भाग-६ आलं मनात आणि गेलो हिमालयात (पिंढारी ट्रेक)

Submitted by अनया on 29 January, 2015 - 09:00

भाग-१ पूर्वतयारी http://www.maayboli.com/node/52024
भाग-२ पुणे ते काठगोदाम http://www.maayboli.com/node/52054
भाग-३ काठगोदाम ते धाकुरी http://www.maayboli.com/node/52100
भाग-४ धाकुरी ते खाती http://www.maayboli.com/node/52128
भाग-५ द्वाली ते फुरकिया http://www.maayboli.com/node/52416

भाग-६ आलं मनात आणि गेलो हिमालयात (पिंढारी ट्रेक)

फुरकीया – झिरो पॉईंट – फुरकिया- द्वाली (१४ जून २०१४)


सहा वाजता निघायचं होतं. सगळ्यांना मिळून एकच टॉयलेट असल्यामुळे आवरायला वेळ लागणार, हे स्पष्ट होतं. बऱ्याच वाटाघाटी होऊन, मग सर्वानुमते साडेचारला उठायचं ठरलं. अश्या परिस्थितीत सर्वसामान्य जनतेने साडेचारचा गजर लावला असता. पण त्यात काय मजा? म्हणून अश्विनीने साडेतीनचा गजर लावला होता!

रोज काही इतक्या लवकर उठायला लागायचं नाही, पण आम्हाला सर्वांना लवकर उठायची सवय व्हावी, ह्या उदात्त हेतूने तिने पहिल्या दिवसापासून साडेतीनचाच गजर लावला होता. उठण्यात आळस होऊ नये, म्हणून ते घड्याळ ती जवळ न ठेवता सॅकमध्ये ठेवायची. फोनचा गजर वाजला की सगळे, ’आश्विनी.....’ असा आरडाओरडा करायचे. मग ही काळोखात आधी आपली सॅक शोधणार, असंख्य प्लास्टिक पिशव्यांचा कुरकुर आवाज करणार. फोन मिळाला, की त्याचा ठणाणा करणारा आवाज बंद करून ‘आहे वेळ अजून उठायला, झोपा-झोपा’ अशी आमची समजूनही घालणार! अस का? कारण ती अश्विनी आहे म्हणून!!!

तर, असा हा रोजचा साडेतीनचा गजर ऐकून आम्ही रोजच्याप्रमाणे झोपलो. नंतर एकदम पाच वाजता ‘बेड टी, मॅडम’ ह्या आवाजानेच सगळे जागे झाले. मग तुंबळ गडबड झाली. सगळे डोकं हरवलेल्या मुरारबाजीसारखे धावपळ करत होते. सामानात खुणेने ठेवलेल्या वस्तू रात्रीतून कुठेतरी फिरायला गेल्या असाव्या, कारण कोणालाच काहीच मिळेना. त्यात थंडी ‘मी’ म्हणत होती.

चहा-कॉफी थंड होत होती. म्हणून कोणाचीतरी टूथपेस्ट (आणि आपलेच ब्रश) घेऊन सगळे तोंड धुवायला पळाले. आजही गरम पाण्याची सोय होती. त्यामुळे फक्त मानेच्या वरच्या शरीराची अंघोळ करून आम्ही खोलीत परत आलो. गरम कॉफी पोटात गेल्यावर सगळे माणसात आले आणि पुन्हा नव्या जोमाने घाई करायला लागले.

आमचा सगळ्यात ज्युनियर मेंबर अभिराम आणि गरम चहा ह्याचं हाडवैर होतं. चहा आला रे आला, की अभिराम कुठेतरी अदृश्य झालाच पाहिजे. चहा थंडगार व्हायचा आणि त्याच्या आईचं, मंजिरीचं डोक तापायचं! आई भडकली की तो, तोंड धुणे / कपडे बदलणे / बूट चढवणे / पोर्टरशी गप्पा मारणे / सूर्योदय पाहणे, अशी कुठलीतरी कामगिरी संपवून अवतीर्ण व्हायचा! आजही सवयीप्रमाणे चहा थंड व्हायला लागल्याबरोबर अभिराम ब्रश करायला गेला. त्याला आधीचे दोन दिवस सर्दी, खोकला, किंचित ताप होता. त्याच्या आईने त्याला सतरा वेळा तरी त्याला तोंड धुताना गरम पाणी घ्यायला सांगितलं होतं. तो शहाणा मुलगा असल्याने त्याने ते ऐकलं.. पण गरम पाण्याने अर्धे कपडे भिजवूनही आला!!! आम्हाला कोणालाही न जमलेली कामगिरी त्याला जमली होती. ते पाहून आई आपल्यावर खूष होईल असं त्याला वाटलं असावं. पण आयांना मुलाचं कौतुकच नसतं. त्याचे ओले कपडे बघून मंजिरी सॉलिड भडकली. थंडी असल्याने सगळ्यांनी होते नव्हते तेवढे सगळे गरम कपडे अंगावर चढवले होते. ओले झालेले बदलायला जास्तीचे कपडेही जवळ नव्हते.

शेवटी निघायच्या वेळेपर्यंत अभिरामला चुलीजवळ (पण सुरक्षित अंतरावर!!) बसायची आज्ञा दिली गेली. कपडे वाळवत त्याने थंड चहा प्यायला आणि परिस्थिती नियंत्रणाखाली आली. अत्यंत आवश्यक सामान घेऊन सगळे तयार झाले आणि ठरल्यापेक्षा १५-२० मिनिटे उशीर करून शेवटी आम्ही निघालो.

अजून सूर्योदय झाला नव्हता, पण हळूहळू उजाडत होतं. बऱ्याच उंचीवर आलो होतो, त्यामुळे झाडं नाहीशी झाली होती. हिरवळ आणि लहान झुडपं दिसत होती. जिथे नजर जाईल तिकडे उंचच उंच शिखरं दिसत होती. अशी शिखरं बघताना त्यांची ओढही वाटते पण भीतीही वाटते. पाऊल टाकायचा धीर होत नाही, दुबळं-बिचारं वाटतं, वाट फार अवघड, उंच वाटायला लागते. नजर मात्र त्या बेलाग, अवघड पर्वतांनी बांधली गेलेली असते. हिमालयाने आपल्याला बांधून टाकलंय, आपण तिकडे ओढले जातोय असं काहीतरी वाटतं राहत.

रस्ता सोपा नव्हताच. उंचीवर आल्यामुळे धाप लागत होती. आधीच आमचा तो दिव्य वेग आणि त्यात अल्टीट्यूडचं मोठ्ठ कारण होतं. थोड्या थोड्या वेळाने थांबावं लागत होतं. लँडस्लाईड सोबतीला होत्याच. काही ठिकाणी ग्लेशियर पार करावी लागत होती. पोर्टरपैकी एकजण पहाटे आमच्या पुढे गेला होता आणि आम्हाला चालायला सोयीचं व्हावं म्हणून आईस अॅक्सने पायऱ्या करून ठेवल्या होत्या. एवढ्या लोकांनी आपल्यासाठी कष्ट केल्यावर कसतरी धडपडत, लडबडत आम्ही चालणार!

अधूनमधून देवेन सर मुलांना थांबवत होते. थोडी विश्रांती झाली की पुन्हा पुढे निघायचो. माउंटन गोट बघायचा एक कार्यक्रम होताच. देवेन सर मुलांबरोबर आणि पोर्टर आमच्याबरोबर अशी विभागणी झाली होती. धाप लागत असल्यामुळे आज आमची बडबड पार बंद होती. स्वरूपचा श्वास फुलत नव्हता की दमायला होत नव्हतं, त्यामुळे आमच्या चौघींच्या वाटची बडबड करायची पूर्ण जबाबदारी स्वतःवर घेऊन त्याने जोरदार बॅटिंग सुरू केली. तो, त्याचं कुटुंब, त्याचं गाव, त्याने केलेले ट्रेक; सगळ्याची साद्यंत माहिती आम्हाला झाली! आम्ही फक्त ‘हं, हं’ इतकचं करू शकत होतो.

चालता चालता एका ठिकाणी डोंगरात बर्फ पडून तयार झालेली ॐ ची आकृती दिसली. ह्या ट्रेकला आल्यापासून मला तीन वर्षांमागे केलेल्या कैलास-मानस यात्रेची खूप आठवण येत होती. तिथल्यासारखा ॐ दिसल्यावर फार आनंद झाला. हा काही ॐ पर्वत नाही, पण तरी बघून मन भरून आल.

चालत, थांबत, लँडस्लाईडना शिव्या देत आम्ही एका पठाराच्या वरच्या भागाजवळ पोचलो. लांबवरच दृश्य दिसत होतं. सगळ्या पठारावर हिरवळ होती. घरंगळून आलेल्या मोठ्या शिळा दिसत होत्या. थोडं पुढे एक मंदिर दिसत होतं. भगवा ध्वज वाऱ्यावर फडफडत होता.

इथे यायचं ठरवल्यापासून ‘पायलट बाबा’ ह्या साधुबुवांबद्दल ऐकत होतो. ते बाबा इथे एकटेच राहतात. आलेल्या ट्रेकर्सना खिचडी-चहा असं खायला घालतात. आलेले लोकं स्वेच्छेने दानपेटीत देणगी देतात, पण बाबांची काही अपेक्षा नसते. सध्या त्यांची प्रकृती ठीक नसल्याने ते तिथे नव्हते. ही कल्पना आम्हाला आधीचं असल्याने त्यांची भेट झाली नाही, ह्याचं जरा वाईट वाटलं, पण अपेक्षाभंग झाला नाही.

पायलटबाबाजी का मंदिर

अश्या ह्या अगदी एकट्या जागी, जगाशी कुठल्याही प्रकारचा संपर्क नसताना राहणं किती कठीण असेलं. मेंढरं चारायला येणारे मेंढपाळ आणि ट्रेकर्स सोडून मानवी सहवास नाही. निसर्ग कधी काय रंग दाखवेल, ह्याची आजिबात शाश्वती नाही. शहरात, कुटुंबात राहणाऱ्या आपल्यासारख्यांना ही कल्पना करणसुद्धा कठीण आहे.

आज आम्हाला मॅगी नुडल्सचा नाश्ता होता. बच्चा कंपनी अत्यंत खुशीत होती. त्या थंड हवेत गरमगरम मॅगी खायला मजा आली. जवळच्या एका डोंगर उतारावरच्या बर्फात पिवळ्या ग्रुपची मंडळी खेळत होती. बर्फाचे गोळे मारणे, घसरणे वगेरे करताना हसाहशी चालू होती. तिथे जाऊन मजा करायची किंवा ‘झिरो पॉइंट’ पर्यंत जायचं असे दोन पर्याय होते. देवेन सरांनी आता तुम्हाला पाहिजे तिथे जा, दोन तासांनी परत जायला निघूया, असं सांगितलं आणि पोर्टरना आमच्या सोबतीला देऊन ते कुठेतरी अंतर्धान पावले.

हिमालयन मॅगी (गरम व आयती!)

सुजाता आणि मंजिरीला अल्टीट्यूडचा त्रास होत होता. डोकं जड होणे, मळमळणे असं चालू झालं होतं. त्यामुळे त्या दोघींनी आहे तिथेच थांबायचं, असं ठरवलं. परदेशस्थ मंडळींना ‘बर्फ’ हा प्रकार अगदी नको होता. त्यामुळे मुलं बर्फात आणि आम्ही झिरो पॉइंटकडे जायचं ठरवलं. स्वरूप बरोबर दुसरा लोकपाल नावाचा एक पोर्टरही आमच्याबरोबर होता.

स्वरूप आणि लोकपाल

पुन्हा चालायला सुरवात केली. पहिल्या पावलापासूनच धाप लागायला सुरवात झाली. स्वरूप निरनिराळ्या शिखरांची माहिती पुरवत होता. ‘आप अगले टाईम आओगे ना दिदी, तो आपको ** ट्रेकपे लेके जायेंगे’ वगैरे गप्पा चालू होत्या. ‘बाबारे, आधी आम्हाला हात, पाय, मेंदू आणि हृदय चालू अवस्थेत असताना घरी तर पोचू दे, मग पुढच्या ट्रेकच पाहूया’ वगैरे ऐकवायची फार इच्छा होती. पण फुफ्फुसं आणि हृदयाच्या मर्यादा लक्षात घेऊन तो विचार सोडून दिला.

इतक्यात समोरून पिवळ्या ग्रुपचे काही मेंबर आले. झिरो पॉइंटला जाऊन आलात का? असं विचारल्यावर त्यांनी तिथे जायलाच दोनेक तास लागतात, असं सांगितलं. म्हणजे आपल्यालाही नाहीच जाता येणार, अश्या विचाराने जरा वाईट वाटलं. लोकपालच्या म्हणण्यानुसार तिथे खूप लँडस्लाईड झाल्याने काही पाहण्यासारख नाहीये आणि रस्ता कठीणही होता. पण ह्या ट्रेकच ठरवल्यापासून ‘झिरो पॉइंट’ असं लिहिलेल्या बोर्डचे फोटो पाहिले होते. त्यामुळे तिथपर्यंत किंवा तिथे पोचणं शक्यच नसेल, तर जितकं जवळ जाता येईल तेवढ जावं, असं अगदी तीव्रतेने वाटत होतं. तिथे न जाण, म्हणजे अर्ध्यातून माघारी फिरल्यासारखं झालं असतं. त्याला काही अर्थ नाही. ट्रेकला जाण्याच्या अनेक उद्देश्यांपैकी एक ‘शिखर न गाठता मागे फिरण्याची मनोवृत्ती कमी करणे’ हा असतो. ह्यावेळेला नेमकं तेच होणार होतं.

मग आम्ही ‘पिंढारी ग्लेशियर’ बघायला जायचं असं ठरवलं. वीस मिनिटात तिथे पोचलो. समोर मोठी दरी होती. दरीत लांब पिंढारी ग्लेशियर दिसत होतं. तिथेच पिंढारी नदीचा उगम आहे. नाजुकशी नदी वाहात होती. ह्याच नदीच्या सोबतीने आज द्वाली कँपपर्यंत जायचं होतं. त्या कँपजवळ ह्या नद्यांनी केलेला विध्वंस अजून डोळ्यासमोर होता आणि नदीचा आवाज कानात घुमत होता. पण त्याचं नदीचं हे नवजात, निरागस रूप होतं.

पिंढारी ग्लेशियर: पिंढारी गंगेचा उगम

तिथे गेल्यावर, हाच आपला ट्रेकमधल शेवटचं टोकं, अशी आम्ही मनाची समजूत घातली होती. वेगवेगळ्या कोनातून, वेगवेळ्या कॉम्बीनेशन्सचे फोटो काढून झाले. ते दृश्य डोळ्यात साठवत तिथे बसून राहिलो होतो. ‘क्यूं दिदी, अच्छा लगा नजारा?’ असं स्वरुपने विचारल्यावर ‘हां, बढिया है, लेकीन झिरो पॉइंटतक जाते, तो और बढिया होता’ असा विनंतीअर्ज हळूच पुढे सरकवला.

हे ऐकल्यावर त्याला एकदम उत्साह आला. चला, मी नेतो तुम्हाला, असं म्हटल्यावर आम्ही आनंदाने उठलो! लोकपालचा अजूनही ह्या आयडीयाला विरोधच होता. ‘टाईम लगेगा, दिदी लोग चल नहीं पायेंगे’ वगैरे कुरकुर चालू होती. पण स्वरूपने आता निश्चय केला होता. ‘हे लोकं इतक्या लांबून आले आहेत, परत येतील नाही येतील. चल, त्यांना घेऊनच जाऊया’ असं म्हणत त्याने लोकपालला पटवल.

आम्ही खुशीत त्याच्या मागे चालायला लागलो. माझा मुलगा, अन्वय आमच्या बरोबर नव्हता. त्यालाही यायला आवडलं असतं, ह्याची मला खात्री होती. पण त्याला बोलावणं शक्य नव्हतं. थोडं पुढे गेल्यावर तो चक्क आमच्याच दिशेने येताना दिसला! आम्ही अजूनच खुष झालो. थांबत, दम खात अर्ध्या तासात आम्ही ‘झिरो पॉइंट’ला पोचलो!! मोठ्ठा आनंद झाला. त्याच्या थोडं पुढेपर्यंत जाता आलं. नंतर लँडस्लाईडमुळे डोंगर कापला गेला आहे. हा ट्रेकचा सगळ्यात शेवटचा पॉइंट आला होता. पुन्हा एकदा फोटो झाले. हिमालयाच्या त्या भव्यतेने सगळे भारावले होते. कुठे पाहू आणि कुठे नाही, असं झालं होत. आत्ताही ते दृश्य डोळ्यासमोर आहे.


झिरो पॉइंटचा रस्ता

झिरो पॉइंटवरचे फोटोसेशन

आमच्यातली दोघं मुलं त्यांच्या आवडीने बर्फात खेळत होती. दोघी त्रास होत होता, म्हणून आल्या नाहीत. उरलेले सगळे इथे पोचलो होतो. आता कसं मनासारख झालं होतं. ह्याचं श्रेय मात्र फक्त स्वरुपला होतं. त्याने आमच मन जाणून, जिद्दीने आणलं नसतं, तर आम्ही फार काही करू शकलो नसतो. ‘काहीही सबळ कारण नसताना आपण अर्ध्यातून मागे आलो’ ही बोच राहिली असती.
उतरताना अन्वयनी सांगितलं की तो अर्ध्यापर्यंत दोनदा येऊन गेला होता. एकदा सरांनी ‘एकटा नको जाऊ’ म्हणून बोलावलं, दुसऱ्यांदा पिवळ्या ग्रूपवाल्यांनी ‘फार कठीण आहे, नको जाऊ, चल आमच्याबरोबर खाली’ असं सांगीतल. नाराज होऊन उतरत असताना आम्ही जाताना दिसलो, म्हणून तो तिसऱ्यांदा चढून आला होता! ‘काहीका असेना, शेवटी पोचलो,’ ह्या आनंदात मुलं बागडत, धावत उतरायला लागली.

उतरायला फार वेळ लागत नाहीच. लगेचच पठारावर पोचलो. तोपर्यंत मुलांच उर्वरीत मेम्बर्सना ‘झिरो पॉइंट’च प्रवासवर्णन करून झालं होतं. आम्ही थोडा वेळ टेकलो. तिथल वातावरण, शांतता मनात भरून घेतली आणि आनंदाने जड झालेल्या मनाने परतीच्या प्रवासाला सुरवात केली.

शेवटचं टोकं गाठून मागे वळलो, की मनःस्थिती बदलतेच. येताना, पुढच्या वळणावर काय नवीन बघायला मिळेल, ही उत्सुकता असते. काही ट्रेक गोलाकार असतात. त्यात आपण वेगळ्या मार्गाने बेस कँपला जातो. तिथे रोज वेगळा रस्ता असतो. हा ट्रेक तसा नव्हता. वाईट भाग म्हणजे कुठल्या दिवशी नक्की किती चढ आहे, किती लँडस्लाईड आहेत, हे पक्क माहिती होतं. चांगला भाग म्हणजे भुरळ पडलेल्या जागा, दृश्य परत एकदा बघायची संधी होती.

चढ, उतार, ग्लेशियर, लँडस्लाईड पार करत करत आम्ही चालत होतो. पुन्हा एकदा ॐ पाशी आलो. देवेन सरांना दाखवून त्यांच्याकडून कौतुक करून घेतलं. ‘आप सब लोग डिव्होटी हो, इसलिये ॐ के दर्शन हो गये’ अशी कॉमेंट आली. असं काही नसतं, हे माहिती असूनही जीवाला बरं वाटलं!

एका जागेवरून लांबवरचा कँप दिसायला लागला. पण आजचा मुक्काम पुढच्या कँपला होता. इथे फक्त जेवणासाठी थांबायचं होतं. मुलांनी उतारावरून धावत आणि आम्ही सावधपणे पावलं टाकत कँप गाठला. थोडं फ्रेश झालो आणि लगेच जेवणावर ताव मारला. जेवताना ‘अभिरामची ओली पँट, लँडस्लाईड पार करताना झालेली फजिती आणि झिरो पॉइंट’ ह्यावर जोरात गप्पा झाल्या. सगळ्यांचे उजळलेले चेहरे, उत्तेजित, आनंदी आवाज ऐकताना मस्त वाटत होतं.

परतीच्या प्रवासाची सुरवात

पुढे पाच किलोमीटर चालायचं होतं. त्यामुळे जेवण झाल्यावर लगेचच पुढच्या मार्गाला लागलो. सकाळी हवा स्वच्छ होती. आता मात्र ढग भरून आले होते. खूप पाऊस आला, तर चालताना पंचाईत होईल, ह्या भीतीने सगळे भराभर पाय उचलायला लागले.

मुंबईतून निघताना आम्ही आपल्या ट्रेकच्या पॅकेजमध्ये कसे सगळे आयटम आहेत, ह्यावर विनोद करत होतो. आत्तापर्यंत राजधानी, दिल्लीतली लोकल ट्रेन, चेअरकार, उत्तराखंडमधील राज्य परिवहन बस, जीप असे प्रवासाचे प्रकार झाले होते. पुढे स्लीपर आणि विमान हे नक्की होते. राहण्याच्या खोल्या, टॉयलेट ह्यांचेही निरनिराळे प्रकार बघायला मिळाले होते. पण हवा मात्र चांगलीच मिळाली होती. बहुतेक ‘पावसाचा अनुभव घेतला नाही,’ असं आम्हाला वाटायला नको, म्हणून पाऊस पडायला लागला. सगळ्यांचे रेनकोट इतके दिवस सॅकमध्ये गुमान बसून राहिले होते, त्यानाही जरा बाहेरची हवा लागली!

लँडस्लाईडची जागा आली की देवेन सर किंवा पोर्टरपैकी कोणीतरी आम्हाला हात द्यायला, मदत करायला थांबत असे. एका जागी आम्हाला थांबायला सांगून, मंजिरीचा हात धरून स्वरूप पुढे गेला. मला आपल्याला जमेल असं वाटलं, म्हणून मी थोडी पुढे गेले. एका जागी माझा बॅलन्स गेला, आणि मी थोडी घसरले. फार काही झालं नाही. आवाज ऐकून स्वरूप मागे आलाच लगेच. ‘दिदी, आपको बोला था रुकानेको, क्यूं आगे आये,’ असं म्हणत मला पुढेपर्यंत घेऊन गेला. हात-पाय व्यवस्थित जागच्या जागी आहेत ना? ह्याची खात्री करायला चौघी थांबलो होतो, तेव्हा तो अगदी भाबडेपणाने म्हणाला,’ठीक हो ना दिदी, मैं तो डरही गया था. गिरनेकी आवाज सुनी तो, पहेले मुझे लगा, की बडा पत्थरही गिर गया. जाके देखा तो दिदी गिर गयी थी...’ झालं. हास्याचा प्रचंड स्फोट झाला. माझं हे परफेक्ट वर्णन ऐकून माझ्यासकट सगळे खो खो हसायला लागले. तो बिचारा सरळपणे म्हणाला होता, पण सगळ्यांना सॉलीड हँडल मिळालं! पुढचे सगळे दिवस ‘बडा पत्थर’ गाजत होता.

सकाळपासून चालण्याचा शीण जाणवायला लागला होता. कधी एकदा कँप गाठतोय असं झालं होत. उजवीकडच्या दरीत पिंढारी नदीचं पात्र दिसत होतं. रोंरावत वाहणाऱ्या नदीचा आवाज आसमंतात घुमत होता. लांबवर दिसणाऱ्या डोंगरांच्या अंगावर दरडी कोसळून जखमा झाल्यासारख्या दिसत होत्या.

पायाचे तुकडे पडणार असं वाटायला लागल्यानंतर काही वेळानी कँप आला. नेहमीप्रमाणे पिवळ्या ग्रुपचा कँप आमच्या आधी होता. त्यांच्याशी थोडी बातचीत झाली. त्यांचे लीडर सदैव लीडरच्याच बेअरिंगमध्येच असायचे. पिवळा टी शर्ट, ट्रेकची स्पेशल जिथेतिथे खिसे असलेली पँट, गळ्यात शिट्टी, डोक्यावर कडा असलेली टोपी, डोळ्यावर नसेल तर त्या टोपीवर गॉगल अडकवलेला, पँटच्या लूपमध्ये चहाचा मग लटकत असायचा. अश्या सगळ्या वस्तू ते कायम बाळगत असल्याने आम्ही त्याचं नाव ‘कोचरेकर मास्तर’ ठेवलं होतं. कँपवर मिळणाऱ्या सरबताची तहान लागलेली असताना, ते आमची मुलाखत घ्यायच्या बेतात होते. आम्ही काहीतरी कारण काढून तिथून सटकलो आणि कँपच्या व्हरांड्यात असलेल्या खुर्च्यांवर कोसळलो.

सरबत पिऊन जरा तरतरी आली. मुलांची विश्रांती झाल्याने आता त्यांचं स्ट्रेचिंग सुरू होतं. पाय आखडून गेले होते, स्ट्रेचिंगने बरं वाटेल, म्हणून आम्हीही त्यांच्यात सामील झालो. अधोमुख श्वानासन किंवा डाऊन डॉग करताना ‘ हा कसला कुत्र्यासारखा दिसतोय’ ‘कुत्र्यालाही ही पोझ ह्याच्याइतकी चांगली येत नाही’, वगैरे विनोद झाले. मग रेस्टिंग पोझ करायची ठरली. आमच्या योग वर्गात भिंतीला टेकून ‘विपरीत करणी’ करतात. ती सगळ्यांना फारच आवडली. वेगवेगळ्या उंचीची पाच मुलं भिंतीला तंगड्या लावून खिदळत होती. देवेन सर काहीतरी सांगायला आत आले, आणि हे दृश्य पाहून भंजाळलेच! विचित्रच सीन होता तो! त्यांना हसू आवरेचना. आम्ही सर्व मंडळी एकूण मॅड आहोत, अशी त्यांना आधी शंका असेल तर आता खात्री झाली असेल.. आम्हीही हसायला लागलो. एकमेकांचं हसणं पाहून हसायच्या अजून जास्तच उकळ्या फुटत होत्या.

कसाबसा हास्ययोगाला आवर घालून आम्ही जेवायला गेलो. जेवून, थोडा वेळ शेकोटीजवळ शेकून खोलीत परत आलो. अन्वयचा मित्र नील आधीच खोलीत आला होता. येऊन पाहतो, तर हा मुलगा पोटभर जेवण झाल्यावर आता पुशअप्स करत होता. आजच्या दिवसात जवळपास अठरा किलोमीटर चाललो होतो, तरी त्याला पुरेसा व्यायाम झाला नव्हता, असं त्याचं म्हणणं होतं.. हे भगवान, ह्या मुलाचं आता काय करावं? हतबुद्ध होऊन त्याला थांबवलं आणि झोपायला लावलं.

आडवं झाल्यावर मी आणि मंजिरी एका क्षणात झोपलो. मुक्ता आणि अनुजा ‘मावशी कशी झोपलीय बघ’ असं म्हणून बराच वेळ खिदळत होत्या म्हणे. पण ते मला दुसऱ्या दिवशी कळल. पण त्या वेळेला मात्र फक्त गाढ, शांत, उबदार झोप. बास....

भाग-७ द्वाली ते बागेश्वर http://www.maayboli.com/node/52551

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लगेच प्रतिसाद दिल्याबद्दल सगळ्यांचे आभार.
पराग, ॐ पर्वताची आठवण आली ना? कैलास यात्रेतला अविस्मरणीय अनुभव आहे तो माझ्यासाठी.

किती गोड लिहिता हो तुम्ही....असं वाटतय की आम्ही सुद्धा तुमच्यासोबत होतो तिथेच...छोटे छोटे घरगुती प्रसंग वाचायला मस्त मज्जा येतेय..