गेवा

Posted
16 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
16 वर्ष ago

मुंबईतील तिवरांची जंगले आता किती वर्षं टिकतील याची शंकाच आहे. अजुनतरी ईस्टर्न एक्स्प्रेस हायवेच्या बाजुला ती थोडीफ़ार आहेत. वाशी खाडीच्या पुलच्या बाजुलाहि ती आहेत. विमानातून उतरताना तरी हा हिरवा टापू नजरेत भरतो.

पुर्वी कलानगरच्या समोर म्हणजे वांद्राच्या अलि यावर जंग पुलाच्या बाजुलाहि याचे दाट जंगल होते. तो भाग पक्षी अभयारण्य म्हणुन जाहिरही झाला होता.

तिवराची जंगले म्हणजे जिथे समुद्र आणि नदी मिळते, त्या खाडीच्या भागात वाढणारी खास झाडे. या झाडांची अनेक वैशिष्ठ आहेत. एकतर जिथे ती वाढतात तिथल्या जमिनीत मिठाचे प्रमाण भरपुर असते. ( याच भागात माचोळ नावाची एक पालेभाजी वाढते. पर्‍णविरहित पण हिरवीगार अशी हि पालेभाजी करताना त्यात मीठ घालायची गरज नसते. आणि या भाजीला माश्यासारखाच वास येतो. पण आता ती भाजी बघायलाही मिळत नाही. ) हे अतिरिक्त मीठ रिचवण्यासाठी आणि ते बाहेर टाकण्यासाठी या झाडाना खास प्रयत्न करावे लागतात.

दुसरे म्हणजे या भागात पाण्याची पातळी भरती ओहोटीनुसार सतत बदलत असते, याचीही खास तजवीज या झाडाना करावी लागते. यांच्या खोडाचा खालचा भाग मुळाचे रुप घेतो किंवा असेही म्हणता येईल कि मुळांचा वरचा भाग खोडाचे रुप घेतो. पण जमिन आणि पाण्याची महत्तम पातळी या दोन पातळ्यात या झाडांच्या मुळांचे किंवा खोडाचे जाळेच असते. हि जागा माश्याना अंडी घालण्यासाठी सोयीची असते कारण इथे मोठे मासे येऊ न शकल्याने पिल्ले सुरक्षित राहतात. माणसाच्या उपयोगी पडण्याचेही काम हि झाडे करतात, कारण भरती ओहोटीच्या वेळी या झाडांची मुळे गाळण्याचे काम करतात, व नद्यांमधे तरंगत असणारा कचरा, समुद्रात जाऊ देत नाहीत. पण बांधकामासाठी या झाडांची आता सररास कत्तल होत असते.

या झाडांच्या मुळाशी दलदल आणि पाणी असल्याने, या झाडांच्या जवळ जाणे तसे शक्य होत नाही. तरिही या भागातल्या झाडांची थोडी तोंड ओळख करुन घेऊ.

blinding_tree.jpg

वरच्या फोटोत दिसतेय त्याला मराठीत म्हणतात गेवा. शास्त्रीय नाव Excoecaria agallochaa या नावाच अर्थच विखारी असा आहे.

याला इंग्लिशमधे ब्लाईंडिंग ट्री असाही शब्द आहे. कारण या झाडाचा चिक डोळ्यात गेल्यास अंधत्व येऊ शकते.
या झाडाची पाने चमकदार, जाडसर आणि दंतुर कडांची असतात. गळुन गेलेल्या पानांच्या जखमा खोडावर दिसतात. पाने गळयच्या आधी चमकदार पिवळ्या रंगाची होतात. याला वरच्या फोटोत दिसताहेत त्याप्रमाणे पिवळसर फुले लागतात. याला थोडासा सुगंध येतो. पण सागरी खार्‍या वार्‍यात तो विरुन जातो. फ़ळे त्रिधारी असतात.

विखारी असले तरी हे लाकुड उत्तम जळण आहे. मासे पकडायची जाळी, तरंगत ठेवण्यासाठी, याच्या मुळांचे तुकडे वपरतात. खेळणी वगैरे करण्यासाठी पण याच्या लाकडाचा उपयोग होतो.

विषय: 
प्रकार: 

फोटो अप्रतीम आहे आणि माहिती थोडक्यात पण उपयुक्त आहे.माणूस स्वार्थासाठी किती बळी घेणारेय कुणास ठाऊक! पनवेलला तिवरांचं संशोधन केन्द्र आहे म्हणे. एकदा जाऊन बघायचंय. लिखाणाबद्दल धन्यवाद!

दिनेशदा, काळाकिल्ला परिसरात खाडीला लागुन एक बाग आहे तेथे आहेत का हा गेवा. छान माहिती आणि प्रकाशचित्र.

आभार तिलकश्री, वाशी परिसरात हि झाडे दिसतील, पनवेलला कुठे आहे ते केंद्र ? कर्नाळाजवळ युसुफ मेहेर अलि सेंटर आहे. तिथे औषधी झाडे आहेत.
किशोर, वांद्रे किल्ल्याजवळही आहेत हि झाडे. त्या भागातल्या बाकिच्या झाडांबद्दलही लिहिन, लवकरच.