श्वानहिरो

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 27 January, 2015 - 00:15

नाव डॅनी असले तरी हा चित्रपटातील खलनायक नसून आमच्या घरातील श्वानहिरो आहे. माझा पुतण्या- अभिषेकच्या आग्रहास्तव माझ्या मिस्टरांनी एका काळ्या कुळकुळीत ग्रेटडेन नामक जातीच्या कुत्र्याच्या पिलाला आमच्या घरी आणले. ग्रेटडेन जातीचे कुत्रे धिप्पाड, उंच असतात. असेच वेगळेपण यांच्या पिलांमध्येही असते. इतर गावठी कुत्र्यांच्या पिल्लांपेक्षा उंच, काळा कुळकुळीत चमकता रंग तसेच पट्टा लावल्याने पावडर-तीट लावलेल्या बाळाप्रमाणे दिसणारा डॅनी घरातील सगळ्यांच्याच कुतूहलाचा विषय झाला होता.

नवोदित श्वानपिलाचे कोडकौतुक जोरात चालू होते. वापरात असणाऱ्या चादरी जुन्या मानून त्याच्या अंथरूण-पांघरुणाची अभिषेकने सोय केली. थंडी लागत असेल म्हणून स्वत:चे जुने टीशर्टही त्याला घातले. घरातल्या दुधात १ लिटरची वाढ केल्याने दूधवाल्याच्या धंद्यातही वाढ झाली. डॅनीसाठी डॉग फूड, डॉग सोप, पावडर, अशा वस्तूंनी डॅनीचे बालपण सुसज्ज झाले. काही दिवसांनी माझ्या मिस्टरांनी डॅनीसाठी एक ग्रिलचा पिंजरा तयार करून आणला. त्याची स्पेशल रूमच म्हणा ना! त्यातच रात्री आम्ही डॅनीला ठेवू लागलो, तर रात्रीच्या वेळी त्याच्या भुंकण्यामुळे आम्ही चिंताग्रस्त झालो. मग मात्र त्याचे 'डॅनी' हे नाव विसरून 'काय कुत्रा आहे, धड झोपू देत नाही.' असे संवाद आम्हा घरातल्यांमध्ये होऊ लागले. माझे दीर म्हणजे अभिषेकचे वडील आणि अभिषेक अशा वेळी मध्येच उठून त्याला पिंजऱ्याआडून घरातील हॉलमध्ये ठेवत.

डॅनीला डास चावत असतील म्हणून डास निवारण कार्यक्रमांतर्गत कछुआ छाप अगरबत्तीची धूर काढून काढून राख जमा झाली; पण डॅनीचे रात्रीचे भुंकणे काही कमी झाले नाही. त्यानंतर आम्हाला कळले की, डॅनीला डासांची फिकीर नाही, तर आमच्या घराशिवाय करमत नाही. थोडे दिवस ठेवून बाहेरची सवय लावू म्हणून रात्री आम्ही त्याला हॉलमध्ये ठेवू लागलो. त्याची शी-सू घरात होऊ नये म्हणून आळीपाळीने रात्री मधूनमधून उठून बाहेरून शी-शूचा कार्यक्रम उरकून आणावे लागत असे. त्यातही एखादा दिवस झोप लागली की, वर्तमानपत्र पसरायची वेळ यायचीच. आता तर 'हाकलून द्या त्याला घराबाहेर, सोडून द्या कुठे तरी नेऊन' असे संवाद सगळ्यांच्याच- विशेषत: त्याची देखभाल करणाऱ्याच्या तोंडी मोठय़ामोठय़ाने आणि तावातावानेच यायचे. मग डॅनीचा रात्रीचा मुक्काम हळूहळू घरातील हॉलपासून ओटीपर्यंत आणला. त्यामुळे तोच आता आपली नित्य क्रियाकर्मे स्वत:च बाहेर उरकून येतो. स्वावलंबी झाला म्हणा ना!

आमचा डॅनी मनमिळाऊ, प्रेमळ आहे; पण हट्टीही तितकाच आहे. जे पाहिजे तेच करणार. दिवसभर त्याला बांधून ठेवले तर त्याच्या ओरडण्याने कान बधिर होतील असा त्याचा आवाज. त्याला स्वत:ला बांधून घेणे आवडत नाही. त्याचे आपल्या कुळातील भटक्या कुत्र्यांशीही तितकेच जमते. त्यामुळे अन्य भटक्या कुत्र्यांचा वावरही आमच्या अंगणात सर्रास असतो. त्याचेही या भटक्या कुत्र्यांवर इतके प्रेम की, गंमत म्हणजे आमच्या अंगणातील भटक्या कुत्र्यांना घराची राखण करण्याचे कॉन्ट्रॅक्ट त्याने दिले आहे जणू! कारण कोणी अनोळखी माणूस आला, की डॅनीचे मित्रच आधी भुंकतात. त्यानंतर डॅनीशेठ कॉन्ट्रॅक्टर बाकीचे निस्तरायला बाहेर येतात. खाण्याच्या बाबतीत म्हणाल तर 'खाईन तर तुपाशी नाही तर उपाशी' असा नवाबी थाट. नाश्ता दूध-पोहे, बटर वगैरे आणि जेवणात उकडलेले चिकन असेल तरच खाणार. डॅनी अंघोळीच्या बाबतीत एकदम आळशी. अंघोळीसाठी पाइप लावला की याची धावाधाव चालू होते. डॉक्टरांकडून इंजेक्शन घेतानाही हाच प्रकार.

डॅनी घरातील माणसांवरही जिवापाड प्रेम करतो. घरातील कोणी आले, की आधी त्याच्या जवळ जाणार. आमच्यापैकी कोणी २-३ दिवस बाहेरगावी जाऊन आले, की गेटमधून आत शिरताच हा प्रेमाने अंगावर उडय़ा मारायला लागतो.

माझी मुलगी ३ महिन्यांची होती. घरात नणंदेचे लग्न ठरलेले. एका महत्त्वाच्या कामासाठी मला तिच्या बरोबर थोडय़ा वेळासाठी बाहेर जावे लागले होते. त्या वेळेत नेमकी माझी मुलगी उठली आणि पाळण्यात खूप रडू लागली. घरातील सगळेच मी येण्याची वाट पाहतच होते; पण हा डॅनी सारखा पाळण्यात येऊन पाहायचा आणि गेटजवळ येऊन मी आले का ते पाहायचा. अशा त्याच्या खूप चकरा झाल्या. शेवटी मी गेटवर आले तेव्हा धावत जवळ येऊन जणू मला सांगू लागला, ''अगं, तुझं बाळ रडतंय. कशाला गेलीस तिला टाकून?'' त्या क्षणी आम्ही सगळेच डॅनीच्या वागण्याने भारावलो. असे बरेच भारावण्यासारखे प्रसंग डॅनीच्या वागण्यात येतात. पण हे सगळे प्रेम घरातल्या आणि ओळखीच्या माणसांसाठीच! अनोळखी माणसांशी याची कायम दुश्मनी. गेटची कडी जरी वाजली तरी गुरगुर चालू होते बसल्या जागी. कोणी येणार असले की आम्ही आधीच याला साखळीने बांधून ठेवतो; पण 'कुत्र्यापासून सावधान'च्या पाटीवर दुर्लक्ष करून गेटची कडी न वाजवताच कोणी थेट आले की डॅनी त्याच्या दिशेने धावत गेलाच समजा. मग त्याला आवरताना नाकीनऊ येतात.

अभिषेकसाठी तर डॅनी म्हणजे जिवलग मित्र. अभिषेक नववीत असताना डॅनीला आणला म्हणून अभिषेकची आई नाराज होती; पण डॅनीने तिच्या नाराजीवर प्रेमाने मात केली. अभिषेक शाळेतून आता कॉलेजविश्वात गेला; पण डॅनीसोबत खेळल्याशिवाय, त्याची चौकशी केल्याशिवाय अभिषेकला करमत नाही. इतका लळा आहे त्याला डॅनीचा. माझ्या मुली राधा-श्रावणी यांच्याही तोंडी डॅनीचे सतत नामघोष चालू असतात. सासूबाईंचीही दिवसभर घरच्याच सदस्याप्रमाणे डॅनीची विचारपूस चालू असते.

लहानपणी कुत्र्यावर निबंध लिहिलेला आठवतो- कुत्रा हा पाळीव प्राणी आहे, तो घराची राखण करतो; पण आता उमगते की त्यापलीकडेही त्याला भावना, प्रेम, वेळप्रसंगी कठोरता, लळा, आपुलकी यांचीही जोड आहे.

हा लेख २४ जानेवारी २०१५ च्या लोकसत्ता वास्तुरंग मध्ये प्रकाशीत झाला आहे. http://www.loksatta.com/vasturang-news/family-pets-dany-1064547/

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लिहिलं आहेस! खरंतर कुत्र्याला वन ऑफ द फॅमिली मेंबर असंच म्हणायला पाहिजे! खूप कळतं त्यांना.....मालका बद्द्ल खूप जिव्हाळा असतो. मांजरांचं तसं नसतं... ती आपल्याच विश्वात मग्न असतात. खाणं पिणं आटोपलं आणि स्वतःला हवं तेव्हा लाड करून घेणं झालं की दुसर्‍याशी संबंध संपला यांचा!! मग तुम्ही कोण आणि आम्ही कोण!!... काही दिवसांपूर्वी एक वाक्य वाचलं होतं...'Dogs have owners & cats have staff!!'.......अगदी खरंय हे!

अश्विनी. धन्स. Lol निघताना फोन कर ग.

अमा ५ वर्षे झाली.

शांकली खर आहे. धन्स.

दिनेशदा ओळख ठेवतो तो बरोबर.

नरेश नक्कीच.

जागू......... मस्तच! आता बघते गं...वास्तुरंग. दिनेशनी एकदा माबोवरच्या २(श्वान) हीरोंचा मस्त उल्लेख केला होता.
१) डॅनी उरणकर
२)लुई नगरकर
Biggrin

शांकली मस्त प्रतिसाद!

लेख वाचला होताच. अभिनंदन!

मस्त आहे डॅनी! आणि खरंच हिरो आहे. आमच्या समोर एकसे एक पोझेस देत होता. मी गेलेते तेव्हा त्याला बांधून घातलं होतं म्हणून ठीक.

खूप छान! तुमच्या डॅनीचा एक फोटोही टाका ना इथे!

ते भटक्या कुत्र्यांशी दोस्ती, पाळण्यातल्या बाळाची काळजी वगैरे खूप आवडलं. पुण्यात माझ्या सासरी असलेला कुत्रा माझ्या ३ महिन्यांच्या पुतणीबद्दल इतका प्रोटेक्टिव्ह होता की घरातले ठराविक लोक सोडून इतर कोणी बाहेरच्या व्यक्तीने तिला घेतलेलं त्याला चालायचं नाही. ती झोपेतून जागी झाली आणि आसपास कोणी नसलं तर हा बरोबर तिची आई, आजी घरात कुठे असतील तिथे जाऊन त्यांना भुंकून सांगायचा की ती उठली आहे, तिच्याकडे लक्ष दया Happy

पुन्हा एकदा जागुचे अभिनंदन!
लोकसत्तामधील नवीन लेख दि. २४ जानेवारी २०१५ वास्तुरंग पुरवणी पान नं. ५
अप्रतिम! चौफेर लेखन.
हा घ्या डॅनी साहेबांचा फोटो

लिन्क : http://epaper.loksatta.com/423948/indian-express/24-01-2015#page/61/2

Danny.jpg

बाबौ............कस्सला हॅन्डसमै!
हे आमचं पात्रः मि. लुई नगरकर

लोकहो,

मस्त भुभू आहेत दोन्ही! कुत्र्याच्या जिवाला जपायला हवं. थोडी सावधानी पाहिजे. कृपया ही बातमी पहा (दुवा स्वत:च्या जबाबदारीवर उघडणे) : http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai/men-murdered-a...

आ.न.,
-गा.पै.

अरे मस्त आहे की डॅनीशेठ. मानुषी तुमचा लुई नगरकर पण दिसला एकदाचा (मला वाटते वानू लेखमालेवर तुम्ही त्याच्याबद्दल लिहिले होते).

वॉव मस्त लिहिलय तुम्ही ..

आठवणी ताज्या झाल्या .. माझ्याकडे सुद्धा एक डॉबरमॅन कुत्रा होता .. काळ्या रंगाचा .. शेरा त्याच नाव .. माझ्या मामा आणि आप्पाजींनी आणलेल त्याला .. नागपुर ला राहणार्‍या एका पोलीस काकांकडे असलेल्या कुत्रीने जन्म दिलेला त्याला .. त्याची शेपुट लहानपणीच कापलेली त्यांनी ( कारण विचारल तर म्हणाले कि त्यामूळे ते चावणार नाही.. खर खोट नाही माहित मला ).

त्याला वळण लावायच म्हणून आईने खुप वेळा फटके दिलेले त्याला.. डोळे वटारुन थोड जोरानी ओरडल कि हा एकदम सॉरी सॉरी म्हणत पायात घुटमळणार .. छोट १ ते २ महिन्याचं पिल्लू होत जेव्हा आणल .. त्याला कुणी बाहेर गेल कि मागे लागायची फार सवय होती. बर साखळीने बांधुन ठेवन म्हणजे भयंकर काम होत.. खुप आक्रमक व्हायचा तो म्हणून तो मोकळाच असायचा ..

आमच्याकडे एक काका काकू भाड्याने रहायचे. काका ऑटो चालवायचे आणि काकू हाऊसवाईफ होत्या... आम्ही घरी नसलो तरी ते असले कि तो मागे नाही लागायचा . एकदा आमच्यापैकी घरी कुणीच नव्हत आणि नेमक काका काकूंना बाहेर जाव लागल . ते त्यांच्या ऑटोने निघाले तर हा पठ्ठा निघाला ना धावत पळत मागे त्यांच्या . एक दोन वेळा त्याला परत फिरुन घरी ठेवल्यावर हा त्यांना दिसणार नाहि अश्या रितीने लपतछपत त्यांचा पाठलाग करत राहीला पण हमरस्त्यावर आल्यावर मात्र गडबडुन गेला कि एवढ्या ऑटो मधे आपण नेमका कुणाचा पाठलाग करावा .. ३ ४ महिन्यांचा असेल तो तेव्हा आणि गोंधळला हरवला .

मी राहते त्या परिसरापासुन २ किमी वर लोहारा नावाचा परिसर आहे .. तिथे राहणार्‍या एका मुलाने त्याला उचलुन घरी नेल . गळ्यात पट्टा होता शेराच्या तेव्हा .. खुप शोध घेतला पण तो नाही गवसला आम्हाला ..

त्या घटनेनंतर तब्बल ९ ते १० महिन्यांनी लोहारा येथेच राहणार्‍या एका नातेवाईकांकडे जेवायला जाण्याचा प्रसंग आला मामा आप्पांना .. तिथे गेल्यावर अगदि शेजारच्या घरात ( मधे कुंपण वगैरे नव्हत, कालू म्हणून हाक मारायचे ते लोक त्याला ) आप्पांना तो दिसला . माझ्या आईप्रमाणेच आप्पांवरही खुप जीव त्याचा .. तो आप्पांना निरखुन पाहत होता खुप वेळचा पण इतक्या दिवसांनी दिसणारे ते हेच का हे नक्की होत नव्ह्त त्याच . न रहावून आप्पा , " शेरा आहे का रे ? " असे त्याला म्हणाल्यावर असला तुटून पडला तो त्यांच्यावर कि बास .. त्याच आप्पा आणि मामाजवळ अस लाडात येण, ओरडण , तक्रार करणारा सुर बघुन तो ज्या घरात होता ते सुद्धा थक्क झाले ..
रडत रडत त्या बाईने त्याला निरोप दिला आणि मामाच्या मोपेड वर बसुन स्वारी आमच्या घरी पोहचली..

कापलेली शेपूट हि त्याचा सिग्नेचर मार्क .. डायरेक्ट मोठा होऊन घरी परतला तेव्हा आम्हाला आधी अस वाटल कि आम्ही विचार करत होतो त्याप्रमाणे मामाने नविन कुत्रा आणला कि काय.. पण जसा तो गाडिवरुन उतरला
आणि आम्ही त्याला शेरा म्हणून हाक मारली ना त्यावेळी अनुभवल कि दुरावा संपल्यावर मिळणार्‍या सहवासाचा आनंद व्यक्त करण्यासाठी माणूस म्हणूनच जन्म घेण आवश्यक नाही आणि प्रेम व्यक्त करण्यासाठी बोलता येण जरुरी आहे हे तर नाहीच नाही ..

खुप आनंदाचे क्षण वाट्याला आले तो जवळ असताना .. निर्व्याज्ज प्रेम शिकवून गेला तो .. पण ते त्यालाच जमल आम्हाला नाही .. आई दवाखान्यात ४ दिवस अ‍ॅडमीट असताना तीला बघितल्याशिवाय अन्नाचा घासही न घेणारा तो .. मरणासन्न अवस्थेत पडून असताना तिला शेवटच बघेपर्यंत श्वास रोखुन धरणारा आणि तिचा प्रेमळ स्पर्श पाठीवर घेतल्यावर डोळे मिटणारा तो .. कधीच नाही विसरु शकणार ..

अजूनही सगळे म्हणतात कि घरी एक कुत्रा हवा पण नकार असतो फक्त आईचा .. म्हणते त्याची जागा नाही घेऊ शकणार कोणी आणि इतका जीव लावणारा आपल्याआधी गेला तर तो धक्का परत पचवायला जमणार नाही माझ्यानी ..

तुमच्या लेखात एवढा मोठा प्रतिसाद त्यातही माझ्याच घरच्या श्वानाबद्दल लिहिल्याबद्दल सॉरी .. पण खरच वाचुन माझा अनुभव शेअर केल्यावीना मला रहावल नाही ..

आमच्याकडे त्याचा असलेला एकुलता एक प्रचि :

DSC_6274.JPG

जागू, छान लिहिलय.
कुत्र्याला बांधून ठेवलेलं अजिबात चालत नाही. खास करून घरच्या.
त्याला जितकं आपल्यात वावरायला द्याल, तो तितका चांगला राहिल. नाहितर आक्रमक वा हिंसक होइल.
थोडसं ट्रेनिंग द्या त्याला. हे कुत्रे ट्रेनिंग दिलं की मस्त उपयोगी असतात व बिझी सुद्धा रहातात. व्यायम जरूरी सुद्धा आहे.
(हे सर्व तुम्हाला माहित झालच असेल आतावर पण उगाच माहिती पुरवली. Happy )
आणि, हे उपहासाने नाहि, पण कुत्र्याला दूध का पाजता? त्यांच्या पोटाला चांगलं नाही ते. तो पित जरी असला तरी त्याला त्रास होइल?

धन्यवाद नितीन! डॅनी एकदम हँडसम आहे Happy
लुई पण देखणा आहे..काय पोझ देतोय एकदम स्टाईलमध्ये.

टीना तुमची पोस्टही खूप आवडली. ८-१० महिन्यांनी शेराला त्याची फॅमिली सापडली पुन्हा हे छान झालं.

जागुले... मी तुझ्याकडे आले तर दोन दिवस आधी सूचनाज देऊन ठेव डॅनी ला... Lol

आणी मलाही सांगून ठेव त्याच्यासमोर कसंकसं वागायचं ते Wink

प्रेमळ श्वान असेल तर प्रॉब्लेम नै .. नाहीतर भीती वाटते मला.. Uhoh

पण लेख एक नंबर इंटरेस्टिंग आहे Happy

मानुषी चा लुई पण गोड दिस्तोय .. लॅब्रेडोर का??

टीना, तुझी पोस्ट ही खूप आवडलीये Happy

Pages