अकादमी भाग 1: एंट्री

Submitted by सोन्याबापू on 27 March, 2015 - 05:42

लोकसेवा आयोगाच्या परीक्षा द्यायला लागलो तेव्हा चोवीस वर्षांचा होतो. प्रस्तुत अनुभव कथन हे अगदी सत्य असुन माझ्या सेवाशर्ती अन केंद्रीय कर्मचारी नियमावली च्या निर्देषांना अनुसरुन मी काही नावे अन जागा वगळतो किंवा बदलतो आहे तेवढे फ़क्त मायबाप वाचकहो सांभाळुन घ्यावे इतकी विनंती करतो अन माझ्या अनुभवांना कथा रुपात पेश करतो.

अकादमी भाग 1: एंट्री

उत्तरभारतात जायचा हा माझा तसा काही पहिला अनुभव नव्हता, ह्याआधी युथ हॉस्टेल एसोसिएशन ऑफ़ इंडिया सोबत कॉलेज च्या दिवसांत हिमाचल पूर्ण पिंजून काढला होता आधी ट्रेकर म्हणुन अन नंतर कॅम्प लीडर म्हणुन, पण ह्यावेळी वेगळे भासत होते, कारण ह्याक्षणी मी एक हौशी ट्रेकर म्हणुन नाही तर भारतभरातुन पेपर लिहिलेल्या साडे तीन लाख अविवाहित पुरुष उमेदवारांतून जे 80 निवडले गेले होते त्यांच्यापैकी एक होतो. ट्रेनिंग कसे होईल ह्याची पाव टक्का कल्पना एनसीसी मुळे होतीच तरीही अकादमी कशी असेल तिथे काय शिकवतील ही एक ओढ़ होतीच मनात दाटलेली ! त्याशिवाय जाताना आई बाबांच्या पायाला स्पर्श केल्यावर आईची जाणवलेली चलबीचल त्याने आलेले उदासपणाचे मळभ, वडलांच्या डोळ्यातला ओलसर अभिमान पाहून कमी करायच्या प्रयत्नात मी होतो. लहानपणी पासुन सोबत असलेले 4 मित्र स्टेशन वर आले होते त्यांच्या मजबुत मिठ्या मैत्री अजुन घट्ट करत होत्या, गाड़ीची वेळ झाली तशी मित्रांनी अन वडलांनी सामान माझ्या जागेवर नेऊन ठेवले अन मला काहीवेळ माऊली जवळ सोडले!!! डोळे ओलावत तिने मला सांगितले "नीट रहा!! जितका व्यायाम करशील तितके खात जा कोणाशी उगीच भांडु नकोस" तिला मीठी मारून पाच मिनिटे स्वर्ग अनुभवला अन तोपर्यंत मागे येऊन थांबलेल्या बाबांच्या पायाकडे वळलो नमस्कार करायला वाकलो तसे बाबा 61 च्या वयात ही ताठ झाले , डोळे पाझरत होते त्यांचे!! मित्रहो त्या दिवशी मी हिमालय वितळताना पाहिला!! तो असाच असतो, पोरांसाठी वितळणारा पण पोराच्या कवेतही न मावणारा. आमचे मुळगाव सातारा जिल्ह्यातले, घरटी एक माणुस वर्दीत असलाच पाहिजे असला दंडक असणारा गाव तो!! त्या गावापासुन दुर वर्हाडातला माझा जन्म तरीही, काही गोष्टी डीएनए ने येतात तश्याच आलेल्या काही संस्कार मुद्दाम केलेले. बाबांच्या चेहर्याकडे पाहताना आलेले हे विचार आता लिहायला जितका वेळ लागला त्याच्या पेक्षा हजारपट वेगाने डोक्यात येत होते, तंद्री मोडली ती बाबांच्याच शब्दांनी "बेटा तु जा, जे तुला शिकवले आहे ते लक्षात ठेव, चुकीचे वागण्यालायक मोह येतील ते निग्रहाने टाळ, तु अण्णांचा नातु आहेस हे भान नेहमी ठेव, तु ते ठेवशील हे मला माहिती आहे पण तरीही बाप म्हणुन राहवत नाही, जा मागे वळून पाहू नकोस निरोप घेणे कठीण होते"

अन आई च्या मऊ मेणासम प्रेमातुन मी झटक्यात बाहेर पडलो मागे वळून पहायची गरजच नव्हती आता मला कारण माझा हिमालय माझ्या मागे उभा होता खंबीर !! पाय रोवुन , माझे पाहिले उड्डाण कौतुकाने पाहत असलेला तरीही संतुलित असा.

गाडीने फलाट सोडला तेव्हा सातारी जिद्द अन वर्हाडी गरमी कोळून प्यायलेला बापूसाहेब घर सोडून उडाला होता एक "वर्दीवाला अधिकारी" होण्याकरता.

प्रवास साधारण उदास अवस्थेत गेला कारणे दोन एक म्हणजे एकटेपणा अन दोन म्हणजे रेंगाळलेली घरची आठवण. साधारण 24 तास प्रवास करुन एक गाडी बदलुन मी उत्तर मध्य प्रदेशात,ग्वालियर ला पोचलो.नेमणुक पत्रात ट्रेनिंग एका जुन्या शिंदेशाही महालात होईल असे लिहिले होते, तो पहायचे एक कुतूहल पण तूफान होते. प्लॅटफॉर्म वर उतरताच एक पाटी दिसली "एमसीओ की तरफ" एमसीओ म्हणजेच "मूवमेंट कोआर्डिनेशन ऑफिसर" ग्वालियर ला आधिपासुन मोठी छावणी असल्यामुळे तिथे स्टेशन ला प्लॅटफॉर्म नंबर 1 ला आर्मी चे एमसीओ ऑफिस होतेच , तेच ऑफिस इतर अर्द्धसैनिक बले एयरफोर्स वगैरे पण वापरत. त्या ऑफिस समोर एक टेबल मागे camouflage गणवेशधारी एक वरिष्ठ अधिकारी बसलेला, शेजारी डॉक्यूमेंट वेरिफिकेशनसाठी म्हणुन बसलेले एडम (एडमिनिस्ट्रेटिव ब्रांच) ऑफिस चे नागरीक कर्मचारी बसले होते.एक नागरी अधिकारी मला अतिशय करड्या आवाजात म्हणाला
"ऑफर लेटर और डॉक्युमेंट्स दीजिये प्लीज"
गरजेची सगळी कागदपत्रे त्याने तपासुन परत माझ्या हवाली केली व "हो पुढे" स्टाइल इशारा केला बॅग उचलून जायला लागलो तशी तो कडाडला
"बॅग साथ में रखो नहीं जाओ उसे पीछे वाले कैंटर (आइशर किंवा डीसीएम् टोयोटा चा एक फौजी ट्रक) में रखो और खुद सामने वाले बस में बैठ जाओ" बहुतेक मी येणारा पहिलाच होतो मध्यरात्री आता हे पोरगे ही किती वेळ ताटकळत ठेवणार असा मानवतावादी विचार बहुतेक त्यांनी केला असावा अन त्यातुनच मला त्यांनी बस खाली बोलावले एक चहा दिला अन एक जिप्सी कड़े बोट दाखवत तो camouflage मधला अधिकारी म्हणाला "जाओ बेटा अपना सामान उठाकर उस जिप्सी में बैठो और अकादमी जाओ हम बस भरते ही भेज देंगे तबतक तुम वहीँ सेंट्री गार्ड रूम में बैठो या सो जाओ" गुमान जिप्सित बसलो अन जिप्सी सुसाट निघाली,साधारण 8 किमी शाहराबाहेर आल्यावर एक भली मोठी आवारभिंत लागली तिच्या कड़ेकडेने एखाद किलोमीटर गेल्यावर एक प्रचंड लोखंडी गेट लागले जिप्सी ड्राईवर हॉर्न मारून जागेवर बसला होता तेवढ्यात त्या मोठ्या दरवाज्यात एक खिड़की होती त्यातुन साधारण चीनी दिसावा असल्या माणसाचे डोके बाहेर आले त्याने गाडी नंबर निरखला ड्राईवर चे तोंड टॉर्च च्या प्रकाशात पाहिले अन मोठे गेट उघडले! आत गेल्यावर सेंट्री रूम च्या शेजारच्या जागेत त्याने जिप्सी उभी केली अन मागे वळुन मला म्हणाला
"साब आपका अगले 11 महीनों का घर आ गया"
साधारण चाळीशी पार केलेल्या ड्राईवर ने "साहब" म्हणायचा तो माझ्या आयुष्यात पहिलाच प्रसंग !! विलक्षण अवघडून मी "थैंक्यू भैया" म्हणले तसा तो खळखळून हसला अन म्हणाला "आईये सरजी आईये, भेलकम टू रंगभवन पैलेस" मी मनात म्हणले "राव इथे फाटकाच्या आत तर किर्र रान आहे अन पैलेस कुठला" पण वरकरणी गप्प बसलो. काहीवेळाने ड्राईवर अन जिप्सी निघुन गेली अन मी सेंट्रीच्याच बेड वर ताणुन दिली , बोलायला आता कोणीच नव्हते कारण!! दोघही सेंट्री ड्यूटी वर होते. सकाळी 6 ला सेंट्रीने उठवले व् म्हणाला "साबजी उठो मुह धो के फॉलइन हो जाओ" बाहेर पाहता अजुन 30 मुले दिसली मी यांत्रिकपणे माझे सामान त्यांच्या सामानाच्या ढिगाला लावुन ठेवल अन 3x3 च्या लाइन मधे फॉलइन झालो. मजेशीर दृष्य होते ते कोणी तमिळ कोणी पंजाबी कोणी नॉर्थईस्टर्न कोणी कुठला. अचानक खांद्यावर एक हात पडला

"हॅलो दोस्त कैसे हो, मै पुनीत....पुनीत शुक्ला, कानपूर से हूँ, आप??"
"हाय , मै बापुसाहेब, महाराष्ट्र से हूँ अमरावती का"
"यार बापुसाब शायद हमलोगो को सामान खुद ही लेकर जाना पड़ेगा अंदर तक, मैंने गार्ड से पूछा वो बोला ज्यादा दूर नहीं 200 मीटर होगा अंदर"
मी काहीही न बोलता त्याच्या सोबत समोरच्या दाट राईतुन आत जाणाऱ्या पायवाटेला पाहत बसलो तितक्यात समोर एक मजेशीर प्रकार आला, चक्क एक सहाफुटी पण सिंगल हड्डी सरदार
"ओ हलो जी, की हाल अस्सी अपणा नाम ता दस्सो मै अंगदसिंह गिल" आम्ही शेकहैण्ड वगैरे करुन अंगद ला प्रॉब्लम सांगितला तसा तो ही गंभीर झाला!! त्याला सगळा मुद्दा सांगून होइस्तोवर एकाने मागे शांत उभे राहुन तो ऐकला होता अन त्याचाच काळजी युक्त सुर कानावर आदळला "उडी बाबा मोसाय ई तो ट्रेनिंग यही से चालु कर देतायsssss" नाव सुदीप्तो सेन उर्फ़ आमचा पुढे चालून झालेला जीवश्च मित्र "मोसाय" काही साउथ इंडियन मुले भाषेच्या प्रॉब्लम मुळे एकीकडे गोंधळलेले भाव घेऊन उभे होती, आम्ही चौघे तिकडे मोर्चा वळवणार इतक्यात एक कड़क आवाज घुमला

"अपनी बैग्स लेकर सेमी सर्किल में खड़े हो जाओ और सिविलियन जैसे यहाँ वहा दौड़ना बंद पकडे गए तो रगड़ दूंगा"

पोरे त्या हुकुमाबरोबर सामान घेऊन आली अन उभी राहिली, अर्धगोलाकार सेटल झाल्यावर परत तोच आवाज, कमावलेला आवाज घुमला

"मैं सुभेदार भरत नारायण चौधरी, जात से जाट हूँ कायदे के बाहर सोच नहीं सकता, कायदे तफसील बादमे समझाऊंगा उसका पालन करोगे तो लाड करूँगा वरना रगड़ा लगाउँगा फ़िलहाल हम एक क़तार में कतार तोड़े बिना पैलेस जायेंगे, कोई शंका हो तो हाथ खड़ा करके परमिशन ले कर बोलना, मुझे सब लोग बड़े उस्तादजी कहेंगे......कोई शक....चलो"

अन माझ्या तीन नवीन मित्रांसोबत मी अकादमी च्या दिशेनेे पाहिले पाऊल टाकले.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बापु सहेब , अजुन हे भाग लवक येउद्यत... पुर्वी रण्हित चितळेंचे असेच संदर्भ वाच आलोय ....
पु. ले.शु.

सोन्या, का ले उशीर करून राहिला बे तू ... लिही की लवकर !!!
तू लिहितो सुन्दरच सारखे कौतूक करायची गरज नाही ... पटापट येऊदे पुढचे भाग !!

तुझा,
(मित्र) विशुभाऊ

मस्त रे बापु..
लवकर, लवकर टाका पुढचे भाग ! 'उस्तादजी' काहीतरी भारी प्रकरण दिसतेय. एन.सी.सी.च्या दिवसांची आठवण झाली. कँपच्या दरम्यान छोट्या-छोट्या चुकांसाठी मैदानावर बेडुकऊड्या मारायला लावणारे आणि रात्री आम्ही झोपल्यावर गपचूप आमची पांघरुणं सारखी करुन जाणारे आमचे उस्तादजी आठवले.

आतुरतेने वाट पाहतोय. येवु द्या लवकर लवकर !

मस्त सुरुवात.

तोतोलचा पुल आणि नंतर हे. दोन्ही अनुभवात किती फरक आहे ! पण तितक्याच ताकदीने लिहिल आहे.

Pages