वारी - भाग ६

Submitted by टवणे सर on 25 July, 2009 - 12:23

मी आणि धनंजय भोश्याच्या ओढ्याशी पोचलो तोपर्यंत दुपारचे बारा वाजले होते. दंडोबाच्या डोंगरातून निघालेला हा ओढा, जमिनीखालच्या दोन मोठ्या सिमेंटच्या पायपांमधून रस्ता ओलांडत एकदम नव्वद अंशात उजवीकडे वळून परत रस्त्याला समांतर वाहत होता. ओढ्याच्या डाव्या हाताला, रस्त्यालगत एक जुनं दगडी देउळ होतं. देवळाचा कळस बर्‍यापैकी उंच होता आणि त्याला नुकतच लाल-पिवळ्या झगझगीत रंगात रंगवलेलं दिसत होतं. मूळचं देउळ तसं छोटसंच होतं. पण गाभार्‍यासमोर आता एक नवीन पक्का, साधारण पन्नास एक माणसं बसतील एव्हडा अ‍ॅस्बेस्टॉसच्या पत्र्यांनी झाकलेला मंडप बांधलेला होता. आत गुळगुळीत फरशी घातलेली होती. जमिनीपासून चार-पाच फूट उंचीची भिंत होती आणि मग वर छतापर्यंत लोखंडी जाळी बसवलेली होती. मंडपाच्या दर्शनी बाजूला, छतावर दोन कोपर्‍यात दोन हनुमान हात जोडून, एकमेकांकडे तोंड करुन, खोखोला बसतात तसं एका गुढग्यावर रेलून बसले होते. देवळाच्या समोर एक मोठ्ठं वडाचं गोल झाड होतं. त्याच्या पारंब्या सगळ्या बाजूंनी पार खाली जमिनीपर्यंत लोंबत होत्या. वडाच्या झाडाला माझ्या छातीपर्यंत येइल इतका उंच आणि भरपूर मोठा गोल दगडी पार होता. पारावर गिलावा करुन मस्त गुळगुळीत फरशी टाकलेली होती.

आम्ही पोचलो तेव्हा तीसएक लोकं अगोदरच तिथे पोचलेले होते. पाच-दहा बायकांचा एक घोळका देवळाच्या पायर्‍यांवर बसला होता. बरेचसे पुरुष पारावर आडवे झाले होते. काका मफलरची गुंडाळी करुन आणि त्यावर एक हात डोक्याखाली मुडपून पाराच्या कट्ट्यावर वर झोपले होते. बापू चिवटे त्यांच्या शेजारी बसून स्वतःचे पाय चेपत होते. मी धनंजयला घेउन त्या दोघांच्या शेजारी जाउन बसलो. माझी चाहूल लागताच काका उठून बसले. मी त्यांना धनंजयची ओळख करुन दिली.
'काका, हा धनंजय वाटवे. मिरजेचाच आहे, पण आता मुंबईला असतो. आणि हे आमचे काका! दरवर्षी असतात वारीला. न चूकता. आधी भाउ जायचे. पण भाउ म्हातारे झाल्यावर काका जायला लागले. आता मात्र काकाच जाणार दरवर्षी.'
'अरे ए-जा काय करतोस त्यांना. धनंजयदादा तरी म्हण किमान.'
'अहो नाही हो. दोस्त आहे हा आपला. चलता है.' असं म्हणत धनंजयने गळ्यातली पिशवी काढून कट्ट्यावर ठेवली आणि आं उं असे मोठ्याने आवाज करत, दोन्ही हात वर-आडवे ताणत आणि दोन्ही पाय खाली कट्ट्यावर पसरत जोरात जांभई दिली. मग त्याचे, काकांचे आणि बापूंचे, तुम्ही कोण, कुठले, ह्याला ओळखता का, मग तो तुमच्यापैकीच ना, अमूक अमूक तुमचा चुलताच वगैरे गप्पा सुरु झाल्या.

कळंबीपासून परत पायात स्लीपर घालून चालल्यानं, अंगठा आणि त्याच्या शेजारच्या बोटाच्यामध्ये, जिथे स्लीपरचा अंगठा बसतो, तिथे हुळहुळुन लाल झालं होतं. खरतर सकाळी निघतानाच बूट घालून निघायला पाहिजे होतं. पण मग तासगाव वेस मारुतीच्या देवळात आरतीसाठी आत जायला म्हणुन बूट काढून ठेवायला लागले असते. चपला-बूट आणि शाळेचा डबा ह्या गोष्टी माझ्या हातनं कायम हरवायच्या. वारीला पोचवायला म्हणुन जायचं आणि नेमकं कोणीतरी बूट पळवायचं आणि आईच्या शिव्या मात्र फुकटच्या मी खायच्या. हे सगळं नको म्हणुन मी स्लीपर घालूनच बाहेर पडलो होतो. पण स्लीपरची बोंब म्हणजे अंगठा आणि शेजारचं बोट ह्यात स्लीपर घट्ट पकडून चालायला लागत होतं. बूट कसा आपणहून पायात बसतो पण स्लीपर मात्र पकडून ठेवायला लागत होती. आणि मग प्रत्येक वेळी पाउल टेकताना आधी स्लीपरची टाच मागं टेकायची आणि मग माझी टाच. त्या फट्याक फट्याक टाच हापटण्याने टाचापण जरा दुखत होत्या. मी पारावर स्लीपर फेकून अनवाणीच ओढ्याकडं गेलो. चालून चालून तळपाय जरा हुळहुळल्याने दगडं पण जरा जास्तच बोचली.

देवळापासनं जरा दूरवर जाउन मी ओढ्याच्या पाण्यात पाय सोडून बसलो. पाणी जेमतेम पिंडर्‍यांपर्यंतच होतं, पण मस्त थंडगार होतं. दोन-पाच मिनीटं तसच बसून मग मी हात-पाय-तोंड धुतलं आणि बाजूलाच गवतावर आडवा झालो. पाय मात्र ओढ्याच्या पाण्यातच सोडून ठेवले होते. हळुहळु थंड पाण्याने अंगठा आणि शेजारच्या बोटाच्यामधली हुळहुळ थांबली आणि मला झोप लागली.

एका वहीच्या आकाराच्या कागदावर एक लाल गोल होता. लाल रंगाचा आखीव तावाचा गोल कापून चिकटवल्यासारखा. त्या गोलावर डोळे अजून ताणून जवळ गेलो तर दिसलं की तो अगदी गुळगुळीत गोल नव्हता. त्याला ओबडधोबड कडा होत्या. त्या लाल रंगाच्या आजूबाजूला पक्ष्यानं घरटं बांधल्यासारखं वाळक्या काटक्यांचा कागदावर सपाट पसरलेला बिछाना होता. पण ह्या काटक्या कागदावर चिकटवल्या नव्हत्या. नुसत्याच एकमेकात अडकून त्या कागदावर घट्ट बसल्या होत्या इतकंच. त्या काटक्यांमध्ये एक छोटसं पीस अडकलेलं होता. चित्रात दाखवतात तसं - भुर्‍या रंगाचं, छोटूसं. नाजूक. त्या पिसाला मग मी माझा गाल घासला तर एकदम मउ मउ लागलं. मग बराच वेळ मी त्या कागदावर दोन्ही डोळे रोखून अगदी जवळ, मग अगदी दूरवरुन असं बघत बसलो. मग माझं डोकंच एव्हडं मोठं झालं की मानेपासून खालचं शरीर बॉलपेनाएव्हडं आणि डोकं कलिंगडाएव्हडं. खूप वेळ मग मी तसाच राहिलो. वाटलं की होइल हळुहळु कमी. पण ते पण तसच राहिलं.

बर्‍याच लोकांचे आवाज यायला लागल्याने माझी झोप मोडली. मग मी पाराकडे आलो.

मी पाराकडे परतलो तर जवळपास सगळेजण पोचले होते. पण दिंडी मात्र अजून आली नव्हती. काका पारावरुन खाली उतरुन पंधरा-वीस लोकांच्या एका मोठ्या गोल घोळक्यात बसले होते. मी फेकून दिलेल्या स्लीपर त्यांनी एकात एक घालून स्वतःच्या शेजारी ठेवलेल्या होत्या. मी त्यांच्या शेजारी, थोडासा मागे, स्लीपर ढुंगणाखाली घेउन बसलो. शेजारी धनंजय पाराच्या भिंतीला पाठ टेकवून, डोळे मिटून बसला होता. 'वर्षागणिक वारीला येणार्‍यांची संख्या वाढतीच आहे, काय!' काका आणि त्यांच्या शेजारी बसलेले एक जण ह्यांच्यात गप्पा चालू होत्या. 'आमच्या बहिणाबाईच बघा. पुण्याहून आली आहे खास ह्यावर्षी वारीसाठी. आणि हा पुतण्या माझा, धाकट्या भावाचा मुलगा. आठवीत आहे. पहिल्यांदाच येतोय.'
'अरे वा. छान छान.' असं म्हणत त्यां गृहस्थांनी माझी पाठ थोपटली. मला फार बरं वाटलं. कारण सकाळी निघाल्यापासनं पहिल्यांदाच कुणीतरी माझं 'एव्हडा लहान आहे, पण वारीला निघालाय चालत' असं कौतुक केलं होतं.

पाच-पाच, दहा-दहाच्या जथ्थ्यात लोकं ओढ्याशी येत होते. थोड्याच वेळात सामानाचा ट्रक पण रस्त्यावरुन खाली येउन देवळाच्या शेजारी येउन थांबला. त्याच्यामागोमाग एक हिरव्या रंगाची मेटॅडोरपण येउन थांबली. ट्रक येउन थांबल्यावर सगळे लोक जेवणाचा डबा काढायला म्हणुन उठुन तिकडे निघाले. मी पण काकांच्या मागेमागे ट्रकपाशी गेलो. 'ही मेटॅडोर सगळ्यात शेवटी असते. जर कुणी हळुहळु चालत असेल किंवा मागे पडलं असेल, तर त्यांना घेउन येण्यासाठी असते ही', ट्रकमध्ये आत उभा राहून लोकांना त्यांच्या पिशव्या देणार्‍या माणसाच्या हातनं आमची पिशवी घेत काकांनी मला सांगितलं. आज आत्ताशी पहिल्याच दिवसाचा जेवणाचा मुक्काम असल्यानं मेटॅडोरमध्ये कुणीच नव्हतं. लोकं आपापल्या पिशव्या घेउन आधी बसले होते तसे आपापल्या गोलात परतले. देउळ आणि पाराच्या मध्ये, पाराच्या बाजूला असे दहा-बारा गोल घोळके बसले होते. बायका सगळ्या देवळाच्या बाजूला बसल्या होत्या.

तेव्हड्यात रस्त्याकडून टाळांचा आवाज आला आणि सगळ्यांच्या माना आवाजकडे वळल्या. अर्ध्या मिनीटातच दिंडी देवळासमोर येउन थांबली. दिंडीपुढे एक गृहस्थ वीणा घेउन होते. त्यांच्यामागे दोघांच्या खांद्यावर पालखी आणि पंधरा-वीस जण पालखीच्या प्रत्येक अंगास एका रेषेत एका पायावरुन दुसर्‍या पायावर भार देत, भजन म्हणता म्हणता नाचत होते. सगळ्यांच्या एकत्र आवाजामुळे भजन एकदम खणखणीत ऐकु येत होते. मग देवळाशी आल्यावर सगळ्यांनी आधी उभं राहून भजन संपवलं आणि पालखी आत ठेवून धोतर नेसलेले हे सगळे त्यांचा एक मोठा गोल करुन बसले.

काकूनं टिफिनचा चार खणांचा मोठा डबा दिला होता. खालचे दोन खण बाजूला ठेवून काकांनी वरचे दोन खण उघडले. खालचे दोन खण रात्रीच्या जेवणाचे होते. एका खणात पोळ्या आणि दुसर्‍यात बटाटाच्या काचर्‍यांची परतलेली भाजी होती. आमच्या शाळेची सहल असली की आईपण मला असलीच भाजी द्यायची कारण ह्या भाजीत रस नसतो आणि त्यामुळे सांडत नाही. एकदा तर मला आज्जीनं रताळ्याच्या आणि साध्या अश्या दोन्ही पोळ्या दिल्या होत्या सहलीला. पण बाकी सगळ्यांनी साध्याच पोळ्या आणल्या असल्याने आणि मग सगळ्यांना द्यायला लागल्या असत्या म्हणुन मी फक्त साध्याच पोळ्या बाहेर काढल्या, आणि रताळ्याच्या पोळ्या रात्री घरी आल्यावर खाल्ल्या. आईच्या काचर्‍यांच्या भाजीपेक्षा मला काकूनं केलेली काचर्‍यांची भाजी आवडायची. आणि पुरणपोळ्यापण. आज्जी शंकरपाळ्या चांगल्या करायची. आणि आई गुलाबजाम. काकूनं दिलेल्या भाजीत बाजूला लाल तिखट मिसळलं गेल्यामुळ लालसर दिसणार तेल पसरलेलं होतं. बटाट्याच्या काचर्‍यांवर पण तेल आणि तिखटाचे बारीक बारीक कण चिकटलेले होते. मला अश्या खरपूर तिखट चिकटलेल्या काचर्‍या आवडायच्या. आई तिखट घालायची नाही जास्त. काकांनी डब्याच्या एका झाकणात भाजी काढली आणि दुसर्‍या झाकणात थोड्या पोळ्या काढल्या. माझ्या हातात दोन्ही झाकणं देउन म्हणाले, 'जा. आत्याला देउन ये.'

आत्या बायकांच्या घोळक्यात मध्ये बसलेली होती. मी दोन्ही हातात एक एक झाकण पकडून तिच्याकडे गेलो तेव्हा ती एका हातानं पाय दाबत होती आणि दुसर्‍या हातानं हातवारे करत मोठमोठ्यानं बोलत होती. बहुतेक कुणीतरी तिला 'काय, पाय दुखायला लागलेत काय' असं विचारलेलं दिसत होतं. 'छे छे छे!' आत्या सुरु होती. 'मी रोज ऑफिसला चालतच जाते. मला चालायची सवय आहे चांगली. घरी असले की धाकटीला शाळेत पोचवायला, आणायला चालतच जायचे मी. आजच्यासारख्या गाड्या नव्हत्या काही तेव्हा आमच्याकडं. आजकाल काय, पदर खोचला, गाडीला लाथ मारली की भुर्र! म्हणजे चालवाव्यात गाड्या बायकांनी. पण बरोबरीनं थोडा व्यायाम पण पाहिजेच. पुर्वीच्या काळी बायका धुणी-भांडी-केरफडकं घरातच करायच्या, नाही का. पण त्या सगळ्या कामामुंळे संपूर्ण शरीराला व्यायाम होतो. आता धुण्याला मशिन, झाडायला मशिन आणि भांड्याला बाई. आता माझ्याकडे पण आहे धुण्याचं मशिन आणि भांडी-केरफरशीला बाई. पण एखाद दिवशी बाई आली नाही - आणि ह्या बायकांचा काही भरोसा नाही हो. कधिही दांडी मारतात. आणि घरात कुणी आलेलं असलं किंवा ऑफिसमध्ये गडबड असली की नेमकी ह्यांची दांडी. तर बाई नाही आली तरी सगळं आटोपून, मुलांचा, ह्यांचा आणि माझा डबा बनवून मग मी ऑफिसला जाते. ह्याचं रहस्य काय, तर आम्ही लहानपणापासूनच घरातली कामं अभ्यासाच्या बरोबरीनं केली. अहो शाळेत असताना मी आमच्या वडिलांच्या बरोबर वारीला पण गेलेले आहे. तेव्हातर आम्ही स्वतःचं सामान, शिधा पाठीवरुन वाहून न्यायचो. आताच्या सारखा ट्रक नसायचा काही तेव्हा. आणि मुक्कामाला पोचलं की लगेच तीन दगडांची चूल मांडून स्वैपाक. आता ट्रक आणि आचारी वगैरे आहेत ते चांगलच आहे म्हणा. पण तेव्हा आताच्या इतकी माणसं नसायची. जेमतेम वीस-बावीस. मी आमच्या धाकटीला म्हटलं चल वारीला ह्या वेळी म्हणुन. पण तिचं दिवाळीच्या सुट्टीतलं बालनाटकांचं शिबीर बुडलं असतं मग. फार चांगलं घेतात हं त्यांच्या शाळेत. मागल्या उन्हाळ्याच्या सुट्टीत त्यांच्यात शाळेनं व्यक्तिमत्व विकास शिबीर पण घेतलं होतं, बरोबरीनं पोहायचे वर्ग पण..'
'आत्या जेवण', आत्याला मध्येच तोडत मी दोन्ही झाकणं तिच्या हातात दिली. 'होय होय. चला सुरु करुया' म्हणत आता जेवण सुरु नाही केलं तर आत्या सुरु होइल ह्या भितीनं बाकी बायकांनी पण पटापट डबे उघडले. ह्या सगळ्या आमच्या मिरजेतल्या बायका होत्या. त्यांच्यापैकी कुणाकडेही धुण्याचं मशिन नव्हतं आणि भांड्याला बाई नव्हती.

मी काकांना आत्याची गंमत सांगुया म्हणुन पटकन परतलो तर त्या घोळक्यात एक गोरागोमटा, उंच, कुरळसर केसांचा कॉलेजात जाणार्‍या पोरांसारखा एक मुलगा येउन बसलेला दिसत होता. त्याच्याशेजारी एक भारीतली सॅक होती आणि त्याचे शूजपण भारीतले स्पोर्ट शूज होते. आमच्या वर्गात फक्त शिर्क्या कुलकर्ण्याकडे तसले गब्बू स्पोर्ट शूज होते. शिर्क्याच्या बाबांचं हॉस्पिटल होतं. 'मी खूप ट्रेक केलेत हो. नुसतं इथं सह्याद्रीतच नाही तर हिमालयात सुद्धा. रोजचं तीस-बत्तीस किलोमीटर म्हणजे फार नाही मला. हिमालयात रोज वरुन पाउस कोसळतो आणि बर्फावरुन येणारे थंडगार वारे. त्यात परत प्रचंड चढ-उतार. असं असताना आम्ही तीस-तीस चाळीस-चाळीस किलोमीटर चालतो. इथे सपाट रस्त्यावर काय.' त्याचे सुरु होते. बापूंनी काकांना हळूच चिमटा काढलेला आणि दोघांनी एकमेकांकडे पाहून हळूच टाळी दिलेली मी बघितली. ह्या नवीन आलेल्याचा बकरा होणार होता.

'घ्या. जेवायला सुरु करुया' असं काकांनी म्हटल्यावर सगळ्यांनी एकमेकांना आपापल्या डब्यातून आणलेल्या बटाट्याच्या भाज्या दिल्या आणि जेवायला सुरुवात केली. चटण्या-लोणची डब्यांच्या झाकणात एकत्र करुन मध्ये ठेवली. एखाद-दुसर्‍यांनी दही भात पण आणलेला दिसत होता. सगळ्यांच्या भाज्या एकत्र झाल्याने हातातल्या भाजीचा रंग वेगळाच झाला होता. दोन्ही झाकणं आत्याला दिल्याने मी आणि काकांनी हातातच पोळी धरुन त्यावर भाजी घेतली होती. मला असं हातात पोळी घेउन आणि मध्ये भाजी ठेवून खायला आवडायचं. पण मग आज्जीची कॅसेट सुरु व्हायची म्हणुन मी घरात कधी असं जेवत नसे.

'हा सुधीर. कुलकर्णी डॉक्टरांच्या दवाखान्याच्या शेजारी दातार वाड्यात ते भाउंचे आपटे म्हणुन एक मित्र राहतात बघ. त्यांचा नातू हा. मुलीचा मुलगा. पुण्याला असतो. इंजिनीअरींगला आहे. वारीला आलाय ह्यावर्षी पुण्याहून. पण ट्रेकिंग-बिकींग पण जोरदार करतो. सांगत होता ना आत्ता.' मी काकांच्या बोलण्यावर नुसतंच हुं केलं. सुधीरनं पण माझ्याकडं बघितलं नाही. त्याच्या डिंग्या ऐकून तो मला मुळीच आवडला नव्हता. खरंतर मी एव्हडा लहान असून वारीला निघालो होतो हे बघून त्यानं माझ्याशी बोलायला पाहिजे होतं. परत मी फक्त स्लीपर घालून निघालो होतो. ह्याच्याकडं स्पोर्ट शूज आणि पाठीवर घ्यायची सॅक पण होती. मी मागच्या वर्षीपासून आईला सॅक घे म्हणुन मागे लागलो होतो. माझ्याकडे दोन बकलांचं चौकोनी दप्तर होतं. पण आठवीत गेल्यावर सगळी मुलं चेनवाली सॅक घेतात म्हणुन मला पण सॅक हवी होती. पण माझं दप्तर अजून चांगलं होतं, फाटल्यावर सॅक घेउ असं सांगून आईने सॅक घेतली नव्हती.
'हा सुधीर मधनंच जायला पाहिजे त्या हिरव्या मेटॅडोर मधून. मज्जा येईल.'

जेवण झाल्यावर काकांनी मला आत्याकडून झाकणं घेउन यायला सांगितली. मी आत्याकडून दोन्ही झाकणं घेउन ओढ्याशी नेउन विसळली आणि काकांना आणून दिली. तोवर काकांनी डबे विसळून ठेवले होते. झाकण लावून आणि टिफीन बॉक्समध्ये एकावर एक ठेवून, दोन्ही बाजूच्या पट्ट्या वरती अडकवून काकांनी डबा पिशवीत टाकला. पिशवी ट्रकमधल्या मागं उभ्या असलेल्या माणसाच्या हातात दिली. वारीच्या समितीतल्या एकांकडे काकांनी माझे पैसे भरले. आणि मग कमरेला मफलर गुंडाळून लांब लांब ढांगा टाकत ते निघाले. त्यांच्या मागोमाग बापू, धनंजय, मी आणि सुधीर निघालो. आत्या बाकी बायकांबरोबर निघेन असं म्हणाली होती - त्यांना आज तिच्या नोकरीबद्दल, दोन्ही मुलांबद्दल, त्यांच्या शाळांबद्दल, शाळेतल्या प्रगतीबद्दल आणि इतर अनेक गोष्टींबद्दल बिनकामाची भरपूर माहिती मिळणार होती. बरेचसे थोडे उशीरा आलेले लोक पाराखाली, देवळाच्या मंडपात, डोक्याखाली पिशव्या-चपला घेउन पहुडले होते. आमच्या बरोबर जेवायला बसलेले सगळेजण मात्र आधीच पुढे गेले होते.

परत रस्त्याच्या दोन्ही बाजूनी आता वडाची मोठी झाडं होती त्यामुळं उन लागत नव्हतं. रस्ताही बर्‍यापैकी थंड होता. मी स्लीपर पायातून काढून हातात अडकवल्या आणि अनवाणी चालायला सुरुवात केली. उजव्या पायाच्या अंगठ्याच्या जरा मागं चवड्यावर खाली मउ मउ झालं होतं आणि हात लावल्यावर आत पाणी झाल्यासारखं वाटत होतं. जर त्याच्यावर जोर पडला तर बारीक कळ उठत होती. म्हणुन मी त्या चवड्यावर जोर न येउ देता चालायला सुरुवात केली. त्यामुळे पाउल थोडं तिरकं पडायला लागलं. दंडोबाची रांग मागे पडली.

पहिले थोडे अंतर आम्ही चौघेही एकत्रच चालत होतो. निघतानाच काका म्हणाले होते की रात्रीच्या मुक्कामाचं ठिकाण, लांडगेवाडी, शिरढोणपासून पुढे दोन-अडीच किलोमीटर आहे. तेव्हा जर का मी मागे राहिलो तर ते शिरढोणला माझी वाट बघत थांबणार होते. हळुहळु करत काका त्यांच्या वेगाने बरेच पुढे जात दिसेनासे झाले. बापू त्यांच्याबरोबर राहण्याच्या प्रयत्नात दोन-पाच पावलं चालत, मग दोन पावलं पळत पुढे जात राहिले. मी धनंजय आणि सुधीर बरोबर चालत होतो. पण आता सुधीर बरोबर असल्याने धनंजय त्याच्याशीच गप्पा मारत होता. सुधीर त्याच्या भारी बुटांबद्दल काय काय फेकत बसला होता. ते म्हणे खास ट्रेकिंगचे बूट होते. त्याला आतून मउ कापड होतं ज्यामुळे ब्लिस्टर येत नाहीत. मला ब्लिस्टर म्हणजे काय ते माहिती नव्हतं म्हणुन मी काय म्हणुन विचारलं तर काय गावंढळ पोरगा आहे असं सुधीरने माझ्याकडे बघितली व काही न बोलता परत कॅसेट सुरु केली. पण धनंजयने त्याला मध्येच तोडत 'खूप चालल्यामुळे तळपायाला किंवा पायाच्या बोटांमध्ये किंवा चप्पल-बूट घासतात तिथे मोठे मोठे फोड येतात आणि त्यात पाणी होतं. तिथली कातडी पांढुरकी होते आणि त्याच्यावर पाय टेकला किंवा चप्पल-बूट घासले की प्रचंड दुखतं' असं ब्लिस्टर म्हणजे काय ते नीट सांगितले. मी लगेच त्यांना माझा पाय उचलून मला पण एक ब्लिस्टर आलाय असं दाखवलं. 'छ्या! हा गरीब आहे एकदम. हिमालयातल्या ट्रेकमध्ये माझ्या पायाला लहान बटाट्याएव्हडे मोठे मोठे ब्लिस्टर आले होते. तरी मी ट्रेक पूर्ण केला.' वाकड्या तोंड्याचा सुधीर पचकला. वर पावशेर ठेवत म्हणाला, 'तुझं मात्र अवघड आहे बाबा. पहिल्याच दिवशी ब्लिस्टर आलाय तुला. तू खरा आज रात्रीच परत जा. अवघड आहे वारी पूर्ण व्हायची तुझ्या हातनं'
मी एकदम सटकलो आणि रागाने त्याच्याकडे बघायला लागलो. पण धनंजय माझ्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला 'कुछ नही होता छोटे. करशील तू पूर्ण. आपण दोघं एकदम देवळात जाणार बघ.'

सुधीर आणि धनंजय मध्ये एकदा चहा प्यायला म्हणुन थांबले ते मागेच राहिले होते. माझ्याकडे पैसे नव्हते आणि परत धनंजयच्याकडून चहा प्यायला नको म्हणुन मी थांबलो नाही. तासा दोन तासात एकदाच मी शिरढोणला पोचलो. शिरढोण रस्त्यावरचं तसं छोटसं गाव होतं. कळंबीपेक्षा जरास मोठं असेल फक्त. पूर्वी आमच्याकडं एक शिरढोणचा दूधवाला येउन रोज दूध घेउन जात असे. त्याच्याकडं त्याच्या स्वतःच्या दोन कळश्या असत. त्यात आमच्याकडची एखाद-अर्धी कळशी घेउन तो मग डेअरीला विकायला जायचा. त्यामुळे मला शिरढोण ऐकून माहिती होतं. गाव सुरु झाल्याझाल्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला चहा-नाष्ट्याची पत्राचं छप्पर घातलेली हॉटेलं होती. बर्‍याच वडापच्या ट्रॅक्स गाड्या, वाळूचे ट्रक रस्त्याच्या खाली हॉटेलांसमोर लागलेले होते. माझ्या पुढे-मागे दोन-चार दोन-चार वारीतली लोकं होती. पुढचे तीघे जण गावात मध्यात आल्यावर एकदम उजवीकडे वळून एका ट्रकच्या मागे गेले. त्यांच्यापुढचे पण तिकडेच गेले होते. म्हणुन मी पण त्यांच्यामागोमाग वळलो तर आत एका दगडी-कौलारु एक खणी घरासमोर मिरज मार्केटमध्ये किराण्याचं दुकान असलेले जाधव उभे होते. मला बघून ते म्हणाले, 'काय रे, तू पण काय ह्या वर्षी? छान! जा आत जा. काका बसलाय बघ तुझा आत.'
आत मोठा सोपा आणि दोन पायर्‍या ओलांडून वर पडवी होती. जुन्या वाड्यासारखे मध्ये चौकोनी खांब होते. वरती पडवीत एका कोपर्‍यात एक मोठ्या कढईत दूध उकळत ठेवलेलं होतं. एकजण लांब पळीनं ते ढवळत होता. जाधव दरवर्षी वारकर्‍यांना शिरढोणला दूध द्यायचे. काका पाय उंच उभे भिंतीला लावून जमिनीवर पाठीवर पडले होते. मला आलेलं बघताच काका पाय खाली घेउन मांडी घालून बसले. 'तू पण पड असा पाय वर भिंतीला लावून. म्हणजे चालून चालून सतत पायाकडं होणारा रक्तप्रवाह थोडा कमी होतो.'
'नको. मी ठिक आहे.'
'काका सांगतोय तसा पड की भोसडीच्या. पाय सुजणार नाही म्हणजे'. काकांच्या शेजारी पाय वर करुन पडलेला माणुस ख्याख्याख्या हसत पाय खाली घेउन मांडी घालत मला म्हणाला. काकांनी त्याला टाळी दिली आणि मला म्हणाले हा विनोबा भावे. आणि मग माझ्याकडे बोट दाखवत म्हणाले, पुतण्या आमचा. पहिल्यांदाच येतोय ह्या वर्षी. तोपर्यंत एका मुलाने आमच्यासाठी तीन ग्लास दूध आणलं. लोकं येतील तसे थोडावेळ बसून मग दूध घेउन निघत होते. आम्ही तिघांनी दूध संपवलं आणि एकत्रच बाहेर पडलो. विनोबाने नेहरु सदरा, धोतर नेसलं होतं आणि गळ्यात एक कापडी पिशवी तिरकी अडकवलेली होती. धोतर, सदरा आणि पिशवी ह्या तिन्हींचा मूळ पांढरा रंग जाउन पिवळसर विटका रंग उरलेला होता. त्यांची छातीपर्यंत रुळणारी दाढी तेव्हडी पांढरीशुभ्र होती. दाढीबरोबर जाड भिंगाचा चष्मा आणि पुढे आलेले दात ह्याच्यामुळे एकदम बघितल्यावर ते जरा वयस्कर वाटत होते. पण काकांपेक्षा लहानच असावेत कारण काका कधी मोठ्या माणसांना अरे-तुरे म्हणत नसत.

डाव्या हाताला सूर्य आडवा कलायला लागला होता. दोन्ही बाजूला माळरान होतं आणि रस्त्याकडेला फारशी झाडं पण नव्हती. थोडं पुढे एक चढ दिसत होता तिकडं बोट दाखवत काका म्हणाले 'हा चढ संपला की लांडगेवाडी'. आणि तेव्हड्यात आमच्या बाजूने वारीची हिरवी मेटॅडोर पुढे निघून गेली. माझं ओझरतं लक्ष गेलं तर आत आत्या बसली होती. मी काकांना दाखवावं तो गाडी पुढं गेली. पण काका मोठ्याने हसायला लागले आणि मला जोरात टाळी देत म्हणाले 'चल पटपट. बहिणाबाईंची वारी का आटोपली ते ऐकुया. तरी तिला सांगत होतो की नुसतं ऑफिसला चालत येउन-जाउन सराव होत नाही. चल ऐकुया आता कहाणी'. आणि भराभरा पावलं उचलत चढ ओलांडून आम्ही लांडगेवाडीला पोचलो. चढाच्या टोकावरच उजव्या हाताला ग्रामपंचायतीची चार खोल्यांची शाळा रस्त्याला आडवी बांधलेली होती आणि शाळेची इमारत आणि रस्ता ह्याच्या मधल्या चौकोनी पटांगणात मेटॅडोर उभी होती. तीस एक लोक मुक्कामाला पोचलेले होते. पश्चिमेचं आकाश तांबडा पट्टा फिरवल्यासारखं रंगलं होतं.

गुलमोहर: 

सुरेख लिहिलं आहे टण्या. आवडलं... पुढचे भाग पटापट टाक रे... Happy

आधी धन्यवाद, बाड बासनातून बाहेर काढल्याबद्दल!

पण मला ना तपशीलात जरा गुंगायला झालय - सॅक, धुण्याचं मशीन, स्पोर्ट्स शूज आणि विनोबा सगळे एका काळात?

कदाचित पुढच्या भागात संदर्भ स्पष्ट होतील, लिही बघू पटपट!

अग विनोबा भावे नावची दुसरी व्यक्ती असु शकते ना... म्हणजे मी तरी असाच समज करुन घेतलाय. Happy

हे सगळ खुप मस्त आहे. मी १ ते ६ भाग अत्ताच वाचुन काढले. इतके दिवस का वाचलं नव्ह्तं कोणास ठाउक? दांडोबाची गोष्टपण वाचली परत. ती आधि वाचल्याचं आठवत होतं , पण नक्की कुठे ते आठवत नव्हतं. लिन्क दिली ते बरं केलतं. तुमचं भाउंशी असंलेलं नातं खुप भावलं. त्या घराबद्दल जे लिहिलय ते हि खुप सुरेख. स्पेशली त्या घराच्या प्रत्येक गोष्टीच्या वासाबद्दल. मला स्वत:ला असंच वाट्तं. माझ्या अशा प्रत्येक आठवणींचा एक वेगळा वास असतो. आपल्यासारंखच अजुन कोणीतरी आहे हे बघुन छान वाटलं.
पुढचे वाचायला आवडेल.
धनु.

मस्त लिहीलयत...
दोन बकलांचं चौकोनी दप्तर, बटाट्याची भाजी, सॅक, स्लीपर....वा! शाळेच्या दिवसांची आठवण झाली.

बर्‍याच वडापच्या ट्रॅक्स गाड्या > > हे वडाप काय आहे?

वडाप म्हणजे ज्याला रायगडात टमटम म्हणतात ते!! प्रवाशाची अवैध वाहतूक. जीप, ट्रॅक्स मधून वगैरे.

टण्या, पुढचा भाग २०१० मधे लिहिशील का रे???
--------------
नंदिनी
--------------

मस्त लिहिलयं.
हे सगळे भाग एका फ्लो मधे वाचायला हवेत Happy
पुढचे भाग पण लवकर येऊ देत Happy

टण्या तू एकदम सही लिहीतोस पण फार गॅप घेतोस बाबा, हे काही चालायच नाही. यावेळी ठरवले होते की वारीचा हा भाग वाचायचा नाही तू पुढचा भाग टाकल्याशिवाय पण रहावल नाही आणि शेवटी आज वाचलाच. एकदम सही जम्या है ये भाग भी. मला तू खरच आठवीत असल्यासारखा वाटायला लागलास. यावेळी तरी पुढचा भाग लवकर टाक.

>>वडाप म्हणजे ज्याला रायगडात टमटम म्हणतात ते!! प्रवाशाची अवैध वाहतूक. जीप, ट्रॅक्स मधून वगैरे.

नंदिनी,
माझ्या माहितीप्रमाणे हे सांगली-कोल्हपूरकडचे 'वडाप' म्हणजे वाहन शेअर करणे. स्टेशनला जाणारे ३ वेगवेगळे लोक मिळून एक रिक्षा करतात. त्याचे माणशी भाडे ठरलेले असते जे एकट्याने जाण्यापेक्षा निश्चित कमी असते. हे अवैध असेलही पण मूळ कल्पना ही.

टण्या, मस्त जमते आहे. पुढचे येऊदे लवकर.

मस्तच टण्या. पाचवा भाग वाचून एक कोळ लोटला म्हणून ह्या भागात लिंक जरा उशीराच लागली पण तरी मजा आली. तुझ्याबरोबर चालतोय असंच वाटत होतं.
आत्याबाई सहीच. हे वाचणार आहे का ती?

सर्वांना धन्यवाद! खूप काळाने लिहिल्यामुळे सलगता फारशी नष्ट झालेली नाही हे वाचून बरे वाटले. पुढचे भाग पटापट लिहिन.

वडाप म्हणजे ट्रॅक्स, जीप, सहा आसनी रिक्शा वगैरेतून केलेली अवैध वाहतूक. माझ्या अंदाजानुसार अश्या वाहनातून क्षमतेपेक्षा (खूपच) जास्ती लोक बसवून वाहतूक केली जाते. तेव्हा कितीही लोक बसवून वडणारी (ओढणारी) ती वडाप! 'वड तू' ह्या शब्दप्रयोगातून निर्माण झालेला शब्द.

>>>
आत्याबाई सहीच. हे वाचणार आहे का ती?
>>>
ही आत्याबाई म्हणजे माझी खरी आत्याच असेल असे का वाटले तुला? Happy

व्वा! नेहमीप्रमाणेच मस्त! आम्हीही वारी करतोय असं वाटतंय वाचताना Happy
पुढचे भाग लवकर लवकर येऊदे ..

मस्तच. मजा आली वचताना. कुठेही सलगता तुटली असे वाटले नाही. मूळात आधीचा भागही चक्क लक्षात होता माझ्या. Happy पुढचा भाग वाचायची खूप उत्सुक्ता आहे.

>>त्यांच्याकडे कुणाकडेच धुण्याचं मशिन आणि भांड्याला बाई नव्हती>><<
आत्या बाई टिपीकल. एकाच वाक्यात तिचे character रंगवणे मस्तच. Happy

मस्त आहे , चालु दे .....
वारीत चालल्यासारखं वाटतयं...
घरी गेलं की पाय गरम पाण्याने शेकावे लागतील, खुप दुखताहेत. Happy

टण्या,
वारीतल्या दुपारच्या जेवणाबद्दल लिहिताना बहुतेक तुला खुप भुक लागली होती असं वाटतंय. बटाट्याच्या भाजीचं वर्णनच तसं केले आहेस.

खूपच छान. लगे रहो.....पुढचा भाग लवकर टाक.

Pages