मला सल्ला हवा आहे

Submitted by स्वाती आम्बेकर on 12 November, 2014 - 08:09

सध्या मी एकत्र कुटुम्बामध्ये रहात आहे. मला एक दहा महिन्यांची मुलगी आहे. आम्ही मार्चमध्ये आमच्या नविन घरी रहायला जाणार आहोत. मी, नवरा आणि मुलगी. मी आणि नवरा दोघेही जॉब करतो. घराचे कर्ज असल्यामुळे मी जॉब सोडु शक़त नाही. पण मला मुलीलाही वेळ द्यायचाय. वाटत की घरूनच काहीतरी काम करावे. मी काय करू? माझा ब्युटी पार्लरचा डीप्लोमा झाला आहे. पण कॉम्प्लेक्समध्ये आधीच एक पार्लर आहे. बेबी सिटींग चालू करायचा विचार करतेय. काय करू?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

स्वती आम्बेकर, दहा महिन्यांच्या मुलीला वेळ देणं आणि बेबी सिटींगचा व्यवसाय दोन्ही अगदी हॅन्ड इन हॅन्ड जातंय. वेळेचं व्यवस्थापन, डोक्यावर बर्फ, तोंडात साखर आणि नवर्‍याच्या बाजूनी भरपूर समजूतदारपणा आणि मदतीचा हात , एवढं असेल तर यश तुमचेच आहे. :स्मितः
खूप खूप शुभेच्छा!

इतक्या कमी माहीतीवर आहे तो जॉब सोडावा का हे पण सांगता येत नाही.
आत्ताच्या जॉब चा पगार कीती?, कर्ज कीती? जॉब चा प्रकार काय आहे? वगैरे ह्या सर्वाचा विचार आधी करा.

आत्ताचा जॉब जर चांगला / बरा असला तर जॉब सोडुच नका. मुलीला सांभाळायला माहेर सासरच्या कोणाला तरी विनंती करा, २-३ वर्षानी पाळणाघरात ठेवा. सोडलेला जॉब परत मिळणे अवघड असते.

सध्याचा जॉब जर फार चांगला नसला तर ब्युटीपार्लर तुम्ही ट्रायल बेसिस वर शनि - रवि सुद्धा करु शकता. बघा कसा रीस्पाँस मिळतो आहे ते. मग अंतिम निर्णय घ्या.

सध्याच्या नोकरीत अर्धवेळेचा किंवा आठवड्यातील काही तास / दिवस घरून काम करायचा पर्याय आहे का, हे बघावे.
नोकरी लगेच न सोडता काही महिने रजा घेऊन काम होणार असेल तर तोही पर्याय पाहावा.
मायबोलीवरील उद्योजक ग्रुपात एकट्या व्यक्तीने करायचे व्यवसाय, कोणताही व्यवसाय सुरू करण्याअगोदरची पूर्वतयारी असे बरेच मार्गदर्शक धागे आहेत त्यांचा लाभ घ्यावा.

कोणत्याही व्यवसायाचा जम बसेपर्यंत किमान एक - दोन वर्षे जातात. त्यात अनोळखी परिसर असेल तर वेळ लागू शकतो. तोपर्यंत फारसे उत्पन्न न मिळता चालू शकणार असेल तरच व्यवसायाकडे वळावे असे मी सुचवेन. घरबसल्या बेबीसीटिंग किंवा शिकवण्यांसारखा व्यवसाय करायचा असेल तर त्यासाठीही तयारी लागेलच. शिवाय फिक्स्ड इन्कम सुरूवातीला तरी नसणार हे गृहित धरावे लागेल.

वस्तू होलसेल भावात विकत घेऊन घरगुती तत्वावर रीटेल भावात विकण्याचा व्यवसायही अनेक गृहिणी करतात. साड्या, तयार कपडे, ड्रेस मटेरियल, गिफ्ट आयटम्स, कॉस्च्यूम ज्वेलरी वगैरे. सौंदर्यप्रसाधन उत्पादनांची एजन्सी घेणे व ती खपविणे. तुम्ही जिथे राहायला जाणार आहात तिथे कोणत्या सोयीसुविधांची कमतरता आहे? त्या सुविधा उपलब्ध झाल्यास त्यांचा लाभ घेण्याची रहिवाशांची मानसिकता आहे का? याचाही शोध घ्यावा. अगदी उदाहरणादाखल, उद्या तुम्ही तिथे वडापाव विक्री करायचे ठरवले किंवा तयार पोळी भाजी / डब्याच्या ऑर्डरी घेतल्या तरी त्यांचा लाभ घेण्याची लोकांची परिस्थिती व मानसिकता आहे का, हे बघायला पाहिजे. नसेल तर ती निर्माण करायचीही तयारी हवी.

काँप्लेक्समधे आधीच असलेल्या ब्यूटी पार्लरबद्दल :

माझ्या शेजारी / गल्लीत नव्या डॉक्टरने दवाखाना टाकल्यावर तो चालणार नाही, किंवा माझा बंद पडेल असे अजिबात नसते. उलट माझ्याकडे वाट पहायला नको असणारे पेशंट तिकडे जाऊन येतात, तिकडचे सेकंड ओपिनियनला माझ्याकडे इ.

मुलीबरोबर वेळ देणं ही टॉप प्रायोरिटी असेल तर बेबीसीटींग हा मार्ग चांगला वाटतो. या बरोबर तुम्ही ब्युटीशियनचा व्यवसाय पण वाढवू शकाल. येणार्‍या बालकांच्या माता तुमच्या पहिल्या क्लायंट. त्यांना डिस्काऊंट वगैरे ऑफर करुन त्यांच्या मदतीनी क्लायंटेल वाढवू शकाल. हे सगळं होम बेस म्हणजेच मिनिमल इन्व्हेस्टमेंटमधे होऊ शकतं.

ब्युटी पार्लरमध्ये सेशन करून आलेल्या महिला सेकंड ओपिनियनसाठी दुसर्‍या ब्युटी पार्लरमध्ये जात नसाव्यात!

स्वाती आम्बेकर,

मुलगी की कर्ज हा प्रश्न असेल तर मुलगी हे प्राधान्य असायला हवे हे 'काही आय डीं च्या मते मी न देण्यासारखे मत असतानाही' म्हणत आहे. मग त्यासाठी एकत्र कुटुंबामध्ये राहा, नोकरी सोडा, घरून करता येईल असे नवे काम मिळवा किंवा घरीच पार्लर सुरू करा.

एक नक्की, मायबोली किंवा कोणत्याही संकेतस्थळावर अश्या अर्थाचा धागा काढून ह्या प्रश्नांची उत्तरे मिळत नसतात तर केवळ स्वतःच्या मताला जगातील कितीजण 'प्लस वन' देतात हे जोखता येते.

१) बेबी सिटींग आवडते का? पुढची ५ वर्षे तेच करू शकाल का? कारण एखादे मुल तुमच्याकडे कडे ४-५ महिने आले आणि नंतर तुम्ही परत विचार बदलून नोकरी केलीत तर त्या मुलाचे नकळत नुकसान होते (त्या बेबीला परत कुठेतरी नव्याने जुळवून घ्यावे लागते).
२) बेबी सिटींगचा व्यवसाय करायचा असेल तर ज्यांची पाळणाघरे आहेत अशा महिलांशी बोलून बघा. सहसा एक दोन मुलांच्या संगोपनाचा अनुभव असलेल्या महिला पाळणाघरे चालवतात. (स्वतःचेच मुल हवे असे नाही. कुणीही भाची पुतणी सांभाळण्याचा अनुभव हवा). शक्य असेल तर एखाद्या व्यावसायिक पाळणाघरात अनुभव घेणे उत्तम.
३) बेबीसिटींग ला फार भांडवल लागत नाही पण क्वचित विकेंड द्यावा लागतो (एखादे पालक नर्स, डॉक्टर किंवा तत्सम व्यवसायात असेल तर ड्युटीप्रमाणे ते विकेंडला जातात.) घरच्या लोकांची तयारी आहे का?

टोच्या यांनी सांगितल्याप्रमाणे आर्थिक गणित मांडणे आवश्यक. ब्युटी पार्लर बद्दल त्यांचा सल्ला योग्य आहे.

<< एक नक्की, मायबोली किंवा कोणत्याही संकेतस्थळावर अश्या अर्थाचा धागा काढून ह्या प्रश्नांची उत्तरे मिळत नसतात तर केवळ स्वतःच्या मताला जगातील कितीजण 'प्लस वन' देतात हे जोखता येते. >>

या मताला अनुमोदन. ज्याला आपली परिस्थिती व्यवस्थित माहिती आहे अशी व्यक्तीच योग्य सल्ला देऊ शकणार. आपले सर्वात चांगले सल्लागार आपण स्वतःच असतो. त्यानंतर जोडीदार, आईवडील, भाऊ बहीण व इतर कुटूंबीय व नातेवाईक किंवा मित्रपरिवार. यापैकी कुणीच योग्य सल्ला देऊ शकत नसेल तर तज्ज्ञ व्यावसायिक सल्लागार गाठा. ते माफक शुल्क आकारून तुमचे म्हणणे सविस्तर ऐकून घेतील, तुम्हाला अजून काही प्रश्न देखील विचारतील व सरतेशेवटी योग्य सल्ला देतील.

हौशी / मोफत / अर्धवट परिस्थिती माहिती करून त्यावर सल्ला देणार्‍यांपेक्षा हे केव्हाही चांगले.

घरी राहून व्यवसाय करणार असलात तरी त्या व्यवसायाला वेळ देणे आले. ब्युटिपार्लरचा व्यवसाय करणार असाल तर ज्या वेळात व्यवसाय करणार त्या वेळात मुलीला सांभाळायला घरात कुणीतरी खात्रीचे हवे.
बेबीसिटिंग करणार असाल तर त्यासाठीही वेळाचे बरेच नियोजन करावे लागेल. १० महिन्याचे स्वतःचे बाळ संभाळून इतर मुले संभाळणे हे सोपे काम नाही. तुमच्या मुलीचे वय बघता कुठल्या वयोगटातील मुले संभाळणे योग्य ठरेल याचा विचार करुन निर्णय घ्या. जी काही सेवा देणार आहात त्यासाठी जास्तीची मदत लागणार असेल तर त्याचाही खर्च लक्षात घ्या.

शक्य असेल तर एखाद्या व्यावसायिक पाळणाघरात अनुभव घेणे उत्तम.

+१

खूप जबाबदारीचं काम आहे दुसर्‍याचं मूल सांभाळणं. त्यात पूर्वतयारीनिशीच उतरा.

१० महिन्याचे स्वतःचे बाळ संभाळून इतर मुले संभाळणे हे सोपे काम नाही. तुमच्या मुलीचे वय बघता कुठल्या वयोगटातील मुले संभाळणे योग्य ठरेल याचा विचार करुन निर्णय घ्या. जी काही सेवा देणार आहात त्यासाठी जास्तीची मदत लागणार असेल तर त्याचाही खर्च लक्षात घ्या.>>>>>> +१.
सध्याचा जॉब न सोडता ,अकु आणि टोचा यांच्या सल्ल्याचा विचार करण्यात यावा.

बेफि,
>>
ब्युटी पार्लरमध्ये सेशन करून आलेल्या महिला सेकंड ओपिनियनसाठी दुसर्‍या ब्युटी पार्लरमध्ये जात नसाव्यात!
<<

इथे तुमच्या आकलनशक्तीच्या कमाल अन किमान मर्यादा स्पष्ट होतात.
नव्या पार्लरमधून जुन्याकडे जाणार नाहीत असं सुचवायचं असेल तर मात्र बरोबर आहे. असो. रात्र बरीच झाली आहे, तुमच्याशी वाद घालण्यात अर्थ नाही. बाय बाय.

सिमंतिनी ला अनुमोदन.

* प्रथम फक्त कर्ज आहे म्हणून नोकरी करणार असाल तर आहे तिच राहू द्यावी हे माझं मत. कारण स्वतःचा व्यवसाय (पार्लर वगैरे) सेट व्हायला बराच वेळ लागतो. शिवाय त्यात बरिच इन्व्हेस्ट्मेंट असते.

* पाळणाघर सुरू करणे हा पर्याय असू शकतो पण तुम्हाला त्यात खरंच रस आहे का हे तपासून पहा. ते काम खूप दमवणारं थकवणारं असू शकतं. त्यातून तुमच्या बाळाला किती आणि कसा वेळ (क्वालिटी) देऊ शकाल का याचा विचार करा. शिवाय यात इन्व्हेस्टेमेंट फार नसली तरिही त्यात कधी कधी रिस्क असू शकते. मुलांची काळजी घेण्यासाठी खूप दक्ष राहावे लागते.

* आहे ती नोकरी योग्य मोबदला देते का? किंवा ती बदलून अजून एखादी नोकरी जिथे कदाचित कमी मोबदला मिळेल पण कामाचे तास कमी असतील तर त्या पर्यायाचा विचार करू शकता.

* या आहे त्याच नोकरीत घरून काम करण्याचा पर्याय मिळतोय का ते पाहणे ही योग्य ठरेल.

सध्या इतकंच सुचतंय, तुम्हाला शुभेच्छा.

*

तुमच्या ऑफिसजवळ एखादं पाळणाघर असेल तर बघा ना.. म्हणजे ब्रेक मधे वगैरे जाउन बाळाला भेटता येइल.. अधुन मधुन घरुन काम वगैरे.. शक्य तितक्या सुट्या.. बाबाने तुम्हाला अन बाळाला ड्रॉप करणे.. पार्लर वगैरे ला इन्व्हेस्टमेंट लागेल भरपुर.. परत कर्ज काढणं शक्य आहे का? स्वयंपाकात रुची असेल तर टिफिन सेंटर चालु करता येइल..

माझ्या मते सध्या फक्त १० महिन्यांची मुलगी आणि मुलगीच! ही प्रायॉरीटी असली पाहिजे. तिच्याकडे तंतोतंत लक्ष देऊन संसाराला हातभार लावेल असे काही छोटेमोठे काम घरूनच करता येते का पहा.

आणखी एक म्हणजे आपल्या यजमानांना अधिक काही काम (त्यांच्या ऑफिस अवर्स नंतर) करता येते का पहा. काही वर्षे ही अशी कसरत करावी लागल्यास हरकत नाही.

अ‍ॅन्ड अबोव्ह ऑल,

शक्य असल्यास आहे तिथेच एकत्र कुटुंबात रहाता येतेय का ते पहा.

अतिच अवांतर, इब्लिसदा मी गेली ८ वर्ष एकाच पार्लर मधे जाते. मी एक वर्षासाठी बाहेर राज्यात गेलेले तेंव्हा पुर्ण वर्षभर दुसर्‍या पार्लरचं तोंडही पाहिलं नव्हतं.

माझा लूक ज्या हाताने बदलणार आहे तो हात भरवशाच्या नसेल तर मी त्या हातात माझा चेहरा देणार नाही.
मी स्वतः पार्लर न बदलणं प्रेफर करते. त्या काकू म्हातार्‍या झाल्या किंवा त्यांनी हा व्यवसाय बंद केला (तरीही त्या फक्त माझ्या एकटीची अपॉईंटमेंट घेतील हे मी वदवून घेतलंय त्यांच्याकडून) किंवा मी कायमची इतर कुठे तरी निघुन गेले तरच मी पार्लर बदलेन.
पार्लर बाबत सेकंड ओपिनिअन घेणार्‍या कोणी असतील असं वाटत नाही. पहिलं पार्लर आवडलं नाही तरच दुसरीकडे जातात. एका पार्लरचा कंफर्टझोन असताना दुसर्‍यात शक्यतो कोणी शिरत नाही Happy

नोकरी करणे & व्यवसाय करणे ह्या दोन्ही गोष्टी मध्ये खूप फरक असतो.
संपूर्ण मानसिकता वेगवेगळी असते.
व्यवसायाची घडी बसवण्याच्या काळात खूप कस लागतो. तीच गोष्ट मुल लहान असताना लागू पडते.
त्यातून तुम्ही एकत्र कुटुंबातून बाहेर पडत आहात.
कोणताही व्यवसाय सुरु करताना वेळ, पैसा , कौशल्य आणि नशीब ह्या गोष्टी आपल्या बाजूने लागतात.
नशीब तुमचे तुम्हाला माहित असेल पण तुमच्या लिहण्या वरून बाकी ३ गोष्टी वर काम करायला हवे आहे असे दिसते.
अवघड असे काही नसते पण खूप सारे बदल आपल्याला झेपतील का हा विचार आपला आपणच करावा लागतो.
कारण घेतलेला निर्णय निभावून आपल्यालाच न्यायचा असतो
वाटचालीस शुभेच्छा

ब्युटी पार्लर मध्ये सेकंड ओपिनियन साठी.....:P

अगं रिया इब्लिसदा म्हणतायत की अशी तू जरी असलीस तरी इतर बायका तशा नसतात...त्या नवे व जुने दोन्ही ट्राय करतात.

स्वाती घरून काम करण्यासाठी पण बरेच नियोजन करावे लागेल. आर्थिक झळ नोकरी सोडल्यावर थोडी तरी बसेलच, पण आधीची नोकरी सोडताना काही रक्कम मिळणार असेल आणि त्यातून एखादे वर्ष निदान कर्जाचा हप्ता जाऊ शकत असेलत तर अशी झळ सोसण्याचे नियोजन करता येऊ शकते.

नोकरीतील स्किल्स घरून काम करण्यासाठी वापरता येऊ शकतात. आजकाल थोडा नीट प्रयत्न केल्यास घरून करण्याच्या नोक-या देखील मिळतात. पण अशा नोक-या बाकीचे फायदे (रिटायरमेंट, पेन्शन, पीएफ) असे देत नाहीत.

<<<<<<माझ्या मते सध्या फक्त १० महिन्यांची मुलगी आणि मुलगीच! ही प्रायॉरीटी असली पाहिजे. तिच्याकडे तंतोतंत लक्ष देऊन संसाराला हातभार लावेल असे काही छोटेमोठे काम घरूनच करता येते का पहा.

आणखी एक म्हणजे आपल्या यजमानांना अधिक काही काम (त्यांच्या ऑफिस अवर्स नंतर) करता येते का पहा. काही वर्षे ही अशी कसरत करावी लागल्यास हरकत नाही.
शक्य असल्यास आहे तिथेच एकत्र कुटुंबात रहाता येतेय का ते पहा.>>>>आत्ममग्न अगदि योग्य सल्ला.

<<,पण मला मुलीलाही वेळ द्यायचाय>>>> हे वाटने आनि हि भावना खुप आवडलि.

बाळ तर मोठे होनारच आहे.पन बाळाबरोबर वेळ देणं आनि motherhood enjoy करने हे देखिल तेवढेच महत्वाचे नाहि का?

स्वातीजी तुम्हाला अनेक शुभेच्छा.

ब्युटी पार्लरमध्ये सेशन करून आलेल्या महिला सेकंड ओपिनियनसाठी दुसर्‍या ब्युटी पार्लरमध्ये जात नसाव्यात! >>

Smiley

अनेकांनी ब्युटी पार्लरच्या इब्लिस ह्यांच्या मुद्द्यावर मत व्यकत केले आहे परंतू सेकंड ओपिनियन ह्या गोष्टीचा बाऊ केला जात आहे असे वाटते.

इब्लिस ह्यांच्या मते, एकाच प्रकारची दोन दुकाने शेजारी शेजारी असली की त्यातले एक चालणार नाही ही भीती अनाठायी आहे. त्यांचे हे मत मलाही पटले आहे. शेवटी व्यवसाय अशा भाबड्या धारणांवर यशस्वी/ अयशस्वी होत असते तर मग काय!

स्वातीजी तुम्हाला नवीन घराच्या आणि बाळाच्या हार्दीक शुभेच्छा...
मी पण काही दिवसांनी ह्या फेज मध्ये जाणार आहे....आता एकत्र फॅमीलीमध्ये राहतेय्...
तुम्ही बाळ चांगल्या पाळणाघरात ठेवा नाहितर एखादी चांगली बाई माहीतीतली बाळ सांभाळायला लावा...जॉब सोडु नका....घरात पार्लर चालवणे आणि बाळ सांभाळणे फार अवघड आहे...बाळ मध्येच रडणार्...त्याला प्रायारीटी देणार की क्लायंटला?सगळेच तुम्हाला समजुन घेणारे असतीलच असे नाही...
बाळ हे तर सगळ्यात मोठी प्रायारीटी आहे पण पैसे देऊन तुम्हि ते करु शकता...आता नवीन फ्लॅट चे हप्ते भरपुर असतात्...तुम्ही दोघांच्या सॅलरी हिशेबात धरुन गणिते मांडली असणार्...तीच कायम ठेवा...घरुन अपेक्षा पण ठेवु नका..एकत्र फॅमिलीची मदत खुप कमी होते...माझा संसार आहे मी करिन हेच मनात ठेवा आणि कंबर कसा....बाळाला सोडुन जॉब वर जाणे अवघड आहे पण हे सर्व तुम्ही त्याच्यासाठीच तर करताय ना...
मी तर हेच करणार आहे....

आपल्या सर्वान्च्या प्रतिसादासाठी खुप खुप धन्यवाद! सध्याचा जॉब तसा ठिक आहे पण शेवटी प्रायव्हेटच आणि मार्केट्पण डाऊन आहे. काही सान्गता येत नाही. आणि घराचा ताबा मिळाल्यावर एकत्र कुटुम्बामध्ये रहाता येणार नाही. सासर्यानीच तस सान्गितल आहे. आणि मायबोलीवर सल्ला विचारण्याबद्द्ल म्ह्णाल तर माझ्या ओळ्खी खुप कमी होतात आणि मी खरच गोन्धळात पडले आहे.

स्वाती आम्बेकर - अनेकांनी खूप चाम्गले सल्ले दिले आहेत. तुम्ही नव्या घरात शिफ्ट झाल्यावर शिकवण्या, जेवणाचे डबे देणे हे करता येईल का पाहा. बेबी सिटिंग हा चांगला पण थकवणारा पर्याय आहे. त्यात स्वतःच्या बाळाला सांभाळून करायचे म्हणजे साधारण ६ वर्षाच्या वरची मुले घ्या. इथे आठवड्यात सुट्टी घेण्याचा पर्याय नसतो जो महिन्यातून एखादा दिवस जॉब मध्ये असतो.

माझ्या मते सध्या पार्लर चालवणं हा ऑप्शन चांगला नाही आहे कारण त्याला मदत्नीस हवी किंवा घरात मदतीला बाई हवी. कारण तुमचं बाळ लहान आहे. मदतनीस मिळणार असेल तर अशी भीती ठेवू नका की पार्लर कसे चालेल ते नक्की चालणार. काँप्लेक्षच्या बाहेरच्या बायकाही येतील. जुनं सेट पार्लर असेल म्हणून नवीन चालणार नाही असं नाही. जम बसायला थोडा वेळ लागू शकतो.

फक्त नवरा एकता खर्च पेलवू शकणार नसेल तर जॉब जोवर चालू आहे तोवर चालू द्याव असे माझे मत. पण खरच बर्डन येणार आहे का? का ही फक्त भीती आहे. असं विचारतेय कारण माझ्या डोक्यात ही भीती होती.
ऑगस्ट मध्ये मला जॉब सोडावा लागला तेव्हा मलाही भीती वाटली होती आता कसं. सहा जणांची जॉईंट फॅमिली. एक बेड रिडन पेशंट आणि बाकी दोनही पेशंट. ह्या तिघांशिवाय नवरा मी आणि मुलगा. नवरा कमावणारा एकटा. मुलगा शाळेत जाणारा. कसं जमेल? घरातल्या कामवाल्या बायांना काढावं लागेल का? आजीला पाहाणार्‍या बाईला काढावं लागेल का? मेलाला साध्या शाळेत घालावं लागेल का? पण जमतय.

इतकच नव्हे तर माझ्या थोड्याश्या सेव्हिंग्जमधून ज्वेलरी बनवून विकायचा बिझनेस सुरू केला तो चालू आहे थोडासा. आत्ता नफ्याचं सेव्हिंग होत नाहीये पण पुढे नक्की खूप फायदा आहे. सांगायचं कारण असं की एक दार बंद झालं की दुसरं आपोआप उघडतं. मी ह्या सर्वात स्वतःवर एवढच बंधन घालून घेतलं अनाठायी खर्च नाही करायचा. जसे दर वीकेंडला हॉटेलात जेवायला जाणे नवनवीन कपडे घेणे. प्रत्येक सणाला किंवा फंक्शनला साडी किंवा ड्रेस घेणे. किंवा सोने खरेदी मुहुर्तावर सोने किंवा दागिने विकत घेणे. इतरांना - नाततेवाईकांना काही ना काही कारणाने गिफ्ट देणे. पार्लरला जाणे, इत्यादी इत्यादी.

उगाच काळजी करू नकात, कागद पेन घ्या विचारांना मूर्त स्वरूप द्या. खर्च आणि इनकम लिहा मग तुम्हालाच कळेल तुम्हाला जॉब सोडणं शक्य आहे का? आणि सोडला तर कोणता बिझनेस ज्यात कमी इन्वेस्टमेंट आहे असा करणं तुम्हाला तुमच्या नव्या घरातून शक्य आहे.

ऑल द बेस्ट सगळं नीट होईल.