सांता क्लॉजच गिफ्ट

Submitted by मयुरी चवाथे-शिंदे on 27 December, 2014 - 06:37

सांता क्लॉजच गिफ्ट

संध्याकाळी घरी आल्या आल्या माझी चिमुरडी धावत आली, ख्रिस्मस च्या निमित्ताने तिला शाळेतून सांता क्लॉजच चित्र दिल होत रंगवायला. ते दाखवतच म्हणाली, "आई मला आणि ताईला पण देणार का ग सांता गिफ्ट?" (आजकालच्या 'नवीन' पिढीची आकलनशक्ती खूपच प्रगल्भ आहे त्यापुढे माझा कितपत निभाव लागेल ह्याची कल्पना असल्यामुळे पुढील अर्धा तास यांच्याशी बोलण्यात धारातीर्थी पडणार याची जाणीव होऊन मग मीही गप्पा मारायला बसले.)

"नाही ग अनु, सांता हा नसतोच... ते तर ना लहान मुलांचे आई बाबाच गिफ्ट ठेवतात. आपल्याला कसे दिवाळीत फटाके, ड्रेस आणि काय काय देतात तसच क्याथलिक लोकांचा हा सण आहे "क्रिसमस", ते तसा साजरा करतात." चिमुरडीची ताई पुटपुटली. माझ रक्षण व्हाव म्हणून ढालीसारखी सामोरी आलेली माझी मोठी लेक उत्तरली.
पण त्या एवढ्या प्र्याक्टीकॅल उत्तराने मी तर थक्कच झाले पण चिमुरडी हिरमुसली. तीही मागे हटनार्यातील नव्हती.. "मग ताई तो लाल ड्रेस घातलेला, सफेद दाढीवाला, 'डीअर'च्या गाडीतून येणारा ह्या कलरिंग मधला हा कोण?"
"बाळ, तोच सांता. आपल्याकडे कशी दिवाळीत लक्ष्मीपूजनच्या दिवशी लक्ष्मी माता येते, तसाच हा क्याथलिक धर्माच्या लोकांकडे त्यांच्या सणाच्या दिवशी म्हणजे ख्रिसमसच्या दिवशी येतो"
"मग आई मला आज्जोंनी खोट सांगितलं? " (आज्जोंनाच विचार... हे बोलता बोलता माझे शब्द मागे फिरले. आज दोघी मिळून मला तोफेवर चढवणार बहुतेक) “आता तू तरी माझ्यावर कृपा करून असे उलट सुलट प्रश्न नको विचारूस ग”...अस केविलवाण वाक्य तिने माझ्या चेहऱ्यावर वाचल असेल बहुतेक आणि ती गप्प बसली. मग पुन्हा दुसरी सुरु...
"क्याथलिक म्हणजे चर्च मध्ये जाणारे ना ग आई? 'मेरी' आंटीसारखे ?, आपण देवळात जातो आणि ते तिसरे लोक ते कुठे जातात?"
"त्याला मॉस्क म्हणतात अनु; ते गोल टोपी घालणारे तिथे जातात" (pk मधल्या आमिरचा हा प्रभाव आहे कि शाळेतल्या अभ्यासाचा की या मुलांच्या निरीक्षणशक्तीचा ?)
"आई आपण बनूया का क्याथलिक? करूया ना सेलिब्रेट ख्रिसमस .."
"आपण केली ना दिवाळी साजरी.. मग तेव्हा ते कुठे आलेले फटाके उडवायला? देवाने जे सण ज्याला दिले आहेत तो ते तशा पद्धतीने साजरे करतो..."
"मग आई आपण ख्रिसमस सेलिब्रेट केला तर चर्चमधला देव रागावेल का ग?" (मी लहानपणी किती गुणी बाळ होते, असे भारी भारी प्रश्न विचारून मी माझ्या आईची आणि पप्पांची कद्धी कद्धी परीक्षा घेतली नाही- विचारले असतील तरी आता कुठे आठवत आहेत?)
"अनु...... सोन्या... उद्या मेरी आंटी जो केक पाठवेल ना तो कापून आपण करूयात क्रिसमस सेलिब्रेट.. आता तरी चल ना 'लोटू पोटु' (नवीन पिढीच कार्टून क्यारक्टर) लागेल आणि अजून ह्या सान्तालाही कलरिंग करायचंय ना?"
"हो ग ताई, विसरलेच. चल..." अस बोलून माझे दोन्ही गुरु हातात हात घालून दुसर्या खोलीत निघूनही गेले.. अरे विचारलेले प्रश्न, त्यांची उत्तर तर शोधू देत. थांबा ग... चर्चमध्ये देव असतो का ग? मग मंदिरात अल्ला आणि मस्जिदमध्ये नक्कीच God असणार.

दोन दिवसांनी कुठल्यातरी ग्रुपवर पोस्ट वाचनात आली. "मी ख्रिर्स्चन नाही उगाच मेरी ख्रिस्मस म्हणून शुभेच्छा पाठवू नका... हे लोक करतात का दिवाळी साजरी. ? देतात का गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा मग... ?" मी मराठी आणि मराठीचा बाणा जपणाऱ्या सुसंस्कृत व्यक्तीला ह्या शुभेच्छांचा त्रास होत होता तर... का? तर ते नीट वागत नाहीत तर मी का नीट वागू? खर तर हाच एक मुद्दा होता. "मी"पणा जपण्याचा. अरे हिंदू संस्कुतीचा एवढा अभिमान आहे ना मग? आपण तर बैल पोळा, नागपंचमी असे सण साजरे करून जनावरानबद्दलही आत्मीयता दाखवतो, वटपौर्णिमा साजरी करून वृक्ष आणि निसर्ग यांच्यावरच प्रेम दर्शवतो... मग हाड- मांस- हृदय असणार्या जात बांधवांना का दुखवाव? सर्वधर्म सहिष्णुता असलेल्या भारतात राहतो आपण. ह्या एका मुल्यामुळे भारत जगात "वेगळा" ठरला आहे.. मग कशाला न्यारो माइंड किंवा ब्रॉड माइंड ने विचार करायचा? फक्त माइंड ने विचार करूयात ना.

रात्री दोन्ही मुली झोपल्यावर त्यांच्या उशाशी एक एक मोठ्ठी क्याडबरी ठेवली. सकाळी उठल्यावर अंथरुणात कुठतरी ती त्यांना सापडली. "आई हे कोणी दिल?, कुठून आली हि क्याडबरी?, ताई आपल्या दोघींना?"
"बाळांनो चर्चमधल्या देवाने सांताला सांगितलं असेल हे गिफ्ट तुम्हाला द्यायला.. तोच ठेऊन गेला असेल"
चिमुरडी खिडकीत धावली वर आकाशात बघून सांताला "थ्यांक यु" म्हणाली. (तिला सांता दिसलाही असेल) मोठी माझ्याकडे आली, म्हणाली "थ्यांक यु आई" . अजून काय हवय मग...!

मयुरी चवाथे- शिंदे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वा खूप आवडले, साधेसेच पण मनापासून लिहिता आपण, लिहित राहा ..

वर उल्लेखलेले तथाकथित धर्माभिमानी मेसेज पाठवणार्‍यांना छळणे हा माझा छंद आहे, पण असो ते दळण इथे नको ..

सांताक्लोज बांताक्लोज सब झूठ आहे हे वयात आल्यावर समजूनही ते कॅरेक्टर फार आवडते.. पण देवालाही धर्माच्या चौकटीत बांधणारे त्याला सोडताहेत होय!

मस्तच . शेवट गोड आहे अगदि.
आवडला लेख ,स्पेशली शेवटुन दुसरा पॅरा ."फक्त माइंड ने विचार करूयात ना" Happy

छान Happy

सांता हा साक्षात विष्णुचा अवतार आहे.

विष्णुपुराणात सांताचा उल्लेख आहे.

सांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं

Proud

>>सांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं<< Angry
काउ, उगाच काही तरि इथे टंकत बसु नका !! ते सांताकारं नाहीये...शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं असे आहे...अगदी South Indian लोकं सुद्धा शांताकारं च म्हणतात !!

Happy