"नाव विदेशी-चव देशी" - पाककला स्पर्धा

Submitted by संयोजक on 8 August, 2009 - 00:37

मेरा जूता है जपानी, ये पतलून इंग्लिस्तानी, सर पे लाल टोपी रुसी, फिर भी दिल है हिंदुस्थानी |

हे दिल जसं हिंदुस्थानी आहे तशी आपल्या जीभेची चवही अस्सल हिंदुस्थानी नाही का ? पिझ्झा हट मधल्या तंदूरी पिझ्झ्यावर उगीच का उड्या पडतात?

ह्या अस्सल हिंदुस्थानी जीभेचे चोचले पुरवण्यासाठी तुम्हीही कधी घरातल्या घरात फ्युजन पाककृती निर्माण केल्या असतील. आपल्या मराठी पदार्थांखेरीज कध्धी काहीही न खाणार्‍या सासुबाईंकडून पसंतीची पावती मिळवली असेल.

पण फक्त चाटून पुसून स्वच्छ झालेल्या ताटाकडे बघून समाधान मानू नका तर आपल्या पाककृती मायबोलीच्या गणेशोत्सव पाककृती स्पर्धेत सादर करुन सर्वांचीच दाद मिळवा!!

"नाव विदेशी-चव देशी" - पाककला स्पर्धा

********************************************************

स्पर्धेचे नियम :

१. पाककृतीत वापरल्या जाणार्‍या साहित्यामधे महत्वाचा घटक हा विदेशी आणि बाकी भारतीय घटक असावेत. मुख्यतः भारतीय मसाले किंवा भारतीय भाज्या, डाळी, फळं (घटक) वापरून मूळ पाककृतीत केलेला बदल लिहिणे अपेक्षित आहे.

२. पाककृती मुद्देसूद व व्यवस्थित लिहीलेली असावी.

३. शाकाहारी आणि मांसाहारी अशा दोन्ही प्रकारच्या पाककृती चालतील.

४. पाककृती सोबत छायाचित्र देणे बंधनकारक नाही पण असल्यास उत्तम. परिक्षकांनी दिलेल्या गुणांची बरोबरी झाल्यास छायाचित्र असलेल्या प्रवेशिकेला प्राधान्य देण्यात येइल.

५. पाककृती साधारणपणे २ ते ६ लोकांच्या वाढणीची असावी.

६. पाककृतीसाठी लागणारे जिन्नस भारतात आणि भारताबाहेर सहज उपलब्ध असावेत.

७. या स्पर्धेसाठी वेळमर्यादा नाही. पण तरीही ती वेळखाऊ नसावी. तयारीचा वेळ व पाककृती बनवताना लागणारा वेळ ह्या दोन्ही गोष्टी नमूद केलेल्या असाव्यात.

८. पाककृतीसाठी मायक्रोवेव्ह किंवा ओव्हन वापरले तरी हरकत नाही. या उपकरणांना काही पर्याय असेल तर तो पाककृती मध्ये नमूद केलेला असावा.

९. पाककृती पारंपारिक (उदा. इटालियन पिझ्झा) असली तरी त्यात केलेले बदल, स्वतः केलेले असावेत. ते तसे पाककृतीत नमूद करावेत.

१०. प्रादेशिक अथवा स्थानिक घटक पदार्थांसाठी पर्यायी घटक पदार्थ देणे स्वागतार्ह आहे परंतु बंधनकारक नाही.

११. फुड नेटवर्क वरुन किंवा संजीव कपूर किंवा इतर कोणाची पाककृती जशीच्या तशी उचलून स्पर्धेत टाकलेली नसावी. पाककृतीच्या माहितीचा स्त्रोत लिहिणे बंधनकारक आहे.

१२. पाककृती ह्याआधी मायबोलीवर प्रसिद्ध झालेली नसावी. स्पर्धेच्या विषयाला धरुन मायबोलीवर प्रसिद्ध झालेल्या एखाद्या कृतीत बदल केले असल्यास चालेल.

१३. परिक्षकांचा निर्णय अंतिम राहील.

स्पर्धेची सुरवात गणेश चतुर्थीला होईल आणि प्रवेशिका कशा आणि कुठे पाठवायच्या याबद्दल माहिती लवकरच दिली जाईल.

********************************************************

इतर स्पर्धांसाठी पहा : मायबोली गणेशोत्सव २००९ स्पर्धा घोषणा

विषय: 

छे, काही सुचत नाही.. Proud
>>महत्वाचा घटक हा विदेशी
हं..
युकॉन गोल्ड किंवा रसेट हे विदेशी बटाटे वापरुन केलेले वडे चालतील का? Wink Light 1

आयडीया मस्तंय!

>> पाककृतीत वापरल्या जाणार्‍या साहित्यामधे महत्वाचा घटक हा विदेशी आणि बाकी भारतीय घटक असावेत.
ह्यातलं विदेशी साहित्य 'रॉ मटेरिअल' ह्या अर्थाने का? की मी स्पायसी बीन पॅटी, व्हेजी पॅटी किंवा मीट पॅटी वापरून 'भरले पराठे' करायचे ठरवले तर चालेल?

युकॉन गोल्ड किंवा रसेट हे विदेशी बटाटे वापरुन केलेले वडे चालतील का? >>>
मी स्पायसी बीन पॅटी, व्हेजी पॅटी किंवा मीट पॅटी वापरून 'भरले पराठे' करायचे ठरवले तर चालेल?>>> भरले पराठे किंवा बटाटे वडे दोन्ही चालणार नाहीत कारण ते मुळात देशी पदार्थ आहेत.

आपल्याला पदार्थ विदेशी पाहिजे आणि त्याची चव मात्र देशी हविये. तो विदेशी पदार्थ करण्यासाठी मूळ घटक म्हणजेच रॉ मटेरीयल-- जसं की पास्ता, पिझ्झा बेस हे चालतील.

>>हे फक्त खाण्याच्याच बाबतीत लागु होतं का ? >> पाककला स्पर्धा असल्याने खाण्याच्याच बाबतीत लागू होणार ना? >>>
नाही हो "नाव विदेशी-चव देशी" म्हणुन गोंधळलो जरा. Proud

अहो संयोजक,
तुमचे नियम १ आणि ६ परस्पर विरूद्ध आहेत अस नाही का वाटत. मुख्य विदेशी पदार्थ देशात सहज पणे कसा मिळणार.?
आणि मग देशी लोक कसे सहभागी होणार?

विक्रम३११, नियम १: पाककृतीत वापरल्या जाणार्‍या साहित्यामधे महत्वाचा घटक हा विदेशी आणि बाकी भारतीय घटक असावेत. >>
पाककृती तयार करायला लागणार्‍या साहीत्यातला मुख्य पदार्थ विदेशी असावा. जर तंदूरी पिझा हा पदार्थ तयार करणार असाल तर पिझा बेस हा झाला विदेशी घटक.
नियम ६ : पाककृतीसाठी लागणारे जिन्नस भारतात आणि भारताबाहेर सहज उपलब्ध असावेत.>> पास्ता, नूडल्स, पिझा बेस, बर्गर बन, स्वीट कॉर्न, चीझ ह्यासारखे विदेशी घटक पदार्थ आजकाल भारतात लहान गावांमधेही सहज उपलब्ध आहेत. तसेच फक्त हेच घटक पदार्थ वापरले पाहिजेत ह्यावर बंधन नाही. तेव्हा तुम्ही म्हणता तसे नियम १ आणि ६ परस्परविरुद्ध नाहीत.

स्कॉच व्हिस्की म्हणून देशी दारू दिली तर चालेल का? म्हणजे बाटली (महत्वाचा घटक) शिव्हास रीगलची नि आत दारू गावठी.

Lol वा वा झक्की काय मस्त कल्पना. तशी पाककृती म्हणजे तिरामित्सू मध्ये मोसंबी किंवा नारंगी. नारंगीचा रंग एकदम मॅच होईल.
संयोजक पत्ता पाठवा, टेस्टसाठी पाठवून देतो.

पाककृती,
१ कांदा बारीक चिरुन घ्या , ६ पाकळ्या लसुन ठेचुन घ्या , थोडी कोथींबीर चिरुन घ्या .
गॅस/ विद्युत शेगडी वर भाड ठेवा त्यात कोलेस्ट्रेल फ्री तेल टाका , त्यात जिरे मोहरी फोडणी द्या , मग कांदा , लसुन , कोथींबीर टाकुनं चांगल परतुन घ्या , आता त्यात २ वाट्या बेसन टाका , तिखट व मीट चवीप्रमाणे टाका ..............................
आणी मग झक्कीकाकांनी वर दिलेला चिवास रिगलचा अख्खाच्या अख्खा खंबा त्यात उपडा करा , आणि झाकुन ठेवा .
१० मिनिटांत तयार चिवास पिठलं . Happy

लाजो , तरीच म्हटलं परिक्षकांना माझी रेसिपी लक्षात का नाही राहीली Lol
आऊटडोअर्स किमान १२ वर्ष जुनी तरी हवी म्हणजे पिठल्याची टेस्ट वाढते , तेवढी जुनी नसेल तर थोडी वोड्का पण मिसळायची म्हणजे इच्छीत इफेक्ट लगेच जाणवतात Proud