पॉझिटीव्ह दृष्टीकोन ठेवण्यासाठी मदत

Submitted by Mother Warrior on 5 November, 2014 - 13:10

मी आज कुठलेही ऑटीझमसंबंधित उपदेश करणार नाही तर मलाच थोडी मदत हवी आहे. आशादायी दृष्टीकोन ठेवण्यासाठी. कराल का?

झालंय असं, की मुलाच्या वय वर्षे २ पासून ऑटीझमशी झुंज देऊन जरा थकायला झाले आहे आता. हे सर्व किती दिवस चालणार, मुलगा कधी बोलणार अशा प्रश्नांनी आता २ वर्षं भंडावून सोडले आहे. आत्ता लिहीताना मला जाणवलं, २च वर्षं झाली या सगळ्याला? पण ७३० दिवस गुणीले २४ तास असं म्हटलं की जाणवते थकण्याची इंटेसिंटी.
दिवसाची सर्व कामे सुरळीत पार पडतातच, मुलाबरोबर हसतमुखाने दंगा केला जातोच, त्याचे जेवण-खाण आजारपण त्यात मी कुठेही कसूर होऊ देणार नाही. (बिलिव्ह मी, ऑटीझम आणि आजारपण = वर्स्ट काँबिनेशन! एरवी मुलं गृहीत धरतातच पालकांना परंतू माझा मुलगा आजारी पडला की माझी शब्दशः कसोटी असते. त्याची चिडचिड कमालीची वाढते व आपण शांत राहून त्याला काय होत असेल हे गेस करत राहणं = बॅटल.)

डोक्यात, मनात एकप्रकारची पोकळी येत चालली आहे. आयुष्य हे एक आनंददायी प्रकरण आहे हे विसरत चालले आहे. आयुष्य म्हणजे कर्तव्यांची रांग. मला ना काही वाचण्यात इंटरेस्ट राहीला आहे ना कुठला मुव्ही पाहण्यात. इतकंच काय, मी ऑटीझम बद्दलही वाचत नाही सध्या. याचा अर्थ असा नाही मी डिप्रेस्ड आहे. तो ऑप्शनच नाही उपलब्ध मला. परंतू बंद पडलेल्या गाडीला किकस्टार्ट देऊन जोमाने पळवायचे आहे. त्यासाठीच मदतीचे आवाहन.

आपण या पानावर आशादायी, ऑप्टीमिस्टीक, पेशन्स, जिद्द, हार्डवर्क इत्यादींबद्दल पोस्ट्स एकत्र करायच्या का? असं काहीतरी जे वाचून आमच्यासारख्या स्पेशल नीड्स मुलं असलेल्या पालकांना उभारी येईल. कारण पॉझिटीव्ह अ‍ॅटीट्युड हा एकच लाकडाचा ओंडका आम्हाला ऑटीझमच्या समुद्रात जरा तरंगत ठेऊ शकतो..आमचा तो ओंडका जरा तात्पुरता झिजत चालला आहे. जमल्यास आपण सर्वांनी मिळून तराफा बनवायचा का?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

इथे लिहिण्यासारखं माझ्याकडे फार काही नाही. उलट तुमच्यासकट सगळ्यांनी लिहिलेलं वाचून मलाच खूप काही मिळालंय.

कधीकधी निराश , हताश, हरल्यासारखं, थकल्यासारखं वाटणं चुकीचं नाही आहे. त्या भावनेलाही वाट मोकळी करून देणं गरजेचं आहे. बोलायला कोणी नसे त्या काळात माझ्या भावना मी डायरीत मोकळ्या करत असे.

मन दुसरीकडे गुंतवायचं असेल तर वाचन, टीव्ही, सिनेमा पाहणं यासारख्या पॅसिव्ह गोष्टींचा मला तरी उपयोग होत नाही. अशा वेळी लक्ष देऊन, पण स्वतः विचार न करता कराव्या लागतील अशा फिजिकल अ‍ॅक्टिव्हिक्टीज उपयोगी पडतात. : उदा: सीडीज लावून त्याबरहुकूम केलेला व्यायाम (ग्रुपमध्ये केला तर आणखी छान).

धन्यवाद भरत मयेकर, मंजू, देवकी, सिनी!!

एक बाप,
नातीगोती Sad मी बरंच पूर्वी पाहीले आहे. लग्नाच्याही आधी. तेव्हा अगदी हादरून गेले होते. बरीच लहान असताना कुठल्यातरी मॅग्झिनमध्ये स्वमग्न मुलांवरचे आर्टीकल वाचले होते. तेव्हाही हादरले होते. who knew माझं बाळ असंच होईल! :|
असो, मंटोंच वाक्य छान आहे! पागलखाना. Happy गेंड्याची कातडीची ऑर्डर कुठे द्यावी?

काल एक चांगली बातमी वाचली. ठाणे पोलीस डिपार्टमेंट काही अधिकार्‍यांना ऑटिस्टिक मुलांशी कसे वागायचे, त्यांना कसे समजून घ्यायचे ह्याचे ट्रेनिन्ग देणार आहे. मुले यदाकदाचित हरवली तर ती सिटीत जिथे
सापडतील तिथे त्यांच्याशी कसे वागायचे हे ह्या प्रशिक्षणाचा भाग आहे.

हळू हळू समाज सेन्सिटाइज होत आहे. सिस्टिम व परिस्थिती कृएल आहे म्हणून हताश न होता ती कश्या पद्धतीने बदलली पाहिजे ह्याचा विचार झाला तर पालकांना मदतीचे होईल व त्यांच्या लढ्याला हातभार लागेल. सरकारात पेटिशन देणे. कायद्याने सुविधा आणणे, मीडियातून समाजाला सेन्सिटाइज करणे असे मार्ग अवलंबिले पाहिजेत. एकट्याने लढू नका. समाजाला त्यात सहभागी करा. म्हणजे तुमच्या खांद्यावरचे असह्य ओझे शेअर होईल.

स्मित गेंड्याची कातडीची ऑर्डर कुठे द्यावी? >>>>> नाही गं राणी! असं नको बोलू Happy फक्त एकदाच आपल्या मनानेच उभी केलेली भिंत तोडायची हिंमत राखायची असते. आपल्यासमोर जे वाढून ठेवलं आहे ते आपल्यालाच फेस करायचं असतं आणि त्यात समाजाचा ताण कुठे बाळगत बसायचं? झुगारुन टाक असा काही ताण येत असेल तर. एखाद्या साध्याश्या गोष्टीलाही समाज अनेक बाजूंनी बघत असतो...कधी हळूवारपणे तर कधी रूक्षपणे...आत्ता आपल्याला पॉझिटिव्ह स्ट्रोक्सच उपयोगाचे आहेत त्यामुळे ते मिळाले तर तेच साठवून ठेव. बाकीचं क्लटर फेकून दे. गेंड्याची कातडी ही निब्बर असते. आपल्याला निब्बर व्हायचं नाहिये. आपल्या बाळाचं आणि आपलंही पॉझिटिव्ह लाईफ जगण्यासाठी फक्त काय निवडायचं ते ठरवण्यापुरता मनाला शांतपणा आला तरी बास आहे.

------
मन दुसरीकडे गुंतवायचं असेल तर वाचन, टीव्ही, सिनेमा पाहणं यासारख्या पॅसिव्ह गोष्टींचा मला तरी उपयोग होत नाही. >>>> भरत मयेकर, काही सल हे मुळापासूनच उपसून टाकावे लागतात. पॅसिव्ह गोष्टींनी ते वरवर झाकले जातात आणि जरा धक्का लागताच परत ठुसठुसायला लागतात.

केश्विनी,

>> ...मनाला शांतपणा आला तरी बास आहे.

हा शांतपणा कसा आणायचा ते तुम्हाला ठाऊक आहे. ते पण लिहा की !

आ.न.,
-गा.पै.

केश्वी + १००

गापै हा शांतपणा काही अनुभवां तून गेल्यावरच येतो. शिवाय स्वभावाचा कोमल कणखर पणा देखील. God's workshop is the best for survival tactics.

अमा, अगदी अचूक निरिक्षण. ऑटिस्टिक मुलांबद्दल भारतात गेल्या काही वर्षात झपाट्याने आलेला अवेअरनेस पाहून बरे वाटले.
इकडे अमेरिकेत स्पेशल नीड्स ट्रस्ट नावाचा प्रकार आहे तो छान आहे. थोडक्यात,

१ मुलाच्या नावावर पैसे न ठेवणे. त्यामुळे मुलगा सरकारी सोशल सिक्युरिटी कडून मिळणार्‍या मदतीला पात्र होतो.
२ ते पैसे ट्रस्ट मध्ये ठेवून आपल्या परिचितांना ट्रस्टी करणे. अर्थात त्यांनाही हे पैसे फक्त मुलासाठीच खर्च करता येतात. तेही जीवनावश्यक गोष्टीवर नाही.
३ मुलाच्या नावावर पैसेच नसल्याने
अ) मुलावर एखाद्याने खटला भरला तर त्या पैश्याला हात लावता येत नाही.
ब) ही मुले अतिशय भोळी असतात त्यामुळे केवळ पैश्यासाठी एखाद्या व्यक्तीने लग्न केले आणी घटस्फोटात अर्धी रक्कम घेतली असे होत नाही.
क) चेकवर मुलाची सही घेतली आणी रक्कम लांबवली असे होत नाही.

ए बी ए चा उपयोग आम्हाला झाला. गणितात dy/dx पोझितिव्ह असेल तर क्ष वाढेल तसा य वाढतोच तशी प्रगती आहे. dy/dx कमी असेल, पण पोझितिव्ह आहे. मुलाचे टोयलेत ट्रेनिंग कसे करायचे या चिंतेत आम्ही जागरण करत असू, आज तो आमच्या आधे उठतो, शॉवर करून कपडे बदलून आय पॅड खेळत बसत्तो.

त्याला बूर्बन बिस्किटातले क्रीम फार म्हणजे फार आवडत असे, पाच वर्षाचा असताना शेजारची मुलगी आमच्या घरी आपली वैवाहिक समस्या सांगून रडत होती. त्याने स्वतःसाठी कुठेतरी लपवून ठेवलेले बिस्किट आणले, त्यातले क्रीम काढले आणी तिच्या तोंडात घालू लागला. त्यावेळी तो टोटली नॉन व्हर्बल होता.

>>काही सल हे मुळापासूनच उपसून टाकावे लागतात. पॅसिव्ह गोष्टींनी ते वरवर झाकले जातात आणि जरा धक्का लागताच परत ठुसठुसायला लागतात

क्या बात है! अशा वेळी अल्कोहोल म्हणजे तर रोगापेक्षा औषध भयंकर.

एकदा मी खूप काम करून दमून आलो होतो आणी आल्या आल्या तिने कोणत्यातरी नव्या उपाया साठी दहा हजार डॉ मागितले तेव्हा मी उखडलो आणी म्हणालो, मी तिकडे राब राबून कमवतो, तु उडव. वो मेरा जरा चुक्याच! कधी कधी थेरपी चा ग्राफ मनासारखा नसेल तर ती ओरडते. शेवटी ही लढाई नवरा वि बायको अशी नसून नवरा बयको मुलगा वि ऑटिझम आहे हे लक्षात ठेवले की पुरे

घर दोघांच असत दोघांनी सावरायच.
एकाने विस्कतल तर दुसर्‍याने आवरायाच.

( आता चिनूक्स येऊन माझ्या डोक्यात प्रताधिकाराचा दांडू मारणार )

नताशाचे वाक्य सगळ्यांनाच खूप मार्गदर्शक आहे.

केश्वी, अमा, +१००

भारताबाहेर एक्सटेंडेड फॅमिलीपासून दूर रहात असाल तर बरेचदा तुमचे मित्र हेच तुमची एक्सटेंडेड फॅमिली असते. त्यांना शक्य तितक्या लवकर खरी परीस्थिती सांगावी. होणारे गैरसमज टळतात आणि आपल्यासाठी आणि बाळासाठी हळूहळू सपोर्ट सिस्टिम तयार होते. सब डिविजनमधल्या शेजार्‍यांनाही माहिती असावी. पिल्लू जसे मोठे होते तसे एकटे घराबाहेर पडून भरकरटण्याचे चान्सेस वाढतात. घर सिक्युअर करणे, ट्रॅकिंग डिवाइस हे उपाय आहेतच पण जोडीला शेजार्‍यांना तुमचे मुल आणि त्याची कंडीशन माहित असणे आवश्यक. एकदा माहिती झाले की शेजारी कंडीशन समजून घ्यायचा प्रयत्न करतात. मदतीचा हात देतात. गावातील पोलिसांनाही माहिती द्यावी. जितक्या जास्त लोकांना तुमच्या मुलाबद्दल माहिती असेल तितके चांगले. ऑटिझम सर्कलच्या बाहेरचे आधाराचे जाळे तयार होते.
माझ्या ओळखीच्या कुटुंबाने आपले मुल ऑटिझम स्पेक्ट्रम वर आहे हे दुसर्‍याच भेटीत सांगितले. मुल अतिशय बुद्धिमान आहे. वर वर बघता सामान्य आहे. त्यांनी सांगितले नसते तर त्याचे काही वर्तन बघून आमच्या मनात मुलाबद्दल गैरसमज निर्माण झाला असता. त्याची हेल्थ कंडीशन माहित झाल्याने आता तेच वर्तन आमच्यासाठी सामान्य आहे. आमच्या लेकालाही आम्हाला समजावून सांगता आले. साहाजिकच या मुलाशी खेळताना माझ्या लेकाच्या अपेक्षाही त्याप्रमाणे अ‍ॅडजस्ट झाल्या. तो अधिक चांगल्या प्रकारे दादाची भूमिका निभावू शकला. माझ्या नवर्‍याचा मेंटी देखील ऑटिझम स्पेक्ट्रमवर आहे. ओळखीच्या मुलामुळे ऑटिझम बाबत थोडाफार होमवर्क झाला होता त्यामुळे नव्या मेंटीला समजून घ्यायला मदत झाली.
आजूबाजूचे लोकं नेहमीच क्रूर असतात असे नाही. बरेचदा अज्ञानामुळे क्लेश देणारे वर्तन होते. जेवढा अवेअरनेस वाढेल तेवढे समजून घेणे, सामावून घेणे वाढेल. हा लढा तुमच्या एकट्याचा नाही. आम्ही सगळे तुमच्या बरोबर आहोत.

अमा, दॅट्स द प्लॅन. अजुन तितका मोकळेपणा जमत नाही. पण जमवावा लागेल भविष्यात. मित्रमंडळात किंवा नातेवाईकांत मुलाबद्दल माहीती नसणे याचे ओझे जास्त होते. कधी जमेल माहीत नाही, परंतू प्रयत्न चालू आहेत.

तुम्ही लिहीलेले समाज सेन्सिटाईज होतो आहे हे पटले. खरं सांगायचे तर स्वानुभव असा आहे, की थोडीच ओळख असलेली लोकं समजुतदारपणे वागतात. परंतू रोजच्या संपर्कातील बरीच लोकं याबाबतीत मॅचुरिटी दाखवत नाहीत. खरंतर मी कशाला कोणाचा विचार केला पाहीजे? पण असं होतं खरं. बदलायचे आहे ते.

अश्विनी के, प्रतिसाद खूप आवडला. धन्यवाद! Happy

एक बाप, स्पेशल नीड्स ट्रस्टबद्दल काहीच माहीत नव्हते. शोध घेते आता. थँक्स!
मुलाचे टोयलेत ट्रेनिंग कसे करायचे या चिंतेत आम्ही जागरण करत असू, आज तो आमच्या आधे उठतो, शॉवर करून कपडे बदलून आय पॅड खेळत बसत्तो. सध्या आम्ही यातल्या पूर्वार्धात आहोत. उत्तरार्धातला आमच्या आधी उठून आयपॅड खेळत बसणं इतकंच खरं आहे आमच्या बाबतीत. बाकीचेही लवकरच सत्यात उतरावं. आमची एबीए थेरपिस्ट आम्हाला कायम सांगते, स्पेशल नीड्स चिल्ड्रेनच्या बाबतीत एक गोष्ट फार महत्वाची आहे. सेल्फ हेल्प स्किल्स. आम्ही अजुन बरेच मागे पडतो यात. मुलाला कपडे बदलणे, दात घासणे, पॉटी ट्रेनिंग अजुन येत नाही. त्यावर जास्त लक्ष द्यावे आता.

बिस्किटातल्या क्रीमची स्टोरी गोड! Happy

शेवटी ही लढाई नवरा वि बायको अशी नसून नवरा बयको मुलगा वि ऑटिझम आहे हे लक्षात ठेवले की पुरे>>> क्या बात है. आणि हेच कित्येकदा विसरायलाही होते!! कारण प्रत्येकाचे ताण वेगळे व त्या ताणांना रिअ‍ॅक्ट करायच्या पद्धती वेगळ्या.

स्वाती२ धन्यवाद! विशेषतः या ओळी तर फार आवडल्या.
आजूबाजूचे लोकं नेहमीच क्रूर असतात असे नाही. बरेचदा अज्ञानामुळे क्लेश देणारे वर्तन होते. जेवढा अवेअरनेस वाढेल तेवढे समजून घेणे, सामावून घेणे वाढेल. हा लढा तुमच्या एकट्याचा नाही. आम्ही सगळे तुमच्या बरोबर आहोत.

लोकं क्रूर नाहीत परंतू आम्ही अजुन तेव्हढे मानसिकदृष्ट्या स्ट्राँग नाही आहोत. ज्या २-३ फॅमिलीजना माहीत आहे त्यांच्याशी देखील बोलताना कधी आवंढा येईल सांगता येत नाही. आणि मी मनातल्या या डीप डार्क भावनांना फार वाट करून देणारी मुलगी नाही. पण अर्थात जमेल हळूहळू. Happy

तुमचे मित्र हेच तुमची एक्सटेंडेड फॅमिली असते. त्यांना शक्य तितक्या लवकर खरी परीस्थिती सांगावी. होणारे गैरसमज टळतात आणि आपल्यासाठी आणि बाळासाठी हळूहळू सपोर्ट सिस्टिम तयार होते.>>>>>>>>>>> +१
स्वाती, सुरेख प्रतिसाद.
ज्या २-३ फॅमिलीजना माहीत आहे त्यांच्याशी देखील बोलताना कधी आवंढा येईल सांगता येत नाही. आणि मी मनातल्या या डीप डार्क भावनांना फार वाट करून देणारी मुलगी नाही. >>>>>>>>>>> पुलंनी म्हटल्याप्रमाणे आपल्याकडे सहानुभूतीला वेगळाच अर्थ आला आहे.वास्तविक सहानुभूती म्हणजे 'सह + अनुभूती' असा आहे.कदाचित तुम्हांलाही परिचितांशी बोलल्यानंतर बरे वाटेल.

>>आम्ही अजुन तेव्हढे मानसिकदृष्ट्या स्ट्राँग नाही आहोत. ज्या २-३ फॅमिलीजना माहीत आहे त्यांच्याशी देखील बोलताना कधी आवंढा येईल सांगता येत नाही.>>
तुम्ही खूप स्ट्रॉन्ग आहात. आता आपल्या पिल्लासाठी हळवे असणे अगदी सहज आहे. त्यामुळे दाटणारा आवंढा अगदी नॉर्मल. माझ्या लेकाच्या आजारपणात मला उपयोगी पडलेली गोष्ट म्हणजे अशा वेळी एक दीर्घ श्वास घ्यायचा, डोळ्यात पाणी आले तर अलगद पुसायचे आणि एक्सुज मी म्हणायचे. समोरच्या व्यक्तीने सहानुभुतीने खांद्यावर ठेवलेला हात God's grace म्हणून स्विकारायचा. असे केल्याने आपण दुबळे ठरत नाही. उलट आपले असे हम्बल होणे आपल्याला आतुन कणखर बनवते. जोडीला आपल्या बाळाभोवती असलेले प्रेमाचे वर्तुळ मोठे होते.

तुमचे मित्र हेच तुमची एक्सटेंडेड फॅमिली असते. त्यांना शक्य तितक्या लवकर खरी परीस्थिती सांगावी. होणारे गैरसमज टळतात आणि आपल्यासाठी आणि बाळासाठी हळूहळू सपोर्ट सिस्टिम तयार होते. >> +१०००

जगी सर्व सुखी असा कुणी नाही त्यामुळे दुसर्याचे वेगळेपण, दुसर्याचे दुखः लोक बोलतच राहतात. त्यामुळे परिस्थिती आपण स्वतः नाही सांगितली तरी कुठून कुठून कळते, वर मीठ-मसाला लावून कळते. त्यापेक्षा जे लोक आपल्याला महत्त्वाचे वाटतात त्यांना स्वतःहून सांगणे नात्यात मोकळेपणा आणते.

मुलाला स्पेशल नीड्स आहेत अस सांगणे आवंढा आणणारे ठरू शकते. पण आपल्या मुलाचे एफर्टस आणि वेज ऑफ कनेक्शन शेयर करणे ह्या बाबतीत तू एक सर्वसामान्य आई आहेस. सगळ्या आया हेच करतात. जशी तू मदर वॉरियर आहेस तसा तो ही सन वॉरियर आहे. त्याचे स्पेशल एफर्टस आणि स्पेशल वेज ऑफ कनेक्शन मित्र मंडळी, नातेवाईक यांच्याशी शेयर केलेस तर त्यात आवंढा आणणारे काही नाही.

क्रीम बिस्किटाची स्टोरी कशी मस्त! स्पेशल वे ऑफ कनेक्ट!! आवडलच.

क्रीम बिस्किटाची गोष्ट एकदम मस्त.
ऑटिझमबद्दल मी न्यू सायंटिस्टात एक लेख वाचला होता, त्यात सांगितले होते की आपण सतत एखाद्या नाइटक्लबात जोरदार संगीत/ रंगीबेरंगी दिवे अश्या वातावरणात राहिलो तर आपल्या संवेदना कश्या भंजाळून जातील तसे काहीसे स्पेक्ट्रमवर एका बिंदूच्या पलिकडे गेल्यावर होऊ लागते. कोणत्या न कोणत्या संवेदना भंजाळतात. पण बाकी विचार करणारा मेंदू तोच असतो, हुशार मनुष्याचा. त्यामुळे बोलता/ लिहिता/ सांगता आले नाही तरी कळत सगळे असते. ती व्यक्त न करता येण्याची धडपड किती अवघड असे मला कायम वाटते.

<<<<< डोक्यात, मनात एकप्रकारची पोकळी येत चालली आहे. आयुष्य हे एक आनंददायी प्रकरण आहे हे विसरत चालले आहे. आयुष्य म्हणजे कर्तव्यांची रांग. मला ना काही वाचण्यात इंटरेस्ट राहीला आहे ना कुठला मुव्ही पाहण्यात. इतकंच काय, मी ऑटीझम बद्दलही वाचत नाही सध्या. याचा अर्थ असा नाही मी डिप्रेस्ड आहे. तो ऑप्शनच नाही उपलब्ध मला. परंतू बंद पडलेल्या गाडीला किकस्टार्ट देऊन जोमाने पळवायचे आहे. त्यासाठीच मदतीचे आवाहन. >>>> खाली देत असलेले मत पूर्णतः वैयक्तिक आहे जर ते कोणालाही आक्षेपार्ह अथवा बोचणारे वाटले तर मोकळेपणाने सांगा - मी ते काढून टाकीन ...

या वर दिलेल्या परिस्थितीतून कोणतीही व्यक्ति सतत जात असतेच - भले ती सुस्थितीत असो वा काही कौटुंबिक वा शारिरीक वा इतर कोणत्याही बाबींमुळे ती त्रासलेली असो. आपण जरा अंतर्मुख झालो तर लक्षात येईल की आपल्या मनाचा एक ग्राफ आहे - जो कधी कधी किरकोळ कारणांमुळे फारच वर-खाली होतो तर कधी याच मनाची एक फेज असते ज्यात अनेक मनाविरुद्ध गोष्टी घडूनही हा ग्राफ बराच सरळ रेषेत जात असतो - आपणच या ग्राफवर लक्ष ठेवायचे - आपल्या जोडीदाराच्याही मनाच्या ग्राफवर वा आपल्या मुलांच्या मनाच्या ग्राफवरही.

एखाद्या गोष्टीकडे जरा तिर्‍हाईतासारखे वा तटस्थपणे पहाणे जमल्यास कोणतीही परिस्थिती कधी आटोक्याबाहेर गेली आहे असे मनाला वाटणार नाही - ती एक "मनाची फेज" म्हणून आपण त्रयस्थपणे बघायला लागू - अँड आय थिंक दॅट्स दि सोल्यूशन - या क्षणोक्षणी बदलणार्‍या आपल्या जगात कायमस्वरुपी काही सोल्यूशन निघणे अवघड आहे - आलेला क्षण कसा निभावतोय याला महत्व देत राहिलो की पुढचा क्षणही निभावता येईलच येईल -

मन फार गुंतागुंतीचे आहे - त्याच्यावर जितका विचार करु तितके थोडेच - पण त्याच्या फेजेसकडे बघता आले तर त्याचे सामर्थ्य वा कमकुवतपणा दोन्हीची ओळख तरी होईल - त्याचा सुयोग्य वापर आपण जिद्दीने, प्रयत्नाने करीत असतोच की....

फार लांबण लावल्याबद्दल क्षमस्व. Happy

एखाद्या गोष्टीकडे जरा तिर्‍हाईतासारखे वा तटस्थपणे पहाणे जमल्यास कोणतीही परिस्थिती कधी आटोक्याबाहेर गेली आहे असे मनाला वाटणार नाही - ती एक "मनाची फेज" म्हणून आपण त्रयस्थपणे बघायला लागू - अँड आय थिंक दॅट्स दि सोल्यूशन - या क्षणोक्षणी बदलणार्‍या आपल्या जगात कायमस्वरुपी काही सोल्यूशन निघणे अवघड आहे - आलेला क्षण कसा निभावतोय याला महत्व देत राहिलो की पुढचा क्षणही निभावता येईलच येईल ->>+१

हे अजून सोपं करण्यासाठी आपल्या दिवसाचे घटनांप्रमाणे छोटे छोटे भाग करायचे. ती ती वेळ आपण यशस्वीरित्या निभावून नेली गेली की ती एक अचिव्हमेंट असल्यासारखं, एक टप्पा पार पडल्यासारखं मनातल्या मनात स्वतःलाच मार्क्स द्यायचे. मग पुढच्या घटनेला /परिस्थितीला तोंड द्यायला हुरुप येतो आणि कॉन्फिडन्सही येतो. आपल्याला समजतं की हे आपण करु शकतो आणि वाटतं तसं अशक्य/कोलमडून टाकणारं नाहिये. हे म्हणजे आपले आपल्यालाच छोटे छोटे पॉझिटिव्ह स्ट्रोक्स देणं, ज्याची आपल्याला नितांत आवश्यकता असते. इतर लोक नेहमीच आपली ती गरज समजू शकतील असं नाही. मग आपणच आपला मित्र व्हायचं Happy

आपल्या मनाचा एक ग्राफ आहे - जो कधी कधी किरकोळ कारणांमुळे फारच वर-खाली होतो>>> अगदी योग्य लिहलतं ...

यात स्पेशल नॉनस्पेश्ल असे काही नाहिय. अगदी चहात साखर कमीजास्त झाली / लोकल चुकली / फोनची रेंज गेली म्हणुन नॉनस्पेशल लोकांना येणारा स्ट्रेस हा रोजच्या स्पेशल लोकांना ( पिपल विथ स्पेशल किड्स) बेडवेट / दुखापत इत्यादी पेक्षा कितीतरी जास्त असु शकतो, व्यक्तिपर्त्वे.

हा जो ग्राफ आहे तो हार्मोनिक पध्दतीचा अस्तो. सिंपल पेडुलम सारखा. एका बाजुला एक्स्ट्रीम गुड दुसर्‍या बाजुला एक्स्ट्रीम बॅड. मॅनिया !!!! याचा दोलन काळ वेगवेगळा असतो. काहि तासापासुन ( जे लोक सायकियाट्रिक ट्रिटमेंट घेतात) ते काही महिण्यांपर्यंत ( नॉर्मल लोक Wink ) . प्रत्येकाची फ्रिक्वेन्सी (वारंवारता) वेगळी प्रत्येकाची अ‍ॅम्प्लिट्युड (आयाम) वेगळी. ज्याची अ‍ॅम्प्लिट्युड ० त्याला बहुतेक स्थितप्रज्ञ म्हणत असावेत.

आपापली अ‍ॅम्प्लिट्युड कमी करत रहाणे हाच यावर उपाय आहे. तो लगे रहो Happy

बहुआयामी हा शब्द देखिल अ‍ॅम्प्लिट्युड यावरुनच आला असेल असे वाटते.

I am on phone so can't write too much or in Marathi. I feel you should not give too much importance to How should we tell others? There is nothing to tell or its not the news of the day. If you had stopped having or visiting social functions like birthdays, weddings etc. You should start attending those again. For people who are your person, you don't have to say anything and they will understand everything. People who needs explanation, clarifications; have doubts and needs more information have no intention of becoming useful to you. Usually people are " chhidra asel tar bot ghalun bhok karnar" type. As long as your near and dear like both Grandparents and so kaka, aatya, mavashi, mama knows you should be alright.

If this post is inappropriate in any manner, let me know and I'll delete it.

माझे दोन पैसे:

आपल्या बाबतीत घडलेल्या छोट्या-मोठ्या चांगल्या गोष्टी लगेच लिहून ठेवायच्या, तारीख-वार-वेळेसकट. लो फेज असताना ही डायरी वाचली तरी त्या एकेक आठवणीनेही छान वाटते.

जुने फोटोज पहायचे.

कोणाशीतरी बोलायचे. कोणत्यातरी मार्गाने व्यक्त व्हायचे. एखादे ईमोशन साचून राहिले की जेव्हा फ़ायनली ते बाहेर पडते तेव्हा हमखास वाईट/ नकोसे वळण घेते. वेळीच भावनांचा निचरा झाला की आपण बरेचसे ठिकाणावर राहतो.

स्ट्रेसफुल परिस्थितीमध्ये चुकूनमाकून जवळच्या व्यक्तींना/ मित्रांना उलटसुलट बोलून गेलो तर लागलीच मनापासून माफी मागायची. त्यात कमीपणा वाटून घ्यायचा नाही. पुन्हा असं होणार नाही याची काळजी घ्यायची.

तुमचा विश्वास असेल तर प्राणायाम करा, ॐकारसाधनेनेही खूप फरक पडतो.

मदत मागा. मदत घ्या. कोंडून ठेवू नका.
चॉकलेट क्रीमचा किस्सा किती गोड! गॉड ब्लेस!

मी जिथे गाणे शिकतो आहे तिथे एक मुलगी तेरा वर्षांपासून तिच्या वडीलांसोबत येते. ती स्पेशल किड आहे. तिची शाळा, खाणे, पिणे, सर्कल सगळे वेगळे आहे. ती फक्त बघून हसते. सर तिला जे शिकवतात ते त्यांच्या मागे म्हणते. असे म्हणतात संगीताचा खास करुन आपल्या रागाचा आपल्या भावनिक जगावर खूप सकारात्मक परिणाम होतो. हेच सतारमधून निघणार्‍या सुरांसाठीही आहे. तुम्ही ही म्युझिक थेरपी तुमच्या बाळाला देऊन बघा.

शशांक, मनाचा आलेख खूपच छान.

<<<<< या क्षणोक्षणी बदलणार्‍या आपल्या जगात कायमस्वरुपी काही सोल्यूशन निघणे अवघड आहे - आलेला क्षण कसा निभावतोय याला महत्व देत राहिलो की पुढचा क्षणही निभावता येईलच येईल - >>>>>>पुरंदरे शशांक अगदि योग्य
मला आवडनारे काहि अनमोल वचन

"Everything changes, nothing remains without change."

हजार लड़ाई जीतने से अच्छा है अपने आप को जीतना. फिर जीत तुम्हारी है. इसे तुमसे कोई नहीं ले सकता न ही स्वर्गदूतों द्वारा न ही राक्षसों द्वारा, न ही स्वर्ग या नरक में.

निश्चित रूप से जो नाराजगी युक्त विचारों से मुक्त रहते हैं वही शांति पाते हैं.
शांति मन के अन्दर से आता है. इसके बिना इसकी तलाश मत करो.
जैसा हम सोचते हैं, वैसा ही बन जाते हैं.

सगळ्यांच्या पोस्ट खूप छान! काल स्पे. मुलांची शाळा 'संज्न्या संवर्धन' च्या सांस्कृतिक कार्यक्रमाला गेले होते. खूप छान कार्यक्रम झाला. त्यांच्या संपुर्ण टीमच्या मेहनतीला, धीराला ....माझा सलाम.... २० वर्षाच्या मुलाचा डान्स बघून माझ्या शेजारी बसलेल्या आईच्या डोळ्यात घळाघळा अश्रु .... आनंदाचे ... जुळ्यापैकी एक सामान्य... एक स्पे. कम्पुटरशी खूप दोस्ती... त्याच शाळेत कम्पुटरवर शाळेची कामे करतो....
मागे इथे संवेदना शाळेबद्दल लिहीलं होतं, तिथे शिकणारा चैतन्य मेडीकल ट्रान्सक्रिपशन करतो ... अशी बरीच सकारात्मक उदाहरण आहेत.... पिल्लु काय करु शकतो, त्याचा शोध घेणं पेशन्सच काम आहे.... धीर सोडू नको....

>>For people who are your person, you don't have to say anything and they will understand everything. People who needs explanation, clarifications; have doubts and needs more information have no intention of becoming useful to you.>>
पटले नाही. निदान ऑटिझम बाबत तरी. या व्याधीत प्रत्येक केस युनिक असते. तुमच्या मुलाबद्दल तुम्ही सांगितले नाही तर लोकांना कळत नाही. छोटीशी, इतरांना सामान्य असलेली गोष्ट देखील मेल्ट डाऊन ला कारणीभूत होऊ शकते. लोकं नेहमीच उगाच वायफळ कुतुहलापोटी विचारत नाहीत. तर मुलाबद्दल जास्त माहिती करुन घेवून त्याला सामावून घेण्यासाठी काय कसे करावे याचा प्रयत्न करत असतात. गेस्ट लिस्ट मधे एक कुटुंब ऑटिस्टिक मुल असलेले असेल तर इतर कुटुंब बोलावताना त्यांची मुलं काय वयाची, कितपत समजूत असलेली आहेत याचा विचार करावा लागतो. मुलाला सेन्सरी ओवरलोड होऊ नये म्हणून काय चालते काय नाही हे विचारणे, सध्याची त्याची प्रगती वगैरे विचारले तर त्यात गैर काय? बरेचदा थेरपीचा भाग म्हणून स्पेशल डाएट वगैरे असते. माहिती असेल तर पर्यायी व्यवस्था करता येते.
ऑटिझम हा तुमच्या, तुमच्या बाळाच्या आयुष्याचा एक भाग आहे. त्याबद्दल लोकांनी प्रश्न विचारले, अगदी वायफळ कुतुहल म्हणून, तरी मॅटर ऑफ फॅक्ट उत्तरे द्यावित. पुन्हा एकदा सांगते. जेवढा अवेअरनेस वाढेल तेवढे सामावून घेण्यासाठी प्रयत्न वाढतील. आज जगात १% लोकं ऑटिझम स्पेक्ट्रम सह जगत आहेत. अमेरिकेत नव्या बाळांमधे ६८ पैकी १ हे प्रमाण आहे. सामावून घेण्यासाठी सोई-सुविधा, डिस्क्रिमिनेशन होऊ नये म्हणून लोकांचे प्रबोधन, संशोधनासाठी पैसे हे सगळे होण्यासाठी लोकांचा सातत्याने सपोर्ट हवा. हा सपोर्ट अवेरनेस मधून येणार आहे. स्टिग्मा आहे, मान्य! आपल्याला तो दूर करायचाय.

Stigma aahe hech malaa vyaktishah maanya nahiye. Baakeeche jara pc milala tar lihin.

Sorry! Swati2 for disagreeing Sad

>>Stigma aahe hech malaa vyaktishah maanya nahiye.>>
स्टिग्मा असणे मलाही मान्य नाहीये. पण तो आहे ही रियालिटी. त्यातून डिस्क्रिमिनेशन होते, बुलींग होते. प्रत्येक वेळी निगेटिव न्युज मधे व्यक्तीला ऑटिझम स्पेक्ट्र्म असेल तर ते पुन्हा पुन्हा सांगितले जाते. नवर्‍याच्या मेंटीला प्रत्येक परीक्षेसाठी कायद्याने जादा वेळ मिळू शकतो. पूर्ण पेपर सोडवण्यासाठी ते आवश्यक आहे पण मित्र हसतील या भीतीने तो तसे करत नाही. त्याला शंभर पैकी ८० मार्काचे सोडवायला वेळ पुरतो. त्याच्या बर्‍याचशा शिक्षकांनाही त्याची कंडीशन माहित नाही. काउंसेलर आणि माझा नवरा दोघे समजावून थकले. सॅट साठी त्याला शेवटी समजावून सांगितले की तू त्या वर्गात एकटाच असशील कुणालाच कळणार नाही, तेव्हा पटले.
याउलट ज्युवेनाईल डायबेटिस असलेले मुल स्टिग्मा नसल्याने शुगर लेवल मेंटेन करायला स्नॅक ब्रेक लागेल हे उघडपणे सांगू शकते. टिचरही गरज पडल्यास असावे म्हणून योग्य ते स्नॅक्स वर्गात ठेवतात.

स्वाती२, बरोबर. तसंच ज्युवेनाईल डायबिटीस किंवा बाकीचे आजार, अ‍ॅल र्जी हा स्टिग्मा नसल्याने वर्षाच्या सुरूवातीलाच तुमच्या मुलांना ह्यापैकी काही असल्यास काय औषधं घ्यावी लागतात हे तसंच एपिपेन वगैरे बद्दल सांगावं लागतं.

नव्याने मैत्री झालेल्या एका मैत्रिणीची ९ वर्षाची मुलगी स्पेशल कीड होती. तिच्या घरी गेले की मोठी दोघे मुले मस्त गप्पा मारून जायची. हि काहीच बोलायची नाही पण निघायला पायात चपला घातल्या की ती नेहमी मला एक तिने रंगवलेल चित्र आणून द्यायची. तिला हिंदी समजत नसेल म्हणून तिच्या मातृभाषेत माझ्या मोडक्या गुजरातीत तिच्याशी बोलायचा प्रयत्न करीत होते. तरी नो रीस्पोंस. मग तिच्या आईने मला समजवले ती वेगळ्या पद्धतीने लोकांशी कनेक्ट होते. चित्र काढून, तिला कुणी आवडले तर ती चित्र देते (स्वतःवर लई खुश झाले मी Happy ) आणि अजून तिच्याशी कसे संवाद करायचे ह्याची बरीच माहिती. आईने सकारात्मक आणि प्रेमाने सांगितले नसते तर मला अॉकवर्ड झाल असते. पुढे मी त्यांच्या कडे गेले की तिच्याशी फारसे बोलायच्या धडपडीत न पडता तिच्या शेजारी बसून चित्र रंगवत राहत होते. मजा यायची.
नंतर मी घर बदलले. आता भेटी होत नाहीत. मैत्रिणीची इमेल आली की मुलगी तुझी आठवण काढते हे आवर्जून लिहिते. मुलीने दिलेली चित्र मी अजूनही फेकू शकले नाही. माझ्या सर्टिफिकेट्सच्या फाईलमध्ये ठेवून दिली आहेत.

तात्पर्य - आईने इतरांना समजेल अशा भाषेत माहिती देणे सगळ्यांना फायद्याचे.

सगळ्यांनीच मस्त लिहिलय.
अश्विनी के -- आपणच आपला मित्र व्हायचं >>>> मस्तच.

निवांत पाटील-- मस्तच तुम्ही लिहिलेलं पुर्ण पॅरा >>>>हा जो ग्राफ .... बहुतेक स्थितप्रज्ञ म्हणत असावेत.>>>> .पण तुम्ही लिहिलेलं मलातरी समजायला कठीनच गेलं . आधी माझ्या डोकयावरुन गेलं .मग सगळे तुम्ही लिहीलेले शब्द शोधुन काढले. मग मला समजलं .मला पण तेच सोप्या भाषेत लिहायचं होतं .पण मला असं लिहिताच आलं नसतं. Happy

अ‍ॅम्प्लिट्युड म्हणजे मोठेपणा ,आयाम ,अधिकता ,विपुलता ,विस्तार.
बहुआयामी म्हणजे मल्टिडायमेन्शन् बरोबर ना .? तुमची पुर्ण पोस्टच अभ्यास करण्यासारखी आहे. धन्यवाद

पोर्णिमा -- .>>>>स्ट्रेसफुल परिस्थितीमध्ये चुकूनमाकून जवळच्या व्यक्तींना/ मित्रांना उलटसुलट बोलून गेलो तर लागलीच मनापासून माफी मागायची. त्यात कमीपणा वाटून घ्यायचा नाही. पुन्हा असं होणार नाही याची काळजी घ्यायची. >>>> हे आवडलं . हे वाक्य मलाही आयुश्यात लागु पडलयं .धन्यवाद.

वरचा क्रीमच्या बिस्कीटाचा किस्सा खरच गोड. Happy

Autistic person is not sick neither it's a disease where medications are administered to feel better (unless otherwise specified). They are just different.

Anyway, this is my last post.

अमच्या अपार्ट्मेन्ट कॉम्लेक्स मधे एका कुटुंबात ऑटीझम च्या मुलाला जवळुन बघितले आहे. मुलगा रेग्युलर शाळेत जायचा आणि आई त्याच शाळेत त्याच्याच वर्गात व्हाऑलेन्टीयर काम करायची.

सगळ्यानीच छान लिहील आहे.
वरचा क्रीमच्या बिस्कीटाचा किस्सा खरच गोड.+१

धन्यवाद सर्वांना! छान चर्चा रंगली आहे इथे. Happy

पुरंदरे शशांक, तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. या सगळ्या मनाच्याच अवस्था असतात. खरं सांगायचे तर २ वर्षांत माझ्या मुलाने कळत नकळत इतकी प्रगती केली आहे! पण माझे मनच थकले होते.. पण इथे लिहून व तुमच्या सर्वांचे प्रतिसाद वाचून सांगता येणार नाही इतकी टवटवी आली आहे. परिस्थिती तीच आहे, पण माझे मन ताजेतवाने झाल्याने परिस्थिती तितकी वाईट वाटत नाही. उलट जसे वर बर्‍याच जणांनी म्हटले आहे तसं चांगल्या गोष्टी कॅप्चर केल्या जात आहेत. ग्रॅटीट्युड वाढत आहे. Happy

निवांत पाटील, पर्फेक्ट. आपल्याच मनाला प्रश्न विचारणे, कुठल्या प्रसंगावर मन निगेटीव्हली रिअ‍ॅक्ट करत असेल तर मी पूर्वी प्रश्न विचारायचे मनाला, "नक्की काय बोचत आहे? कुठल्या वाक्याने राग आला, इत्यादी" आणि त्याने बराच फरक (चांगला) पडायचा. मी हे विसरलेच होते.

पौर्णिमा, खाली ओळी अगदी पटल्या. स्वानुभव.
कोणाशीतरी बोलायचे. कोणत्यातरी मार्गाने व्यक्त व्हायचे. एखादे ईमोशन साचून राहिले की जेव्हा फ़ायनली ते बाहेर पडते तेव्हा हमखास वाईट/ नकोसे वळण घेते. वेळीच भावनांचा निचरा झाला की आपण बरेचसे ठिकाणावर राहतो.

राजसी, स्वाती२ तुम्हा दोघींचे म्हणणे पटते. परंतू राजसी, न सांगता समजुन घेण्यासारखी ही डिसऑर्डर नाही. वरवर पाहता मूल इतकं व्यवस्थित नॉर्मल दिसते. त्यामुळे अचानक विचित्र बिहेविअर्स दिसले की समजून घेणं अजुन अवघड जाते. एखाद्या माणसाचे हात पाय वाकडे असल्याने तो जरा वेगळा चालत असेल, तर आपण लगेच समजून घेऊ शकतो. आपल्याला आपुलकी देखील वाटू शकते. परंतू ऑटीस्टीक किड्स बर्याचदा फिजिकली एकदम नॉर्मल दिसतात. परंतू अचानक एखाद्या ट्रिगरने, सेन्सरी प्रोसेसिंगच्या डिसऑर्डरमुळे अगदी अचानक ते मूल विचित्र वागू शकते, किंचाळू शकते. अशा वेळेस आपोआप आठ्या पडतात बघ्यांच्या चेहर्‍यावर. हातपाय तुटलेल्या माणसाला मिळणारी सहानुभूती आपोआप इकडे मिळत नाही. मी जनरलाईझ करत आहे मान्य. किंवा परिस्थिती कळल्यावर त्या बघ्यांची रिअ‍ॅक्शन बदलेलही. पण म्हणूनच अजिबात काही न सांगता समाज समजून घेईल हे पॉसिबल वाटत नाही मला. त्यामुळे राजसी, स्टिग्मा आहे हे मलाही आवडत नाही, परंतू मान्य करावे लागते कारण तीच रिअ‍ॅलिटी आहे.

सिमंतिनी, आईने इतरांना समजेल अशा भाषेत माहिती देणे सगळ्यांना फायद्याचे.
हे पटलं आहे. म्हणूनच मी माझी वेबसाईट चालू करून लिहीत आहे. कारण मला ते सोयीचे वाटते.

प्रत्यक्ष समजावून सांगणे हे अतिशय थकवणारे काम आहे. माझ्याच नात्यातील काही लोकांना किती वेळा सांगून देखील या डिसॅबिलिटीबद्दल क्लिअर पिक्चर येत नाही. तू मुलाला वेगवेगळे पदार्थ खायला दे, सारखं थोद्याथोड्या वेळाने दे - खाईल तो. किंवा दात घासताना चूळ भरायला शिकव. हे आमच्या बाबतीत सोप्पं सोल्युशन नाही हे समजतच नही. इतकं सोप्पं नाही या गोष्टी डील करणे.. ते प्रत्यक्ष तुम्ही केलं तरच तुम्हाला त्यातील प्रॉब्लेम्स कळणे शक्य आहे. मी तुम्हाला एक्स्प्लेन करत बसले तर शक्यता आहे तुम्ही म्हणाल आई काही फार प्रयत्न करत नाही. इत्यादी इत्यादी. प्रत्येक ठिकाणी मी अ‍ॅदव्होकेट करत बसणे माझ्या अ‍ॅबिलिटीबाहेरचे आहे. Many a times I just give a plain reply to my son's weird behavior as: I donno why he does that. Something to do with his autism and sensory processing disorder .

मदर वॉरिअर,

A big hug to you. I have gone through some very very bad phase of my life, where I felt depressed,helpless,agitated,angry. I joined a group and life changed into a happy,joyful,positive journey. Pranayaam, meditation all helped me to come out of such depressing period. In our meditation group Siddha Samadhi Yoga USA( website www.liyausa.org) there is a couple who has autistic couple. Both parents say that this meditation group, meditation, pranayaam helped them a lot, also this group offers a parenting class which gives a joyful approach to deal with kids. Myself being a parent who got transformed into a joyful parent I recommend you for joining such group where you can start looking at life with positivity, I would rather say you yourself becomes the source of positivity, then rest comes right and bright. Please let me know if you are in San Francisco Bay Area or anywhere, I would really love to help you by any ways I can.

Cheers to you, who realised what this depression is and you have are wishing to come out of it.. Tathastu to that!!

आश, धन्यवाद! मी असं काही करून बघितले नाही कधी. बघते आमच्या भागात काही आहे का.

मागच्या पानावरच्या टेड टॉकच्या लिंकसाठी, जिज्ञासा थँक्स! राहून गेले तुमचे नाव. टेड टॉक बघितला नाही अजुन. पाहिन. Happy

सगळ्यानीच छान लिहील आहे
इथे लिहिण्यासारखं माझ्याकडे फार काही नाही. उलट तुमच्यासकट सगळ्यांनी लिहिलेलं वाचून मलाच खूप काही मिळालंय.
आमच्या लहान सहान प्रोब्लेम वरती मी हा उपाय वापरते. हि फेज पार पडल्यावर जे फळ मिळणार आहे त्याबद्दल एकमेकांशी बोलणे . मनातल्या मनात नाही मोठ्यादा बोलणे ते आपण कसे celetrate करणार हे ठरवणे. मलातरी खूप फरक पडतो
( हा वेडेपणा वाटू शकतो पण) आपली समस्या आपली काळजी घेणाऱ्या मृत व्यक्तीला सांगणे.. माझ्यासाठी हि व्यक्ती माझी आई आहे. का कुणास ठावूक खूप हलके वाटते.

मदर वॉरियर,

मला जेव्हा जेव्हा छोट्या मोठ्या गोष्टींचा राग येतो, दु:ख होतं, वैताग येतो तेव्हा मी तुमचे लेखण वाचतो/ आठवतो. तुमच्याकडे बघुन प्रेरणा घेतो. लक्षात येते कि आपण किती व्यर्थ त्रागा करतोय. आपण ईतके सुखवस्तू असुन किती कुरबुर करतो हे लक्षात येतं.

Does this help ????

aajachya lokmat nashik paper madhil batamichi Link & det ahe kahi upayog zaala tar bagha
http://epaper.lokmat.com/epapermain.aspx?queryed=14

स्टेमसेल थेरपीद्वारे स्वमग्न मुलांवर उपचार शक्य

मुंबई : स्वमग्न (ऑटिझमग्रस्त) मुले अन्य मुलांमध्ये फार मिसळत नाहीत. एखादी व्यक्ती बोलत असली तरी त्याच्याकडे ही मुले लक्ष देत नाहीत. स्वत:ला काही हवे असल्यास मागण्याचा प्रयत्न करतात, मात्र अन्य वेळी ही मुले सर्वांपासून अलिप्तच राहणे पसंत करतात. त्यामुळे या मुलांची समज कमी आहे किंवा त्यांची बौद्धिक क्षमता कमी आहे, असे म्हणून त्यांना हिणवले जाते.
प्रत्यक्षात मात्र त्यांच्या मेंदूची कार्यक्षमता कमी असते. अशा मुलांवर स्टेमसेल (मूळ पेशी) थेरपीचा उपचार केल्यास त्यांच्या वर्तनात व बोलण्यात लक्षणीय बदल दिसून येत असल्याचे निरीक्षण डॉ. नंदिनी गोकुलचंद्रन यांनी नोंदवले आहे. बालदिनानिमित्त जनजागृती अभियानांतर्गत पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. भारतामध्ये २५0 सर्वसामान्य मुलांपैकी एक जण स्वमग्न अर्थात ऑटिस्टिक असल्याचे आढळते. स्वमग्नता म्हणजे गतिमंद असाच समज आता समाजात रूढ होऊ पाहतो आहे. पण ही बाब अत्यंत चुकीची आहे. स्वमग्न मुलांची बौद्धिक क्षमता अन्य सामान्य मुलांप्रमाणेच असते, मात्र ही मुले त्यांचे विचार, भावना व्यक्त करू शकत नाहीत. या मुलांसाठी व्यवसायोपचारतज्ज्ञ, मानसोपचारतज्ज्ञ, वाचा उपचारतज्ज्ञ आणि विशेष शिक्षक यांच्या माध्यमातून उपचार केले जातात. मात्र तरीही स्वमग्न मुलांमध्ये म्हणावी तितकी प्रगती होताना दिसत नाही. मात्र स्टेमसेल थेरपीचा उपचार केल्यावर या मुलांच्या मेंदूच्या कार्यक्षमतेमध्ये लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून येते. स्टेमसेल थेरपी केलेल्या १00 स्वमग्न मुलांवर केलेल्या सर्वेक्षणामध्ये असे आढळून आले, की ३५ टक्के मुले बोलू लागली आहेत. तर ४८ टक्के मुले ही सांगितलेल्या गोष्टी योग्य पद्धतीने करतात. ५0 टक्के मुले तर नजरेला नजर भिडवून बोलू लागली आहेत. समजण्याची क्षमता आणि शिकण्याची क्षमता ४0 टक्के मुलांमध्ये वाढल्याचे दिसून आल्याचेही डॉ. नंदिनी यांनी सांगितले. (प्रतिनिधी) या मुलांना 'वेगळे' समजू नका..
लहानपणी देवेंद्र (नाव बदलले आहे.) इतर मुलांप्रमाणे बोलत नसे. स्वत:हून त्याला काही करता येत नव्हते. तीन वर्षांपूर्वी देवेंद्रवर स्टेमसेल थेरपी केली. यानंतर दैनंदिन कामे तो स्वत: करतो. त्याला सायकल चालवता येते. ही मुले खूप काही गोष्टी करू शकतात. यामुळे या मुलांना वेगळे समजू नये, असे देवेंद्रच्या आईने सांगितले.

मंजुडीला अनुमोदन!
मदर वॉरिअर, तुम्ही इतक्या सजग आहात हे तुमच्या मुलाचे भाग्य आहे. तुमचे आधीचे लेख हे स्पेशल नीड्स नव्हे तर सर्वच पालकांकरिता उद्बोधक आहेत, त्यामुळे तुमचा इथला निराशेचा सूर वाचवला नाही. काळजी वाटली. तुमची जिद्द, प्रयत्न यांना लवकर फळ मिळो ही सदिच्छा!
तुमचा ब्लॉगही पाहिला. मराठीत सर्व माहितीचे एकत्रीकरण ही अतिशय उपयुक्त कल्पना आहे. तुमच्या या विषयावरच्या लिखाणाला अनेक शुभेच्छा!

सर्वांचे आभार!

काव्या, हो स्टेमसेलचा फायदा होईल असं वाचले होते कुठेतरी. मुलाच्या जन्माच्यावेळेस विचारले होते आम्हाला. तेव्हा इतकी माहीती नव्हती याबद्दल, शिवाय महागही. त्यामुळे आम्ही नकार दिला होता.
आशा आहे विज्ञान अशीच प्रगती करत एकेदिवशी आमच्यासाठी पर्फेक्ट सोल्युशन शोधेल.

मृणाल १, आपली काळजी कुठे बोलून दाखवायचा स्वभाव नसल्याने अवघड होते. पण निदान चांगले फळ मिळेल त्याबद्दल कल्पनाचित्र रंगवणे हा उपाय जमण्यासारखा आहे. हळूहळू जमवत आहे परत ऑप्टीमिस्टीक राहण्यासाठी.

अतरंगी, धन्यवाद.

मंजुडी, खरे आहे. माझा हाच प्लॅन होता - एक उर्जास्थान. कधीही लो वाटलं तर या पानावर येऊन इंधन रिफिल करून कामाला लागायचे. सर्वांचे परत आभार त्यासाठी. मी कितीदा इथले सल्ले वाचले आहेत गेल्या १०-१२ दिवसांत! मला खरंच खूप ऊर्जा मिळाली इथून. मिळत राहील!

ज्ञाती, धन्यवाद. Happy

आपली काळजी कुठे बोलून दाखवायचा स्वभाव नसल्याने अवघड होते - ते तुझ्या लिहण्या वरून लक्षात आले म्हणूनच लिहिले की जी व्यक्ती आपल्यात नाही तिला सांगायचे .
कित्येक वेळा आपल्याला सल्ला पण नको असतो फक्त कोणीतरी एकुन घेतले तरी बरे वाटते पण कोणी आपल्या भावनांची थट्टा केली तर आपल्याला सहन होत नाही.

इथे प्रतिसाद देणार्‍या सर्वांचे पुन्हा एकदा आभार. मलाही फार overwhelming झाले की इथे आलो की बरे वाटते. ऑटिस्टिक मुलांना छक्केपंजे माहीत नसतात. अशा मुलीला तुम्ही अवडलात म्हणून तिने एक चित्र काढून दिले तर You are doing something right. ते चित्र जपून ठेवा.

हे एक उर्जास्थान. कधीही लो वाटलं तर या पानावर येऊन इंधन रिफिल करून कामाला लागायचे. सर्वांचे परत आभार त्यासाठी. मी कितीदा इथले सल्ले वाचले आहेत गेल्या १०-१२ दिवसांत! मला खरंच खूप ऊर्जा मिळाली इथून. मिळत राहील! >>>>> हे आम्हा सर्वांसाठीच एक उर्जास्थान आहे.... खूपच प्रॅक्टिकल सल्ले आणि मनाची मरगळ संपवणार्‍या गोष्टी सर्वांनीच सुरेखरित्या सांगितल्यात ... ग्रेट ...

हे एक उर्जास्थान. कधीही लो वाटलं तर या पानावर येऊन इंधन रिफिल करून कामाला लागायचे. सर्वांचे परत आभार त्यासाठी. मी कितीदा इथले सल्ले वाचले आहेत गेल्या १०-१२ दिवसांत! मला खरंच खूप ऊर्जा मिळाली इथून. मिळत राहील! >>>>> हे आम्हा सर्वांसाठीच एक उर्जास्थान आहे.... खूपच प्रॅक्टिकल सल्ले आणि मनाची मरगळ संपवणार्‍या गोष्टी सर्वांनीच सुरेखरित्या सांगितल्यात ... ग्रेट ...

१०० +. Same here. Be positive

कोर्सेराच वर्ल्ड म्युझिकचा ऑनलाईन कोर्स करताना माझी ओळख आफ्रिकन गायिका मिरीयम मकेबा (ममा आफ्रिका) हिच्या गाण्यांशी झाली. अफलातून गायन कौशल्य, हेलावणारे किंवा मस्तीखोर शब्द आणि स्टेजवरची तिची ऊर्जा पाहून मी या दिवंगत गायिकेच्या व तिच्या गाण्यांच्या प्रेमातच पडले. शेवटपर्यंत आयुष्यातल्या प्रतिकूलतेशी व अन्यायाशी झगडणाऱ्या मिरीयमची कहाणी बळ देणारी आहे आणि तिचे गाणे आनंद देणारे आहे.
असा आनंद देणारी गाणी ऐकताना, तिचा परफॉर्मन्स बघताना आयुष्याचा भरभरून आनंद लुटण्याचे व आला क्षण साजरा करण्याचे महत्त्व कळते.

मदर वॉरिअर, तुम्हाला नवीन वर्षाच्या खुप खुप शुभेच्छा . Happy

ऑटीझम या विषयावर संजय सुरकर यांची "आपकी अंतरा" ही मालिका काही वर्षांपुर्वी आली होती, त्यात या विषयाबद्दल जागरुकता व गांभीर्य आणि ऑटीझम विषयीची माहीती लोकांपर्यंत पोचवी यासाठीचा नाट्यमय प्रवास "अंतरा" च्या रुपाने दाखवला होता.त्या सिरीयल मधील काही भाग अतिशय महत्वपुर्ण रीतीने हाताळले होते.त्यातुन ऑटीस्टीक मुलांविषयीचे अनेक समज गैरसमज मला समजले होते , त्यामुळे ही सर्वांना सिरीयल पाहता यावी म्हणुन इथे देत आहे.

"आपकी अंतरा " मालिकेबद्दल इथे थोड्क्यात माहीती आहे. http://en.wikipedia.org/wiki/Aapki_Antara

आणि इथे पहील्यापासुन भाग पहाता येतील. http://www.youtube.com/watch?v=SOnKHn9htPI&index=1&list=ELpeD19cjBWv4

नंतर चे भाग तुम्हाला ह्याच लिंक वर सापडतील.

Pages