………. राहिले मी एकटी !

Submitted by अनुराधा म्हापणकर on 16 January, 2015 - 01:05

परवाच्या रविवारी भल्या सकाळी एका मैत्रिणीचा फोन आला. सूर रडवेला.. तुझ्याकडे एक काम आहे गं.. माझ्या आईशी बोलशील का एकदा ? नंतर ती बरंच काही बोलत- सांगत राहिली. घरातले अनेक प्रसंग माझ्यापुढे उभे करत राहिली. तिची माझी मैत्री पंधरा सोळा वर्षांची. तिच्या आईबाबा आणि तिच्या घरच्यांनाही मी जवळपास तेवढीच वर्षं ओळखत होते. त्या सगळ्या कुटुंबाशी माझं अत्यंत आपुलकीचं नातं होतं. त्यामुळे, मी कसं बोलू तुझ्या आईशी, म्हणत तो विषय टाळण्याचा प्रश्नच नव्हता. पण माझ्या बोलण्याने त्यांचा प्रश्न कितपत सुटेल याची मलाच शाश्वती नव्हती. तरीही बघते प्रयत्न करुन असा विश्वास देत मी फोन ठेवला.

माझी मैत्रिण साधी होती. आपल्या संसारात रुळलेली, आपल्या घरच्यांची काळजी घेणारी. नोकरी करणारी. दोन मुलांची आई. तिचं माहेरही तसं जवळचं. अर्ध्यातासावर ! माहेरी भाऊ-वहिनी आई आणि बाबा ! तिची आई मनस्वी. घरातून विशेष कधीही बाहेर न पडणारी. चूल आणि मूल अशा टिपिकल रुढी परंपरेत अडकलेली आणि त्यातच धन्यता मानणारी. फिरणं हिंडणं तर विरळाच पण व्यवहार आणि बाजार यासाठीही कधी तिचा बाहेरच्या विश्वाशी फारसा संबंध आलेला नाही. मात्र त्याउलट तिचे बाबा. घरात लागणा-या कोथिंबीरीच्या काडीपासून ते अगदी बॆकेच्या एफडी पर्यंत त्यांचा एकहाती कारभार. काका म्हणजे पुलंच्या व्यक्ती आणि वल्ली मधला "नारायण". नातेवाईक मित्रमंडळी यांच्याकडली लग्न, मुंज, बारसं असो वा अगदी अंत्यविधी ते बाराव्याचं जेवण असो, हे काका म्हणजे सगळीकडे मदतीला पुढेच !

काकू अतिशय मितभाषी, आपणच विणलेल्या कोशातून कधीही बाहेर न पडणा-या ! आणि काका अगदी विरुद्ध ! जातील तिथे वेगवेगळे कोश निर्माण करणारे ! मुलगी आणि मुलगा दोघांचंही लग्न झालेलं. त्यात निवृत्तीनंतर तर काकांच्या ह्या मदतकार्याला तर आणखी जोर आलेला. पण अडचणीत दिसलेल्या प्रत्येकासाठी अडचणीच्या आधीच पोहोचणा-या काकांचा पुण्यसंचय मात्र कुठेतरी कमी पडला असावा. कारण एका सकाळी अचानक छातीत फक्त एक कळ आली आणि सत्तरीच्या उंबरठ्यावर तरण्याताठ लोकांनाही लाजवणा-या काकांना ती एक कळ पुरली. कुणाच्या ध्यानी मनी नसताना होत्याचं नव्हतं.

काकूंवर अचानक दु:खाचा डोंगर कोसळला होता.. काकांना जवळून लांबून ओळखणारे आमच्यासारखेच इतके हळहळत होते तिथे काकूंची काय कथा ? पण शेवटी कितीही हळहळ वाटली तरी जगरहाटीप्रमाणे तिथे आलेला प्रत्येक जण तिथून बाहेर पडताना आपापल्या जगात स्थिरावत होता. या गोष्टीलाही आता सहा महिने होऊन गेले होते. त्या सहा महिन्यांत माझ्या व्यापात माझ्या मैत्रिणीला मोजून चार दोन फोन आणि काकूंना एकदा जाऊन भेटण्यापलिकडे मी काही केलंच नव्हतं. किंबहुना त्यांचीही माझ्याकडून याहून मोठी अपेक्षा नसावीच.

आणि परवाच्या रविवारी हा असा माझ्या मैत्रिणीचा फोन ! आईशी बोलशील एकदा … ? माझी मैत्रिण हतबल होती. आईला समजावून थकली होती. तिच्या बोलण्यात आईबद्दलची काळजी होतीच पण कुठेतरी तिने लपवलेला किंवा तिचा तिलाच न कळलेला मानसिक त्रागाही होता.

काका अचानक निघून गेले हे खरं होतं. त्यामुळे काकूंचं तुटणंही स्वाभाविक होतं. पण आज इतक्या दिवसानंतरही त्यांनी ते सत्य स्विकारलं नव्हतं. स्विकारलं नव्हतं असं तरी कसं म्हणायचं. कारण गेल्या सहा महिन्यात एकही दिवस त्यांच्या डोळयाला खळ नव्हती. एक रात्रही शांतपणे झोप नव्हती. एक क्षणही त्यांच्या आठवणीशिवाय नव्हता. एक घासही सुखाचा नव्हता. काकांचं निघून जाणं काकूंना कळलं होतं परंतु पचनी पडत नव्हतं. नवी साडी- कपड्यांचं राहूच दे पण साधं हसतानाही काकूंना अपराधी सल येत होता. आधी आवडीने टीव्हीवरल्या मालिका पाहणा-या काकूंना टीव्ही पाहाणं नकोसं वाटू लागलं. चवीनं खाणारे निघून गेले म्हणून स्वयंपाक करण्यातही त्यांना रस उरला नाही. आधीही अभावानेच बाहेर पडणा-या काकूंनी तर आता स्वत:ला घरात कोंडूनच घेतलं होतं. मग कुणाकडे जाणं येणं मन रमवणं हा प्रश्नच नव्हता.

बाबा गेल्याचा धक्का मुलासूनेसाठीही फार मोठा होता. बाजारात भाजी कशी घ्यायची आणि विजेचं बील कुठे भरायचं खरतर इथपासून सुरुवात होती. तरीही मुलं आत्मविश्वासानं उभी राहू पाहात होती. शिवाय पर्यायच नव्हता. घरात अचानक येऊन पडलेल्या ह्या जबाबदारीसोबतच नोकरी, तिथली आव्हानं- स्पर्धा याचीही भर होतीच. त्यांना घराबरोबर बाहेरचं विश्वही होतं. त्यात नित्य नव्या घडामोडी घडत होत्या. त्यामुळे कालांतराने बाबांचं जाणं स्विकारायला, पेक्षा त्या दु:खातून स्वत:ला सावरायला ह्या सगळ्याची मदत होतच होती. पण कितीही सावरलं असं वाटत असतानाच आईचं हे दु:खाच्या कोशातलं गुरफटलेपण त्यांना सलत होतं. या गोष्टीला तसे सहा महिने उलटून गेल्यावरही घरात टीव्ही रेडिओ मोठ्यांनं लावणं, फिरायला जाणं, काही खमंग बनवणं जमत नव्हतं. कुठली चांगली गोष्ट साजरी करणं तर राहूदे पण त्यासाठी मोकळा आनंद व्यक्त करतानाही खंतावल्यासारखं वाटत होतं. कारण आई दु:खी होती, खूप खूप दु:खी आणि कदाचित सर्वांबरोबर राहूनही अगदी एकटीसुद्धा ! हे एकटेपण तिचं तिनेच स्वत:हून लादून घेतलं होतं. बाहेरच्या जगात मिसळण्याचा स्वभाव नव्हताच. त्यामुळे इतर साठीच्या स्त्रियांप्रमाणे भजन प्रवचन किर्तनात गुंतवणं, महिलामंडळात जाऊन मैत्रिणी जमवणं ह्याचीही शक्यता नव्हती.

मुलगी आपल्या व्यापात..! तरीही तिला आईचा रोज फोन. आणि फोनवर बोलणं कमी अश्रू ढाळणंच जास्त. बाबांच्या आठवणींचा पूर. कितीही दूर असली तरी शेवटी ती लेकच ! बाबांच्या वियोगापेक्षाही तिला आता छळत होतं ते आईचं दु:ख ! तिचं सांत्वन करावं तेही कुठल्या शब्दांत तेच तिला कळत नव्हतं. आईच्या दु:खाने लेकही रडत होती. नकळतच आता सहा महिन्यानंतरही तिच्या संसारात, तिच्या घरातही त्या दु:खाचं सावट पसरत होतंच.

जगाच्या दृष्टीने पाहायला गेलं तर सगळे सावरले होते. आपापल्या व्यापात नोकरी व्यवसायांत, थोडक्यात जगरहाटीत गुंतले होते. पण खरतर काकांच्या जाण्याने दोन घरांची घडी तशी विस्कटलीच होती.

मला आठवलं, माझे सासरे चार वर्षांपूर्वी गेले तेव्हा सत्तर पंच्याहत्तरीच्या एक विधवा बाई सासूबाईंना भेटायला आल्या होत्या. दोनेक वर्षांपूर्वी त्यांचे पती असेच अचानकच निर्वतले होते. त्या बाईंनी एक खूप छान गोष्ट सासूबाईंना सांगितली- मी जगून काय करु असं नाही म्हणायचं. आता इतकं वय झाल्यावर कुणीतरी मागे - पुढे होणारच. आमच्यात ते पुढे गेले, मी राहिले. त्यासाठी दु:ख करत बसायचं नाही. देवाने दिलंय तेवढं आयुष्य काढायला लागणारच. तुमच्या बाबतही तसंच झालं. तेव्हा तुमचं जे आयुष्य राहिलं आहे ते आनंदात काढा. तुमच्या दोघांतले चांगले क्षण आठवा. इतक्या वर्षांची सोबत आठवा. मुलांबाळांत समाजात मिसळा. अस्सं सरेल आयुष्य !.. मला नंतर कळलं की आधी कारणाशिवाय घराबाहेर पाऊलही न ठेवलेल्या त्या बाई आता रोज दुपारी आसपासच्या देवळांत प्रवचनाला जातात. संध्याकाळी बागेत फिरायला जातात. तिथे छान मैत्रिणीही जमवल्या आहेत. आणि तिथून येताना मस्त ताजी भाजी, दूध, फळं घेऊन येतात.

किती उपयोग होईल माहित नाही, पण मैत्रिणीने सांगितलंय म्हणजे काकूंशी बोलावं लागेल. त्यांच्या दु:खात कुढण्याने त्यांच्या मुलांचंही मानसिक स्वास्थ्य हरवतंय हे त्यांना कुणी त्रयस्थानेच सांगावं लागेल. आणि त्यासाठी मला आता "त्या" बाईंचं तत्त्वज्ञान कामी येणार आहे कदाचित !

अनुराधा म्हापणकर

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझी सर्वात मोठी मावशी आणि तिचे यजमान यांच्यात असंच अतिशय प्रेमाचं नातं होतं. कधीच एकमेकांशी भांडले नाहीत. एकमेकांना सोडून कधी एकटे राहिले नाहीत. लग्नानंतर पस्तीस वर्षांनी मावशीचे यजमान अचानक हृदयविकाराच्या झटक्याने गेले. त्यानंतर मावशीला जगण्यात काहीच रस उरला नाही. पुढे तिला मधुमेह आणि इतरही अनेक असाध्य व्याधी जडल्या आणि तीन वर्षानंतर अतिशय झिजून झिजून तीदेखील हे जग सोडून गेली. तिला अनेकांनी समजावण्याचा प्रयत्न केला. मुलं, नातवंडं असलेल्या भरल्या घरात तसं पाहता तिला इतर काहीच दु:ख नव्हतं पण तिचे यजमान हेच तिचं जग होतं, जगण्याचं कारण होतं. त्यांच्यापश्चात तिला कशाचंही मोल नव्हतं. आमच्या कुणाच्याही समजावण्याचा कसलाच उपयोग झाला नाही. शरीराने ती तीन वर्षानंतर गेली असली तरी मनाने मात्र ती तिच्या यजमानांसोबतच निघून गेली होती.

चेतन..

हो... असं होतं खरं... पण असं कुणी पाहिलं की आपलं काळीज तुटतं.. त्या व्यक्तीने सावरावं असं मनापासून वाटत राहतं. अख्खंहसतं खेळतं घर पाहता पाहता कोसळून जातं..

<< स्त्री निदान व्यक्त तरी होते. पुरुष आतल्या आत कुढत राहतो .. >>

नक्कीच पुरुषांची दु:ख व्यक्त करायची पद्धत फारच वेगळी असते. एक विनोदी सदर म्हणून टिपरेंची रोजनिशी वाचायचो दर आठवड्याला लोकसत्तामध्ये. विधूर असले तरीही हसरे, खेळकर स्वभावाचे टिपरे आजोबा ग्रुप फोटो काढताना माझ्या शेजारी एक रिकामी खुर्ची ठेवा असं सर्वांना सांगतात तेव्हा ते वाचून मी फार रडलो होतो.

एक लेखिका म्हणून तुमचा परीघ मर्यादित आहे. पण त्यात तुम्हास अपेक्षित लोकप्रियता नक्की मिळेल अशी शुभेच्छा.

पुढील ललित सासू सून संबंध, नणंद दीर, घरची राणी, विवाहबाह्य संबंध / बालसंगोपन/ फेसबुकचे वाइट परीणाम/ एकट्या ज्येष्ठ नागरिकाना प्रेम द्यायची गरज, वहीनीच्या बांगड्या, माझे माहेर, समजुतदार सासरे, ह्या पैकी काही असू शकेल.

अमा Happy

अमा,

>>एक लेखिका म्हणून तुमचा परीघ मर्यादित आहे>>>
तुमची प्रतिक्रिया लागली,चांगल्या अर्थाने.. असं मी एका दुस-या धाग्यावर म्हटलं.. मी इथेही ह्या वाक्यासाठी तेच म्हणेन..

>>पुढील ललित सासू सून संबंध, नणंद दीर, घरची राणी, विवाहबाह्य संबंध / बालसंगोपन/ फेसबुकचे वाइट परीणाम/ एकट्या ज्येष्ठ नागरिकाना प्रेम द्यायची गरज, वहीनीच्या बांगड्या, माझे माहेर, समजुतदार सासरे, ह्या पैकी काही असू शकेल.>>>
हे मात्र लागलं... ! शहाण्याला शब्दांचा मार पुरेसा असतो, तो दिल्यानंतर चार चौघांत पुन्हा चाबकाचे फटके मारायचे नसतात. आणि कसं का बरवाईट असेल, माझ्या लेखनावरुन तुम्ही मला निदान शहाण्यात जमा समजायला हरकत नव्हती.

एकूणातच मी गद्य फार लिहिलेलं नाही. तुम्ही माझं इतर लिखाण दुस-या साइट्स वर वाचलं आहे म्हणून असं म्हणता आहात की मायबोलीवरील लेख वाचून ?
"कवयित्री" म्हणूनही तुमचं माझ्याबद्दल तेच मत आहे का.. माझ्या मते मी तिथे वेगवेगळे (घराबाहेरचे) विषय हाताळले असल्याची शक्यता आहे.. असो. फार विचारत नाही.. (पुन्हा फटके पडायची भीती वाटते.. Proud Happy ;))

लेखन आवडले असे नाही लिहीणार, कारण ही वस्तुस्थिती आहे. पण तुमच्याकडुन होतील तेवढे प्रयत्न नक्कीच करा. हल्ली माणसा-माणसामधला सन्वाद हरवलाय, तोच वाढण्याची गरज आहे. लिहीत रहा, व्यक्त व्हा. कारण वाचणारे आहेत. मी फक्त आणी फक्त मायबोलीचीच सदस्य आहे. फेसबुक, ऑर्कुट वगैरे माझ्या झेपेबाहेर. तेव्हा इथे जरुर लिहा.:स्मित: