मासिक भविष्य फेब्रुवारी २०१५

Submitted by पशुपति on 31 January, 2015 - 20:54

राशिभविष्य
फेब्रुवारी २०१५
(के.पी.पद्धतीप्रमाणे)

(टीप : सर्व भविष्य चंद्र राशीप्रमाणे दिली आहेत, पण ज्यांना लग्न रास माहीत आहे त्यांनी जन्म रास व लग्न रास अशी दोन्ही भविष्य वाचावीत.
समजा...चंद्र राशी मिथुन आहे आणि लग्न राशी मीन आहे, तर अशांनी मिथुन आणि मीन अशी दोन्ही राशींची भविष्ये पहावीत आणि समन्वय साधावा. )
मेष : मेष राशीचा स्वामी मंगळ लाभात, गुरु चतुर्थात आणि शनि अष्टमात, त्यामुळे घरासंबंधी काही लाभ होण्याची शक्यता आहे. म्हणजे ज्यांचे घर विकायचे अगर भाड्याने द्यायचे असेल, त्यांचे व्यवहार मनाप्रमाणे होतील. द्वितीयेश शुक्र लाभात, राहू षष्ठात त्यामुळे वरील विधानाला पुष्टी मिळते व आर्थिक लाभ निश्चित दिसत आहे. तृतीयातील बुध दशमात व गुरु चतुर्थात त्यामुळे लेखक, वक्ते, पुस्तक विक्रेते आदी लोकांना हा काळ उत्तम आहे. चतुर्थात गुरु-चंद्र युती असल्याने विद्यार्थ्यांना हा काळ त्यांच्या अभ्यासाच्या दृष्टीने समाधानकारक आहे. तसेच मुलाबाळांची प्रगती समाधानकारक राहील. प्रकृती उत्तम राहील, फारसा त्रास जाणवणार नाही. कौटुंबिक वातावरण देखील खेळीमेळीचे व सलोख्याचे राहील. नोकरी अगर व्यवसायाच्या दृष्टीने हा काळ उत्तम आहे. विशेषत: सरकारी नोकरी असणाऱ्यांना उत्तम काळ आहे. एकंदरीत हा महिना सर्व दृष्टीने उत्तम आहे.
वृषभ : वृषभ राशीचा स्वामी शुक्र दशम भावात, राहू पंचमात असल्याने शेअर ब्रोकिंगचा व्यवसाय असणाऱ्यांसाठी हा काळ फार चांगला नसला तरी थोडाफार फायदा होण्याइतका चांगला नक्कीच आहे. तसेच ज्यांच्या अंगी कलागुण आहेत, त्यांना त्यांची कला लोकांसमोर आणण्यासाठी अनुकूल काळ आहे. द्वितीयेश बुध नवम स्थानी व महिन्याच्या सुरुवातीला चंद्र तृतीय स्थानी ही ग्रहस्थिती धार्मिक स्थळांना भेटी देण्याचे योग दर्शवते. तृतीयात गुरु-चंद्र युती तुमच्या जवळच्या नातेवाईकांची भेट दाखवते. विद्यार्थ्यांना हा काळ अभ्यासाच्या दृष्टीने अनुकूल आहे. सप्तमात शनि व दशमात मंगळ हा योग कौटुंबिक दृष्ट्या थोडीफार नरमगरम परिस्थिती आणेल असे दाखवतो. वर लिहिल्याप्रमाणे नवमातील रवि-बुध अनेक लोकांना धार्मिक स्थळांना भेटी देण्याला पुष्टी देत आहे. दशमातील शुक्र, मंगळ हे दोन्ही ग्रह तुमच्या नोकरी अगर व्यवसायातील तुमचा दर्जा उच्च ठेवतील. लाभेश गुरु किंवा लाभातील केतू आणि गुरु-बुध दोन्ही वक्री बरेचसे लाभ तुमच्या समोर असून देखील मिळण्यासाठी विलंब करतील किंवा काहींच्या बाबतीत निराशा देऊ शकतील. एकंदरीत हा महिना संमिश्र राहील.
मिथुन : मिथुन राशीचा स्वामी बुध अष्टमात असून तो चतुर्थेश पण आहे त्यामुळे घरासंबंधी काही अडीअडचणी आणि त्याद्वारे मानसिक त्रास पण संभवतो. द्वितीय स्थानी गुरु असून बुध अष्टमात आणि मंगळ नवमात त्यामुळे आर्थिक बाबतीत परिस्थिती जैसे थे राहील. तृतीयेश रवि अष्टमात असल्यामुळे प्रवासाच्या बाबतीत सतत काळजी बाळगावी. पंचमेश शुक्र नवमात आणि तिथेच मंगळ पण असल्याने ह्या महिन्यात तुम्ही धार्मिक गोष्टींकडे जास्त लक्ष घालणेच इष्ट, ज्यामुळे मन:शांती लाभेल. शरीर प्रकृती सर्वसाधारणपणे ठीक राहील. कौटुंबिक वातावरण सलोख्याचे राहील. वैवाहिक जोडीदारास नोकरी असल्यास पगाराव्यतिरिक्त बोनस, अॅरीअर्स इ. स्वरूपाने आर्थिक प्राप्ती होईल. दशमेश गुरु द्वितीयात व बुध अष्टमात असल्याने नोकरीमध्ये थोडेफार नमते घेऊन वरिष्ठांशी जुळवून घेणे फायदेशीर ठरेल. एकंदरीत हा महिना संमिश्र राहील व प्रकृतीची काळजी घेणे योग्य ठरेल.
कर्क : कर्क राशीचा स्वामी चंद्र महिन्याच्या सुरुवातीला तुमच्याच राशीत व गुरु पण तिथेच असल्याने महिन्याची सुरुवात फार छान होईल असे दिसते. द्वितीयेश रवि सप्तमात व शुक्र अष्टमात ह्यामुळे खर्चाचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. मुलाबाळांच्या बाबतीत त्यांच्या मागे लागून अभ्यास करवून घ्यावा लागेल असे दिसते. कौटुंबिक बाबतीत वातावरण थोडे नरमगरम राहील. दशमेश मंगळ अष्टमात आणि गुरु प्रथम स्थानी असल्याने नोकरी संबंधात थोडाफार त्रास अगर वाद होतील, पण अंतत: सगळ्या गोष्टी तुमच्या मनासारख्या घडतील. लाभेश शुक्र अष्टमात आणि राहू तृतीयात असल्याने आर्थिक बाबतीत सर्व व्यवहार जपून करणे गरजेचे आहे. तसेच पैशाचा व्यवहार देखील रीतसर मार्गाने करावा. एकंदरीत हा महिना संमिश्र पण आर्थिक बाबतीत थोडा त्रासदायक जाईल असे वाटते.
सिंह : सिंह राशीचा स्वामी रवि षष्ठात आणि चंद्र महिन्याच्या सुरुवातीलाच बाराव्या स्थानी स्वराशीत आहे, त्यामुळे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात काही लोकांना हृदय अगर डोळ्यासंबंधी त्रास होण्याची शक्यता आहे. द्वितीयातील राहू व्यावसायिक लोकांना ह्या महिन्यात आर्थिक चढउतार दाखवत आहे. चतुर्थात शनि, मंगळ सप्तमात आणि गुरु बाराव्या स्थानी त्यामुळे घरासंबंधी काहीतरी खर्च किंवा काहीतरी नवीन सामान आणण्यासाठी बराच खर्च होईल. मुलांच्या अभ्यासाकडे विशेष लक्ष द्यावे लागेल अशी चिन्हे आहेत. सप्तमात शुक्र व मंगळ हे दोन ग्रह असल्याने घरगुती बाबतीत थोडेफार वादविवादाचे प्रसंग येऊ शकतात. नवमेश मंगळ सप्तमात व गुरु बाराव्या स्थानी काही लोकांना धार्मिक स्थळांना भेटी देण्याचा योग घडवून आणतील. वर लिहिल्याप्रमाणे घरासंबंधी खर्च कदाचित हा देखील असू शकेल. दशमेश शुक्र सप्तमात व राहू द्वितीयात, व्यापारी लोकांना हा काळ एकंदरीत चांगला आहे असे वाटते. लाभात मिथुन रास असून त्याचा स्वामी बुध षष्ठात आहे, पण राहू कन्या राशीत द्वितीय स्थानी आहे. ज्यांच्या पत्रिकेत राहू बलवान असेल त्यांना आर्थिक आवक उत्तम दाखवत आहे. एकंदरीत ह्या राशीला हा महिना काही बाबतीत संमिश्र तर काही बाबतीत उत्तम आहे. प्रकृतीसंबंधी थोडी काळजी घ्यावी.
कन्या : कन्या राशीचा स्वामी बुध पंचमात आणि चंद्र पहिल्या आठवड्यात लाभस्थानी आहे. ज्यांच्या पत्रिकेत प्रथम व नवम स्थानांचा एकमेकांशी योग असल्यास अश्या लोकांना धार्मिक व अध्यात्मिक दृष्ट्या अत्यंत उत्तम काळ आहे. द्वितीयेश शुक्र षष्ठ स्थानी आर्थिक दृष्ट्या हा योग चांगला आहे. बँकेची कामे, लोन इ. पटकन मार्गी लागतील. तृतीयातील वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ षष्ठात व गुरु लाभात हा योग पुस्तक विक्रेते, शिक्षक इ. व्यावसायिकांसाठी उत्तम आहे. शिवाय एखादी कोर्ट केस चालू असेल व निकाल लागणार असेल तर निकाल तुमच्या बाजूने लागण्याचे चांगले योग आहेत. होतकरू तरुणांनी नोकरीसाठी अर्ज केला असेल तर नोकरी मिळण्याची बरीच शक्यता आहे. धनु राशीतील गुरु लाभात आणि बुध पंचमात पहिल्या आठवड्यात केलेले शेअरचे व्यवहार फायद्यात ठरतील. १५-१६ तारखेनंतर रवि षष्ठात व मंगळ सप्तमात गेल्याने कौटुंबिक बाबतीत थोड्याफार कुरबुरीला तोंड द्यावे लागेल. मुलाबाळांची प्रगती व अभ्यास समाधानकारक राहील. नोकरीमध्ये असणाऱ्या लोकांनी मात्र वरिष्ठांशी व सह्योगींशी सामंजस्याने वागल्यास उत्तम! एकंदरीत हा महिना चांगला आहे.
तूळ : तूळ राशीचा स्वामी शुक्र पंचमात आणि शनि द्वितीयात ह्या ग्रहस्थितीमुळे असे दिसते की ज्यांची मुले शिकायला लांब आहेत त्यांच्यासाठी काही कारणात्सव बराच खर्च होण्याची शक्यता आहे. द्वितीयात शनि व शुक्र पंचमात ही परिस्थिती देखील आर्थिक बाबतीत कात्री लावेल असे दिसते. द्वितीयेश मंगळ पंचमात व गुरु दशमात त्यामुळे नोकरी संबंधात वातावरण ठीक दिसत आहे, पण तरीही गुरु वक्री असल्याने कदाचित हवा तसा परिणाम साधला जाणार नाही. तृतीयेश गुरु देखील ह्याला पुष्टी देतो. चतुर्थात रवि व चंद्र महिन्याच्या सुरुवातीला दशमात असल्याने विद्यार्थ्यांना हा काळ चांगला आहे. पंचम स्थानी मंगळ आणि शुक्र हे दोन ग्रह धार्मिक किंवा अध्यात्माची आवड असणाऱ्यांसाठी उत्तम आहेत. कौटुंबिक वातावरण उत्तम आणि खेळीमेळीचे राहील. दशमात गुरु, चंद्र दोन ग्रह आहेत आणि त्यांचा पंचमाशी संबंध असल्याने नोकरी अगर व्यवसायासाठी तितकासा अनुकुल काळ नाही. कलाकार मंडळींना खूप नसली तरी थोडीफार प्रसिद्धी मिळू शकेल. एकंदरीत हा महिना काहीसा संमिश्र स्वरूपाचा जाईल असे दिसते.
वृश्चिक : वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ चतुर्थात आणि गुरु नवम स्थानी असून शनि तुमच्याच राशीत आहे. गुरु वक्री असल्याने फार काही घडामोडी होतील असे दिसत नाही, मात्र तुमच्या हातून एखादे धार्मिक कार्य होण्याची शक्यता दिसते. द्वितीयेश गुरु नवमात व मंगळ चतुर्थात त्यामुळे घरासंबंधी काहीतरी खर्च होण्याची शक्यता आहे. महिन्याच्या सुरुवातीला चंद्र पण नवम स्थानी असल्याने ह्या विधानाला पुष्टी मिळते. मुलाबाळांची प्रगती व अभ्यास समाधानकारक राहील. कौटुंबिक वातावरण खेळीमेळीचे व आनंदी राहील. नोकरी अगर व्यवसायाच्या दृष्टीने वरिष्ठांशी सामंजस्याने वागणेच इष्ट ठरेल. खाजगी व्यावसायिकांना ह्या महिन्यात बऱ्याच चढउतरला तोंड द्यावे लागेल. एकंदरीत हा महिना संमिश्र स्वरूपाचा दिसतो.
धनु : धनु राशीचा स्वामी गुरु अष्टमात आणि बुध तृतीयात असल्याने ह्या महिन्यात कामाचा ताण जास्त राहील. द्वितीयेश शनि बाराव्या स्थानी व शुक्र तृतीयात त्यामुळे काही लोकांना प्रवासाचे योग येतील असे दिसते. तसेच खर्चाचे प्रमाण देखील वाढेल. तृतीयातील शुक्र तुमच्या पराक्रमाला आणि कामातील यशाला पोषक ठरेल, पण मंगळामुळे मानसिक ताण देखील तेवढाच वाढेल. मुलाबाळांच्या अभ्यासासंबंधी काळजीचे कारण नाही. कौटुंबिक वातावरण उत्तम राहील. अष्टम भावातील गुरु वक्री व द्वितीय स्थानातील बुध पण वक्री, त्यामुळे वाहन काळजीपूर्वक चालवावे. नवमेश रवि द्वितीय स्थानी व शुक्र तृतीय स्थानी ही ग्रहस्थिती भाग्यकारक आहे. ह्याचा अर्थ असा घेता येईल की कदाचित तुमच्या कामाची वरिष्ठांकडून विशेष दखल घेतली जाण्याची शक्यता आहे. नोकरी अगर व्यवसायासंबंधात चांगला काळ आहे. एकंदरीत हा महिना मानसिक ताण सोडता सर्व दृष्टीने उत्तम आहे.
मकर : मकर राशीचा स्वामी शनि लाभात आहे त्यामुळे सर्व गोष्टी थोड्याफार फरकाने मनासारख्या घडण्याचा योग आहे. तसेच द्वितीयातील शुक्र देखील आर्थिक लाभाच्या दृष्टीने उत्तम आहे. धन स्थानात कुंभ रास व त्याचा स्वामी शनि लाभात व शुक्र, मंगळ दोन्ही ग्रह द्वितीय स्थानात त्यामुळे आर्थिक आवक उत्तम राहील असे दिसते. तृतीयेश गुरु सप्तमात असल्याने काहींच्या बाबतीत छोटामोठा प्रवास घडण्याची शक्यता आहे. मुलाबाळांची प्रगती समाधानकारक राहील. कौटुंबिक वातावरण देखील उत्तम राहील. वाहन काळजीपूर्वक चालवणे जरुरीचे आहे. दशमेश शुक्र द्वितीयात व राहू नवमात त्यामुळे नोकरी अगर व्यवसाय उत्तम राहील. लाभात शनि व लाभेश मंगळ महिन्याच्या सुरुवातील द्वितीय स्थानी व १५-१६ फेब्रुवारीनंतर तृतीय स्थानी जात असल्याने अनेक प्रकारचे लाभ होतील. एकंदरीत हा महिना उत्तम आहे असे दिसते.
कुंभ : कुंभ राशीचा स्वामी शनि दशमात आणि शुक्र लग्नी हे योग काहीतरी वेगळे कार्य करणाऱ्या व्यक्तींसाठी फारच चांगले आहेत. कोणतेतरी सामाजिक कार्य हातून घडण्याची बरीच शक्यता आहे. सामाजिक कार्यकर्ते नसाल तर तुमच्या नोकरी अगर व्यवसायात लक्षात राहण्यासारखे कार्य घडेल. द्वितीयातील गुरु षष्ठात आणि बुध बाराव्या स्थानी हे योग खर्च अगर आर्थिक फसवणूक ह्याच्याशी संबंधित आहेत, तरी अश्या प्रकारचे व्यवहार अतिशय काळजीपूर्वक करावेत. घरगुती वातावरण खेळीमेळीचे राहील. मुलाबाळांच्या प्रगतीकडे व अभ्यासाकडे थोडेफार लक्ष देणे गरजेचे आहे. ज्यांना जुनी दुखणी आहेत, त्यांनी त्यासंबंधी काळजी घेणे आवश्यक आहे. कौटुंबिक वातावरण उत्तम राहील. नवमेश शुक्र लग्नी व राहू अष्टमात त्यामुळे प्रवास शक्यतो टाळावेत. धार्मिक कार्यक्रम शक्यतो घराच्या घरी अथवा आपल्या गावातच करावेत. नोकरी अगर व्यवसायात प्राप्तीपेक्षा तुमचा दर्जा उंचावेल. एकंदरीत हा महिना संमिश्र स्वरूपाचा राहील.
मीन : मीन राशीत केतू, राशीस्वामी गुरु पंचमात व शनि नवमात हे ग्रहयोग अध्यात्मिक व धार्मिक दृष्ट्या अतिशय चांगले आहे, त्यामुळे ह्या काळात धार्मिक कार्य, धार्मिक स्थळांना भेटी अगर ध्यानधारणा केल्यास उत्तम फळे प्राप्त होतील. धनेश मंगळ बाराव्या स्थानी व गुरु पंचम स्थानी आर्थिक दृष्ट्या अनुकुलता दाखवत नाहीत. त्यामुळे बँकेव्यतिरिक्त इतरत्र आर्थिक गुंतवणूक करताना सावधगिरी बाळगावी. तृतीयेश शुक्र बाराव्या स्थानी व राहू सप्तम स्थानी कन्या राशीत हे योग तुम्हाला थोडेफार प्रवास घडवून आणतील. घरासंबंधी कोणताही व्यवहार ह्या महिन्यात शक्यतो टाळावेत, तरीही काही ठराविक दिवस निश्चित उत्तम आहेत, पण तसे सांगणे अवघड आहे. मुलाबाळांची प्रगती व अभ्यास समाधानकारक राहिल. प्रकृतीबाबत काळजी करण्याचे कारण नाही. कौटुंबिक वातावरण आनंदी व सलोख्याचे राहील. अष्टमेश शुक्र बाराव्या स्थानी असल्याने कर्जफेडीसाठी उत्तम काळ आहे. तसेच काही लोकांना नातेवाईकांची शुश्रुषा करण्यासाठी वेळ द्यावा लागेल. एकुणात हा महिना अध्यात्मिक दृष्ट्या उत्तम व व्यावहारिक दृष्ट्या संमिश्र राहील असे दिसते.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Thanks

आभार.