बायल्यावाणी कायले मरतं? : नागपुरी तडका

Submitted by अभय आर्वीकर on 29 January, 2015 - 23:58

बायल्यावाणी कायले मरतं? : नागपुरी तडका

बायल्यावाणी कायले मरतं? मर्दावाणी मरं!
सरणावरुन उठ... आनं... मशाल हाती धर ...!!

तुह्यावाणी लाखो मेले... काही फ़रक पडला?
येथे सारे निगरगट्ट ... काही बदल घडला?
त्यायच्यावाणी तू बी... फ़ुक्कट जाशीन मरून
संसाराची धूळधान... व्हईन आणखी वरून
लढल्याबिगर मोक्ष नाय.. कृष्णवचन स्मर ...!!

कर्जपाणी, घेणंदेणं... आता चिंता सोड
आला दिवस तसा... मानून घे तू गोड
कुणी आला ’यम’ दारी... शब्द त्याचे छाट
“पिकलं तवा लुटलं”... झालं फ़िट्टमफ़ाट
धमन्यामंधी बारुद भर... आनं... आवाज मोठा कर ...!!

जेव्हा पाय चालणारा... रस्ता जातो खुटून
श्वासाभरल्या विचारांचा... धागा जातो तुटून
तेव्हा तरी निग्रहाने... विवेकाला स्मर
कोणी केली दुर्गती... त्यांची यादी कर
एकटा नको मरू... संग... दहा घेऊन मर ...!!

कायदा तुह्या विरोधात... ’अभय’ नाही तुले
म्हूनशान लढले भाऊ.... शरद जोशी - फ़ुले
तुह्यी हाक घेण्यासाठी... सरकार मूकं-बह्यरं
आपण सारे मिळून लढू... करू त्याले सह्यरं
लुटारुंचे रचू थर... आनं... नाचू गच्चीवर ...!!

                                  - गंगाधर मुटे ’अभय’
------------------------------------------------

Group content visibility: 
Public - accessible to all site users

कोणी केली दुर्गती... त्यांची यादी कर
एकटा नको मरू... संग... दहा घेऊन मर .
>>> +११११
पण मराठवाड्यात वर्षानुवर्ष हा प्रोब्लेम चालू आहे. इतक्या वर्षात काहीच कसा फरक पडला नाही ह्याचं आश्चर्य वाटतं. आता ह्या वर्षी सगळ्यात जास्त पाऊस मराठवाड्यात पडलाय आणि सगळ्यात जास्त दुष्काळ पण . तो हि उन्हाळा सुरु व्हायच्या आधीच . मग हे लोक काय नुसते झोप काढतात का ? पाणी अडवण्याचा , पाणी जिरवण्याचा ह्यांनी काहीच प्रयत्न केला नाही ? सरकारची मदत हवी असेल तर हे लोक तसा प्रयत्न हि करताना दिसत नाही . सरकारच्या मागे लागणं, आंदोलनं करण असे कुठलेच प्रकार ह्यांच्याकडून होताना दिसत नाहीत .स्थिती सुधारण्यासाठी स्वताहून प्रयत्न करण तर दूरच .
ह्यांचं कर्ज माफ करा , वीजबिल माफ करा , पाणी फुकटात द्या .. अरे मग हे काय करणार ? नुसत्या आत्महत्या ????