तुला बक्षिस मिळालं म्हणून, खंडेराव!

Submitted by खंडेराव on 7 February, 2015 - 05:36

खंडेराव, तुला मिळालेल्या बक्षिसामुळे आता उदाहरणार्थ दोन तीन गोष्टी चांगल्या झाल्या.

एक म्हणजे लोकांना नुसती गोष्ट आवडते- हे तितकंसं खरं नाही- हे सिद्ध झालं, खंडेराव. समृद्ध रानटी संस्कृतींपासून चालत आलेल्या हजारो कथा ऐकण्याचा नि सांगण्याचा लोकांना छंद लागलेला, शिवाय परमेश्वराएवढे मोठ्ठे प्राणी मारता मारता या मौल्यवान संस्कृतीही लोकांनी मारून टाकलेल्या, पण गोष्टी ऐकण्याचं लागलेलं वेड काही सुटलं नाही, आणि आता त्याशिवाय दुसरं काही आवडतच नाही- असं जे निरीक्षण तू करून आणि लिहून ठेवलं होतं आणि जे खोटं ठरलं तर सगळ्यात जास्त आनंद तुला झाला असता.. आता तो आनंद तुला व्हायला हरकत नाही! कथा सांगण्याच्या मिषाने तू शेकडो पाल्हाळं लावलीस आणि फार फार गुंते करून ठेवले होतेस. आपल्या आणि आपल्याच मुळांच्या गुंत्यात अडकायला लावलंस. गोष्टी-कथा सांगण्या-ऐकण्यापेक्षा हे कसं महत्त्वाचं आहे- ते आडून आडून सुचवत राहिलास. काहींना या समृद्ध आणि अलौकिक गोंधळात अडकायला आवडलं. मात्र कथा ऐकण्याची किंवा चटदिशी अनुमानं काढण्याची सवय पडलेले काही मात्र या गोंधळामुळे वैतागले, अस्वस्थ झाले. कथा ऐकण्याच्या मिषाने आपण फार पुढे आलो आणि आता कथा तर नाहीच, पण आपलीच मुळं अडगळीत सापडून, अडकल्यामुळे आणि भलताच गुंता होऊन बसल्याने आता परत जाणं अवघड होऊन बसलंय- हे कळल्यामूळे साहजिकच चिडलेही. अस्वस्थपण त्या पाल्हाळांचं फलित होतं हे तुला चांगलंच माहिती होतं. इतकंच नव्हे, तर हे अस्वस्थपण हेच तुझं साध्यही आहे- हेही ठसठशीतपणे सांगायचं होतं. आता तुझ्या पाल्हाळांना राजाश्रय मिळाल्याच्या निमित्ताने जेव्हा ती पुन्हा आठवली तेव्हा लक्षात आलं, की खरं तर या सार्‍या कथाच आहेत. फक्त लौकिकार्थातले सुरूवात, मध्य, शेवट त्यांना नाहीत! मात्र लौकिक कथांच्या तुलनेत ठोस आणि मोठी तत्त्वज्ञाने मात्र त्यांनी सहजपणे मांडली आहेत. या प्रथमदर्शनी बुडखाशेंडा नसणार्‍या आणि एकमेकांशी फटकून वागणार्‍या सार्‍या पाल्हाळिक न-कथांचा एकेकट्याने विचार न करता एकसलग कोलाज तयार करून बघितला तेव्हाच त्यांचं समृद्धपण कळलं, खंडेराव, आणि अडगळींचे केवढे थोर वारसे आपल्याला आहेत- हेही.

आणखी म्हणजे- रोज उठून सतत बदलत राहणार्‍या आणि घडीघडी नवीन काहीतरी मागणार्‍या या जमान्यातल्या लोकांशी बोलताना तू हट्टाने आणि निग्रहाने 'अनेकवचनी भूतकाळी' हा परवलीचा शब्द ठेवलास. या लखलखत्या वारशाची बूज आम्ही राखली नाही, त्याचं महत्त्व आम्ही ओळखलं नाही- हे तू परोपरीने प्रत्येक कथेत आणि पाल्हाळात सांगत राहिलास- याचा आता तुला मिळालेल्या नव्याकोर्‍या राजाश्रयामुळे लोक नव्याने विचार करून पाहतील. तू उदाहरणार्थ कितीही हुशार असलास खंडेराव, आणि कितीही महान गोष्टी सांगत असलास तरी असं काहीतरी अधिकृत, अधिष्ठान लागतंच लोकांना पटायला- याची तुलाही कल्पना असेलच, नाही का. तर सांगायची गोष्ट अशी- की 'पृथ्वीवर कोणत्या लोकांना एवढा समृद्ध वारसा नुसता बेंबीच्या बळावर मिळतो?!' ही तुझी भाषा कदाचित आता लोकांना समजेल. प्रयत्न तरी करतील. तुझ्या अस्सल देशीवादी रूपाला जे लोक भंपक आणि काळाच्या पट्टीवर न टिकणारं तत्त्वज्ञान- असं म्हणत होते, ते एकदा तरी विचार करतील. त्या काळ्याकुट्ट मोजपट्टीवर काहीच टिकणार नाही आणि शेवटी अक्षय असं काहीच नाही; पण असं कसं चालेल? तुमच्यातलं काहीतरी अक्षय तत्त्व तुम्ही शोधूनच काढलं पाहिजे. अक्षयाच्या शोधात जन्म-पिढ्या खपल्या तरी चालतील. ते सापडलं नाही तर काय उपयोग त्या जन्मांचा आणि पिढ्यांचा?- अशा अर्थाचं तुझं नव्या अस्तित्त्ववादाचं जुन्या अडगळींतून धुंडून काढलेलं तत्त्वज्ञान एकदा पडताळून बघितलं जाईल, हे या घडीला, खंडेराव, मला तरी फारच भारी वाटतं आहे. 'युग बदलतं त्या वेळचा दाट अंधार' हा अक्षय असेल तर तो तुमचा वारसा आहे- अशासारखं थोडंसं हे तत्त्वज्ञान.

तुझी गोष्ट सांगण्याची हातोटी आणि तत्त्वज्ञान यांची जशी हेटाळणी झाली तशी तुझ्या भाषेचीही क्वचित झालीच. तर ते क्वचित लोक तुझ्या भाषेची आणि अर्थांच्या समृद्धतेची समीकरणं कदाचित नव्याने मांडून बघतील. एकतर तुझ्या भाषेला, खंडेराव, नटणं सजणं मुरडणं माहिती नाही. उलट वरून तूच सांगणार की बाबा, ते नटणं मुरडणं उदाहरणार्थ असोच, पण ते काही खरं नाही.. त्याचा काही उपयोग नाही. भाषा भव्य बनून तुमच्यासमोर आली पाहिजे. छातीत न मावणारे पर्वत आणि जंगलं तीत आले पाहिजेत. खवळलेल्या समुद्रासारखी रोरावत ती अंगावर आली पाहिजे. तेच तिचं सौंदर्य आणि तेच तिचं नाजूकपण. तिने स्वतःशीच खेळ करत तिने स्वतःची आणि इतरांची खिल्ली उडवली पाहिजे.. वगैरे. मग त्या भाषेतून तू स्वतःलाच 'सिगरेटी थोडे दिवस जास्त कमी पीत जाव्या, खंडेराव, मग जास्त दिवस कमी कमी पीत जाव्या-' असं सांगण्याचे चिल्लर खेळ असोत, की बापाच्या तोंडी '..दोन्ही पाय झोकून तर माणसानं कधीही कुदू नये. कधी खालची जमीनच नाहीशी होते. आयुष्य संपवून टाकण्याइतकं महत्वाचं काहीच नसतं..' असं तत्त्वज्ञान घालणं असो.. तुझी भाषा नेहमीच गारूड घालत गेली. तुझी भाषा तुझ्या पाल्हाळांना आणखी समृद्ध करत गेली. तुझ्या लिहिण्याच्या आणि गोष्ट सांगण्याच्या घाट आणि प्रयोगांना तुझ्या या भाषेने नवे प्रदेश आंदण दिले. तुझ्या भाषेने उलफत्तू, ग्यानमोड्या, बेउमज्या, उचाळू, भेंडसुमार्‍या अशा अनेक ओबडधोबड आणि शिव्या आणि लौकिकार्थतले कुरूप शब्द दिले. तुझ्या चिंधूआत्याची, तिरोनीआत्याची, पेंढार्‍यांची, भपार्‍या पाटलाची आणि सटार्‍या देश्मुखाची, हुनाकाकाची.. अशा कितीतरी स्थानिक संदर्भ असलेल्या गोष्टींना आशयाने दिली तशीच तुझ्या भाषेनेही वैश्विक परिमाणं दिली. या अशा अर्ध्या अपुर्‍यासपुर्‍या पण दुखर्‍या नसेसारख्या सटसटणार्‍या गोष्टींगोष्टींतून तू नक्की काय म्हणतो आहेस- याचा अंदाज येईस्तोवर तुझ्या 'आपला देश परदेश तर परदेश देश आपला- हे उलटं वाचायचं की सुलटं?' अशासारख्या तिढ्यात पाडणार्‍या प्रश्नांनी आधीच देशीवादी चौकटीतली, पण वैश्विक तत्त्वज्ञानं मांडून झाली होती. तर, खंडेराव, ही तुझी भाषा तुझ्या स्वतःशीच बोलण्याची नाटकं करत असली तरी नक्की ती कुणाला उद्देशून आहे- याचा थोडाफार शोध यानिमित्ताने घेतला जाईल, असं प्रामाणिकपणे वाटतं. तुझ्या देशीवादाचं आयुष्य या काळाच्या पट्टीवर किती असेल ते माहिती नाही, पण ते नक्की किती आहे- याचा शोध तुझ्या बक्षिसाच्या निमित्ताने घेतला गेला, तर थोडा तरी धन्य होशील की नाही तू, खंडेराव?

आणखी एक छोटी, पण तरी मोठी गोष्ट म्हणजे, खंडेराव, 'हिंदू' हा धर्म नही, तर जगण्याची शैली-तत्त्वज्ञान आहे- असं शेकडो पंडितांकडून लाखो लोक ऐकत आले. मात्र ते नक्की कसं, ते नीट कुणी सांगितलं नाही, किंवा कळेल अशा भाषेत सांगितलं नाही. धर्माचा-जातीवादाचा हा भलामोठा पसारा मांडूनही धर्मा-जातीपलीकडे जात तू हे रसाळ-पाल्हाळ भाषेत सांगितलं होतंस- त्याचा अर्थ समजून घेण्याची धड्पड आता किंचितशी सुरू होईल असं वाटतं आहे, आणि तू मारलेले आसूड हे सुद्धा बक्षिस असल्याचं काळ कदाचित ठरवेल- अशी अंधुक आशा दिसते आहे, खंडेराव.

लाहोर-अमृतसर-दिल्ली-भुसावळ-मोरगाव हा म्हटला तर, खंडेराव, दोनेक दिवसांचा प्रवास. लाखो मैल आडव्यातिडव्या अस्ताव्यस्त पसरलेल्या प्राचीन काळापासून झालेल्या करोडो प्रवासांपुढे याची मातब्बरी ती काय? इथं पेंढार्‍यांनी आणि लमाणांनी केले तसे सिंदबाद, कोलंबस, शिकंदर आणि नेपोलियनानेही त्यांचे सुप्रसिद्ध प्रवास केले असतील आणि कधीतरी संपलेही असतील. मूळं शोधण्याचा हा तुझा प्रवास मात्र मोरगावालाच संपत नाही. ते जे काय अक्षय तू शोधत असतोस, आणि अस्तित्त्वाची कारणं शोधत असतोस, आणि तुझ्या असण्याला, अवकाशाला भक्कम आधार शोधत असतोस, आणि ते करताना स्वतःपुरती प्रमेये मांडत असतोस- ते फारच मनोहारी आहे. ही कडूगोड प्रमेये, निरीक्षणं, गणनं, अनुमानं तू 'आपण आपल्या पायावर आधी उभं राहायला शिकावं. आपणच धड नसलो तर कसला आलाय परोपकार. स्वतःला नीट सांभाळणं हा सर्वात मोठा परमार्थ!' किंवा मग 'आईनं एकदा धांदलीत पत्रात लिहिलं- तू वंशाचा दावा आहेस. दिव्याऐवजी चुकून दावा. म्हणजे दिव्यापेक्षा भयंकर!' किंवा मग 'काहीही न वाचणं आणि खराब वाचणं यात फरक नाही. निरक्षर लोक, ज्यांनी काहीच वाचलेलं नसतं, म्हणून ते लोक जास्त शहाणे असतात. अशा लोकांमुळेच आपल्या इथं सांस्कृतिक समतोल टिकून आहे!' किंवा मग 'दाट चिंतनात असं वारंवार शिरणं म्हणाजे कोण्या अज्ञाताचं कर्ज फेडण्याचा प्रकार' किंवा मग 'सांगाड्याच्या कवटीत संबंध युगाचा, स्थळाचा, काळाचा संदर्भ कोरलेला असतो- त्याचंच मडकं हेही प्रतीक. एका संपलेल्या आयुष्याचा आशय. म्हणजे काहीही नाही, फक्त घाट. मडक्यात फक्त घाट असतो, आत काहीही नाही!' किंवा मग 'पुरूषासारखं अमानुष होणं स्त्रीला किती कठीण असतं! पण तेच तिला कठीण झालं आहे..!' अशी बिनदिक्कत मांडत जातोस तेव्हा कधी धक्केही बसतात. कधी कळतही नाही, तुला काय म्हणायचं आहे ते. अशा वेळी ते कळवून घेणं किती आवश्यक आहे बाबांनो, हे सांगायला तू आणखी गोष्टी आणि आणखी नवे प्रवास सुरू करतोस. गंतव्य स्थान माहिती नसलेला एखादाच कोलंबस नसतो- हे तुझ्या प्रवासाला मिळालेल्या बक्षिसाच्या निमित्ताने शोधायला थोडीफार सुरूवात होईल असं खंडेराव, आता वाटतं आहे.

'जगण्याचं उर्ध्वपातन' करून लिहिलेल्या तुझ्या ओळींत ठायीठायी कथा आहे, खंडेराव, लोकांना आता कदाचित आवडायला लागेल हे एक बरं चिन्ह दिसतं आहे. मी तू आहेस, खंडेराव-आंबेराव-खंबेराव-खंदेराव. मी-तू-तो एकच. आत्ता हे बरोब्बर जमलं, आता गोष्ट सांगता येईल. कित्येक शतकांची ती तुझी सुप्रसिद्ध नि:शब्द शांतता भंग करून तू आता सुरू कर. लोक आता ऐकतील, खंडेराव, तू पाल्हाळ लावत घोळत-रमत गोष्ट सांग फक्त.

***

ह्या विश्वभानाच्या घोंघावत्या समुद्रफेसात निरर्थक न ठरो
आपल्या आयुष्याचा सुरम्य सप्तरंगी बुडबुडा, न ढळो
हे पहाटी पांघरलेले दाट झाडांतून डोकावणारे रोशन सूर्य

ह्या खिन्न विनाशतत्त्वाच्या झपाट्यात दरवळो
अकाली महामेघाने उठवलेली जमिनीतली उग्रगंधी धूळ, साचो
घर भरून जगण्याची समृद्ध अडगळ

***

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्तच लिहिलंय.
वा!

<<पृथ्वीवर कोणत्या लोकांना एवढा समृद्ध वारसा नुसता बेंबीच्या बळावर मिळतो?!' ही तुझी भाषा कदाचित आता लोकांना समजेल. प्रयत्न तरी करतील>>
कुणास ठाऊक. लोक नाही करणार. 'अडगळ' या एकाच शब्दाला चिकटून राहतात सगळे.
समृद्ध शब्दं विसरतात.
संपूर्ण कादंबरी तशीच्या तशी ठेवून पुस्तकाचं फक्तं शीर्षक -'हिंदु-जगण्याचा एक समृद्ध प्रवास' असं असतं तर या कादंबरीलाच लोकांनी डोक्यावर नाचवलं असतं.

व्वा!

उभे आडवे तिरके वाकडे अक्षांश रेखांशांचे फटकारे. सगळी पृथ्वीच त्या गुंत्यात अडकवून टाकलीस खंडेराव! म्हणूनच तिची समृध्द अडगळ झाली. हा लखलखता वारसा पुढे जाईल की नाही माहीत नाही पण पिढ्यान्पिढ्या त्याचं लखलखणं अधिकच धारदार होत राहील याची ही नांदी. तू लिही खंडेराव, तू सांग. तुझ्या पाल्हाळाला तुझ्या वर्षानुवर्षांच्या मौनाची शपथ होती. आता भल्याभल्यांच्या शपथा सुटतील. मौनं गळतील, तुझ्याच गळ्यात पाल्हाळांचे हार पडतील. ती तुझ्यासाठी समृध्द अडगळ हे सांगूनही खरं वाटणार नाही त्यांना कारण त्यात गोष्ट नाही! गंमतीची गोष्ट तर आताच घडली आहे. खंडेराव, अभिनंदन तुझं.

आता या लेखनासाठी -
साजिरा, क मा ल लिहीलंयस. अत्यंत अवघड. खंडेरावाची तिडीक तुझी पोटतिडीक होऊन मनाच्या पायर्या झपाझप ओलांडत लेखणीतून उतरत उमटत जाताना दिसतेय साक्षात. भाषा भव्य होऊन सामोरी येणंच उदाहरणार्थ. आजच्या आनंदाचे, अभिमानाचे पर्वत तीत आहेत, इतक्या वर्षांची उपेक्षा, दुर्लक्ष, कधीतरी माझं म्हणणं जगाला कळेल म्हणत अरण्याच्या पोटात राखलेलं मौन तीत आहे आणि कधीतरी त्या तिकडे किनार्यावर काहीतरी पृथ्वीचा समतोलच ढासळवणारं भयंकर घडतंय अशी खबर लागताच सगळे मौनाचे संयमाचे हिमनग फोडत रोरावत झेपावणारा समुद्र, सगळंच!

फारच सुंदर लेख. उदाहरणार्थ धाटणी अगदी हुबेहूब.
पण जरा वेगळे. आशय नाही पटला. देशीवाद तंतोतंत एकोणीसशे सत्तर वेळा भंपक आहे म्हणजे आहेच.