एक प्रमुख पाहुणा

Submitted by सुशांत खुरसाले on 30 March, 2015 - 00:40

कॉलेज सुटलं आणि आम्ही तिघे मित्र घरी जाण्यासाठी निघालो. शेजारच्या रस्त्यावरून आमचेच काही मित्र त्यांच्या मैत्रिणींना घेऊन इमानेइतबारे घरापर्यंत सोडण्यासाठी गाडीवर निघाले होते.(या मैत्रिणी वर्गात आपल्या वाटत असल्या तरी गाडीवर बसल्यावर पूर्णपणे 'त्यांच्या' होतात.)
आपल्याला हे काम कधीही जमणार नाही अशी आमची गाढ श्रध्दा आहे- कारण आम्ही जाताना एवढे धिंगाणे करत जातो की स्वतःच्याच घरापर्यंत सहीसलामत पोचण्याची हमी नसते.

अशा ओळखीच्या दृश्यांसोबत ओळखीची वाट तुडवत असताना मला एका अनोळखी नंबरवरून फोन आला. 'आपली एखादी कविता वाचून एखादीने लाडेलाडे बोलण्यासाठी हा फोन केला असावा.'अशा कल्पना आता मनातसुध्दा येत नाहीत.ते वय केव्हाच उडून गेलं. शिवाय असा फोन आलाच तर काही काळाने ती पोरगी आपल्याशी बोलणं टाकते, हा अनुभव गाठीशी असल्यामुळे अशा कुठल्याही कल्पनांवर जीव उधळता येत नाही. त्यामुळे योगायोगांवर आमचा विश्वास नाही, कर्मावर आमचा विश्वास नाही ,विश्वासावरही आमचा विश्वास नाही..आमचा विश्वास आहे तो एकमेकांवरच्या दृढ अशा अविश्वासावर -अशी चर्चा आम्ही उठता बसता करतो.

"नमस्कार,खुरसाले का ?"

"हो..बोलतोय."

"नमस्कार, मी फर्ग्युसन कॉलेजमधून बोलतीय."

"बोला..काय म्हणताय ?"

"आमच्याकडे व्हॅलेंटाईन्स डे ला एक कार्यक्रम आहे. तिकडे तुम्ही येऊ शकाल का ?"

"हो..सादर करायला का ? येईन ना."मागचापुढचा विचार न करता मी सुटलो.

"नुसतं सादर करायला नव्हे, प्रमुख पाहुणे म्हणून."
मी कपाळाला हात मारून घेतला.

"असं असेल तर..तर मी तुम्हाला थोड्या वेळाने कळवतो."

मी सुन्न होऊन दोघांना हकीकत ऐकवली. त्यांनाही सुदैवाने ती खोटी वाटली नाही.ती फक्त मलाच खोटी वाटत होती.
"आयला भारीच की ! जा ना मग.."
एक जण म्हणाला.

"पण मानधनाचं काय म्हणाली रे ??" दुसरा म्हणाला.

"साल्या मी अजून होकार कळवला नाहीये.."

"मग कळव की होकार. आणि मग त्या मानधनाच्या पैशात आपली ऑरेंज फ्लेवर सोनपापडी..फिक्स ना ?"

"बघुया."

मागे एकदा कुठल्यातरी कार्यक्रमाच्या मानधनातुन मी रूमवर ऑरेंज फ्लेवर सोनपापडी आणली होती. ती गिळंकृत झाल्यावर एका अलिखित नियमाचं जोखड माझ्यावर लादण्यात आलं. - 'प्रत्येक कार्यक्रम झाल्यावर त्याच्या मानधनातून एक ऑरेंज फ्लेवर सोनपापडीचा डब्बा आमच्यासमोर आणून ठेवायचा आणि मगच पुढच्या कार्यक्रमाच्या तयारीला लागायचं.'

ज्या कॉलेजच्या हिरवळीवर बसून अजून मी साधी चारोळीही कोणाला ऐकवली नाहीये, तिथं थेट प्रमुख पाहुणा म्हणून जायचं ?
एवढंच काय, ते कॉलेजच अजून मी पाहिलं नाहीये !
एवढं मोठं नाव असलेल्या ठिकाणी जायचं म्हणजे पुन्हा जबाबदारी..
मलाच का म्हणून बोलावलं असेल त्यांनी ?
आणि मुख्य म्हणजे बोलायचं..कवितेवर बोलायचं ?

रूमवर येईपर्यंत या प्रश्नांनी डोकं जड होऊन गेलं.
पुन्हा त्याच नंबरवरून फोन येऊन "गम्मत केली रे तुझी!" असं कोणीतरी म्हणेल असं वाटत होतं पण तेही काही घडलं नाही.

मग मीच फोन लावुन बोललो.
"माझ्यासोबत कोणी ज्येष्ठ, मोठं असणार आहे का ?"

"नाही सर.अध्यक्ष असतील पण ते भाषण करून निघून जातील."(वा !काय आत्मविश्वास आहे.)

"पण तुम्हाला मीच का पाहुणा म्हणून हवाय ?"

"सर, आम्ही तुमचा एक कार्यक्रम ऐकला होता. तिथं लोकांनी तुम्हाला बर्यापैकी दाद दिली. त्यामुळे आम्हाला वाटतंय की तुम्ही धकून जाल."
तिने नको तेवढं खरं बोलून टाकलं.

"अच्छा !"

"शिवाय, ऐकायला सगळी तरूणाई असणार आहे. त्यामुळे आम्हाला आमच्यासारखंच कुणी तरूण हवंय. अगदी ज्येष्ठ वगैरे नको."

"किती वेळ बोलायचं मी ?"

"दहा मिनिटं..नंतर एक दोन कविता ऐकवल्या तरी चालतील."

फार मोठं अवडंबर नाहीये असा अंदाज घेऊन मी एकदाचा 'हो' म्हणालो.
मी 'नाही' म्हणालो तर नवीन पाहुणा कुठून शोधायचा याचं पडलेलं संकट तिच्या आवाजात जाणवायचं तर आपल्याकडे कुणी काही काळ का होईना पाहुणा म्हणून बघतंय या जाणिवेने मला माझ्या आवाजात मार्दव आणि सभ्यपणा आणावा लागायचा.

दुसर्या दिवशी दुपारी पुन्हा तिचा फोन की- आम्हाला तुमची थोडी माहिती हवीय.परिचय करून देण्यासाठी. तुम्ही कधी फ्री असता ?

मी म्हणालो की संध्याकाळी किंवा रात्री बोलू.

संगनमताने रात्री दहानंतर व्हॉट्सॅपवर माहितीची देवाण-घेवाण करायचे ठरले. ठरवून गप्पा मारण्याची ही आयुष्यातली पहिलीच वेळ. इथे पाहुण्यांमधे नसलेला सोफेस्टिकेटेडपणा आयोजकांकडे होता. तिने मला लगेच माहिती विचारली असती तरी तिथल्या तिथे दिली असती पण आता एकेक प्रयोगच साजरे करायचे म्हटल्यावर काय !

रात्री तिचा वेळेवर मेसेज आला. तिने एक चांगल्यातला फोटो शोधून (डिपी) ठेवलेला वाटत होता.

पुढचे दोन दिवस सखोल चौकशी होत राहिली.
"तुमचं प्राथमिक शिक्षण कुठे झालं ?"

"तुम्ही कधीपासून लिहिता ?आणि का लिहिता ?"
(का लिहिता या प्रश्नाचं उत्तर मलाच ठाऊक नसल्यानं मी तो उडवून टाकला. विषय बदलला.)

"सुचतं म्हणजे नक्की काय होतं तुम्हाला ?"
(याचं उत्तर तिला काव्यमय भाषेत हवं होतं असं ती माझं उत्तर ऐकल्यावर म्हणाली.)

"आवडते कवी कुठले ?"

"तुम्हाला तुमच्या प्रेरणेचा उगम कोठे आहे असं वाटतं ?"

आदी जीवघेऊ प्रश्न विचारले जायचे. काहीच शिल्लक न उरल्यावर एकदा तिने "अजून काय विचारत असतात ?" असं मलाच विचारून टाकलं.

कार्यक्रमाच्या आदल्या दिवशी तिनं विचारलं की -तुम्ही तुमच्या पहिल्या प्रेमाविषयीही थोडं बोलाल का ?
(मी मनात म्हणालो की-कशाला ??
तिथल्या पोरींना उगाच वाटेल की हा कमिटेड आहे म्हणून .आणि ही एवढी महत्वाची फर्माईश ऐनवेळेवर का केली जातेय ?)

पहिल्या प्रेमाविषयी थोडंफार बोलायचं शेवटी मान्य करावं लागलं. बोलता बोलता ती माझ्याच वयाची असल्याचंही कळलं. त्यामुळे आता 'सर, तुम्ही' वगैरे बहुवचने न लावण्याची मी विनंती केली.

एवढं सगळं झाल्यावर ती मूळ मुद्यावर आली.
"आम्ही तुला एवढ्या महत्त्वाच्या दिवशी बोलवतोय तर तुझा पर्सनल वेळ तर खात नाही आहोत ना ??"

तिच्या प्रश्नाचा रोख समजूनही मी वेडगळपणे उत्तर दिलं-" नाही. संध्याकाळी मला अकोल्याला जायचंय. पण सगळ्या वेळा मॅनेज होतायत. म्हणूनच मी हो म्हणालोय."

"तसं नाही रे !पर्सनल.."

"नाही..अजून तसं काही नाहीये."

"म्हणजे..सिंगल आहेस ??"

"हो."

"मला वाटलं नव्हतं रे."

"असाच गैरसमज होतो बहुतेक वेळा."

"हो ना. आय होप आपण कार्यक्रमानंतरही मित्र राहू."

"येस. व्हाय नॉट.उद्या तिकडे आलो की कॉल करतो."

"हो नक्की."

सगळ्या मुली शेवटी याच पालुपदावर का येतात आणि असं विचारूनही पुढे काहीच का करत नाहीत, याचा विचार करण्यात पुढचा बराच वेळ गेला. स्त्री-पुरूषांच्या निखळ मैत्रीवरचा माझा विश्वास खिळखिळा होण्याची कारणं हीच असावीत, असं वाटून गेलं.
उद्या काय काय बोलायचं हे लिहून ठेवता ठेवता दोन वाजले. मग ते एक दोन वेळा स्वतःशीच बडबडून पाहिलं. तिनं माझा नुसताच वेळ खाल्ला नव्हता तर डोक्यात विचारांचं एक पिल्लूही सोडून दिलं होतं. त्यामुळे मोक्याच्या क्षणी झोपेला सुरूंग लागण्याची शक्यता होती.
इकडून तिकडून झोप लागल्यावर मी एका सुंदर/चांगल्या/बर्या मुलीबरोबर बसून चहा पितो आहे,असं स्वप्न पडल्याचं आठवतय.
सकाळी उठल्यावर मग हे स्वप्न खरं झालं नाही तर मन कसं सावरायचं याची तयारी करता करता मी चहा पिला.

अपेक्षा ठेवण्याआधीच अपेक्षाभंगाची तयारी करणे, हे चांगल्या प्रेक्षकाचं लक्षण आहे आणि जो चांगला प्रेक्षक होऊ शकतो तो झालाच तर चुकुनहुकून 'बरा' पाहुणाही होऊ शकतो.

---------------------------
डेक्कनला गेल्यावर तिथे कोणीच सिंगल उरलेलं नाही, असं का वाटतं देव जाणे !त्यात पुन्हा व्हॅलेंटाईन्स डे असल्यामुळे सगळीकडे लाल-गुलाबी रंग पसरले होते आणि अंगात एक निळसर झब्बा घालून मी ते सगळे रंग बघत चाललो होतो.
चालताना उगाच वाटून गेलं की सालं आपण अलिकडं का उतरलो ? बसमधे कुणाला विचारलं असतं तर कळलं असतं की कॉलेजचं गेट जरा पुढे आहे.पण नाही, आपल्यालाच हौस आहे ना हे रस्ते तुडवायची !
अशा अनोळखी रस्त्यांवरून चालू लागलो की डोक्यात-
'पार्श्वभुमी बदलली की लोक का बदलल्यासारखे वाटतात ?की लोक बदलल्यामुळे ही पार्श्वभुमी बदललेली वाटते ? सगळं जग अशाच रस्त्यांनी भरून गेलं तर ? आपलं नातं या रस्त्यांशी असंच राहील की काळानुरूप बदलत जाईल ?' असे काही संदर्भहीन विचार निरूद्देश चकरा मारायला लागतात.
मग कॉलेजमधला तो कार्यक्रम सोडून असंच रस्त्यारस्त्यांवरून पायपीट करत फिरावं, कुठं झाडांच्या शेंड्यावरची सोनेरी चकाकी वाचत बसावी, इथल्या माणसांचे व्यवहार जसे आहेत तसे पाहत बसावेत, असं वाटायला लागतं.
पण हे सगळं करायला त्या दिवशी वेळ नव्हता आणि मुख्य म्हणजे तसं करण्याचा मला अधिकारही नव्हता. कारण वेळेवर पोचून तिथला उत्सव साजरा करणं, या उद्देशापायी मी फर्ग्युसन रस्त्यावर प्रगट झालो होतो.

पुढं लागलेल्या कुठल्याशा गेटमधून मी आतमध्ये गेलो. एखादं मोठं नाव ऐकलं की लोकांच्या त्या ठिकाणाबद्दलच्या किंवा त्या व्यक्तीबद्दलच्या फार बलदंड अपेक्षा असतात. मीही लोकापवाद नाही.'फर्ग्युसन' मध्ये इंट्री करतो आहोत तर आजुबाजुला हिरवळ असलीच पाहिजे,अशी माझ्या नजरेची एक साधी अपेक्षा होती. (इथे हिरवळ हा शब्द झाडे-झुडुपे याच अर्थाने वापरला आहे.) पण ती कॉलेजच्या इमारतींपर्यंत पोचेस्तोवर पूर्ण झाली नाही.
पुढे दिसलेल्या एक-दोन दगडी
इमारती. त्या इमारतींनी आपल्या गर्भात पोसलेला थंडावा आजुबाजुला जाणवत होता. तो थंडावा सुखेनैव अनुभवत असतानाच आणि त्याविषयी काही काव्यमय विचार मनात येत असतानाच तिथे उभ्या असलेल्या एका स्वयंसेवकानं "तुम्ही कवी-कट्टा मध्ये सहभागी असाल तर कृपया वरती जाऊन बसा." असा आग्रह केला आणि मी काही प्रमुख पाहुणा वगैरे दिसत नाहीये,याची मला आल्याआल्याच जाणिव करून दिली.
थोड्या वेळाने आत जातो असं त्याला सांगून मी ठरल्याप्रमाणे रात्री दहानंतर चॅटिंग करणार्या मुलीला फोन लावू लागलो.तितक्यात माझी एक प्राथमिक शाळेतली मैत्रीण जी आता फर्ग्युसनला शिकते,ती भेटली.
'हा माणुस व्हॅलेंटाईन्स निमित्तानं कुठलातरी घोळ घालण्यासाठी इथं आला असावा' असं तिला वाटणं शक्यच नव्हतं. कारण मी आधीच या कार्यक्रमासाठी येणार असल्याची कल्पना तिला देऊन ठेवली होती. ( खरंतर मी घोळ घालण्यासाठी आलोय,असं काही तिला वाटलं असतं तर ते मला जास्त आवडलं असतं. कारण असं काही शॉकींग कृत्य केल्यावर तिच्या नजरेत 'मला सांगितलं पण नाही' याचा राग आणि 'पण यानिमित्तानं कधीनवत भेटायला तरी आलास' यासाठीचा लाड या दोन्ही गोष्टी एकत्रित पाहायला मिळाल्या असत्या. पण ऐनवेळेवर धावपळ झाली आणि स्पष्टीकरणाची संधीच नाही भेटली तर ? असा विचार करून मी ती रिस्क घेतली नाही. )

दरम्यानच्या एकदोन दिवसांत त्या मैत्रिणीनं व्हॉट्सॅपवर असलेल्या काही शाळकरी मित्रांच्या ग्रुपमध्ये ही बातमी देऊन खळबळ माजवली होती.-
"यु नो गाईज..
सुशांत येतोय आमच्या कॉलेजमधे.
आणि तेही नुसता सादरकर्ता म्हणून नव्हे- प्रमुख पाहुणा म्हणून."
हे ऐकून काही हितचिंतक मित्रांनी मेसेज केलेच की- "ए सुश्या, आधी धडाच्या कविता तर लिही..मग पाहुणा वगैरे बन की."
त्या सगळ्यांच्या चिंतनीय सल्ल्यांचा आदर करत स्पष्टीकरणं द्यावी लागायची. कार्यक्रमात काय बोलायचं याच्यापेक्षा 'कार्यक्रम आहे' असं यांना का बोलून बसलो याचीच चिंता वाटायची.

मैत्रिणीशी बोलत असतानाच रात्री दहानंतर चॅटिंग करणारी कुमारी अवतरली. तिने जरा जाड भिंगाचा चष्मा घातला होता. व्हॉट्सॅपवरच्या डिपीमधे एवढे बारकावे ओळखू येत नसल्याबद्दल मला खंत वाटून गेली.
"आलात तुम्ही..अगदी वेळेवर आलात. चला माझ्यासोबत." असं म्हणून ती माझा हात धरून मला घेऊन जाणार इतक्यात मैत्रीण एका प्रश्नार्थक नजरेने पाहत म्हणाली- "ठीके सुशांत. मी थेट कार्यक्रमातच येते आता. बोलत बसा तुम्ही दोघं."
कार्यक्रमानंतर माझी उलटतपासणी होणार हे या 'बोलत बसा तुम्ही दोघं.' ने सिध्द करून टाकलं.
मी कुमारीसोबत चुपचाप वरती गेलो. इथे काल मी स्वप्नात पाहिल्याप्रमाणे आपली चहा-पाण्याची व्यवस्था असणार असे वाटत होते. आम्ही कुठल्यातरी सरांच्या केबिनमध्ये गेलो.सरांनी खालपासून वरपर्यंत मला न्याहाळलं आणि म्हणाले- "अच्छा, तर तुम्ही प्रमुख पाहुणे का ?"
मला स्वतःच्या तोंडानं 'हो' म्हणायची लाज वाटू लागल्यामुळं मी कुमारीकडे पाहिलं. ती म्हणाली- "हो सर, हेच ते."

"तुम्ही गझल वगैरे करता का?"

"हो सर..आमचे मुशायरे असतात कधीकधी." आता मीच बोलू लागलो.

"ओह..आय सी.बरं यांच्या चहापाण्याचं बघा." असं म्हणून सर बाहेर गेले.

पाहुणा कसाही असला तरी शेवटी चहापाणी करणं अपरिहार्यपणे आलंच. कितीही नाही म्हटलं तरी एक मोठी सांस्कृतिक परंपरा लाभलेल्या कॉलेजात मला स्वतःचा सुसंस्कृतपणा दाखवण्यासाठी आमंत्रित करण्यात आलं होतं. त्यामुळे त्यांनाही पाहुण्यांसमोर शिष्टाचार पाळावाच लागला, यात नवल ते काय !

चहा आणण्यासाठी म्हणून तीही बाहेर गेली. मी खुर्चीत बसून होतो. बाहेरून माझ्याच वयाची काही मंडळी- 'आमच्यासारख्याच एका सोम्यागोम्याला ही स्पेशल ट्रीटमेंट कशाबद्दल?' असा विचार करून बहुधा अधुनमधुन केबिनमध्ये डोकावून पाहत होती. आपल्यालाही घुसता येईल का, ही शक्यता पडताळून पाहत होती.
चहा आला. चहासोबत एक मॅडमही आल्या. त्यांनी आपल्या बॉपकटच्या बटा सावरत आणि भुवया जराशा उंच करत विचारले, "हे कोण?"

यावेळी मी पाहायच्या आधीच कुमारी समजुतदारपणे म्हणाली,
"हे आमचे..
हे आमचे प्रमुख पाहुणे !"

लग्नानंतर 'अहो-जाहो' करणारी बायको भेटली तर नवर्याला काय वाटत असेल( थोडक्यात 'फील' येत असेल) याची कल्पना ह्या 'हे आमचे' मुळे मला लग्नाआधीच येऊन गेली.

"काय करतोस रे ?"

"काही नाही मॅडम,इंजिनिअरींगला आहे. सेकंड इयर."

माझ्या हातावर एक खरबुजनिर्मित चॉकलेट ठेवून "ओके.." असं म्हणत मॅडम निघून गेल्या.

कुमारीने दोन कप चहा ओतला.एक प्याला मला देताना तिच्या चेहर्यावर आपण आपली निम्मी जबाबदारी पार पाडल्याचे समाधान होते. काल स्वप्नात पाहिल्याप्रमाणे खरोखरच मी एका मुलीबरोबर चहा घेत होतो.आम्ही दोघेच त्या केबिनमध्ये असल्यामुळे 'ही थोडी अजून सुंदर असायला काय हरकत होती ?' असा विचार मनात आला.
थोड्याफार इकड-तिकडच्या गप्पानंतर मी म्हणालो की, "आपलं ठरलंय ना की एकमेकांना अरे-तुरे करायचं म्हणून. मग तू आल्यापासून हे 'सर, तुम्ही' काय चालवलयंस ?"

दोनेक सेकंदांचा भोळसट पॉज घेऊन ती उत्तरली-"अहो,असं काय करताय सर..निदान कार्यक्रम पार पडेपर्यंत तरी तुम्ही प्रमुख पाहुणे वाटायलो नको का ?"

"ओह..अच्छा अच्छा.बरोबर!" इति मी.

अशा प्रकारे तिचा माझ्याशी बहुवचनी आणि माझा तिच्याशी एकवचनी संवाद चालू असताना कुणीतरी खाडकन दरवाजा उघडला.

"अगं माधवी (माधवी की माधुरी ते आठवत नाही.) नॉक तर करायचंस. पाहुणे बसलेत ना."
शब्दागणिक मी पाहुणा असल्याची जाणिव गडद करून देत चॅटिंगकुमारी माधवीला म्हणाली.

"सॉरी गं..पण ते बुके कुठे ठेवलेयत, माहिती आहे का ?"

"नाही गं..माझ्याकडे तर फक्त प्रमुख पाहुण्यांचीच जबाबदारी आहे(!). ते जाऊ दे तुमची ओळख करून देते .सर,ही माधवी(/माधुरी) . आज सुत्रसंचालन करणार आहे. माधवी, हे आपले प्रमुख पाहुणे."

मग माधवी(/माधुरीने) सुहास्यवदनाने प्रमुख पाहुण्यांना करतात तसा नमस्कार केला.
"दहा मिनिटात या तुम्ही तिकडे." असं लाडेलाडे म्हणत माधवी(/माधुरी) आल्यापावली सुहास्यवदनाने निघून गेली.
माझ्या कपात कुमारीने दुसर्यांदा चहा ओतला. चॅटिंगमध्ये मी कुठेही चहा आवडत असल्याचा उल्लेख केलेला नसल्यामुळे मला कुमारीचे या मनकवडेपणाबद्दल अभिनंदन करावेसे वाटले.
"हा महेश पण ना...वडापाव आणतो म्हणाला आणि कुठे उधळला देव जाणे !" ती स्वतःशीच पुटपुटत होती.मला दुसर्या चहाचा उद्देश स्पष्ट कळाला. मी ज्याला मनकवडेपणा म्हणत होतो, तो तिच्या दृष्टीने निरूपाय होता. दृष्टीकोन बदलला की गोष्टींचे अर्थ कसे खटकन बदलतात आणि अर्थहीन गोष्टी कशा सुचायला लागतात, हे एका क्षणापुरतेच जाणवले आणि पुढचे बरेच क्षण मी स्वतःला चहाच्या हवाली करून मोकळा झालो. कसल्यातरी कारणाने हवालदील होण्यापेक्षा कसल्यातरी कारणाच्या हवाली होण्यात काय वाईट आहे ?

"ओह माय गॉड. मला नै का अजिबात वाटत नाहीये की मी प्रमुख पाहुण्यांसोबत चालतीये." कार्यक्रमस्थळापर्यंत मला घेऊन जाण्याची जबाबदारी पार पाडत असताना तिने हे उद्गार काढले.

"तुमच्या कॉलेजच्या ह्या इमारती पाहून मला मात्र युरोपात आल्याप्रमाणे वाटतंय."-इति मी.
(इथे मी खरंतर-"मग मला काय एखाद्या युरोपियन सुंदरीसोबत चालल्याप्रमाणे वाटतंय का?" असे भरजरी उद्गार काढणार होतो. पण सुदैवाने मी ते गिळू शकलो आणि प्रमुख पाहुणेपण शाबुत ठेवण्यात यशस्वी झालो.)

कार्यक्रम 'अँफिथिएटर' नावाच्या देखण्या वास्तूत होणार होता. इतका सुंदर रंगमंच मी याआधी पाहिला नव्हता. खरंतर मी हे कॉलेजच आयुष्यात पहिल्यांदा पाहत होतो. पण इतर सगळ्या ठिकाणांपेक्षा इथे सुबकता ओसंडून वाहत होती. नुसती वास्तुचीच नव्हे तर माणसांचीही. अशा वास्तू न्याहाळण्यासाठी आपल्या नजरेत तितका अभिजातपणा हवा, असं वाटून गेलं.
पण नीट न्याहाळण्यासाठी वेळ मिळायच्या आतच आम्हाला स्टेजवर पाचारण करण्यात आलं.
ज्या मंचावरून मी साधं इतर कुणाला बोलताना ऐकलेलं नव्हतं तिथून मला थेट समोरच्या दोन-तीनच ओळखीचे चेहरे असलेल्या समुदायाला उद्देशून बोलायचं होतं. एक जबाबदारी पार पाडायची होती. त्यांचं तारूण्य, माझं तारूण्य आणि कवितेतलं तारूण्य यांची कुठेतरी सांगड घालायची होती. मी त्यांना त्यांच्याहून वेगळा कुणीतरी वाटत असलो तरी त्यांच्यासारखाच, त्यांच्यातलाच एक आहे हे पटवून द्यायचं होतं आणि तरीही माझं त्यांच्यापासून तथाकथित वेगळं असणंही सिध्द करायचं होतं.
म्हटलं तर हे काहीतरी विशेष होतं, म्हटलं तर साधेपणाने उरकून टाकण्यासारखं होतं कारण समोर बसलेले उगाच माझी समिक्षा करणार नव्हते. ज्याला त्याला/तिला त्याच्या/तिच्या शेजारी बसलेल्याचं पडलेलं होतं. एका अर्थाने मी कार्यक्रमातला प्रथा म्हणून आवश्यक असलेला परंतू निरुपयोगी घटक होतो. त्यामुळे माझं बोलणं त्यांना आवश्यक वाटावंसं वाटणं, हेच काय ते माझ्यासाठी जरासं आवश्यक होतं.

मी आवश्यक होणे तर आवश्यक नाही
मी आवश्यक होणे म्हणजे शोषण आहे..

सुस्वागतम वगैरे औपचारिकता पार पडल्यानंतर माधवी(/माधुरी) मॅडम आमचा परिचय करायला सरसावल्या. हा एकंदरितच लाडेलाडे बोलणारा घटक असल्याचे मला तेव्हा जाहिरपणे कळाले.
"आजचे आमचे..म्हणजे आजचे आपले प्रमुख पाहुणे आहेत सुशांत खुरसाले. खरंतर आपण त्यांना पाहुणे वगैरे म्हणण्यापेक्षा आपला मित्रच म्हणुया..कारण त्यांचीच तशी इच्छा आहे.
यांचं प्राथमिक शिक्षण अमक्या ठिकाणी झालं असून सध्या ते इंजिनिअरिंग करतात. हे दहावीपासून अश्याच (??) कविता करतात. त्यांनी तमक्या-तमक्या ठिकाणी कविता/गझलांचे कार्यक्रम केले असून आज ते आपला कार्यक्रम करायला (??) आले आहेत. "
भरपूर माहिती विचारून थोडासा परिचय करून दिल्यानंतर बुकेने स्वागत करण्यात आले.

अध्यक्षांनी आपल्या भाषणात संत व्हॅलेंटाईनचा इतिहास सांगितला.अनुषंगाने व्हॅलेंटाईन्स डे चं महत्व वगैरे सांगितलं. माझ्याकडे असंकाही ऐतिहासिक घबाड नसल्यामुळे मनात जराशी चलबिचल झाली. पण आता अध्यक्षांनी एरवीतरी तो विषय बोलून टाकल्यामुळे मी त्याचा पुनरूच्चार करणं ठीक नव्हतं. त्यांच्या भाषणादरम्यान मी माझा चेहरा बर्यापैकी 'प्रमुख' ठेवून होतो. अधुनमधुन सभागृहातल्या एखाद्या नजरेत नजर मिसळणं ,मग ती सोडवून शुन्यात पाहत बसणं असे प्रकार नियमित चालू होते.अर्थात मी प्रमुख नसतो तरी हेच सगळं केलं असतं, याची खात्री मला आहेच.
नंतर त्या ऐतिहासिक सभागृहात काहीतरी अनैतिहासिक बोलण्यासाठी मला पाचारण करण्यात आलं.
कार्यक्रमाच्या अध्यक्षा मॅडम आणि मराठी विभागप्रमुख सर वगळता सगळी तरूणाईच होती.
"मघाशी त्यांनी माझी ओळख करून दिली(जिच्यामुळं मी धन्य झालो) .खरंतर ओळख करून द्यावी असं सध्यातरी काही नाही. एवढ्या सुंदर वास्तुत आणि एवढ्या प्रेमळ तरूणाईसमोर मला कवितेविषयी थोडंफार बोलण्याची, शेयर करण्याची संधी मिळतेय, त्याबद्दल खरंतर मीच कॉलेजचा ऋणी आहे.
मला नेहमीच असं वाटत आलय की प्रत्येक कविता ही अंतिमतः एक प्रेमकविताच असते..."अशी रूक्ष सुरूवात केल्यानंतर मी पाचेक मिनिटं कवितेवरून प्रेम आणि प्रेमावरून कविता या विषयांवर उड्या घेत होतो. ऐकणारे मध्येच भांवावलेले वाटायचे ,मध्येच जरासे चुळबूळ करायचे तर काहींच्या चेहर्यावर कानांवर पडतंय तर काही मौल्यवान असेल तर टिपून घेऊया असे भाव होते.(प्रमुख पाहुणा नेहमीच काहीतरी मौल्यवान बोलतो, हा भ्रम त्यांनी आपल्या मनी पुजिला असावा.)
चॅटिंगमधील फर्माईशीप्रमाणे पहिल्या प्रेमासाठी पहिली कविता कशी लिहिली, ही हकीकतही ऐकवली. संयमित शब्दांत ती कागदावर रितसर लिहूनच आणली होती मी. दहावीत इंग्रजीचा सराव पेपर चालू असताना पहिल्यांदा कविता कशी लिहून काढली आणि पेपर संपेपर्यंत तिला लपवता लपवता कशी दमछाक झाली, वगैरे दिलखुश करणारी घटना वर्णिली.
त्यामुळे पब्लिक जरा हासायला लागली. मग 'प्रमुख'पणा अधोरेखित करण्यासाठी पुन्हा गंभीरतेकडे वळलो.
"कुसुमाग्रजांनी एके ठिकाणी म्हणून ठेवलंय की-कवी म्हणजे सुसंस्कृत समाजातील असंस्कृत अथवा रानटी मनुष्य. याचा अर्थ
कवीजवळ संस्कृती नसते असा नाही, किंबहुना इतरांपेक्षा बहुधा अधिक असते.पण त्याची निष्ठा असते ती संस्कृतीच्या मूल, विशुद्ध तत्त्वावर,त्यावर उभारलेल्या रंगीत , नक्षीदार
ताबुतावर नव्हे."
हे ऐकून पहिल्या दोन रांगेत बसलेल्या काही जातिवंत कवींनी टाळ्या वाजवल्या. बाकीच्यांनी सुस्कारे सोडले.
माझ्यापेक्षा त्यांच्याच भावना व्यक्त करण्याचा वेग जास्त होता.
अजून काही विषयांवर उड्या घेतल्यावर मी दमलो. ऐकणारे आधीच दमले होते.
शेवटी माझे नसलेले दोन हिंदी-उर्दू इश़्किया ढंगाचे शेर मी ऐकवले. अर्थात शायरांची नावे सांगुनच.
तिथे त्यांची तबियत जरा खूष झाली. त्यांची दाद पाहून माझी तबियत बिघडते की काय,असे आयोजकांना वाटले असावे.

चॅटिंगमध्ये आखलेल्या रूपरेषेनुसार मग मी माझ्या दोन 'चक्कपैकी प्रेमकविता' ऐकवल्या. 'प्रत्येक कविता ही अंतिमतः एक प्रेमकविताच असते.' असं मी बोललो असलो तरी त्यामुळे मला वाट्टेल ती कविता ऐकवण्याची सूट मिळाली नाही.
बोलायचं निराळंच आणि करायचं काहीतरी भलतंच -हा प्रमुखपाहुणेपणाचा नियम मी नकळत पाळून गेलो. उक्ती आणि कृतीमधे योग्य ती तफावत राखल्याशिवाय कार्यक्रम आनंदाने पार पडतील तरी कसे ?

पहिल्या कवितेने बर्यापैकी दाद मिळवली. ती नुकत्याच उमलणार्या वयातल्या शाळकरी प्रेमावर आधारित होती.चुकून का होईना दोघे समोरासमोर आल्यावर दररोज कसे बावरून जातात आणि मग एक जाणुनबुजून भेट कशी घेतात..वगैरे मसाला तिच्यात होता. व्हॅलेंटाईन्स डे च्या शुभमुहुर्ताचं तेल उकळत असताना त्याच्यात नॉस्टेल्जियाची फोडणी देणे आवश्यकच होते म्हणा !

दुसर्या कवितेचा शेवट होता -
आठवे पुन्हा शब्दांना
सत्याचा धुरकट रंग
जन्मभर पुरावा इतका
असतो का देह अभंग ?

ही कविता जातिवंत कवीमंडळाने बर्यापैकी उचलून धरली. शेवट झाला तेव्हा गस्त घालत फोटो काढणार्या फोटोग्राफर मुलीने 'तू बरा लिहितोस..पण असाच फिलॉसॉफीच्या नादी लागत राहिलास तर नक्की मातीत जाशील.' इत्यादी आशयाचे हावभाव केले.

पाहुण्यांना आणि अध्यक्षांना आपापल्या मनोगतानंतर स्थानापन्न होण्याची मुभा मिळाली आणि मुख्य कार्यक्रम सुरू झाला. पाच-पाच कवींचे एकेक मंडळ मंचावर जाऊन कविता ऐकवत होते.दरम्यान आता माधवी(/माधुरी) ताई जाऊन एका कर्त्या पुरूषाने मैफलीचा ताबा घेतलेला होता. तो प्रत्येक कवीची ओळख करून देई आणि गाव सांगत असे. मुख्य म्हणजे त्या कवीची कविता ऐकवून झाली की तो त्याच आशयाची चारोळी, कविता किंवा तसाच एखादा शेर ऐकवत असे. कधीकधी त्याला मिळणारी दाद त्याच्या शरीरासारखीच बलाढ्य असे आणि त्यापुढे मूळ कवी अगदीच झाकोळून जाई.
त्याचे ते प्रसंगानुरूप साधर्म्य असणार्या प्रेमकविता ऐकवणे आणि त्यात अगदी दूरदर्शन, फटाके यांसारखे शब्दही खुबीने वापरून टाकणे, हे गुण शिकण्यासारखे होते. हा या कॉलेजचा नसता तर प्रमुख पाहुणा म्हणून खचितच जास्त शोभला असता, असेही वाटून गेले.

अधल्यामधल्या चांगल्या वाटणार्या कविता/चारोळ्या मी ऐकत होतो. उरलेल्या वेळात मला भेटस्वरूप मिळालेलं मॅगझिन वाचून काढत होतो. पण प्रमुख पाहुणे बघतात की नाही यामुळे फारसा ताण न घेता बिनदिक्कत ऐकवाऐकवी चालली होती.

' कबुतराला रंग दिला म्हणून तो कावळा होत नाही..
तू सोडुन गेलीस पण आता जीव बावळा होत नाही !'

अशा उन्मुक्त दाद मिळवणार्या ओळींची पखरण होत होती.

'तुझा लागुन गेला होता जिंदगीला लळा
पण एकदा झालं असं की केसांनी कापला गळा
शेजारी राहायला आली तेव्हा कळालं..-
माझी बायको वेगळी, तिचा नवरा वेगळा !'

अशा प्रकारांमुळे काही ठिकाणी
'नसते कवी या भूतलावरी
तरी न काही खोळंबते ।।'
या कुसुमाग्रजांच्या उक्तीची प्रचिती आल्यासारखी वाटली.
इथे इतर कोण्या महत्त्वाच्या माणसाचा पाहुणेपणासाठी वेळ गेला नाही याचा आनंद होत राहिला.
काही ताकदीच्या कविता सादर करणारेही कवी आले होतेच.
पण त्यांना मिळणारी दाद सौम्य स्वरूपाची असे आणि बाकीच्या 'केसाने गळा कापणार्या' कवींसमोर ते झाकोळून जात आणि तसेही एखाद्याचे झाले नाही तर कर्ता पुरूष त्यांचा प्रभाव प्रभावीपणे नष्ट करून टाकत असे.

अशीच मजल-दरमजल करत, दूरदर्शनसमोर फटाके फोडत, कवीकल्पनांच्या नवनवीन मजल्यांचं बांधकाम करत शेवटचे पाच कवी येऊन बसले.कार्यक्रमाचा शेवट असल्यामुळं कविता कशी आहे वगैरे साधारण गोष्टींच्या फंदात न पडता थेट टाळ्या आणि शिट्ट्यांचा धडाका चालू करायचा, हे धोरण पब्लिकने स्विकारलं असावं.इथे मात्र कर्त्या पुरूषाचं अभिनंदन करावं लागेल कारण त्याने सगळ्यांवर ठीकठाक वचक ठेवून जास्त गदारोळ होऊ दिला नाही.

कार्यक्रम संपल्यावर कर्त्या पुरूषाला भेटायला कवींपेक्षा जास्त गर्दी झाली आणि जे कुणालाच भेटायला आले नव्हते ते आपल्या त्याच्या/ तिच्या सोबत दिवसातील पुढील कार्यक्रमांसाठी फरार झाले.

"काय मग आज सुशांतरावांना पाकीट कितीचं ??"
बाहेर आल्याबरोबर एका जवळच्या मित्राने गळ्यात हात टाकून प्रश्न केला.

"नाही रे.तसं काही नको म्हटलंय मी.इथे यायला मिळालं हेच खूप झालं.बाकी तुझी आजची कविता छान होती हं.."

"माझी नव्हती ती."

"मग ??"

"अरे, अँम्फित बसून फोटो काढायची फार ख्वाईश होती माझी. मग घेतली एका मित्राची कविता..कळतंय कुणाला !"

"वा वा..छान !"
आजच्या मला आवडलेल्या कवितांविषयी मनात एकाएकी प्रश्नचिन्ह निर्माण झालं.
तेवढ्यात कार्यक्रमात माझ्यासोबत असलेले सर आले आणि मला त्यांच्याबरोबर घेऊन गेले.लाकडी जिने आणि सन्मान्य पुरूषांच्या प्रतिमा यांनी नटलेली, जुन्या पुस्तकांचा हवाहवासा गंध हवेत खेळवणारी एवढी भव्य लायब्ररी मी पहिल्यांदाच पाहत होतो.तिथल्या रंध्रारंध्रावर कसल्या अभिजाततेची खूण होती,कोण जाणे !अशा ठिकाणी इतिहासात लोकांनी करून ठेवलेली कामं, त्यांचे विचार किंवा तसंच काहीतरी सतत आपल्याभवती रेंगाळत असल्यासारखं वाटतं.पण शब्दांत काहीच नीट मांडता येत नाही.आपण नुसतंच म्हणतो- काहीतरी फार वेगळं वाटलं म्हणून.
इकडेही चहाचाच इंतजाम दिसत होता.रात्री अडीचपर्यंतच्या जागण्याने तसेच सकाळच्या दोन चहांनी चेतवलेल्या उष्णतेत हा चहा भर घालणार होता. पण काय करणार- त्यांचाही आदर राखणं आवश्यक आणि दुसरं म्हणजे चहाला काही केल्या मला 'नाही' म्हणवत नाही.

"तसा शेवटी झाला थोडा गदारोळ..हां पण एकंदरित कार्यक्रम चांगला हॅंडल केला यांनी." चहा पिता-पिता सोबतचे सर लायब्ररीच्या सरांना सांगत होते.
पाहुण्याच्या नावावर काहीतरी श्रेय लोटून देण्याचा हा प्रकार होता. 'एकंदरित' कार्यक्रमासाठी मी कुठे जबाबदार होतो. ते तर कर्त्या पुरूषाचं श्रेय होतं.

"म्हणजे कसंय ना की यांनी सुरूवातच एका उंचीची करून दिली. त्यामुळे पुढच्या सादरकर्त्यांवर व्यवस्थित दडपण आलं. पहिले दोन-तीन राऊंड्स फार चांगले झाले."सर पुढे सांगत होते.

"अच्छा अच्छा.छान ! म्हणजे आम्हाला एक चांगला पाहुणा कायमस्वरूपी मिळाला म्हणायचा."

"पाहुणा कसला सर..विद्यार्थीच म्हणा हवं तर." मी म्हणालो.
मला इकडेतिकडे न्याहाळायचं सोडून या गप्पा ऐकाव्या लागतायत याचं शल्य टोचत होतं आणि पाहुण्याला 'कायमस्वरूपी' वगैरे संज्ञा जोडून त्याला गृहीत धरलं जातं, हेही नवीनच समजत होतं.
शिवाय इथपर्यंत आणलं गेलं आहे तर पाकीट मिळतं की काय असं वाटू लागलं होतं. कारण मित्राने सरांसोबत मी निघताना हात उंचावून सांगितलेलं- "म्हणजे पाकीट फिक्स रे राजा !"

तिथून रिकाम्या हाताने निघाल्यावर सर एका निर्णायक वळणावर मला घेऊन आले. एका बाजुला बाग सुरू होत होती आणि दुसर्या बाजुला रस्ता फुटत होता.
"चला, मग सुशांतराव.पुढे-मागे एखादं व्याख्यान ठेवलं तर याल ना ?"

"कोणाचं माझं ?"

"नाहीतर कोणाचं ?"

"एवढी तयारी नाही हो सर.पण प्रयत्न करेन मी नक्की."

"काळजी करू नका हो.अगदी निवडक श्रोतृवर्ग असेल.आजच्यासारखं नाही..."

पारलेच्या बिस्कीटासोबत गुड डेचा पुडा फ्री भेटावा तसं झालं.फक्त गुड डे ची किंमतही हळूच कोणी कानात सांगावी तसंही झालं.

हो-हो म्हणत मी निघालो आणि कटूनच जाणार होतो इतक्यात तिथल्या मित्रमैत्रिणींनी पाहिलं.
आधी कित्येकदा गेट-टू-गेदरला न फिरकलेला मी आज त्यांच्या तावडीत सापडलो होतो. फक्त आज ते सगळे जरा सौम्य भावाने या पामराकडे पाहत होते कारण चुकुनहुकून आज मी तिथला पाहुणा होतो.
बागेतल्या गोल दगडांवर बसून सगळेजण गप्पा मारू लागलो. उत्सवमुर्ती पदामुळे सहजासहजी कविता ऐकायलाही तयार न होणार्या सगळ्यांनी आज चक्क फर्माईश केली. मग मीही ती चक्कपैकी पूर्ण केली.
काही कळत असलं नसलं तरी सगळ्यांच्या चेहर्यावर एक अभिमान होता- नेहमी पाहुण्यासारखा वागणारा हा आज खरोखरच पाहुणा झाला तर !
मग मैत्रिणींनी नेहमीप्रमाणे-" सो स्वीट..कसं सुचतं रे तुला ?" वगैरे प्रश्न सुरू केले. मीही स्वीटपैकी उत्तरं दिली.या प्रकाराची आता किंचित स्वीट सवयही झालीय आणि ऑक्वर्ड की काय म्हणतात,तेही होऊ नये एवढं निर्ढावलेपण अंगात आलंय. े
दुसर्या एका मित्राला यायला वेळ असल्यामुळं आपण दम-शराझ खेळुयात असा तोडगा एका मित्रिणीने काढला.
उभ्या जन्मात मी तो खेळलेला नसल्यामुळे मी फक्त बघ्याची भूमिका घेतो, असं सांगितलं.
त्यावर आजपर्यंत न फिरकण्याची शिक्षा म्हणून सर्वांत अवघड चित्रपटांच्या नावांची अँक्शन मलाच करावी लागणार असल्याचे कळवण्यात आले. मग अगदी 'जोरू का गुलाम' ,'हळद रुसली,कुंकू हसलं' इथपासून ते 'पोपट', 'लालबाग परळ', 'शमिताभ' पर्यंत सगळ्या चित्रपटांचा यथोचित उध्दार करण्यात आला. 'लालबाग परळ' साठीचा 'लाल' सांगण्यासाठी एका मैत्रिणीच्याच ओढणीचा आधार घ्यावा लागला आणि त्या क्षणाने खेळण्यात निराळेच रंग भरले .'पोपटा'चा हिरवेपणा दाखवण्यासाठीही आता जमिनीवरच्या गवताचा किंवा मित्राच्या शर्टाचा आधार घेण्याची प्रथा निघाली.
आता खेळण्यात जुना निरागसपणा नसला तरी काही क्षण जरूर लहान झाल्यासारखं वाटलं. अधुनमधूनच कुणीतरी भेटायला येई आणि कार्यक्रम छान झाला वगैरे सांगत. काही बागेत बसलेले तसेच काही येणारे-जाणारे आजचे प्रमुख पाहुणे या काय अनाकलनीय मुद्रा करत आहेत, हे पाहून मी भाषण करताना भांबावले होते तसे भांबावून गेल्यासारखे वाटत होते. पण शिक्षेचा अविभाज्य भाग म्हणून मी ते सगळं नेटाने करत होतो आणि का कोण जाणे- एरवी उथळ वाटणार्या या गोष्टी आज रंजक आणि हव्याहव्याशा वाटू लागल्या होत्या.

बराच वेळ खेळून आणि मग खाऊन झाल्यावर मित्राला उशीरच होणार असल्याचं समजलं आणि मी निघालो. निघताना खराब तब्येतीवर अगदी घरच्यासारखे सल्ले देण्यात आले.डोक्यावर चमचमणार्या दोन-तीन पांढर्या केसांचा उल्लेख आणि उध्दार करण्यात आला आणि अगदी शेवटी निघताना प्रत्येकाच्या डोळ्यात "यानंतर कदाचित आपण पुन्हा कैकदा भेटू.पण तू अशा भूमिकेत असशील-नसशील. कदाचित आमच्याही भूमिका बदललेल्या असतील.तेव्हा आजचे हे क्षण मनाशी घट्ट पकडून कसे ठेवायचे ?" असा एक साधा पण महत्त्वाचा प्रश्न दिसत होता. त्याचं उत्तर कदाचित मला कधीच देता येणार नाही,कदाचित त्यांनाही शोधता येणार नाही. पण हा प्रश्न पडला याचं समाधान मात्र दोन्ही बाजुंना काठोकाठ असेल.

बराच पुढपर्यंत चालत आलो.किती, ते माहित नाही. कुठल्यातरी पुलाजवळ एक बस भेटली आणि चढलोसुध्दा. मागे नक्की काय काय राहून चाललं होतं ?- डोळ्यांना अपेक्षित असलेली पण आजुबाजुला न दिसलेली हिरवळ,जुन्या आणि भव्य इमारती, त्यांच्या गर्भातला तो वर्णिता न येणारा थंडावा,चहाचे झुरके, अँफिथिएटरच्या कमानी, अनोळखी लोकांनी दिलेलं प्रेम, लायब्ररीतल्या पुस्तकांचा दर्प, आयुष्यात पहिल्यांदा खेळलेला दम-शराझ, मित्रांच्या डोळ्यातले अनुत्तरित प्रश्न आणि आणखी काय काय...

तितक्यात चॅटिंगकुमारीचा फोन आला- "सॉरी सुशांत.अरे आपलं भेटणं-बोलणं झालंच नाही नंतर.बरं एक सांगायचंय- तू बुके विसरून गेलायस की रे इथे.."

"सोड ना.तसंही खूप काही राहिलंय माझं तिथे."

नंतर कधीतरी मग काळानुरूप चॅटिंगकुमारीचे मेसेजेस कमी होत गेले, नंतर कधीतरी मग मुशायर्याच्या निमित्ताने बाहेर गेल्यावर मी आवर्जुन चक्क ऑरेंज सोडून चॉकलेट फ्लेवर्ड सोनपापडी आणली, नंतर कधीतरी मग एका व्हॅलेंटाईन्स डे ची आठवण मी डोळे पुसत-पुसत डायरीत लिहून ठेवली..

--सुशांत..

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान. Happy

सुशांत खुरसाले, छान लिहीलंय! साली काय मस्त जिंदगी असते पुण्यातल्या कॉलेजवाल्यांची. हेवा वाटला तुमचा. आमच्या इंजिनियरिंग कॉलेजात पार रखरखाट होता.
आ.न.,
-गा.पै.

साली काय मस्त
जिंदगी असते पुण्यातल्या कॉलेजवाल्यांची. << वरवर पाहायला सगळं छान असतं.. प्रत्यक्षात खरंतर काही हाती लागत नाही आमच्यासारख्यांच्या . Wink

खूप खूप आभार सर्वांचे. Happy

पण म्हणजे मानधन दिलंच नाही
का? << नाही ना.. म्हणून तर -- तिथून रिकाम्या हाताने निघाल्यावर सर एका
निर्णायक वळणावर मला घेऊन आले.
असं लिहिलंय . Wink

एकदम खुसखुशीत! मजा आली वाचायला! मात्र पुढच्या कार्यक्रमाला तुम्हाला मानधन मिळो अशी शुभेच्छा!

छान लिहीलंय. माझ्या पहिल्या कार्यक्रमाची आठवण झाली. रु.१०१/- (अक्षरी रुपये एकशे एक फक्त) इतकं मानधन मिळालं होतं.

पुढच्या कार्यक्रमाला तुम्हाला मानधन मिळो अशी
शुभेच्छा!<< धन्यवाद जिज्ञासा.

माझ्या पहिल्या कार्यक्रमाची
आठवण झाली. रु.१०१/- (अक्षरी रुपये एकशे एक
फक्त) इतकं मानधन मिळालं होतं.<< मलाही अगदी पहिल्यांदा 151 रूपये मिळालं होतं.

अँनिवे, हा सगळा प्रकार मानधनासाठी नव्हताच तसाही .
एक चांगला अनुभव मिळाला हेच खूप झालं. Happy