वारसा भाग ४

Submitted by पायस on 28 January, 2015 - 08:03

पूर्वसूत्र येथे वाचू शकता - http://www.maayboli.com/node/52441

सन १८२०

ती अमावस्येची रात्र होती. रात्रीच्या काळ्या गर्भात काय चालते हे कदाचित रात्रही सांगू शकत नाही. अमावस्येची रात्र त्यामुळे अनेकदा गुप्त घटनांची साक्षीदार असते. पण गुप्त घटना देखील एखाद्या कठपुतळीच्या खेळासारख्याच नाही का? अनेकदा गुप्त घटनांमध्ये सामील बाहुल्यांना नाचविणारा धनी कोणी वेगळाच असतो व त्या बाहुल्यांना आपण काय गुपित घेऊन चाललोय हे ठाऊकच नसते. ते दोन शिपाई देखील तसलेच. मायकपाळच्या आजूबाजूला टेकड्यांची कमी नव्हती. पण म्हणून मालकांनी आपल्याला एवढ्या लांबवरच्या टेकडीवर पाठवावे हे काही अंताजी-संताजीला पटले नव्हते. तसेच हवेत कमालीचा गारठा होता. अंगावर दोन-तीन कांबळी पांघरल्यावरही थंडी भरुन येत होती. दात एकमेकांवर आपटू पाहत होते. पण मोठ्या मुश्किलीने त्यांना आवर घातला जात होता. अंताजी एका दगडामागे उभा राहून डोळे तारवटून त्या अरुंदशा पायवाटेवर नजर ठेऊन होता. तर संताजी मागे जवळच असलेल्या मोहाच्या पानांशी खूडबूड करीत होता.
"तिच्या मायला संत्या, किती येळ लावतुया. ७-८ पानं तोडायला एवढा येळ लागतु व्हयं रं."
"झालं झालं. आत्ता वळतो बघ चिल्लम" खिशातून तंबाखूची चंची काढत संताजी उत्तरला.
मोहाच्या पानांची बांधलेली चिलीम हा दोघांचा कळीचा मुद्दा. फडक्यानी बांधलेल्या चिलमीत दम नाही असे त्यांचे प्रामाणिक मत. संताजीने अत्यंत कसबीने २-२ पाने वापरून सुरेखशी चिलीम वळली. थोड्यावेळा पूर्वी केलेल्या शेकोटीतला उरलेला इंगळ वापरून, फुंकर घालून चिलम चांगली फुलविली. मग एक चिलीम उचलून अंताजीने सुरेख झुरका घेतला. फू हूहू.........
"आता कसं ब्येस वाटतंय बघ. ही थंडी जीवच घेतीया. त्यात शेकोटी करायची सोय नाही. येनारे आपले मेव्हनेच न्हवं. लगेच सावध व्हाययचे."
"मेव्हने परवडलं. मालकाचा हुकुम म्हनून. न्हाईतर काम कराया अदुगर किमान चेहरा बगून घेतो म्या."
आपल्या कुर्‍हाडीला कुरवाळत अंताजीने जणू अनुमोदनच दिले.
"परं काय घोडं मारलं आसल रं यांनी राजांचं संत्या?"
" आपल्याला काय करायचया? काय का आसंना, मुधोजीराजं जे म्हनतील त्ये गपगुमान करायचं. बसं एवढंच ध्यानात ठेव."
संताजीने चिलीम झकास वळली होती. मोहाच्या पानांचा एक अलग स्वाद येत होता. चिलमीचे दोन तीन झुरके घेतले नसतील तोवर कोणाचा तरी झपाझप चालण्याचा आवाज येऊ लागला. अंताजीने लगेच अंदाज घेतला. अंधाराला सरावलेल्या डोळ्यांनी कांबळे पांघरलेल्या दोन व्यक्ती हेरल्या. "ह्येच असनार. न्हाईतर कोन येतंय हिकडं मरायला. चल."
हातात कुर्‍हाडी घेऊन दोघे हलकेच दबा धरून बसले. सावजेही सावध दिसत होती. पण मोक्याची जागा ती मोक्याची जागा. टप्प्यात येताच दोघांनी एका झेपेत काम तमाम केले. आता धोका नव्हता. मुडद्यांपाशी उभे राहून अंताजी संताजी ची जोडी त्यांना निरखत होती. सर्व एका निमिषार्धात घडले असले तरी त्यांना थंडीतही घाम फुटला होता. कुर्‍हाडीचे पाते रक्ताने माखले होते. "पुडंच बी कराया पाहिजे?"
अंताजीने मान हलविली. "राजं जे सांगितील ते करायाच पायजे. इलाज न्हाई. त्यांना ओळख पटवायला त्ये घेऊन जाया पायजे."
दोघे आता मुडद्यांच्या मानेच्या रेषेत उभे होते. त्यांच्या कुर्‍हाडी हवेत उंचावल्या आणि....
पुढच्या पहाटे मुधोजीराजांना एक पेटी नजर झाली. पेटीतली वस्तु पाहून मुधोजीराजे खूश झाले. खजिना लपवून झाला होता व लपविणारे त्यांचे मावळे आता परत कधी दिसणार नव्हते.
~*~*~*~*~*~

"भिवा धनगर आणि त्याचा भाऊ - लपविला खजिना अंश क्रमांक २ - मारेकरी - अंताजी-संताजी.
या ओळीची कहाणी अशीच काहीतरी असेल नाही?" - गोष्ट पूर्ण करता करता शाम उद्गारला.
कागदपत्रांची भेंडोळी घेऊन मंडळी बसली होती. शामने रचलेली सुरस कथा ऐकूनही कुणी फारशी प्रतिक्रिया दिली नव्हती. ते प्रशस्त दिसले नसते पेक्षा देखील त्याने शामला प्रोत्साहन न मिळू देणे हा खरा उद्देश होता. अन्यथा प्रत्येक ओळीसाठी शाम अशीच एखादी कथा रचत बसला असता.
"छ्या, मालकांच्या पणजोबांनी कत्तलखानाच उघडला होता जनू. दर ओळीत दोन-दोन माणसे मेली असे धरले तरी केवळ खजिना लपविण्यापायी एवढी माणसे गारद झाली? प्रताप नक्की किती मोठा खजिना आहे?" - बळवंत
प्रतापने खांदे उडविले. त्याचे लक्ष अग्रजवर केंद्रित झाले होते. प्रतापचे वडिल स्वतः कैक वर्ष या खजिन्यासाठी डोंगर दर्‍या शोधत होते. प्रतापने त्याच्या वडिलांना कळायला लागल्यापासून कधी पाहिल्याचे स्मरणात नव्हते. तो लहान असतानाच त्यांचा मृत्यू झाला होता. त्याच्या आईने नवर्‍याच्या आठवण काढत हाय खाल्लेली तो अजून विसरला होता. त्यामुळे त्याच्या मनात खजिन्याविषयी अतीव तिटकारा निर्माण झालेला होता. त्यामुळे जेव्हा आजोबांच्या विनंतीला मान देऊन अग्रज खजिना शोधायला तयार झाला होता तेव्हा प्रतापचा पारा चढला होता.
"तुला मी इथे खजिना शोध म्हणून नाही तर एक भावी केंब्रिजवीर प्लेगच्या साथीतून वाचावा म्हणून आणले होते. तू का या भानगडीत पडतोयस? तुला केंब्रिजला जायचे नाही का? या खजिन्याचा वारसदार स्वतः नकार देत असताना खजिना शोधण्याची गरजच काय? मी या प्रकाराच्या पूर्णपणे विरोधात आहे."
प्रतापच्या कानाच्या पाळ्या लालबुंद झाल्या होत्या. अग्रजच्या अटीनुसार त्याच्या इतर मित्रांनाही कल्पना देऊन हैबतरावांनी त्यांना अग्रजचे मदतनीस म्हणून नेमले होते. याखेरीज त्यांना पमाण्णा व स्वतः हैबतराव यांची मदत घ्यायची मुभा होती. वाटाड्या म्हणून मंजूची निवड झाली होती पण अगदी अपरिहार्य कारणाशिवाय तिला नक्की काय चालू आहे हे सांगण्यास मनाई होती. गोपनीयतेची पुरेपूर काळजी घेतली जाणार होती.
"पण प्रताप अखेरीस झाले तरी काय? समजा तुला खजिना नको असेल तर कोणा सेवाभावी संस्थेला आपण तो दान करु. टिळक गुरुजींच्या केसरीला किंवा काँग्रेसला देऊ मग तर झालं. तेवढीच स्वराज्य प्राप्तीला आपली मदत."
"मला खजिना देण्यात काही त्रास नाही. पण तो खजिना शापित आहे रे. त्याने माझा बाप माझ्याहून दूर नेला. माझे पणजोबा, खापरपणजोबा याच खजिन्यापायी झुरून मेले. आजोबा अजूनही त्याच्या लालसेपायी नीट झोपत नाहीत. कित्येकदा शोधतुकड्या पाठवतात. आहे तो खजिना संपण्याची लक्षणे वर मानसिक तब्येतीचा खेळखंडोबा. असा शापित खजिना स्वराज्य प्राप्तीसारख्या पवित्र कामासाठी वेचण्याची माझी इच्छा नाही."
अग्रजला दोन दिवस लागले प्रतापची समजूत घालायला. भले त्याच्या आजोबांना काम लगेच सुरु होण्यातच रस असला तरी प्रताप त्याचा भावी वारसदार होता. अग्रजकडे बघताना प्रताप अग्रजच्या गेल्या काही दिवसांतील निर्णयांवर विचार करीत होता आणि एकीकडे त्याच्या आईची झालेली होरपळ त्याच्या डोळ्यांसमोरुन जात नव्हती.
~*~*~*~*~*~
शामची डायरी

सन १८८५ - वीराजी राजांचा संक्षिप्त इतिहास
नाट्यीकरण - अर्थातच एकमेवाद्वितीय शाम भावे

"वीराजी राजांचा काही तपास लागला?" मंदिरातून परतलेल्या सईने विचारणा केली.
न्हाई जी - उत्तर मिळाले.
दिवेलागणीची वेळ जाहली होती. पुण्यास त्याच्या मावशीकडे राहायला गेलेला छोटा प्रताप परतला होता. जेमतेम ६ वर्षांचा होता तो. फडक्यांच्या बंडाचा बीमोड होऊन उणीपुरी सहा वर्षे झाली होती. त्या मोहिमेत स्वारींनी खूपच पराक्रम गाजविला होता. १८७९ मध्ये दौलतराव नाईकांना पकडण्यात मोठा वाटा हैबतराजे - वीराजी राजांचा होता. फडक्यांच्या अटकेतही त्यांनी अशीच मर्दुमकी गाजविली होती. तरुण वयात त्यांच्या तलवारीला रक्ताची व त्यांना साहसाची चटक लागली होती. १८७८-७९ कालखंड तर जवळपास सर्व मायकपाळच्या बाहेरच गेला होता. प्रतापचा जन्म पाहायलाही वीराजी परतले नव्हते. सई तशी लहानच होती अजूनही. बालविवाह विरोधी कायदा होऊनही बालविवाह थांबले नव्हते व सई अशीच एक बालविवाहिता होती. आता तर प्रतापच्या रुपाने तिला एक मूलही होते. पण संसारसुख तिच्या नशीबी नव्हते.
एक-दोन वर्षे इंग्रजांचे सत्कार स्वीकारत गावी घालविल्यावर त्यांच्या डोक्यात खजिन्याचे भूत शिरले होते. मग पुण्यास जाऊन त्यांनी गणिताचा अभ्यास चालविला. न जाणो कितीक डोंगर त्यांनी पालथे घातले. दरवेळी खजिन्याच्या इतक्या जवळ आलो हीच रट. सई वैतागली होती. पण तिच्यावर त्या रात्री जणू शेवटचा आघात झाला.
वाड्यात रात्रीचे एक शव आणण्यात आले. त्या शवाचा एक पाय कापला गेला होता. अनंत जखमा शरीरावर होत्या. बाणांनी वीराजी जहागीरदारास सहस्त्राक्ष करुन टाकले होते. हैबतराजे जहागीरदार त्या रात्री १० वर्षांनी म्हातारे झाले. खजिन्याच्या कोणत्या अंशापर्यंत पोचता पोचता वीराजींनी आपले प्राण गमावले हे आता कळण्यास मार्ग नव्हता. एका धनगरास डोंगरात मेंढरे चरायला नेत असताना वीराजी सापडला. सापडला तेव्हा तो जिवंत होता. त्याने मायकपाळचे नाव घेतले व रस्त्यात प्राण सोडले. या धक्क्याने खचलेली सई सती गेली.
------------------------------------------------
"ए थांब" प्रतापचा मूड आता बराच सुधारला होता. पण शामचे हे नाट्यीकरण त्याला काही फारसे पसंत पडले नव्हते. त्यात वीराजींचे तैलचित्र बघून त्यांना पुण्यात आपण कदाचित लहानपणी पाहिले असावे कारण चेहरा ओळखीचा वाटतो अशी अग्रजने थोड्यावेळापूर्वी टिप्पणी केली होती. अर्थात प्रतापला या नाट्यीकरणाच्या पलीकडचे काहीतरी माहित होते. त्याला वीराजींच्या इच्छापत्राप्रमाणे एक पेटी मिळाली होती. तिचे जुळणीचे कुलूप त्याने कधीच सोडविले होते पण त्याच्या आजोबांना त्यात काही सोन्याचे तुकडेच फक्त मिळाल्याचे खोटेच सांगितले होते. तेवढेच आजोबांचे पोराने खजिन्यातून काही तुकडे का होईना परत आणल्याचे समाधान! पण तळाशी असलेल्या चोरकप्प्यात मिळालेल्या कागदाविषयी काहीच सांगितले नव्हते. त्याला खात्री होती कि बाबांनी खजिन्याचे रहस्य सोडविले आहे आणि या कागदावर सांकेतिक भाषेत काही खुणा सोडल्या आहेत. अगदी अपवादात्मक परिस्थिती वगळता तो हे रहस्य कोणासमोर फोडणार नव्हता, अगदी अग्रजसमोर पण नाही.
~*~*~*~*~*~

अग्रजने आता आपला शोध सुरु केला होता. तो पमाण्णांसोबत जाऊन त्या टेकडीवरच्या गुहेत जाऊन खजिना पाहून आला होता. पण त्याला वाड्यातला मार्ग मात्र दाखविण्यात आला नाही. तसेच गुहेपर्यंत डोळे बांधून नेण्यात आले. खजिना डोळे दिपविणारा होता. कित्येक रांजण भरुन सोन्याचे होन, मोहोरा, तुकडे. चांदीची भांडी. जुन्या अश्रफ्या, प्रचलित नसणारी कित्येक जुनी नाणी. विविध मूर्त्या, दागदागिने इ. इ. कच्चा अंदाज २० कोटींचा असल्याची माहिती पमाण्णांनी पुरविली. आजकाल पुरातत्त्व का काय म्हणतात त्या लोकांना या अशा जुन्या वस्तूंची आवड असल्याने ते वाट्टेल ती किंमत मोजतात इति पमाण्णा. पण निव्वळ सोने-चांदी-तांबे-हिरे-मोती यांची किंमतही सहज कोट्यावधीत जात होती.
"याच्या कमीत कमी ५ पट खजिना असण्याची आमची अपेक्षा आहे."
अग्रज हे सर्व ऐकून हादरलाच होता. अलिबाबाची गुहा देखील कमीच की! आणि अशा अजून कमीत कमी ५ गुहा अजून! या अवस्थेतही त्याचे लक्ष एका कोपर्‍यात गेले.
"ओह, तिथे जुने ग्रंथालय आहे. त्या पुस्तकांना फारशी किंमत येणार नाही असा मालकांचा अंदाज आहे. तुम्ही ती पुस्तके हवी असतील तर पाहू शकता. जर त्याने तुमच्या शोधाला मदत होणार असेल तर."
अग्रजने काही जुजबी चाळाचाळ केली. शुल्बसुत्रे, चरकसंहिता, सुश्रुतसंहिता निव्वळ नावे ऐकूनच हादरायला होत होते. पण हाय रे दैवा काही अपवाद वगळता ती कुठल्यातरी भलत्याच भाषेत दिसत होती. अग्रजने काही सुट्टे कागद फक्त आपल्या बरोबर घेतले व ____ भाषा कोश बरोबर घेतला. ते नाव नीट वाचता येत नव्हते पण ही विचित्र भाषा तीच असणार हा त्याचा कयास होता. हा शोध कुठे कुठे घेऊन जाणार आहे, असा विचार करीतच तो गढीवर परतला.
~*~*~*~*~*~

***पालेम्बंगचा विध्वंस***
पुन्हा मला खाट जाणवत नाहीये. आज मी उभ्याने झोपलोय. पुन्हा तोच साधू. मी स्वप्नाच्या दुनियेत आलो आहे.
"मलिगयांग पगडेतिंग पाबालिक. मालक हे बघताय."
हे काय? सगळीकडे जळणारी घरे, रडण्या-भेकण्याचा आवाज. एक भकास वातावरण. काय प्रकार आहे हा?
"या शहराचे नाव आहे पालेम्बंग. तुम्हाला खोटे वाटेल पण हे काही दिवसांपूर्वी एक संपन्न राजधानीचे शहर होते. आता हे शहर यातून कधीच उभरणार नाही. चला आपल्याला त्या तरुणाचा पाठलाग करायचा आहे."
कोणता तरुण? अच्छा तो. कोणी योद्धा दिसतो. तो कुठे चालला आहे? जंगलात काय काम त्याचे? हे काय हा तर कोणी शत्रुपक्षीय योद्धा दिसतो. पण त्याच्या अंगावर युद्धवेष नाही. या तरुणाच्या इतक्या साथीदारांनी घेरल्यावर आता अजून काय होणार याचे. नाही, एक मिनिट, हे काय बघतोय मी? तो दुसरा तरुण अचानक दिसेनासा होतोय. योद्धे धडाधडा कोसळत आहेत.
"मालक हे घ्या तुम्हाला दूरची नजर"
अरे या साधूने हात ठेवताच.मला दुर्बिणीतून बघितल्यासारखे वाटतंय. पण.. अरे.. हा नवा तरुण दिसेनासा होत नसून चक्क हवेत उडतोय, पंखानी ते सुद्धा वेगाने. या साधूमुळे माझी नजर त्याचा पाठलाग करु शकतेय. हे काय त्याच्या हाताच्या फटक्याने मुंडकी उडतायेत. तो त्यांना एखाद्या भक्ष्यासारखे वागवतोय.
"आता बघा मालक"
अरे मघाचा तरुण आला. हा काय लढणार या राक्षसाबरोबर. हे काय जखमी झालाच. पण हा मरत नाही. कोणताच वार प्राणघातक होऊ देत नाही. आणि अरे त्याने पाते त्याच्या उडण्याच्या मार्गात धरले आणि त्याचे शिर धडावेगळे झाले. वाह. भले शाब्बास. पण हे काय, त्या राक्षसाने मुंडके उचलून पुन्हा चिकटवले. पण तो तरुण विचलित होत नाहीये. अरे राक्षस त्याच्यापुढे नतमस्तक होतोय. तो काय बोलतोय त्या राक्षसाला?
"बास मालक. आज इतकेच. सर्व रहस्ये एकत्र उघड करु नयेत नाही का? इतकेच सांगतो या तरुणाच्या विजयाने तुमची व तुमच्या पूर्वजांची भविष्ये बदलली गेली."
अरे........ मी माझ्या बिछान्यात. या स्वप्नातल्या साधूला ही वाईट्ट खोड आहे. चुकीच्या ठिकाणी स्वप्ने तोडण्याची. पण खरंच कोण असेल तो तरुण? काय संबंध आहे त्याचा माझ्याशी?
~*~*~*~*~*~

अग्रज मध्यरात्रीचा एकांतात जाऊन गुहेतून आणलेले कागद घेऊन बसला. एवढ्या रात्रीचा त्याला कोणी त्रास देणार नाही हा अचूक ठोकताळा त्याने बांधला होता. त्यासाठी तो जेवण होताच झोपून गेला होता जेणेकरून रात्री उठता यावे. गढीतही त्याला ग्रंथागार उपलब्ध होते. गुहेइतके विपुल नसले तरी ते बरेच मोठे होते. जहागीरदारांचा हिंसक इतिहास बघता एवढे विपुल ग्रंथभांडार अग्रजसाठी नवलाईची गोष्ट होती. तिथे एकांतात बसून तो त्यांचे वाचन करीत बसला. जहागीरदारांच्या घराण्यातील मूळपुरुषांनी लिहिलेले काही दस्ताऐवज तिथे होते. १७व्या-१८व्या शतकातील कैक पत्रव्यवहार त्याच्या समोर होते. पण त्यात एक पत्र अगदीच वेगळे होते. ते तमिळ भाषेत असल्याचे त्याने ताडले. त्याचा संस्कृत अनुवादही सोबत होता. मध्येच एका नावाच्या जागी मात्र गाळलेली जागा होती. त्यात कोणा सेनापती विक्रमाचा खून करण्याच्या योजनेचा संदर्भ होता. पत्रलेखकानुसार विक्रम मेल्यास राजेन्द्र तिसरा आपले राज्य आक्रमकांपासून निश्चित राखू शकणार नाही. कुलसेखर पांडियन पासून त्याला मग कोणी वाचवू शकणार नाही. पत्रलेखकाच्या अनेक पिढ्यांच्या अपमानाचा बदला घ्यायची हीच संधि आहे असेही त्याचे म्हणणे होते. पत्रलेखक (नाव धूसर, वाचण्याच्या पलीकडचे) खून झाल्यानंतर मारता मारता बलिदान करण्याविषयी बोलतो व त्याला (गाळलेली जागा, कोण असावा बरे हा) पळून जाण्यास सांगतो. आपल्या थोरल्या वारसास व त्याच्या आईला घेऊन दूरदेशी जाण्याची आज्ञा करतो.
अग्रजसाठी आता हे नवीनच कोडे होते. त्याने अजून थोडी चाळाचाळ केली असता त्याला त्याच्यावरचे शक दिसले. शके १२०१. १२०१? १२०१ + ७८ म्हणजे सन १२७९? तेव्हा तर तमिळप्रांताचे राजे चोळ आणि पांड्य होते. नक्की हे जहागीरदार आहेत तरी कोण?

क्रमशः

ऐतिहासिक टीपा - वासुदेव बळवंत फडक्यांचा व दौलतराव नाईकांचा उल्लेख या गोष्टीत पूर्वी आलेला आहे. दोघेही २ महिन्यांच्या अंतराने १८७९ मध्ये पकडले गेले. नाईक मारले गेले तर फडक्यांवर खटला भरून त्यांना एडनच्या तुरुंगात पाठवले जिथे त्यांचे १८८३ मध्ये निधन झाले. शुल्बसुत्रे हा अनेक गणिती ग्रंथाचा संग्रह आहे ज्यात वैदिक काळातील गणिताच्या संशोधनाचा व त्यातील सिद्धांताच लेखाजोखा आहे. सुश्रुतसंहिता, चरकसंहिता भारतीय वैद्यकशास्त्रातील सर्वोच्च ग्रंथ आहेत. विक्रम काल्पनिक व्यक्ती आहे. राजेन्द्र तिसरा हा शेवटचा चोळ राजा मानला जातो. त्याचा कुलसेखर पांडियन या पांड्य राजाने निर्णायक पराभव करुन चोळ राज्य विलयास नेले. चोळ इतिहासाचाही या कथेत महत्त्वाचा वापर होणार आहे. मी शोधले असता चोळ शालिवाहन शकाचा वापर करीत अशी माहिती मिळाली म्हणून त्याचा वापर केला. सर्वांना माहिती असेलच पण तरी रेफरन्स साठी चालू शालिवाहन शकसंवत् इसवीसनातून ७८ वर्षे वजा केली असता मिळतो.

पुढील कथासूत्र येथे - http://www.maayboli.com/node/52567

Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्स सर्वांना. सध्या नेट access अनियमित असल्याने १-२ दिवसांचे ब्रेक होऊ शकतात. तसेच गणिती कोडी जुळवायला जरा वेळ लागतोय. त्यमुळेही थोडया gaps होतील. त्याबद्दल आधीच क्षमस्व!

एक्स्ट्रा फीचर

जसे वर्तुळामधून समान क्षेत्रफळाचा चौरस करणे हा केवळ कंपास-पट्टी वापरून करता येणे अशक्य आहे. तसेच दिलेल्या घनाच्या दुप्पट घनफळाचा घन तयार करणे सामान्य पद्धतीने अशक्य आहे. पण इतर साधनांनी ते तितकेसे अशक्यप्राय नाही. या कोडयाचा विचार करू शकता. याचा वापर होणार आहे.

Mala anakhin ase vachan karavayache aahe , ekhadya pustakache naav sangitala apan tar anand hoil mala .... Mi nakki te pustak milavinyacha prayatn karen ... Ani vachen pn

@Sachingpowar - उत्तर देण्यास उशीराबद्दल क्षमस्व. तुम्ही कॉमिक्स वाचत असाल तर बरीच अशी पुस्तके मिळतील. alan moore ची फ्रॉम हेल या धाटणीची वाटते मला. मूळात हे कथानक गेम+हॉरर मूवी असे सुचले असल्याने पुस्तकाची अशी शैली या कथानकाला नाही. पण खजिना शोध, गूढ कथा मराठीत खूप आहेत. सुहास शिरवळकरांची पुस्तके तुमच्यासाठी सर्वोत्तम!