रहस्यचित्र -१

Submitted by संतोष वाटपाडे on 9 March, 2015 - 01:15

आजवर सर्वात जास्त लोकप्रिय झालेली माझी कलाकृती.....आणि सोबत या कलाकृतीवर आदरणीय अमेयजी पंडित यांनी दिलेला रुचीपुर्ण अभिप्राय.....अवश्य वाचा ...चित्रंही आणि अभिप्रायही

>>>>>>>>>>

monalisa.jpg

अभिजात कला हे निसर्गाचे मानवहातांद्वारे पूर्ण होत असलेले स्वप्नच जणू. एखादी आत्म्याशी अद्वैत जोडू जाणारी सुरावट, प्रत्यक्ष 'त्याचा'च हुंकार म्हणावा अशी कविता किंवा सृष्टीतील सर्व गतीने आपली परिमाणे ज्याला दिली आहेत असे रेखीव शिल्प पाहिले की हाडे, मांस आणि रक्तवाहिन्यांसोबत विधात्याने मानवाच्या बोटांत अजून काही दिव्यतत्त्व निश्चित भरलेले आहे याची खात्री पटते.
चित्रकला ही देखिल याला अपवाद नाही. सगळ्या अभिजात कलांमध्ये पिढी दर पिढीत वैचारिक सर्जन होते, त्या त्या काळातील विचार, प्रगति, समृद्धी यांचे प्रतिबिम्बच कलेत दिसते. चित्रकलेत आजवर अनेक बदल होऊन गेलेत. आदिमानवाने प्रस्तरावर काढलेल्या रेषेपासून आजच्या ग्राफिक पद्धतीच्या चित्रांपर्यंत एक दूरवरचा प्रवास चित्रकलेने साध्य केला आहे.
काही कलाकृती मात्र काळाचा पडदा भेदून भूत आणि भविष्याचा आरसा दाखवतात. त्यांना पाहिले की (अम्मळ जास्त बटाटवडे खाल्ल्यावर काही काळाने येते तशी) हृदयात अनामिक कळ येते, हुरहूर लागते आणि (वैशिष्ट्य जपून राहावे, पुन्हा असले काही निर्माण होऊ नये म्हणून) रचनाकर्त्याचे हात कलम करावेसे वाटतात. परममित्र संतोष यांची ही रेखाकृती पाहून आज त्याच प्रतीचा आनंद मिळाला आहे.
चित्रातील दृश्य वैशिष्ट्ये पाहू.
चित्रातील मानवी व्यक्तीचे केस लांब आहेत, चेहरा कोवळा आहे, नाकाखाली मिशीसदृश ठिपका आहे, हात एखाद्या मल्लासारखे मजबूत आहेत आणि अंगात पुरुषाचा बनियन अथवा आधुनिक स्त्रिया घालतात तो tank top यापैकी काहीही म्हणता येईल असे वस्त्र घातले आहे. अस्सल कला ही कधीही थेट नसते, ती नेहेमी प्रतिमेच्या लोलकातून आभास दाखवते आणि परिणाम आस्वादकावर सोडते याची सार्थ प्रचिती येते. स्त्री पुरुष सायुज्यावरून कलाकारास प्रकृती आणि पुरुष यांतील समतोल दाखवायचा आहे, डावीकडून स्त्री वाटणारा प्रत्यक्षात पुरुष असू शकतो (आमचीही बाजारात अशी फसगत वेळोवेळी झाली आहे!) म्हणजेच कुठलीही गोष्ट जीवनात गृहीत धरु नये असा संदेश यातून मिळतो. अर्थात नर नारी समानता दाखवणे हाच मर्यादित उद्देश आहे असे अजिबात नाही. तसे असते तर टायगर श्रोफ, अर्चना पूरनसिंग ...गेलाबाजार मायकेल जैक्सनचा फोटू लावून काम झाले असते. कलाकार जीवनाच्या गूढ अर्थाला हात घालतो, इथेही विश्वाच्या निर्मीतीत नर नारी या दोघांचे समान योगदान असते असे काही त्याच्या मनात खदखदत असावे.
एका डोळ्याऐवजी इंग्रजीतले e हे मुळाक्षर वापरणे ही तर प्रतिभेची परमावधीच! डोळ्याला eye म्हणतात आणि त्यातले पहिले e घेऊन चित्रकाराने रसिकांना सूचक खूण करत निर्मीतीत सहभागी करण्याचा प्रयत्न केला आहे. काही लोक eye मधील शेवटचा e घेतलाय असेही म्हणतील. एका कलाकृतीचे अनेक अर्थ असतात त्याप्रमाणेच हे आहे इतके सध्या म्हणतो.
दा विन्चिची कल्पना, पिकासोची रेषा आणि Van Gogh ची चमत्कृती फिकी पडावी असे हे चित्र पाहायला मिळाले हे भाग्यच! आता यानंतर कलाकाराने काहीही निर्मिले नाही (कोण रे तो नाचतोय आनंदाने?) तरी कलाकाराचे नाव अढळ राहील यात शंका नाहीच!

-- अमेय

Group content visibility: 
Public - accessible to all site users

चित्रात व्यक्तीने डोक्यावर ' अर्धी इन्फिनिटी' धारण केली आहे. या वरुन हे सुचीत करवयाचे आहे कि - "काळ अनन्त आहे मी नाही" हे सत्य त्या व्यक्तीला उमगलेले आहे . ... Lol .. Proud ..

कसे हलवु इथून? डिलिट करावे लागेल ना......चित्रकला विभाग तर आहे ना हा..... खरोखर इथे आक्षेपार्ह असेल तर कुणी सांगावे

एक सौम्य निरीक्षण - गळा आणि मुंडके एकमेकांना जोडले गेलेले नाहीये.

एक उच्च निष्कर्श - डोके ताळ्यावर नसलेल्या या चित्रातील व्यक्तीला मानसोपचाराची गरज आहे.