परिंचे येथील प्राथमिक आरोग्य केंद्र

Submitted by बेफ़िकीर on 18 January, 2015 - 11:54

परिंचे! पुरंधर तालुक्यातील एक अतिशय आडगाव असलेले परिंचे हे गाव कदाचित नकाशावर शोधायला अवघड जाईल. इतकेच काय, प्रत्यक्ष शोध घ्यायला निघालो तरी अरुंद खडबडीत रस्ते आणि आजूबाजूचा जंगली परिसर ह्यामुळे नकोसेच होईल. पण ह्या गावात एक शासकीय प्राथमिक आरोग्य केंद्र आहे आणि तेथे त्या गावासोबतच आजूबाजूच्या काही लहान गावांमधील रुग्णांना आरोग्य सेवा पुरवली जाते.

ह्या केंद्राला भेट दिली असता प्रकर्षाने जाणवले ते डॉक्टर व कर्मचार्‍यांमधील माणूसपण! माणूसकीचा ओलावा!

डॉ. कांबळे हे ह्या केंद्राचे प्रमुख आहेत. हसतमुख असलेल्या डॉ. कांबळेंना बघूनच रुग्णाला धीर येत असावा. त्यांच्या देहबोलीत आत्मविश्वास व एका डॉक्टरला आवश्यक असलेली मृदुता ह्यांचा अनोखा संगम दिसतो. शासकीय सेवा ही नेहमीच नकारात्मकरीत्या बघितली जाते. पण डॉ. कांबळेंकडे पाहून समजते की ह्यात किती अपरंपार कष्ट असतात आणि ते हसतमुखाने कसे करता येतात. डॉ. कांबळेंच्या नेतृत्वामध्ये आणखीन एक तरुण डॉक्टर आहेत डॉ. निटाणेकर! हेही असेच हसतमुख व सतत कार्यरत असलेले डॉक्टर आहेत. दोघांच्याही चेहर्‍यावर 'आपण कोणाला तरी उपचारांनी बरे केल्याचे' आत्मिक समाधान सतत विलसत असते.

कर्मचार्‍यांमध्ये वरिष्ठ आहेत जयश्रीताई. त्या हेड नर्स असून त्यांच्या टीममध्ये सौ. दीप्ती, अर्चना व रुपाली अश्या नर्सेस आहेत. ह्या शिवाय पॅथॉलॉजी, डेटा प्रोसेसिंग हेही विभाग असून तेथे उचित प्रशिक्षण असलेले कर्मचारी आहेत.

जयश्रीताईंच्या टीमशी गप्पा मारताना जाणवले की शहरी विभागात, अद्ययावत सोवीसुविधांमध्ये राहून स्वतःचा विकास करून घेणारी स्त्री आणि अश्या आडगावात राहून गोरगरीबांची शुश्रुषा करणारी स्त्री ह्यात किती तफावत आहे. ही आडगावातील स्त्री किती महान कार्य करत आहे ह्याची जाणीवही शहरवासीयांना नसेल.

जयश्रीताई व त्यांच्या टीमने रुग्णांसोबत आपुलकीचे नाते निर्माण केलेले आहे. जुनाट अंधश्रद्धांचे निर्मूलन केलेले आहे. अनेकांना जीवदाने दिलेली आहेत तर कित्येकांना जन्म दिलेला आहे. त्यांच्या वागण्याबोलण्यात कोणताही गर्व नाही किंवा कोणतेही शल्य नाही. गीतेतील 'कर्मण्येवाधिकारस्ते' ह्या श्लोकानुसार त्या सर्वांचे आचरण असून त्याशिवाय ही नोकरी करताना त्यांनी इतरही अनेक संकटाम्चा सामना केलेला आहे.

त्या चौघींशी मारलेल्या गप्पा जर प्रश्नोत्तराच्या स्वरुपात व्यवस्थित शब्दांकित करायच्या झाल्या तर अश्या होतीलः

प्रश्न - ह्या केंद्रात कोणकोणत्या सुविधा आहेत? कोणत्या मर्यादा आहेत? तसेच ह्या केंद्रात येणार्‍या रुग्णांचे प्रकारही सांगा!

उत्तर - ह्या केंद्रामध्ये एकुण सहा बेड्स आहेत. एक लेबर रूम आहे. एक पॅथॉलॉजी लॅब व डेटा प्रोसेसिंग रूम आहे,. तसेच औषधे व लशी ठेवण्यासाठी योग्य त्या रेफ्रिजरेशनच्या सुविधा आहेत. रुग्णांना विविध आजारांची व औषधोपचारांची माहिती देणारे अनेक फलक आहेत. एक अँब्युलन्स व एक ड्रायव्हर आहे. दोन डॉक्टर्स धरून येथे एकुण १५ कर्मचारी आहेत. आमच्या आरोग्य केंद्राला मर्यादा म्हणजे पुरेश्या जागेचा अभाव व शहरापासून आम्ही लांब असणे! मात्र त्या मर्यादांवर आम्ही विजय मिळवलेला आहे. येथे येणार्‍या रुग्णांचे अनेक प्रकार आहेत. येथे महिन्याला जवळपास वीस प्रसूती होतात. साथीच्या आजाराचे अनेक रुग्ण रोज येतच असतात. ह्याशिवाय प्रतिकारशक्ती वाढवणार्‍या किंवा विशिष्ट रोगांवर असलेल्या लसीकरणासाठीही नियमीतपणे अनेक रुग्ण येत असतात. आमच्या केंद्रात लसीकरण, कुटुंब नियोजन, प्रसूती व साथीचे आजार ह्यावर सर्वाधिक उपचार होतात. ह्याशिवाय श्वानदंश आणि सर्पदंश हेही कॉमन आजार आहेत.

प्रश्न - येथे काम करताना येणारी आव्हाने कोणकोणती?

उत्तर - येथे काम करणे हेच मुळात एक आव्हान आहे. इतक्या आडगावी सातत्याने वर्षानुवर्षे कार्यरत राहणे व रुग्णसेवा करणे ह्यामुळे वैयक्तीक विकासाची वाटचाल खुंटते. पण रुग्णांच्या चेहर्‍यावरील हास्य आणि समाधान आपल्याला अध्यात्मिक आनंद देऊन जाते व त्यापुढे वैयक्तीक विकास सामान्य वाटू लागतो. येथे येणारे रुग्ण गरीब असतात, अर्धशिक्षीत असतात. ते येथे येतात तेव्हा आपल्यावर पूर्ण विश्वास टाकून येतात. त्यांना समजून घेणारे कोणीतरी हवे असते. ही रुग्णांची मानसिक गरज शहरात क्वचितच आढळत असेल. त्यांची आर्थिक पातळी, पेहराव, अशिक्षितपणा ह्याचे वाईट न वाटून घेता त्यांची शुश्रुषा करावी लागते. शहरातील रुग्णांवा स्वतःलाच बरेचसे ज्ञान आलेले असते. येथील रुग्णांना रोगाचा अर्थ समजून सांगण्यापासून सर्व काही करावे लागते. लस टोचणे महत्वाचे आहे हे पटवून द्यावे लागते. त्यांचे अज्ञान दूर करणे हेही एक मोठे आव्हान आहे. त्याशिवाय कुटुंब नियोजनाची आवश्यकता, असुरक्षित लैंगीक संबंधांमधील धोके, प्रसूतीच्या आधी व नंतर घ्यावयाची काळजी ह्यासाठी भरपूर ज्ञानप्रसार करावा लागतो. आम्ही शाळाशाळांमधून जाऊन लैगीक शिक्षणही देतो. असे शिक्षण दिल्यामुळे मानसिकतेत योग्य ते बदल होऊन गुन्ह्यांचे प्रमाण काहीसे घटते, त्यामुळे ते आवश्यक आहे. येथे एखादी इमर्जन्सी केस असल्यास ती ताबडतोब रुग्णवाहिकेतून सासवडला किंवा पुण्यातील औम्ध येथे हलवावी लागते. कमी जागा, अपुर्‍या सुविधा व गरीब आणि भाबडे रुग्ण ह्यामुळे उभी ठाकत असलेली ही सर्व आव्हाने आम्ही गेली अनेक वर्षे परतवून आवत आलो आहोत. अनेकदा असाही प्रसंग येतो की आमचे उपचार चुकले की काय असे रुग्णांना उगाचच वाटू शकते. त्यावेळी त्यांना सर्व काही नीट समजावून सांगावे लागते. स्तनपानासंदर्भात येथे अनेक जुने समज आहेत. त्या सर्व चुकीच्या समजांचे परिमार्जन करावे लागते. सुमारे चोपन्न हजार लोकसंख्येसाठी हे एकच केंद्र असल्याने येथे कामाचा ताण बराच जास्त असतो.

प्रश्न - असुरक्षित लैंगीक संबंधातील धोक्यांबाबतचे प्रबोधन कितपत झालेले आहे?

उत्तर - अथक परिश्रमांमुळे हा प्रसार बर्‍याच प्रमाणात झालेला आहे. आता लोक स्वतःहून येऊन सुरक्षासाधने मागतात. स्वतःहून येऊन चर्चा करतात. आधी ह्या विषयावर त्यांना बोलते करणे हेही जिकीरीचे होते. शासनाने विविध माध्यमांमार्फत केलेल्या विचारप्रसारामुळे बरेचसे प्रबोधन झालेले आहे ही एक सुखद बाब आहे.

प्रश्न - स्तनपानाचे महत्व व त्याबाबतचे प्रबोधन कितपत झालेले आहे?

उत्तर - स्तनपानाचे महत्वही आता बहुतेकांना समजलेले आहे. तरीही काही वेळा नातेवाईक मंडळी प्रसूत स्त्रीला पहिले दोन ते तीन दिवस बाळाला पाजू देत नाहीत. त्यामागे त्यांची काही चुकीची धारणा असते. त्यांचे ते विचार चुकीचे आहेत हे नीट समजावून सांगून त्यांना स्तनपानाचे महत्व पटवून द्यावे लागते. प्रसूत स्त्री कोणताच वाद घालण्याच्या शारीरिक अवस्थेत नसते, ती तिला जे कोणी जे काही सांगतील ते करते. त्यामुळे हे प्रबोधन आम्हाला जाणीवपूर्वक करावे लागते.

प्रश्न - शासनाकडून तुमच्या काय अपेक्षा आहेत?

उत्तर - आम्हाला अधिक जागेची आवश्यकता आहे. पुरेश्या जागेमुळे आपोआपच अधिक आरोग्य वास करेल. अनेक सोयीसुविधाही हव्या आहेत पण शासनदरबारी रडगाणेच गायले पाहिजे असे नाही. आपल्या हिंमतीवर आणि कर्तृत्वावर विश्वास असायला हवा. डॉक्टर कांबळे व डॉक्टर निटणेकरांसारखे समर्थ डॉक्टर्स पाठीशी आहेत, तेवढ्या पाठिंब्यावर आम्ही आमचे कार्य करत आहोत.

डॉ. कांबळे:

IMG_2849.JPG

डॉ. निटाणेकर व सहाय्यक

IMG_2850.JPG

डेटा प्रोसेसिंग

IMG_2860.JPG

ग्रामस्थांच्या प्रबोधनासाठी ठेवलेले माहितीफलक

IMG_2861.JPGIMG_2862.JPGIMG_2863.JPGIMG_3421.JPGIMG_3425.JPG

नर्सेस कर्मचारी:

IMG_2864.JPG

धन्यवाद!

===========================================

-'बेफिकीर'!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आवडलं. कामानिमित्त या परिसरात मी वीसेक वर्षांपूर्वी एक आठवडाभर काळदरी नामक गावात राहिले होते. परिंचे मध्यवर्ती वाटावं इतकं आडगाव. माझ्या आठवंणीप्रमाणे (नोट्स काढून तपासून बघते नंतर) तेव्हा या आरोग्यकेंद्रात एक नर्स सोडून कुणी फारसं नसायचं. त्यांचं नावही जयश्रीच होतं असं वाटतंय पण नक्की आठवत नाही. त्या खूपच डेडीकेटेड होत्या आणि उत्तम काम करत.
आता त्या तुलनेने भरभराट झालेले आरोग्य केंद्र बघून छान वाटले. त्या भागात अशा सेवांची खरीखुरी गरज आहे.

१९९७ मधे मी देखील 'प्राथमिक आरोग्य क्रेद्रांचा' स्टडी केला होता तेव्हा या गावाला आणि आरोग्य क्रेंदाला भेट दिली होती… त्या वेळच्या ह्या आरोग्यकेंद्राच्या माझ्याही आठवणी, ह्या लेखात आहेत तितक्या 'चांगल्या' नाहीत.
आज इतक्या वर्षांनी हे आरोग्यकेंद्र 'सुधारित' स्वरूपात नजरेसमोर आलं या लेखातून हे पाहून बरं वाटलं …

ह्या आणि अश्या अनेक गावांना भेट दिल्यानंतर इतर काही नाही पण ' एस टी महामंडळाचं' तेव्हा कौतुक वाटलं होतं…
आता मला २००५-०६ सालचा या संदर्भातला लेख शोधायलाच हवा Happy

बेफी,

छान !!

तुम्ही अश्या आरोग्य सेवा पुरवणार्या सेवाभावी संस्था व त्यांचे चालक ह्या बद्दल चांगली माहीती ईथे शेअर केलीत त्याबद्दल धन्यवाद !!

वाह बेफ़ी....मी आरोग्य विभागात काम करते. आणि आधीच आपली आरोग्य सेवा कायम वादाच्या भोवर्यात सापडलेली असते...त्यामुळे तुमचा हा लेख भीत भीतच उघडला होता....पण वाचुन बरे वाटले..शासनात असेही लोक कार्यरत आहेत हे पुन्हा एकदा प्रकर्षाने वाटले

वाह बेफ़ी....मी आरोग्य विभागात काम करते. आणि आधीच आपली आरोग्य सेवा कायम वादाच्या भोवर्यात सापडलेली असते...त्यामुळे तुमचा हा लेख भीत भीतच उघडला होता....पण वाचुन बरे वाटले..शासनात असेही लोक कार्यरत आहेत हे पुन्हा एकदा प्रकर्षाने वाटले

वाह बेफ़ी....मी आरोग्य विभागात काम करते. आणि आधीच आपली आरोग्य सेवा कायम वादाच्या भोवर्यात सापडलेली असते...त्यामुळे तुमचा हा लेख भीत भीतच उघडला होता....पण वाचुन बरे वाटले..शासनात असेही लोक कार्यरत आहेत हे पुन्हा एकदा प्रकर्षाने वाटले

शहर असो की खेडं, खाजगी असो की शासकीय, फाईव्ह स्टार हॉस्पिटल असो की वैद्यकीय केंद्र डॉक्टर आणि स्टाफच्या तत्परतेमुळे रुग्णाचा विश्वास वाढत असतो. खेड्यापाड्यातून रात्री बेरात्री इमर्जन्सीला टू व्हीलर वर धावून येणारे डॉक्टर्स पाहीलेले आहेत. आजही अशाच डॉक्टरांचा आधार असतो.

या सेवाभावामुळेच या व्यवसायाला नोबेल प्रोफेशन म्हटले जात असावे. अशा लोकांमुळेच लोक आदर करतात. हॅट्स ऑफ टू देम !