मंच तोच अन प्रत्येकाची तीच कहाणी

Submitted by सुप्रिया जाधव. on 4 March, 2015 - 09:59

वाजवून खणखणीत व्हावी नीट पहाणी
खरी मानतो आपण निघती खोटी नाणी

मणामणांचा भार उतरला आभाळाचा
बरसत गेले मातीला सांगत गा-हाणी

अव्यक्ताचे भावसरोवर स्वच्छ राहु दे
शब्दांच्या दगडाने होते गढूळ पाणी

एकांताच्या उंबरठ्यावर गर्दी माझी
कुणीतरी गर्दीस म्हणाले.. माणुसघाणी !

निघून तो गेल्याला झाली कितीक वर्षे
एक दिवाणी अजूनही त्याचीच दिवाणी

नशिबापेक्षा कमी-अधिक ना मिळे कुणाला
तोलुन-मापुन राशन देतो वरचा वाणी

विषय-पात्र-संवाद ह्यात असतील फरक पण..
मंच तोच अन प्रत्येकाची तीच कहाणी

-सुप्रिया.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मणामणांचा भार उतरला आभाळाचा
बरसत गेले मातीला सांगत गा-हाणी

अव्यक्ताचे भावसरोवर स्वच्छ राहु दे
शब्दांच्या दगडाने होइल गढूळ पाणी

नशिबापेक्षा कमी-अधिक ना मिळे कुणाला
तोलुन-मापुन राशन देतो वरचा वाणी

विषय-पात्र-संवाद ह्यात असतील फरक पण..
मंच तोच अन प्रत्येकाची तीच कहाणी<<<

सुरेख सुरेख शेर सुप्रिया! अनेक दिवसांनी आपली एक अशी गझल वाचनांत आली जी पूर्णपणे आवडली, प्रतीकांची भट्टी जमली आणि लहजाही भावला.

अभिनंदन Happy

'होइल', 'राहु दे' सारख्या सुटी टाळण्याकडे कल असायला हवा. (होइल ऐवजी होतेही सूट होईल)

शेवटचा शेर वाचून माझ्या एका अपूर्ण गझलेतील एक शेर आठवला.

जराही शांतता नाही, पुन्हा येणी, पुन्हा जाणी
शरीरे भिन्न केवळ......तोच आत्मा, तीच गार्‍हाणी

धन्यवाद बेफिजी !

भविष्यात सुटी घेणे टाळण्यावर भर द्यायचा प्रयत्न करेन.

धंस आनंदयात्रीजी.

सुप्रिया.

वावा !! बेफीजींना चक्क ४ शेर आवडले मजा आली . बाकीचे त्यांनी का कोट केले नसावेत असा प्रश्न पडला .
माझ्या मते मतला मतला म्हणून छान आहे पण एकंदर गझलेच मूड जरा डायल्यूट करत असावा किंवा पुढचे शेर असे एकापेक्षा एक छान झाले आहेत की तो लक्षात राहात नसावा फारसा . असो

एकांताच्या उंबरठ्याचा शेर मला तरी खूप छान वाटला मला सर्वाधिक तोच आवडला खरेतर

तसेच >> तो निघून गेल्याला झाली ...<< असे असल्यास मलातरी अधिक योग्य वाटले असते असो मुद्दा गौण असावा

धन्यवाद Happy

____________________________

प्रतीकांची भट्टी जमली आणि लहजाही भावला.<<< येस ! सहमत !!

माणुसघाणी वरूनच गझल बेतली गेलीय अख्खी !

आपण कोट केलेला मतला क्या कहेने !!

गझल येवूदयात एखादी ....

आपले विशेष आभार !

सुप्रियातै !

नशिबापेक्षा कमी-अधिक ना मिळे कुणाला
तोलुन-मापुन राशन देतो वरचा वाणी

विषय-पात्र-संवाद ह्यात असतील फरक पण..
मंच तोच अन प्रत्येकाची तीच कहाणी >>>>>> केवळ सुंदर .... Happy

वा वा सुप्रियाताई.
गझल आवडली.

विशेषकरून मणामणांचा भार आणि शेवटचा शेर हे अप्रतिम आहेत.

प्रतीकांची भट्टी जमली आणि लहजाही भावला.<< अगदी खरंय .

अनेकानेक शुभेच्छा. Happy