छावणी - ८

Submitted by स्पार्टाकस on 28 November, 2014 - 01:34

छावणीच्या फाटकाच्या दिशेने आलेल्या घोषणा ऐकून सर्वजण काय समजायचे ते समजून चुकले.

हल्ला!

सर्वत्र धावाधाव पळापळ सुरु झाली. छावणीवर असा अचानक हल्ला होईल अशी कोणालाच कल्पना नव्हती. गुजरानवाला इथून निघाल्यापासून आतापर्यंतची वाटचाल निर्विघ्नपणे पार पडली होती, त्यामुळे सर्वजण काहीसे गाफील राहीले होते. अर्थात आतापर्यंत हल्ला झाला नाही म्हणजे पुढे होणारच नाही याची काही खात्री देता आली नसतीच. हा विचार ध्यानात घेऊन आपण सावध असायला हवं होतं असं प्रत्येकाला वाटून गेलं. पण आता असं वाटून उपयोग नव्हता!

आणि सावध असून तरी करणार काय हा यक्षप्रश्न होताच! बंदुका, तलवारी, चाकू-सुरे, लोखंडी सळ्या-कांबी-भाले अशा हत्यारांनी सुसज्ज असलेल्या आणि धर्मांधतेने पछाडलेल्या गुंडांचा प्रतिकार कसा करणार? कोणत्या शस्त्राने? साधी हातात घेण्यासाठी काठीतरी होती? आणि लाठ्या-काठ्या असत्या तरी बंदुका आणि तलवारींचा प्रतिकार त्यांनी थोडाच करता येणार होता? स्वत:चं आणि आपल्या बायका-मुलांचं संरक्षण करणार तरी कसं? कशाच्या बळावर? अहिंसेने?

मेजर चौहान आणि त्यांची लष्करी तुकडी हल्लेखोरांना छावणीत घुसण्यापासून रोखण्याचा आटोकाट प्रयत्न करत होती. त्यांनी हल्लेखोरांच्या दिशेने बंदुकीच्या फैरींचा सतत मारा सुरू ठेवला होता. पण हल्लेखोरांना त्याची पर्वा नव्हती. धार्मिक उन्मादात अंध बनलेल्या आणि जीवावर उदार झालेल्या त्या रानटी लोकांना लष्कराच्या गोळ्यांची तमा नव्हती. ते पुढे पुढे सरकतच होते. एखाद्या युद्धालाच निघाले होते जणू! त्यांच्या युद्धघोषणा सतत कानावर आदळत होत्या,

"नारा ए तकब्बीर!”
"दीन! दीन! दीन!"
"अल्ला हो अकबर!"

पुढे पुढे सरकणार्‍या या हल्लेखोरांना रोखण्याचे हिंदुस्तानी लष्कराचे प्रयत्न अपुरे पडत होते. लष्कराच्या तुलनेत त्यांची संख्या बरीच जास्तं होती. मुरीदके आणि आस-पासच्या खेड्यातील सर्व गुंड-पुंड तिथे आले असावेत. अखेर त्यांच्यापैकी बरेच जण छावणीत घुसलेच!

छावणीत एकच अफरातफरी माजली होती. स्त्रिया आपल्या लहान मुलांना हाताशी धरुन तंबूत लपण्याचा प्रयत्न करु लागल्या. पुरुषमंडळीही आपला आणि आपल्या कुटुंबियांचा जीव वाचवण्यासाठी जमेल तसा विरोध करु लागली, पण त्या विरोधाला काही अर्थच नव्हता. आसमंतात सर्वत्र धुळीचं साम्राज्यं पसरलं होतं. स्त्रियांच्या आणि लहान मुलांच्या किंकाळ्या आणि आक्रोश चहूबाजूंनी कानावर येत होता. प्रत्येकजण आपला जीव वाचवण्याचा आकांती प्रयत्न करत होता.

"बचाव! मुझे बचाव!"
"छोडो! जाने दो!"
"मारो! काटो!"
"लेकर चलो!"
"या अली!"

चहुबाजूला एकच गोंधळ माजला होता. हल्लेखोर पुर्‍या तयारीनिशी आलेले होते. त्यांच्यासमोर एकच लक्ष्यं होतं. मिळतील तेवढ्या काफीरांना ठार मारायचं! स्त्रिया आणि मुलींचं अपहरण करायचं! त्यानुसार त्यांचा धुमाकूळ सुरु होता. तावडीत सापडलेल्या पुरुषांवर सपासप तलवारी चालवल्या जात होत्या. डोक्यात सळ्या - लोखंडी कांबी घातल्या जात होत्या. स्त्रियांच्या अंगावर हात टाकला जात होता. चहूबाजूला सुरु असलेल्या कोलाहलात स्त्रियांच्या अब्रूवर घाला घातला जात होता. कित्येक स्त्रियांचं आणि तरूणींचं अपहरण करण्यात आलं. हल्लेखोरांजवळ दयामाया औषधालासुद्धा नव्हती. त्यांच्या अंगात सैतान संचारला होता. लहान मुलं आणि कोवळी बालकंही त्यांच्या पाशवीपणातून बचावली नाहीत. कुठे काय घडत आहे, कोण हल्लेखोर कोण निर्वासित काही कळेनासं झालं.

रजनी आणि चित्रा छावणीच्या एका टोकाला असलेल्या नळावर पाणी भरण्यासाठी गेल्या होत्या. हल्ला झाल्याची चाहूल लागताच त्यांनी पाण्याने भरलेली भांडी तिथेच टाकली आणि आपल्या तंबूकडे धाव घेतली. चहुबाजूला उडालेल्या गदारोळातून मार्ग काढत त्या वाट काढत असतानाच अचानक काही गुंडांची त्यांच्यावर नजर पडली! मोठमोठ्याने आरोळ्या ठोकत तीन-चार जण दोघींच्या मागे लागले! रजनी आणि चित्राची पाचावर धारण बसली! जिवाच्या कराराने दोघी धावत सुटल्या, परंतु त्या गुंडांनी त्यांना गाठलंच!

"उठा लो दोनोंको!" एक गुंड तारस्वरात किंचाळला.

दोन गुंड दोघींच्या दिशेने झेपावले. चित्राने किंकाळी फोडली, पण रजनीच्या तोंडून भयाने आवाजही फुटेना.

अचानक एक चमत्कार झाला!
रजनीच्या दिशेने झेपावलेल्या गुंडाने जोरात किंकाळी फोडली!
त्याचा हात खांद्यापासून तुटून खाली पडला होता!
दुसर्‍याच क्षणी चित्राच्या अंगावर हात टाकणार्‍या गुंडाची मान धडावेगळी झाली!

आपले दोन साथीदार असे कापले गेलेले पाहताच उरलेले दोन गुंड भेदरले. एक पाऊल मागे सरकले. आपल्यावर प्रतिहल्ला कोणी केला हे त्यांना कळेना. त्याचवेळी रजनी आणि चित्रा यांना पाठीशी घालून एक धिप्पाड माणूस कृतांतासारखा त्यांच्यासमोर उभा ठाकला! त्याच्या हातात नंगी तलवार होती! रक्ताळलेली!

"छडना नहीं तैनू! औरत पे हथ क्या डालताए ओये! मर्द का बचा है तो मैनू भिडजा!"
"बोले सो निहालSSS!"

सरदार कर्तारसिंग!

कर्तारसिंगांचे डोळे आग ओकत होते. अंगावर जखमांच्या खुणा दिसत होत्या. जखमांतून वाहिलेल्या रक्ताचे डाग त्यांच्या झब्ब्यावर पडले होते. परंतु त्यांना पर्वा नव्हती.

"उस तरफ जाओ बेटी! मेजरसाब के डेरेके तरफ! जाओ!"

एकदाच आपल्या मागील बाजूस निर्देश करत ते चित्रा आणि रजनीला उद्देशून म्हणाले आणि दुसर्‍याच क्षणी हातातली तलवार परजत ते त्या गुंडांवर चालून गेले! कर्तारसिंगांचा आवेश पाहूनच त्या गुंडांना धडकी भरली होती. असहाय्य स्त्रियांवर हात टाकणं आणि संतापाने पेटलेल्या लढवय्या शीखाशी मुकाबला करणं यातला फरक त्या दोन्ही गुंडांना आता चांगलाच कळून येणार होता!

चित्रा अद्यापही भयचकीत होऊन कर्तारसिंग आणि मरुन पडलेल्या गुंडांकडे पाहत उभी होती. काहीक्षणाने ती भानावर आली. रजनीचा हात धरुन ती त्यांनी दाखवलेल्या दिशेने धावत सुटली.

रात्री झोपण्यापूर्वी 'हलकं' होण्याच्या उद्देशाने आदित्य छावणीतील प्रातर्विधीच्या जागी गेला होता. हल्ला झाल्याचं ध्यानात येताच तो झटकन शौचालयात शिरला! तिथल्या अंधारात छपून राहून तो बाहेरचा कानोसा घेत होता. चहूबाजूनी कोलाहलाचे आवाज त्याच्या कानावर येत होते. हल्लेखोरांविषयीच्या संतापाने त्याच्या हाताच्या मुठी आवळल्या जात होत्या. परंतु आता या क्षणी आपण हतबल आहोत याची जाणिव झाल्याने त्याला स्वतःचाच राग येत होता! या परिस्थितीत स्वतःचा जीवा वाचवणं हे सगळ्यात महत्वाचं होतं. त्याच्या मनात आई-वडीलांचा आणि बहिणीचा विचार आला. हल्लेखोरांनी त्यांना काही इजा तर केली नसेल ना? आणि सरिता? ती कुठे असेल?

गोंधळाचा आवाज जरा कमी झाल्यावर तो हळूच शौचालयातून बाहेर पडला. अद्यापही छावणीत काही ठिकाणी स्त्री - पुरुष लहान मुलांना हाताशी धरुन इतस्ततः धावत होते. परंतु हे प्रमाण काहीसं कमी झालं होतं. हल्ल्याचा जोर कमी झाला असावा असं त्याला वाटलं. जखमी आणि जायबंदी झालेले कित्येक लोक वेडेवाकडे पडलेले होते. वेदनांनी विव्हळणार्‍यांचा आक्रोश चहूबाजूंनी कानावर आदळत होता. हल्लेखोर आपलं 'पवित्रं' कार्य आटपून निघून गेले असावेत.

आदित्य घाईघाईने आपल्या तंबूच्या दिशेने निघाला. काही अंतर पार केल्यावर समोरुन धावत येणार्‍या कोणाशीतरी त्याची टक्कर झाली! दोघंही खाली आपटले, परंतु उठून पुन्हा आपापल्या मार्गाने धावत सुटले. त्या कोलाहलात एकमेकांशी बोलण्याचंही कोणाला सुचलं नाही! त्यातच तो ज्या दिशेने चालला होता त्या दिशेने अद्यापही मदतीसाठी आक्रंदत असलेल्यांचा 'बचाव! कोई बचाव!' असा आवाज येत होता. त्याच्या जोडीला हल्लेखोरांच्या 'या अली!' अशा आरोळ्यादेखील! याचा अर्थ अजूनही काही हल्लेखोर छावणीत होते! तंबूकडे जाणार्‍या मार्गावरच त्यांच हैदोस सुरु होता!

अद्यापही आपल्याला धोका आहे हे ध्यानात येताच त्याने छावणीच्या विरुद्ध बाजूला धाव घेतली. वाटेत आडवे येणारे तंबू, खुंट्यांना ठोकलेले तंबूचे दोर हे टाळून मार्ग काढणं म्हणजे कसरतच होती. त्यातच कधी तलवारीचा घाव पडेल किंवा एखादी बंदूकीची गोळी लागेल याचा भरवसा नव्हता. धावताधावता एका आडव्या आलेल्या दोरात पाय अडकून आदित्यचा तोल गेला, परंतु जमिनीवर न आपटता तो खाली पडलेल्या एका दुर्दैवी माणसावर आदळला! तो माणूस पालथा पडलेला होता. त्याच्या पाठीवर रक्ताचं थारोळं दिसत होतं. हल्ल्यात त्याचा बळी पडला असावा.

कपडे झटकत तो उभा राहीला आणि पुढे निघाला. काही अंतरावर त्याला छावणीभोवती असलेलं तारेचं कुंपण दिसलं. कुंपणापाशी पोहोचल्यावर तिथे दोन माणसं मरुन पडलेली त्याला आढळून आली. कुंपणापाशी पोहोचल्यावर त्याने बाहेर नजर टाकली. सर्वत्रं अंधाराचं साम्राज्यं पसरलेलं होतं. मागे वळून पाहील्यावर त्याला काही अंतरावर दोन हिंदुस्तानी सैनिक आढळून आले. ते हल्लेखोरांच्या दिशेने गोळीबार करत असावेत. अचानक दोनपैकी एक सैनिक किंकाळी फोडून खाली आपटला. ते दृष्य पाहून आदित्यची छातीच दडपली. सैनिकांवर हल्ला करण्यासही गुंड मागेपुढे पाहत नव्हते! जीवाच्या भितीने त्याने कुंपणावरुन पलीकडॅ उडी टाकली आणि तो तीरासारखा धावत सुटला.

काही क्षणांतच आदित्य एका शेतात पोहोचला. ते गव्हाचं शेत होतं. मात्रं फाळणीच्या धामधुमीत आता कोणी इथे असणं अशक्यंच होतं. मशागत न झाल्याने तिथे झुडपांचं रान माजलं. होतं. त्या झुडूपांच्या आडोशाला धांबून त्याने थोडा दम खाल्ला. आपले आईवडील, बहीण, प्रेयसी आणि तुकडीतील इतरजण कोणत्या परिस्थितीत असतील याचा विचारही त्याला करवेना. छावणीच्या दिशेने अजून गोंधळाचे आवाज कानावर येत होते. हल्लेखोरांचं थैमान अजूनही सुरुच होतं.

अचानक तो थांबला होता त्याच्या बाजूच्या झुडूपात काहीतरी खसफस झाली! आदित्य नखशिखांत हादरला! कसला...कसला आवाज होता तो? एखादा साप तर नसेल? की कोणी प्राणी? आपल्यासारखंच कोणी जीव बचावून तिथे लपलं असेल? की आपल्या मागावर आलेला एखादा हल्लेखोर? आणि हल्लेखोर असला तर त्याचा मुकाबला कसा करणार?

आदित्यच्या मनात झरझर हे विचार येत होते. प्रतिकाराचा विचार येताच अभावितपणे त्याचा हात कंबरेशी गेला. गुजरानवाला सोडताना कॅ. वकार सईदने स्वसंरक्षणासाठी दिलेला लांब पात्याचा सुरा नेहमी त्याच्या कंबरेला असे, परंतु रात्री लघुशंकेला जाताना त्याने नेमका तो सुरा तंबूत काढून ठेवला होता! मनातल्या मनात त्याने स्वतःला शिव्यांची लाखोली वाहीली. कोणताही प्रतिकार करण्यास आपण असमर्थ असल्याचं ध्यानात आल्यावर एकच मार्ग शिल्लक होता, तो म्हणजे तिथून निसटून दूर जाणं!

कमीत कमी आवाज होईल अशी दक्षता घेत रांगत, सरपटत त्याने काही अंतर पार केलं आणि मग उठून धावण्यास सुरवात केली. काही अंतरावर तो दुसर्‍या एका शेतात घुसला. या शेतातही काटेरी झुडूपांचं रान माजलं होतं. अंधारात त्यातून वाट काढताना काट्यांचे ओरखडॅ सर्वांगावर उमटत होते. परंतु तो तसाच पुढे चालला होता. एव्हाना आपण छावणीपासून अर्धा ते एक मैल दूर आलो असणार याबद्दल त्याला कोणतीच शंका वाटत नव्हती.

त्या शेतातून मार्ग काढताना आदित्य अचानक रस्त्यावर पोहोचला. ह्याच रस्त्याने तीन दिवसांपूर्वी आपण मुरीदके छावणीत आलो होतो हे त्याच्या ध्यानात आलं. रस्त्याच्या कडेने तो सावधपणे छावणीकडॅ निघाला.

काही अंतर पार केल्यावर त्याला रस्त्याच्या कडेला एक लहानसं खोपट त्याला आढळलं. बाहेर रॉकेलचा दिवा जळत होता. त्याचा प्रकाश थोड्याशा अंतरापर्यंत पडला होता. त्या खोपटात शिरावं असा त्याला मोह झाला. हल्लेखोर निघून जाईपर्यंत लपून राहण्यासाठी ती जागा उत्तम होती. परंतु न जाणो ही खोली एखाद्या गुंडाचीच असली तर? तसं झालं तर आपला कारभार आटोपलाच! त्याच्या मनात आलं. परंतु काही वेळ विश्रांतीचा मोह त्याला सोडवेना.

मांजराच्या पावलाने आदित्य त्या खोपटापाशी आला. त्या खोपटाचं दार कुलूप लावून बंद केलेलं त्याला आढळून आलं. याचा अर्थ आत शिरण्याचा मार्ग बंद होता. खोपटाला खिडक्याही दिसून येत नव्हता. खोपटाला वळसा घालून तो मागच्या बाजूला आला. मागे आणखीन एक झोपडी त्याला आढळली. सावधपणे दारापाशी येऊन त्याने आत नजर टाकली. शेणामुताचा वास भसकन् त्याच्या नाकात शिरला तो गोठा असावा असं त्याच्या ध्यानात आलं. परंतु दार आतून बंद होतं! गोठाला कडी? याचा अर्थ आत कोणीतरी माणूस असणार!

आदित्य मागच्या बाजूस आला. गोठ्याच्या आत काहीतरी धडपडीचा आवाज येत होता. पाठोपाठ कोणा असहाय्य स्त्रीचा आक्रोश.

"छोड मुझे! छोड दे! बेशरम! मै एक शादीशुदा औरत हूं! छोड!"

त्याच्या तळपायाची आग मस्तकाला गेली. आत कोणीतरी गुंड एका असहाय्य स्त्रीवर बलात्कार करण्याच्या बेतात आहे हे त्याच्या ध्यानात आलं. आपण तिची यातून सुटका करायला हवी. पण कशी? धावतच तो पुढच्या दाराशी आला. जोर लावून त्याने दार उघडण्याचा प्रयत्नं केला, पण दार काही उघडेना. पुन्हा वळसा घालून मागच्या बाजूस जाताना गोठ्याला असलेली खिडकी त्याच्या नजरेस पडली. खिडकीची लाकडी दारं खिळखिळी झालेली होती. सगळा जोर लावून त्याने एक दार बाहेर खेचलं. आधीच अर्धवट तुटलेलं दार झटकन त्याच्या हातात आलं! सुदैवाने दाराला गज नव्हते.

आतल्या स्त्रीचा आक्रोश त्याच्या कानावर आदळत होता.

"छोड दे मुझे! सुव्वर की औलाद! मै तेरा गला घोट दूंगी छोड...."
"छोड दूं? छोडने के लिये यहां लाया था क्या तेरेको उठाकर? आजतक जो भी औरत उठाई है उसके साथ येही किया है मैने!"

आदित्य खिडकीच्या तुटलेल्या दारातून अंग चोरून आत घुसला. आत शिरताच त्याने आजूबाजूला नजर टाकली. शेतीसाठी लागणारी अवजारं तिथे पडली होती. त्यातली जड लोखंडी कांब त्याने उचलली आणि तो पुढे सरसावला. एका बाजूच्या कोपर्‍यात त्या असहाय्य स्त्रीला खाली पाडलं होतं. एक आडदांड पुरूष तिच्या अंगावर व्यापण्याचा प्रयत्न करत होता. आपली अब्रू वाचवण्यासाठी ती त्या सैतानाला मारत होती, ओरबाडत होती परंतु त्याच्या राक्षसी ताकदीपुढे तिची प्रतिकारशक्ती कमी पडत होती. कामांध झालेल्या त्या गुंडाच्या आसुरी नजरेला फक्तं त्या असहाय्य स्त्रीचा देह दिसत होता. कामातुराणं न भयं न लज्जा! साक्षात आपला मृत्यू पाठीमागे येऊन उभा आहे याची त्याला काहीच कल्पना नव्हती.

सगळा जोर एक्वटून आदित्यने ती कांब उचलली आणि त्या नराधमाच्या डोक्यावर घाव घातला. हा पहिलाच घाव वर्मी लागला असावा. जोरात आवाज होऊन रक्ताच्या चिऴकांड्या उडाल्या! बहुतेक कवटी फुटली असावी! त्याला ओरड्ण्यासही वेळ मिळाला नाही. त्या स्त्रीच्या देहावरुन तो बाजूला पडला. पण आदित्य आता थांबायला तयार नव्हता. तो एकापाठोपाठ एक घाव घालत सुटला. सुरवातीच्या दोन-तीन फटक्यातच त्या हैवानाचा प्राण गेला असावा, परंतु आदित्यने आपला हात आवरला नाही. आतापर्यंत दाबून ठेवलेला सारा अंगार बाहेर पडत होता! हरामखोर! हिंदू आणि शीख स्त्रिया म्हणजे भोगदासी वाटल्या काय तुम्हाला? भोगा आता आपल्या कर्माची फळं!

काही क्षणाने तो भानावर आला! हातात्ली कांब फेकून त्याने बाजूला फेकून दिली. ती स्त्री एव्हाना उठून उभी राहीली होती आणि त्या गुंडाच्या छिन्नविच्छिन्न देहाकडे पाहत होती. आपली इज्जल लुटण्यापासून थोडक्यात वाचल्यामुळे तिने सुटकेचा नि:श्वास टाकला. आपल्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न करणार्‍याला देहांत प्रायश्चित्त मिळालेलं पाहून तिने आनंद झाला असावा. तिच्याकडे नजर जाताच आदित्य थक्क झाला.

"चारूदिदी! तुम्ही?"
"आदित्यभैय्या!" चारूच्या तोंडून शब्द फुटत नव्हता. ती हुंदके देत होती.
"शांत व्हा दिदी! शांत व्हा! खलास झालाय तो! खून केला मी त्याचा!"

दोघं काही न बोलता एकमेकासमोर उभे राहीले. काही वेळाने चारुने स्वतःला सावरलं. त्या प्रेताकडे नजर जाताच तिला किळस आली. काही वेळापूर्वी आपल्यावर कोणता प्रसंग उभा राहीला होता याची आठवण आल्यावर ती सुन्न झाली. आदित्य नेमका तिथे कसा आला याचं तिला आश्चर्य वाटलं.

"जे काही झालं त्यात तुमचा काही दोष नाही चारुदिदी!" आदित्य बोलू लागला, "दुर्दैवाने एका हैवानाच्या तावडीत तुम्ही सापडला होतात. पण आता ते सगळं संपलंय. तो नराधम ठार झाला आहे! पण दिदी, तुम्ही इथे कशा आलात?"
"या...या दुष्टाने मला घोड्यावर घालून इथे आणलं!"
"आणि बाकीचे सर्वजण कुठे आहेत?"
"मला काहीच माहीत नाही! मी चित्राकडे गेले होते, पण ती नव्हती म्हणून मी परत आले तो वाटेत या नराधमाने मला पळवून आणलं! आदित्यभैय्या, तुम्ही आला नसता तर याने....." त्या कल्पनेनेच चारुचा थरकाप उडाला होता.
"विसरा ते सगळं आता दिदी! सगळं संपलं आहे! पण आता आपल्याला इथून बाहेर पडायला हवं! इथे जास्तवेळ थांबणं धोक्याचं आहे. न जाणो, याचे कोणे साथीदार आले तर?"
"पण आपण जाणार कुठे?"
"छावणीकडे! दुसरा काही मार्गच नाही!"
"पण अजूनही तिथे हल्लेखोर असले तर?"
"आधी इथून तर बाहेर पडू! मग पाहू काय ते!"

आदित्यने गोठ्याच्या दाराजवळ जाऊन कानोसा घेतला! बाहेर कोणाचीही चाहूल लागत नव्हती. हलकेच दार उघडून दोघं बाहेर आले. बाहेर गडद काळोख पसरला होता. सावधपणे दोघं रस्त्याला लागले. काही अंतर चालून जातात तोच समोरुन येणार्‍या वाहनाच्या दिव्याचा उजेड त्यांच्या दृष्टीस पडला! ती गाडी छावणीकडून येत होती. त्यात निश्चितच हल्लेखोर असणार होते!

क्षणाचाही विचार न करता चारुचा हात धरुन आदित्यने रस्त्यालगतच्या शेतात उडी टाकली. धावत-पळत दोघांनी वाढलेल्या झुडूपांचा आश्रय घेतला. गाडीतल्या लोकांनी आपल्याला पाहीलं तर ते आपल्या मागे येतील या भीतीने दोघंही भेदरले होते. सुदैवाने ती गाडी न थांबता पुढे निघून गेली. मात्रं ती गाडी पुढे गेल्यानंतरही दोघं तिथेच बसून होते. रात्रीच्या अंधारात आणखीन संकटात सापडण्यापेक्षा सकाळी पुढील हालचाल करण्याचा आदित्यने निर्णय घेतला होता.

ते दोघं तिथे किती वेळ बसले होते कोणास ठाऊक! बर्‍याच वेळाने त्यांना दुसर्‍या गाडीचा आवाज ऐकू आला. हल्लेखोर परत आले की काय? आदित्यच्या मनात आलं. पण त्याची ही भीती अनाठायी होती. ती जीप हिंदुस्तानी लष्कराची होती. जीपवर कर्णा बसवला होता. लष्करी अधिकारी त्यावरुन आवाहन करत होते.

"छावणीतील परिस्थिती हिंदुस्तानी लष्कराच्या काबूत आली आहे! इथे कोणी निर्वासित लपून राहीले असतील तर त्यांनी ताबडतोब जीपकडे यावं! आम्ही तुम्हाला सुखरुप छावणीत घेऊन जाऊ!"

ही घोषणा ऐकताच आदित्य आणि चारू दोघं धावतच रस्त्यावर आले. परंतु ती जीप एव्हाना पुढे निघून गेली होती. दोघं पुन्हा रस्त्याने चालत छावणीकडॅ निघाले. छावणी सुमारे मैलभर अंतरावर असावी. अर्ध्यातासात दोघं छावणीजवळ आले. एव्हाना पहाट फुटायला आली होती.

"आदित्यभैय्या, त्या गोठ्यात तुम्ही जे काही पाहीलंत ते कृपा करुन कोणाला बोलू नका! हात जोडते मी तुमच्यापुढे!" चारूने खरोखरच त्याच्यापुढे हात जोडले.
"बस्स दिदी! पुढे काही बोलू नका! मी कोणाला काही बोलेन असं तुम्हाला वाटलंच कसं? मी एका माणसाचा खून केलाय तिथे! मी काही पाहीलं नाही आणि काही ऐकलं नाही! तुम्ही काळजी करु नका!"

चारू आणि आदित्य त्याच्या तंबूमधे आले. एखाद्या वादळात सापडावं तशी तंबूची अवस्था झाली होती. सारं सामान इतस्तत: फेकलं होतं. हल्लेखोर आपल्या तंबूत धुमाकूळ घालून गेले आहेत हे आदित्यच्या ध्यानात आलं. कॅ. वकारने भेट दिलेला त्याचा सुरा मात्रं एका बोचक्यामागे पडलेला त्याला दिसला. हल्लेखोरांच्या नजरेतून तो सुटला हे आश्चर्यच! तंबूत कोणीच नव्हतं. सर्वजण गेले कुठे? नाना? आई? रजनी? सिन्हासर आणि चित्राभाभी? का.... मी एकटाच...

हा भयावह विचार मनात येताच तो हादरुन गेला. दोघं चौधरींच्या तंबूकडे आले. कमलादेवी, सरिता, चित्रा आणि रजनी तिथे होत्या! चारु सुखरुप आल्याचं पाहून कमलादेवी आणि चित्राला हायसं वाटलं. तिच्यापाठोपाठ आदित्य आत शिरला.

"आदित्य!" त्याच्याकडे नजर जाताच सरिता उत्तेजित आवाजात उद्गारली.
"दादा!"

रजनी धावत येऊन त्याला बिलगली. आदित्यने तिला छातीशी कवटाळलं. त्याची लाडकी बहीण सुखरुप होती! सुरक्षीत होती! तिच्या डोळ्यातून पाण्याची धार लागली होती. रडू आवरत नव्हतं. आदित्यने तिला सावरलं. हळूहळू ती शांत झाली.

"दादा! तू ठीक आहेस ना? आणि हे रक्तं?" रजनीचं त्याच्या शर्टावरील रक्ताच्या शिंतोड्यांवर लक्षं गेलं.
"मी ठीक आहे! हे रक्तं माझं नाहीये ! नाना कुठे आहेत? आई?"
"नाना, चाचाजी आणि सिन्हासर मेजरसाहेबांच्या तंबूकडे गेलेत! तुमची चौकशी करण्यासाठी!"
"आणि आई?"
"आई.." रजनीचे डोळे पुन्हा पाण्याने भरुन आले, "दादा, आईचा कुठेच पत्ता नाही! ती कोणालाच दिसलेली नाही!"
"का SSS य ?" आदित्य ओरडलाच.
"रजनी म्हणते ते खरं आहे आदित्यबाबू!" चित्रा म्हणाली, "चाचीजी, चारु, कर्तारसिंगजी आणि तू - तुम्ही चौघं काल रात्रीपासून गायब आहात! त्याच चौकशीसाठी चौधरीजी, सिन्हासाहेब आणि केशवजी मेजरसाहेबांना भेटायला गेले आहेत!"
"ठीक आहे! मी पाहतो!" आदित्य तंबूतून बाहेर पडला.

छावणीच्या एका टोकाला असलेल्या मेजरसाहेबांच्या तंबूपाशी बरीच गर्दी जमा झालेली होती, आपल्या गायब झालेल्या आप्तेष्टांची चौकशी करण्यासाठी आलेल्यांची लांबलचक रांग लागली होती. हल्ला झाल्यापासून छावणीतील बरीच माणसं गायब झाली होती. कर्तारसिंगांचा मुलगा गुरकीरतही तिथेच होता. आपल्या वडीलांची काही खबर मिळते का हे पाहण्यासाठी तो आला होता.

चौधरी महेंद्रनाथ, केशवराव आणि प्रा. सिन्हा मेजरसाहेबांच्या तंबूतील मेजापाशी उभे होते. मेजरसाहेबांच्या पुढ्यात जथ्यातील लोकांची यादी होती. गायब झालेल्या किंवा मरण पावलेल्या माणसांची चौकशी करुन त्या नावावर ते काट मारत होते. आदित्य तंबूच्या खिडकीतून आत डोकावला आणि त्याची केशवरावांची नजरानजर झाली. आदित्य सुखरुप आलेला पाहून ते धावतच बाहेर आले. त्यांचा म्हातारपणाचा आधार परत मिळाला होता! आदित्यला त्यांनी अत्यानंदाने मिठी मारली. तोपर्यंत चौधरी आणि प्रा. सिन्हाही त्यांच्याजवळ आले. आदित्य सुखरुप परतलेला पाहून त्यांनाही हायसं वाटलं.

"नाना, आईचा काही पत्ता लागला?"
"नाही!" केशवराव विशादाने मान हलवत म्हणाले. "काहीच पत्ता लागत नाहीये तिचा! कुठे गेली काही कळत नाही!"
"पण.. पण नेमकं झालं तरी काय?"
"काल हल्ला झाला तेव्हा आम्ही तंबूतच होतो!" केशवराव सांगू लागले. "चौधरीजींनी ही खबर तातडीने मेजरसाहेबांना दिली. मेजरसाहेबांनी आम्हाला त्यांच्याच तंबूत आश्रय घेण्याची सूचना दिली. त्याप्रमाणे आम्ही सर्वजण तिकडे धावलो. तुझी आई माझ्यामागोमागच पळत येत होती. पण तंबूपर्यंत पोहोचलीच नाही! मध्येच गायब झाली! काही वेळाने रजनी आणि चित्राभाभीपण तिकडेच आल्या!"

एव्हाना गुरकीरत त्यांच्यापाशी येऊन पोहोचला.

"चाचा़जी, पापाजीका कोई पता चला?" त्याने चौधरींना विचारलं.
"नही बेटा! कर्तारभाई, भाभीजी आणि चारुचा काही पत्ता लागलेला नाही!" चौधरी उत्तरले.
"चारुदिदी ठीक आहे चाचाजी!" आदित्य म्हणाला, "आम्ही दोघे बरोबरच परत आलो. ती तुमच्या तंबूत आहे!"

चौधरींनी मेजरसाहेबांना गाठून आदित्य आणि चारुलता सुखरुप असल्याची बातमी दिली. तोपर्यंत केशवराव आणि आदित्य छावणीतील दवाखान्यात आले. एका तंबूत हा दवाखाना थाटलेला होता. उपलब्धं असलेल्या तुटपुंज्या साधनांनिशी डॉ. सेन आणि आणखीन एक डॉक्टर सर्वांवर उपचार करत होते. त्यांना दोन मिनीटं बोलायलाही फुरसत नव्हती. रात्रीपासून आपली पत्नी गायब झालेली आहे हे डॉ. सेनना माहीत होतं. चारची काळजी त्यांचं काळीज कुरतडत होती. परंतु त्यांच्या रुग्णसेवेत मात्रं खंड पडला नव्हता!

आदित्य आणि केशवरावांनी त्यांची गाठ घेऊन मालतीबाईंची चौकशी केली, परंतु डॉक्टरांकडेही काहीच आशादायक बातमी नव्हती. चारु सुखरुप असल्याचं आदित्यकडून कळल्यावर डॉक्टरांना हायसं वाटलं. निराश मनाने केशवराव आणि आदित्य आपल्या तंबूकडे परतले. प्रा. सिन्हाही त्यांच्याबरोबरच होते. मालतीबाईंच्या चिंतेने केशवरावांचा जीव खालीवर होत होता. आदित्यचीही तीच अवस्था झाली होती. अशा प्रसंगी नको त्या शंका मनात येतातच, त्याला इलाज नव्हता.

दुपारच्या सुमाराला छावणीच्या एका टोकाला छिन्नविच्छीन्न झालेला कर्तारसिंगांचा मृतदेह आढळला! सर्वांनीच तिकडे धाव घेतली. कर्तारसिंगांच्या प्रेताकडे पाहवत नव्हतं. हल्लेखोरांनी त्यांचं पोट फाडून आतडी बाहेर काढली होती. त्यांची मानदेखील चिरलेली दिसत होती. रक्ताचं थारोळं झालेलं होतं. मृत्यूपूर्वी कर्तारसिंगांनी कडवी झुंज दिलेली असावी. त्यांच्या आजूबाजूला चार हल्लेखोरांची प्रेतं पडलेली आढळून आली!

सरदारजींच्या मृत्यूने सर्वांनाच दु:ख झालं. गुरकीरतने आकांत मांडला होता. जसवीरही हुंदके देत होती. लहानगा सतनाम आपल्या आजोबांना हलवून उठवण्याचा प्रयत्न करत होता. ते पाहून सर्वांचंच अंत:करण हेलावलं. चित्रा आणि रजनी या दोघींनाही अश्रू आवरत नव्हते. आदल्या रात्री केवळ कर्तारसिंगांमुळे त्या सुरक्षीत बचावल्या होत्या. नाहीतर... त्या कल्पनेने दोघींना आणखीनच भरुन येत होतं.

छावणीतील अनेक तंबूंमधून आक्रोशाचे सूर कानावर येत होते. अनेकजण जखमी वा जायबंदी झाल्यामुळे विव्हळत होते. बर्‍याच जणांचे आप्तेष्ट बळी पडले होते. कोणी आपला पती गमावला होता तर कोणाची पत्नी मृत्यूमुखी पडली होती. काही स्त्रियां आणि तरुणींचं अपहरण झालं होतं. त्यांच्या नशिबात आता काय भोग लिहीले होते कोणास ठाऊक!

केशवराव, आदित्य आणि रजनी, तिघे तीन दिशांनी छावणीत वणवण भटकत होते. त्यांच्याबरोबर प्रा. सिन्हा आणि सरितादेखील शोध घेत फिरत होते. मालतीबाई सुखरुप असतील, कुठे ना कुठे तरी त्यांचा शोध लागेल या आशेने पाचहीजणांनी सगळी छावणी पिंजून काढली, पण त्यांचा काहीही पत्ता लागला नाही! निराश मनाने सर्वजण आपल्या तंबूकडे परतले. पत्नीच्या अशारितीने अचानक गायब होण्यामुळे केशवराव सुन्न झाले होते. रजनीच्या डोळ्यातील पाण्याला खळ नव्हता. आईच्या आठवणीने तिचे डोळे सतत पाण्याने भरुन येत होते. सरिता तिला धीर देण्याचा प्रयत्न करत होती. आदित्यलाही हा धक्का असह्य होता, परंतु त्याने प्रसंगाचं गांभिर्य ओळखलं होतं. वडिलांना आणि बहिणीला आधार देण्यासाठी आपण खंबीरपणे उभं राहीलं पाहीजे हे त्याच्या ध्यानात आलं होतं.

छावणीवरील हल्ल्याला तीन दिवस उलटून गेल्यावर मेजरसाहेबांनी पुढे निघण्याचे आदेश दिले! हल्ल्यात गमावलेले आता कायमचे निघून गेले होते. आता कितीही आक्रोश केला तरी काहीही उपयोग होणार नव्हता! मागे राहीलेल्यांना हिंदुस्तानच्या दिशेने कूच करण्यापलीकडे मार्ग नव्हता. छावणीभर पुन्हा बोचक्यांची आणि गाठोड्यांची बांधाबांध सुरु झाली!

आदित्यने रजनी आणि चित्राच्या मदतीने आपलं सगळं सामान आवरलं. केशवराव कशातच नसल्यागत शून्यात नजर लावून बसले होते. निघण्याची वेळ झाली तरी ते काही उठायला तयार नव्हते!

"मी इथून कसा जाऊ रे आदित्या? तुझी आई इथूनच गेली आहे! इथेच येईल ती परतून!"
"नाना!" आदित्य स्वतःला आवरत म्हणाला, "आई गेली नाना! कायमची! आता ती येणार नाही! तुम्ही चला!"
"असं कसं होईल रे? ती नक्की इथेच परत येईल! आपण कोणीच नसलो तर काय करेल बिचारी?"
"नाना! नाना सावरा स्वतःला! आई आता कधीच दिसणार नाही आपल्याला!"
"आदित्यबाबू बरोबर सांगताहेत केशवजी!" प्रा. सिन्हा म्हणाले, "भाभीजींची आणि तुमची साथ इथपर्यंतचीच होती. त्यांची वेळ आली आणि त्या निघून गेल्या. कुठे आणि कशा गेल्या हे आपल्याला कधीच कळणार नाही, पण आता तुम्हाला मात्रं पुढे निघायलाच हवं!"
"केशवजी, तुमच्या मुलांचा तरी विचार करा! तुमच्याशिवाय त्यांना आता कोण आहे?"

चौधरींनी केशवरावांना जाणिव करुन दिली. अखेरीस हो-ना करत केशवराव उठले.
सरदार कर्तारसिंगांना अग्नी देण्यापूर्वी गुरकीरतने त्यांच्या हातातलं कडं काढून घेतलं होतं. ते त्याने आपल्या हाती चढवलं.

मुरीदके छावणीतून जथ्यातील तुकड्या बाहेर पडू लागल्या. पुन्हा हिंदुस्तानच्या दिशेने वाटचाल सुरु झाली.

आपल्या गमावलेल्या नातेवाईकांच्या आणि मित्रमंडळींच्या आठवणी उराशी बाळगत आणि वारंवार भरुन येणारे डोळे पुसतच प्रत्येकाची पावलं पुढे पडू लागली. कोणीही कोणाशीही बोलण्याच्या मनस्थितीत नव्हतं माळरानात चरण्याला सोडलेली गुरं - ढोरं इतस्ततः भटकतात, जथा एका सरळ रेषेत चालला होता, इतकाच काय तो फरक!

क्रमशः

छावणी - ७                                                                                                                                      छावणी - ९

Group content visibility: 
Public - accessible to all site users

खरय.:अरेरे:

अविश्वसनीय… वाचताना जणू,, नजरे समोरच प्रसंग होत आहे असे होते …
अफाट लेखणी नाही तर समोर प्रसंग उभा राहत आहे असे वाटते. आताच वाचून येवढी धड धड होते अहे.
प्रत्यक्ष ज्यांच्य्वर हा प्रसंग झाला होता त्यंच्या बद्दल तर बोलणेच सोडा ……

सुन्न...फरच भयानक. आपण स्वातन्त्र्य खुपच लाइटली घेतोय. ह्या घटना आपल्या बरोबर घडल्या असत्या तर? विचार करुनच हातभर फाटली. लेखनशैली....टोपी काढली.

हा भाग खुपच भयंकर होता, फाळणीच्यावेळी कोणत्या परिस्थितीला करोडो लोकांनी तोंड दिले असेल हे वाचुन एकदम सुन्न व्हायला होते.:(