मासिक भविश्य जानेवारी २०१५

Submitted by पशुपति on 1 January, 2015 - 08:36


HAPPY NEW YEAR
राशिभविष्य
जानेवारी २०१५
(के.पी.पद्धतीप्रमाणे)

(टीप : सर्व भविष्य चंद्र राशीप्रमाणे दिली आहेत, पण ज्यांना लग्न रास माहीत आहे त्यांनी जन्म रास व लग्न रास अशी दोन्ही भविष्य वाचावीत.
समजा...चंद्र राशी मिथुन आहे आणि लग्न राशी मीन आहे, तर अशांनी मिथुन आणि मीन अशी दोन्ही राशींची भविष्ये पहावीत आणि समन्वय साधावा. )

मेष : मेष राशीचा स्वामी मंगळ दशमात असल्यामुळे काही बाबतीत चांगल्या घटना घडू शकतील. पण त्या जोडीला शनि अष्टमात असल्याने बरीच सावधगिरी बाळगावी लागेल, बराच मानसिक ताण देखील वाढण्याची शक्यता आहे. त्यातल्या त्यात एक चांगली गोष्ट म्हणजे शनि-मंगळ अन्योन्य योग करत आहे. त्यामुळे दशम भावातील फळे चांगली मिळण्याची शक्यता आहे. द्वितीयेश शुक्र दशमात व रवि नवमात त्यामुळे धार्मिक कार्यात बराच खर्च होण्याची शक्यता आहे. काही गोष्टींमध्ये तुमचा सामाजिक दर्जा देखील उंचावण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना हा काळ अतिशय उत्तम आहे. त्यांनी केलेल्या अभ्यासाचे संपूर्ण यश त्यांना मिळणार, तसेच अनेक लोकांच्या बाबत त्यांच्या घरासंबंधी चांगल्या घटना घडतील. मुलाबाळांच्या अभ्यास अगर प्रगतीबाबत काळजीचे कारण नाही, प्रगती समाधानकारक राहील. प्रकृतीसंबंधी किरकोळ तक्रारी सोडता काळजीचे कारण राहणार नाही. कौटुंबिक वातावरण उत्तम राहील. दशम स्थानात तीन ग्रह असल्याने ज्यांच्या जन्मकुंडलीत शुक्र महादशा असेल त्यांना नोकरी अगर व्यवसाय दृष्ट्या हा काळ उत्तम राहील. एकंदरीत हा महिना मेष राशीला चांगला आहे.

वृषभ : वृषभ राशीचा स्वामी शुक्र नवम भावात आहे आणि रवि अष्टमात आहे. त्यामुळे प्रवासात अडथळे येण्याची शक्यता आहे. महिन्याच्या पहिल्या आठवड्यात चंद्र द्वितीय स्थानी, राहू पंचम स्थानी आणि बुध नवम स्थानी आहे. ही ग्रहस्थिती आर्थिक बाबतीत म्हणावी तेवढी अनुकूल नाही, त्यामुळे कोणतेही व्यवहार सावधानतेने करणे इष्ट आहे. गुरु तृतीय स्थानी उच्चीचा व बुध नवम स्थानी असल्याने धर्मप्रचारकांना हा काळ अतिशय उत्तम आहे. ह्या बरोबरच ज्यांचा पुस्तकासंबंधी व्यवसाय असेल त्यांनाही हा काळ उत्तम आहे. चतुर्थाचा स्वामी रवि अष्टमात असल्याने वाहने चालवताना काळजी बाळगावी. मुलाबाळांची प्रगती समाधानकारक राहील. प्रकृतीसंबंधी काळजी करण्याचे फारसे कारण नाही. नोकरी-व्यवसायाच्या संदर्भात थोडे नमते घेणे उत्तम आहे. एकंदरीत हा महिना संमिश्र असून आर्थिक बाबतीत सावधगिरी बाळगावी असा ग्रहांचा संदेश आहे.
मिथुन : मिथुन राशीचा स्वामी बुध सप्तमात असून रवि षष्ठात आहे. त्यामुळे प्रतिस्पर्ध्यांवर तुमचा वरचष्मा राहील. द्वितीयेश चंद्र महिन्याच्या पहिल्या आठवड्यात तुमच्याच राशीत असल्याने खर्चाची बाजू जास्त राहील. राहू चतुर्थात व बुध अष्टमात असल्यामुळे वाहने जपून चालवणे आवश्यक आहे. तसेच वर लिहिल्याप्रमाणे खर्च कदाचित घरासंबंधी होईल असे दिसते. पंचमेश शुक्र अष्टमात व रवि सप्तमात त्यामुळे शेअर्स किंवा तत्सम व्यवहार करताना काळजी घ्यावी, नुकसान संभवते. तरीही विचारपूर्वक व्यवहार करण्याचे निर्णय घ्यावेत. षष्ठात शनि व अष्टमात बुध त्यामुळे शरीर प्रकृतीच्या दृष्टीने काळजी बाळगणे आवश्यक आहे, विशेषत: जुन्या व्याधी बळावण्याची शक्यता आहे. सप्तमातील रवि घरगुती वातावरण ठीक ठेवेल. अष्टमात तीन ग्रह असल्याने मानसिक ताणतणाव जास्त राहण्याची शक्यता आहे. दशमेश गुरु द्वितीयात असून बुध अष्टमात आहे, त्यामुळे नोकरी संबंधी थोडीफार चिंता राहील. एकंदरीत हा महिना संमिश्र राहील असे दिसते.
कर्क : कर्क राशीचा स्वामी चंद्र पहिल्या आठवड्यात बाराव्या स्थानी आहे व राहू तृतीयात आहे, त्यामुळे घरामध्ये कोणाचीतरी देखभाल करावी लागेल असे दिसते. द्वितीयेश रवि षष्ठात आणि शुक्र सप्तमात त्यामुळे आर्थिक बाजू सर्वसाधारणपणे ठीक राहील असे दिसते. तृतीय स्थानातील राहू कन्येचा आणि बुध सप्तमात त्यामुळे एखादा छोटामोठा प्रवास देखील संभवतो. गुरु प्रथमात, शनि पंचमात आणि नवमेश गुरु हे योग ह्या महिन्यात धार्मिक विचारांचा मनावर जास्त परिणाम करतील असे दिसते. ही तीन ही स्थाने कार्यान्वित असल्याने धार्मिक स्थळांना भेटी दिल्यास मन:शांती जास्त लाभेल. सप्तमातील तीन ग्रह कौटुंबिक वातावरणात अधूनमधून वादळाचे प्रसंग आणतील. नोकरी अगर व्यवसायात अधूनमधून चढउताराला तोंड द्यावे लागेल. वरिष्ठांशी सलोखा ठेवल्यास कार्यभाग साधेल. एकुणात हा महिना संमिश्र राहील असे दिसते.
सिंह : सिंह राशीचा स्वामी रवि पंचमात व शुक्र षष्ठात, त्यामुळे षष्ठात अनेक ग्रह जरी असले तरी प्रकृतीबाबत किरकोळ त्रास वगळता फारशी चिंता करण्याचे कारण नाही. द्वितीय स्थानातील राहू आर्थिक बाजू व्यवस्थित ठेवेल असे दिसते. चतुर्थातील शनि आणि षष्ठातील बुध घरातील वातावरण खेळीमेळीचे ठेवतील. पंचमातील रवि मुलाबाळांची प्रगती समाधानकारक ठेवेल. कौटुंबिक वातावरणात क्वचित खटके उडण्याची शक्यता आहे. अष्टमेश गुरु बाराव्या स्थानी व बुध षष्ठात त्यामुळे प्रवास करताना अगर वाहन चालवताना काळजी बाळगावी. नोकरी अगर व्यवसाय सर्वसाधारणपणे विनातक्रार चालतील. काही लोकांना महिन्याच्या पहिल्या आठवड्यात अचानक धनलाभ होण्याची पण शक्यता आहे. एकंदरीत हा महिना काही बाबतीत संमिश्र तर काही बाबतीत चांगला राहील.
कन्या : कन्या राशीचा स्वामी बुध पंचम भावात असल्याने शरीर प्रकृतीबाबत फारशी काळजी राहणार नाही, तरीपण चंद्राच्या राशीतील बदलामुळे प्रकृतीत काही किरकोळ चढ उतार होऊ शकतील. काही व्यक्तींना जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात शेअर किंवा तत्सम व्यवहारात फायदा होऊ शकतो. काही लोकांच्या बाबतीत चंद्र ज्यावेळी बारावा येईल, अंदाजे जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात, त्यावेळी आर्थिक व्यवहार किंवा कोणतेही ठराव इ. सावधानतेने करावेत. प्रथम, पंचम व नवम ह्या तिन्ही भावांचा एकमेकांशी संबंध असल्याने आर्थिक बाबींपेक्षा धार्मिक बाबतीत लक्ष घातल्यास जास्त मन:शांती मिळेल. विद्यार्थी व मुलाबाळांची प्रगती समाधानकारक राहील. कौटुंबिक वातावरण देखील उत्तम राहील. नोकरी अगर व्यवसाय सर्वसाधारणपणे ठीक राहतील. गुरु लाभत असल्याने आर्थिक आवक समाधानकारक राहील. एकंदरीत हा महिना संमिश्र आहे असे दिसते.
तूळ : तूळ राशीचा स्वामी शुक्र चतुर्थात व रवि तृतीयात, त्यामुळे काही लोकांना छोटेमोठे प्रवास किंवा घर बदलण्याचे योग आहेत. शनि द्वितीयात आणि बुध चतुर्थात त्याअर्थी घरासंबंधी खर्च होण्याची शक्यता आहे. पंचमेश शनि द्वितीय स्थानात असल्याने शेअर अगर लॉटरीपासून लांब राहिलेले बरे. मुलाबाळांची प्रगती एकंदरीत समाधानकारक राहील. षष्ठेश गुरु दशमात व बुध चतुर्थात त्यामुळे प्रकृतीची फारशी काळजी करण्याची जरूर नाही. केतू षष्ठात असल्याने मात्र थोडेफार त्रास उद्भवू शकतील. कौटुंबिक वातावरण उत्तम राहील. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात चंद्र नवम स्थानी असल्याने प्रवासाची निश्चितपणे हमी देत आहे. दशमातील गुरु अनेक लोकांच्याबाबतीत प्रमोशन्ससाठी कारणीभूत ठरेल. लाभेश रवि तृतीय स्थानी व शुक्र चतुर्थ स्थानी असल्याने लेखक, बुकसेलर्स आणि शिक्षक ह्यांच्यासाठी हा काळ उत्तम आहे. एकंदरीत हा महिना सर्व बाजूंनी उत्तम आहे.
वृश्चिक : वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ तृतीयात असल्याने छोटामोठा प्रवास, विशेषत: तुमच्या जवळच्या नातेवाईकांकडे, होईल असे दिसते. द्वितीयात रवि, तृतीयात शुक्र व लाभात राहू ह्यामुळे ज्यांचा व्यवसाय मेडिकल रिप्रेझेंटेटिवज्, पुस्तक विक्रेते, लेखक इ. मंडळींना हा काळ अतिशय चांगला आहे. तसेच ज्या होतकरू तरुणांनी इंटरव्ह्यू दिलेले आहेत अश्यांना नोकरी मिळण्याचे खूप चांगले योग आहेत. मुलाबाळांची प्रगती समाधानकारक राहील. शेअर्स वगैरे बाबतीत हा काळ विक्रीपेक्षा खरेदीसाठी जास्त अनुकूल आहे. शरीर प्रकृतीबाबत फारसे काळजी करण्याचे कारण नाही. कौटुंबिक वातावरण देखील खेळीमेळीचे राहील. दशमेश रवि द्वितीय स्थानी, शुक्र तृतीय स्थानी व राहू लाभ स्थानी हा योग नोकरीच्या दृष्टीने चांगला आहे, वरिष्ठांकडून तुमच्या कामाची दखल घेतली जाईल आणि त्यासंबंधी काही आर्थिक लाभ देखील मिळतील. एकंदरीत हा महिना सर्व दृष्टीने खूप चांगला आहे.
धनु : धनु राशीचा स्वामी गुरु अष्टमात असून बुध द्वितीयात आहे त्यामुळे काही आर्थिक लाभ व त्याचबरोबर बराच खर्च हे दोन्ही एकाच वेळी संभवते. प्रथम भावात रवि, द्वितीयात शुक व दशमात राहू ही ग्रहस्थिती नोकरीच्या दृष्टीने अतिशय चांगले योग दर्शवते. द्वितीयातील तीन ग्रह निश्चितपणे काहीतरी आर्थिक लाभ दाखवतात. तृतीयातील शनि बाराव्या स्थानी असल्याने काही लोकांना लांबचे प्रवास होण्याची शक्यता आहे. मुलाबाळांची प्रगती समाधानकारक राहील. षष्ठातील शुक्र द्वितीय स्थानी असल्याने आर्थिक परिस्थिती उत्तम राहील, पण प्रकृतीबाबत काहीतरी किरकोळ आजार होण्याची शक्यता आहे. सप्तम भावातील बुध द्वितीय स्थानी असल्याने कौटुंबिक वातावरण खेळीमेळीचे राहील. दशमेश बुध द्वितीय स्थानी, रवि प्रथम स्थानी आणि राहू दशम स्थानी ही ग्रहस्थिती नोकरीतील वातावरण उत्तम ठेवील असे दिसते, प्रमोशन तसेच काहीतरी नवीन जबाबदारी तुमच्यावर येण्याची शक्यता आहे. एकंदरीत हा महिना उत्तम आहे.
मकर : मकर राशीचा स्वामी शनि लाभ स्थानी, बुध तुमच्या राशीत त्यामुळे ही ग्रहस्थिती तुमची बरीचशी कामे मनाप्रमाणे घडवून येण्यास कारणीभूत ठरेल. द्वितीयेश शनि लाभात देखील तुम्हाला आर्थिक लाभ घडवून आणेल. शनिमुळे कोणाला किती लाभ मिळेल हे सांगणे कठीण आहे, मात्र लाभ निश्चित मिळेल. चतुर्थातील मंगळ लग्न स्थानी व शनि लाभात तुमच्या घरासंबंधी काहीतरी चांगली बातमी ऐकायला मिळेल, काहींना नवीन घराचा लाभ होईल, ज्यांचे घर भाड्याने देण्याचे आहे त्यांना भाडेकरू मिळतील इ. ध्यानधारणेसाठी देखील हा महिना उत्तम आहे. त्यामुळे ह्या महिन्यात ध्यानधारणा केल्यास उत्तम प्रकारे मन:शांती लाभेल. षष्ठात मिथुन रास असून त्याचा स्वामी बुध लग्नी आहे व रवि बाराव्या स्थानी आहे, त्यामुळे शरीर प्रकृतीसंबंधी थोडी काळजी घ्यावी. सप्तम स्थानातील गुरु सर्वसाधारणपणे घरातील वातावरण खेळीमेळीचे व आनंदी ठेवेल. अष्टमेश रवि बाराव्या स्थानी व शुक्र लग्नी आहे त्यामुळे बऱ्याच मानसिक ताणास सामोरे जावे लागेल. एकंदरीत ह्या महिन्यात काही बाबतीत मानसिक ताण व काही बाबतीत उत्तम काळ अश्या दुहेरी परिस्थितीस तोंड द्यावे लागेल असे दिसते.
कुंभ : कुंभ राशीचा स्वामी शनि दशम स्थानी व बुध बाराव्या स्थानी असल्याने काही लोकांना नोकरी संबंधात परदेशी जावे लागण्याची शक्यता आहे. अर्थात हा योग ज्यांच्या मूळ जन्मकुंडलीत आहे, अश्यांनाच ही संधी मिळू शकते. द्वितीयातील मीन राशीचा स्वामी गुरु षष्ठात असल्याने आर्थिक बाबतीत विशेष काळजी राहणार नाही. मुलाबाळांची प्रगती समाधानकारक राहील. ज्यांचा शेअर ब्रोकिंगचा व्यवसाय आहे, त्यांना ह्या महिन्यात बऱ्यापैकी प्राप्ती होईल. शरीर प्रकृती साधारणपणे व्यवस्थित राहील. कौटुंबिक वातावरण खेळीमेळीचे राहील. नवमेश शुक्र बाराव्या स्थानी व रवि लाभस्थानी त्यामुळे वर लिहिल्याप्रमाणे लांबच्या प्रवासाचे योग निश्चित दिसत आहेत. एकंदरीत हा महिना उत्तम जाईल असे दिसते.
मीन : मीन राशीचा स्वामी गुरु पंचमात आणि बुध लाभात असल्याने कलाकार मंडळींना हा महिना चांगला जाईल असे दिसते. तसेच ज्यांचा इव्हेंट मॅनेजमेंटचा व्यवसाय आहे त्यांना देखील ह्या महिन्यात चांगला प्रतिसाद मिळेल. द्वितीयेश मंगळ लाभात आणि शनि नवमात त्यामुळे आर्थिक आवक ठीक राहील. लेखक, पुस्तक विक्रेते, प्रकाशक इ. मंडळींना देखील हा काळ चांगला आहे. त्यांचे विक्रीचे प्रमाण बरेच वाढेल असे संकेत आहेत. पंचमात गुरु, नवमात शनि हे योग अध्यात्मिक प्रगतीच्या दृष्टीने उत्तम आहेत. ज्यांना धार्मिक कार्याची आवड आहे, त्यांनी ह्या महिन्यात त्याचा लाभ जरूर घ्यावा. तसेच मुलाबाळांची प्रगती देखील समाधानकारक राहील. षष्ठेश रवि दशमात आणि तीन ग्रह लाभात हे योग तुम्ही प्रतिस्पर्ध्यावर मात करून पुढे जाल, असे दर्शवतात. कौटुंबिक वातावरण उत्तम राहील. एकंदरीत हा महिना अतिशय चांगला जाईल असे दिसते.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users