणे वगैरे म्हणजे जरा जास्तच. पण परीक्षांचे दिवस आणि अगदीच हाताच्या बोटावर मोजता येतील अशी माणसे असुनही बाईंनी उत्साहाने सुरुवात केली आणि अगदी बरोबर दिली होती ती अर्ध्यातासाची वेळ काटेकोर पार पाडली. हे आणखि नवल. आमच्याकडे काहीजण बोलायला आले कि लोकांच्या हृदयाचा ठोका चुकतो. कारण "आता शेवटचा मुद्दा" हे त्यांच्या बोलण्यात किमान चार पाच वेळा येते. बाई ब्रिटीश असुन आणि त्यांचा अ‍ॅक्क्स्सेंट ब्रिटीश असुन देखिल अगदी समजेल अशा इंग्रजीत बोलत होत्या त्याने तर मला गहिवरुनच आलं. कारण दुर्बोधता हा येथे विदवत्तेचा पहिला निकष आहे. साध्या भाषेतल्या बोलण्याला "इडियॉटीक सिमप्लिसिटी" म्हणुन हिणवण्याचे दिवस आहेत. पण येथे सारं काही नीट पाडण्याच्या आनंदात राहताच आलं नाही. मागे बसलेले एक विद्वान अचानक चवताळले आणि त्यांनी टिकेची झोड उठवली. तुम्ही फारसं नवीन काहीही सांगीतलं नाहीत हा त्यांचा मुद्दा होता. खरं तर त्यात काही नवीन मुद्दे होते असं मला वाटलं पण साहेब ऐकुन घ्यायला तयार होईनात. चढ्या आवाजात आणि उद्धट शब्दांमध्ये ते बोलत होते आणि बाई शांतपणे उत्तर देत होत्या. प्रथेप्रमाणे हे विद्वान दार उघडुन धाडदिशी निघुन गेले म्हणजे त्या बाईचा कमाल अपमान साधता येईल. कारण येथे मी थांबुन ऐकावं या लायकिचं काहीही सांगण्यासारखं तुमच्याकडे नाही हेच त्यातुन दाखवायचं असणार. ही विदवत्तेचा वरचढपणा दाखवण्याची खास समाजशास्त्रीय पद्धत आहे. त्यानंतर असं कळलं कि बाईंना ज्या विद्वानांनी बोलावलं त्यांचे या विद्वानांशी बरे नव्हते आणि राग मात्र उगाचच बाईंवर निघाला. माझ्या बाबतीत घडलेले प्रसंगदेखिल येथे सांगीतले तर ते अस्थानी होणार नाही.

माझे काम गाईडकडे होते तेथे एका विद्वानांशी गाठ पडली. हे महाशय सिगरेट फुंकत बसले होते. संशोधन सुरु असल्याने असे विद्वान खोर्‍याने भेटतात. विद्यापीठ, कॉलेज सगळीकडेच. बोलण्याच्या ओघात मी अतिशय आदराने योगाचार्य अय्यंगार गुरुजींचा उल्लेख केला. वयाच्या ९४ व्या वर्षी त्यांचे बत्तीस दात शाबुत होते याचेही मला खरोखरच नवल वाटले होते. विद्वान बोलु लागले," कोण ते चेक करायला गेलंय? माणसं काहीही सांगतात. आणि सर्व अय्यंगार दीर्घायुषी असतातच. त्यांच्या फुड हॅबीट्समुळे.... हे खाऊन खाऊन काय खाणार तर भात आणि सांबर. त्याने शरीराला होऊन होऊन किती डेमेज होणार? अय्यंगार लोक ८० च्या आधी मरतच नाहीत. त्याचा अध्यात्म वगैरेशी काही संबंध नाही." एका झटक्यात त्या विद्वानांनी अय्यंगारांचा सत्तरहुन अधिक वर्षाचा योगाचा अनुभव, त्यांचा सराव, योगाचार्य म्हणुन जगतात असलेले त्यांचे स्थान, त्यात त्यांनी केलेले प्रचंड संधोधन मोडीत काढले होते. विद्वानांबद्दल मला वाटत असलेला तिरस्कार वेळोवेळी माझ्या लिखाणात दिसत असतोच. तो मुद्दाम आलेला नाही. त्याला हे असे विद्वान कारणीभूत आहेत. हा तिरस्कार उत्तरोत्तर वाढतच जाण्याची शक्यता वाटते आहे. पण आता मी एक पथ्य पाळतो. वाद घालत नाही. पूर्वी वाटायचे यांचे आदराचे स्थान तरी कोणते असेल? पण आता वाटतं ही पराकाष्ठेची आत्मकेंद्रित माणसं असणार. मी आणि फक्त मीच. अशा स्वतःच्याच प्रेमात पडलेल्या माणसांकडे इतरांसाठी जागा कुठुन असणार? मात्र एकदा हातघाईची वेळ आली होती. धारावीतील ढोर समाजावर काही संशोधन सुरु होते आणि काही माहीती मी गोळा केली होती. मुलाखती घेतल्या होत्या. त्याआधारे एका सेमिनारमध्ये मला पेपर सादर करण्यास सांगीतले होते. एकुण प्रतिसादावरुन जाणवत होते कि प्रेझेन्टेशन बर्‍यापैकी जमले आहे. मात्र अचानक एक जेएनयुमधले विद्वान चवताळलेच. त्यांनी वेडावल्यासारखे करुन अत्यंत विखारी शब्दात जोरजोरात ओरडुन टिका करण्यास सुरुवात केली. बरं त्या टिकेत काही रेखीव मुद्दाच नव्हता. मला यांना एकदम चिडण्यासारखे काय झाले हे क्षणभर कळेचना. पण त्यादिवशी बर्‍यात गोष्टी त्या काही क्षणात लक्षात आल्या.

एक म्हणजे कोंबड्याची झुंज पाहण्याची मानसिकता असलेली बरीच माणसे येथे येतात. ती विद्वान असतीलही पण त्यांना माणुसकी नसते. माझ्या अवतीभोवती अगदी सेन्सेशन निर्माण झाले होते. झुंजीमध्ये रक्ताळलेला कोंबडा पाहणारी ती विकृत मानसिकता होती. सर्वजण सोयीस्कररित्या मुग गिळुन गप्प बसले होते. फक्त एकच माणुस माझ्या बाजुने काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करीत होता. बहुतेकजण कुंपणावरचे सरडे होते. जो वरचढ ठरेल त्याच्या बाजुने बोलणारे. हे सारं एका क्षणात माझ्या डोळ्यापुढुन सरकुन गेलं. इथे गप्प बसण्यात अर्थ नव्हता. साधारणपणे माझी भुमिका नेमस्तच असते. शक्यतोवर वाद टाळणे याकडे कल. पण त्यादिवशी संयम राहीला नाही आणि त्या विद्वानाच्या वरताण आवाज काढुन मी प्रतिवाद केला. अतिशय तुच्छतेने त्याचा मुद्दा खोडुन काढला. एखादा मेलेला उंदिर फेकावा त्याप्रमाणे त्या विद्वानांना झटकुन मी खाली बसलो. ते सेशन तेथेच संपलं. विद्वान परत काही बोललेच नाहीत. मुळात अनेकांना माझा हा अवतार नवीन होता. हा आता गप्प ऐकुन खाली बसणार, नंतर सावकाश आपण याची सालं काढु या समजुतीत बहुतेक जण होते. ते खट्टु झाले असणार. माझ्या गाईडने माझ्या वागण्याबद्दल मला दोष दिला. पण मी "गुरुर्ब्रह्मा" कॅटेगरीतला माणुस नाही त्यामुळे मला काडीचीही खंत वाटली नाही. आजदेखिल मला त्यादिवसाच्या वागण्याचा पश्चात्ताप नाही. ज्ञानाच्या क्षेत्रात सर्वज्ञ कुणीही नसतो. पण चुका सांगण्याची काही पद्धत हवी. समोरच्याचा कमाल अपमान साधेल असे वागण्याचे काही कारण नसते. माझ्यावर खच्चुन ओरडावं असा त्या विद्वानांचा मी कसलाही अपराध केला नव्हता. पण समाजशास्त्राच्या सेमिनार्समध्ये किंवा चर्चांमध्ये हा प्रकार मी नेहेमी पाहिला आहे. पण यावरुन फक्त विद्वानांचा अहंकार हे कारण कुणी यात पाहिले तर या प्रकाराचे धारेदोरे किती खोलवर गेले असतात याची संपूर्ण कल्पना येणार नाही. आणि ती कल्पना येण्यासाठी मुळात इतर विषयांपेक्षा समाजशास्त्र हा विषय किती आणि कसा वेगळा आहे हे माहित करुन घेणे आवश्यक आहे.

इतर विज्ञान किंवा गणितासारखे विषय शिकवताना, जात, वर्ग आणि धर्म यांचा संबंध येत नाही. तुमची जात, वर्ग, धर्म काहीही असो, वैज्ञानिक सत्य हे सत्यच राहतं. मात्र समाजशास्त्रात तसं नसतं. प्रत्येकाची जात, धर्म आणि वर्ग हा त्यांच्या शिकवण्याशी दुर्दैवाने एकरुप झालेला असतो, त्यामुळे जजमेंटल न होणे, व्हॅल्यु न्युट्रॅलिटी हे शब्द फक्त पुस्तकातच राहिलेले असतात. सर्वांचे स्वतःचे अजेंडा असतात आणि ते कधी सुक्ष्मपणे तर कधी अगदी उघडेपणाने ही मंडळी पुढे करतात. त्याचा शिकवण्यावर तर परिणाम होतोच पण काही प्रसंगी बिचार्‍या रिसर्च स्टुडंट्सना याची झळ बसते. ख्रिस्ती पाद्री जर प्रोफेसर असेल तर तो भारतातल्या सर्व महत्त्वाच्या सुधारणा ख्रिश्चनांनी कशा आणल्या यावर वर्गात बोलणारच. किंवा हिंदुंच्या काही चालीरितींवर टिका टिप्पणी करणारच. अलिकडेच "जाती आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या अ‍ॅनहीलेशन ऑफ कास्ट" यावरील व्याख्यानात व्याख्यात्यानंतर बोलायला उठलेल्या ख्रिस्ती प्रोफेसरने गोवधबंदीवर वर कमेंट केलेच. दलित प्राध्यापक गांधींवर टिका केल्याशिवाय राहणारच नाही. मार्क्सवादी अहंकाराची तर गोष्टच वेगळी. सर्वांनाच तुच्छ लेखण्याचा परवाना त्यांना मिळालेला असतो. फेमिनिझम कडे जाणारे एकजात श्रीमंत लोक आणि त्यांच्या चर्चा हे तसल्याच. त्यात दलित स्त्रियांवरील अत्याचारांवर शब्दही नाही. अशा तर्‍हेच्या वाटण्या झाल्याने मी स्वतः किमान दोन प्रसंगी प्राध्यापक मंडळी एकमेकांवर आरडाओरडा करताना पाहीली आहेत. त्यात सर्वात वाईट भाग म्हणजे संशोधनाच्या सुरुवातीला डिपार्टमेंटमध्ये प्रेझेंनटेशन असते तेव्हा ज्या प्राध्यापकावर आपला राग असतो त्याच्या स्टुडंटला मुद्दाम कठिण प्रश्न विचारायचे, त्याचा सर्वांसमोर पाणउतारा करायचा हे प्रकार घडतात. या सर्व ज्ञानी मंडळींचे अहंकार प्रचंड मोठे असतात. विद्यार्थ्यांच्या नाड्या त्यांच्या हातात असल्याने त्यांच्याकडुन कसलाही विरोध होण्याची शक्यता नसते. यामुळे संशोधनात "संशोधन" बाजुला राहुन हा अशा तर्‍हेच्या प्राध्यापकांची मर्जी राखणे हेच एक मोठे काम होऊन बसलेले असते. यामुळे होणारे नुकसान खुपच असते. वेळेचा अपरीमित अपव्यय होतो. आणि विद्यार्थ्यामधली सहिष्णुता कमी होते असे मला वाटते.

हा सहिष्णुतेचा भाग मला अत्यंत महत्त्वाचा वाटतो. चर्चा करणे म्हणजे फड जिंकण्यासाठी बसणे नव्हे. मात्र अलिकडे हा समजच रुढ होऊ पाहतोय. मला कुणीतरी पॉवरपॉईंट प्रेझेंटेशनचे महत्त्व आणि फायदे सांगताना एक फायदा हा सांगीतला कि त्यामुळे ही जी युद्ध खेळण्यासाठी मंडळी आलेली असतात त्यांचे लक्ष जरा युद्ध खेळण्यावरुन बाजुला होते. हे ऐकुन मला धक्काच बसला. चर्चा म्हणजे खर्‍या अर्थाने युद्धच असेल तर मला ऐन धुमश्चक्रित मध्यावर उभे राहुन लढायला आवडेल. पण ते युद्ध म्हणुन खेळले जाऊ नये असे मात्र मनापासुन वाटते. त्याचा एक परिणाम मी पाहीला आहे. इंग्रजीचा न्युनगंड म्हणुन गावाकडुन आलेला एक अतिशय हुशार मुलगा येथे सेमिनार मध्ये तोंड उघडत नव्हता. काही दिवसांनी त्याला मराठीत पेपर वाचण्याची संधी मुंबईबाहेर कुठेतरी मिळाली. तेव्हा हा माणुस मला येऊन फड जिंकल्याच्या आनंदात आपण इतरांना कसे अडचणीचे प्रश्न विचारुन गप्प केले, हेच सांगत सुटला. हे शिक्षण याला कुठुन मिळाले? असली सेमिनार्स अटेंड करुन आणि अशा भांडणार्‍या गुरुजनांना पाहुनच. बरं यातले सर्वच आपापल्या विषयात तज्ञ असतात हाही एक मोठा गैरसमज. काही जण अनेकवर्षापुर्वी केलेल्या पीएचडीच्या धनुकलीवर आयुष्यभराचं पिंजण काढत राहतात. त्यामुळे चर्चांमध्ये मोकळेपणा, समोरच्याचा न पटलेला मुद्दा शांतपणे समजाऊन देणे, सौम्यपणे आपले म्हणणे मांडणे, खर्‍या अर्थाने "ज्ञान" मिळावे म्हणुन वादविवाद करणे या गोष्टी सेमिनार्स मध्ये दुर्मिळ झाल्या आहेत. दुसर्‍याबद्दल असहिष्णुता आणि तुच्छता हा विद्वत्तेचा निकष होऊ पाहात आहे ही गोष्ट मला भयावह वाटते.

अतुल ठाकुर

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त लेख, अशी माणसे प्रत्येक ठीकाणी असतात. बर्‍याचदा घरात, मिञ परीवारात , नातेवाईकात , शेजारी पाजारी ही असतात. वास्तविक ही माणसे जेलस असतात , आपण समोरच्या ईतके कर्तुत्ववान नाहीत हे अशी माणसे सहन करु शकत नाही त्यामुळे ती कारणे देत असतात.

आवडला लेख ( हे सर्व बहुतेक केवळ समाजशास्त्रातल्या विद्वानांनाच लागू होते.. इतर क्षेत्रातले अत्यंत नम्र विद्वान मी बघितले आहेत.. ) शिवाय माझी लायकी नाही हे लिहायची तरी लिहावेसे वाटतेय... प्रत्यक्ष कृतीतून समाजासाठी काही करणारे विद्वान अगदीच मोजके. बाकीचे केवळ वाचावीर.

लेख खूप आवडला.
छान लिहिलाय.
सुदैवाने एकाही मेडिकल कॉन्फरंसमध्ये असा प्रकार पाहिला नाही.
कुणी रटाळवाणे बोलू लागला तर लोक आपापल्या लॅपटॉप्/आयफोनात तोंड खूपसून बसतात.
कुणी प्रश्नं विचारलाच तर अधिक जाणून घेण्याच्या इच्छेने फक्तं!
अडचणीत आणण्यासाठी नाही.
हल्ली इंटरॅक्टीव पद्धतीमुळे सुरुवातीस आणि शेवटी एम सी क्यू टाईप प्रश्नं विचारतात.
म्हणून मजा येते.

लेख सुंदर.. एकदम पटला.. मी समाजशास्त्राचा विद्यार्थी नाही पण हा लेख मला इतरही बऱ्याच ठिकाणी लागू होईल असे वाटले..

शांतपणे काही माहितीपूर्ण चर्चा करता येईल असे लोक भेटणे विरळाच ...
नाहीतर बरेच जण पूर्वग्रहदूषित मनाने तावातावाने बोलत असतात, समोरच्याचे बोलणे समजून घेण्यासाठी त्यांची मनाची कवाडे उघडी नसतात.. मग काही अर्थ राहत नाही चर्चांना...

नम्र विद्वान समाजशास्त्रातही दिसतात. नाही असं नाही. विशेषतः जी माणसे प्रत्यक्ष फिल्डवर काम करीत असतात त्यांच्यात बरेचदा कसलाही इगो आढळत नाही. मात्र जे "आर्म चेअर स्कॉलर्स" असतात ते मात्र बहुधा लढाईसाठी येतात असं मला वाटतं.

समाजशास्त्राच्या अभ्यासकाला त्याचा त्या विषयातील ज्ञानाचा विस्तार करण्यासाठी अनेकविध पातळीवरील अनुभवांना सामोरे जावे लागते. अतुल ठाकुरांनी "आदिवासी समाजाच्या चालीरितींचा मी अभ्यास केला आहे" असे विधान चारचौघांसमोर केले त्यावेळी त्यापैकी एक मी असेन तर साहजिकच मी असे गृहित धरून चालतो की श्री.ठाकुर यानी स्वतः आदिवासी समाजात जाऊन तिथे वस्ती करून त्या चालीरिती पाहिल्या आहेत आणि त्यातून मिळालेल्या अनुभवाच्या आधारे सेमिनारमध्ये आपले म्हणणे मांडले आहे. भाषेच्याबाबतीत असे होत नाही. ग्रंथालयातील चार कोंदट कपाटाभोवती बसूनसुद्धा एखादा गुणवत्ता शिष्यवृत्तीधारक सातासमुद्रापल्याड लेखकांसंदर्भातील माहिती गोळा करून, तीवर आपले भाष्य दाखल करून भाषा परिसंवादाला हजर राहून आपला पेपर सहजी सादर करू शकतो. समाजशास्त्रा अभ्यासात फिल्ड वर्कला अतोनात महत्त्व आहे....जे साहजिकच आहे... त्यामुळे एकाच वेळी अनेकजण शास्त्रातील विषयावर प्रत्यक्ष जागेवर जाऊन संशोधन करत असल्यामुळे जो तो माझेच संशोधन किती मोलाचे हे अहमहमिकेने परिसंवादात मांडत असतो आणि त्यातूनच उत्पन्न होती दुस-याने केलेल्या संशोधनाची खिल्ली उडविणे. हे वास्तविक ख-या अभ्यासकाला शोभा देत नसते. त्याने आपल्याबरोबरीने इतरांच्या संशोधनालाही मान्यतेची पावती द्यावी अशी अपेक्षा असते. काही ठिकाणी संशोधनातील फलितेबाबत एकवाक्यता असू शकत नसेलही, पण ती मांडताना मांडणा-याने विवेक ठेवणे अपेक्षित असते. दुर्दैवाने हे होत नाही हे अतुल ठाकुर यांच्या निवेदनातून उघड होतच आहे.

ज्ञानी मंडळींच्या आपल्या विद्येबाबत प्रचंड अहंकार असतो आणि तो दाखविण्याची खुमखुमी त्याना आली की असली सेमिनार्स त्याना कुरण म्हणून सापडतात. तरीही अशा एखाद्याला ठाकुर म्हणतात त्याप्रमाणे "...त्या विद्वानाच्या वरताण आवाज काढुन मी प्रतिवाद केला. अतिशय तुच्छतेने त्याचा मुद्दा खोडुन काढला...." ही मात्रा झटदिशी लागू पडते...कित्येकवेळा याचा परिणाम ओळीत बसलेल्या अन्य विद्वानांवर योग्यरितीने झाला असणारच.

"..दुसर्‍याबद्दल असहिष्णुता आणि तुच्छता हा विद्वत्तेचा निकष होऊ पाहात आहे ही गोष्ट मला भयावह वाटते..." ~ हे सर्वांच्याच बाबतीत घडत असेल असे मात्र नाही....घडूही नये इतकेच म्हणेन.

लेखाचा आशय म्हणजे अगदी दुखर्‍या जखमेवरची खपली. हे सु:स्पष्टपणे मांडायलाही धाडसच लागते.
>>>> पण आता वाटतं ही पराकाष्ठेची आत्मकेंद्रित माणसं असणार. मी आणि फक्त मीच. अशा स्वतःच्याच प्रेमात पडलेल्या माणसांकडे इतरांसाठी जागा कुठुन असणार? <<<<
माणसाचे "माणूसपणाचे" लक्षणच ही आत्मकेंद्रीतता आहे आणि ही सर्व थरात बघायला मिळते, विद्वानांकडेही बघायला मिळाली तर मात्र अधिक बोचते. कारण अभ्यासाने माणूस नम्र बनलेला असायला पाहिजे पण मूळ वृत्ती मात करते.
आख्ख अध्यात्म व साधुसंतांचे साहित्य "याच मीपणावर" मात करीत सुखाचे गृहस्थी जीवन कसे जगावे हे शिकविण्याकरीता झटले आहे असे मला वाटते.
पण सुंभ जळला तरी पीळ जळत नाही, तशागत अहंपणा सहजासहजी जात नाही. कुंडलीतील ग्रहांवरुन कोणामधे हा अहं किती आहे याचा अंदाज नक्कीच घेता येतो. असो.

अशी माणसं रोज आपल्या आजूबाजूला सापडू शकतात . विद्वत्ता नसलेली , काडीची अक्कल आणि लायकी नसलेली माणसंही भयंकर अहंकारी असतात . उदा पी एम टी चे कंडक्टर , ड्रायवर .