शरण्योsस्मि - अवघा काय़ापालट !!!!

Submitted by अपराजिता on 17 March, 2015 - 13:36

शरण्योsस्मि - अवघा काय़ापालट !!!!
शरण्योsस्मि - शरणागती म्हणजेच शरण जाणे .
भगवंता मी तुला शरण आहे म्हणणे म्हणजेच अवघा काय़ापालट असे समीकरण मांडल्यास वावगे ठरणार नाही.

महाशिवरात्र - म्हणजे भगवान शिव-शंकराच्या पूजनाचा अतिशय महत्त्वाचा दिवस. बहुतेक करून आपण सारे जण ह्या दिवशी उपास करून , साबुदाण्याची खिचडी, वरीच्या तांदळाचा भात, शेंगदाण्याची आमटी असा उपासाच्या पदार्थांवर आडवा हात मारतो.

आता जरा विचार करू या की "महाशिवरात्र" नाव ठेवण्यामागे काय बरे कारण असावे?
शिवाचे पूजन हे प्रदोषसमयाला केलेले अधिक श्रेष्ठ मानले जाते. प्रदोष समय म्हणजे सूर्यास्ताआधीचा अर्धा तास आणि सूर्यास्तानंतरचा दीड तास. आपण मराठीत दोष हे वाईट किंवा चुकीचे अशा अर्थाने वापरतो. परंतु संस्कृत भाषेत ‘दोष’ म्हणजे ‘मूलभूत घटक’. सर्व सृष्टीतील मूलभूत घटक, तत्व अतिशय प्रकर्षाने कार्यरत होतात त्याला ‘प्रदोषकाळ’ म्हणतात.
आम्हाला शिवाची म्हणजे शंकराची भीती वाटत असते. क्रोध धारण करून भगवान शिव तांडव नृत्य करतात आणि तृतीय नेत्र म्हणजे तिसरा डोळा उघडून सारे काही भस्मसात करतात, त्यांनी तर मदनालाही जाळून भस्म केले. अशा आम्ही त्याच्या क्रोधाच्या कथा ऐकलेल्या असतात. परंतु हाच शिव भोलेनाथ म्हणूनही प्रसिद्ध आहे. मृत्यू देणं त्याचं काम नाही. तो transform करतो.

वाल्याचा वाल्मिकी करतो. हे नुसतचं रुपांतर नाही आहे, हे गुणांतरही आहे. आपण बघतोच ना वाटपाड्या लुटारू वाल्या कोळी हा वाल्मिकी ऋषी झाला.

Transform करणे म्हणजे कायापालट घडवून आणणं ही प्रक्रिया परमशिवामुळे घडते. हा ह्या क्रियेचा स्वामी आहे. प्रदोष काळात शिवाचं पूजन करणं म्हणजे शिवाला प्रार्थना करणं, “देवा, माझ्या मनात, शरीरात, प्रारब्धात, पुर्व जन्मात, पुढच्या जन्मात, आजच्या जन्मात जे काही transform घडवायचं आहे ते तू तुझ्या मनाप्रमाणे घडवून आण.”

‘महाशिवरात्र’ हा अख्खा दिवस पवित्र आहे. ह्या दिवशी आपण शंकराला आवडते म्हणून बेल (बिल्वपत्र) वहातो. मला वाटते आपण ह्या भोलेनाथाला अत्यंत प्रेमाने सांगायला हवे की हे देवा , माझ्या जीवनात तुझे स्वागत आहे. (Yor are Welcome) माझ्यात तुला जे बदल घडवायचेत ते बिनधास्तपणे घडवून आण.

एका पुस्तकात असे वाचनात आले की - आपल्या प्राचीन सनातन भारतीय संस्कृतीत वर्षाचे चार दिवस -
(१) महाशिवरात्र ,
(२)होळी ,
(३) लक्ष्मीपूजन , आणि
(४) त्रिपुरारी पौर्णिमा
असे आहेत की त्या दिवशी भिक्षा मागणार्‍यास सुध्दा (अतिथी समजून ) घरात घेऊन संपूर्ण भोजन द्यावे.

आता साहजिकच आजकालच्या कलियुगात हे पाळणे खूपच कठीण आहे, हे ही तितकेच खरे.

दुसरी बाब - महाशिवरात्र असा शुभ दिवस मानला आहे शंकराचार्य सांगतात की, “ह्या दिवशी उकिरडासुद्धा गंगेच्या काठाइतका पवित्र बनतो. स्मशानसुद्धा मंदिराच्या ओसरीप्रमाणे पवित्र, शुभ बनते.”
मग जर स्थानाला ही एवढी पवित्रता येऊ शकते , तर माझे अवघे जीवन "त्या" भगवंताच्या चरणी शरण गेले तर का बरे नाही सुधारणार , नक्कीच सुधारेल, बदलू शकेल , पण कधी तर मी "त्या" भगवंताला माझ्या जीवनात साक्षी भावात न ठेवता, कार्यशील होण्यासाठी प्रेमाने शरण जाऊन साद घालेले तेव्हाच "तो" हा कायापालट म्हणजेच माझे सुंदर रुपांतरण "तो" करू शकतो.

आता हे Transform करणे म्हणजे कायापालट घडवून आणणं , रुपांतर करणे का आवश्यक असते , ते बघू या....

चालता चालता कानी आला हा बहुधा एका कुटूंबात चाललेला पती-पत्नी मधील संवाद असावा---
पत्नी : "काय हो, तुमचा भाऊ एवढा काही दिवसांपूर्वी तुमच्याशी कचाकचा भांडला होता ना ?
पती : "हो, मग त्याचे काय?
पत्नी: अहो, मग आता जरा काय त्याने नरमाई दाखविली, गोड गोड बोलला , sorry बोलला की तुम्ही लगेच पाघळालात आणि माफ ही केलेत लगेच त्याला.....
पत्नी: जाऊ दे ग, लहान धाकटा आहे, होतात चुका, शरण आलेल्याला , माफी मागणार्‍याला देवही माफ करतोच ना? आज महाशिवरात्र. त्या भोलेनाथाने शिकार्‍याला माफ केले आणि त्याचे आयुष्य बदलले ही गोष्ट आपण वाचतो. तसे आपण पण वागायला हवे असे ....
पत्नी: पुरेपुरे .... एवढे काही नको मला शिकवायला ...
तसे पाहिले तर हा किती लहानसा वाद होता नाही....
आपण सामान्य माणसे आहोत, त्यामुळे वादावादी, रुसवे-फुगवे, भांडणे , मत-भेद हे होतच राहतात. मग ते घर असो वा मित्र-परिवार, वा शेजारी-पाजारी.. पण त्यात अडकून न पडता, जो शरणागताला माफी देतो त्याचे जीवन खर्‍या अर्थाने सुखाने भरून राहते. पण आम्हांला वाटते की हे काय क्षमा करणे वगैरे आम्हांला जमणार नाही.
खरे पाहता , क्षमा हा भगवंताचा महत्त्वाचा गुणधर्म आहे, असे आम्हांला वाटते. म्हणून भगवंतच शरण आलेल्याला क्षमा करु शकतो.मग तो शरण आलेला माणूस कितीही पापी असो, कितीही अपराध, पापे , गुन्हा त्याने केलेले असो. जो अगदी अंत:करणापासून चुकांची कबूली देतो, माफी मागतो त्याला भगंवत कधीच निराश करत नाही. अगदी बरोबरच आहे.

आपण साक्षात श्रीराम प्रभूंचे जीवनात पहातो ना, ब्रम्हर्षी विश्वामित्रांच्या सोबत राक्षसांचा पाडाव करून तपोवन आणि गुरुकुलाची परंपरा अबाधित व अखंडीत राखण्यासाठी जेव्हा श्रीराम आणि लक्ष्मण असे दोघेही जातात, तेव्हा वाटेत गौतम मुनींचा आश्रम लागतो आणि गौतमांच्या शापामुळे शिळा होऊन वर्षानुवर्षे खितपत पडलेल्या अहिल्येचा उध्दार श्रीराम केवळ उजव्या पायाच्या अंगठ्याच्या नखाच्या स्पर्शाने करतात. निर्जीव शिळा झालेली अहिल्या पुनश्च आपले मूळ मानवी रूप प्राप्त करते. म्हणजेच थोडक्यात काय तर श्रीरामांच्या चरणस्पर्शाने मानवी जीवांचाच नव्हे तर अगदी निर्जीव दगडमातीचाही उध्दार घडू शकत होता. हेच असावे ते Transform करणे म्हणजे कायापालट घडवून आणणे.

"मैया मोरी मैं नहीं माखन खायो" - गोकुळात असताना श्रीकृष्णा्ने आपल्या बाल संवगड्या गोपांबरोबर दह्याची-लोण्याची चोरी करताना केलेल्या बालपणीच्या खोड्या सर्वांच्या चांगल्याच परीचयाच्या असतात. अर्थात मग सार्‍या गोपिका यशोदा मातेकडे कृष्णाची तक्रार करायला धाव घ्यायच्या. एकदा रागावून यशोदामाई खट्याळ कृष्णाला शिक्षा करण्यासाठी म्हणून अंगणात उखळाला बांधून घरात निघून जाते. मग काय स्वत:ला सोडावून घेण्यासाठी हा बाल-प्रतापी कृष्ण त्या उखळापासून बर्‍याच दूर अंतरावर दोन अर्जुनवृक्ष अगदी जवळ जवळ उभे होते, त्या वृक्षांपाशी आला. उखळ त्या दोन वृक्षांच्यामध्ये अडकले. त्या वृक्षांना कृष्णस्पर्श होताच जोराचा आवाज झाला. ते दोन्ही वृक्ष मुळासकट उन्मळून पडले. ते वृक्ष म्हणजे नलकबूर आणि मणिग्रीव नावाचे कुबेराचे पुत्र होते. येथे कृष्णाने बाल-लीला करीत ऋषींच्या शापाने वृक्ष बनलेल्या दोन कुबेर-पुत्रांचा उध्दार केला आणि त्यांना त्यांचे मानवी रुप प्रदान केले . हा ही कायापालटच नाही का?

हे झाले प्रत्यक्ष रूपाचा , कायेचा पालट करण्याची उदाहरणे जे भगवंत वा परमात्माच करू शकतो. परंतु अप्रत्यक्ष रीत्या सुध्दा अनुचित , वाईट वृत्तींना पूर्णत: बदलून उचित वृत्ती अंगी बाणवणे हा सुध्दा कायापालटच असावा असे मला वाटते.

ऐन राज्याभिषेकाच्या आधी कैकयी दशरथ राजाकडून युध्दात जिंकलेले आपले २ वर मागून घेते की एकाने रामाला १४ वर्षांचा वनवास आणि दुसर्‍याने तिच्या पुत्राला भरताला राज्याभिषेक. राजा होता होता राज्यपद सोडून रामाला नेसत्या वल्कलांसहीत पत्नी सीता आणि बंधू लक्ष्मणासवे अयोध्या सोडावी लागते. एवढे होऊनही जेव्हा आजोळाहून परत आलेला भरत स्वत:च्या मातेला धिक्कारतो आणि श्रीराम प्रभूंना विनवून परत माघारा आणण्यासाठी व त्यांचे राज्य परत त्यांनाच सोपविण्यासाठी जातो, माता कैकयीही लज्जित होऊन जाते आणि क्षमा मागते मनापासून , तेव्हा हा शरणागतवत्सल, दीनांचा कैवारी श्रीराम मनात कोणताही राग न धरता, अत्यंत उदार अंत: करणाने त्या मातेस माफ करतोच ना? एवढेच नव्हे तर स्वत: वनवासात निघतानाही सीता आणि लक्ष्मणासहीत कैकयी मातेच्याही पाया पडतो मनात कोणताही किंतु न बाळगता आणि नंतर भरतालाही माता म्हणूनच स्विकार करण्यास भागही पाडतो. येथे श्रीराम प्रभू असूनही, मर्यादा पुरुषोत्तम असणे म्हणजे काय ह्याची शिकवण देतात असेच मला वाटते. संपूर्णपणे मानवी मर्यादा पाळून आपल्याला मानवी मूल्यांचा आदर्शच शिकवितात जणू श्रीराम !!!! येथे श्रीरामांनी आपल्या आचरणाने, क्षमाशील वृत्तीने कैकयीचे अध:पतन रोखले व तिचा कायापालट केला नाही का बरे?

तसेच पुढे स्वत:चा शत्रू असणार्‍या रावणाचा सख्खा भाऊ बिभीषण ह्यास रावणाने लाथ मारून भर राजसभेतून हाकलून लावले असताना बिभीषण श्रीरामांना शरण येतो. तेव्हाही सुग्रीव आणि इतर वानरसैनीक बिभीषणावर विश्वास न ठेवण्याचाच सल्ला देतात. परंतु शरणागतवत्सल प्रभू श्रीराम बिभीषणाच्या मनीचा भाव जाणून त्याला अभय देतात, शरण देतात. एवढेच नव्हे तर जी संपती शंकराने रावणाला दहा शिरे कापून वाहिल्यानंतर दिली होती , तीच संपत्ती श्रीरामांनी बिभीषणाला फक्त चरणांवर मस्तक ठेवताच दिली.

संत तुलसीदास ह्याचे सुंदरकांडात खूप सुंदरपणे वर्णन करतात -
जो संपति सिव रावनहि दीन्हि दिए दस माथ ।
सोइ संपदा बिभीषणहि सकुचि दीन्हि रघुनाथ ।।
राक्षसी कुलात जन्म घेतलेल्या बिभीषणाला शरण देऊन श्रीरामांनी त्याला भक्तीमार्गावर अभय देऊन त्याचाही कायापालटच केला.

आता भगंवत श्रीकृष्णाच्या जीवनात हेच शरणागताच्या जीवनात कायापालट घडविल्याचे आपण अनुभवतो....
श्रीकृष्ण, बलराम आणि सुदामा सांदिपनी ऋषींच्या आश्रमात शिकत असताना जंगलात लाकडे तोडायला जातात. सुदामा बरोबर गुरुमाता काही फुटाणे श्रमपरिहारासाठी देते. लाकडे तोडून दमून -भागून कॄष्ण सुदामाच्या मांडीवर पहुडतो आणि कृष्णाचा डोळा लागल्याचे पाहून सुदामा एकटाच फुटाणे खातो. आपल्या मित्राच्या हातून दुसर्‍याच्या वाट्याचे चोरून खाण्याचे पाप घडू नये व तेही साक्षात भगवंताशी असत्य बोलून म्हणून सुदामाला सावध करण्याचा प्रयत्न ही करतो. परंतु सुदामा दुर्लक्ष करून म्हणतो थंडीने दंतपक्ती एवढी कुडकुडते की नीट विष्णूनामही उच्चारता येत नाही. अर्थात तेव्हा सुदाम्याला कृष्ण हा भगवंत असल्याची जाणीव नव्हती. पुढे नशिबी अठरा विश्वे दारिद्र्य येऊन आदळते , तेव्हा सुदामाला आपली चूक कळते. पश्चात्ताप होतो. आपल्या सख्याला कृष्णाला भेटीस जाताना हाच सुदामा एक पुरंचुडी भर पोहे नेतो आणि कृष्ण कसा प्रसन्न होऊन अख्खी सुवर्ण नगरी सुदामाला बहाल करून टाकतो ह्याची गोष्ट ही आपण वाचतो. "जयाची भ्रूविक्षेप लहरी रंकाचा राव करी" -- सुदाम्याला अनीतीच्या मार्गावरून आपसूक नीतीच्या मार्गावर सुस्थापित केले लीलया - हा ही एका प्रकारचा कायापालट म्हणजेच transformation असावे, नाही का बरे?

आता आपण म्हणू की श्रीराम, श्रीकृष्ण हे काय बाबा देव होते , त्यांना सर्व काही शक्य होते. आम्ही सामान्य माणसे आम्हांला कसे जमणार? पण हेच आपल्याला आपले संतही त्यांच्या वागण्यातून शिकविताना दिसतात.

संत एकनाथांच्या कथेत आढळते की नाथ एकदा नदीवरून स्नान करून परतत असताना केवळ त्रास देण्याच्या उद्देशाने एक माणूस वारंवार त्यांच्या अंगावर थुंकत राहतो. नाथ त्याच्यावर रागावत नाहीत. परत स्नान करून येतात. असे थोडे नाही जवळपास ३५ का ४० वेळा घडते. आणि मग त्या माणूसाला आपली चूक कळते. अर्थातच तो नाथांचे पाय धरतो आणि शरण जातो. पुढे नाथ त्याला भगवंताच्या नामाची ( विष्णूसहस्त्रनामाची ) दीक्षा देऊन त्याचे कोट कल्याण करतात.

बघा, एका शरण जाण्याने केवढे अजब चमत्कार घडू शकतात नाही बरे आपल्याही आयुष्यात. मग कशाला आपण ही सोपी पायवाट सोडून फक्त दु;खाने आपले जीवन कष्ट्प्रद करतो.

नजीकच्या काळातील शिरडीचे साईबाबाही आपल्याला हीच ग्वाही देतात की
शरण मजसी आला आणि वाया गेला दाखवा दाखवा ऐसा कोणी ।
साईबाबा स्पष्ट शब्दांत सांगतात आणि पट्वूनही देतात. मग एखादा भावार्थी, पुण्यार्थी असेल जो भक्तीभावाने शरण जाईल तर एखादा बाबांचीच परीक्षा घेण्याच्या कुमतीने जाईल. पण बाबा दोघांनाही समानच वागणूक देतात.

हेमाडपंतविरचिते "श्रीसाईसच्चरित " ह्या महान अपौरुषेय ग्रंथात आपल्याला साईनाथ दाखवतात की शरणागताचा वेळप्रसंगी कसा कैवार घेतला जातो आणि त्याच्या मनीची इच्छाही पूर्ण करून दिली जाते अर्थातच ती जर सदभावनेने , सदहेतूपूर्वक असेल तर.
माधवराव देशपांडे अर्थात बाबांचा शामा तसा अशिक्षीत. संस्कृत लिहीता वाचता इतपत मजल जाऊच शकत नाही. त्यामुळे " नामस्मरणाचे महत्त्व " ठसविण्यासाठी बाबा लीलया "विष्णूसहस्त्र नामाची पोथी" स्वहस्ते गळा बांधून प्रोफेसर नरके आणि दिक्षीत ह्यांकडून दीक्षा ही देववितात ह्याची कथा आपल्याला २७व्या अध्यायात वाचनात येते. ह्याच कथेत अत्यंत रागीट रामदासीचेही कसे मन परिवर्तन करून बाबा त्याला सन्मार्गावर प्रवृत्त करतात हे आढळते. "स्वभावाला औषध नसते " असे म्हणतात परंतु भगवंत वा सदगुरु किती लीलया स्वभावालाही पालटवून खर्‍या अर्थाने जीवनात अनुचिताचे रुपांतरण उचितात करतात.....

हे झाले शरणागती स्विकारलेल्या भक्ताबाबत. पण साईबाबांची परीक्षा बघण्याच्या हेतूने गेलेल्या रतनजी शेटजी असो वा हरी कान्होबा असो साईबाबा सर्वांशीच प्रेमाने वागले. त्यांच्या मनीच्या हेतूला पुरवूनही साईनाथांनी त्याही दोघांना भक्तीमार्गालाच लावले आणि त्यांचे कल्याण केले. म्हणजेच जो कोणी मनोभावे संताना, देवाला वा सदगुरुंना शरण जातो त्याचे समस्त जीवनच बदलून जाते.

वारकरी संप्रदायात ही शरणागतीच्या भावाची एक खुपच सुंदर भावपूर्ण गोष्ट आढळते. जेव्हा आषाढी एकादशीला वा कार्तिकी एकादशीला पंढरपूरच्या आपल्या लाडक्या दैवताला विठूमाऊलीला - विठोबाला भेटायला हे सारे वारकरी जातात, तेव्हा चंद्रभागेमध्ये स्नान करून हे बाहेर येतातच एकमेकांच्या पाया पडतात, चक्क लोटांगण घालतात की तु माझ्या विठूमाऊलीला भेटायला चाललास. मी तुला शरण आहे .

संत तुकारामांनी आपल्या एका अभंगात ह्याचा उल्लेख केला आहे -
खेळ मांडियेला वाळंवटी घाई नाचती वैष्णव भाई रे ।
क्रोध अभिमान गेला पावतणी , एक एक लागतील पायी रे ।।
म्हणजेच काय तर शरण जाण्यासाठी मला माझ्या ठायीचा क्रोध, अभिमान, अंहकार हा पायातळी चिरडावा लागतो. पुढे तुकाराम महाराज म्हणतात की -
वर्ण अभिमान विसरली याती एक एका लोटांगणी जाती ।
निर्मळ चित्ते झाली नवनीते पाषाणा पाझर फुटती रे ।।
माणूस सारी वर्ण, अभिमान, जाती (याती) हे विसरून फक्त माणूसकीच्या प्रेमाच्या नात्यानेच बांधला जातो जेव्हा लोटांगण घालतो कारण त्याचे चित्त निर्मळ होते त्या लोण्यासारखे मृदू होते , ज्यामुळे पाषाणालाही पाझर फुटावा.. असे मला वाटते.
तुकाराम महाराज म्हणतात हीच सोपी पायवाट आहे भगवंताला शरण जाऊन , अतिशय दुस्तर असा भवसागर उतरण्यासाठी .

तसेच पंढरीची वारी करून आलेल्या प्रत्येक वारकर्‍याच्या पायी,न जाऊ शकलेले वारकरी आपला माथा ठेवतात प्रेमाने, शारण्याने की तु माझ्या देवाला , माझ्या विठठलाला भेटून आलास , मी तुला नमस्कार करतो , मी तुला शरण आहे. मग भले तो कितीही लहान पोर असो वा वयाने मोठा वयस्क असो. किती किती श्रेष्ठ, सुंदर भाव आहे त्यांच्या ह्या लोटांगणा मागे, माथा नमवण्यामागे नाही का? ही शरणागती , शारण्य आपल्याला नम्रता, शालीनता शिकविते "त्या" भगवंताच्या पायाशी आणि घट्ट बांधिलकीही मिळवून देते.

देवाच्या चरणांवर माथा ठेवला की त्याचा प्रेमाचा, कृपेचा वरदहस्त, आशीर्वादासाठी माथी पडणारच आपसूक ...आहे की नाही ही भक्ताची लबाडी , तरीही ती "त्या" भोळया भाबड्या देवाला आवडतेच कारण "तो" असतो फक्त "भावाचा भुकेला"

असा हा भावाचा भुकेला श्रीहरी दौपदीच्या-पांचालीच्या थाळीतले उरलेले एकमेव उष्टे शीत खाऊन तृप्तीचा ढेकर देतो आणि कोपीष्ट दुर्वासांच्या कोपापासून पांड्वाना वाचवतो तर भर सभेत अगतिक , लाचार झालेल्या दौपदीला तिचे वस्त्रहरण होताना आपला पितांबर पुरवून तिची लाज राखतो. कारण शरणागतवत्सल भगवंत हा आपल्याला शरण आलेल्याला कधीच अधिक काळ लाचार, लज्जास्पद अवस्थेत ठेवत नाही.

आता आपण पाहू या की शरण जाणे असे कसा काय चमत्कार करते, कायापालट करते . त्यासाठी आपण आधी "शरण" ह्या शब्दाचा नीट अर्थ जाणून घेऊ या. संस्कृतमधील "शृ" धातूपासून शरण हा शब्द बनतो. ’शृ’ धातुचा अर्थ आहे विरून जाणे, नाहीसे होणे, ठार मारणे आणि शरण शब्दाचा अर्थ आहे ’आश्रय’ . आता आश्रय कोण देऊ शकतो तर एकमेव भगवंत . म्हणूनच मला वाटते की ’शरण्य’ म्हणजे रक्षण करण्यास समर्थ असणार्‍या अशा आश्रयाचे स्थान अर्थातच " तो" एकमेव भगवंत !!!
भगवंत हा एकमेव शरणागतवत्सल असतो म्हणजेच तो शरण आलेल्या जीवावर निरपेक्ष प्रेम करतो, त्याच्या मनाचे रण थांबवतो. जेथे तो परम कनवाळू , भक्तवत्सल परमात्मा, भगवंत आपल्या लेकरांच्या दु:खांचा संपूर्ण नाश करतो , त्यांच्या मनातील, जीवनातील रण - शांत करतो, त्यांना सुखी, समृध्द जीवन बहाल करतो.

आपण व्यवहारात पाहतो की शरण गेल्यावर किती लाचारी स्विकारावी लागते, किती अपमानास्पद जीवन जगावे लागते. परंतु भगवंत म्हणा, सदगुरु म्हणा ह्यांच्या घरचा न्याय हा अजबच असतो. सामान्य मानव हा तुमच्या पापांची घृणा करेल, चुकांना हसेल, तुमची निंदा करेल, तुम्हाला जगणे हराम करेल. पण हा प्रेमळा देव म्हणा, भगवंत म्हणा वा सदगुरु म्हणा वा संत म्हणा हे पतीतांचा उध्दार करण्यासाठीच अवतार घेतात. त्यामुळे ते कधीही पाप्याची घृणा करीत नाही, तर ते त्या पापाची घृणा करतात. हीच ती "संताघरची उलटी खूण" असावी.
एकवेळ मानवाला शरण जाणे आम्हाला जमू शकणार नाही पण ह्या दयाळू, प्रेमळ , अपार करूणामयी भगवंताला आपण जर शरण गेलो तर तो शरणागताचे म्हणजेच आपले जीवन समग्र आनंदाने भरून टाकतो.

म्हणूनच स्वत: भगवान श्रीकृष्ण आपल्या लाडक्या भक्त आणि मित्र असणार्‍या अर्जुनास सांगतात की-
सर्वधर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज ।
अहं त्वां सर्वपापेभ्यो मोक्ष्यिष्यामि मा शुच: ।।
(अर्थ- हे मानवा, तू सर्व गुणधर्म सोडून फक्त मला शरण ये. मी तुला पूर्ण पापमुक्त करून सर्वोच्च स्थान देईन. )
तुम्हीच विचार करा जर सामान्य मानवी माता- पित्याला आपले बाळ, आपले लेकरू आपल्यापुढे लाचार झालेले किंवा जास्त काळ रडलेले आवडेल का ? नाही ना, तो पिता किंवा माता आपल्या लेकरास पटकन उचलून पोटाशी कवटाळेल, त्याच्या अपराधांना माफ करेल, चुकांना नजरअंदाज करेल, दुर्लक्ष करेल, अर्थातच योग्य ती समज नंतर देईलच. मग जरा विचार करा की ही तर संपूर्ण जगाची, विश्वाची माऊली असते ती आपल्या बाळांचे अपराध पोटात नाही का घालणार ? नक्कीच घालेल आणि ह्याचे अत्यंत बोलके उदाहरण म्हणजे रत्नाकर नावाने ओळखला जाणारा वाल्या कोळी. त्याची तर मोजता येणार नाही इतकी असंख्य पापे, गुन्हे झाले होते. चोर्‍या, दरोडे, खून असे नानाविध प्रकार, तरीही नारदमुनी ह्या सदगुरुतत्त्वाचा जीवनात प्रवेश झाला काय, शरणागती स्विकारली, पश्चाताप व्यक्त केला, प्रायश्चित्त घेतले आणि "रामाय़ण" ह्या महान काव्याचा निर्माता झाला. साक्षात प्रभू राम जन्माआधीच भगवंताचे जीवन लिहिता झाला.
हे शरणागतीने कायापालट झाल्याचे अत्यंत सुंदर उदाहरण आम्हाला सर्व काही सांगण्यास पुरेसे आहे.

व्यवहारात आपणही आपल्याला जमेल तसे शरण आलेल्या माणसाला माफ करायला शिकले पाहिजे , जेणे करून आपणच आपली नाती , आपले संबध सुधारु शकतो. हेवेदावे, भांड्णे, कलह ह्यांनी मने दु:खी होतात, कलुषित होतात आणि आनंदी जीवनाचा चुराडा होतो जसा एखादा मिठाचा कणही सारे दूधाचे भांडे नासवू शकतो तसेच असतात हे वाद, कलह, भांडणे. आपला भगवंत जर आपल्याला शरण देतो , माफी देतो तर आपण "त्या"च्या लेकरांनी हा "त्या"चा गुण थोडासा तरी शिकायला काही हरकत नसावी असे मला वाटते.

बरे आपल्याला नाहीच जमले ह्यातले काही आचरणात आणायला तर कमीत कमी आपण "त्या" परमेश्वराला , "त्या" भगवंताला किंवा "त्या" सदगुरुला तर आपण नक्कीच शरण जाऊ शकतो ना?

महाशिवरात्रीच्या पावन दिवशी आपण "त्या" शिव-शंकराला अत्यंत प्रेमाने प्रार्थना करू या की " हे महादेवा , माझ्यातील अनुचिताचा लय करून तुला जे काही बदल घडवून आणायचे आहेत, ते तू घडवून आण. मला संपूर्ण विश्वास आहे की त्याने माझे भलेच होणार आहे."

चला तर मग आपण सारे आजच नाही आताच शरण जाऊ या "त्या" सच्चिदानंद स्वरूप भगवंताला वा सदगुरुला आणि आपले जीवन उचित दिशेने transform करायला साद घालून सत्य, प्रेम , पावित्र्याच्या अधिष्ठानावर वसलेल्या आनंददायी वाटेवरून मार्गक्रमणा करू या...

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

व्यवहारात आपणही आपल्याला जमेल तसे शरण आलेल्या माणसाला माफ करायला शिकले पाहिजे , जेणे करून आपणच आपली नाती , आपले संबध सुधारु शकतो. हेवेदावे, भांड्णे, कलह ह्यांनी मने दु:खी होतात, कलुषित होतात आणि आनंदी जीवनाचा चुराडा होतो>> १००% अनुमोदन. छान लेख.

महाशिवरात्रीच्या पावन दिवशी आपण "त्या" शिव-शंकराला अत्यंत प्रेमाने प्रार्थना करू या की " हे महादेवा , माझ्यातील अनुचिताचा लय करून तुला जे काही बदल घडवून आणायचे आहेत, ते तू घडवून आण. - एकदम आवडलं.
परवा महाशिवरात्र असल्यामुळे धागा वर काढलाय. ही प्रार्थनाही करायला आवडेल.