श्वास तुझा निर्जीव वाटला होता

Submitted by जयदीप. on 22 March, 2015 - 12:05

श्वास तुझा निर्जीव वाटला होता
यंत्राचा आधार घेतला होता!

अर्थ जगाला त्याचा कळला होता
तोवर त्याचा शब्द हरवला होता

एक विषारी झाड उगवले आहे
एक नकोसा विषय गाडला होता

आज गळ्यावर हात चालला त्याचा
काल म्हणे तो हात कापला होता

खोडावरती जखम कुठेही नव्हती
घाव मुळावरतीच घातला होता

एक समाधी आज लागली आहे
एक भुकेला काल झोपला होता

जयदीप

Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>>एक विषारी झाड उगवले आहे
एक नकोसा विषय गाडला होता

आज गळ्यावर हात चालला त्याचा
काल म्हणे तो हात कापला होता

खोडावरती जखम कुठेही नव्हती
घाव मुळावरतीच घातला होता

एक समाधी आज लागली आहे
एक भुकेला काल झोपला होता<<<

व्वा व्वा!

पहिले दोनही आवडलेच.

अतिशय सुरेख गझल!

अभिनंदन!

>>>एक समाधी आज लागली आहे
एक भुकेला काल झोपला होता<<<

ह्या शेरात 'लागली' हा शब्द (माझ्यामते अजिबात) सूट होत नाही. त्याऐवजी 'बांधली' हा शब्द हवा आहे असे माझे मत!

कृपया गैरसमज नसावा.

एक समाधी आज बांधली आहे
एक भुकेला काल झोपला होता

एक समाधी आज लागली आहे
एक भुकेला काल झोपला होता

व्वा.

बांधली केल्याने अर्थ बदलतो. दोन्ही शेर वेगवेगळे आणि चांगले वाटत आहेत.
झाड आणि जखम दोन्ही मस्त शेर झालेत.
अभिनंदन.

समीर

समीर चव्हाण | 22 March, 2015 - 13:37

एक समाधी आज लागली आहे
एक भुकेला काल झोपला होता

व्वा.

बांधली केल्याने अर्थ बदलतो. दोन्ही शेर वेगवेगळे आणि चांगले वाटत आहेत.
झाड आणि जखम दोन्ही मस्त शेर झालेत.>>>>>>>
........... समीरजी,समाधी लागणे हे स्वतःसिध्द योग्याचे लक्षण अहे. (लागली समाधी ज्ञानेशाची), समाधी साधणे हे कृतसिध्द योग्याचे लक्षण आहे.आणि समाधी बांधली जाते ती पुण्यात्म्याची ! आता एकंदरीत गझलेचा अंदाज घेतला तर मी बेफिकिरजींच्या समाधी बांधली या दुरुस्तीचे समर्थन करेल. चुक्भुल द्यावी घ्यावी. -- बाळ पाटील

एक समाधी आज लागली आहे
एक भुकेला काल झोपला होता

हा शेरात मला ह्युमर जाणवला.
मला लागलेला अर्थ असा आहे (जयदीपला काय अपेक्षित आहे ते माहीत नसल्याने, हा कल्पनेचा पतंग होऊ शकतो).
काल भुकेल्या पोटी झोपावे लागले तर आज पोटात भर आहे तर तंद्री लागत आहे. हे कथन सामान्य माणसाचे आहे कोणी योग्याचे नव्हे. समाधी लावलीस का असं आपण स्वतःत हरवलेल्या माणसाला म्हणतोच की तेव्हा इथे ह्युमर अपेक्षित असतो शब्दशः अर्थ नाही. असो, जयदीप सांगू शकेल त्याने कोणत्या विचाराने लिहिला.

समीर

सर्वांचे मनापासून आभार!!
बेफिजींचा बदलही आवडला.

मी शेर लिहिला तेव्हा मला ह्यूमर अपेक्षित नव्हता - तसाही अर्थ निघत आहे ही आनंदाची गोष्ट आहे

मला दोन अर्थ अपेक्षित होते -

काल एक भुकेला माणूस झोपी गेला आणि झोपेतच त्याचा मृत्यू झाला. असे मरण खूप पुण्यवान लोकांना येते असे म्हणतात - म्हणजे त्याची भूक भागली (समाधी लागून) असे मला सुचवायचे होते

माझ्याबाबतीत बरेचदा असं होतं की एखादा खयाल सुचतो, दिवसभर डोक्यात असतो, शब्द मिळत नाहीत .. रात्री झोपायच्या वेळी अर्धवट शब्द असतात- (भूक) - खयाल पूर्णत्वाला जात नाही -पण दुसर्या दिवशी जेव्हा office ला निघतो - तेव्हा विशेषतः ट्रेन मध्ये डोळे मिटून बसलेलो असताना पटकन शब्द मिळत जातात . त्या मानसिक अवस्थेची तुलना -समाधी लागणे अशी केली होती

(हे खूप हास्यास्पद वाटू शकतं बरं का Happy पण मला तेच अभिप्रेत होतं :))
बाळ पाटील - माझी प्रगल्भता तुमच्या इतकी नाही Happy

गझल इतकी मन लाऊन वाचल्याबद्दल आभार Happy

__/\__

हा शेरात मला ह्युमर जाणवला.<< हे वाक्य पहून आश्चर्य वाटले व थोडा खेदही

बांधली बाबत बेफीजींशी सहमत . पाटीलसाहेबांचे डीटेलिंगही छान

मला बेफीजींनी सुचवलेल्या बदलात आहे हे क्रियापद जरा अनफिट वाटले त्यापेक्षा गेली असे जास्त छान दिसेल असे वाटते

एक समाधी आज बांधली गेली
एक भुकेला काल झोपला होता

मला दोनही ओळी एक ह्या शब्दाने सुरु करण्याच्या मागची अपरिहार्यता समजली नाही (माबुदोअ)

असो जशी आहे तशी गझल भन्नाटच आहे मला सगळे शेर खूप आवडले

न ए कु : खूप आभार Happy
समीरजी, बेफिजी, बाळ पाटील

आणि आजवर आवर्जून प्रतिसाद दिलेल्या सर्वांचे मनापासून आभार. Happy

धन्यवाद.

__/\__.

बाळ पाटील - माझी प्रगल्भता तुमच्या इतकी नाही >>>>>>.
......... जयदीपजी ,प्रगल्भता वगैरे काही नाही. विषयानुषंगाने थोडे माहीती होते ते बोलुन गेलो इतकंच !

माझ्याबाबतीत बरेचदा असं होतं की एखादा खयाल सुचतो, दिवसभर डोक्यात असतो, शब्द मिळत नाहीत .. रात्री झोपायच्या वेळी अर्धवट शब्द असतात- (भूक) - खयाल पूर्णत्वाला जात नाही -पण दुसर्या दिवशी जेव्हा office ला निघतो - तेव्हा विशेषतः ट्रेन मध्ये डोळे मिटून बसलेलो असताना पटकन शब्द मिळत जातात . त्या मानसिक अवस्थेची तुलना -समाधी लागणे अशी केली होती

एक समाधी आज लागली आहे
एक भुकेला काल झोपला होती <<

<<< एक समाधी आज लागली आहे
एक भुकेला काल झोपला होता >>>

"समाधी लागली" आणि "समाधी बांधली" यात खूपच अर्थांतर होते. समाधी लागणे ही अवस्था म्हणजे मृत्यूच्या अत्यंत जवळ जाणारी अवस्था. तो भुकेला काल झोपला होता आणि आज तो मरणासन्न अवस्थेत आहे. हा अर्थ ठीक आहे. नाट्यमयता नाही; पण द्वीपदी ठीक आहे!